व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाहा! यहोवाचा सेवक ज्याच्याविषयी तो संतुष्ट आहे

पाहा! यहोवाचा सेवक ज्याच्याविषयी तो संतुष्ट आहे

पाहा! यहोवाचा सेवक ज्याच्याविषयी तो संतुष्ट आहे

“पाहा, हा माझा सेवक, . . . याजविषयी माझा जीव संतुष्ट आहे.”—यश. ४२:१.

१. स्मारकविधीचा दिवस जवळ येत असता, यहोवाच्या लोकांना काय करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे, आणि का?

ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण करण्याचा दिवस जवळ येत असता, प्रेषित पौलाने दिलेल्या एका सल्ल्याचे पालन करण्याचे प्रोत्साहन आपल्याला देण्यात आले आहे. त्याने म्हटले: “विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे.” पौलाने पुढे असे म्हटले: “तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.” (इब्री १२:२, ३) पृथ्वीवर असताना येशू देवाप्रती विश्‍वासू राहिला आणि त्याने आपले जीवन बलिदान केले. त्याच्या जीवनचरित्रावर लक्ष दिल्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आणि त्यांच्या साथीदारांना म्हणजे दुसऱ्‍या मेंढरांना यहोवाची सेवा विश्‍वासूपणे करत राहण्यास व ‘खचून न जाण्यास’ साहाय्य मिळेल.—गलतीकर ६:९ पडताळून पाहा.

२. देवाच्या पुत्राबद्दल यशयाच्या भविष्यवाण्यांतून आपण काय शिकू शकतो?

यहोवाने संदेष्टा यशया याच्याद्वारे, आपल्या पुत्राशी संबंधित असलेल्या अनेक भविष्यवाण्या केल्या. या भविष्यवाण्या ‘आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहण्यास’ आपल्याला साहाय्य करतील. * त्याचे व्यक्‍तिमत्त्व, त्याला भोगाव्या लागलेल्या यातना, आणि आपला राजा व तारणारा या नात्याने त्याला कशा प्रकारे उंचावले गेले याविषयीची माहिती आपल्याला या भविष्यवाण्यांतून मिळते. या भविष्यवाण्या स्मारकविधीचे महत्त्व आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आपल्याला मदत करतील. यावर्षी गुरुवार, ९ एप्रिल रोजी सूर्यास्तानंतर येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा केला जाईल.

यहोवाचा सेवक कोण?

३, ४. (क) यशयाच्या पुस्तकात “सेवक” हा शब्द कोणाला सूचित करतो? (ख) यशया पुस्तकातील अध्याय ४२, ४९, ५०, ५२, आणि ५३ मध्ये उल्लेख केलेला सेवक कोण आहे हे बायबल स्वतःच कशा प्रकारे स्पष्ट करते?

“सेवक” हा शब्द यशयाच्या पुस्तकात अनेकदा आढळतो. काही वेळा हा शब्द स्वतः यशयालाच लागू होतो. (यश. २०:३; ४४:२६) तर, कधीकधी संपूर्ण इस्राएल राष्ट्र, ज्याला याकोब देखील म्हटले जाते त्याला हा शब्द लागू होतो. (यश. ४१:८, ९; ४४:१, २, २१) पण, यशया पुस्तकाच्या ४२, ४९, ५०, ५२, व ५३ अध्यायांत यहोवाच्या सेवकाच्या संदर्भात केलेल्या उल्लेखनीय भविष्यवाण्यांबद्दल काय म्हणता येईल? या अध्यायांत उल्लेख केलेला यहोवाचा सेवक कोण आहे याबद्दल ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत स्पष्टपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे, प्रेषितांची कृत्ये पुस्तकात सांगितल्यानुसार, पवित्र आत्म्याने सुवार्तिक फिलिप्पाला एका इथिओपियन अधिकाऱ्‍यास गाठण्यास सांगितले तेव्हा तो अधिकारी याच भविष्यवाण्यांपैकी एक वाचत होता. आज आपल्या बायबलमध्ये यशया ५३:७, ८ येथे सापडणारा अहवाल वाचल्यावर त्या अधिकाऱ्‍याने फिलिप्पाला विचारले: “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्‍या कोणाविषयी?” फिलिप्पाने लागलीच त्याला समजावून सांगितले की यशया मशीहाबद्दल म्हणजेच येशूबद्दल बोलत होता.—प्रे. कृत्ये ८:२६-३५.

