देवाच्या उद्देशातील येशूची अद्वितीय भूमिका समजून घ्या व तिची कदर करा
देवाच्या उद्देशातील येशूची अद्वितीय भूमिका समजून घ्या व तिची कदर करा
“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.”—योहा. १४:६.
१, २. देवाच्या उद्देशातील येशूच्या अद्वितीय भूमिकेबद्दल आपण का शिकून घेतले पाहिजे?
शतकानुशतके अगणित लोकांनी इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न केला आहे. पण, काही निवडक लोकच आपल्या प्रयत्नांत यशस्वी झाले आहेत. आणि त्याहीपेक्षा कमी लोक, काही विशिष्ट बाबतींत इतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करतात. पण, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मात्र अद्वितीय आहे.
२ येशूच्या अनोख्या भूमिकेविषयी आपण का शिकून घेतले पाहिजे? कारण, आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध यात गोवलेला आहे. येशूने असे म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहा. १४:६; १७:३) म्हणून, येशू कोणकोणत्या बाबतीत अद्वितीय आहे याचे आता आपण परीक्षण करू या. यामुळे, आपल्याला देवाच्या उद्देशातील येशूची अद्वितीय भूमिका समजून घेऊन तिची कदर करता येईल.
“एकुलता एक पुत्र”
३, ४. (क) एकुलत्या एका पुत्राच्या भूमिकेत येशू अद्वितीय आहे असे आपण का म्हणू शकतो? (ख) सृष्टिकार्यात येशूची भूमिका कशा प्रकारे अद्वितीय होती?
३ येशूला देवाचा “एकुलता एक पुत्र” असे म्हटले आहे. (योहा. ३:१६, १८) “एकुलता एक” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचे “अद्वितीय” असे देखील भाषांतर केले जाऊ शकते. “अद्वितीय” म्हणजे “त्या वर्गातला तो एकमात्र,” किंवा “अनन्यसाधारण.” पण, यहोवाचे तर हजारो-लाखो आत्मिक पुत्र आहेत. मग, कोणत्या अर्थाने येशू “अद्वितीय” आहे?
४ येशूला देवाने स्वतः सृष्ट केले असल्यामुळे येशू अद्वितीय आहे. खरेतर, तो “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.” (कलस्सै. १:१५) तो “देवाच्या कृतीचा प्रारंभ” आहे. (प्रकटी. ३:१४, पं.र.भा.) सृष्टिकार्यात एकुलत्या एका पुत्राची भूमिका देखील अद्वितीय आहे. तो सृष्टीचा रचनाकार किंवा निर्माणकर्ता नव्हता. पण, सृष्टीतील इतर गोष्टींच्या निर्माणकार्यात यहोवाने त्याला आपला प्रतिनिधी किंवा माध्यम म्हणून वापरले. (योहान १:३ वाचा.) प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो; आणि आपला एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहो.”—१ करिंथ. ८:६.
५. येशू अद्वितीय आहे हे शास्त्रवचनांतून कसे दिसून येते?
५ येशू इतर बाबतींतही अद्वितीय आहे. त्याला मिळालेली विशेषणे किंवा उपाधी यांतून देवाचा उद्देश पूर्ण करण्यात त्याची काय भूमिका आहे हे स्पष्ट होते. म्हणून, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत त्याला देण्यात आलेल्या आणखी पाच उपाधींचे आता आपण परीक्षण करू या.
“शब्द”
६. येशूला मिळालेली “शब्द” ही उपाधी योग्य का आहे?
६ योहान १:१४ वाचा. येशूला “शब्द” किंवा लोगोस का म्हणण्यात आले आहे? इतर बुद्धिमान प्राण्यांची सृष्टी करण्यात आली तेव्हापासून येशू काय करत होता हे या उपाधीतून स्पष्ट होते. यहोवाने आपल्या इतर आत्मिक पुत्रांना माहिती पोचवण्यासाठी आपल्या या पुत्राचा वापर केला. तसेच, पृथ्वीवर मानवांना देखील आपला संदेश पोचवण्यासाठी देवाने आपल्या याच पुत्राचा उपयोग केला. येशू, शब्द किंवा देवाचा प्रवक्ता आहे हे ख्रिस्ताने आपल्या यहुदी श्रोत्यांना उद्देशून जे म्हटले त्यातूनही दिसून येते. “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.” (योहा. ७:१६, १७) स्वर्गातील वैभवात परत गेल्यानंतरही “देवाचा शब्द” ही येशूची उपाधी तशीच कायम राहिली.—प्रकटी. १९:११, १३, १६.
७. “शब्द” या भूमिकेत येशूने दाखवलेल्या नम्रतेचे आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?
योहा. १२:५०) आपल्यासाठी अनुकरण करण्याजोगे किती उत्तम उदाहरण! आपल्यालाही ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगण्याची’ एक बहुमोल संधी देण्यात आली आहे. (रोम. १०:१५) येशूने दाखवलेल्या नम्रतेबद्दल आपल्याला आदर असल्यामुळे, आपण आपल्या मनाचे बोलण्याचे टाळले पाहिजे. शास्त्रवचनात असलेला जीवन वाचवणारा संदेश इतरांपर्यंत पोचवण्याच्या बाबतीत, आपण कधीही “शास्त्रलेखापलिकडे” जात नाही.—१ करिंथ. ४:६.
७ या उपाधीचा काय अर्थ होतो यावर जरा विचार करा. येशू यहोवाच्या सृष्टीतील सर्व प्राण्यांपेक्षा बुद्धिमान असूनही, तो आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहिला नाही. जे काही तो आपल्या पित्यापासून शिकला तेच तो बोलला. त्याने लोकांचे लक्ष आपल्याऐवजी नेहमी यहोवाकडे वेधले. (“आमेन”
८, ९. (क) “आमेन” या शब्दाचा काय अर्थ होतो आणि येशूला “आमेन” असे का म्हणण्यात आले आहे? (ख) “आमेन” या नात्याने येशूने आपली भूमिका कशी पार पाडली?
८ प्रकटीकरण ३:१४ वाचा. येशूला “आमेन” असे का म्हणण्यात आले आहे? “आमेन” हा एक हिब्रू शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे, “तसे होवो.” हा शब्द ज्या मूळ हिब्रू शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ “विश्वासू असणे” किंवा “भरवसालायक” असा होतो. यहोवाच्या विश्वसनीयतेचे वर्णन करण्यासाठी देखील हाच शब्द वापरण्यात आला आहे. (अनु. ७:९; यश. ४९:७) मग, येशूला जेव्हा “आमेन” असे म्हटले जाते, तेव्हा तो कशा प्रकारे अद्वितीय आहे? २ करिंथकर १:१९, २० या वचनांत काय म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या: “देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून . . . तुम्हामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती. देवाची वचने कितीहि असोत, त्याच्या ठायी होय हे आहे; म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो.”
९ देवाने दिलेल्या सर्व वचनांना येशू “आमेन” असा आहे. पृथ्वीवर असताना येशू निष्कलंक जीवन जगला आणि त्याने आपले जीवन अर्पण केले. यामुळे, यहोवाने दिलेल्या सर्व वचनांच्या पूर्णतेची खात्री मिळाली. ईयोबाच्या पुस्तकात नमूद असल्याप्रमाणे सैतानाने दावा केला होता की हालअपेष्टा, दुःख आणि संकटे आल्यास देवाचे सेवक त्याची सेवा करण्याचे सोडून देतील. पण, देवाप्रती विश्वासू राहण्याद्वारे येशूने सैतानाचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध केले. (ईयो. १:६-१२; २:२-७) देवाच्या सृष्टीतील सर्व प्राण्यांपैकी, देवाचा ज्येष्ठ पुत्र सैतानाच्या खोट्या आरोपांना खणखणीत उत्तर देऊ शकला. शिवाय, यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाच्या योग्यतेविषयी उभ्या राहिलेल्या मोठ्या वादविषयात आपल्या पित्याची बाजू घेऊन येशूने सर्वात उत्तम पुरावा सादर केला.
१०. “आमेन” या नात्याने येशू अद्वितीय भूमिका पार पाडत आहे, तेव्हा आपण त्याचे अनुकरण कशा प्रकारे करू शकतो?
१० “आमेन” या नात्याने येशू अद्वितीय भूमिका पार पाडत आहे, तेव्हा आपण त्याचे अनुकरण कशा प्रकारे करू शकतो? विश्वासूपणे यहोवाची सेवा करण्याद्वारे आणि त्याच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याद्वारे आपण येशूचे अनुकरण करू शकतो. असे करण्याद्वारे आपण नीतिसूत्रे २७:११ मध्ये असलेल्या विनंतीला प्रतिसाद देत असतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”
“नव्या कराराचा मध्यस्थ”
११, १२. मध्यस्थ या नात्याने येशूची भूमिका कशा प्रकारे अद्वितीय आहे?
