व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा

लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा

लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा

“आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.”—योहा. ६:६८.

१. येशूचे अनेक शिष्य त्याला सोडून गेले तेव्हा पेत्राने काय म्हटले?

एकदा येशू ख्रिस्ताची एक शिकवण न पटल्यामुळे त्याचे अनेक शिष्य त्याला सोडून गेले. तेव्हा येशूने आपल्या प्रेषितांना विचारले, “तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?” पेत्राने उत्तर दिले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” (योहा. ६:५१-६९) खरोखरच, ते आणखी कोठे जाऊ शकत होते? यहुदी धर्मात तर “सार्वकालिक जीवनाची वचने” नव्हती. आणि आजही मोठ्या बाबेलमध्ये, अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यात ही वचने सापडणे शक्य नाही. त्यामुळे, जे देवाच्या कळपापासून भटकले आहेत पण ज्यांना अजूनही यहोवाच्या इच्छेनुसार वागण्याची इच्छा आहे, त्यांनी “आता जागे होण्याची वेळ आली आहे.”—रोम. १३:११, किंग जेम्स व्हर्शन.

२. न्यायिक समितीने हाताळण्याजोग्या किंवा गोपनीय स्वरूपाच्या समस्यांविषयी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांबद्दल यहोवाला काळजी होती. (यहेज्केल ३४:१५, १६ वाचा.) त्याच प्रकारे, ख्रिस्ती वडीलही देवाच्या कळपापासून भटकलेल्या मेंढरांसमान व्यक्‍तींना मदत करू इच्छितात. किंबहुना हे त्यांचे कर्तव्य आहे. कधीकधी ते मदत मिळवण्यास उत्सुक असलेल्या अक्रियाशील व्यक्‍तीसोबत अभ्यास करण्याकरता एखाद्या प्रचारकाला नेमतात. पण, त्या अक्रियाशील व्यक्‍तीकडून काहीतरी गंभीर पाप घडले असल्याचे प्रचारकाला कळल्यास त्याने काय करावे? अशा परिस्थितीत, प्रचारकाने त्या व्यक्‍तीला वडिलांशी याविषयी बोलण्याचे सुचवले पाहिजे. पण जर त्या व्यक्‍तीने असे केले नाही, तर प्रचारकाने स्वतः वडिलांना याविषयी सांगितले पाहिजे.—लेवी. ५:१; गल. ६:१.

३. ज्याच्याजवळ १०० मेंढरे होती त्या मनुष्याचे हरवलेले मेंढरू सापडल्यावर त्याला कसे वाटले?

याआधीच्या लेखात, येशूने दिलेल्या एका दृष्टान्ताबद्दल सांगण्यात आले होते, ज्यात एका मनुष्याजवळ १०० मेंढरे होती. या मनुष्याचे एक मेंढरू कळपापासून भटकून हरवले, तेव्हा ९९ मेंढरांना सोडून त्याने त्या हरवलेल्या मेंढराचा शोध घेतला. मेंढरू सापडल्यावर त्याला किती आनंद झाला! (लूक १५:४-७) देवाच्या कळपातील एखादे हरवलेले मेंढरू परत येते तेव्हा आपल्यालाही असाच आनंद होतो. अशा व्यक्‍तीबद्दल प्रेम असल्यामुळेच वडिलांनी व मंडळीतील इतर सदस्यांनी या व्यक्‍तीला कदाचित अधूनमधून भेटीही दिल्या असतील. त्या सर्वांचीही हीच इच्छा आहे की त्या व्यक्‍तीने कळपात परत यावे आणि देवाकडून मिळणारे साहाय्य, संरक्षण व आशीर्वाद अनुभवावेत. (अनु. ३३:२७; स्तो. ९१:१४; नीति. १०:२२) मग, या व्यक्‍तीला मंडळीत परत येण्यास मदत करण्याची त्यांना संधी मिळाल्यास त्यांनी काय करावे?

४. गलतीकर ६:२, ५ यावरून काय समजते?

