व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“चल, माझ्यामागे ये”

“चल, माझ्यामागे ये”

“चल, माझ्यामागे ये”

“जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”—लूक ९:२३.

१, २. (क) येशूने कोणते आमंत्रण दिले? (ख) येशूच्या आमंत्रणाला तुम्ही कसा प्रतिसाद दिला आहे?

येशूचे पृथ्वीवरील सेवाकार्य संपत आले असताना, तो पेरिया नावाच्या प्रदेशात साक्षकार्य करत होता. हा भाग यहुदीयाच्या उत्तरपूर्व दिशेला, यार्देन नदीच्या पलीकडे होता. तेथे, एका तरुण मनुष्याने त्याच्याकडे येऊन सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे, असे त्याला विचारले. हा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञा आधीपासूनच पाळत आला आहे हे समजल्यावर येशूने त्याला एक अनोखे आमंत्रण दिले. तो म्हणाला: “जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” (मार्क १०:२१) कल्पना करा—सर्वसमर्थ देवाच्या एकुलत्या एका पुत्राचे अनुसरण करण्याची ही संधी होती!

त्या तरुणाने तर येशूचे आमंत्रण स्वीकारले नाही, पण इतरांनी मात्र ते स्वीकारले. याआधी येशूने फिलिप्पाला, “माझ्यामागून ये” असे म्हटले होते. (योहा. १:४३) फिलिप्पाने हे आमंत्रण स्वीकारले व कालांतराने तो येशूचा एक प्रेषित बनला. येशूने पुन्हा तेच आमंत्रण मत्तयालाही दिले आणि त्यानेही ते स्वीकारले. (मत्त. ९:९; १०:२-४) खरे पाहता, नीतिमत्त्वानुसार जगण्याची इच्छा असलेल्या सर्वांनाच येशूने हे आमंत्रण दिले आहे. त्याने म्हटले: “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (लूक ९:२३) याचा अर्थ, जो कोणी येशूचे अनुसरण करू इच्छितो तो त्याचा अनुयायी बनू शकतो. तुम्हाला येशूचे अनुसरण करण्याची इच्छा आहे का? आपल्यापैकी बहुतेकांनी येशूच्या प्रेमळ आमंत्रणाला आधीच प्रतिसाद दिलेला आहे आणि क्षेत्र सेवाकार्याद्वारे आपण इतरांनाही हे आमंत्रण देतो.

३. येशूचे अनुसरण करण्यापासून वाहवत जाण्याचे आपण कसे टाळू शकतो?

पण, खेदाने म्हणावे लागते की काही जण बायबलमधील सत्याविषयी सुरुवातीला आवड दाखवत असले, तरी त्यांची आस्था हळूहळू कमी होत जाते आणि ते मध्येच बायबल अभ्यास थांबवतात. आणि अशा रीतीने येशूला अनुसरण्याच्या ध्येयापासून ते ‘वाहवत जातात.’ (इब्री २:१) आपल्याबाबतीत असे घडू नये म्हणून काय करता येईल? आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘आपण मुळात येशूचे अनुसरण करण्याचे का निवडले? त्याचे अनुसरण करण्याचा काय अर्थ होतो?’ या दोन प्रश्‍नांची उत्तरे सतत आठवणीत ठेवल्यास, आपण निवडलेल्या या उत्तम मार्गावर चालत राहण्याचा आपला संकल्प आणखी दृढ करण्यास आपल्याला साहाय्य मिळेल. तसेच येशूचे अनुयायी होण्यास इतरांना प्रोत्साहन देण्यासही आपल्याला साहाय्य मिळेल.

येशूला का अनुसरावे?

४, ५. येशू आपले नेतृत्त्व करण्यास अगदी योग्य आहे असे का म्हणता येते?

संदेष्टा यिर्मयाने म्हटले: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्म. १०:२३) आतापर्यंतच्या मानवी इतिहासावर एक नजर टाकल्यास यिर्मयाच्या या शब्दांची सत्यता पटते. अपरिपूर्ण मानव एकमेकांवर सत्ता चालवून कधीही सुखी होऊ शकत नाहीत हे दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत गेले आहे. कोणत्याही मनुष्यापेक्षा येशूच आपले नेतृत्त्व करण्यास अगदी योग्य आहे हे आपल्याला समजल्यामुळे, त्याला अनुसरण्याचे आमंत्रण आपण स्वीकारले. येशू आपले नेतृत्त्व करण्यास का अगदी योग्य आहे याची काही कारणे लक्षात घ्या.