११ पहिले तीमथ्य २:५, ६ वाचा. ‘देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे.’ तो “नव्या कराराचा मध्यस्थ” आहे. (इब्री ९:१५; १२:२४) मोशेला देखील नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ असे म्हणण्यात आले आहे. (गल. ३:१९) तर मग, येशू मध्यस्थ या नात्याने आपल्या भूमिकेत कशा प्रकारे अद्वितीय आहे?
१२ “मध्यस्थ” असे भाषांतरित केलेला मूळ भाषेतील शब्द एक कायदेविषयक संज्ञा आहे. नव्या कराराचा कायदेशीर मध्यस्थ (किंवा वकील) अशी ही संज्ञा येशूला सूचित होते. या नव्या करारामुळे एका नवीन राष्ट्राचा म्हणजेच ‘देवाच्या इस्राएलाचा’ जन्म झाला. (गल. ६:१६) हे राष्ट्र आत्म्याने अभिषिक्त ख्रिश्चनांचे मिळून बनलेले आहे जे स्वर्गात “राजकीय याजकगण” बनतात. (१ पेत्र २:९; निर्ग. १९:६) परंतु, ज्या नियमशास्त्र कराराचा मध्यस्थ मोशे होता तो करार अशा एका राष्ट्राला जन्म देऊ शकला नाही.
१३. मध्यस्थ या नात्याने येशू पार पाडत असलेल्या भूमिकेत काय समाविष्ट आहे?
१३ मध्यस्थ या नात्याने येशू पार पाडत असलेल्या भूमिकेत आणखी काय समाविष्ट आहे? नव्या करारात सहभागी होण्यासाठी ज्यांना घेतले जात आहे त्यांना यहोवा येशूच्या रक्ताचे मोल लागू करतो. अशा प्रकारे, यहोवा त्यांना कायदेशीर रीत्या नीतिमान ठरवतो. (रोम. ३:२४; इब्री ९:१५) नंतर देव त्यांना स्वर्गात राजे व याजक बनण्याच्या दृष्टीने नव्या करारात सहभागी होण्यास योग्य ठरवू शकतो! त्यांचा मध्यस्थ या नात्याने देवापुढे त्यांची शुद्ध भूमिका टिकवून ठेवण्यास येशू त्यांना मदत करतो.—इब्री २:१६.
१४. सर्व ख्रिश्चनांनी, मग त्यांची आशा कोणतीही असो, मध्यस्थ या नात्याने येशू पार पाडत असलेल्या भूमिकेसाठी कृतज्ञ का असले पाहिजे?
१४ तर मग, जे नव्या करारात सहभागी नाहीत आणि ज्यांना स्वर्गात नव्हे तर पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा आहे त्यांच्याबद्दल काय? हे लोक जरी नव्या करारात सहभागी होत नसले, तरी ते त्याचे हिताधिकारी आहेत म्हणजेच त्याच्यापासून त्यांनाही फायदा होतो. त्यांना पापांची क्षमा मिळते व देवाचे मित्र या नात्याने त्यांना नीतिमान घोषित केले जाते. (याको. २:२३; १ योहा. २:१, २) आपली आशा स्वर्गातील जीवनाची असो वा पृथ्वीवर जगण्याची असो, नव्या कराराचा मध्यस्थ या नात्याने येशू पार पाडत असलेल्या भूमिकेबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञ असले पाहिजे.
“प्रमुख याजक”
१५. प्रमुख याजक या नात्याने सेवा करणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा, येशू कशा प्रकारे अनोखा आहे?
१५ प्राचीन काळात अनेकांनी प्रमुख याजक या नात्याने सेवा केली होती. तरीपण, प्रमुख याजक या नात्याने येशूची भूमिका अद्वितीय आहे. ते कसे? प्रेषित पौलाने असे म्हटले: “त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेविले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमिते; पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारिलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमिते.”—इब्री ७:२७, २८. *
१६. येशूने दिलेले बलिदान खरोखर अद्वितीय का आहे?
१६ येशू एक परिपूर्ण मनुष्य होता. तो पापरहित अवस्थेतील आदामाच्या तोडीचा होता. (१ करिंथ. १५:४५) त्यामुळे, मानवांपैकी येशू एकटाच योग्य आणि परिपूर्ण बलिदान देऊ शकत होता, ज्याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नव्हती. मोशेच्या नियमशास्त्रानुसार रोज बलिदाने द्यावी लागायची. पण, ही सर्व बलिदाने आणि याजक करत असलेल्या सेवा, येशू साध्य करणार असलेल्या गोष्टींची केवळ एक छाया होती. (इब्री ८:५; १०:१) येशू इतर प्रमुख याजकांपेक्षा जास्त गोष्टी सिद्धीस नेणार असल्यामुळे आणि सदासर्वकाळ ही सेवा करणार असल्यामुळे प्रमुख याजक या नात्याने तो अद्वितीय आहे.
१७. प्रमुख याजक या नात्याने येशूच्या भूमिकेबद्दल आपण कृतज्ञ का असले पाहिजे आणि आपण ही कृतज्ञता कशी दाखवू शकतो?
१७ आपण देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्यासाठी प्रमुख याजक असलेल्या येशूच्या सेवांची आपल्याला गरज आहे. आणि खरोखरच येशू एक अद्भुत प्रमुख याजक आहे! पौलाने असे लिहिले: “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.” (इब्री ४:१५) म्हणून, कृतज्ञतेमुळे आपण ‘स्वतःकरिता नव्हे तर जो आपल्याकरता मेला त्याच्यासाठी जगण्यास’ प्रेरित झाले पाहिजे.—२ करिंथ. ५:१४, १५; लूक ९:२३.
पूर्वभाकीत “संतति”
१८. आदामाने पाप केल्यानंतर काय पूर्वभाकीत करण्यात आले आणि त्याबद्दल पुढे काय प्रकट करण्यात आले?
१८ एदेन बागेत असताना, देवासोबतचा चांगला नातेसंबंध, सार्वकालिक जीवन, आनंद आणि नंदनवन, या सगळ्या गोष्टी आदाम आणि हव्वेने गमावल्या असे जेव्हा वाटले, तेव्हा यहोवा देवाने एका मुक्तिदात्याविषयी पूर्वभाकीत केले. यालाच “संतति” असे म्हणण्यात आले. (उत्प. ३:१५) शेकडो वर्षांपासून या रहस्यमय संततिबद्दल बायबलमध्ये कितीतरी भाकिते करण्यात आली. ही संतति अब्राहाम, इसहाक, याकोब यांच्या वंशातून येणार होती. तसेच, दावीद राजाच्या कुळात या संततिचा जन्म होणार होता.—उत्प. २१:१२; २२:१६-१८; २८:१४; २ शमु. ७:१२-१६.
१९, २०. (क) पूर्वभाकीत संतती कोण आहे? (ख) पूर्वभाकीत संततित येशूशिवाय इतर जणही आहेत असे का म्हणता येऊ शकते?
१९ पूर्वभाकीत करण्यात आलेली ही संतति कोण होती? गलतीकर ३:१६ मध्ये सापडते. (वाचा.) पण, याच अध्यायात पुढे प्रेषित पौल अभिषिक्त ख्रिश्चनांना असे म्हणतो: “आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहा.” (गल. ३:२९) केवळ ख्रिस्तच जर पूर्वभाकीत संतति आहे, तर त्यात इतरांचाही समावेश कसा होतो?
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला२० लाखो लोक अब्राहामाचे वंशज असल्याचा दावा करतात. आणि काही जण तर स्वतःला संदेष्टेही म्हणवतात. काही धर्मांतील लोक तर आपले संदेष्टे अब्राहामाचे वंशज आहेत असे जोर देऊन सांगतात आणि त्या संदेष्ट्यांना जास्त महत्त्व देतात. पण, हे सर्वच जण पूर्वभाकीत केलेली संतति आहेत का? नाही. प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने सांगितल्याप्रमाणे, अब्राहामाच्या वंशजांपैकी सगळेच जण पूर्वभाकीत संतति असल्याचा दावा करू शकत नाहीत. अब्राहामाच्या इतर पुत्रांच्या संततिला मानवजातीस आशीर्वाद देण्यासाठी वापरण्यात आले नाही. आशीर्वाद प्राप्त करून देणारी संतति केवळ इसहाकाच्या कुळातूनच येणार होती. (इब्री ११:१८) सरतेशेवटी, फक्त एकच मनुष्य येशू ख्रिस्त, ज्याची अब्राहामापासूनची वंशावळी बायबलमध्ये नमूद करण्यात आली आहे, पूर्वभाकीत संततिचा प्राथमिक भाग ठरला. * “ख्रिस्ताचे” असणारे इतर जण नंतर अब्राहामाच्या संततिचा दुय्यम भाग बनले. अशा प्रकारे, संततिविषयी असलेल्या भविष्यवाणीच्या पूर्ततेत येशूची भूमिका अद्वितीय आहे.
२१. यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत येशूने पार पाडलेल्या अद्वितीय भूमिकेविषयीच्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केले आहे?
२१ यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत येशूच्या अद्वितीय भूमिकेबद्दल आपण आतापर्यंत केलेल्या चर्चेतून काय शिकलो? देवाचा हा एकुलता एक पुत्र अगदी त्याच्या सृष्टीपासूनच अद्वितीय व अनन्यसाधारण ठरला आहे. पण, हा अद्वितीय पुत्र येशू नेहमीच आपल्या पित्याच्या इच्छेनुसार नम्रपणे वागला. त्याने कधीही स्वतःचे गौरव करून घ्यायचा प्रयत्न केला नाही. (योहा. ५:४१; ८:५०) अनुकरण करण्याकरता आपल्यासाठी किती उल्लेखनीय उदाहरण! म्हणून, येशूप्रमाणेच आपणही ‘जे काही करतो ते सर्व काही देवाच्या गौरवासाठी करण्याचा’ प्रयत्न करत राहू या.—१ करिंथ. १०:३१.
[तळटीपा]
^ परि. 15 एका बायबल विद्वानानुसार “एकदाच” असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दातून, “ख्रिस्ताचे बलिदान अद्वितीय [किंवा ‘अतिशय खास’] आहे आणि त्याच्या बलिदानाची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही,” ही बायबलमधील एक महत्त्वपूर्ण शिकवण व्यक्त होते.
^ परि. 20 आपणच अब्राहामाचे खरे वंशज, देवाची मर्जी प्राप्त असलेले खास लोक आहोत असा सा.यु. पहिल्या शतकातील यहुदी विचार करत असले, तरी मशीहा किंवा ख्रिस्त म्हणून केवळ एकच व्यक्ती येईल याची ते वाट पाहत होते.—योहा. १:२५; ७:४१, ४२; ८:३९-४१.
तुम्हाला आठवते का?
• येशूला मिळालेल्या उपाधींतून त्याच्या अद्वितीय भूमिकेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळाले? (चौकट पाहा.)
• यहोवाच्या अद्वितीय पुत्राच्या उदाहरणाचे अनुकरण आपण कसे करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चौकट/चित्र]
देवाच्या उद्देशातील येशूच्या अद्वितीय भूमिकेविषयीच्या काही उपाधी
▪ एकुलता एक पुत्र. (योहा. १:३) येशूला देवाने स्वतः सृष्ट केले आहे.
▪ शब्द. (योहा. १:१४) इतर बुद्धिमान प्राण्यांपर्यंत माहिती व सूचना पोचवण्यासाठी यहोवा आपल्या पुत्राचा प्रवक्ता म्हणून वापर करतो.
▪ आमेन. (प्रकटी. ३:१४) पृथ्वीवर असताना येशू निष्कलंक जीवन जगला आणि आपले जीवन अर्पण केले. यामुळे, यहोवाने दिलेल्या सर्व वचनांच्या पूर्णतेची खात्री मिळाली.
▪ नव्या कराराचा मध्यस्थ. (१ तीम. २:५, ६) येशू हा नव्या कराराचा कायदेशीर मध्यस्थ आहे. या नव्या करारामुळे एका नवीन राष्ट्राचा म्हणजेच ‘देवाच्या इस्राएलाचा’ जन्म झाला. हे राष्ट्र आत्म्याने अभिषिक्त ख्रिश्चनांचे मिळून बनलेले आहे जे स्वर्गात “राजकीय याजकगण” बनतात.—गल. ६:१६; १ पेत्र २:९.
▪ प्रमुख याजक. (इब्री ७:२७, २८) मानवांपैकी येशू एकटाच योग्य आणि परिपूर्ण बलिदान देऊ शकत होता, ज्याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नव्हती. तो आपल्याला पापापासून शुद्ध करू शकतो आणि मृत्यूपासून सोडवू शकतो.
▪ पूर्वभाकीत संतति. (उत्प. ३:१५) येशू ख्रिस्त एकटाच पूर्वभाकीत संततिचा प्राथमिक भाग आहे. नंतर, अब्राहामाच्या संततिचा दुय्यम भाग बनणारे इतर सर्व जण ‘ख्रिस्ताचे आहेत’.—गल. ३:२९.