व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा निर्धार करा

अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा निर्धार करा

अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा निर्धार करा

“त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा व अगदी पूर्णपणे साक्ष द्या.”—प्रे. कृत्ये १०:४२, NW.

१. कर्नेल्यापुढे बोलत असताना पेत्राने कोणत्या आज्ञेविषयी सांगितले?

एका इटॅलियन सेनापतीने आपल्या सर्व आप्तेष्टांना एकत्र जमवले होते. त्यानंतर जी घटना घडली ती देवाने मानवांसोबत केलेल्या व्यवहारांतील एक अभूतपूर्व घटना ठरली. तो देवभीरू सेनापती कर्नेल्य होता. त्याच्या घरी जमलेल्या लोकांना प्रेषित पेत्राने सांगितले की येशूविषयी ‘लोकांना उपदेश करण्याची व अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची’ प्रेषितांना आज्ञा देण्यात आली आहे. पेत्राने दिलेल्या साक्षीचा अद्‌भुत परिणाम झाला. सुंता न झालेल्या गैरयहुद्यांवर देवाचा पवित्र आत्मा आला, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांना सुद्धा स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याची सुसंधी मिळाली. पेत्राने अगदी पूर्णपणे साक्ष दिल्यामुळेच हा विलक्षण परिणाम घडून आला होता!—प्रे. कृत्ये १०:२२, ३४-४८.

२. साक्ष देण्याची आज्ञा ही केवळ १२ प्रेषितांपुरतीच मर्यादित नव्हती हे कशावरून कळते?

ही घटना सा.यु. ३६ मध्ये घडली. याच्या दोन वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्माचा कडाडून विरोध करणाऱ्‍या एका मनुष्याच्या जीवनाचा कायापालट झाला होता. हा मनुष्य म्हणजे तार्ससचा शौल. तो दिमिष्कास जात असताना येशूने त्याला दर्शन देऊन म्हटले: “ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल.” येशूने हनन्या नावाच्या शिष्याला आश्‍वासन दिले की हा शौल “परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर” साक्ष देईल. (प्रेषितांची कृत्ये ९:३-६, १३-२० वाचा.) शौलाची भेट झाल्यानंतर हनन्याने म्हटले: “आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरविले आहे की, . . . तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.” (प्रे. कृत्ये २२:१२-१६) शौल, ज्याला नंतर पौल हे नाव पडले त्याने देवाविषयी साक्ष देण्याच्या या जबाबदारीकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहिले?

त्याने अगदी पूर्णपणे साक्ष दिली!

३. (क) आपण कोणत्या विशिष्ट अहवालाकडे लक्ष देणार आहोत? (ख) इफिसस मंडळीतील वडिलांनी पौलाचा निरोप मिळाल्यावर काय केले असावे आणि आपण त्यांचे कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

त्यानंतर पौलाने जे काही केले त्या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणे निश्‍चितच अतिशय रोचक ठरेल. पण सध्या आपण सा.यु. ५६ सालाच्या सुमारास पौलाने दिलेल्या एका भाषणाकडे लक्ष देऊ या. हे भाषण आपल्याला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाच्या २० व्या अध्यायात वाचायला मिळते. पौलाने आपल्या तिसऱ्‍या मिशनरी यात्रेच्या शेवटी शेवटी हे भाषण दिले होते. तेव्हा तो एजियन समुद्रावरील मिलेत बंदरात उतरला होता आणि त्याने इफिसस येथील मंडळीच्या वडिलांना बोलावणे पाठवले होते. तेथून इफिसस हे जवळजवळ ५० किलोमीटरच्या अंतरावरच होते, पण वळणावळणाच्या रस्त्यांवरील या प्रवासाला बराच वेळ लागत असे. इफिसस येथील मंडळीच्या वडिलांना पौलाचा निरोप मिळताच त्यांना किती आनंद झाला असावा याची तुम्ही कल्पना करू शकता. (नीतिसूत्रे १०:२८ पडताळून पाहा.) तरीसुद्धा, मिलेतला जाण्याकरता त्यांना नक्कीच प्रवासासाठी आवश्‍यक व्यवस्था करावी लागली असेल. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांना कामावरून रजा घ्यावी लागली असेल, किंवा आपली दुकाने बंद करावी लागली असतील. आजही बरेच ख्रिस्ती दर वर्षी होणाऱ्‍या प्रांतीय अधिवेशनातील एकही कार्यक्रम चुकू नये म्हणून असेच करतात.