सर्वात पहिले कारण म्हणजे, मानवांचे नेतृत्त्व करणारा मशीहा म्हणून येशूला खुद्द यहोवाने निवडले. आपल्याकरता सर्वात उत्तम नेता कोण ठरेल हे आपल्या निर्माणकर्त्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असू शकेल? दुसरे कारण म्हणजे येशूच्या व्यक्‍तिमत्त्वात अनेक प्रशंसनीय व अनुकरण करण्याजोगे गुण आहेत. (यशया ११:२, ३ वाचा.) तो आपल्याकरता एक परिपूर्ण आदर्श आहे. (१ पेत्र २:२१) तिसरे कारण असे, की येशू आपले अनुसरण करणाऱ्‍यांची मनापासून काळजी करतो. त्याने आपले जीवन त्यांच्याकरता अर्पण करण्याद्वारे हे दाखवून दिले. (योहान १०:१४, १५ वाचा.) तसेच, तो एका प्रेमळ मेंढपाळाप्रमाणे आपले मार्गदर्शन करतो. त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालल्यास आपले सध्याचे जीवन तर आनंदी होतेच पण सार्वकालिक भविष्याची अद्‌भुत आशाही आपल्याला प्राप्त होते. (योहा. १०:१०, ११; प्रकटी. ७:१६, १७) या व इतर अनेक कारणांमुळे येशूचे अनुसरण करण्याचा आपण जो निर्णय घेतला, तो एक सुज्ञ निर्णय होता असे म्हणता येते. पण येशूला अनुसरण्याचा काय अर्थ होतो?

६. येशूला अनुसरण्याचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ताचे अनुयायी असण्याचा अर्थ फक्‍त स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणे नव्हे. आज जगभरात जवळजवळ दोन अब्ज लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात. पण त्यांची कृत्ये मात्र ते ‘अनाचार करणारे’ आहेत हे सिद्ध करतात. (मत्तय ७:२१-२३ वाचा.) येशूला अनुसरण्याची इच्छा व्यक्‍त करणाऱ्‍यांना आपण सहसा हे समजावून सांगतो की खरे ख्रिस्ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत येशूच्या शिकवणींचे व त्याच्या उदाहरणाचे पालन करतात. आणि केवळ अधूनमधून नव्हे तर दररोज ते असे करतात. याचा काय अर्थ होतो हे स्पष्टपणे समजून घेण्यासाठी येशूविषयी आपल्याला माहीत असलेल्या काही गोष्टी आपण येथे विचारात घेऊ या.

येशूच्या सुबुद्धीचे अनुकरण करा

७, ८. (क) सुबुद्धी म्हणजे काय आणि येशूजवळ विपुल प्रमाणात सुबुद्धी असण्याचे कारण काय? (ख) येशू कशा प्रकारे सुबुद्धीने वागला व आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?

पृथ्वीवर असताना येशूने अनेक अप्रतिम गुण दाखवले, पण आपण मुख्यतः त्याच्या चार गुणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत: सुबुद्धी, नम्रता, आवेश व प्रेम. सर्वात आधी त्याच्या सुबुद्धीविषयी, म्हणजेच जवळ असलेले ज्ञान व समज यांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याच्या त्याच्या क्षमतेविषयी विचार करा. प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.” (कलस्सै. २:३) येशूला ही सुबुद्धी कोठून प्राप्त झाली? त्याने स्वतः याचे उत्तर दिले: “मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो.” (योहा. ८:२८) त्याच्याठायी असलेली सुबुद्धी त्याला यहोवाकडून प्राप्त झाली होती. त्यामुळे, त्याच्या सुज्ञतेविषयी किंवा उत्तम निर्णयक्षमतेविषयी आपल्याला आश्‍चर्य वाटू नये.

