व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कळपापासून भटकलेल्यांना मदत करा

कळपापासून भटकलेल्यांना मदत करा

कळपापासून भटकलेल्यांना मदत करा

“माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.”—लूक १५:६.

१. येशू कशा प्रकारे एक प्रेमळ मेंढपाळ ठरला?

यहोवाचा एकुलता एक पुत्र असलेल्या येशू ख्रिस्ताला “मेंढरांचा महान मेंढपाळ” असे म्हटले आहे. (इब्री १३:२०) असा एक मेंढपाळ येईल हे शास्त्रवचनांत पूर्वीच भाकीत करण्यात आले होते आणि येशू खरोखरच एक उत्तम मेंढपाळ असल्याचेही त्यांत दाखवण्यात आले. त्याने इस्राएलाच्या ‘हरवलेल्या मेंढरांना’ शोधण्याचा प्रयत्न केला. (मत्त. २:१-६; १५:२४) शिवाय, एक मेंढपाळ ज्या प्रकारे आपल्या मेंढरांचे संरक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो, त्याच प्रकारे येशूने मेंढरांसमान लोकांच्या फायद्यासाठी आपले जीवन खंडणी बलिदानाच्या रूपात दिले.—योहा. १०:११, १५; १ योहा. २:१, २.

२. काही ख्रिस्ती कोणत्या कारणांमुळे अक्रियाशील बनले असावेत?

दुःखाची गोष्ट म्हणजे, जे एके काळी येशूच्या बलिदानाबद्दल कदर बाळगत होते व ज्यांनी देवाला आपले जीवन समर्पण केले होते, त्यांपैकी काही जण आज ख्रिस्ती मंडळीपासून दूर गेले आहेत. नैराश्‍य, आजारपण किंवा अशा इतर कारणांमुळे त्यांचा उत्साह मावळला असण्याची आणि यामुळे ते अक्रियाशील बनले असण्याची शक्यता आहे. पण, दाविदाने २३ व्या स्तोत्रात ज्या शांती व समाधानाविषयी सांगितले ते त्यांना केवळ देवाच्या कळपातच अनुभवता येईल. उदाहरणार्थ, दाविदाने आपल्या स्तोत्रात म्हटले: “परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.” (स्तो. २३:१) देवाच्या कळपाचा भाग असलेल्यांना आध्यात्मिक रीत्या कसलीही उणीव नाही. पण, कळपातून भटकलेल्या मेंढरांबद्दल असे म्हणता येत नाही. या मेंढरांना कोण मदत करू शकतात? त्यांना कशा प्रकारे साहाय्य केले जाऊ शकते? कळपात परत येण्यास त्यांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?

कोण मदत करू शकतात?

३. देवाच्या कुरणातील हरवलेल्या मेंढरांना मदत कशी करता येईल याबद्दल येशूने काय सांगितले?

देवाच्या कुरणातील हरवलेल्या मेंढरांना मदत करण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. (स्तो. १००:३) हे समजावण्याकरता येशूने म्हटले: “कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हास खचित सांगतो. तसे ह्‍या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.” (मत्त. १८:१२-१४) तर मग, कळपापासून दूर गेलेल्या मेंढरांसमान लोकांना कोण साहाय्य करू शकतात?

४, ५. देवाच्या कळपाप्रती वडिलांची कशा प्रकारची मनोवृत्ती असली पाहिजे?

भटकलेल्या मेंढरांना मदत करण्यासाठी ख्रिस्ती वडिलांनी हे आठवणीत ठेवले पाहिजे की देवाचा कळप यहोवाला सर्मपण केलेल्या लोकांची मंडळी आहे. आणि ही ‘[देवाच्या] कुरणातील मेंढरे’ त्याच्याकरता अतिशय मौल्यवान आहेत. (स्तो. ७९:१३) या प्रिय मेंढरांची प्रेमळपणे काळजी घेण्याची गरज आहे. आणि यासाठी, प्रेमळ मेंढपाळांनी त्यांच्यामध्ये वैयक्‍तिक आस्था घेतली पाहिजे. मैत्रीभावाने त्यांना मेंढपाळ भेटी देणे अतिशय प्रभावकारी ठरू शकते. मेंढपाळाने दिलेल्या प्रेमळ उत्तेजनामुळे त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या उभारी मिळेल आणि यामुळे कळपात परत येण्याची त्यांची इच्छा प्रबळ होईल.—१ करिंथ. ८:१.