४. काही वर्षे इफिससमध्ये असताना पौलाने कोणता परिपाठ पाळला?

इफिससचे वडील मिलेताला येईपर्यंत तीन चार दिवस पौलाने काय केले असेल असे तुम्हाला वाटते? तुम्ही काय केले असते? (प्रेषितांची कृत्ये १७:१६, १७ पडताळून पाहा.) पौलाने स्वतः इफिससच्या वडिलांना जे म्हटले त्यावरून त्याने काय केले असावे हे आपल्याला कळते. त्याने आपला अनेक वर्षांचा परिपाठ त्यांना सांगितला. पूर्वी इफिससमध्ये असतानाही त्याने तेच केले होते. (प्रेषितांची कृत्ये २०:१८-२१ वाचा.) त्याने अगदी आत्मविश्‍वासाने म्हटले ‘आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून मी साक्ष देत होतो हे तुम्हाला ठाऊक आहे.’ (प्रेषितांची कृत्ये २०:१८-२१ वाचा.) होय, येशूने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा पौलाचा पक्का निर्धार होता. इफिससमध्ये त्याने हे कसे काय केले? त्याने यहुद्यांना साक्ष दिली. जेथे बहुतेक लोक भेटतील तेथे जाऊन तो त्यांच्याशी बोलला. लूकने दिलेल्या वृतान्तानुसार, सा.यु. ५२-५५ च्या सुमारास पौल इफिसस येथे होता, तेव्हा तो सभास्थानात जाऊन “देवाच्या राज्याविषयी वादविवाद” करत असे. पण, जेव्हा यहुदी लोक “कठोर व विरोधी” बनले तेव्हा पौलाने आपले लक्ष इतरांकडे वळवले. तो शहराच्या दुसऱ्‍या ठिकाणी जाऊन प्रचार करतच राहिला. अशा रीतीने त्या मोठ्या शहरात त्याने यहुद्यांना व हेल्लेणी लोकांना साक्ष दिली.—प्रे. कृत्ये १९:१, ८, ९.

५, ६. पौल घरोघरच्या प्रचार कार्यात विश्‍वासात नसलेल्या लोकांशी बोलला असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

जे ख्रिस्ती बनले त्यांच्यापैकी काही जण नंतर वडील म्हणून सेवा करू लागले. पौल मिलेतात ज्यांच्यासोबत बोलला त्यांत ते देखील होते. त्यांना साक्ष देण्याकरता पौलाने कोणती पद्धत वापरली होती याची त्याने त्यांना आठवण करून दिली: “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.” आपल्या काळात काहींचे असे म्हणणे आहे की या वचनात पौल आधीपासूनच विश्‍वासात असलेल्या बांधवांना मेंढपाळ भेटी देण्याविषयी बोलत होता. पण, हे खरे नाही. ‘चार लोकांत व घरोघरी शिकविणे’ हे वर्णन प्रामुख्याने विश्‍वासात नसलेल्यांना सुवार्ता सांगण्याविषयीचे आहे. हे पौलाच्या पुढील शब्दांवरून अगदीच स्पष्ट होते. पौलाने म्हटले की तो “पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‍यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्‍यांस” साक्ष देत होता. त्याअर्थी, पौल विश्‍वासात नसलेल्या लोकांना साक्ष देत होता, ज्यांना पश्‍चात्ताप करून येशूवर विश्‍वास ठेवण्याची गरज होती.—प्रे. कृत्ये २०:२०, २१.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे सविस्तर विश्‍लेषण करताना एक विद्वान प्रेषितांची कृत्ये २०:२० या वचनासंबंधी असे म्हणतो: “पौलाने इफिससमध्ये तीन वर्षे घालवली होती. त्याने प्रत्येक घरी भेट दिली होती, निदान सर्व लोकांना त्याने प्रचार केला होता. (२६ वे वचन) जाहीर सभांसोबतच घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा शास्त्रवचनीय आधार आपल्याला येथे सापडतो.” या विद्वानाने म्हटल्याप्रमाणे पौलाने खरोखरच प्रत्येक घरी भेट दिली होती किंवा नाही हे तर सांगता येत नाही, पण एवढे मात्र खरे की त्याने कशा प्रकारे साक्ष दिली होती व त्यामुळे काय परिणाम झाला हे इफिससच्या वडिलांनी विसरू नये असे त्याला वाटत होते. लूक असा अहवाल देतो: “आशियात राहणाऱ्‍या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.” (प्रे. कृत्ये १९:१०) पण आशियातील “सर्व” लोकांनी कसे काय ऐकले असावे आणि यावरून आपल्या साक्षकार्याविषयी काय कळून येते?

७. पौलाने ज्यांना साक्ष दिली होती त्यांच्या व्यतिरिक्‍त इतर जणांनाही त्याच्या प्रचार कार्यामुळे कशा प्रकारे फायदा झाला असावा?

पौलाने सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी प्रचार केल्यामुळे बऱ्‍याच जणांना त्याचा संदेश ऐकायला मिळाला. हे सगळे लोक पुढेही इफिससमध्येच राहिले असतील का? व्यवसायाच्या निमित्ताने किंवा आपल्या नातेवाईकांच्या जवळ राहावे या उद्देशाने किंवा मोठ्या शहराचे धकाधकीचे जीवन टाळण्यासाठी त्यांच्यापैकी काही जण इतर ठिकाणी राहायला गेले नसतील का? नक्कीच गेले असतील. आजही बरेच लोक अशा प्रकारच्या कारणांमुळे स्थलांतर करतात; कदाचित तुम्हीही केले असेल. शिवाय, त्या काळात इतर ठिकाणचे लोक सामाजिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे इफिसस शहराला भेट देत असत. तेथे मुक्कामाला असताना कदाचित त्यांची पौलाशी भेट झाली असेल किंवा त्याने दिलेली साक्ष त्यांनी ऐकली असेल. ते घरी परतले तेव्हा त्यांनी काय केले असेल? ज्यांनी ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला त्यांनी तर नक्कीच इतरांना साक्ष दिली असेल. पण काही जणांनी जरी स्वतः ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला नसला, तरी इफिसस येथे असताना आपल्याला जे ऐकायला मिळाले त्याविषयी त्यांनी कदाचित इतरांशी चर्चा केली असेल. अशा प्रकारे, त्यांच्या नातेवाईकांना, शेजाऱ्‍यांना किंवा गिऱ्‍हाइकांना सत्याविषयी ऐकायला मिळाले असेल आणि काहींनी ते स्वीकारलेही असेल. (मार्क ५:१४ पडताळून पाहा.) यावरून, पूर्णपणे साक्ष दिल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो याविषयी आपल्याला काय दिसून येते?

८. सबंध आशियातील लोकांना सत्याचा संदेश कशा प्रकारे ऐकायला मिळाला असावा?

इफिससमधील आपल्या आधीच्या सेवेच्या संदर्भात लिहिताना पौलाने म्हटले की “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे.” (१ करिंथ. १६:८, ९) तो कोणत्या द्वाराबद्दल बोलत होता आणि हे द्वार त्याच्यासाठी कशा प्रकारे उघडण्यात आले होते? इफिससमध्ये पौलाने सतत प्रचार केल्यामुळे सुवार्तेचा प्रसार झाला. इफिससपासून काही अंतरावर असलेल्या कलस्सै, लावदिकिया व हेरापली या तीन शहरांचे उदाहरण घ्या. या शहरांना पौलाने स्वतः कधी भेट दिली नसली तरी त्यांना सुवार्ता ऐकायला मिळाली होती. एपफ्रास हा त्याच भागातला होता. (कलस्सै. २:१; ४:१२, १३) तोही इफिससमध्ये पौलाची साक्ष ऐकून ख्रिस्ती बनला असावा का? बायबल याचे उत्तर देत नाही. पण कदाचित एपफ्रासने पौलाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या घराजवळील क्षेत्रात सत्याचा प्रचार केला असावा. (कलस्सै. १:७) पौल इफिससमध्ये साक्षकार्य करत असताना ख्रिस्ताविषयीचा संदेश फिलदेल्फिया, सार्दीस व थुवतीरा या शहरांतही पोचला असावा.