उदाहरणार्थ, आपल्या जीवनाचा कशा प्रकारे उपयोग करावा हे ठरवताना येशूने सुज्ञता दाखवली. त्याने आपली जीवनपद्धती साधी ठेवून देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे या एकमेव ध्येयावर आपले लक्ष केंद्रित केले. देवाच्या राज्याशी निगडीत असलेल्या कार्यांकरता त्याने सुज्ञपणे आपला वेळ व शक्‍ती खर्च केली. आपणही येशूचे अनुकरण करून आपला ‘डोळा निर्दोष’ ठेवण्याचा प्रयत्न करतो व अनावश्‍यक गोष्टींच्या नादी लागून आपला वेळ व शक्‍ती वाया घालवण्याचे टाळतो. (मत्त. ६:२२) बऱ्‍याच ख्रिश्‍चनांनी सेवाकार्याला अधिक वेळ देता यावा म्हणून आपल्या जीवनातील अनावश्‍यक गोष्टी कमी करण्याकरता पावले उचलली आहेत. यामुळे काहींना पायनियर सेवेत उतरणे शक्य झाले आहे. या बंधुभगिनींपैकी तुम्हीही एक असाल तर तुमचे प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. ‘पहिल्याने राज्य मिळविण्यास झटल्याने’ खरोखरच खूप आनंद व समाधान प्राप्त होते.—मत्त. ६:३३.

येशूप्रमाणे नम्र असा

९, १०. येशूने कशा प्रकारे नम्रता दाखवली?

येशूच्या व्यक्‍तिमत्त्वातील ज्या दुसऱ्‍या गुणाचा आपण विचार करणार आहोत तो गुण म्हणजे त्याची नम्रता. अपरिपूर्ण मानवांना अधिकार दिला जातो तेव्हा ते सहसा गर्वाने फुगतात व स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतात. पण येशू किती वेगळा होता! यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत त्याची सर्वात महत्त्वाची भूमिका असूनही त्याच्यात गर्विष्ठपणाचा लवलेशही नव्हता. आणि याबाबतीत आपल्याला त्याचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. प्रेषित पौलाने असे लिहिले: “अशी जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्‍त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.” (फिलिप्पै. २:५-७) याचा काय अर्थ होतो?

१० येशू स्वर्गात आपल्या पित्याच्या सान्‍निध्यात राहात होता. पण त्याने या अद्‌भुत विशेषाधिकाराचा त्याग केला आणि आपणहून “स्वतःला रिक्‍त केले.” त्याचा जीव एका यहुदी कुमारिकेच्या उदरात स्थानांतरित करण्यात आला. नऊ महिन्यांनंतर, तो एका गरीब सुताराच्या कुटुंबात एक असहाय बालक म्हणून जन्मला. योसेफाच्या घरात येशू हळूहळू लहानाचा मोठा झाला. तो परिपूर्ण होता, म्हणजे त्याच्यात पापाचा अंश मुळीच नव्हता. तरीसुद्धा, बालपणापासून मोठा होईपर्यंत तो आपल्या पापी व अपरिपूर्ण असलेल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. (लूक २:५१, ५२) येशूने खरोखर किती उल्लेखनीय नम्रता दाखवली!

११. आपण येशूच्या नम्रतेचे अनुकरण कसे करू शकतो?

११ आपल्यावर सोपवण्यात आलेली कामे काहीशी कमी दर्जाची भासली, तरीसुद्धा ती आनंदाने स्वीकारण्याद्वारे आपण येशूच्या नम्रतेचे अनुकरण करतो. उदाहरणार्थ, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्याचा विचार करा. हे कार्य करत असताना काही लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात, काही आपली थट्टा करतात तर काही जण विरोध करतात. अशावेळी प्रचाराचे हे कार्य काहीसे कमी दर्जाचे वाटू शकते. पण या सर्व समस्यांना तोंड देऊनही जेव्हा आपण प्रचार कार्य सातत्याने करत राहतो तेव्हा येशूने आपल्यामागे येण्याचे जे आमंत्रण दिले आहे त्याचे पालन करण्यास आपण इतरांनाही मदत करतो. अशा प्रकारे खरे तर आपण त्यांचे जीवन वाचवतो. (२ तीमथ्य ४:१-५ वाचा.) दुसरे उदाहरण म्हणजे, आपले राज्य सभागृह स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे. याकरता आपल्याला केराच्या टोपल्या रिकाम्या करणे, झाडलोट करणे किंवा बाथरूम्स स्वच्छ करणे यांसारखी कामे करावी लागू शकतात. ही सर्व तशी कमी दर्जाचीच कामे आहेत. तरीसुद्धा, आपले राज्य सभागृह हे आपल्या परिसरातील खऱ्‍या उपासनेचे केंद्र आहे हे आपण ओळखतो. आणि त्यामुळे, ते स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे हा आपल्या पवित्र सेवेचाच एक भाग आहे या दृष्टीने आपण विचार करतो. कमी दर्जाची भासणारी कामे देखील स्वेच्छेने पार पाडण्याद्वारे आपण नम्रता दाखवतो आणि अशा रीतीने ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो.

