व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागा’

‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागा’

‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागा’

नव्याने बनवण्यात आलेला रस्ता आपल्याला मजबूत व टिकाऊ वाटतो. पण काही काळाने, त्या रस्त्याला तडे जातात आणि त्यावर खड्डे निर्माण होतात. त्यामुळे, अपघात टाळण्यासाठी आणि रस्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्‍यक असते.

त्याच प्रकारे, कधीकधी मतभेद किंवा तणावांमुळे इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधात दरी निर्माण होण्याची शक्यता असते. प्रेषित पौलाने रोममधील काही ख्रिश्‍चनांमध्येही मतभेद असल्याचे कबूल केले होते. म्हणूनच, त्याने आपल्या या ख्रिस्ती बांधवांना असा सल्ला दिला: “शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.” (रोम. १४:१३, १९) ‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागणे’ इतके महत्त्वाचे का आहे? आणि आपण आपसात शांती प्रस्थापित करण्यासाठी धैर्याने व प्रभावीपणे पावले कशी उचलू शकतो?

शांती प्रस्थापित करणे महत्त्वाचे का?

रस्त्याला पडलेल्या भेगा जर वेळीच बुजवल्या नाहीत, तर तेथे मोठे खड्डे पडून अपघात होऊ शकतात. त्याच प्रकारे, आपसातील मतभेद वेळीच न मिटवल्यास समस्या उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. प्रेषित योहानाने लिहिले: “मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.” (१ योहा. ४:२०) आपसातील मतभेद वेळीच न मिटवल्यास, एखादा ख्रिस्ती आपल्याच बांधवाचा द्वेष करू लागण्याची शक्यता आहे.

आपण आपसातील मतभेद मिटवून शांती प्रस्थापित न केल्यास, यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही हे येशूने स्पष्ट केले होते. त्याने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्त. ५:२३, २४) आपण यहोवाचे मन आनंदित करू इच्छितो आणि हेच इतरांसोबत शांती प्रस्थापित करण्याचे आपले मुख्य कारण आहे. *

आपसात शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे का महत्त्वाचे आहे याचे आणखी एक कारण फिलिप्पै येथील मंडळीत उद्‌भवलेल्या समस्येवरून स्पष्ट होते. या मंडळीतील युवदीया आणि सुंतुखे या दोन ख्रिस्ती बहिणींमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे, संपूर्ण मंडळीच्या शांतीला धोका निर्माण झाला होता. (फिलिप्पै. ४:२, ३) सहसा, मतभेद वेळीच न मिटवल्यास ते चव्हाट्यावर येण्याची शक्यता असते. म्हणूनच, मंडळीतील प्रीती व ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबत शांती प्रस्थापित करण्यास प्रेरित होतो.

येशूने म्हटले: “जे शांति करणारे ते धन्य.” (मत्त. ५:९) इतरांसोबत शांती प्रस्थापित केल्याने आपल्याला आनंद व समाधान प्राप्त होते. शिवाय, शांती आपल्या आरोग्यासाठीही हितकारक आहे. कारण, “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीति. १४:३०) याउलट, मनात दीर्घकाळ कटू भावना बाळगल्यास आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता वाढते.

शांती प्रस्थापित करणे आवश्‍यक आहे असे जरी बहुतेक ख्रिस्ती मान्य करत असले, तरी आपसातील मतभेद मिटवायचे कसे असा प्रश्‍न उद्‌भवतो. म्हणूनच, याबाबतीत आपल्याला साहाय्यक ठरू शकतील अशा बायबलमधील तत्त्वांचे आता आपण परीक्षण करू या.

शांतपणे चर्चा केल्याने मतभेद मिटतात

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी सहसा तेवढा भाग भराव घालून झाकून टाकला जातो. अशाच प्रकारे, आपल्या बांधवांच्या लहानसहान चुका पदरात घेऊन त्यांविषयी विसरून जाण्यास काय हरकत आहे? हा मार्ग अवलंबल्याने बहुतेक मतभेद मिटवले जाऊ शकतात. प्रेषित पेत्राने लिहिले: “प्रीति पापांची रास झाकून टाकते.”—१ पेत्र ४:८.

