व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोरियात झालेली वाढ मी पाहिली आहे

कोरियात झालेली वाढ मी पाहिली आहे

कोरियात झालेली वाढ मी पाहिली आहे

मिल्टन हॅमिल्टन यांच्याद्वारे कथित

“आम्हाला हे कळवण्यास खेद वाटतो, की कोरियाच्या प्रजासत्ताक सरकारने तुम्हा सर्व मिशनऱ्‍यांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि आता तुम्हाला या देशात राहता येणार नाही या आशयाचे विधान केले आहे. . . . त्यामुळे काही काळापुरते तुम्हाला जपानमध्ये सेवा करण्यास नियुक्‍त केले जात आहे.”

माझ्या पत्नीला व मला १९५४ सालच्या उत्तरार्धात अमेरिकेतील ब्रुकलिन, न्यूयॉर्क इथून वरील संदेश मिळाला. त्याच वर्षाच्या सुरुवातीला आम्ही न्यूयॉर्कमधील गिलियड प्रशालेच्या २३ व्या वर्गातून पदवीधर झालो होतो. आम्हाला पत्र मिळालं तेव्हा आम्ही तात्पुरते इंडियाना राज्यातील इंडियानापोलिस इथं सेवा करत होतो.

माझी पत्नी लिझ (पूर्वीची लिझ सेमॉक) व मी उच्च शाळेत वर्गमित्र होतो. १९४८ साली आम्ही विवाहबद्ध झालो. तिला पूर्णवेळ सेवेबद्दल आवड तर होती, पण अमेरिका सोडून एखाद्या अनोळखी देशात जाऊन सेवा करण्याबद्दल ती तितकी उत्सुक नव्हती. मग तिचा विचार कसा काय बदलला?

गिलियड प्रशालेला उपस्थित राहू इच्छिणाऱ्‍यांसाठी आयोजित केलेल्या एका सभेला माझ्यासोबत येण्यास लिझ तयार झाली. ही सभा १९५३ साली न्यूयॉर्क येथील यांकी स्टेडियममध्ये चाललेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला उपस्थित राहिल्यामुळे आम्हाला खूपच प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळे आम्ही गिलियडसाठी अर्ज भरले. आणि काय आश्‍चर्य! आम्हाला पुढच्याच म्हणजे फेब्रुवारी, १९५४ मध्ये सुरू होणाऱ्‍या वर्गाचं निमंत्रण मिळालं.

कोरियामध्ये तीन वर्षं चाललेले युद्ध १९५३ सालच्या उन्हाळ्यात संपुष्टात आले तरीपण आम्हाला कोरीयाला नेमण्यात आले. युद्धामुळे हा देश पुरता उद्‌ध्वस्त झाला होता. वरती उल्लेख केलेल्या पत्रात सांगितल्यानुसार आम्ही आधी जपानला गेलो. २० दिवस समुद्रातून प्रवास केल्यानंतर, आमच्यासोबत कोरियात सेवा करण्यास नियुक्‍त करण्यात आलेल्या आणखी सहा मिशनऱ्‍यांसोबत आम्ही जपानला पोचलो. त्या वेळी जपान शाखा कार्यालयाचे काम पाहणारे लॉईड बॅरी पहाटे सहा वाजता आमच्या स्वागतासाठी धक्क्यावर आले होते. तिथून आम्ही योकोहामातील मिशनरी गृहाकडे जायला निघालो. नंतर त्याच दिवशी, आम्ही सेवाकार्याला गेलो.

शेवटी कोरियात पोचलो

कोरियाच्या प्रजासत्ताक देशात प्रवेश करण्यासाठी शेवटी आम्ही व्हिसा मिळवला. ७ मार्च, १९५५ रोजी टोकियोतील हानडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमचे विमान निघाले आणि तीन तासांनी सोल येथील यॉइडो विमानतळावर उतरले. २०० कोरियन साक्षीदारांनी आमचे स्वागत केले. त्यावेळी आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याकाळी संपूर्ण कोरियात फक्‍त १,००० साक्षीदार होते. पाश्‍चिमात्त्य देशातील इतर लोकांप्रमाणेच आमचाही असा ग्रह होता की पूर्वेकडील सर्व लोक, मग ते कोणत्याही देशाचे असले तरी ते सर्व एकसारखेच दिसतात आणि वागतात. आमचा हा गैरसमज दूर व्हायला जास्त वेळ लागला नाही. कोरियन लोकांची आपली स्वतःची भाषा व वर्णमाला तर आहेच, पण त्यांची पाकशैली, शारीरिक वैशिष्ट्ये, पारंपरिक पोषाख तसेच त्यांची वास्तुकलासुद्धा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे.