९. (क) पौलाची मनःपूर्वक इच्छा काय होती? (ख) २००९ सालचे वार्षिक वचन काय असेल?

म्हणूनच पौलाच्या पुढील शब्दांना इफिसस मंडळीच्या सर्व वडिलांनी नक्कीच सहमती दर्शवली असेल: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्‍यासाठी की, मी आपली धाव आणि देवाने अपात्र जनांवर दाखवलेल्या कृपेच्या सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” २००९ सालचे आपले स्फूर्तीदायक व प्रेरणादायी वार्षिक वचन पौलाच्या या शब्दांवरच आधारित आहे: ‘सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष द्या.’—प्रे. कृत्ये २०:२४, NW.

सध्याच्या काळात अगदी पूर्णपणे साक्ष देणे

१०. अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची आज्ञा आपल्यालाही लागू होते हे कशावरून दिसते?

१० ‘लोकांस उपदेश करण्याची व अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची’ आज्ञा मुळात प्रेषितांना देण्यात आली होती. पण, कालांतराने यात इतरांचाही समावेश झाला. पुनरुत्थान झाल्यानंतर येशू गालीलात एकत्र जमलेल्या जवळजवळ ५०० शिष्यांशी बोलला तेव्हा त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” ही आज्ञा सध्याच्या काळातील सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही लागू होते कारण येशूने पुढे असे म्हटले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्त. २८:१९, २०.

११. यहोवाचे साक्षीदार कोणत्या महत्त्वाच्या कार्यामुळे ओळखले जातात?

११ आवेशी ख्रिस्ती, येशूच्या त्या आज्ञेचे आजही पालन करत आहेत. ते ‘सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा’ प्रयत्न करतात. असे करण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे घरोघरचे प्रचार कार्य, ज्याविषयी पौलाने इफिसस मंडळीच्या वडिलांना सांगितले होते. २००७ साली परिणामकारक सुवार्तिक कार्याविषयी लिहिलेल्या एका पुस्तकात डेव्हिड जी. स्ट्युवर्ट ज्युनियर यांनी असे म्हटले: “आपल्या सदस्यांना सुवार्ता प्रचाराच्या कार्यात सहभाग घेण्यास प्रेरित करण्यासाठी फक्‍त [व्यासपीठावरून भाषणं झोडण्यापेक्षा], यहोवाच्या साक्षीदारांची व्यावहारिक पद्धत जास्त परिणामकारक ठरली आहे. आपल्या विश्‍वासांविषयी इतरांशी बोलणे हे बहुतेक यहोवाच्या साक्षीदारांचे आवडते कार्य आहे.” याचा परिणाम? “१९९९ साली माझ्या पाहणीनुसार, पूर्व युरोपातील दोन शहरांत लॅटर-डे सेंट्‌स किंवा ‘मोर्मन’ मिशनरी आपल्याकडे आल्याचे फक्‍त २-४ टक्के लोकांनीच सांगितले. दुसरीकडे पाहता, यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्याला वैयक्‍तिक भेट दिल्याचे आणि ते सुद्धा बऱ्‍याच वेळा भेट दिल्याचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सांगितले.”

१२. (क) आपल्या क्षेत्रातील लोकांच्या घरी आपण “बऱ्‍याच वेळा” भेटी का देतो? (ख) आपल्या संदेशाप्रती मनोवृत्ती बदललेल्या एखाद्या व्यक्‍तीचा अनुभव तुम्हाला सांगता येईल का?