येशू बाळ होता तेव्हाच, शिमोन नावाच्या एका नीतिमान मनुष्याने तो “परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड” ठरेल असे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने म्हटले. यशया ४२:६ आणि ४९:६ येथे हे पूर्वभाकीत करण्यात आले होते. (लूक २:२५-३२) शिवाय, येशूची न्यायचौकशी झाली त्या रात्री त्याला देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीविषयी यशया ५०:६-९ येथे भाकीत करण्यात आले होते. (मत्त. २६:६७; लूक २२:६३) सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टनंतर, येशू हाच यहोवाचा “सेवक” असल्याचे प्रेषित पेत्राने स्पष्टपणे सांगितले. (यश. ५२:१३; ५३:११; प्रेषितांची कृत्ये ३:१३, २६ वाचा.) मशीहाविषयी असलेल्या या भविष्यवाण्यांतून आपण काय शिकू शकतो?

यहोवा आपल्या सेवकाला शिकवतो

५. यहोवाच्या सेवकाला कोणते शिक्षण मिळाले?

येशू पृथ्वीवर मानवाच्या रूपात येण्याअगोदर, यहोवा व त्याच्या या ज्येष्ठ पुत्रामध्ये किती घनिष्ट नातेसंबंध होता, यावर यहोवाच्या सेवकाविषयी असलेल्या यशयाच्या भविष्यावाण्यांपैकी एक भविष्यवाणी प्रकाश टाकते. (यशया ५०:४-९ वाचा.) यहोवाने आपल्याला कशा प्रकारे सतत मार्गदर्शन दिले याबद्दल त्याचा सेवक स्वतः असे सांगतो: “[तो] शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो.” (यश. ५०:४) त्या सबंध काळात, यहोवाच्या सेवकाने एक आज्ञाधारक शिष्य बनून आपल्या पित्याचे ऐकले व त्याच्याकडून शिकून घेतले. विश्‍वाच्या निर्माणकर्त्याकडून शिकवले जाणे यापेक्षा मोठा बहुमान कोणता असू शकतो!

६. आपल्या पित्याच्या पूर्णपणे अधीन असल्याचे यहोवाच्या सेवकाने कसे दाखवले?

या भविष्यवाणीत, यहोवाचा सेवक आपल्या पित्याला “सार्वभौम प्रभू” म्हणतो. सार्वभौम या नात्याने केवळ यहोवालाच या सबंध विश्‍वावर प्रभुत्त्व करण्याचा अधिकार आहे हे मूलभूत सत्य यहोवाच्या या सेवकाला समजले होते असे यावरून स्पष्ट होते. तो आपल्या पित्याच्या किती पूर्णपणे अधीन होता हे त्याच्या पुढील शब्दांवरून दिसते: “प्रभु परमेश्‍वराने [“सार्वभौम प्रभू यहोवाने,” NW] माझे कान उघडिले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही.” (यश. ५०:५) विश्‍वाची आणि मानवाची सृष्टी करण्याच्या कार्यात तो “[यहोवापाशी] कुशल कारागीर” असा होता. हा ‘कुशल कारागीर [यहोवाला] नित्य आनंददायी होता; त्याच्यासमोर तो सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर तो हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी [देवाचा पुत्र] आनंद पावे.’—नीति. ८:२२-३१.

७. परीक्षांचा सामना करत असताना यहोवाच्या सेवकाला आपल्या पित्याच्या आधाराची खातरी होती हे कशावरून दिसते?

यहोवाच्या सेवकाला मिळालेल्या या शिक्षणाने व मनुष्यजातीबद्दल त्याला असलेल्या जिव्हाळ्याने, पृथ्वीवर असताना कड्या विरोधाचा सामना करण्यास त्याला सज्ज केले. त्याला तीव्र छळ सहन करावा लागला तरी तो आनंदाने आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत राहिला. (स्तो. ४०:८; मत्त. २६:४२; योहा. ६:३८) आपला पिता आपल्याविषयी संतुष्ट आहे आणि तो सदोदित आपल्या पाठीशी आहे याची त्याला खातरी होती. यशयाच्या भविष्यवाणीत आधीच सांगितल्याप्रमाणे, येशू असे म्हणू शकला: “मला नीतिमान्‌ ठरविणारा जवळ आहे; मजबरोबर कोण वाद करणार? . . . पाहा, प्रभु परमेश्‍वर माझा साहाय्यकर्ता आहे.” (यश. ५०:८, ९) यशयाच्या आणखी एका भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, यहोवाने आपल्या विश्‍वासू सेवकाच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान त्याला नक्कीच साहाय्य केले.

यहोवाच्या सेवकाचे पृथ्वीवरील सेवाकार्य

८. यशया ४२:१ मध्ये सांगितल्याप्रमाणे येशू हा यहोवाचा “निवडलेला” होता हे कशावरून सिद्ध होते?

सा.यु. २९ मध्ये येशूच्या बाप्तिस्म्‌याच्या वेळी काय घडले त्याविषयी बायबलमधील अहवाल असे सांगतो: “पवित्र आत्मा . . . त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (लूक ३:२१, २२) अशा रीतीने, यशयाच्या भविष्यवाणीत ज्याला “निवडलेला” असे म्हटले होते त्याची ओळख यहोवाने करून दिली. (यशया ४२:१-७ वाचा.) पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने ही भविष्यवाणी उल्लेखनीय रीत्या पूर्ण केली. मत्तयाने आपल्या शुभवर्तमानात, यशया ४२:१-४ मधील शब्दांचा उल्लेख केला आणि ते शब्द त्याने येशूला लागू केले.—मत्त. १२:१५-२१.

९, १०. (क) येशूच्या सेवाकार्यादरम्यान त्याने यशया ४२:३ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण केली? (ख) पृथ्वीवर असताना येशूने कशा प्रकारे ‘न्याय पुढे आणला’ आणि तो केव्हा ‘पृथ्वीवर न्याय स्थापित’ करेल?

यहुदी धार्मिक पुढारी, सर्वसामान्य यहुद्यांचा तिरस्कार करायचे. (योहा. ७:४७-४९) ते लोकांशी कठोरतेने व्यवहार करायचे, त्यामुळे हे सर्वसामान्य लोक जणू ‘चेपलेल्या बोरूप्रमाणे’ किंवा विझण्याच्या बेतात असलेल्या ‘मिणमिणत्या वातीप्रमाणे’ होते. पण, येशूने मात्र दीन व दुःखी असलेल्यांना दया दाखवली. (मत्त. ९:३५, ३६) या लोकांना त्याने प्रेमळपणे असे आमंत्रण दिले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्त. ११:२८) शिवाय, चांगल्या-वाईटाबद्दल यहोवाचे स्तर लोकांना शिकवण्याद्वारे त्याने ‘न्याय पुढे आणला.’ (यश. ४२:३, पं.र.भा.) देवाचे नियमशास्त्र समजूतदारपणे आणि दयेने लागू केले पाहिजे हेही त्याने दाखवले. (मत्त. २३:२३) येशूने पक्षपात न करता श्रीमंतांना व गरीबांना प्रचार करण्याद्वारेही, न्याय प्रदर्शित केला.—मत्त. ११:५; लूक १८:१८-२३.

१० यहोवाचा “निवडलेला” ‘पृथ्वीवर न्याय स्थापित’ करेल असेही यशयाच्या भविष्यवाणीत सांगितले होते. (यश. ४२:४) हे तो कसे साध्य करेल? मशीही राज्याचा राजा या नात्याने जगातील सर्व राज्यांचा नाश करण्याद्वारे आणि आपले स्वतःचे नीतिमान शासन स्थापित करण्याद्वारे. “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते” अशा एका नवीन जगाची तो सुरुवात करेल.—२ पेत्र ३:१३; दानी. २:४४.

“करार” व “प्रकाश”

११. पहिल्या शतकात येशू कोणत्या अर्थाने “राष्ट्रांना प्रकाश” देणारा ठरला, आणि आजही तो कशा प्रकारे “राष्ट्रांना प्रकाश” देत आहे?

११यशया ४२:६ यात भाकीत करण्यात आल्यानुसार, येशू खरोखरच “राष्ट्रांना प्रकाश” देणारा ठरला. पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने मुख्यतः यहुद्यांना आध्यात्मिक प्रकाश दिला. (मत्त. १५:२४; प्रे. कृत्ये ३:२६) पण, येशूने म्हटले होते की, ‘मी जगाचा प्रकाश आहे.’ (योहा. ८:१२) आध्यात्मिक ज्ञान देण्यासोबतच खंडणी म्हणून आपल्या परिपूर्ण जीवनाचे बलिदान देण्याद्वारे तो यहुद्यांसाठी, तसेच राष्ट्रांसाठी प्रकाश ठरला. (मत्त. २०:२८) त्याचे पुनरुत्थान झाल्यावर, त्याने आपल्या शिष्यांवर “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” त्याच्याविषयी साक्ष देण्याची कामगिरी सोपवली. (प्रे. कृत्ये १:८) पौल व बर्णबा यांनी आपल्या सेवाकार्यादरम्यान, “राष्ट्रांना प्रकाश” या वाक्यांशाचा उल्लेख केला आणि गैर-यहुदी लोकांमध्ये ते करत असलेल्या प्रचार कार्याशी त्याचा संबंध जोडला. (प्रे. कृत्ये १३:४६-४८; यशया ४९:६, पडताळून पाहा.) पृथ्वीवरील येशूचे अभिषिक्‍त बांधव आणि त्यांचे साथीदार आध्यात्मिक प्रकाश पसरवण्याद्वारे आणि “राष्ट्रांना प्रकाश” देणाऱ्‍या येशूवर विश्‍वास ठेवण्यास लोकांना मदत करण्याद्वारे हे कार्य आजही करत आहेत.

१२. यहोवाने आपल्या सेवकाला कशा प्रकारे “लोकांना करार” म्हणून दिले?

१२ त्याच भविष्यवाणीत यहोवाने आपल्या निवडलेल्या सेवकाला असे सांगितले: ‘मी तुझा हात धरीन व तुला राखीन, आणि तुला लोकांना करार म्हणून देईन.’ (यश. ४२:६, पं.र.भा.) येशूला ठार मारण्यासाठी आणि पृथ्वीवरील त्याचे सेवाकार्य थांबवण्यासाठी सैतानाने कोणतीही कसूर केली नाही. पण, येशूच्या मृत्यूची ठरलेली वेळ येईपर्यंत यहोवाने त्याचे संरक्षण केले. (मत्त. २:१३; योहा. ७:३०) नंतर, यहोवाने त्याला पुनरुत्थित केले आणि पृथ्वीवरील लोकांसाठी त्याला एक “करार” किंवा प्रतिज्ञा म्हणून दिले. या प्रतिज्ञेतून यहोवाने असे आश्‍वासन दिले की त्याचा हा विश्‍वासू सेवक पुढेही “राष्ट्रांना प्रकाश” ठरेल आणि आध्यात्मिक अंधकारातून लोकांना मुक्‍त करेल.यशया ४९:८, ९ वाचा.

१३. येशूने पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान कशा प्रकारे “अंधारात बसलेल्यांस” मुक्‍त केले, आणि आजही तो हे कशा प्रकारे करत आहे?

१३ या प्रतिज्ञेनुसार यहोवाचा निवडलेला सेवक ‘अंधळ्यांचे डोळे उघडणार’ होता; ‘बंदिशाळेतून बंदिवानांस व अंधारात बसलेल्यांस कारागृहातून बाहेर काढणार’ होता. (यश. ४२:७) येशूने पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान, खोट्या धार्मिक परंपरांचा पर्दाफाश करून व देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करून ही भविष्यवाणी पूर्ण केली. (मत्त. १५:३; लूक ८:१) अशा रीतीने, जे यहुदी त्याचे शिष्य बनले त्यांना त्याने खोट्या धर्मातून मुक्‍त केले. (योहा. ८:३१, ३२) त्याच प्रकारे, येशूने लाखो गैर-यहुद्यांनाही खोट्या धर्माच्या दास्यातून मुक्‍त केले. त्याने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” त्याच वेळी त्याने त्यांना असे आश्‍वासनही दिले की, “युगाच्या समाप्तीपर्यंत” मी तुमच्याबरोबर असेन. (मत्त. २८:१९, २०) सध्या ख्रिस्त येशू स्वर्गातून जगव्याप्त प्रचार कार्याची देखरेख करत आहे.

यहोवाने आपल्या ‘सेवकाला’ उच्च स्थान दिले

१४, १५. यहोवाने आपल्या सेवकाला उच्च स्थान का व कसे बहाल केले?

१४ यहोवाने आपल्या मशीही सेवकाबद्दल आणखी एका भविष्यवाणीत असे म्हटले: “पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्‍नत होईल, तो अत्युच्च होईल.” (यश. ५२:१३) आपल्या पित्याच्या सार्वभौमत्वाप्रती येशूने दाखवलेल्या एकनिष्ठतेमुळे व अधीनतेमुळे, तसेच अत्यंत कठीण परीक्षेतही तो विश्‍वासू राहिल्यामुळे यहोवाने त्याला अतिशय उच्च स्थान दिले.

