व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचे आहे?

तुम्हाला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचे आहे?

तुम्हाला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचे आहे?

फिलिपीन्झच्या एका शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्‍याने एका पायनियर बहिणीला म्हटले: “हा मनुष्य बदललाच कसा? तुम्ही केलं तरी काय?” मग टेबलावरच्या कागदांच्या थप्पीकडे बोट दाखवत तो म्हणाला, “ही सगळी याच्याविरुद्ध आजपर्यंत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रं आहेत. खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. या शहरातली आमची एक डोकेदुखी तुम्ही कमी केलीय.” हा मनुष्य दारूच्या नशेत मारामाऱ्‍या करायचा आणि सतत कोणत्या न कोणत्या बेकायदेशीर कृत्यांत अडकायचा. तर मग, त्याला आपल्या जीवनात एवढा मोठा बदल करण्यास कशामुळे प्रेरणा मिळाली? देवाचे वचन बायबल, यातील प्रेरित संदेशामुळे.

प्रेषित पौलाने असा सल्ला दिला, ‘तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, आणि देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.’ (इफिस. ४:२२-२४) हा सल्ला मनावर घेऊन बऱ्‍याच व्यक्‍तींनी आपल्या जीवनात बदल केले आहेत. किंबहुना, ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारणाऱ्‍या प्रत्येकाला आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल हे करावेच लागतात, मग ते लहानसहान बदल असोत वा मोठे.

पण, व्यक्‍तिमत्त्वात बदल करून बाप्तिस्मा होण्याइतकी पात्रता मिळवणे ही केवळ एक सुरुवात म्हणता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या काष्ठशिल्पकाराला लाकडाची एखादी सुंदर कोरीव वस्तू बनवायची असते तेव्हा तो लाकडाचा एक ठोकळा घेऊन त्यापासून त्या विशिष्ट वस्तूचा ढोबळ आकार तयार करतो. या घडीला, ती वस्तू काय आहे हे जरी ओळखता येत असले, तरी अजून बरेच काम बाकी असते. काष्ठशिल्पकाराला त्या वस्तूचे सौंदर्य वाढवण्याकरता बरेच कोरीवकाम करावे लागते. तेव्हा कोठे, ती वस्तू सुंदर कलेचा एक नमूना बनते. आपला बाप्तिस्मा होतो तेव्हा आपणही त्या ढोबळ आकाराच्या लाकडी वस्तूसारखे असतो. आपल्या व्यक्‍तिमत्त्वात देवाचा सेवक बनण्याकरता आवश्‍यक असणारे मूलभूत गुण तर असतात, पण ही केवळ एक सुरुवात असते. या नव्या व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा करण्याकरता आपल्याला पुढेही त्यात बदल करावे लागतात.

पौलालाही आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्याची गरज जाणवली. त्याने प्रामाणिकपणे म्हटले: “जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो.” (रोम. ७:२१) आपण मुळात कसे आहोत आणि आपण कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छितो याची पौलाला स्पष्ट जाणीव होती. आपल्याविषयी काय? आपणही स्वतःला विचारले पाहिजे: ‘मी मुळात कशा प्रकारची व्यक्‍ती आहे? आणि मी कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छितो?’

मी मुळात कशा प्रकारची व्यक्‍ती आहे?

एखाद्या जुन्या घराची डागडुजी करताना, फक्‍त बाहेरून रंगरंगोटी करून चालणार नाही. घरातील तुळया जर कुजलेल्या असतील तर घराला रंग लावून काय उपयोग? घराचा ढाचाच कमजोर झालेला असेल, तर पुढे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्याच प्रकारे, चांगुलपणाचा फक्‍त आव आणण्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्याऐवजी, आपण आपल्या अंतःकरणात डोकावून आपले खरे व्यक्‍तिमत्त्व कसे आहे, आपल्यात कोणते दोष आहेत आणि त्यांवर कशी मात करता येईल याचे परीक्षण केले पाहिजे. नाहीतर, हे जुने अवगुण आज ना उद्या डोके वर काढतील. म्हणूनच, आत्मपरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. (२ करिंथ. १३:५) आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील वाईट गुण ओळखून ते सुधारणे गरजेचे आहे. आणि यासाठी यहोवाने आपल्याला मदत पुरवली आहे.

पौलाने लिहिले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री ४:१२) देवाचे लिखित वचन बायबल यातील संदेशात, आपल्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पाडण्याचे सामर्थ्य आहे. ते आपल्याला अगदी आतपर्यंत—लाक्षणिकरित्या आपल्या हाडांतील मज्जेपर्यंत भेदून जाते. आपण वरवर कसेही दिसत असलो, किंवा आपला स्वतःविषयी काहीही ग्रह असला, तरी देवाचे वचन आपले आंतरिक विचार व हेतू उघड करून आपले खरे व्यक्‍तिमत्त्व उजेडात आणते. आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील खरे दोष कोणते, हे ओळखण्यासाठी खरोखर बायबल किती मदतदायक ठरू शकते!

जुन्या घराची दुरुस्ती करताना, फक्‍त खराब झालेले साहित्य बदलणेच पुरेसे नसते. तर ते दोष का निर्माण झाले हे जाणून घेतल्यास ते पुन्हा उद्‌भवणार नाहीत याची काळजी घेता येते. त्याच प्रकारे, आपल्या व्यक्‍तिमत्त्वातील फक्‍त दोषच नव्हे, तर ते कशामुळे निर्माण झाले, कोणत्या गोष्टींनी त्यांत भर घातली हे स्पष्टपणे ओळखल्यास आपल्याला त्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला अनेक गोष्टी आकार देत असतात. उदाहरणार्थ, समाजातील आपले स्थान, आपली आर्थिक स्थिती, आपल्या भोवतीचे वातावरण, आपल्यावर झालेले संस्कार, आपले आईवडील, मित्र व सोबती तसेच आपली धार्मिक पार्श्‍वभूमी. इतकेच काय, तर जे टीव्हीवरील कार्यक्रम किंवा चित्रपट आपण पाहतो, तसेच इतर करमणुकीचे प्रकार देखील आपल्या व्यक्‍तिमत्त्वावर त्यांचा ठसा उमटवतात. तेव्हा, आपल्या व्यक्‍तिमत्त्वावर नकारात्मक प्रभाव पाडणाऱ्‍या गोष्टी ओळखल्यास, आपण त्यांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलू शकतो.

स्वतःचे परीक्षण केल्यानंतर, ‘मी तर हा असाच आहे,’ असे कदाचित आपल्याला म्हणावेसे वाटेल. पण अशा प्रकारे तर्क करणे चुकीचे आहे. करिंथ मंडळीत जे पूर्वी व्यभिचारी, समलिंगी किंवा दारूडे होते त्यांच्याविषयी पौलाने म्हटले: ‘तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले असे झाला.’ (१ करिंथ. ६:९-११) यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपणही आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आवश्‍यक बदल नक्कीच करू शकतो.

फिलिपीन्झमध्ये राहणाऱ्‍या मार्कोस * नावाच्या एका मनुष्याचे उदाहरण पाहू या. आपण कशा वातावरणात वाढलो हे सांगताना मार्कोस म्हणतो: “माझ्या आईवडिलांची सतत भांडणं व्हायची. त्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षापासूनच मी बंडखोर बनलो.” जुगार, चोऱ्‍या व बंदुकीचा धाक दाखवून लोकांना लुटणे यांसारख्या प्रकारांसाठी मार्कोस कुख्यात होता. त्याच्या काही मित्रांचा व त्याचा एका विमानाचे अपहरण करण्याचाही बेत होता. पण त्यांचा मनसुबा पूर्ण झाला नाही. लग्न झाल्यावरही मार्कोसचे हे गैरप्रकार चालूच राहिले. शेवटी, त्याच्याजवळ होते नव्हते ते सारे त्याने जुगारात गमावले. त्याची बायको त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत होती. काही काळाने, मार्कोसही तिच्यासोबत अभ्यासाला बसू लागला. सुरुवातीला, आपण साक्षीदार बनण्यास लायक नाही असे त्याला वाटे. पण त्याला जे जे शिकायला मिळाले त्याचे पालन केल्यामुळे आणि सभांना उपस्थित राहिल्यामुळे त्याला आपल्या पूर्वीच्या वाईट सवयी सोडून देण्यास साहाय्य मिळाले. आता तो बाप्तिस्मा झालेला ख्रिस्ती आहे आणि इतरांनाही आपल्या जीवनात बदल करण्यास मार्गदर्शन देण्याच्या कार्यात तो नियमित सहभाग घेतो.

तुम्हाला कशा प्रकारची व्यक्‍ती बनायचे आहे?

ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्यात सुधारणा करण्यासाठी आपल्याला कोणते बदल करावे लागू शकतात? पौलाने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा; एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे.” प्रेषित पौल पुढे म्हणतो: “जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.”—कलस्सै. ३:८-१०.

तर मग, जुने व्यक्‍तिमत्त्व काढून टाकून नवे व्यक्‍तिमत्त्व धारण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे. याकरता आपल्याला कोणते गुण विकसित करण्याची गरज आहे? पौल म्हणतो: “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” (कलस्सै. ३:१२-१४) हे गुण प्रदर्शित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने आपल्याला ‘मानवाची आणि देवाची मर्जी संपादन करता येईल.’ (१ शमु. २:२६, सुबोध भाषांतर) पृथ्वीवर असताना, येशूने देवाला प्रिय असणारे हे गुण उल्लेखनीय रीत्या प्रदर्शित केले. तेव्हा, त्याच्या उदाहरणाचे परीक्षण व अनुकरण केल्यास आपले व्यक्‍तिमत्त्व दिवसेंदिवस ख्रिस्तासारखे बनेल. आणि अशा प्रकारे आपण ‘देवाचे अनुकरण करू’.—इफिस. ५:१, २.

आपल्या व्यक्‍तिमत्त्वात कोणते बदल करण्याची गरज आहे हे ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, बायबलमध्ये वर्णन केलेल्या व्यक्‍तींच्या गुणांचे परीक्षण करणे. म्हणजेच, ती व्यक्‍ती कशामुळे चांगली किंवा वाईट ठरली यावर मनन करणे. उदाहरणार्थ, कुलपिता याकोबाचा पुत्र योसेफ याचा विचार करा. त्याच्यावर इतका अन्याय झाला तरीसुद्धा त्याने मनात द्वेष व कटुता उत्पन्‍न होऊ दिली नाही, तर अशाही परिस्थितीत त्याने आपले आंतरिक सौंदर्य टिकवून ठेवले. (उत्प. ४५:१-१५) दुसरीकडे पाहता, राजा दाविदाचा पुत्र अबशालोम याने लोकांबद्दल खूप कळकळ असल्याचा आव आणला. त्याच्या सौंदर्याचीही लोक खूप प्रशंसा करत. पण खरे पाहता, तो विश्‍वासघातकी व खूनी होता. (२ शमु. १३:२८, २९; १४:२५; १५:१-१२) यावरून हेच दिसून येते, की चांगुलपणाचा आव आणल्यामुळे किंवा शारीरिक सौंदर्यामुळे एक व्यक्‍ती खऱ्‍या अर्थाने आकर्षक बनू शकत नाही.

आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो

आपले व्यक्‍तिमत्त्व सुधारण्याकरता व देवाच्या नजरेत एक सुंदर व्यक्‍ती बनण्याकरता आपण आपल्या अंतःकरणातील गुप्त मनुष्याकडे लक्ष दिले पाहिजे. (१ पेत्र ३:३, ४) व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्याकरता आपले वाईट गुण व त्यांना कारणीभूत ठरणाऱ्‍या गोष्टी ओळखणे, तसेच, देवाला आवडणारे गुण विकसित करणे गरजेचे आहे. पण, आपल्या प्रयत्नांना यश येईल का?

हो, निश्‍चितच. यहोवाच्या मदतीने आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आवश्‍यक बदल नक्कीच करू शकतो. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही यहोवाला अशी प्रार्थना करू शकतो: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तो. ५१:१०) देवाला आवडेल अशा प्रकारे वागण्याची इच्छा आपल्या मनात दिवसेंदिवस आणखी प्रबळ व्हावी म्हणून, त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या अंतःकरणास प्रेरित करावे अशी आपण प्रार्थना करू शकतो. असे केल्यास, आपण निश्‍चितच यहोवाच्या नजरेत एक सुंदर व्यक्‍ती बनू!

[तळटीप]

^ परि. 11 हे त्याचे खरे नाव नाही.

[४ पानांवरील चित्र]

वादळामुळे नुकसान झालेल्या या घराची नुसतीच रंगरंगोटी करून चालेल का?

[५ पानांवरील चित्र]

तुमचे व्यक्‍तिमत्त्व ख्रिस्तासारखे बनले आहे का?