येशूप्रमाणे आवेशी असा

१२, १३. (क) येशूने कशा प्रकारे आवेश दाखवला आणि त्याला कोणत्या गोष्टींनी प्रेरित केले? (ख) सेवाकार्यात आवेशी असण्याची प्रेरणा आपल्याला कशामुळे मिळेल?

१२ सेवाकार्यासाठी येशूला असलेल्या आवेशाचा विचार करा. पृथ्वीवर असताना येशूने अनेक गोष्टी केल्या होत्या. सुरुवातीला कदाचित त्याने आपला दत्तक पिता योसेफ याच्यासोबत सुतारकाम केले असावे. सेवाकार्यादरम्यान येशूने अनेक चमत्कार केले. उदाहरणार्थ, त्याने रोग्यांना बरे केले व मृतांना जिवंत केले. तरीसुद्धा, सुवार्तेची घोषणा करणे आणि ऐकून घेण्यास तयार असलेल्यांना देवाच्या राज्याविषयी शिकवणे हेच त्याचे सर्वात मुख्य कार्य होते. (मत्त. ४:२३) त्याचे अनुयायी या नात्याने आपल्यालाही तेच कार्य करायचे आहे. तर मग आपण येशूचे अनुकरण कशा प्रकारे करू शकतो? ज्या कारणांनी प्रेरित होऊन येशूने प्रचार कार्य केले, ती कारणे जाणून घेऊन त्याच्या मनोवृत्तीचे अनुकरण करण्याद्वारे आपण असे करू शकतो.

१३ इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, देवाबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमानेच येशूला प्रचार करण्यास व लोकांना देवाच्या राज्याविषयी शिकवण्यास प्रेरित केले. पण त्यासोबतच येशू जी सत्ये इतरांना शिकवायचा ती देखील त्याला प्रिय होती. त्याच्या दृष्टीने ती सत्ये अनमोल खजिन्यासारखी होती आणि ती इतरांनाही देण्यास तो उत्सुक होता. शिक्षक या नात्याने आपलीही हीच मनोवृत्ती आहे. देवाच्या वचनातून आपल्याला शिकायला मिळालेल्या काही अनमोल सत्यांचा विचार करा. विश्‍वाच्या सार्वभौमत्वासंबंधी जो वादविषय उपस्थित करण्यात आला होता त्याविषयी आणि तो कसा सोडवला जाईल याविषयी आपल्याला समजले आहे. मेल्यानंतर मनुष्याचे काय होते, तसेच देवाच्या नव्या जगात कोणते आशीर्वाद मानवांना मिळतील याविषयी शास्त्रवचने काय सांगतात हे देखील आपल्याला स्पष्टपणे समजले आहे. ही सत्ये आपण अलीकडील काळात शिकलेली असोत वा अनेक वर्षांपूर्वी, एखाद्या मौल्यवान खजिन्याप्रमाणेच त्यांचे मोल कधीही कमी होत नाही. (मत्तय १३:५२ वाचा.) उत्साहाने व आवेशाने प्रचार करण्याद्वारे, यहोवाने शिकवलेल्या गोष्टी आपल्याला किती प्रिय वाटतात हे आपण इतरांना दाखवतो.

१४. आपण येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे अनुकरण कसे करू शकतो?

१४ येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीकडेही लक्ष द्या. त्याने वारंवार आपल्या श्रोत्यांचे लक्ष शास्त्रवचनांकडे वेधले. एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडण्याआधी, सहसा, तो “असा शास्त्रलेख आहे” किंवा “असे लिहिले आहे” असे म्हणायचा. (मत्त. ४:४; २१:१३) आपल्याला बायबलमध्ये त्याची जी विधाने वाचायला मिळतात, त्यांत त्याने इब्री शास्त्रवचनांतील निम्म्याहून अधिक पुस्तकांतील शब्दांचा एकतर थेटपणे अथवा अप्रत्यक्ष रीत्या उल्लेख केला आहे. येशूप्रमाणेच आपणही सेवाकार्यात जे काही बोलतो ते बायबलवरच पूर्णपणे आधारित असले पाहिजे आणि जेथे कोठे शक्य होईल तेथे आपण शास्त्रवचने उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा रीतीने, आपण जे शिकवतो ते आपल्या मनाचे नव्हे तर देवाच्या विचारांवर आधारित आहे हे प्रामाणिक मनाच्या लोकांना दिसून येईल. एखादी व्यक्‍ती जेव्हा बायबलमधील वचन वाचण्यास तयार होते आणि देवाच्या वचनाच्या मोलाविषयी व त्याच्या अर्थाविषयी चर्चा करण्यास तयार होते तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! आणि अशा व्यक्‍ती जेव्हा येशूचे अनुसरण करण्याचे आमंत्रण स्वीकारतात तेव्हा तर आपल्या आनंदाला पारावार उरत नाही.

येशूचे अनुसरण करणे म्हणजे इतरांवर प्रेम करणे

१५. येशूचा एक उल्लेखनीय गुण कोणता होता आणि त्याबद्दल मनन केल्याने आपल्यावर कसा परिणाम होतो?

१५ येशूच्या व्यक्‍तिमत्त्वातील ज्या शेवटल्या गुणाची आपण येथे चर्चा करणार आहोत तो अतिशय दिलासा देणारा आहे. तो गुण म्हणजे मानवांप्रती त्याला असलेले प्रेम. प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते.” (२ करिंथ. ५:१४, ईझी टू रीड व्हर्शन) येशूला मानवजातीवर आणि व्यक्‍तिशः आपल्यावर असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा आपण मनन करतो तेव्हा ते आपल्या हृदयाला स्पर्श करते आणि त्याचे अनुकरण करण्यास ते आपल्याला भाग पाडते.

१६, १७. येशूने कोणकोणत्या मार्गांनी इतरांबद्दल प्रेम व्यक्‍त केले?

१६ येशूने इतरांबद्दल प्रेम कशा प्रकारे व्यक्‍त केले? मानवजातीकरता त्याने स्वेच्छेने आपल्या जीवनाचे बलिदान दिले, हा त्याच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा होता. (योहा. १५:१३) पण आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने इतर मार्गांनीही लोकांबद्दल प्रेम व्यक्‍त केले. उदाहरणार्थ, दुःखीकष्टी लोकांबद्दल त्याला सहानुभूती होती. लाजराच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याने मरीयेला व इतर लोकांना रडताना पाहिले, तेव्हा त्यांचे दुःख पाहून येशूचे अंतःकरण भरून आले. खरे तर, तो काही क्षणांतच लाजराचे पुनरुत्थान करणार होता, तरीसुद्धा, तो इतका भावनाविवश झाला की तो अक्षरशः “रडला.”—योहा. ११:३२-३५.

१७ येशूच्या सेवाकार्याच्या सुरुवातीला एक कुष्ठरोगी येशूकडे येऊन त्याला म्हणाला: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” येशूने काय केले? अहवाल पुढे असे सांगतो: “[येशूला] त्याचा कळवळा आला.” मग त्याने काहीतरी विलक्षण असे केले. “त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, ‘माझी इच्छा आहे, शुद्ध हो.’ तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.” मोशेच्या नियमशास्त्रानुसार, कुष्ठरोग्यांना अशुद्ध समजले जाई. शिवाय, येशू त्या मनुष्याला स्पर्श न करताही त्याला सहज बरे करू शकला असता. तरीसुद्धा, ज्याला कित्येक वर्षांपासून कदाचित कोणीही स्पर्श केला नसेल, अशा या मनुष्याला बरे करताना येशूने त्याला दुसऱ्‍या व्यक्‍तीचा स्पर्श अनुभवण्याची संधी दिली. खरोखर, येशू किती करुणामय होता!—मार्क १:४०-४२.

१८. आपण इतरांचे “समसुखदुःखी” कसे होऊ शकतो?

