व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

आपला विश्‍वासू दास “बुद्धिमान” असेल असे जेव्हा येशूने म्हटले, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

“ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण?” असा प्रश्‍न येशूने विचारला. (मत्तय २४:४५) आध्यात्मिक अन्‍न “खावयास” देणारा हा ‘दास’ आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांची मंडळी आहे. पण, येशूने त्यांना बुद्धिमान का म्हटले? *

येशूच्याच शिकवणीवरून त्याने “बुद्धिमान” हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला हे आपल्याला कळेल. उदाहरणार्थ, “विश्‍वासू व बुद्धिमान दास” यांच्याबद्दल बोलताना त्याने दहा कुमारींचा दृष्टांत सांगितला ज्या वराच्या येण्याची वाट बघत होत्या. या कुमारिका आपल्याला, १९१४ पूर्वी महान वर येशूची वाट बघत असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची आठवण करून देतात. त्या दहा कुमारींपैकी पाच जणींकडे वर येईपर्यंत पुरेल इतके तेल नसल्यामुळे त्या लग्नाच्या मेजवानीला जाऊ शकल्या नाहीत. पण, इतर पाच जणी मात्र बुद्धिमान ठरल्या. त्यांनी स्वतःपुरता पुरेसा तेलाचा साठा घेतला होता. त्यामुळे वर आल्यानंतर त्यांचे दिवे उजेड देत राहणार होते व त्यांना मेजवानीत घेतले जाणार होते.—मत्तय २५:१०-१२.

१९१४ मध्ये येशू राज्याधिकारात आला तेव्हा लगेचच आपणही स्वर्गात जाऊन त्याला सामील होऊ असे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी अनेकांना वाटले. पण, पृथ्वीवर त्यांच्यासाठी करण्यासारखे पुष्कळ काम बाकी होते आणि यासाठी काही जण मात्र बिलकुल तयार नव्हते. त्या मूर्ख कुमारींसारखेच त्यांनी स्वतःला आध्यात्मिकरीत्या आधीपासून मजबूत केले नव्हते, त्यामुळे प्रकाशवाहक या नात्याने काम करत राहण्यासाठी ते तयार नव्हते. इतरांनी मात्र सुज्ञपणा व दूरदृष्टी ठेवून बुद्धिमानी दाखवली व स्वतःला आध्यात्मिकरीत्या मजबूत केले होते. आपल्याला पुढे आणखी काम करायचे आहे असे त्यांना कळाले तेव्हा काम पूर्ण करण्यासाठी ते आनंदाने तयार झाले. अशा रीतीने त्यांनी ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ असल्याचे दाखवून दिले.

मत्तय ७:२४ या वचनात येशूने जे म्हटले त्याकडे लक्ष द्या: “ह्‍यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले.” सुज्ञ मनुष्य वादळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन आपले घर पक्के बांधतो. याउलट, मूर्ख मनुष्य आपले घर वाळूत बांधतो व ते जमीनदोस्त होते. अशाच प्रकारे मानवी बुद्धीनुसार वागल्यामुळे जे दुष्परिणाम होतात त्यांना आधी पाहू शकणाराच येशूचा बुद्धिमान शिष्य आहे. त्याच्या सुज्ञपणामुळे आणि समंजसपणामुळे तो येशूने जे शिकवले त्यावरच आपला विश्‍वास, कार्ये आणि शिकवणी आधारतो. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासही’ अशाच प्रकारे कार्य करतो.

इब्री शास्त्रवचनांच्या अनेक भाषांतरांमध्ये, “बुद्धिमान” हा शब्द कसा वेगवेगळ्या पद्धतीने भाषांतरीत करण्यात आला आहे ते लक्षात घ्या. उदाहरणार्थ, फारोने योसेफाला इजिप्तला अन्‍न पुरवठा करण्यासाठी नेमले होते. खरे तर आपल्या लोकांना अन्‍न पुरवठा करण्यासाठी यहोवानेच ही तरतूद केली होती. पण यासाठी योसेफालाच का निवडण्यात आले होते? फारोने त्याला म्हटले: “तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही.” (उत्पत्ति ४१:३३-३९; ४५:५) त्याचप्रमाणे बायबल अबिगईलला “बुद्धिमती” स्त्री म्हणते. तिने यहोवाचा अभिषिक्‍त असलेल्या दावीद व त्याच्या साथीदारांना अन्‍न पुरवले होते. (१ शमुवेल २५:३, ११, १८) योसेफ आणि अबिगईल या दोघांना बुद्धिमान म्हटले जाऊ शकते कारण त्यांनी देवाची इच्छा काय आहे हे समजून घेतले आणि दूरदृष्टी दाखवून समंजसपणे कार्य केले.

अशा रीतीने येशूने जेव्हा त्याच्या विश्‍वासू दासाला बुद्धिमान म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हा अर्थ होता की या दास वर्गातील सदस्य विवेकीपणा, दूरदृष्टी आणि समंजसपणा दाखवतील. कारण त्यांचा विश्‍वास, त्यांची कार्ये, व त्यांच्या शिकवणी देवाच्या सत्यवचनावर आधारलेली असतील.

[तळटीप]

^ परि. 3 “बुद्धिमान” असे भाषांतरीत करण्यात आलेला ग्रीक शब्द फ्रोनीमोस आहे. एम. आर. विन्सेंट हे आपल्या वर्ड स्टडीज इन द न्यू टेस्टमेंट नावाच्या पुस्तकात असे म्हणतात की हा शब्द बहुतेकदा व्यावहारिक बुद्धी, शहाणपण, सुज्ञपणा आणि दूरदृष्टी यासाठी वापरला जातो.