व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”

येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”

येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा”

“सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.”—याको. ४:७.

१. आपल्याला पृथ्वीवर कोणत्या विरोधाला तोंड द्यावे लागणार असल्याचे येशूला माहीत होते आणि याचा परिणाम काय होणार होता?

सैतानाकडून आपला विरोध होईल हे येशू ख्रिस्ताला माहीत होते. देवाने सापाला आणि पर्यायाने त्याचा आड घेऊन बोलणाऱ्‍या दुष्ट बंडखोर आत्मिक प्राण्याला जे म्हटले त्यातून हे आधीच स्पष्ट झाले होते. “मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये [यहोवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग] आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन; तो [येशू ख्रिस्त] तुझे डोके फोडील आणि तू त्याची टाच फोडशील.” (उत्प. ३:१४, १५, पं.र.भा.; प्रकटी. १२:९) येशूची टाच फोडली जाईल याचा अर्थ पृथ्वीवर असताना त्याला जिवे मारले जाईल. पण, हा तात्पुरता आघात असेल कारण यहोवा त्याचे स्वर्गीय वैभवात पुनरुत्थान करेल. पण, सापाचे डोके फोडले जाईल याचा अर्थ दियाबलाला इतका जबरदस्त तडाखा बसेल की त्यातून तो कधीही सावरणार नाही.प्रेषितांची कृत्ये २:३१, ३२; इब्री लोकांस २:१४ वाचा.

२. येशू सफलतापूर्वक दियाबलाचा प्रतिकार करेल याची यहोवाला खात्री का होती?

पृथ्वीवर असताना येशू आपली कामगिरी यशस्वी रीत्या पार पाडेल आणि सैतानाचा प्रतिकार करेल याची यहोवाला खात्री होती. पण, त्याला इतकी खात्री का होती? कारण, अनेक युगांपूर्वी त्यानेच स्वर्गात येशूची सृष्टी केली होती, त्याला जवळून पाहिले होते आणि हा “कुशल कारागीर” आणि “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असलेला त्याचा पुत्र आज्ञाधारक व विश्‍वासू असल्याचे त्याला माहीत होते. (नीति. ८:२२-३१; कलस्सै. १:१५) म्हणून, जेव्हा येशूला पृथ्वीवर पाठवण्यात आले व सैतानाला त्याची परीक्षा पाहण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा देवाला खात्री होती की त्याचा एकुलता एक पुत्र सैतानाचा विरोध करण्यात नक्कीच यशस्वी होईल.—योहा. ३:१६.

यहोवा आपल्या सेवकांचे रक्षण करतो

३. यहोवाच्या सेवकांबद्दल दियाबलाचा काय दृष्टिकोन आहे?

येशूने दियाबलाचा उल्लेख या “जगाचा अधिकारी” असे केले आणि आपल्या शिष्यांना इशारा दिला की जसे त्याला छळण्यात आले तसेच त्यांनाही छळले जाईल. (योहा. १२:३१; १५:२०) दियाबल सैतानाच्या कह्‍यात असलेले हे जग खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा द्वेष करते, कारण ते यहोवाची सेवा करतात आणि नीतिमत्त्वाचा प्रचार करतात. (मत्त. २४:९; १ योहा. ५:१९) विशेषतः, जे ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात शासन करतील, त्या अभिषिक्‍त शेषजनांवर दियाबलाचा डोळा आहे. तसेच, पृथ्वीवर नंदनवनात जगण्याची आशा बाळगणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनाही तो आपले लक्ष्य बनवतो. देवाचे वचन आपल्याला इशारा देते: “तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.

४. देवाच्या सेवकांनी दियाबलाचा यशस्वीपणे प्रतिकार केला आहे हे कशावरून सिद्ध होते?

एक संघटना या नात्याने आपल्याला यहोवा देवाचा आधार असल्यामुळे, आपण दियाबलाचा यशस्वीपणे प्रतिकार करतो. या तथ्यांकडे लक्ष द्या: मागील १०० वर्षांत, इतिहासातील सर्वात क्रूर जुलूमशाही सरकारांनी यहोवाच्या साक्षीदारांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला. पण, साक्षीदारांच्या संख्येत वाढ होतच आहे आणि आज जगभरातील १,००,००० मंडळ्यांत असलेल्या साक्षीदारांची संख्या जवळजवळ ७०,००,००० पर्यंत पोचली आहे. उलट, यहोवाच्या लोकांचा छळ करणारी ती क्रूर जुलूमशाही सरकारेच आज इतिहासजमा झाली आहेत!

५. यहोवाच्या सेवकांच्या बाबतीत यशया ५४:१७ यातील शब्द कशा प्रकारे खरे ठरले आहेत?

प्राचीन इस्राएलाच्या मंडळीला संबोधून, देवाने असे वचन दिले होते: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही; तुजवर आरोप ठेवणाऱ्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरविशील. परमेश्‍वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे.” (यश. ५४:१७) या “शेवटल्या काळी” संपूर्ण जगात असलेल्या यहोवाच्या लोकांच्या बाबतीत हे वचन अगदी खरे ठरले आहे. (२ तीम. ३:१-५, १३) आजही आपण सैतानाचा प्रतिकार करतच आहोत. पण, देवाच्या लोकांचा समूळ नाश करण्यासाठी दियाबल वापरत असलेले एकही शस्त्र यशस्वी ठरलेले नाही. कारण, यहोवा आपल्या पाठीशी आहे.—स्तो. ११८:६, ७.

६. दानीएलाने दियाबलाच्या शासनाबद्दल काय भाकीत केले होते?

या सबंध दुष्ट जगाचा लवकरच अंत होईल तेव्हा सैतानाच्या सत्तेशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी कायमच्या नाहीशा केल्या जातील. देवाच्या प्रेरणेने संदेष्टा दानीएलाने भाकीत केले: “त्या [आपल्या काळात अस्तित्वात असलेल्या] राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची [स्वर्गात] स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानी. २:४४) ही भविष्यवाणी पूर्ण होईल तेव्हा, सैतानाचे तसेच अपरिपूर्ण मानवांचे शासन नाहीसे होईल. दियाबलाच्या जगाशी संबंधित सर्व गोष्टींचे नामोनिशाण मिटून जाईल. आणि संपूर्ण पृथ्वीवर देवाचे राज्य शासन करेल.२ पेत्र ३:७, १३ वाचा.

७. यहोवाचे सेवक सैतानाचा यशस्वी रीत्या प्रतिकार करू शकतात असे का म्हणता येते?

यहोवाची संघटना सुरक्षित ठेवली जाईल आणि देवाच्या आशीर्वादाने तिची भरभराट होत राहील यात काहीच शंका नाही. (स्तोत्र १२५:१, २ वाचा.) पण, आपल्याबद्दल काय? बायबल आपल्याला सांगते की दियाबलाचा प्रतिकार करण्यात येशूप्रमाणेच आपणही यशस्वी होऊ शकतो. होय, ख्रिस्ताने प्रेषित योहानाद्वारे केलेल्या भविष्यवाणीतून आपल्याला दिसते की पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्या ‘एका मोठ्या लोकसमुदायाला’ आज जरी सैतानाचा विरोध होत असला, तरी हा समुदाय जगाच्या नाशातून सुखरूप बचावेल. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, ते असा जयजयकार करतात: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून [येशू ख्रिस्त], तारण आहे.” (प्रकटी. ७:९-१४) अभिषिक्‍त ख्रिस्ती, सैतानावर विजय मिळवत आहेत असे त्यांच्याविषयी म्हटलेले आहे. तसेच, त्यांचे सहकारी अर्थात ‘दुसरी मेंढरे’ देखील सैतानाचा यशस्वी रीत्या प्रतिकार करत आहेत. (योहा. १०:१६; प्रकटी. १२:१०, ११) पण याकरता, मनस्वी प्रयत्न करणे आणि त्या “वाईटापासून” सोडवण्यासाठी देवाला प्रांजळपणे प्रार्थना करणे आवश्‍यक आहे.—मत्त. ६:१३.

दियाबलाचा प्रतिकार करण्यात सर्वात यशस्वी ठरलेला

८. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे सैतानाने येशूसमोर आणलेले पहिले प्रलोभन कोणते आणि येशूने त्याचा प्रतिकार कसा केला?

सैतानाने येशूची सचोटी भंग करण्याचा प्रयत्न केला होता. येशू यहोवाला आज्ञाधारक राहू नये म्हणून सैतानाने अरण्यात त्याच्यासमोर निरनिराळी प्रलोभने आणली. पण, सैतानाचा प्रतिकार करण्यात येशूने एक सर्वोत्तम उदाहरण मांडले. अरण्यातील ४० दिवस व ४० रात्रींच्या उपवासानंतर, येशू नक्कीच भुकेला असावा. तेव्हा सैतानाने त्याला म्हटले: “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्‍या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” पण, येशूने देवाकडून मिळालेल्या शक्‍तीचा वैयक्‍तिक फायद्यासाठी वापर करण्यास नकार दिला. त्याऐवजी येशूने म्हटले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”—मत्त. ४:१-४; अनु. ८:३.

९. आपल्या नैसर्गिक इच्छांचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्‍या सैतानाचा आपण प्रतिकार का केला पाहिजे?

आजही सैतान यहोवाच्या सेवकांच्या नैसर्गिक इच्छांचा गैरफायदा घेऊ पाहतो. म्हणून, या वासनांध जगात सर्वत्र आढळणाऱ्‍या अनैतिक लैंगिक प्रलोभनांचा विरोध करण्याचा आपण पक्का निर्धार केला पाहिजे. देवाच्या वचनात स्पष्टपणे असे म्हटले आहे: “अनीतिमान्‌ माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मुर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथ. ६:९, १०) तर मग, जे लोक अनैतिक जीवन जगतात आणि आपली जीवनशैली बदलण्यास तयार नसतात अशांना देवाच्या नवीन जगात निश्‍चितच प्रवेश मिळणार नाही.

१०. मत्तय ४:५, ६ या वचनांनुसार, येशूची सचोटी भंग करण्यासाठी सैतानाने त्याच्यापुढे आणखी कोणते प्रलोभन आणले?

१० सैतानाने अरण्यात येशूपुढे आणलेल्या एका प्रलोभनाविषयी बायबलमध्ये असे म्हटले आहे: “सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले; आणि त्याला म्हटले, ‘तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, “तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील.”’” (मत्त. ४:५, ६) असे म्हणण्याद्वारे सैतानाने येशूला आपल्या मशीहा असण्याचे नेत्रदीपक प्रदर्शन करण्याचे सुचवले. खरे तर, असे करणे अनुचित व गर्विष्ठपणाचे ठरले असते, आणि अशा कृत्याला देवाची संमती व समर्थन मिळाले नसते. पुन्हा एकदा, येशूने यहोवाप्रती आपली एकनिष्ठा राखली आणि शास्त्रवचनाच्या साहाय्याने सैतानाला उत्तर दिले. त्याने म्हटले: “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.’”—मत्त. ४:७; अनु. ६:१६.

११. सैतान कशा प्रकारे आपल्यापुढे प्रलोभन आणू शकतो आणि याचा परिणाम काय होऊ शकतो?

११ सैतान आपल्यापुढेही यहोवाची परीक्षा पाहण्याचे प्रलोभन आणू शकतो. ते कसे? तो आपल्याला या जगातील लोकांची संमती मिळवण्यास प्रवृत्त करू शकतो. जगातील चालीरीतींप्रमाणे पेहराव करण्यास किंवा ख्रिश्‍चनांसाठी अयोग्य असलेल्या मनोरंजनाचा आनंद घेण्यास तो आपल्याला उद्युक्‍त करू शकतो. जर आपण बायबलमधील सल्ल्याकडे दुर्लक्ष करून या जगाचे अनुकरण केले, तर यामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांपासून देवदूत आपल्याला सुरक्षित ठेवतील अशी आपण अपेक्षा करू शकतो का? बथशेबेशी केलेल्या पापासाठी जरी दावीद राजाने पश्‍चात्ताप केला असला, तरी त्याच्या दुष्परिणामांपासून तो वाचला नाही. (२ शमु. १२:९-१२) म्हणूनच, या जगाशी मैत्री करून आपण यहोवाची अनुचित मार्गांनी परीक्षा पाहू नये.याकोब ४:४; १ योहान २:१५-१७ वाचा.

१२. मत्तय ४:८, ९ मध्ये उल्लेख केलेले प्रलोभन काय होते आणि देवाच्या पुत्राने काय उत्तर दिले?

१२ अरण्यात असताना सैतानाने येशूला राजकीय सत्ता देण्याचेही प्रलोभन दाखवले. जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवून सैतानाने येशूला म्हटले: “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” (मत्त. ४:८, ९) जी केवळ यहोवाला मिळाली पाहिजे अशी उपासना स्वतः मिळवण्याचा व येशूला देवाशी विश्‍वासू राहण्यापासून परावृत्त करण्याचा सैतानाचा हा प्रयत्न किती अयोग्य होता! लोकांनी आपली उपासना करावी या अनुचित इच्छेला आपल्या मनात घर करू दिल्यामुळेच, एके काळी निष्ठावान असलेला हा देवदूत पापपूर्ण, लोभी आणि अति दुष्ट असा दियाबल सैतान बनला होता. (याको. १:१४, १५) पण याच्या एकदम उलट, येशूचा आपल्या स्वर्गीय पित्याशी निष्ठावान राहण्याचा पक्का निर्धार होता आणि म्हणूनच त्याने सैतानाला असे म्हटले: “अरे सैताना, चालता हो!, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” अशा प्रकारे, येशूने पुन्हा एकदा साफ व स्पष्ट शब्दांत दियाबलाचा प्रतिकार केला. देवाच्या पुत्राला सैतानाच्या जगातील काहीही नको होते आणि म्हणून तो त्या दुष्टाची उपासना कधीही करणार नव्हता!—मत्त. ४:१०; अनु. ६:१३; १०:२०.

“सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल”

१३, १४. (क) येशूला जगातील सर्व राज्ये दाखवण्याद्वारे, सैतान त्याला काय देऊ करत होता? (ख) सैतान कशा प्रकारे आपल्याला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे?

१३ येशूला जगातील सर्व राज्ये दाखवण्याद्वारे सैतान त्याला कोणत्याही मानवाने मिळवले नव्हते इतके सामर्थ्य देऊ करत होता. जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव पाहिल्यावर येशू मोहात पडेल व आपण पृथ्वीवरील सर्वात शक्‍तीशाली राजकीय व्यक्‍तिमत्त्व बनू शकतो याची त्याला खात्री पटेल असे सैतानाला वाटले होते. आज, दियाबल आपल्याला जगातील राज्ये तर देऊ करत नाही पण, आपण जे पाहतो, ऐकतो व ज्या गोष्टींविषयी विचार करतो त्याद्वारे तो आजही आपले हृदय भ्रष्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो.

१४ या जगावर सैतानाची सत्ता आहे. त्यामुळे, या जगातील प्रसार माध्यमांवरही त्याचेच नियंत्रण आहे. म्हणूनच, या जगातील चित्रपट, संगीत, व वाचन साहित्य यांत अश्‍लीलता व हिंसाचाराला ऊत आला आहे. या जगातील जाहिरात माध्यमे आपल्यावर जाहिरातींचा भडिमार करून गरज नसतानाही निरनिराळी उत्पादने विकत घेण्यास आपल्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे, आपली दृष्टी, श्रवणशक्‍ती व विचार शक्‍ती यांद्वारे दियाबल सतत आपल्याला धनसंपत्ती मिळवण्याच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण, जेव्हा आपण बायबलमधील तत्त्वांच्या विरोधात असलेले काहीही पाहण्यास, ऐकण्यास किंवा वाचण्यास नकार देतो, तेव्हा एका अर्थाने आपण, “अरे सैताना, चालता हो!” असेच म्हणत असतो. अशा रीतीने सैतानाच्या अशुद्ध जगाचा दृढतेने व ठामपणे धिक्कार करण्याद्वारे आपण येशूचे अनुकरण करतो. तसेच, कामाच्या ठिकाणी, शाळेत, शेजाऱ्‍यांना व नातेवाईकांना आपण यहोवाचे साक्षीदार असल्याचे धैर्याने सांगतो तेव्हाही आपण सैतानाच्या जगापासून अलिप्त असल्याचे दाखवून देतो.मार्क ८:३८ वाचा.

१५. सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी नेहमी सतर्क राहणे का महत्त्वाचे आहे?

१५ येशूची देवाप्रती असलेली सचोटी भंग करण्याचा प्रयत्न तिसऱ्‍यांदा असफल झाल्यावर “सैतान त्याला सोडून गेला.” (मत्त. ४:११) पण, इतक्या लवकर तो हार मानणार नव्हता. बायबल आपल्याला पुढे असे सांगते: “मग सैतान [अरण्यात] सर्व परीक्षा संपवून संधि मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.” (लूक ४:१३) आपल्याला जेव्हा सैतानाचा प्रतिकार करण्यात यश येते तेव्हा आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत. पण, देवाने पुढेही आपल्याला साहाय्य करत राहावे अशी आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे. कारण, सैतान योग्य संधी साधून एखाद्या अनपेक्षित क्षणी आपल्यापुढे पुन्हा प्रलोभन आणू शकतो. म्हणूनच, आपण सर्व वेळी सतर्क राहिले पाहिजे व आपल्यावर कोणतीही परीक्षा आली, तरी यहोवाच्या पवित्र सेवेत टिकून राहण्याचा निर्धार केला पाहिजे.

१६. यहोवा आपल्याला कोणती सामर्थ्यशाली शक्‍ती देतो आणि ही शक्‍ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना का केली पाहिजे?

१६ सैतानाचा प्रतिकार करण्यास आपल्याला साहाय्य मिळावे म्हणून, आपण विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍तीसाठी म्हणजेच देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि देव ही शक्‍ती आपल्याला अवश्‍य देईल असा आत्मविश्‍वास आपण बाळगला पाहिजे. आपल्याला स्वतःच्या बळावर ज्या गोष्टी करणे शक्य नाही, त्या करण्यास देवाचा पवित्र आत्मा आपल्याला समर्थ करेल. देवाचा पवित्र आत्मा मिळणे शक्य आहे याची आपल्या शिष्यांना खात्री देताना येशूने म्हटले: “तुम्ही [अपरिपूर्ण व त्या मानाने] वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१३) तर मग, आपल्याला पवित्र आत्मा मिळावा म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करत राहू या. सैतानाचा प्रतिकार करण्याच्या आपल्या निर्धाराला देवाच्या सामर्थ्यशाली शक्‍तीची जोड मिळाल्यास आपण नक्कीच सैतानाचा प्रतिकार करण्यात यशस्वी होऊ. कळकळीने व मनःपूर्वक प्रार्थना करण्यासोबतच, ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावा म्हणून’ आपण देवाकडील आत्मिक शस्त्रसामग्री धारण करण्याचीही आवश्‍यकता आहे.—इफिस. ६:११-१८.

१७. येशूपुढे असलेल्या कोणत्या आनंदामुळे तो सैतानाचा प्रतिकार करू शकला?

१७ दियाबलाचा प्रतिकार करण्यास येशूला आणखी एका गोष्टीमुळे मदत मिळाली. आणि तीच गोष्ट आज आपल्यालाही साहाय्य करू शकते. बायबलमध्ये असे सांगितले आहे: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री १२:२) यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करण्याद्वारे, त्याच्या पवित्र नावाचा सन्मान करण्याद्वारे आणि सदासर्वकाळाच्या जीवनाची आशा आपल्या डोळ्यांपुढे ठेवण्याद्वारे आपणही असाच आनंद प्राप्त करू शकतो. जेव्हा सैतानाला व त्याच्या सर्व दुष्कृत्यांना कायमचे नाहीसे केले जाईल आणि ‘लीन जन पृथ्वीचे वतन पावतील व उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील’ तेव्हा आपल्याला किती आनंद होईल याची कल्पना करा. (स्तो. ३७:११) म्हणूनच येशूप्रमाणे, दियाबलाचा निरंतर प्रतिकार करत राहा.याकोब ४:७, ८ वाचा.

तुमचे उत्तर काय?

• यहोवा आपल्या लोकांचे संरक्षण करतो हे कशावरून म्हणता येईल?

• सैतानाचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत येशूने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले?

• तुम्ही कोणत्या मार्गांनी सैतानाचा प्रतिकार करू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

या जगाशी मैत्री केल्यास आपण देवाचे शत्रू बनतो

[३१ पानांवरील चित्र]

जगातील सर्व राज्ये देण्याचा सैतानाचा प्रस्ताव येशूने धुडकावून लावला