१८ ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपल्यालाही “समसुखदुःखी” होण्याद्वारे इतरांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (१ पेत्र ३:८) एखादा गंभीर आजार झालेल्या किंवा गंभीर नैराश्‍याने ग्रासलेल्या बंधू किंवा भगिनीच्या भावना समजून घेणे कदाचित आपल्याला तितके सोपे जाणार नाही. कारण कदाचित आपण स्वतः अशा प्रकारच्या गोष्टी अनुभवल्या नसतील. पण, येशू स्वतः कधीही आजारी पडला नसला, तरी त्याने आजारी लोकांबद्दल सहानुभूती दाखवली. आपण अशी सहानुभूती कशा प्रकारे दाखवू शकतो? दुःखी व्यक्‍ती आपल्याजवळ त्यांच्या भावना व्यक्‍त करतात तेव्हा त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेण्याद्वारे आपण असे करू शकतो. तसेच, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, की ‘जर मी त्यांच्या जागी असतो/असते तर मला कसं वाटलं असतं?’ इतरांच्या भावना समजून घेण्याचा आपण प्रयत्न केल्यास, दुःखी व्यक्‍तींना ‘धीर देणे’ आपल्याला जास्त सोपे जाईल. (१ थेस्सलनी. ५:१४) अशा प्रकारे आपण येशूचे अनुकरण करू शकू.

१९. येशूच्या उदाहरणाचा आपल्यावर कोणकोणत्या प्रकारे परिणाम होतो?

१९ खरोखर, येशूचे शब्द आणि त्याची कार्ये यांविषयी अभ्यास करणे हा किती रोमहर्षक अनुभव आहे! आपण त्याच्याविषयी जितके जास्त जाणून घेतो तितकेच आपल्याला त्याचे अनुकरण करावेसे वाटते आणि तितकेच आपल्याला इतरांनाही असे करण्यास साहाय्य करावेसे वाटते. तर मग, मशीही राज्याचा राजा येशू ख्रिस्त याचे आपण सदासर्वकाळ आनंदाने अनुसरण करत राहू या!

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• येशूप्रमाणे आपणही सुबुद्धीने कशा प्रकारे वागू शकतो?

• कोणत्या मार्गांनी आपण नम्रता दाखवू शकतो?

• प्रचार कार्यासाठी आपला आवेश आपण कसा वाढवू शकतो?

• येशूप्रमाणे आपणही कोणत्या मार्गांनी इतरांना प्रेम दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चौकट/चित्र]

ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास साहाय्यक ठरेल असे एक पुस्तक

२००७ सालच्या प्रांतीय अधिवेशनात “चल, माझ्यामागे ये” या शीर्षकाचे १९२-पानी पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले. हे पुस्तक ख्रिश्‍चनांना येशूवर, खासकरून त्याचे गुण व त्याची कार्ये यांवर लक्ष एकाग्र करण्यास साहाय्य करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. सुरुवातीच्या दोन अध्यायांनंतर, या पुस्तकाच्या पहिल्या भागात येशूच्या उल्लेखनीय गुणांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर त्याची नम्रता, धैर्य, सुबुद्धी, आज्ञाधारकता, आणि सहनशीलता यांबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

सुवार्तेचा प्रचारक व शिक्षक या नात्याने येशूने जी कार्ये केली, तसेच आपले महान प्रेम ज्या वेगवेगळ्या मार्गांनी प्रदर्शित केले त्यांपैकी काहींबद्दल पुढील भागांत चर्चा करण्यात आली आहे. या संपूर्ण पुस्तकातील माहिती अशा प्रकारे सादर करण्यात आली आहे ज्यामुळे ख्रिश्‍चनांना येशूचे अनुकरण करण्यास साहाय्य मिळेल.

आम्हाला खातरी आहे की हे पुस्तक आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करण्यास आणि स्वतःला पुढील प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त करेल: ‘मी खरोखरच येशूचे अनुकरण करत आहे का? मला आणखी जवळून त्याचे अनुकरण कसे करता येईल?’ तसेच, या पुस्तकामुळे ‘सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असलेल्या सर्वांना’ येशूचे अनुयायी बनण्यास मदत मिळेल.—प्रे. कृत्ये १३:४८, NW.

[४ पानांवरील चित्र]

येशू पृथ्वीवर येण्यास व एक असहाय बालक म्हणून जन्मण्यास तयार झाला. कोणत्या गुणामुळे तो असे करू शकला?

[६ पानांवरील चित्र]

प्रचार कार्यात आवेशी असण्यासाठी आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळेल?