व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १

यहोवाचे वचन सजीव आहे

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १

पात्म बेटावर कैदेत असताना वयोवृद्ध प्रेषित योहानाला एकापाठोपाठ एक १६ दृष्टान्त दाखवण्यात आले. प्रभूच्या दिवसादरम्यान यहोवा देव व येशू ख्रिस्त जे काही साध्य करतात ते या दृष्टान्तांत योहानाला दिसले. प्रभूचा दिवस हा १९१४ साली देवाचे राज्य स्थापन झाल्यापासून, ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्यशासन संपेपर्यंत चालणारा काळ आहे. योहानाने सा.यु. ९६ च्या सुमारास लिहिलेल्या प्रकटीकरण या पुस्तकात याच दृष्टान्तांचे रोमहर्षक वर्णन आढळते.

आता आपण प्रकटीकरण १:१–१२:१७ यातील ठळक मुद्द्‌यांची चर्चा करणार आहोत. या भागात योहानाला दाखवण्यात आलेले पहिले सात दृष्टान्त आहेत. या दृष्टान्तांतील माहिती, सध्या जगात जे घडत आहे त्याच्याशी संबंधित आहे. तसेच, लवकरच यहोवा कोणती पावले उचलणार आहे याविषयीही यांत सांगितले आहे. म्हणूनच, आपण या दृष्टान्तांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असले पाहिजे. जे लोक हा वृत्तान्त वाचून त्यावर विश्‍वास ठेवतील त्यांना नक्कीच खूप सांत्वन व प्रोत्साहन मिळेल.—इब्री ४:१२.

“कोकरा” सातपैकी सहा शिक्के फोडतो

(प्रकटी. १:१–७:१७)

प्रथम, योहान गौरवित करण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताला पाहतो. यासोबतच त्याला अनेक संदेश दिले जातात, जे ‘एका पुस्तकात लिहून सात मंडळ्यांना पाठवण्यास’ त्याला सांगण्यात येते. (प्रकटी. १:१०, ११) यानंतर स्वर्गात असलेल्या एका सिंहासनाचा दृष्टान्त योहानाला दिसतो. सिंहासनावर बसलेल्याच्या उजव्या हातात एक गुंडाळी आहे, जी सात शिक्के मारून बंद करण्यात आली आहे. ‘ही गुंडाळी उघडावयास योग्य’ ठरणारा, “यहूदा वंशाचा सिंह,” किंवा ‘सात शिंगे व सात डोळे असलेला कोकरा’ आहे.—प्रकटी. ४:२; ५:१, २, ५, ६.

‘कोकऱ्‍याने’ पहिले सहा शिक्के एकापाठोपाठ एक फोडल्यावर काय घडते हे तिसऱ्‍या दृष्टान्तात प्रकट केले जाते. सहावा शिक्का फोडल्यानंतर एक भूमिकंप होतो आणि क्रोधाचा मोठा दिवस येतो. (प्रकटी. ६:१, १२, १७) पण यानंतरच्या दृष्टान्तात, १,४४,००० जणांवर शिक्का मारण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ‘चार देवदूत पृथ्वीचे चार वारे अडवून धरतात’ असे योहानाला दिसते. ज्यांच्यावर शिक्का मारला जात नाही अशांचा एक “मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला” योहान पाहतो.—प्रकटी. ७:१, ९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:४; ३:१; ४:५; ५:६—“सात आत्मे” या संज्ञेवरून काय सूचित होते? सात हा आकडा देवाच्या दृष्टिकोनातून पूर्णतेस सूचित करतो. त्याअर्थी, “सात मंडळ्यांना” देण्यात आलेला संदेश हा जगभरातील १,००,००० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये असलेल्या देवाच्या सर्वच लोकांना लागू होतो. (प्रकटी. १:११, २०) देवाला जे साध्य करायचे असते त्याप्रमाणे तो पवित्र आत्मा देतो. त्यामुळे, प्रकटीकरणातील भविष्यवाणीकडे लक्ष देणाऱ्‍यांना त्याविषयीची समज व आशीर्वाद देण्यासाठी देवाचा आत्मा किती पूर्णपणे कार्य करतो, हे “सात आत्मे” या संज्ञेवरून सूचित होते. प्रकटीकरणाच्या पुस्तकात पुढेही सात-सात च्या गटांत निरनिराळ्या गोष्टींचे वर्णन केलेले आढळते. तेव्हा, सात हा आकडा याठिकाणी पूर्णतेला सूचित करतो आणि खरे पाहता, प्रकटीकरणाचे सबंध पुस्तकच देवाचे “गूज” किंवा त्याचे पवित्र रहस्य कशा प्रकारे “पूर्ण” होईल यावर प्रकाश टाकते.—प्रकटी. १०:७.