कोरियन भाषा शिकणं हे आमच्यापुढं असलेलं पहिलं मोठं आव्हान होतं. शिवाय, भाषा शिकण्यासाठी कोणतीही पुस्तकं उपलब्ध नव्हती. आम्हाला लवकरच जाणवलं की इंग्रजी उच्चाराप्रमाणेच कोरियन शब्दांचा उच्चार करणे जवळजवळ अशक्य आहे. कोरियन वर्णमाला शिकल्यानेच अचूक उच्चारण करणे शक्य होते.

कितीतरी वेळा आम्ही चुका केल्या. उदाहरणार्थ, लिझने एका स्त्रीला तुमच्याकडे बायबल आहे का असे विचारले. ती स्त्री चेहऱ्‍यावर विचित्र भाव आणून घरात गेली व एक आगपेटी घेऊन आली. कारण, लिझने संगक्युंग म्हणजे “बायबल” मागवण्याऐवजी संगयांग म्हणजे आगपेटी मागवली होती.

काही महिन्यांनंतर, आम्हाला बंदर असलेल्या दक्षिणेतील पुसान शहरात एका मिशनरी गृहाची सुरुवात करण्यास सांगण्यात आले. आमच्यासाठी व आमच्यासोबत नेमण्यात आलेल्या इतर दोन बहिणींसाठी आम्ही तीन लहान खोल्या भाड्याने घेतल्या. या खोल्यांमध्ये नळांची आणि फ्लश टॉयलेटची सोय नव्हती. दुसऱ्‍या मजल्यावर पाईपने पाणी चढण्यासाठी केवळ रात्रीच्या वेळी पुरेसा पाण्याचा दाब असायचा. त्यामुळे, भांड्यांत पाणी भरून ठेवण्यासाठी आम्ही आळीपाळीने पहाटे लवकर उठायचो. आणि पाणी शुद्ध करण्यासाठी आम्ही एकतर पाणी उकळायचो किंवा त्यात क्लोरीन टाकायचो.

इतरही अनेक आव्हानं होती. वीज पुरवठा इतका कमी वेळ असायचा की वॉशिंग मशीन किंवा इस्त्री वापरणं शक्यच नव्हतं. घरात प्रवेश करताच जो पॅसेज होता तिथं आमचं स्वयंपाकघर होतं आणि त्यात केरोसीनचा स्टोव्ह हे जेमतेम एकच साधन होतं. काही काळातच आम्ही प्रत्येक जण आपापल्या ठरलेल्या दिवशी सर्वांसाठी स्वयंपाक करायला शिकलो. इथं आल्यानंतर तीन वर्षांनी लिझला व मला कावीळ झाला. त्याकाळी बहुतेक मिशनऱ्‍यांना या रोगाचा संसर्ग झाला होता. आम्हाला पूर्णपणे बरं व्हायला अनेक महिने लागले आणि आरोग्याच्या इतरही समस्या निर्माण झाल्या.

अडथळ्यांवर मात करण्यास साहाय्य

मागच्या ५५ वर्षांत कोरियन द्वीपकल्पावर बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. DMZ म्हणजेच डीमिलिटराईझ्ड झोन (निःसैनिकीकरण केलेले क्षेत्र) या द्वीपकल्पास विभाजित करते. हे क्षेत्र कोरिया प्रजासत्ताकाची राजधानी सोल या शहराच्या उत्तरेस ५५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. १९७१ साली ब्रुकलिन मुख्यालयातून फ्रेडरिक फ्रांझ कोरियाला भेट देण्यास आले तेव्हा मी त्यांना DMZ ला घेऊन गेलो होतो. ही जगातली सर्वात जास्त सुरक्षा व्यवस्था असलेली सरहद्द आहे. गत वर्षांत संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्‍यांनी अनेकदा कोरियाच्या दोन सरकारांच्या प्रतिनिधींसोबत वाटाघाटी करण्यासाठी त्यांची इथंच भेट घेतली आहे.