त्या व्यक्‍तीला मंडळीत परत येण्याचे प्रोत्साहन देण्याकरता तिला भेट देणारे वडील किंवा प्रौढ प्रचारक प्रेमळपणे तिला याची आठवण करून देऊ शकतात, की यहोवाचे त्याच्या मेंढरांवर प्रेम आहे. तसेच, त्याला आपल्याकडून असलेल्या कोणत्याही अपेक्षा अवाजवी नाहीत हेही ते सांगू शकतात. उदाहरणार्थ, बायबलचा अभ्यास करणे, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे. शिवाय, गलतीकर ६:२, ५ ही वचने वाचून ते त्या व्यक्‍तीला सांगू शकतात की ख्रिस्ती बांधव जरी एकमेकांची ओझी वाहण्यास साहाय्य करत असले, तरी यहोवाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्‍यांच्या संदर्भात, “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” देवाला आपल्या बदल्यात इतर कोणीही विश्‍वासू राहू शकत नाही.

‘संसाराच्या चिंतांमुळे’ त्यांच्या उत्साह मावळला आहे का?

५, ६. (क) अक्रियाशील भाऊबहिणींचे लक्षपूर्वक ऐकून घेणे का महत्त्वाचे आहे? (ख) देवाच्या लोकांपासून दूर राहिल्यामुळे आपले नुकसानच झाले आहे हे समजून घेण्यास अक्रियाशील व्यक्‍तींना तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता?

अक्रियाशील भाऊबहीण आपल्या मनातले बोलून दाखवतात तेव्हा वडिलांनी व इतर प्रौढ प्रचारकांनी त्यांचे लक्षपूर्वक ऐकून घेतले पाहिजे. म्हणजे, अशा व्यक्‍तींना नक्की कशी मदत करता येईल हे त्यांना समजून घेता येईल. समजा तुम्ही एक वडील आहात आणि ‘संसाराच्या चिंतांमुळे’ देवाच्या सेवेत मागे पडलेल्या एका विवाहित जोडप्याला तुम्ही भेट द्यायला जाता. (लूक २१:३४) आर्थिक अडचणी किंवा कुटुंबाच्या वाढत्या जबाबदाऱ्‍या यांमुळे कदाचित ते आध्यात्मिक कार्यांत हळूहळू अक्रियाशील झाले असण्याची शक्यता आहे. एकाच वेळी या सगळ्या जबाबदाऱ्‍या पेलणे आपल्याला शक्य नाही असे कदाचित ते म्हणतील. पण तुम्ही त्यांना सांगू शकता की मंडळीतील बांधवांपासून दूर राहणे हा यावरचा उपाय नाही. (नीतिसूत्रे १८:१ वाचा.) तुम्ही विचारपूर्वक त्यांना हे प्रश्‍न विचारू शकता: “सभेला येणं बंद केल्यापासून तुम्ही जास्त आनंदी आहात का? तुमचं कौटुंबिक जीवन पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आहे का? यहोवाचा आनंद तुमचा आश्रयदुर्ग आहे, असं तुम्ही आजही म्हणू शकता का?”—नहे. ८:१०.

यांसारख्या प्रश्‍नांवर मनन केल्यामुळे अक्रियाशील व्यक्‍तींना कदाचित याची जाणीव होईल, की मंडळीपासून दूर राहिल्यामुळे यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध कमजोर झाला आहे आणि त्यांच्या जीवनातील आनंदही कमी झाला आहे. (मत्त. ५:३; इब्री १०:२४, २५) कदाचित तुम्ही त्यांच्या हे लक्षात आणून देऊ शकता की सुवार्तेच्या प्रचारात सहभाग न घेतल्यामुळे त्यांचा आनंद नाहीसा झाला आहे. (मत्त. २८:१९, २०) तर मग, आता त्यांच्याकरता सुज्ञतेचा मार्ग कोणता ठरेल?

७. कळपापासून भटकलेल्यांना आपण काय करण्याचे प्रोत्साहन देऊ शकतो?

येशूने म्हटले: ‘संभाळा, नाहीतर कदाचित्‌ अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जातील . . . तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.’ (लूक २१:३४-३६) जे कळपापासून भटकले आहेत, पण यहोवाच्या सेवेत पुन्हा एकदा पूर्वीसारखा आनंद अनुभवू इच्छितात, त्यांना पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करण्याचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते. तसेच, देवाला केलेल्या प्रार्थनेच्या अनुरूप वागण्यासाठी त्याने आपल्याला साहाय्य करावे, अशी प्रार्थना करण्याचेही त्यांना प्रोत्साहन देता येईल.—लूक ११:१३.

काही कारणामुळे ते अडखळले का?