१५ प्रेषित पेत्राने असे लिहिले: “येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.” (१ पेत्र ३:२२) त्याचप्रमाणे, प्रेषित पौलानेही असे लिहिले: “त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्‍यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.”—फिलिप्पै. २:८-११.

१६. येशूला १९१४ साली कशा प्रकारे “अत्युच्च” करण्यात आले, आणि तेव्हापासून त्याने काय केले आहे?

१६ सन १९१४ मध्ये यहोवाने येशूला आणखी गौरव दिले. ते कसे? यहोवाने त्याला मशीही राज्याचे सिंहासन देऊन “अत्युच्च” केले. (स्तो. २:६; दानी. ७:१३, १४) तेव्हापासून, ख्रिस्ताने “आपल्या वैऱ्‍यांमध्ये धनीपण” केले आहे. (स्तो. ११०:२, पं.र.भा.) सर्वात आधी त्याने सैतान व त्याच्या दुरात्म्यांवर विजय मिळवून त्यांना पृथ्वीवर टाकले. (प्रकटी. १२:७-१२) त्यानंतर, अभिषिक्‍त बांधवांतील पृथ्वीवर असलेल्या शेषजनांची ‘मोठ्या बाबेलीच्या’ तावडीतून सुटका करण्याद्वारे, ख्रिस्त थोर कोरेश ठरला. (प्रकटी. १८:२; यश. ४४:२८) तसेच, त्याने एका जगव्याप्त प्रचार कार्याचे नेतृत्व केले. या कार्याच्या परिणामस्वरूप अभिषिक्‍त बांधवांतील ‘बाकीच्या लोकांना’ व त्यानंतर या ‘लहान कळपाचे’ एकनिष्ठ साथीदार असलेल्या लक्षावधी ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ एकत्रित करण्यात आले.—प्रकटी. १२:१७; योहा. १०:१६; लूक १२:३२.

१७. यहोवाच्या ‘सेवकाबद्दल’ असलेल्या यशयाच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करण्याद्वारे आतापर्यंत आपल्याला काय शिकायला मिळाले?

१७ यशयाच्या पुस्तकातील या उल्लेखनीय भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्यामुळे आपला राजा व तारणारा ख्रिस्त येशू याच्याबद्दल आपले ज्ञान व कदर नक्कीच वाढली आहे. पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना त्याने यहोवाबद्दल दाखवलेल्या अधीनतेतून, त्याला पृथ्वीवर येण्याअगोदर त्याच्या पित्याकडून शिक्षण मिळाले होते हे सिद्ध झाले. त्याच्या स्वतःच्या सेवाकार्याद्वारे तसेच आजपर्यंत तो ज्या प्रचार कार्याची देखरेख करत आहे त्याद्वारे तो खरोखरच “राष्ट्रांना प्रकाश” ठरला आहे. पुढील लेखात यहोवाच्या मशीही सेवकाबद्दल असलेल्या आणखी एका भविष्यवाणीवर आपण विचार करणार आहोत. या भविष्यवाणीत, तो कशा प्रकारे दुःख सोसून आपल्या हिताकरता त्याचे जीवन बलिदान करणार होता हे दाखवण्यात आले. येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी जवळ येत असताना हे नक्कीच गांभीर्याने “विचार” करण्याजोगे विषय आहेत.—इब्री १२:२, ३.

[तळटीप]

^ परि. 2 यशया ४२:१-७; ४९:१-१२; ५०:४-९; आणि ५२:१३–५३:१२ मध्ये या भविष्यवाण्या सापडतील.

उजळणी

• यशयाच्या भविष्यवाणीत उल्लेखलेला “सेवक” कोण आहे, आणि हे आपल्याला कशावरून कळते?

• येशूला यहोवाकडून कोणते शिक्षण मिळाले?

• येशू कशा प्रकारे “राष्ट्रांना प्रकाश” ठरला?

• यहोवाच्या सेवकाला कशा प्रकारे अत्युच्च करण्यात आले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

यशयाने उल्लेख केलेला “सेवक” मशीहा येशूच असल्याचे फिलिप्पाने स्पष्ट केले

[२३ पानांवरील चित्र]

यहोवाचा निवडलेला सेवक या नात्याने येशू दीनदुबळ्यांशी करुणेने वागला

[२४ पानांवरील चित्र]

यहोवाने येशूला मशीही राज्याचे सिंहासन देऊन अत्युच्च केले