पण, काही मतभेद मात्र आपल्याला इतके गंभीर वाटतात की आपण त्यांकडे नुसतेच दुर्लक्ष करू शकत नाही. इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशाचा ताबा घेतल्यावर काही काळाने काय घडले याकडे लक्ष द्या. ‘रऊबेनी, गादी व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी’ यार्देनच्या पलीकडे जाण्याअगोदर “एक भव्य मोठी वेदी बांधली.” ही वेदी त्यांनी मूर्तिपूजा करण्यासाठी बांधली आहे असे इस्राएलाच्या इतर गोत्रांना वाटले. त्यांच्या मते ही समस्या दुर्लक्ष करण्याजोगी नव्हती. म्हणून, ते लढाईच्या तयारीला लागले.—यहो. २२:९-१२.

काही इस्राएल लोकांना वाटले असावे की वेदी बांधणाऱ्‍या गोत्रांवर चढाई करण्यासाठी पुरेसे कारण आहे. शिवाय, त्यांच्यावर अचानक आक्रमण केल्यास लढाईत आपली जास्त माणसे मारली जाणार नाहीत असाही तर्क त्यांनी केला असावा. तरीसुद्धा, उतावीळपणे हल्ला करण्याऐवजी, यार्देनेच्या पश्‍चिमेकडे असलेल्या या गोत्रांनी आपल्या बांधवांशी बोलणी करण्यास आधी आपले दूत पाठवले. या दूतांनी त्यांना विचारले: ‘तुम्ही इस्राएलाच्या देवाचा हा काय विश्‍वासघात केला? आज परमेश्‍वराला अनुसरण्याचे सोडले व त्याच्याविरुद्ध बंड पुकारले?’ खरे पाहता, वेदी बांधलेल्या गोत्रांनी देवाचा विश्‍वासघात केला नव्हता. पण, अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी आरोप करणाऱ्‍यांना भलेबुरे सुनावले का किंवा त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला का? नाही. याउलट, त्यांनी सौम्यतेने उत्तर दिले. आपण जे काही केले ते खरे तर यहोवाची सेवा करण्याच्या इच्छेनेच प्रेरित होऊन केले असा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे ते यहोवासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवू शकले व अशा रीतीने मोठा रक्‍तपात टळला. शांतपणे चर्चा केल्याने समस्या मिटवता आली आणि शांती प्रस्थापित झाली.—यहो. २२:१३-३४.

गंभीर पाऊल उचलण्याआधी, इस्राएलाच्या इतर गोत्रांनी सुज्ञपणे रऊबेन, गाद व मनश्‍शेच्या अर्ध्या गोत्राशी समस्येवर चर्चा केली. देवाच्या वचनात असे म्हटले आहे: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयांत वसतो.” (उप. ७:९) मतभेद सोडवण्याचा बायबलशी सुसंगत असलेला मार्ग म्हणजे, शांतपणे व मनमोकळेपणाने चर्चा करणे. आपले मन दुःखावणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल जर आपण मनात राग बाळगला व समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला नाही, तर आपल्याला यहोवाकडून आशीर्वादांची खरोखर अपेक्षा करता येईल का?

दुसरीकडे पाहता, आपल्याविरुद्ध काही तक्रार असलेला एखादा बांधव त्या समस्येविषयी चर्चा करण्यास आपल्याकडे आला तर काय? बायबल म्हणते: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीति. १५:१) ज्या इस्राएल लोकांच्या कृतीमुळे समस्या निर्माण झाली होती त्यांनी सौम्यतेने, पण स्पष्टपणे आपली बाजू मांडली. आणि अशा प्रकारे, एका अतिशय संवेदनशील समस्येला हिंसक वळण घेण्यापासून त्यांनी रोखले. तर मग, एखाद्या समस्येबद्दल आपल्या बांधवाशी बोलण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला असो, किंवा एखादा बांधव स्वतः आपल्याकडे एखाद्या समस्येविषयी चर्चा करण्यास आलेला असो; दोन्ही परिस्थितीत आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘शांती प्रस्थापित व्हावी म्हणून मी कशा प्रकारचे शब्द निवडावेत, माझा स्वर कसा असावा आणि माझी वागणूक कशी असावी?’

जिभेचा सुज्ञतेने वापर करा

आपल्याला आपल्या मनातल्या भावना व्यक्‍त कराव्याशा वाटतात याची यहोवालाही जाणीव आहे. पण, एखाद्या बांधवासोबत झालेला मतभेद जर आपण वेळीच मिटवला नाही, तर त्याविषयी दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीजवळ बोलून दाखवण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. आणि मनात बाळगलेल्या कटू भावनांमुळे आपल्या तोंडूनही तशाच प्रकारचे शब्द निघण्याची शक्यता आहे. जिभेच्या गैरवापराबद्दल नीतिसूत्रे ११:११ येथे असे म्हटले आहे: “दुर्जनांच्या मुखाने [नगराचा] विध्वंस होतो.” त्याच प्रकारे, एखाद्या ख्रिस्ती बांधवाबद्दल अविचारीपणे बोलल्यामुळे, नगरासमान असलेल्या मंडळीची शांती भंग होऊ शकते.

पण, शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागण्याचा हा अर्थ होत नाही की आपण आपल्या भाऊ-बहिणींबद्दल काहीच बोलू नये. प्रेषित पौलाने ख्रिस्ती बांधवांना असा सल्ला दिला: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो.” पण तो पुढे असेही म्हणाला: ‘गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे. . . . तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, एकमेकांना क्षमा करा.’ (इफिस. ४:२९-३२) समजा, आपल्या बोलण्या किंवा वागण्यामुळे नाराज झालेला एखादा बांधव आपल्याशी बोलायला आला. या बांधवाने जर पूर्वी आपल्याविषयी इतरांजवळ कधीच वाईट बोलले नसेल, तर त्या बांधवाची क्षमा मागून त्याच्याशी सलोखा करणे आपल्याला जास्त सोपे जाणार नाही का? त्याच प्रकारे, आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल नेहमी चांगलेच बोलण्याची जर आपली ख्याती असेल, तर मतभेद निर्माण झाल्यास शांती प्रस्थापित करणे आपल्याला सोपे जाईल.—लूक ६:३१.

“खांद्याला खांदा लावून” देवाची सेवा करा

जे आपले मन दुःखावतात त्यांना सहसा आपण टाळतो, त्यांच्यापासून फटकून राहतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. पण, असे करणे सुज्ञपणाचे नाही. (नीति. १८:१) कारण, एकजुटीने यहोवाच्या नामाचा धावा करणारे या नात्याने, “खांद्याला खांदा लावून” त्याची सेवा करण्याचा आपला पक्का निर्धार आहे.—सफ. ३:९, ईझी टू रीड व्हर्शन.

इतरांच्या चुकीच्या वागण्या किंवा बोलण्यामुळे शुद्ध उपासनेसाठी असलेला आपला आवेश कधीही कमी होता कामा नये. येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी शास्त्र्‌यांची निर्भर्त्सना केली होती आणि लवकरच त्याच्या मृत्यूनंतर मंदिरात अर्पणे देण्याची व्यवस्था देखील संपुष्टात येणार होती. तरीसुद्धा, एका गरीब विधवेला मंदिराच्या भांडारात “आपली सर्व उपजीविका” टाकताना येशूने पाहिले तेव्हा त्याने तिला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला का? नाही. उलट, त्या काळी असलेल्या यहोवाच्या मंडळीला एकनिष्ठपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्याने तिची प्रशंसा केली. (लूक २१:१-४) इतरांच्या अभक्‍त कृत्यांनी तिला यहोवाच्या उपासनेला पाठिंबा देण्याच्या जबाबदारीपासून मुक्‍त केले नव्हते.

एखादा भाऊ किंवा बहीण आपल्याशी अनुचितपणे किंवा अन्यायाने वागत आहे असे वाटले, तरीसुद्धा आपली प्रतिक्रिया काय असेल? आपण करत असलेल्या यहोवाच्या मनःपूर्वक सेवेवर आपण याचा परिणाम होऊ देणार का? की आपसातील मतभेद मिटवण्यासाठी धैर्याने पाऊल उचलण्याद्वारे देवाच्या मंडळीत असलेली अमूल्य शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार?

बायबल आपल्याला असे मार्गदर्शन देते: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” (रोम. १२:१८) तर मग, आपण या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा दृढनिश्‍चय करू या. कारण, असे केल्याने आपण जीवनाच्या मार्गावर टिकून राहू.

[तळटीप]

^ परि. 6 मत्तय १८:१५-१७ मध्ये येशूने दिलेल्या सल्ल्याबद्दल टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १५, १९९९ अंकातील पृष्ठे १७-२२ पाहा.

[१७ पानांवरील चित्र]

युवदीया आणि सुंतुखे यांना आपले मतभेद मिटवून शांती प्रस्थापित करण्याची गरज होती

[१८ पानांवरील चित्र]

शांती प्रस्थापित व्हावी म्हणून कशा प्रकारचे शब्द निवडावेत, आपल्या बोलण्याचा स्वर आणि आपली वागणूक कशी असावी?