१२ तुमच्या परिसरातील लोकांनाही कदाचित असाच अनुभव आला असेल. आणि यात नक्कीच तुमचेही योगदान असेल. घरोघरच्या कार्यादरम्यान तुम्ही लोकांची “वैयक्‍तिक भेट” घेत असताना तुम्हाला अनेक पुरुष, स्त्रिया व तरुण भेटले असतील. काहींनी कदाचित “बऱ्‍याच वेळा” जाऊनही तुमचे ऐकून घेतले नसेल. इतरांनी कदाचित तुम्ही दाखवलेले बायबलमधील वचन किंवा बायबलवर आधारित एखादा विचार थोडक्यात ऐकून घेतला असेल. तर इतर काहींना तुम्ही कदाचित सविस्तरपणे साक्ष देऊ शकला असाल. आणि त्यांनी तुमचा संदेश कदाचित स्वीकारलाही असेल. ‘सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष देत’ असताना या निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळू शकतात. सुरुवातीला फारशी उत्सुकता न दाखवलेल्या लोकांनी “बऱ्‍याच वेळा” भेट दिल्यानंतर आपली मनोवृत्ती बदलल्याची असंख्य उदाहरणे, कदाचित तुमच्याही पाहण्यात आली असतील. या लोकांच्या जीवनात किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्‍तीच्या जीवनात एखादी घटना घडल्यामुळे कदाचित ते नंतर सत्याकडे आकर्षित झाले असण्याची शक्यता आहे. आज ते आपले बंधूभगिनी आहेत. म्हणूनच, सुवार्ता सांगण्याच्या कार्यात कधीही माघार घेऊ नका. अलीकडे तुम्हाला सुवार्तेविषयी आवड दाखवणारे जास्त लोक भेटत नसतील तरीसुद्धा निराश होऊ नका. सर्वच जण सत्य स्वीकारतील अशी आपली अपेक्षा नाही. पण देवाची मात्र आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की आपण सुवार्तेची पूर्णपणे साक्ष देण्याचे कार्य दक्षतेने व आवेशाने करत राहावे.

आपल्या नकळत घडून येणारे परिणाम

१३. आपण दिलेल्या साक्षीमुळे आपल्या नकळत चांगले परिणाम कशा प्रकारे घडून येऊ शकतात?

१३ पौलाच्या सेवाकार्याचा परिणाम, त्याने ज्यांना ख्रिस्ती बनण्याकरता स्वतः मदत केली होती त्यांच्यापुरताच मर्यादित नव्हता. आपल्या सेवाकार्याच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. आपण घरोघरच्या सेवाकार्यात नियमित सहभाग घेण्याचा, आणि जास्तीतजास्त लोकांना साक्ष देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. आपले शेजारी, सहकर्मचारी, शाळासोबती व नातेवाईक यांना आपण सुवार्ता सांगतो. यामुळे घडून येणाऱ्‍या सर्वच परिणामांविषयी आपल्याला माहीत असते का? काही लोकांच्या बाबतीत, आपल्याला लगेचच चांगले परिणाम दिसून येतात. तर काही लोकांच्या बाबतीत, सत्याचे बी काही काळ तसेच राहते पण नंतर कधीतरी ते त्यांच्या मनात रुजून अंकुरित होऊ शकते. असे घडले नाही तरीसुद्धा, आपण ज्या लोकांशी बोलतो ते कदाचित इतरांशी आपण सांगितलेल्या गोष्टींविषयी, आपल्या विश्‍वासांविषयी किंवा आपल्या वागणुकीविषयी चर्चा करू शकतात. अशा रीतीने, ते नकळत सत्याचे बी फलदायी जमिनीवर पडण्यास साहाय्य करत असतात.

१४, १५. एका भावाने दिलेल्या साक्षीमुळे काय परिणाम घडून आला?

१४ एक उदाहरण पाहा. रायन व त्याची पत्नी मॅन्डी, अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात राहतात. रायनने आपल्या कामाच्या ठिकाणी एका सहकर्मचाऱ्‍याला साक्ष दिली. तो मनुष्य हिंदू पार्श्‍वभूमीचा होता आणि रायनचा पेहराव व त्याची वागण्याबोलण्याची पद्धत पाहून तो अतिशय प्रभावित झाला होता. या मनुष्याशी बोलताना, रायन पुनरुत्थान व मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते यांसारख्या विषयांचा अधूनमधून उल्लेख करत असे. जानेवारीत एके दिवशी या मनुष्याने आपली पत्नी ज्योडी हिला यहोवाच्या साक्षीदारांविषयी विचारले. ती स्वतः कॅथलिक होती आणि तिने त्याला सांगितले की यहोवाचे साक्षीदार “घरोघरचे प्रचार कार्य” करतात एवढेच मला त्यांच्याबद्दल माहीत आहे. उत्सुकतेपोटी, ज्योडीने इंटरनेटच्या सर्च इंजिनवर “यहोवाचे साक्षीदार” हे शब्द टाईप केले. तेव्हा तिला www.watchtower.org ही आपल्या संस्थेची वेबसाईट सापडली. अनेक महिन्यांपर्यंत ज्योडी या साईटवरील बायबल व इतर माहितीपूर्ण लेख वाचत राहिली.