८, ९. काही कारणामुळे अडखळलेल्या व्यक्‍तीला योग्य प्रकारे विचार करण्यास एक वडील कशा प्रकारे साहाय्य करू शकतात?

मनुष्य अपरिपूर्ण असल्यामुळे आपसांत मतभेद होणे स्वाभाविक आहे आणि यामुळेच कधीकधी काही जण अडखळतात. तर काही जण, मंडळीतील एखादी आदरणीय व्यक्‍ती बायबलमधील तत्त्वांच्या विरोधात वागल्यामुळे अडखळतात. अशा काही कारणांमुळे एखादी व्यक्‍ती अक्रियाशील झाली असेल, तर तिला भेट देणाऱ्‍या वडिलाने तिला सांगितले पाहिजे की यहोवा कधीही कोणाला अडखळायला लावत नाही. तर मग, त्याच्यासोबत व त्याच्या लोकांसोबत कोणी का म्हणून आपले संबंध तोडून टाकावेत? त्याऐवजी, जे काही घडले आहे त्याबद्दल “सर्व जगाचा न्यायाधीश” यहोवा याला माहीत आहे आणि तो योग्य वेळी कारवाई करेल असा भरवसा बाळगून आपण त्याची सेवा करत राहणे योग्य ठरणार नाही का? (उत्प. १८:२५; कलस्सै. ३:२३-२५) समजा, एखादा माणूस रस्त्यावर चालताना खरोखरच अडखळून पडला, तर तो उठण्याचा प्रयत्नही न करता तेथेच बसून राहील का?

त्या व्यक्‍तीला मंडळीत परतण्यास साहाय्य करण्यासाठी वडील हेही सांगू शकतात, की पूर्वी अडखळणास कारणीभूत ठरलेल्या गोष्टी, काही जणांना, कालांतराने तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. कधी कधी तर अडखळणाचे कारणच नाहीसे झालेले असते. जर एखाद्या व्यक्‍तीला मंडळीकडून ताडन मिळाल्यामुळे ती अडखळली असेल, तर प्रार्थनापूर्वक मनन केल्यास ती या निष्कर्षावर येऊ शकते की काही प्रमाणात का होईना पण तिची चूक होती आणि ताडन मिळाल्यामुळे तिने मंडळीपासून दूर जायला नको होते.—स्तो. ११९:१६५; इब्री १२:५-१३.

त्या व्यक्‍तीला एखादी शिकवण पटली नाही का?

१०, ११. बायबलमधील एखाद्या शिकवणीच्या संदर्भात वेगळे मत असलेल्या व्यक्‍तीला मदत करताना कशा प्रकारे तर्क केला जाऊ शकतो?

१० काही जण एखादी शास्त्रवचनीय शिकवण न पटल्यामुळे देवाचा कळप सोडून गेले असावेत. इजिप्तच्या दास्यातून मुक्‍त करण्यात आल्यानंतर इस्राएल लोक “[देवाची] कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरिला नाही.” (स्तो. १०६:१३) अक्रियाशील व्यक्‍तीला याची आठवण करून देणे सहाय्यक ठरू शकते, की ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ अतिशय उत्तम आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. (मत्त. २४:४५) त्यांनी पुरवलेल्या ज्ञानामुळेच तर त्या व्यक्‍तीला सत्य शिकता आले होते. तर मग, तिने पुन्हा एकदा सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याचा निश्‍चय का करू नये?—२ योहा. ४.

११ देवाच्या कळपापासून भटकलेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न करताना, वडील येशूच्या त्या शिष्यांचा उल्लेख करू शकतात, ज्यांनी त्याची एक शिकवण न पटल्यामुळे त्याला सोडून दिले होते. (योहा. ६:५३, ६६) ख्रिस्तासोबत व त्याच्या विश्‍वासू अनुयायांसोबत संबंध तोडून टाकल्यामुळे आध्यात्मिक गोष्टींबद्दल त्यांना पूर्वीसारखी कदर राहिली नाही आणि त्यांनी आपला आनंदही गमावला. ख्रिस्ती मंडळीपासून दूर गेलेल्या व्यक्‍तींना, मुबलक प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न मिळेल असे दुसरे कोणते ठिकाण सापडले आहे का? सापडूच शकत नाही, कारण असे ठिकाण मुळी अस्तित्वातच नाही!

गंभीर पाप कारणीभूत आहे का?

१२, १३. कळपापासून भटकलेल्या एखाद्या व्यक्‍तीने गंभीर पाप केल्याचे कबूल केल्यास तिला कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते?

१२ काही जण त्यांच्या हातून गंभीर पाप घडल्यामुळे प्रचार कार्यात सहभाग घेण्याचे व सभांना उपस्थित राहण्याचे बंद करतात. वडिलांजवळ पाप कबूल केल्यास आपल्याला बहिष्कृत केले जाईल असे त्यांना वाटत असते. पण जर त्यांनी बायबलच्या विरोधात असलेले वर्तन थांबवले असेल आणि त्यांना मनापासून पश्‍चात्ताप झाला असेल तर त्यांना मंडळीतून बहिष्कृत केले जाणार नाही. (२ करिंथ. ७:१०, ११) उलट, त्यांचे मंडळीत स्वागतच केले जाईल आणि वडील त्यांना आवश्‍यक असलेले आध्यात्मिक साहाय्य पुरवतील.

१३ तुम्हाला ज्या अक्रियाशील व्यक्‍तीला मदत करण्यास सांगण्यात आले आहे, तिने एखादे गंभीर पाप केल्याचे तुमच्याजवळ कबूल केल्यास, एक प्रौढ प्रचारक या नात्याने तुम्ही काय केले पाहिजे? याआधीच सांगितल्याप्रमाणे, स्वतः काही सल्ला देण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्‍तीला वडिलांची भेट घेण्यास सांगू शकता. पण त्या व्यक्‍तीने असे करण्यास नकार दिला, तर यहोवाच्या नावाचा व मंडळीच्या हिताचा विचार करून तुम्ही या बाबतीत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. (लेवीय ५:१ वाचा.) त्या व्यक्‍तीला मंडळीत परत येण्याची व देवाच्या इच्छेनुसार जगण्याची इच्छा असल्यास, तिला कशी मदत करता येईल हे वडीलजन ठरवतील. कदाचित ते तिला प्रेमळपणे ताडनही देतील. (इब्री १२:७-११) जर तिने देवाविरुद्ध पाप केल्याचे कबूल केले आणि तिला खरोखरच पश्‍चात्ताप झाला असेल, शिवाय, तिने अयोग्य वर्तन सोडून दिले असेल तर वडील या व्यक्‍तीला मदत करतील आणि अशा प्रकारे तिला यहोवाची क्षमा मिळू शकेल.—यश. १:१८; ५५:७; याको. ५:१३-१६.

पुत्र घरी परतल्याचा आनंद

१४. येशूने दिलेला उधळ्या पुत्राचा दृष्टान्त स्वतःच्या शब्दांत सांगा.

१४ भटकलेल्या एखाद्या मेंढराला मदत करताना लूक १५:११-२४ यातील येशूच्या दृष्टान्ताचाही उल्लेख केला जाऊ शकतो. त्या दृष्टान्तात, एक तरुण आपल्या संपत्तीचा वाटा चैनबाजीत उधळून टाकतो. नंतर मात्र त्याचे डोळे उघडतात आणि त्याला आपल्या पापी जीवनशैलीची घृणा वाटू लागते. तो दाण्यादाण्याला मोताद होतो आणि त्याला आपल्या घराची आठवण सतावू लागते. शेवटी, तो आपल्या घरी परतण्याचा निश्‍चय करतो! घरापासून अद्याप तो काही अंतरावर असतानाच त्याचे वडील त्याला पाहतात आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतात. त्यांना अवर्णनीय आनंद झालेला असतो! या दृष्टान्तावर मनन केल्यास मंडळीपासून दूर गेलेल्या व्यक्‍तीला परत येण्याची प्रेरणा मिळू शकेल. या जगाचा लवकरच अंत होणार असल्यामुळे अशा व्यक्‍तींनी लवकरात लवकर ‘घरी परतले’ पाहिजे.

१५. काही जण मंडळीपासून दूर का जातात?

१५ मंडळीपासून भटकलेले बहुतेक जण उधळ्या पुत्रासारखे नसतात. एखादी नाव किनाऱ्‍यापासून हळूहळू तरंगत दूर वाहून जाते त्या प्रमाणे काहींच्या बाबतीत मंडळीपासून दूर जाणे हे हळूहळू घडते. इतर जण जीवनातील चिंता-विवंचनांमुळे इतके खचून जातात की आध्यात्मिक गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आणखी काही जण मंडळीतील एखाद्या व्यक्‍तीच्या वागणुकीमुळे किंवा एखादी शास्त्रवचनीय शिकवण न पटल्यामुळे अडखळतात. तर काही बायबलच्या विरोधात असलेली कृत्ये केल्यामुळे मंडळीपासून दूर जातात. या सर्व परिस्थितींना लागू होणारी जी माहिती या लेखांत सादर करण्यात आली आहे, ती देवाच्या कळपापासून या किंवा इतर कारणांमुळे दूर गेलेल्यांना साहाय्य करण्याकरता तुम्हाला उपयोगी पडू शकेल, जेणेकरून फार उशीर होण्याआधी ते मंडळीत परत येऊ शकतील.

“बाळा, आज तू आपल्या घरी परत आला आहेस!”

१६-१८. (क) एका वडिलाने बऱ्‍याच वर्षांपासून अक्रियाशील असलेल्या एका बांधवाला कशा प्रकारे मदत केली? (ख) हा बांधव अक्रियाशील का झाला होता, त्याला कशा प्रकारे मदत करण्यात आली आणि तो परत आला तेव्हा मंडळीतील सदस्य त्याच्याशी कशा प्रकारे वागले?

१६ एक ख्रिस्ती वडील म्हणतात: “अक्रियाशील व्यक्‍तींना भेटी देण्याच्या बाबतीत आमचा वडील वर्ग अतिशय उत्सुक आहे. मी ज्याच्यासोबत बायबलचा अभ्यास केला होता अशा एका बांधवाचा मला उल्लेख करावासा वाटतो. तो जवळजवळ २५ वर्षांपासून अक्रियाशील होता आणि एका अतिशय कठीण समस्येला तोंड देत होता. तेव्हा मी त्याला बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला. काही काळाने, तो राज्य सभागृहात येऊ लागला आणि देवाच्या कळपात परत येण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करण्यासाठी बायबल अभ्यास करण्यासही तयार झाला.”

१७ हा बांधव अक्रियाशील का झाला होता? तो स्वतःच सांगतो: “आध्यात्मिक गोष्टींपेक्षा मी जगिक गोष्टींना जास्त महत्त्व देऊ लागलो होतो. मग मी अभ्यास करणं, सेवाकार्याला आणि सभांना जाणं बंद केलं. असं करता करता, माझ्या नकळत मी ख्रिस्ती मंडळीतून बाहेर पडलो. पण या विशिष्ट वडिलाने दाखवलेल्या आस्थेमुळे व आपुलकीमुळे मला मंडळीत परत येणं शक्य झालं.” वैयक्‍तिक बायबल अभ्यास स्वीकारल्यानंतर या बांधवाच्या समस्या हळूहळू कमी होऊ लागल्या. तो म्हणतो: “माझ्या जीवनात जर कशाची कमी होती तर ती होती यहोवा व त्याच्या संघटनेच्या प्रेमाची व मार्गदर्शनाची.”

१८ हा बांधव मंडळीत परत आला तेव्हा इतर भाऊबहीण त्याच्याशी कशा प्रकारे वागले? तो सांगतो: “मला येशू ख्रिस्ताच्या दृष्टान्तातल्या उधळ्या पुत्रासारखं वाटतं. खरं तर, एक वृद्ध भगिनी, ज्या ३० वर्षांपूर्वीही मंडळीत होत्या आणि अजूनही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत, त्या मला म्हणाल्या: ‘बाळा, आज तू आपल्या घरी परत आला आहेस!’ त्यांचे शब्द ऐकून मला भरून आलं. खरंच मी आपल्या घरी परतलो होतो. त्या वडिलाने आणि मंडळीतल्या सगळ्याच सदस्यांनी माझ्याप्रती जे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी व सहनशीलता दाखवली त्याबद्दल मी त्या सर्वांचा सदैव ऋणी राहीन. यहोवावर व सहमानवांवर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळेच मी देवाच्या कळपात परत येऊ शकलो.”

ताबडतोब पाऊल उचलण्याचा त्यांना आग्रह करा

१९, २०. अक्रियाशील झालेल्यांना तुम्ही लवकरात लवकर कळपात परत येण्याचे प्रोत्साहन कशा प्रकारे देऊ शकता आणि देव आपल्याकडून अवास्तव अपेक्षा करत नाही हे तुम्ही त्यांना कसे पटवून द्याल?

१९ आपण शेवटल्या काळात जगत आहोत आणि सध्याच्या या जगाचा नाश अगदी जवळ येऊन ठेपला आहे. म्हणूनच अक्रियाशील व्यक्‍तींना ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचे आणि ताबडतोब असे करण्याचे प्रोत्साहन द्या. सैतान त्यांचा देवासोबत असलेला नातेसंबंध तोडण्याचा आणि खरी उपासना सोडून दिल्याने जीवनातील चिंतांपासून मुक्‍ती मिळू शकते असे भासवण्याचा प्रयत्न करत आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्या. जीवनात खरा आनंद हा केवळ येशूचे विश्‍वासूपणे अनुसरण केल्यानेच मिळू शकतो याची त्यांना खात्री पटवून द्या.—मत्तय ११:२८-३० वाचा.

२० देव आपल्याकडून केवळ जे आपण करू शकतो, जे आपल्या आवाक्यात आहे तेवढीच अपेक्षा करतो याची अक्रियाशील व्यक्‍तींना आठवण करून द्या. लाजराची बहीण मरीया हिने अतिशय मौल्यवान तेल येशूच्या डोक्यावर ओतले तेव्हा इतरांनी नाराजी व्यक्‍त केली. पण येशूने म्हटले: “हिच्या वाटेस जाऊ नका. . . . हिला जे काही करिता आले ते हिने केले आहे.” (मार्क १४:६-८) येशूने मंदिरातील दानपेटीत दोन दमड्या टाकणाऱ्‍या गरीब विधवेची प्रशंसा केली. तिनेही तिला जे करता आले तेच केले. (लूक २१:१-४) ख्रिस्ती सभांना हजर राहणे आणि राज्य प्रचाराच्या कार्यात सहभाग घेणे या गोष्टी आपल्यापैकी बहुतेकांना नक्कीच करता येण्यासारख्या आहेत. सध्या अक्रियाशील असलेले बरेच जण यहोवाच्या मदतीने नक्कीच या गोष्टी पुन्हा करू शकतील.

२१, २२. यहोवाकडे परत येणाऱ्‍यांना तुम्ही कोणते आश्‍वासन देऊ शकता?

२१ मंडळीत परतल्यावर सगळ्या भाऊबहिणींना आपण कसे तोंड देऊ, अशी कदाचित कळपापासून भटकलेल्या एखाद्या मेंढरासमान व्यक्‍तीला भीती वाटत असेल. अशा व्यक्‍तीला तुम्ही उधळा पुत्र घरी परतल्यावर जो आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता, त्याची आठवण करून देऊ शकता. अक्रियाशील झालेले जेव्हा मंडळीत परत येतात तेव्हाही सर्वांना असाच आनंद होतो. म्हणूनच, या अक्रियाशील व्यक्‍तींना दियाबलाचा विरोध करून देवाजवळ येण्याकरता ताबडतोब पाऊल उचलण्याचे प्रोत्साहन द्या.—याको. ४:७, ८.

२२ यहोवाकडे परत येणाऱ्‍यांचे अतिशय आनंदाने स्वागत केले जाईल. (विलाप. ३:४०) देवाच्या सेवेतील त्यांच्या गतकाळातील अनुभवांमुळे त्यांना नक्कीच अतिशय आनंद मिळाला असेल यात शंका नाही. पण, जर ते विलंब न करता देवाच्या कळपात परत आले, तर भविष्यातही त्यांच्यासाठी विपुल आशीर्वाद राखून ठेवले आहेत!

तुमचे उत्तर काय?

• काही कारणामुळे अडखळून अक्रियाशील झालेल्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला तुम्ही कशी मदत करू शकता?

• एखाद्या शिकवणीबद्दल वेगळे मत असल्यामुळे देवाच्या कळपापासून दूर गेलेल्या व्यक्‍तीशी कशा प्रकारे तर्क केला जाऊ शकतो?

• मंडळीत परत येण्यास ज्यांना संकोच वाटतो त्यांना कशी मदत केली जाऊ शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

अक्रियाशील भाऊबहीण आपल्या मनातले बोलून दाखवतात तेव्हा त्यांचे लक्षपूर्वक ऐकून घ्या

[१५ पानांवरील चित्र]

येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राच्या दृष्टान्तावर मनन केल्यामुळे काहींना देवाच्या कळपात परत येण्याची प्रेरणा मिळू शकते