अर्थात, या जगातील राजकीय कारभारांसंबंधी आपण तटस्थ भूमिका घेतो. कोरियन द्वीपकल्पावरील परिस्थितीही याला अपवाद नाही. (योहा. १७:१४) इतरांविरुद्ध शस्त्रे उचलण्यास नकार दिल्यामुळे १३,००० पेक्षा जास्त कोरियन साक्षीदारांना एकंदरीत २६,००० वर्षांचा कारावास सोसावा लागला आहे. (२ करिंथ. १०:३, ४) या देशातील सर्व तरुण बांधवांना माहीत आहे की आज ना उद्या त्यांना याच कारणासाठी तुरुंगात जावे लागेल. पण यामुळे ते घाबरत नाहीत. ख्रिस्ती या नात्याने ते आपली तटस्थ भूमिका सोडण्यास तयार नाहीत. पण, यामुळे सरकार त्यांना “गुन्हेगार” ठरवते हे खरोखर खेदजनक आहे.

१९४४ साली, दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान मी देखील सैन्यात भरती होण्यास नकार दिला होता. आणि त्यामुळे मला पेनसिल्व्हेनियातील लूइसबर्ग इथं अमेरिकन तुरुंगात अडीच वर्षे राहावे लागले होते. आपल्या कोरियन बांधवांना जरी तुरुंगात अतिशय खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागत असले तरी, या तरुणांना जे सोसावे लागले त्याची मला कल्पना आहे कारण मी स्वतः ते अनुभवले आहे. आम्हा मिशनऱ्‍यांपैकी काहींनी त्यांच्यासारख्याच परीक्षेला तोंड दिले आहे हे जाणून अनेक कोरियन बांधवांना दिलासा मिळाला.—यश. २:४.

आमच्यासमोर आलेले आव्हान

१९७७ साली उद्‌भवलेल्या एका समस्येत आमच्याही तटस्थतेची परीक्षा झाली. अधिकाऱ्‍यांना असे वाटले होते की आमच्याच सांगण्यावरून कोरियन तरुण सैन्यात भरती होण्यास व शस्त्रे उचलण्यास नकार देत होते. त्यामुळे मिशनऱ्‍यांना, कोणत्याही कारणामुळे देश सोडून गेल्यास परत येण्याची परवानगी द्यायची नाही असे सरकारने ठरवले. हा नियम १९७७ पासून १९८७ पर्यंत अंमलात होता. त्या वर्षांदरम्यान जर आम्ही कोरियातून बाहेर गेलो असतो तर आम्हाला परत येण्याची परवानगी मिळाली नसती. त्यामुळे, त्या वर्षांत आम्ही एकदाही आपल्या माणसांना भेटण्यास घरी जाऊ शकलो नाही.

आम्ही कितीतरी वेळा सरकारी अधिकाऱ्‍यांना भेटलो आणि ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपली तटस्थ भूमिका त्यांना स्पष्ट केली. आमचा निर्धार पक्का आहे हे कालांतरानं त्यांना कळून चुकले. तब्बल दहा वर्षांनी आमच्यावर लावलेला तो निर्बंध उठवण्यात आला. त्या वर्षांदरम्यान काही मिशनरी बंधूभगिनींना आरोग्याच्या समस्यांमुळे देश सोडून जावं लागलं खरं. पण, आम्ही बाकीचे जण तिथंच राहिलो आणि या गोष्टीचा आम्हाला आनंदच वाटतो.

आपल्या सेवाकार्याच्या विरोधकांनी १९८० च्या दशकाच्या मध्यात, आपल्या अधिकृत निगमाच्या संचालकांवर तरुणांना सैन्यात भरती होण्यापासून रोखत असल्याचा खोटा आरोप लावला. म्हणून, सरकारने आम्हा प्रत्येकाला चौकशीसाठी बोलावले. हे आरोप आधारहीन असल्याचे २२ जानेवारी, १९८७ रोजी न्यायालयाला दिसून आले. यामुळे, भविष्यात अशा प्रकारची समस्या पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता नाहीशी झाली.

आमच्या कार्यावर देवाने आशीर्वाद दिला

आमच्या तटस्थ भूमिकेमुळे कोरीयामध्ये अनेक वर्षांपासून आमच्या प्रचार कार्याला अधिकाधिक तीव्र विरोध होऊ लागला. त्यामुळे, मोठी संमेलने भरवण्यासाठी सोयीस्कर जागा मिळवणे कठीण होऊ लागले. म्हणून, साक्षीदारांनी स्वतः पुढाकार घेऊन पुसानमध्ये एक संमेलनगृह बांधले. हे पूर्वेकडच्या देशांतील सर्वात पहिले संमेलनगृह होते. ५ एप्रिल, १९७६ रोजी १,३०० जणांसमोर समर्पणाचे भाषण देणे हा माझ्यासाठी एक बहुमानच होता.

१९५० पासून हजारो अमेरिकन सैनिकांना काही काळासाठी कोरियात कार्य करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. अमेरिकेला परतल्यावर त्यांपैकी अनेक जणांनी सत्य स्वीकारले आहे व ते उत्साहाने यहोवाची सेवा करत आहेत. आम्हाला अधूनमधून त्यांची पत्रे येत असतात. खरोखर, यहोवास जाणून घेण्यास त्यांना मदत करणे हा एक आशीर्वादच होता.

दुःखाची गोष्ट म्हणजे, २६ सप्टेंबर, २००६ रोजी माझ्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला. मला तिची खूप आठवण येते. कोरियात घालवलेल्या ५१ वर्षांदरम्यान तिला सोपवलेली सर्व कामं तिनं कसलीही तक्रार न करता आनंदानं केली. एके काळी ज्या अमेरिकेतून बाहेर पडून दुसऱ्‍या देशात जाण्याची तिची इच्छा नव्हती, त्या अमेरिकेत परत जाण्याचं तिनं कधी सुचवलं नाही की त्याचा कधी उल्लेखही केला नाही!

आजही मी कोरिया बेथेल कुटुंबात सेवा करत आहे. सुरुवातीच्या काळात असलेल्या बेथेल कुटुंबातील मूठभर सदस्यांच्या संख्येत वाढ होऊन आज २५० सदस्यांचं एक मोठं कुटुंब बनलं आहे. येथील कार्याची देखरेख करणाऱ्‍या सात सदस्यांच्या शाखा समितीसोबत सेवा करण्याचा बहुमानही मला लाभला आहे.

आम्ही जेव्हा कोरियात आलो होतो तेव्हा हा देश अतिशय गरीब होता. पण, आज हा देश जगातील पुढारलेल्या देशांपैकी एक आहे. कोरियात आज ९५,००० साक्षीदार आहेत आणि त्यांच्यापैकी जवळजवळ ४० टक्के साक्षीदार एकतर सामान्य किंवा साहाय्यक पायनियर या नात्याने सेवा करत आहेत. हे सर्व पाहिल्यावर मला इथं येऊन सेवा केल्याबद्दल आणि यहोवाच्या कळपात होत असलेली वाढ पाहता आल्याबद्दल अतिशय समाधान वाटतं.

[२४ पानांवरील चित्र]

इतर मिशनऱ्‍यांसोबत कोरियात पोचल्यावर

[२४, २५ पानांवरील चित्र]

पुसानमध्ये सेवा करताना

[२५ पानांवरील चित्र]

१९७१ साली बंधू फ्रांझ यांच्यासोबत DMZ येथे

[२६ पानांवरील चित्र]

लिझसोबत तिच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी

[२६ पानांवरील चित्र]

मी जेथे बेथेल कुटुंबाचा सदस्य म्हणून सेवा करत आहे ते कोरियाचे शाखा कार्यालय