मेंढपाळांवर देवाच्या कळपातून भटकलेल्या मेंढरांना शोधण्याची आणि त्यांना साहाय्य करण्याची जबाबदारी आहे. प्रेषित पौलाने प्राचीन इफिसस येथील ख्रिस्ती वडिलांना त्यांच्या मेंढपाळकत्वाच्या जबाबदारीबद्दल आठवण करून देताना असे म्हटले: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास पर्यवेक्षक नेमले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या पुत्राच्या रक्‍ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रे. कृत्ये २०:२८, NW) त्याच प्रकारे, प्रेषित पेत्रानेही अभिषिक्‍त वडिलांना असे प्रोत्साहन दिले: “तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा; तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा.”—१ पेत्र ५:१-३.

६. विशेषत: आजच्या काळात मेंढपाळांनी देवाच्या मेंढरांची काळजी घेणे का गरजेचे आहे?

ख्रिस्ती मेंढपाळांनी “उत्तम मेंढपाळ” असलेल्या येशूचे अनुकरण केले पाहिजे. (योहा. १०:११) त्याला देवाच्या मेंढरांची अतिशय काळजी होती आणि म्हणूनच “माझी मेंढरे पाळ,” असे शिमोन पेत्राला सांगण्याद्वारे मेंढरांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे त्याने दाखवले. (योहान २१:१५-१७ वाचा.) खासकरून, आजच्या काळात मेढरांची अशा प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. कारण देवाच्या समर्पित लोकांची सचोटी भंग करण्यासाठी सैतानाने आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. स्वाभाविक उणिवांचा गैरफायदा घेऊन व या जगाच्या प्रलोभनांचा वापर करून सैतान, यहोवाच्या मेंढरांना गैरकृत्ये करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. (१ योहा. २:१५-१७; ५:१९) कळपापासून भरकटलेली मेंढरे सैतानाच्या कुयुक्त्यांना बळी पडण्याची जास्त शक्यता आहे. म्हणूनच, ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा’ सल्ला अंमलात आणण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. (गल. ५:१६-२१, २५) अशा मेंढरांना साहाय्य करण्यासाठी, देवावर प्रार्थनापूर्वक अवलंबून राहणे, त्याच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळवणे, तसेच देवाच्या वचनाचा कुशलतापूर्वक वापर करणे आवश्‍यक आहे.—नीति. ३:५, ६; लूक ११:१३; इब्री ४:१२.

७. वडिलांनी आपल्या देखरेखीखाली असलेल्या मेंढरांसमान लोकांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे?

प्राचीन इस्राएलातील मेंढपाळ आपल्या मेंढरांना मार्ग दाखवण्यासाठी एक लांब काठी किंवा आकडी वापरत. मेंढरे मेंढवाड्यात जाताना किंवा त्यातून बाहेर पडताना “काठीखालून” जात आणि मेंढपाळ त्यांना मोजत असे. (लेवी. २७:३२; मीखा २:१२; ७:१४) त्याच प्रकारे, ख्रिस्ती मेंढपाळांनीही आपल्या देखरेखीखाली असलेल्या कळपाला चांगल्या प्रकारे ओळखण्याची व त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (नीतिवचन २७:२३ पडताळून पाहा.) म्हणूनच, कळपातील मेंढरांची काळजी कशी घेता येईल हा वडील वर्गाच्या सभेतील महत्त्वाचा मुद्दा असतो. यात भटकलेल्या मेंढराला मदत करण्यासाठी व्यवस्था करणेही समाविष्ट आहे. यहोवाने स्वतः म्हटले होते की मी आपल्या मेंढरांचा शोध घेईन आणि त्यांची आवश्‍यक काळजी घेईन. (यहे. ३४:११) म्हणून, भटकलेल्या मेंढरांना परत कळपात येण्यास मदत करण्यासाठी वडीलजन परिश्रम घेतात तेव्हा देवाला आनंद होतो.

८. वडील कोणकोणत्या मार्गांनी मेंढरांकडे वैयक्‍तिक रीत्या लक्ष पुरवू शकतात?

एखादा भाऊ किंवा बहीण आजारी असते तेव्हा देवाच्या कळपाच्या मेंढपाळाने त्यांना भेट दिल्यास त्यांना खूप आनंद होतो व प्रोत्साहन मिळते. त्याच प्रकारे, आध्यात्मिक अर्थाने आजारी असलेल्या एखाद्या मेंढराकडे वैयक्‍तिक लक्ष पुरवले जाते, तेव्हा त्यालाही आनंद होतो व प्रोत्साहन मिळते. वडील अक्रियाशील झालेल्या व्यक्‍तीसोबत बायबल वाचू शकतात, एखाद्या लेखाची चर्चा करू शकतात, सभेतील मुख्य मुद्दयांवर चर्चा करू शकतात, प्रार्थना करू शकतात आणि अशाच इतर मार्गांनी त्यांना मदत करू शकतात. तुम्ही मंडळीच्या सभांमध्ये परत येऊ लागल्यास, मंडळीतील सर्वांना आनंदच होईल असेही वडील त्यांना सांगू शकतात. (२ करिंथ. १:३-७; याको. ५:१३-१५) त्यांना जाऊन भेटणे, फोन करणे किंवा लहानसे पत्र लिहून त्यांची विचारपूस करणे या साध्याशा गोष्टींमुळेही बराच फरक पडू शकतो! अशा रीतीने, कळपातून भटकलेल्या मेंढराला वैयक्‍तिक रीत्या साहाय्य केल्याने दयाळू ख्रिस्ती मेंढपाळाचाही आनंद द्विगुणित होईल.

आपल्या सर्वांचेच योगदान!

९, १०. भटकलेल्या मेंढराबद्दल काळजी व्यक्‍त करणे हे वडिलांपुरतेच मर्यादित नाही असे आपण का म्हणू शकतो?

आपला एखादा भाऊ किंवा बहीण मंडळीतून हळूहळू भरकटत चालला आहे हे या कठीण काळातील धकाधकीच्या जीवनात कदाचित आपल्या लक्षात येणार नाही. (इब्री २:१) पण, यहोवाच्या नजरेत मात्र त्याची मेंढरे अतिशय मौल्यवान आहेत. ज्या प्रकारे शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो, त्याच प्रकारे यहोवाच्या कळपातील प्रत्येक मेंढरू महत्त्वाचे आहे. म्हणूनच, आपल्या सर्वांनाच आपल्या बांधवांबद्दल आस्था व कळकळ वाटली पाहिजे. (१ करिंथ. १२:२५) तुमचीही अशीच मनोवृत्ती आहे का?

१० भटकलेल्या मेंढरांना शोधण्याच्या व त्यांना साहाय्य करण्याच्या कार्यात सहसा वडील पुढाकार घेतात. तरीपण, मंडळीपासून दूर गेलेल्यांबद्दल काळजी व्यक्‍त करणे हे फक्‍त ख्रिस्ती पर्यवेक्षकांपुरतेच मर्यादित नाही. या कार्यात इतरही जण मेंढपाळांना सहकार्य करू शकतात. कळपात परत येण्यासाठी ज्यांना मदतीची गरज आहे अशा भाऊ-बहिणींना आपण प्रोत्साहन व आध्यात्मिक साहाय्य देऊ शकतो, किंबहुना आपण दिले पाहिजे. तर मग, आपण त्यांना कशा प्रकारे साहाय्य करू शकतो?

११, १२. आध्यात्मिक साहाय्याची गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला कोणती खास संधी मिळू शकते?

११ मदत मिळवण्याची इच्छा व्यक्‍त करणाऱ्‍या अक्रियाशील व्यक्‍तींसोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी, वडील विशिष्ट परिस्थितीत, अनुभवी राज्य प्रचारकांची व्यवस्था करू शकतात. असे करण्याचा उद्देश म्हणजे, त्या व्यक्‍तींची देवाप्रती असलेली “पहिली प्रीति” पुन्हा जागृत करणे. (प्रकटी. २:१, ४) हे भाऊ-बहिण मंडळीपासून दूर गेलेले असताना ज्या गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या नाहीत, त्या गोष्टींची उजळणी त्यांच्यासोबत केल्याने त्यांचा विश्‍वास मजबूत होऊ शकतो.

१२ वडिलांनी जर तुम्हाला एखाद्या भाऊ किंवा बहिणीला आध्यात्मिक साहाय्य देण्यास सांगितले, तर मार्गदर्शनासाठी आणि तुमच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. ‘आपली सर्व कार्ये परमेश्‍वरावर सोपवा, म्हणजे तुमचे बेत सिद्धीस जातील.’ (नीति. १६:३) आध्यात्मिक साहाय्याची गरज असलेल्यांसोबत चर्चा करताना वापरता येतील अशा शास्त्रवचनांवर व विश्‍वासाला पुष्टी देणाऱ्‍या मुद्द्‌यांवर मनन करा. प्रेषित पौलाचे उत्कृष्ट उदाहरण लक्षात घ्या. (रोमकर १:११, १२ वाचा.) रोममधील ख्रिस्ती बांधवांना आध्यात्मिक कृपादान देऊन त्यांना विश्‍वासात दृढ करावे म्हणून त्यांना भेटण्याची पौलाला उत्कंठा लागली होती. तसेच, त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळवण्यासही तो उत्सुक होता. देवाच्या कळपातून भटकलेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न करताना आपणही अशीच मनोवृत्ती बाळगू नये का?

१३. अक्रियाशील व्यक्‍तीशी तुम्ही कोणत्या गोष्टींवर चर्चा कराल?

१३ चर्चेदरम्यान तुम्ही त्यांना असे विचारू शकता, “तुम्हाला सत्य कसं मिळालं?” त्यांच्या गतकाळातील आनंददायक आठवणींना उजाळा द्या. सभांमध्ये, प्रचार कार्यात तसेच अधिवेशनांमध्ये एके काळी अनुभवलेल्या आनंददायक क्षणांबद्दल सांगण्याचे त्या अक्रियाशील भाऊ किंवा बहिणीला प्रोत्साहन द्या. जो आनंदी काळ तुम्ही सोबत मिळून घालवला त्याविषयी बोला. यहोवासोबत असलेल्या घनिष्ट नातेसंबंधामुळे तुम्हाला जो आनंद मिळतो त्याबद्दल बोला. (याको. ४:८) देवाचे लोक या नात्याने तो आपली किती प्रेमळपणे काळजी घेतो, विशेषतः कठीण प्रसंगांना तोंड देताना तो जे सांत्वन व बळ देतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करा.—रोम. १५:४; २ करिंथ. १:३, ४.

१४, १५. अक्रियाशील जनांना त्यांनी एके काळी अनुभवलेल्या कोणत्या आशीर्वादांची आठवण करून देणे साहाय्यक ठरू शकते?

१४ अक्रियाशील व्यक्‍तीने मंडळीच्या सहवासात असताना अनुभवलेल्या काही आशीर्वादांची तिला आठवण करून देणे फायद्याचे ठरेल. उदाहरणार्थ, देवाच्या वचनाबद्दल व त्याच्या उद्देशाबद्दल दिवसेंदिवस अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा आशीर्वाद. (नीति. ४:१८) जेव्हा ते ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ होते तेव्हा पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या प्रलोभनांचा प्रतिकार करणे नक्कीच सोपे होते. (गल. ५:२२-२६) परिणामी, शुद्ध विवेकाने यहोवाला प्रार्थना करणे त्यांना शक्य होते. तसेच, ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली व त्यांची अंतःकरणे व त्यांचे विचार राखणारी देवाने दिलेली शांति’ उपभोगणे त्यांना शक्य होते. (फिलिप्पै. ४:६, ७) तर मग, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, आपल्या आध्यात्मिक भाऊ किंवा बहिणीबद्दल प्रामाणिक आस्था व्यक्‍त करा आणि त्यांना कळपात परत येण्याचे प्रेमळ प्रोत्साहन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.फिलिप्पैकर २:४ वाचा.

१५ समजा तुम्ही एक वडील आहात आणि तुम्ही अक्रियाशील झालेल्या एका विवाहित जोडप्याला मेंढपाळ भेट द्यायला गेला आहात. तुम्ही त्यांना देवाच्या वचनातून पहिल्यांदा सत्य शिकल्यावर कसे वाटले यावर विचार करायला प्रोत्साहन देऊ शकता. सत्य खरोखरच अद्‌भुत, मनाला पटण्याजोगे, समाधानकारक आणि खोट्या शिकवणींपासून मुक्‍त करणारे असे होते! (योहा. ८:३२) यहोवाबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल व त्याच्या अद्‌भुत उद्देशांबद्दल शिकायला मिळाले तेव्हा त्यांचे अंतकरण कृतज्ञतेने कसे भरून आले होते. (लूक २४:३२ पडताळून पाहा.) समर्पित ख्रिश्‍चनांना यहोवासोबत जो जवळचा नातेसंबंध आणि शुद्ध विवेकाने त्याला प्रार्थना करण्याचा जो अद्‌भुत विशेषाधिकार अनुभवण्यास मिळतो त्याची त्यांना आठवण करून द्या. ‘धन्यवादित देवाच्या गौरवी सुवार्तेला’ पुन्हा एकदा प्रतिसाद देण्याचा या अक्रियाशील जनांना आर्जव करा.—१ तीम. १:११.

त्यांच्याबद्दल प्रीती दाखवत राहा

१६. आध्यात्मिक साहाय्य देण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच फलदायी ठरतात याचे एक उदाहरण सांगा?

१६ येथे सुचवलेल्या या गोष्टी खरोखरच परिणामकारक ठरतात का? होय. उदाहरणार्थ, १२ वर्षांचा असताना राज्य प्रचारक बनलेला एक तरुण, वयाच्या १५ व्या वर्षी अक्रियाशील झाला. पण, नंतर तो पुन्हा क्रियाशील बनला आणि आता त्याला पूर्ण वेळेच्या सेवेत ३० पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. एका ख्रिस्ती वडिलाने दिलेल्या मदतीमुळेच तो पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रगती करू शकला. त्या वडिलांकडून मिळालेल्या मदतीबद्दल तो नक्कीच आभारी असेल!

१७, १८. देवाच्या कळपापासून भटकलेल्या एखाद्या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी तुम्हाला कोणते गुण साहाय्यक ठरतील?

१७ अक्रियाशील झालेल्यांना मंडळीत परत येण्यासाठी साहाय्य देण्यास ख्रिश्‍चनांना प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे प्रीती. येशूने आपल्या अनुयायांबद्दल असे म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३४, ३५) होय, प्रीती खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे ओळखचिन्ह आहे. तर मग, बाप्तिस्मा झालेल्या, पण काही कारणांमुळे अक्रियाशील झालेल्या ख्रिश्‍चनांप्रती आपण ही प्रीती दाखवू नये का? निश्‍चितच दाखवली पाहिजे! पण, अशांना मदत पुरवण्यासाठी आपल्याला अनेक ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्याची गरज आहे.

१८ देवाच्या कळपापासून भटकलेल्या एखाद्या व्यक्‍तीला मदत करण्यासाठी तुम्हाला कोणते गुण दाखवावे लागतील? प्रीतीव्यतिरिक्‍त तुम्हाला सहानुभूती, दयाळूपणा, सौम्यता आणि सहनशीलता हे गुण देखील दाखवावे लागू शकतात. परिस्थिती लक्षात घेऊन कधीकधी तुम्हाला क्षमाशीलही असावे लागेल. पौलाने असे लिहिले: “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सै. ३:१२-१४.

१९. मेंढरांसमान लोकांना ख्रिस्ती कळपात परत येण्यासाठी मदत करण्याचे प्रयत्न सार्थक ठरतील असे का म्हणता येईल?

१९ काही जण देवाच्या कळपापासून का भटकतात याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात येईल. तसेच, ते मंडळीत परत येतात तेव्हा आपल्या बांधवांकडून ते कशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा करू शकतात याबद्दलही चर्चा करण्यात येईल. त्या लेखाचा अभ्यास करून त्यावर मनन करताना हे विसरू नका की मेंढरांसमान लोकांना ख्रिस्ती कळपात परत येण्यास मदत करण्याकरता तुम्ही जे काही प्रयत्न करता ते सार्थक ठरतील. बरेच लोक आपले संपूर्ण आयुष्य धनसंपत्ती गोळा करण्याच्या प्रयत्नात खर्ची घालतात, पण एखाद्या व्यक्‍तीचे जीवन जगातल्या सर्व संपत्तीपेक्षा जास्त मोलाचे आहे. हरवलेल्या मेंढराच्या दृष्टांतात येशूने याच गोष्टीवर भर दिला होता. (मत्त. १८:१२-१४) तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून, तुम्ही कळपातून भटकलेल्या यहोवाच्या प्रिय मेंढरांना पुन्हा कळपात परत येण्यासाठी मदत करण्याचा, तातडीने व मनःपूर्वक प्रयत्न कराल ही आशा.

तुमचे उत्तर काय असेल?

• कळपापासून भटकलेल्या मेंढरांसमान लोकांप्रती ख्रिस्ती मेंढपाळांची कोणती जबाबदारी आहे?

• मंडळीत सध्या सक्रिय नसलेल्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

• कळपापासून भटकलेल्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला कोणते गुण साहाय्यक ठरतील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

देवाच्या कळपापासून भटकलेल्यांना ख्रिस्ती मेंढपाळ प्रेमळपणे मदत करण्याचा प्रयत्न करतात