‘समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे’ हस्तलिखित इतिहासातील दोन कालखंडांना जोडणारा दुवा
‘समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे’ हस्तलिखित इतिहासातील दोन कालखंडांना जोडणारा दुवा
जेरूसलेमातील इस्राएल वस्तुसंग्रहालयात २२ मे, २००७ रोजी सा.यु. सातव्या किंवा आठव्या शतकातील एका इब्री गुंडाळीचा तुकडा प्रदर्शित करण्यात आला. या हस्तलिखितात निर्गम १३:१९–१६:१ यातील मजकूर आढळतो. तांबड्या समुद्राजवळ इस्राएल लोकांची विलक्षण रीत्या सुटका झाल्यानंतर त्यांनी तिथे जे विजयाचे गीत गायिले होते त्याचा या हस्तलिखितात समावेश आहे. या गीताला “समुद्राजवळ गायिलेले गीत” असे म्हटले जाते. पण, या हस्तलिखिताचे उजेडात येणे इतके उल्लेखनीय का आहे?
या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कालखंड. मृत समुद्र गुंडाळ्या सा.यु.पू. तिसऱ्या ते सा.यु. पहिल्या शतकादरम्यान लिहिण्यात आल्या होत्या. जवळ जवळ ६० वर्षांपूर्वी या गुंडाळ्यांचा शोध लागला. त्याअगोदर उपलब्ध असलेले सर्वात जुने इब्री हस्तलिखित सा.यु. ९३० चे अलेप्पो कोडेक्स हे होते. काही तुकड्यांचा अपवाद वगळता, मध्यंतरीच्या शेकडो वर्षांदरम्यान लिहिण्यात आलेली इतर कोणतीही इब्री हस्तलिखिते सापडलेली नाहीत.
इस्राएल वस्तुसंग्रहालयाचे संचालक जेम्स एस. स्नायडर म्हणतात “समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे हस्तलिखित हे मृत समुद्र गुंडाळ्या व अलेप्पो कोडेक्स यांच्या कालखंडांना जोडणारा दुवा आहे.” त्यांच्या मते इतर प्राचीन हस्तलिखितांसोबतच हे हस्तलिखित देखील “बायबलमधील मजकूर काळाच्या ओघात कशा प्रकारे अबाधित राहिला याचे एक अप्रतिम उदाहरण आहे.”
हा गुंडाळीचा तुकडा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कैरो, इजिप्त येथील एका यहुदी सिनेगॉगमध्ये (उपासनास्थळ) सापडलेल्या अनेक हस्तलिखितांपैकी एक आहे असे मानले जाते. इब्री हस्तलिखितांचा खाजगी संग्रह ठेवणाऱ्या एकाने १९७० च्या उत्तरार्धात एका तज्ज्ञाचा सल्ला घेतला तेव्हा कोठे त्याला या हस्तलिखिताचे महत्त्व कळून आले. त्यानंतर या हस्तलिखिताचा कालखंड ठरवण्यासाठी त्याची कार्बन-परीक्षा करण्यात आली व काही काळ संग्रहित करून ठेवल्यानंतर ते इस्राएल वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित करण्यात आले.
या गुंडाळीच्या तुकड्याच्या महत्त्वाविषयी टिप्पणी करताना इस्राएल वस्तुसंग्रहालयातील बायबलशी संबंधित वस्तूंचे प्रदर्शन करणाऱ्या विभागाचे प्रमुख व मृत समुद्र गुंडाळ्या ज्यांच्या देखरेखीत आहेत ते अडॉल्फो रॉईटमन म्हणतात: “कित्येक शतकांच्या कालावधीत मॅसोरेट नकलनीसांनी किती विश्वासूपणे बायबलचा संदेश एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवला हे समुद्राजवळ गायिलेले गीत या हस्तलिखितावरून सिद्ध होते. समुद्राजवळ गायिलेल्या त्या गीतातील विशिष्ट शैली ७ व्या-८ व्या शतकात जशी होती तशीच आजही आहे हे पाहून आश्चर्य वाटते.”
बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे आणि त्याचे योग्य प्रकारे जतन होईल याची काळजी यहोवाने जातीने घेतली आहे. शिवाय, नकलनीसांनी शास्त्रवचनांची नक्कल अतिशय काळजीपूर्वक केली होती. म्हणूनच, आपण सध्या जे बायबल वापरतो ते पूर्णपणे भरवशालायक आहे यात काहीच शंका नाही.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy of Israel Museum, Jerusalem