व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून

आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून

आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून

“तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर . . . संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.”—मार्क १२:३०.

१. मानवजातीसाठी देवाचा मूळ उद्देश काय होता?

मानवांकरता असलेल्या यहोवा देवाच्या मूळ उद्देशात आजारपण व मृत्यू या गोष्टींचा समावेश नव्हता. आदाम व हव्वेला एका सुखदायक नंदनवनात, म्हणजेच एदेन बागेत, “तिची मशागत व राखण करण्यास” ठेवण्यात आले होते. (उत्प. २:८, १५; स्तो. ९०:१०) जर हे पहिले जोडपे यहोवाला विश्‍वासू राहिले असते आणि त्याच्यावर पूर्ण मनाने प्रेम करून त्याच्या सार्वभौमत्त्वाच्या अधीन राहिले असते तर त्यांना आजारपण, दुर्बलता व मृत्यू या गोष्टींना कधीच तोंड द्यावे लागले नसते.

२, ३. (क) उपदेशकाच्या पुस्तकात वृद्धावस्थेचे वर्णन कशा प्रकारे करण्यात आले आहे? (ख) आदामापासून वारशाने आलेल्या मुत्यूसाठी कोण जबाबदार आहे, आणि त्याचे परिणाम कसे नाहीसे केले जातील?

उपदेशकाच्या १२ व्या अध्यायात अपरिपूर्ण मानवांना म्हातारपणामुळे जे “अनिष्ट दिवस” येतात त्यांचे बोलके वर्णन करण्यात आले आहे. (उपदेशक १२:१-७ वाचा.) पांढऱ्‍या केसांची तुलना ‘बदामाच्या’ मोहोराशी करण्यात आली आहे. पायांना “बळकट पुरुष” म्हणण्यात आले आहे, जे म्हातारपणी वाकतात व लटपटतात. उजेडासाठी खिडक्यांतून पाहणाऱ्‍या स्त्रियांना अंधाराशिवाय काहीच दिसत नाही असे उपदेशक म्हणतो. हे क्षीण होत चाललेल्या दृष्टीचे अगदी अचूक वर्णन आहे. म्हातारपणी दात पडतात याचे वर्णन, “दळणाऱ्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल” असे करण्यात आले आहे.

एका विशिष्ट काळानंतर मनुष्य म्हातारा व्हावा, त्याचे पाय अशक्‍त व्हावेत, दृष्टी कमजोर व्हावी, दात पडावेत असा देवाचा उद्देश निश्‍चितच नव्हता. आदामापासून वारशाने आलेला मुत्यू, ‘सैतानाच्या कृत्यांपैकी’ एक आहे ज्याला देवाचा पुत्र आपल्या मशीही राज्याद्वारे काढून टाकेल. प्रेषित योहानाने लिहले: “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला.”—१ योहा. ३:८.

माफक प्रमाणात काळजी वाटणे स्वाभाविक आहे

४. यहोवाचे सेवक आपल्या आरोग्याविषयी माफक काळजी का बाळगतात, पण त्यासोबतच त्यांना कशाची जाणीव आहे?

अपरिपूर्ण मानवजातीत सर्वांनाच आजारपण व म्हातारपण यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यहोवाच्या काही सेवकांनाही सध्याच्या काळात या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, आपल्या आरोग्याविषयी माफक प्रमाणात काळजी वाटणे स्वाभाविक तर आहेच, शिवाय, याचे काही फायदेही आहेत. चांगले आरोग्य नसल्यास आपल्याला यहोवाची पूर्ण शक्‍तीने सेवा करता येईल का? (मार्क १२:३०) पण माफक प्रमाणात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच आपण वास्तवाची जाणीव ठेवून हे ओळखले पाहिजे, की म्हातारपण किंवा आजारपण पूर्णपणे टाळणे आपल्या हातात नाही.

५. गतकाळात आजारपणाला तोंड दिलेल्या देवाच्या विश्‍वासू सेवकांकडून आपल्याला काही शिकता येण्यासारखे आहे का?

यहोवाच्या विश्‍वासू सेवकांपैकी अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यांच्यापैकी एपफ्रदीत हा एक होता. (फिलिप्पै. २:२५-२७) प्रेषित पौलाचा विश्‍वासू सोबती तीमथ्य यालाही पोटाचे दुखणे होते. म्हणूनच, पौलाने त्याला अधूनमधून ‘थोडा द्राक्षारस घेण्याचा’ सल्ला दिला होता. (१ तीम. ५:२३) स्वतः पौलाने देखील त्याच्या ‘शरीरात एक काटा’ असल्याचा उल्लेख केला होता. हे कदाचित त्याने आपल्या डोळ्यांच्या त्रासाविषयी किंवा इतर कोणत्या शारीरिक व्याधीच्या संदर्भात सांगितले असावे, ज्याकरता त्याकाळी कोणताही इलाज उपलब्ध नव्हता. (२ करिंथ. १२:७; गल. ४:१५; ६:११) या ‘शरीरातील काट्याविषयी’ पौलाने यहोवाकडे अनेकदा कळकळीने विनंती केली होती. (२ करिंथ. १२:७; गल. ४:१५; ६:११) देवाने पौलाला त्याच्या ‘शरीरातील काट्यापासून’ चमत्कारिक रीत्या मुक्‍त केले नाही. उलट त्याने पौलाला त्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य दिले. अशा रीतीने पौलाच्या दुर्बलतेतून यहोवाचे सामर्थ्य प्रकट झाले. यात आपल्याकरता काही धडा आहे का?

आरोग्याविषयी अनावश्‍यक चिंता करण्याचे टाळा

६, ७. आपण आपल्या आरोग्याविषयी फाजील चिंता करण्याचे का टाळले पाहिजे?

यहोवाचे साक्षीदार वैद्यकीय उपचारांच्या किंवा निरनिराळ्या प्रकारच्या उपचारपद्धतींच्या विरोधात नाहीत. काही भाषांतून प्रसिद्ध होणाऱ्‍या आपल्या सावध राहा! या नियतकालिकात अनेकदा आरोग्यासंबंधी लेख प्रकाशित केले जातात. आणि कोणत्याही विशिष्ट उपचाराची जरी आपण शिफारस करत नसलो, तरीही वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांच्या मदतीची व साहाय्याची आपण मनापासून कदर करतो. अर्थात, संपूर्ण स्वास्थ्य मिळवणे सध्याच्या काळात तरी शक्य नाही हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आरोग्याच्या काळजीने पूर्णपणे पछाडून जाणे किंवा सतत त्याचाच विचार करणे सुज्ञपणाचे नाही. आपली मनोवृत्ती जगातील इतर लोकांसारखी नसावी. भविष्याविषयी “आशाहीन” असल्यामुळे त्यांना सध्याचेच जीवन सर्व काही आहे असे वाटते; आणि त्यामुळे आपला रोग बरा करण्यासाठी ते कोणताही उपचार अवलंबण्यास तयार असतात. (इफिस. २:२, १२) पण आपण मात्र सध्याचे जीवन वाचवण्यासाठी यहोवाची मर्जी निश्‍चितच गमावू इच्छित नाही. कारण आपल्याला खात्री आहे की जर आपण देवाला विश्‍वासू राहिलो तर त्याने प्रतिज्ञा केलेल्या नव्या जगात सार्वकालिक जीवन, म्हणजेच “खरे जीवन ते बळकट धरण्यास . . . चांगला आधार होईल.”—१ तीम. ६:१२, १९; २ पेत्र ३:१३.

आरोग्याविषयी अनावश्‍यक चिंता करण्याचे आपण आणखी एका कारणामुळे टाळतो. आरोग्याविषयी प्रमाणापेक्षा जास्त काळजी केल्यास, फक्‍त स्वतःचाच विचार करण्याची स्वार्थी प्रवृत्ती आपल्यात येऊ शकते. पौलाने फिलिप्पैकरांना या धोक्याविषयी सावध केले होते. त्याने म्हटले: “तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.” (फिलिप्पै. २:४) स्वतःची माफक प्रमाणात काळजी घेणे निश्‍चितच योग्य आहे. पण, आपल्या बांधवांबद्दल आणि आपण ज्या लोकांना ‘राज्याची सुवार्ता’ सांगतो त्यांच्याही हिताची आपल्याला काळजी असल्यामुळे आपण सतत केवळ स्वतःच्या आरोग्याचाच विचार करत बसत नाही.—मत्त. २४:१४.

८. आरोग्याविषयी फाजील चिंता केल्यामुळे काय घडू शकते?

आरोग्याविषयी अनावश्‍यक चिंता केल्यामुळे एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीचे देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांकडे दुर्लक्ष होण्याचाही धोका आहे. तसेच, यामुळे कधीकधी आपल्याला विशिष्ट आहारपद्धतीविषयी किंवा उपचाराविषयी इतरांवर स्वतःचे विचार लादण्याचाही मोह होऊ शकतो. या बाबतीत, पौलाच्या पुढील शब्दांत गोवलेले तत्त्व लक्षात घ्या: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.”—फिलिप्पै. १:१०.

जास्त महत्त्वाचे काय?

९. जास्त महत्त्वाची असलेली अशी कोणती एक गोष्ट आहे, जिच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये आणि का?

पौलाने म्हटल्याप्रमाणे, जर आपण श्रेष्ठ म्हणजेच जास्त महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत असू तर आध्यात्मिक दृष्ट्या लोकांना चांगले आरोग्य मिळवून देण्याच्या कार्यात आपण हिरिरीने सहभाग घेऊ. हे कार्य म्हणजे देवाच्या वचनात जे सांगितले आहे त्याविषयी प्रचार करणे व शिकवणे. या आनंददायक कार्याचा फायदा आपल्याला व ज्यांना आपण शिकवतो त्यांनाही होतो. (नीति. १७:२२; १ तीम. ४:१५, १६) आपल्या नियतकालिकांत, गंभीर आजारपणाला तोंड देत असलेल्या भाऊबहिणींचे अनुभव अधूनमधून प्रकाशित होतात. यांत ते सांगतात की इतरांना यहोवाविषयी व त्याच्या अद्‌भुत प्रतिज्ञांविषयी जाणून घेण्यास मदत केल्यामुळे त्यांना आपल्या समस्यांना तोंड देण्यास साहाय्य मिळते आणि काही वेळापुरता स्वतःच्या दुखण्यांचा विसर पडतो. *

१०. उपचारपद्धती विचारपूर्वक निवडणे का महत्त्वाचे आहे?

१० एखादी आरोग्यविषयक समस्या उद्‌भवल्यास, कोणता उपचार निवडावा यासंबंधी प्रत्येक प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तीने ‘आपला स्वतःचा भार वाहिला पाहिजे.’ (गल. ६:५) आपण कोणती उपचार पद्धती निवडतो याचा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो हे आपण विसरू नये. उदाहरणार्थ, बायबलमधील तत्त्वांबद्दल आदर दाखवून आपण ‘रक्‍तापासून अलिप्त राहतो.’ त्याच प्रकारे, देवाच्या वचनाबद्दल मनःपूर्वक आदर असल्यामुळे, आध्यात्मिक रीत्या ज्यांमुळे आपल्याला हानी होऊ शकते किंवा यहोवासोबतचा आपला नातेसंबंध बिघडू शकतो अशी कोणतीही उपचाराची पद्धत न स्वीकारण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल. (प्रे. कृत्ये १५:२०) रोगनिदानाच्या व उपचाराच्या काही पद्धती भूतविद्येशी मिळत्याजुळत्या असतात. ज्या धर्मत्यागी इस्राएल लोकांनी भूतविद्येचा मार्ग अवलंबला त्यांची उपासना यहोवाने स्वीकारली नाही. त्याने म्हटले: “निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धुपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरविणे मला खपत नाही; सणाचा मेळा, [“चेटूक,” NW] हाहि अधर्मच होय.” (यश. १:१३) आजारपणाला तोंड देताना आपण निश्‍चितच असे काहीही करू इच्छिणार नाही ज्यामुळे आपल्या प्रार्थनांमध्ये व्यत्यय येईल व देवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येईल.—विलाप. ३:४४.

“सुबुद्धीने” वागणे आवश्‍यक

११, १२. वैद्यकीय उपचार निवडताना “सुबुद्धीने” वागण्याची आवश्‍यकता का आहे?

११ आपण आजारी असतो तेव्हा यहोवाने चमत्कार करून आपल्याला बरे करावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. पण, योग्य उपचार निवडण्याकरता यहोवाने आपले मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आपण करू शकतो. बायबलमधील तत्त्वांच्या साहाय्याने, सुज्ञपणे निर्णय घेता यावा अशी आपण यहोवाला विनंती करू शकतो. आजार गंभीर स्वरूपाचा असतो तेव्हा, शक्य झाल्यास आणखी एखाददुसऱ्‍या तज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. हे नीतिसूत्रे १५:२२ यातील तत्त्वाशी सुसंगत आहे, जे म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.” प्रेषित पौलाने ख्रिस्ती बांधवांना “आताच्या काळात सुबुद्धीने, व न्यायाने व सुभक्‍तीने वागावे” असा सल्ला दिला.—तीत २:१२, पं.र.भा.

१२ येशूच्या काळातील एका स्त्रीसारखाच बऱ्‍याच जणांना अनुभव येतो. मार्क ५:२५, २६ यात असे म्हटले आहे: “तेथे रक्‍तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्‍याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता.” येशूने त्या स्त्रीला बरे केले आणि तिच्याशी दयाळूपणे वागला. (मार्क ५:२७-३४) काही ख्रिस्ती व्यक्‍तींनी आपल्या आजारामुळे हताश होऊन, खऱ्‍या उपासनेच्या तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्‍या निदान व उपचार पद्धती निवडल्याची उदाहरणे आहेत.

१३, १४. (क) उपचार निवडताना सैतान कशा प्रकारे आपली सचोटी भंग करण्याचा प्रयत्न करू शकतो? (ख) गूढ शक्‍तींशी जराही संबंध असलेल्या सर्व गोष्टी आपण का टाळल्या पाहिजेत?

१३ खऱ्‍या उपासनेपासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी सैतान कोणताही मार्ग अवलंबू शकतो. काही जणांना तो लैंगिक अनैतिकता व संपत्तीच्या लोभामुळे अडखळायला लावतो. तर इतरांची सचोटी भंग करण्यासाठी तो गूढ शक्‍ती व भूतविद्येशी संबंधित असलेल्या, व त्यामुळे ख्रिश्‍चनांकरता योग्य नसलेल्या उपचारांचा वापर करतो. आपण दुष्ट सैतानापासून आणि सर्व प्रकारच्या वाईट कार्यांपासून आपले संरक्षण करण्याची यहोवाला प्रार्थना करतो. पण जर आपण गूढ शक्‍ती व भूतविद्येशी संबंधित असलेले उपचार स्वीकारलेत, तर हे सैतानाचेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासारखे ठरेल.—मत्त. ६:१३; तीत २:१४.

१४ यहोवाने इस्राएल लोकांना चेटूक व मंत्रतंत्र करण्यास मनाई केली होती. (अनु. १८:१०-१२) पौलानेही ‘देहाच्या कर्मांविषयी’ सांगताना ‘चेटकांचा’ त्यांत समावेश केला. (गलती. ५:१९, २०) शिवाय, ‘चेटूक करणाऱ्‍यांना’ यहोवाच्या नव्या जगात प्रवेश मिळणार नाही. (प्रकटी. २१:८) तेव्हा, भूतविद्येचा जराही अंश असलेल्या कोणत्याही गोष्टीची यहोवाला घृणा वाटते हे अगदीच स्पष्ट आहे.

“तुमचा समंजसपणा सर्वांना कळून यावा”

१५, १६. उपचार निवडताना आपल्याला सुबुद्धीची आवश्‍यकता का आहे आणि पहिल्या शतकातील नियमन मंडळाने कोणता सुज्ञ सल्ला दिला होता?

१५ वरील माहिती लक्षात घेता, एखाद्या रोगनिदान अथवा उपचार पद्धतीविषयी आपल्याला शंका असल्यास ती न स्वीकारणेच सुज्ञपणाचे ठरेल. अर्थात, एखादे विशिष्ट उपचार तंत्र कशा प्रकारे कार्य करते हे कदाचित आपल्याला इतरांना समजावून सांगता येणार नाही. पण याचा अर्थ, ते भूतविद्येशी संबंधित आहे असे म्हणता येत नाही. आरोग्याबद्दल शास्त्रवचनीय दृष्टिकोन बाळगण्याकरता आपल्याजवळ देवाकडून मिळणारी बुद्धी व उत्तम निर्णयशक्‍ती असण्याची गरज आहे. नीतिसूत्रांतील ३ ऱ्‍या अध्यायात आपल्याला हा सल्ला सापडतो: ‘तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन अशी होतील.’—नीति. ३:५, ६, २१, २२.

१६ तर मग, आपले आरोग्य उत्तम स्थितीत ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न करण्यात काही गैर नाही. पण या प्रयत्नात, आपल्याला देवाची संमती गमवावी लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. इतर गोष्टींप्रमाणेच, या बाबतीतही बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहण्याद्वारे, “आपला समंजसपणा सर्वांना कळून यावा.” (फिलिप्पै. ४:५) पहिल्या शतकात नियमन मंडळाने लिहिलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या पत्रात त्यांनी ख्रिश्‍चनांना मूर्तिपूजा, रक्‍त व जारकर्म यांपासून अलिप्त राहण्याची आज्ञा दिली होती. त्या पत्रात असेही आश्‍वासन देण्यात आले होते: “ह्‍यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल.” (प्रे. कृत्ये १५:२८, २९) ते कसे?

परिपूर्ण आरोग्याची आशा डोळ्यांसमोर ठेवा

१७. बायबलमधील तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपल्याला शारीरिक दृष्ट्या कोणता फायदा झाला आहे?

१७ आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, ‘रक्‍त व जारकर्म यांविषयी बायबलमधील तत्त्वांचे काटेकोर पालन केल्यामुळे मला जो फायदा झाला आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे का?’ तसेच, ‘देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करण्याचा’ प्रयत्न केल्यामुळे आपल्याला जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांचाही विचार करा. (२ करिंथ. ७:१) वैयक्‍तिक स्वच्छतेसंबंधी बायबलमधील सूचनांचे पालन केल्यामुळे आपल्याला अनेक आजार टाळता येतात. तंबाखू व अवैध मादक पदार्थांच्या, शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक रीत्याही अशुद्ध करणाऱ्‍या सवयींपासून दूर राहिल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते. तसेच, खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम बाळगल्यामुळे आपल्या आरोग्यावर जो चांगला परिणाम होतो तोही लक्षात घ्या. (नीतिसूत्रे २३:२०; तीताला पत्र २:२, ३ वाचा.) पुरेशी विश्रांती व व्यायाम यांसारख्या गोष्टी जरी चांगल्या स्वास्थ्याला हातभार लावत असल्या, तरीसुद्धा बायबलमधील मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळेच खरे तर आपल्याला शारीरिक व आध्यात्मिक दृष्ट्या खूप फायदा झाला आहे.

१८. आपल्याला सर्वात जास्त काळजी कशाची असली पाहिजे आणि आरोग्याच्या संदर्भात आपण कोणत्या भविष्यवाणीची पूर्णता होण्याची आतुरतेने वाट पाहू शकतो?

१८ शारीरिक आरोग्यापेक्षाही आपण आपले आध्यात्मिक आरोग्य जपले पाहिजे आणि यहोवासोबतचा आपला मौल्यवान नातेसंबंध दिवसेंदिवस बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या “आताच्या व पुढच्याहि,” म्हणजेच नव्या जगातील जीवनाचाही स्रोत यहोवाच आहे. (१ तीम. ४:८; स्तो. ३६:९) त्या नव्या जगात, येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर पापांची क्षमा केली जाईल आणि परिणामी, सर्व प्रकारच्या आध्यात्मिक व शारीरिक व्याधी पूर्णपणे नाहीशा केल्या जातील. देवाचा कोकरा, येशू ख्रिस्त आपल्याला “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांजवळ” नेईल आणि देव आपल्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकेल. (प्रकटी. ७:१४-१७; २२:१, २) तसेच, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही,” या हर्षदायक भविष्यवाणीची पूर्णताही आपण त्यावेळी अनुभवू.—यश. ३३:२४.

१९. आरोग्याची माफक काळजी घेत असताना आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१९ आपल्या मुक्‍तीचा काळ जवळ आला असल्याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. आणि यहोवा जेव्हा आजारपणाची व मृत्यूची प्रकिया पूर्णपणे उलटवेल तो दिवस पाहण्याची आपल्याला उत्कंठा लागलेली आहे. पण तोपर्यंत, आपण खात्री बाळगू शकतो, की आपला प्रेमळ पिता आपली सर्व दुखणी सहन करण्याचे सामर्थ्य आपल्याला देईल, कारण त्याला आपली काळजी आहे. (१ पेत्र ५:७) म्हणून, आपण आपल्या आरोग्याची निगा जरूर राखावी, पण देवाच्या प्रेरित वचनातील सुस्पष्ट मार्गदर्शनाच्या चाकोरीत राहूनच!

[तळटीप]

^ परि. 9 अशा प्रकारच्या लेखांची एक यादी टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, २००३ या अंकातील पृष्ठ १७ वरील पेटीत दिलेली आहे.

उजळणी

• आपण आजारी पडतो त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि पापांच्या परिणामांपासून आपल्याला कोण सोडवेल?

• आरोग्याबद्दल काळजी वाटणे जरी स्वाभाविक असले, तरी आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

• आपण कोणती उपचार पद्धती निवडतो याचा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो असे का म्हणता येते?

• आरोग्याच्या संदर्भात बायबलमधील तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

मानवांनी आजारी पडावे, म्हातारे व्हावे असा मुळात यहोवाचा उद्देशच नव्हता

[२५ पानांवरील चित्र]

आरोग्याच्या समस्यांना तोंड देतानाही यहोवाच्या लोकांना सेवाकार्यात सहभाग घेतल्यामुळे आनंद मिळतो