व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही कोणते त्याग करायला तयार आहात?

सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही कोणते त्याग करायला तयार आहात?

सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही कोणते त्याग करायला तयार आहात?

“मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?”—मत्त. १६:२६.

१. पेत्राने येशूला दटावले तेव्हा येशूने इतकी तीव्र प्रतिक्रिया का दाखवली?

प्रेषित पेत्राने जे ऐकले त्यावर त्याचा विश्‍वासच बसेना! येशू ख्रिस्त जो त्याचा गुरू होता आणि ज्याच्यावर त्याचे मनापासून प्रेम होते, तो अगदी ‘उघडपणे’ त्याला पुढे सोसाव्या लागणाऱ्‍या छळाबद्दल व मृत्यूबद्दल बोलत होता. हे ऐकून पेत्राने, अर्थातच चांगल्या हेतूने, येशूला दटावून म्हटले: “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” येशूने पेत्राकडे पाठ फिरवून आपल्या इतर शिष्यांकडे पाहिले. त्यांचाही कदाचित पेत्रासारखाच चुकीचा दृष्टिकोन असावा. मग, येशू पेत्राला म्हणाला: “सैताना, माझ्यापुढून चालता हो! कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे.”—मार्क ८:३२, ३३; मत्त. १६:२१-२३.

२. येशूचा खरा अनुयायी बनण्यासाठी काय करणे आवश्‍यक असल्याचे त्याने सांगितले?

येशूने अशी तीव्र प्रतिक्रिया का दाखवली हे कदाचित त्याच्या पुढील शब्दांवरून पेत्राला समजले असावे. येशूने “आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाहि बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता व सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील.” (मार्क ८:३४, ३५) येशूच्या शब्दांवरून हे स्पष्ट झाले की तो स्वतः तर आपले जीवन अर्पण करणार होताच, पण आपल्या अनुयायांकडूनही त्याची अशी अपेक्षा होती की त्यांनी देवाच्या सेवेकरता आपले जीवन त्यागण्यास तयार असावे. असे केल्यास त्यांना एक अतिशय मौल्यवान प्रतिफळ मिळेल असे त्याने सांगितले.मत्तय १६:२७ वाचा.

३. (क) येशूने कोणते प्रश्‍न विचारले? (ख) येशूच्या दुसऱ्‍या प्रश्‍नावरून त्याच्या श्रोत्यांना कदाचित कशाची आठवण झाली असावी?

त्याच प्रसंगी, येशूने विचार करण्यास भाग पाडणारे दोन प्रश्‍न विचारले: “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?” (मार्क ८:३६, ३७) यांपैकी पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर तर उघडच आहे. माणसाने सगळे जग मिळवले आणि आपले जीवन गमावले तर त्याला काहीही लाभ होणार नाही. मालमत्ता, धनसंपत्ती या गोष्टींना माणूस जिवंत असेपर्यंतच अर्थ आहे. येशूचा दुसरा प्रश्‍न असा होता: “मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?” यावरून त्याच्या श्रोत्यांना ईयोबाच्या काळात सैतानाने केलेल्या दाव्याची कदाचित आठवण झाली असेल: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयो. २:४) जे यहोवाची उपासना करत नाहीत, त्यांना कदाचित सैतानाचे म्हणणे खरेही वाटेल. खरोखरच, बरेच जण जिवंत राहण्यासाठी काहीही करायला, कोणत्याही तत्त्वाचे उल्लंघन करायला तयार होतील. पण, खरे ख्रिस्ती मात्र असा दृष्टिकोन बाळगत नाहीत.

४. येशूचे प्रश्‍न ख्रिश्‍चनांकरता गहिऱ्‍या अर्थाचे का आहेत?

आपल्याला माहीत आहे, की येशू आपल्याला या सध्याच्या जगात आरोग्य, धनसंपत्ती किंवा दीर्घायुष्य देण्यासाठी पृथ्वीवर आला नव्हता. तर, एका नव्या जगात सर्वकाळ जगण्याची संधी आपल्याकरता खुली करण्यासाठी तो आला होता. आणि तेच जीवन आपल्याला सर्वात मौल्यवान वाटते. (योहा. ३:१६) त्यामुळे, येशूने विचारलेल्या पहिल्या प्रश्‍नाचा एक ख्रिस्ती व्यक्‍ती असा अर्थ घेईल: “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि सार्वकालिक जीवनाची आशा गमावली तर त्याला काय लाभ?” अर्थातच, काहीही लाभ होणार नाही. (१ योहा. २:१५-१७) येशूच्या दुसऱ्‍या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘नव्या जगातील जीवनाची माझी आशा पक्की करण्यासाठी मी आज कितपत त्याग करण्यास तयार आहे?’ या प्रश्‍नाला आपले उत्तर काय आहे, हे आपल्या जीवनशैलीतून दिसून येते आणि त्यावरून ही आशा आपल्याला किती मौल्यवान वाटते हे देखील स्पष्ट होते.—योहा. १२:२५.

५. सार्वकालिक जीवनाचे वरदान मिळवण्याकरता आपण काय केले पाहिजे?

अर्थात, सार्वकालिक जीवन आपण स्वबळावर मिळवू शकतो असे येशू म्हणत नव्हता. खरे पाहता, सार्वकालिक जीवनच काय, पण सध्याच्या या जगातील क्षणभंगुर जीवन देखील एक वरदानच आहे. आपण काही मोबदला देऊन ते विकत घेऊ शकत नाही किंवा त्यावर आपला हक्क आहे असा दावा करू शकत नाही. सार्वकालिक जीवनाचे वरदान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे “ख्रिस्त येशूवर” आणि ‘आपला शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देणाऱ्‍या’ यहोवा देवावर ‘विश्‍वास ठेवणे.’ (गल. २:१६; इब्री ११:६) पण फक्‍त विश्‍वास ठेवून चालणार नाही, तर तो कृतींतून सिद्ध करणेही महत्त्वाचे आहे. कारण, ‘विश्‍वास क्रियांवाचून निर्जीव आहे.’ (याको. २:२६) म्हणूनच, येशूच्या प्रश्‍नावर आणखी खोलवर मनन करताना आपण गंभीरपणे आत्मपरीक्षण केले पाहिजे. माझा विश्‍वास खरोखर जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी मी या जगात कितपत त्याग करण्यास तयार आहे? आणि यहोवाच्या सेवेत मी कितपत झटण्यास तयार आहे?

‘ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही’

६. येशूने आपल्या जीवनात कशाला प्राधान्य दिले?

येशूने त्याच्या काळातील जगिक आकर्षणांमुळे विचलित न होता, जे खरोखर महत्त्वाचे होते त्यावरच आपले लक्ष केंद्रित केले. त्याने निरनिराळ्या चैनीच्या वस्तू मिळवून आपले जीवन सुखकर करण्याचा मोह टाळला. तो त्यागाचे जीवन जगला आणि देवाला आज्ञाधारक राहिला. स्वतःच्या सुखाकडे पाहण्याऐवजी त्याने म्हटले: “जे [देवाला] आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहा. ८:२९) देवाचे मन आनंदित करण्यासाठी येशू कोठवर त्याग करायला तयार होता?

७, ८. (क) येशूने कोणते अर्पण दिले आणि याकरता त्याला काय प्रतिफळ मिळाले? (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

एकदा येशूने आपल्या अनुयायांना असे सांगितले: “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्त. २०:२८) यापूर्वी, जेव्हा येशूने आपल्याला लवकरच ‘आपला प्राण अर्पण करावा’ लागेल असे त्याच्या अनुयायांना सांगितले तेव्हा पेत्राने त्याला स्वतःशी कठोरतेने न वागण्याची विनंती केली. तरीसुद्धा, येशू जराही डळमळला नाही. त्याने स्वेच्छेने मानवजातीकरता आपले परिपूर्ण मानवी जीवन अर्पण केले. तो अशा प्रकारे निःस्वार्थी जीवन जगल्यामुळे त्याचे स्वतःचे भवितव्य सुरक्षित राहिले. त्याचे पुनरुत्थान करण्यात आले आणि त्याला ‘देवाच्या उजव्या हाताकडे बसविण्यात आले.’ (प्रे. कृत्ये २:३२, ३३) अशा रीतीने त्याने आपल्याकरता एक उत्तम आदर्श मांडला.

प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला की त्यांनी ‘आपल्याच सुखाकडे पाहू नये’ व त्यांना आठवण करून दिली की “ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” (रोम. १५:१-३) तर मग, आपण प्रेषित पौलाच्या या सल्ल्याचे पालन करून ख्रिस्ताप्रमाणे कितपत स्वार्थत्याग करण्यास तयार आहोत?

आपण यहोवाला सर्वात उत्तम तेच द्यावे अशी तो अपेक्षा करतो

९. आपण देवाला समर्पण करतो तेव्हा खरे तर आपण काय करत असतो?

प्राचीन इस्राएलात, मोशेच्या नियमशास्त्रानुसार इब्री दासांनी सात वर्षे आपल्या मालकाची सेवा केल्यानंतर किंवा ज्युबिली वर्षादरम्यान त्यांना दास्यातून मुक्‍त केले जायचे. पण, त्यांच्यापुढे एक दुसरा पर्यायही होता. जर एखादा दास आपल्या मालकावरील प्रेमामुळे आयुष्यभर त्याचा दास बनून राहू इच्छित असेल तर तो असे करू शकत होता. (अनुवाद १५:१२, १६, १७ वाचा.) आपण देवाला समर्पण करतो तेव्हा आपणही अशाच प्रकारचा निर्णय घेत असतो. आपल्याला जे आवडते ते करण्याऐवजी आपण जीवनात देवाच्या इच्छेनुसार वागू असे आपण स्वेच्छेने कबूल करतो. असे करण्याद्वारे, यहोवावर आपले किती मनापासून प्रेम आहे आणि त्याची सर्वकाळ सेवा करण्याची आपल्याला किती उत्कट इच्छा आहे हे आपण दाखवतो.

१०. आपण कोणत्या अर्थाने देवाच्या मालकीचे आहोत आणि याचा आपल्या विचारांवर व कृतींवर कसा प्रभाव पडण्यास हवा?

१० जर तुम्ही सध्या यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत असाल, सुवार्तेच्या प्रचारात सहभागी होत असाल आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहात असाल तर हे नक्कीच प्रशंसनीय आहे. आम्ही आशा बाळगतो की लवकरच तुम्हाला आपले जीवन यहोवाला समर्पित करावेसे वाटेल. आणि इथियोपिअन माणसाने फिलिप्पाला प्रश्‍न विचारल्याप्रमाणे तुम्हालाही हा प्रश्‍न विचारावासा वाटेल: “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” (प्रे. कृत्ये ८:३५, ३६) मग, देवासोबतचा तुमचा नातेसंबंधही त्या ख्रिश्‍चनांसारखाच बनेल, ज्यांना पौलाने असे लिहिले होते: “तुम्ही स्वतःचे मालक नाही; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा.” (१ करिंथ. ६:१९, २०) आपली आशा स्वर्गीय जीवनाची असो वा पृथ्वीवरील, ज्याअर्थी आपण यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे त्याअर्थी तोच आपला मालक आहे. तर मग, आपल्या स्वार्थी इच्छा दडपून टाकणे व ‘माणसाचे गुलाम होण्याचे’ टाळणे खरोखर किती महत्त्वाचे आहे! (१ करिंथ. ७:२३) यहोवाला योग्य वाटेल त्या मार्गाने त्याने आपला उपयोग करून घ्यावा म्हणून त्याचा एक विश्‍वासू सेवक बनणे हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे!

११. ख्रिश्‍चनांना कशा प्रकारचे बलिदान करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे आणि मोशेच्या नियमशास्त्रातील बलिदानांच्या साहाय्याने हे कसे स्पष्ट करता येईल?

११ पौलाने सहविश्‍वासू बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.” (रोम. १२:१) या शब्दांवरून कदाचित यहुदी ख्रिश्‍चनांना, येशूचे अनुयायी बनण्याअगोदर ते आपल्या उपासनेत जी बलिदाने देत होते त्यांची आठवण झाली असावी. त्यांना माहीत होते, की मोशेच्या नियमशास्त्रानुसार यहोवाच्या वेदीवर अर्पण केलेले पशू उत्तम प्रतीचे असणे आवश्‍यक होते. दोष असलेले किंवा कमी प्रतीचे पशू बलिदानाकरता अयोग्य होते. (मला. १:८, १३) आपण आपली शरीरे ‘जिवंत यज्ञाच्या’ रूपात यहोवाला सादर करतो, त्याअर्थी हे तत्त्व आपल्यालाही लागू होते. आपण यहोवाला सर्वात उत्तम तेच देऊ इच्छितो. स्वतःच्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्यानंतर आपल्याजवळ जे उरेल ते यहोवाला अर्पण करणे निश्‍चितच योग्य ठरणार नाही. आपण यहोवाला समर्पण करतो तेव्हा स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता, आपले जीवन पूर्णपणे त्याच्या हवाली करतो. आपल्याजवळ जे काही आहे, म्हणजे आपली शक्‍ती, संपत्ती, कौशल्ये, सर्व काही आपण यहोवाला देतो. (कलस्सै. ३:२३) व्यावहारिक दृष्टिकोनाने पाहिल्यास यात काय समाविष्ट आहे?

वेळेचा सदुपयोग करा

१२, १३. यहोवाला सर्वात उत्तम प्रतीचा यज्ञ अर्पण करण्याचा एक मार्ग कोणता?

१२ यहोवाला सर्वात उत्तम प्रतीचा यज्ञ अर्पण करण्याचा एक मार्ग म्हणजे, आपल्या वेळेचा सदुपयोग करणे. (इफिसकर ५:१५, १६ वाचा.) याकरता आत्मसंयमाची गरज आहे. कारण, जगिक प्रभावांसोबतच आपल्या उपजत अपरिपूर्णतेमुळे, केवळ स्वतःच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी आपल्या वेळेचा उपयोग करण्याची आपली प्रवृत्ती असते. अर्थात, “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.” त्यामुळे, मौजमजा, विश्रांती तसेच नोकरी-व्यवसाय याही गोष्टी आवश्‍यक आहेत. कारण, या गोष्टी आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास आपल्याला साहाय्यक ठरतात. (उप. ३:१) पण, एका समर्पित ख्रिस्ती व्यक्‍तीने जीवनात समतोल साधून सुजाणतेने आपल्या वेळेचा उपयोग केला पाहिजे.

१३ पौलाने अथेनै शहरास भेट दिली तेव्हा त्याला असे आढळले की, “काहीतरी नवलविशेष सांगितल्याऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्‍यांचा वेळ जात नसे.” (प्रे. कृत्ये १७:२१) आजही बरेच जण अशाच प्रकारे आपला वेळ घालवतात. टीव्ही बघणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा इंटरनेटवर सर्फिंग करणे या आधुनिक काळातील काही वेळखाऊ गोष्टी आहेत. आणि अशा वेळ वाया घालवणाऱ्‍या गोष्टींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जर आपण या गोष्टींमध्ये रमलो तर साहजिकच आपल्या आध्यात्मिक गरजांकडे आपले दुर्लक्ष होईल. आणि यहोवाच्या सेवेशी संबंधित ज्या “श्रेष्ठ” म्हणजेच जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांच्याकरता आपल्याजवळ वेळच नाही असेही आपल्याला वाटू लागण्याची शक्यता आहे.—फिलिप्पै. १:९, १०.

१४. कोणत्या प्रश्‍नांवर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे?

१४ म्हणूनच, यहोवाच्या प्रत्येक समर्पित सेवकाने स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजे: ‘मी दररोज बायबल वाचण्यासाठी, मनन आणि प्रार्थना करण्यासाठी वेळ काढतो का?’ (स्तो. ७७:१२; ११९:९७; १ थेस्सलनी. ५:१७) ‘ख्रिस्ती सभांची तयारी करण्याकरता मी एक निश्‍चित वेळ ठरवली आहे का? सभेत उत्तरं देण्याद्वारे मी इतरांना प्रोत्साहन देतो का?’ (स्तो. १२२:१; इब्री २:१२) देवाचे वचन सांगते, की पौल व बर्णबा हे ‘बराच काळ प्रभूमध्ये धैर्याने बोलले.’ (प्रे. कृत्ये १४:३, पं.र.भा.) तुम्हीही आपल्या जीवनात काही फेरबदल करून प्रचार कार्याला अधिक वेळ देऊ शकाल का, किंवा पायनियर सेवा हाती घेऊन या कार्यात “बराच काळ” घालवू शकाल का?इब्री लोकांस १३:१५ वाचा.

१५. वडील आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करतात?

१५ प्रेषित पौल व बर्णबा यांनी अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीला भेट दिली, तेव्हा “ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले” व त्यांनी त्यांस प्रोत्साहन दिले. (प्रे. कृत्ये १४:२८) आजही प्रेमळ वडील इतरांचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपला बराच वेळ खर्च करतात. क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासोबतच, मेंढपाळ भेटी देण्याकरता, अक्रियाशील झालेल्यांना मदत करण्याकरता, आजारी व्यक्‍तींना साहाय्य करण्याकरता तसेच मंडळीतील अनेक जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता वडील बरीच मेहनत घेतात. जर तुम्ही बाप्तिस्माप्राप्त बंधू असाल तर तुम्हाला सेवेतील हे विशेषाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे?

१६. आपण कोणकोणत्या मार्गांनी “विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करू शकतो?

१६ मानव-निर्मित किंवा नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्यांना साहाय्य पुरवण्याच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे अनेकांना समाधान लाभले आहे. उदाहरणार्थ, बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या एका साठी ओलांडलेल्या बहिणीने अनेकदा साहाय्य कार्यात सहभाग घेतला आहे. याकरता त्यांना दूरवर प्रवास देखील करावा लागला. स्वतःच्या रजेचा अशा प्रकारे उपयोग त्यांना का करावासा वाटला? त्या म्हणतात: “मला काही विशिष्ट कामाचा अनुभव नसला तरी मी पडेल ते काम केलं. खरं तर, ही माझ्याकरता एक खास सुसंधी होती. इतकं नुकसान सोसल्यावरही विश्‍वासात मजबूत राहिलेल्या माझ्या भाऊबहिणींना पाहून मला खूप प्रोत्साहन मिळालं.” या व्यतिरिक्‍त, हजारो जणांनी राज्य सभागृहांच्या व संमेलन गृहांच्या बांधकामात साहाय्य केले आहे. अशा कार्यांत सहभाग घेण्याद्वारे आपण निःस्वार्थीपणे “विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करतो.—गल. ६:१०.

“मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”

१७. सार्वकालिक जीवनाच्या मोबदल्यात तुम्ही कोणते त्याग करण्यास तयार आहात?

१७ देवापासून विमुख झालेल्या मानव समाजाचा लवकरच नाश होणार आहे. हे नेमके केव्हा घडेल हे आपल्याला माहीत नसले, तरी “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे” आणि “ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे” हे आपल्याला माहीत आहे. (१ करिंथकर ७:२९-३१ वाचा.) यामुळे, “मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?” हा येशूचा प्रश्‍न सध्याच्या काळात आणखीनच अर्थपूर्ण बनतो. यहोवा आपल्याकडून कोणतेही त्याग करण्याची अपेक्षा करत असला तरी, “खरे जीवन” मिळवण्याकरता, आपण ते त्याग नक्कीच करू. (१ तीम. ६:१९) म्हणूनच, येशूने ‘त्याला अनुसरत राहण्याची’ आणि ‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटण्याची’ जी आज्ञा दिली होती तिचे पालन करणे सध्याच्या काळात अत्यंत गरजेचे आहे.—मत्त. ६:३१-३३; २४:१३.

१८. आपण कोणता भरवसा बाळगू शकतो आणि का?

१८ हे कबूल आहे, की येशूला अनुसरणे सोपे नाही. येशूने स्वतःच सांगितल्यानुसार, काहींना त्याचे अनुसरण करण्याकरता आपले जीवनही गमवावे लागले आहे. तरीसुद्धा, येशूप्रमाणेच आपणही स्वतःवर “दया” करण्याचा मोह टाळतो. पहिल्या शतकातील त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांना त्याने जे आश्‍वासन दिले होते त्यावर आपला पूर्ण भरवसा आहे: “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:२०) तर मग, यहोवाच्या पवित्र सेवेत आपल्याला शक्य होईल तितका वेळ व शक्‍ती खर्च करण्याचा आपण प्रयत्न करू या. असे करण्याद्वारे, आपण हा भरवसा व्यक्‍त करतो की येणाऱ्‍या मोठ्या संकटातून यहोवा आपले संरक्षण करेल. आणि जर त्याअगोदर आपला मृत्यू झाला तर तो नव्या जगात आपल्याला पुन्हा जिवंत करेल. (इब्री ६:१०) अशा प्रकारे, आपण हे दाखवून दिलेले असेल की सार्वकालिक जीवनाचे वरदानच आपल्याला सर्वात मौल्यवान वाटते.

तुमचे उत्तर काय असेल?

• येशूने स्वेच्छेने देवाची आणि मानवांची सेवा करण्याची उल्लेखनीय मनोवृत्ती कशा प्रकारे दाखवली?

• आपण आत्मत्यागी मनोवृत्ती का बाळगली पाहिजे आणि ही मनोवृत्ती आपण कशा प्रकारे दाखवू शकतो?

• प्राचीन काळात यहोवाने केवळ कोणत्या प्रकारची बलिदाने स्वीकारली आणि यावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

• आपण कशा प्रकारे आपल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्रे]

येशूने सर्वदा देवाला जे आवडते तेच केले

[२८ पानांवरील चित्र]

कृतज्ञ मनोवृत्तीच्या इस्राएल लोकांनी यहोवाला उत्तम प्रतीची बलिदाने अर्पण केली

[२९ पानांवरील चित्रे]

आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याद्वारे आपण देवाचे मन आनंदित करू शकतो