१:८, १७—“अल्फा व ओमेगा” आणि “पहिला व शेवटला” हे किताब कोणाला लागू होतात? “अल्फा व ओमेगा” हा किताब यहोवाला लागू होतो. त्याच्या अगोदर कोणीही सर्वसमर्थ देव नव्हता आणि त्याच्या नंतरही कोणी होणार नाही हे यावरून दिसून येते. तोच “प्रारंभ व शेवट” आहे. (प्रकटी. २१:६; २२:१३) प्रकटीकरण २२:१३ यात “पहिला व शेवटला” हे शब्द यहोवाच्या संदर्भात वापरलेले आहेत. याचा अर्थ, त्याच्या पूर्वी किंवा त्याच्या नंतर कोणीही नाही. पण, प्रकटीकरणाच्या पुस्तकातील पहिल्या अध्यायाचा संदर्भ वाचल्यास असे लक्षात येते की तेथील “पहिला व शेवटला” हा किताब येशू ख्रिस्ताला लागू होतो. पुनरुत्थान होऊन अमर आत्मिक जीवन मिळालेला तो पहिलाच मनुष्य होता आणि ज्याचे पुनरुत्थान स्वतः यहोवाने केले असा तो शेवटला होता.—कलस्सै. १:१८.

२:७—‘देवाची बाग’ काय आहे? हे शब्द अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना संबोधित केलेले असल्यामुळे येथे बाग हे स्वर्गीय क्षेत्राला सूचित करत असावे. स्वर्गात देवाचे वास्तव्य असल्यामुळे या स्वर्गीय क्षेत्राची तुलना एखाद्या सुंदर बागेशी करता येते. अभिषिक्‍तांपैकी जे विश्‍वासू राहतील त्यांना ‘जीवनाच्या झाडाचे’ फळ खायला मिळेल. म्हणजेच त्यांना अमरत्व मिळेल.—१ करिंथ. १५:५३.

३:७—येशूला “दाविदाची किल्ली” केव्हा मिळाली आणि तेव्हापासून तो या किल्लीचा कशा प्रकारे वापर करत आहे? सा.यु. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा दाविदाच्या वंशातील भावी राजा म्हणून त्याचा अभिषेक करण्यात आला. पण दाविदाची किल्ली त्याला सा.यु. ३३ मध्ये मिळाली, जेव्हा त्याला स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसण्याचा बहुमान देण्यात आला. त्यावेळी दाविदाच्या राज्याचा सर्व अधिकार त्याच्या स्वाधीन करण्यात आला. तेव्हापासून राज्याशी संबंधित असलेल्या संधी व विशेषाधिकार देण्याकरता येशू या किल्लीचा वापर करत आहे. १९१९ साली, येशूने “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला” “आपल्या सर्वस्वावर” नेमण्याद्वारे “दावीदाच्या घराण्याची किल्ली” त्याच्या खांद्यावर ठेवली.—यश. २२:२२; मत्त. २४:४५, ४७.

३:१२—येशूचे “नवे नाव” काय आहे? हे नवे नाव येशूच्या नव्या पदाशी व त्याला मिळालेल्या नव्या विशेषाधिकारांशी संबंधित आहे. (फिलिप्पै. २:९-११) स्वतः येशूप्रमाणे इतर कोणीही हे नवे नाव जाणू शकत नसले, तरीही स्वर्गात त्याच्या विश्‍वासू अभिषिक्‍त बांधवांवर तो हे नाव लिहितो आणि अशा रीतीने त्यांच्यासोबत एक अतिशय घनिष्ट नातेसंबंध जोडतो. (प्रकटी. १९:१२) त्याला मिळालेल्या विशेषाधिकारांतही तो त्यांना सहभागी करतो.

आपल्याकरता धडे:

१:३. सैतानाच्या जगावर देवाचे न्यायदंड बजावण्याचा ‘समय जवळ आला असल्यामुळे,’ प्रकटीकरणाच्या पुस्तकातील संदेश समजून घेणे आणि त्यावर त्वरित कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे.

३:१७, १८. आध्यात्मिक दृष्टीने श्रीमंत होण्याकरता आपण येशूकडून “अग्नीने शुद्ध केलेले सोने” विकत घेतले पाहिजे. म्हणजेच, आपण चांगली कार्ये करून देवाच्या दृष्टीत धनवान बनले पाहिजे. (१ तीम. ६:१७-१९) यासोबतच, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपली ओळख करून देणारी “शुभ्र वस्त्रे” आपण धारण केली पाहिजे. तसेच, आध्यात्मिक सूक्ष्मदृष्टी मिळवण्याकरता आपण “अंजन” म्हणजेच टेहळणी बुरूज व इतर बायबल आधारित प्रकाशनांत दिला जाणारा सल्ला उपयोगात आणला पाहिजे.—प्रकटी. १९:८.

७:१३, १४. चोवीस वडील स्वर्गीय गौरव मिळालेल्या १,४४,००० सदस्यांचे प्रतिनिधीत्व करतात. स्वर्गात ते राजेच नव्हे तर याजक म्हणूनही सेवा करतात. दावीद राजाने २४ गटांत संघटित केलेल्या, प्राचीन इस्राएलातील याजकांनी या चोवीस वडिलांना चित्रित केले होते. या चोवीस वडिलांपैकी एकाने योहानाला मोठ्या लोकसमुदायाची ओळख करून दिली. म्हणूनच, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे पुनरुत्थान १९३५ च्या आधी कधीतरी सुरू झाले असण्याची शक्यता आहे. का? कारण त्याच वर्षी मोठा लोकसमुदाय कोणास सूचित करतो हे देवाच्या पृथ्वीवरील अभिषिक्‍त सेवकांना अचूकपणे कळले.—लूक २२:२८-३०; प्रकटी. ४:४; ७:९.

सातव्या शिक्क्याचे फोडले जाणे व त्यानंतर सात कर्ण्यांचा नाद

(प्रकटी. ८:१–१२:१७)

कोकरा सातवा शिक्का फोडतो तेव्हा सात देवदुतांना सात कर्णे दिले जातात. यांपैकी सहा देवदूत आपले कर्णे वाजवतात आणि त्याद्वारे मानवजातीच्या ‘तिसऱ्‍या भागावर’ म्हणजेच ख्रिस्ती धर्मजगतावर येणार असलेल्या न्यायदंडाची घोषणा करतात. (प्रकटी. ८:१, २, ७-१२; ९:१५, १८) या सगळ्या गोष्टी योहानाला पाचव्या दृष्टान्तात दिसतात. यानंतरच्या दृष्टान्तात योहान स्वतः देखील भाग घेतो. त्याला देण्यात आलेले एक लहानसे पुस्तक तो खातो आणि मंदिराचे मोजमाप करतो. सातवा कर्णा वाजवल्यानंतर मोठ्या आवाजात अशी घोषणा केली जाते: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे.”—प्रकटी. १०:१०; ११:१, १५.

प्रकटीकरण ११:१५, १७ यात जे म्हटले आहे त्याचा अर्थ सातव्या दृष्टान्तात आणखी स्पष्ट होतो. स्वर्गात एक मोठे चिन्ह दिसते. स्वर्गीय स्त्री एका पुत्रास म्हणजे पुसंतानास जन्म देते. दियाबलाची स्वर्गातून हकालपट्टी केली जाते. तो स्वर्गीय स्त्रीवर क्रोधाविष्ट होऊन “तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास” निघून जातो.—प्रकटी. १२:१, ५, ९, १७.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

८:१-५—स्वर्गात काही काळ शांतता का पसरली आणि त्यानंतर पृथ्वीवर काय टाकण्यात आले? पृथ्वीवरील ‘पवित्र जनांच्या प्रार्थना’ ऐकल्या जाव्यात म्हणून ही लाक्षणिक शांतता स्वर्गात पसरली. हे पहिल्या महायुद्धाच्या शेवटी घडले. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी अनेकांनी अपेक्षा केल्याप्रमाणे, विदेश्‍यांचा काळ संपल्यानंतर ते स्वर्गात गेले नाहीत. युद्धाच्या काळात त्यांना खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे ते मार्गदर्शनासाठी देवाला कळकळीने प्रार्थना करू लागले. त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर त्यांना मिळाले. देवदूताने एक लाक्षणिक अग्नी पृथ्वीवर टाकला व या अग्नीने अभिषिक्‍त ख्रिस्ती, आध्यात्मिक दृष्ट्या प्रज्वलित झाले. संख्येने ते फार थोडे असले तरीही त्यांनी सबंध जगात केलेल्या आवेशी प्रचारामुळे देवाचे राज्य हा एक ज्वलंत विषय बनला आणि यामुळे ख्रिस्ती धर्मजगत पेटून उठले. बायबलमधून मेघगर्जनांसारखे असणारे इशारे घोषित करण्यात आले. शास्त्रवचनांतील सत्याच्या प्रकाशाचे झोत प्रकट करण्यात आले. आणि भूकंपामुळे इमारती हादरतात त्याप्रमाणे अभिषिक्‍त जनांच्या प्रचाराने खोट्या धर्माला हादरवून सोडले.

८:६-१२; ९:१, १३; ११:१५—सात देवदूत आपापले कर्णे वाजवण्यास केव्हा सिद्ध झाले आणि या कर्ण्यांचा नाद केव्हा व कसा ऐकण्यात आला? आध्यात्मिक दृष्ट्या पुनःउत्साहित झालेल्या योहान वर्गाच्या सदस्यांना १९१९-१९२२ च्या काळात मार्गदर्शन देण्यात आले तेव्हा सात देवदूत सात कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले असे म्हणता येईल. या सुमारास अभिषिक्‍त जन पुन्हा एकदा सुसंघटित रीत्या सार्वजनिक सेवाकार्य करण्याच्या व प्रकाशनाचे कार्य करण्याकरता इमारती मिळवण्याच्या तयारीला लागले होते. (प्रकटी. १२:१३, १४) कर्ण्यांचा नाद हा देवाच्या लोकांनी देवदूतांच्या साहाय्याने, सैतानाच्या जगाविरुद्ध निर्भयपणे केलेल्या यहोवाच्या न्यायसंदेशांच्या घोषणेला सूचित करतो. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे या घोषणाकार्याची सुरुवात १९२२ साली ओहायोतील सीडर पॉईंट येथे झालेल्या अधिवेशनापासून झाली आणि मोठे संकट येईपर्यंत हे कार्य सुरू राहील.

८:१३; ९:१२; ११:१४—शेवटल्या तीन कर्ण्यांच्या नादामुळे कशा प्रकारे “अनर्थ” ओढावतो? पहिल्या चार कर्ण्यांच्या नादामुळे ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिक रीत्या मृतवत स्थिती उघडकीस आणली जाते. पण शेवटल्या तीन कर्ण्यांच्या नादामुळे अनर्थ ओढावतो, कारण या नादांचा काही खास घटनांशी संबंध आहे. पाचव्या कर्ण्याचा नाद, १९१९ साली देवाच्या लोकांची ‘अथांग डोहातून’ म्हणजे त्यांच्या अक्रियाशील स्थितीतून सुटका होण्याशी व त्यांच्या निरंतर प्रचार कार्याशी संबंधित आहे. त्यांचे हे निरंतर प्रचार कार्य ख्रिस्ती धर्मजगतासाठी एका यातनादायी पीडेसारखे ठरले. (प्रकटी. ९:१) सहाव्या कर्ण्याचा नाद इतिहासातील सर्वात मोठ्या घोडदळाच्या हल्ल्याविषयी आणि १९२२ साली सुरू झालेल्या जागतिक प्रचार मोहिमेविषयी आहे. शेवटल्या कर्ण्याचा नाद मशीही राज्याच्या जन्माशी संबंधित आहे.

आपल्याकरता धडे:

९:१०, १९. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ प्रकाशनांतील अधिकारवाणीची व बायबलवर आधारित असलेली विधाने एक झोंबणारा संदेश देतात. (मत्त. २४:४५) हा संदेश ‘विंचवासारख्या नांग्या’ असलेल्या टोळांच्या शेपटीसारखा आणि ‘सापासारखी शेपटे’ असलेल्या घोडदळातील घोड्यांसारखा आहे. का? कारण ही प्रकाशने “देवाचा सूड घेण्याचा दिवस” विदित करतात. (यश. ६१:२) आपण ही प्रकाशने धैर्याने व आवेशीपणे लोकांना दिली पाहिजेत.

९:२०, २१. ख्रिस्ती नसलेल्या राष्ट्रांतही बऱ्‍याच नम्र लोकांनी आपल्या संदेशाला चांगला प्रतिसाद दिला आहे. पण ख्रिस्ती धर्मजगताच्या बाहेर असलेले लोक, ज्यांना ‘बाकीची माणसे’ असे म्हटले आहे, त्यांचे लोंढेच्या लोंढे आपला संदेश स्वीकारून यहोवाचे उपासक बनतील अशी आपण अपेक्षा करत नाही. तरीसुद्धा आपले सेवाकार्य आपण सातत्याने करत राहतो.

१२:१५, १६. “पृथ्वी” म्हणजे सैतानाच्या सत्तेखालील जगाचाच भाग असलेल्या गटांनी किंवा निरनिराळ्या देशांच्या शासकांनी उपासनेच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले. १९४० च्या दशकापासून या शासकांनी “अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली [छळाची] नदी गिळून टाकली.” यहोवाला वाटल्यास तो आपली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रशासकीय अधिकाऱ्‍यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावू शकतो हे यावरून दिसून येते. म्हणूनच नीतिसूत्रे २१:१ यात असे म्हटले आहे: “राजाचे मन पाटांच्या पाण्याप्रमाणे परमेश्‍वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवितो.” हे जाणून आपला देवावरील विश्‍वास आणखी बळकट झाला पाहिजे.