१५ ज्योडी व मॅन्डी दोघीही नर्स असल्यामुळे, काही काळाने त्यांची भेट झाली. ज्योडीने विचारलेल्या प्रश्‍नांची मॅन्डीने आनंदाने उत्तरे दिली. एके दिवशी, त्या दोघींची अतिशय सविस्तर अशी, ज्योडीच्या शब्दांत सांगायचे, तर “आदामापासून हर्मगिदोनापर्यंतच्या” सगळ्या विषयांवर चर्चा झाली. ज्योडी बायबल अभ्यास करायला तयार झाली. लवकरच ती राज्य सभागृहात सभांना जाऊ लागली. ऑक्टोबरमध्ये ज्योडी बाप्तिस्मारहित प्रचारक बनली आणि फेब्रुवारीत तिचा बाप्तिस्मा झाला. ती लिहिते: “सत्य माहीत झाल्यामुळे मी अतिशय आनंदी व समाधानी आहे.”

१६. फ्लोरिडाच्या बांधवाच्या अनुभवावरून साक्ष देण्याच्या आपल्या प्रयत्नांविषयी काय कळून येते?

१६ आपण एका मनुष्याला साक्ष दिल्यामुळे दुसरीच एखादी व्यक्‍ती सत्यात येईल याची रायनने कल्पनाही केली नव्हती. अर्थात त्याच्या बाबतीत पाहिल्यास, ‘पूर्णपणे साक्ष देण्याच्या’ त्याच्या दृढनिश्‍चयामुळे झालेला चांगला परिणाम त्याला स्वतः पाहायला मिळाला. तुम्हीही एखाद्या घरी, कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा एखाद्या अनौपचारिक प्रसंगी साक्ष दिल्यास, तुमच्या नकळतच इतरांना सत्य समजण्याची संधी मिळू शकेल. पण, ज्याप्रमाणे पौलाला त्याच्या साक्षकार्यामुळे ‘आशिया प्रांतात’ मिळालेल्या फळाविषयी पूर्ण माहिती नव्हती, त्याच प्रकारे तुमच्या साक्षकार्यामुळे घडून येणाऱ्‍या चांगल्या परिणामांविषयी कदाचित तुम्हालाही कळणार नाही. (प्रेषितांची कृत्ये २३:११; २८:२३ वाचा.) तरीसुद्धा, सातत्याने साक्षकार्य करणे किती महत्त्वाचे आहे!

१७. २००९ सालादरम्यान तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१७ तर मग, घरोघरी व इतर प्रकारे साक्ष देण्याची जी आज्ञा आपल्याला देण्यात आली आहे, तिच्याकडे २००९ साली आपण गांभीर्याने लक्ष देऊ या. असे केल्यास, पौलाप्रमाणेच आपल्यापैकी प्रत्येकाला असे म्हणता येईल: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्‍यासाठी की, मी आपली धाव आणि देवाने अपात्र जनांवर दाखवलेल्या कृपेच्या सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.”

तुमचे उत्तर काय?

• पहिल्या शतकात प्रेषित पेत्राने, पौलाने तसेच इतरांनी कशा प्रकारे अगदी पूर्णपणे साक्ष दिली?

• आपल्या साक्षकार्यामुळे आपण कल्पनाही केली नसेल इतके चांगले परिणाम मिळू शकतात असे का म्हणता येते?

• २००९ सालचे वार्षिक वचन काय आहे आणि ते अगदी समयोचित आहे असे तुम्हाला का वाटते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

२००९ सालचे वार्षिक वचन हे असेल: ‘सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष द्या.’—प्रे. कृत्ये २०:२४, NW.

[१७ पानांवरील चित्र]

इफिसस मंडळीच्या वडिलांना, घरोघरी जाऊन साक्ष देण्याचा पौलाचा परिपाठ माहीत होता

[१८ पानांवरील चित्र]

अगदी पूर्णपणे साक्ष देण्याच्या तुमच्या प्रयत्नांचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात?