व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा सेवक—‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला’

यहोवाचा सेवक—‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला’

यहोवाचा सेवक—‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला’

“तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; . . . त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.”—यश. ५३:५.

१. स्मारकविधी साजरा करत असताना आपण कोणत्या गोष्टींचे स्मरण केले पाहिजे आणि कोणती भविष्यवाणी आपल्याला असे करण्यास साहाय्य करेल?

आपण ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण करण्यासाठी आणि त्याच्या मृत्यूमुळे व पुनरुत्थानामुळे जे काही साध्य झाले आहे त्याची आठवण करण्यासाठी स्मारकविधी साजरा करतो. येशूने दिलेल्या बलिदानामुळे, यहोवालाच या विश्‍वावर प्रभुत्व करण्याचा अधिकार आहे हे कायमचे सिद्ध केले जाईल; देवाच्या नावावर लावलेला कलंक मिटवला जाईल; त्याचा उद्देश पूर्ण होईल; तसेच मानवजातीला पाप व मृत्यूपासून मुक्‍त केले जाईल. स्मारकविधी आपल्याला या सर्व गोष्टींची आठवण करून देतो. ख्रिस्ताचे बलिदान व त्याद्वारे कोणकोणत्या गोष्टी शक्य झाल्या आहेत याविषयी यशया ५३:३-१२ येथे दिलेल्या भविष्यवाणीत जितके चांगल्या प्रकारे वर्णन करण्यात आले आहे तितके दुसऱ्‍या कोणत्याही भविष्यवाणीत केलेले आढळत नाही. यशयाने यहोवाच्या सेवकाला सोसाव्या लागणाऱ्‍या दुःखांबद्दल भाकीत केले. तसेच, ख्रिस्ताच्या मृत्यूविषयी व त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या अभिषिक्‍त बांधवांना आणि त्याच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ मिळणार असलेल्या आशीर्वादांबद्दल काही खास माहिती सादर केली.—योहा. १०:१६.

२. यशयाच्या भविष्यवाणीवरून काय सिद्ध होते आणि या भविष्यवाणीचा आपल्यावर कोणता परिणाम होईल?

येशूचा पृथ्वीवर जन्म झाला त्याच्या सातशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वी यहोवाने यशयाला असे भाकीत करण्यास प्रेरित केले, की त्याचा निवडलेला सेवक सर्वात कठीण परीक्षेला तोंड देतानाही विश्‍वासू राहील. यहोवाला त्याच्या पुत्राच्या एकनिष्ठतेबद्दल अगदी पूर्णपणे खातरी होती हेच यावरून सिद्ध होते. यशयाच्या या भविष्यवाणीचे परीक्षण केल्यामुळे आपले हृदय नक्कीच कृतज्ञतेने भरून येईल आणि आपला विश्‍वास आणखी दृढ झाल्याशिवाय राहणार नाही.

लोकांनी त्याला ‘तुच्छ लेखले’ आणि ‘त्याला मानिले नाही’

३. यहुद्यांनी येशूचे स्वागत करायला हवे होते असे का म्हणता येते, पण त्यांनी त्याला कशी वागणूक दिली?

यशया ५३:३ वाचा. येशू स्वर्गात आपल्या पित्याच्या सहवासात राहून त्याची सेवा करत होता. पण या आनंददायक सुहक्काचा त्याग करून, मानवाजातीला पाप व मृत्यूपासून सुटका देण्याकरता त्याला आपले जीवन बलिदान करण्यास या पृथ्वीवर यावे लागले. हा त्याग करताना देवाच्या एकुलत्या एका पुत्राला कोणकोणत्या गोष्टींशी जुळवून घ्यावे लागले असेल याची जरा कल्पना करून पाहा! (फिलप्पै. २:५-८) मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेली प्राण्यांची बलिदाने ही येशूच्या बलिदानाकडे संकेत करत होती. कारण त्याच्याच बलिदानामुळे मानवांना पापांची खऱ्‍या अर्थाने क्षमा मिळणे शक्य होणार होते. (इब्री १०:१-४) त्याअर्थी लोकांनी, निदान मशीहाची प्रतीक्षा करत असलेल्या यहुद्यांनी तरी त्याचे आनंदाने व सन्मानाने स्वागत करायला हवे होते. (योहा. ६:१४) पण याउलट, यशयाने आधीच सांगितल्यानुसार, यहुद्यांनी ख्रिस्ताला ‘तुच्छ लेखले’ आणि ‘त्याला मानिले नाही.’ प्रेषित योहानाने लिहिले: “जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.” (योहा. १:११) प्रेषित पेत्राने यहुद्यांना असे सांगितले: “आपल्या पूर्वजांचा देव, ह्‍याने आपला सेवक, येशू ह्‍याचे गौरव केले आहे; त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्‍चय केला असताहि त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान्‌ त्याला तुम्ही नाकारले.”—प्रे. कृत्ये ३:१३, १४.

४. येशू कशा प्रकारे व्याधींशी परिचित झाला?

यशयाने असेही भाकीत केले होते की येशू “व्याधींशी परिचित” होईल. त्याच्या पृथ्वीवरील सेवेदरम्यान अधूनमधून तो थकत असे. पण तो आजारी पडल्याचा किंवा त्याला कोणती व्याधी जडल्याचा कोठेही उल्लेख नाही. (योहा. ४:६) मग तो कोणत्या अर्थाने व्याधींशी परिचित झाला? ज्यांना त्याने प्रचार केला त्या लोकांच्या व्याधींशी तो परिचित झाला. त्याला त्यांचा कळवळा येत असे आणि त्याने अनेकांचे रोग बरे केले. (मार्क १:३२-३४) असे करण्याद्वारे येशूने ही भविष्यवाणी पूर्ण केली: “खरोखर आमचे व्याधि त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले.”—यश. ५३:४क; मत्त. ८:१६, १७.

जणू “देवाने त्यावर प्रहार” केला

५. यहुद्यांपैकी बहुतेकांनी येशूच्या मृत्यूकडे कशा दृष्टिकोनाने पाहिले आणि यामुळे त्याला अधिकच यातना का झाल्या असतील?

यशया ५३:४ख वाचा. येशूला इतकी दुःखे सहन करून आपले जीवन बलिदान करण्याची काय गरज होती हे त्याच्या काळातील बऱ्‍याच लोकांना समजले नाही. त्यांच्या मते देवच त्याला शिक्षा देत होता, जणू त्याने त्याला एका घृणास्पद आजाराने पीडिले होते. (मत्त. २७:३८-४४) यहुद्यांनी येशूवर देवाची निंदा केल्याचा आरोप लावला. (मार्क १४:६१-६४; योहा. १०:३३) खरे पाहता, येशूने कोणतेही पाप केले नव्हते किंवा देवाची निंदाही केली नव्हती. पण आपल्या पित्यावर मनापासून प्रेम असल्यामुळे, आपल्याला त्याची निंदा केल्याच्या आरोपावरून मृत्यूदंड दिला जाईल या विचाराने यहोवाच्या या सेवकाला अधिकच यातना झाल्या असतील. तरीसुद्धा, यहोवाच्या इच्छेनुसार करण्यास तो तयार होता.—मत्त. २६:३९.

६, ७. यहोवाने आपल्या विश्‍वासू सेवकास ‘ठेचले’ याचा काय अर्थ होतो आणि असे करण्यात त्याला “आनंद” का वाटला?

ख्रिस्तावर ‘देवाने प्रहार केला’ असा लोक विचार करतील हे यशयाने भाकीत केले होते. हे एकवेळ आपण समजूही शकतो, पण “त्याला ठेचावे असे परमेश्‍वराच्या मर्जीस आले” असे यशयाच्या भविष्यवाणीत जेव्हा आपण वाचतो, तेव्हा मात्र आपण गोंधळात पडतो. मूळ भाषेत या वचनात, “यहोवाला त्याला ठेचण्यास आनंद वाटला” असे म्हटले आहे. (यश. ५३:१०) यहोवाने स्वतःच म्हटले होते, की “पाहा, हा माझा सेवक, . . . हा माझा निवडलेला, याजविषयी माझा जीव संतुष्ट आहे.” मग, आपल्या या सेवकाला ‘ठेचावे हे त्याच्या मर्जीस’ येणे कसे काय शक्य होते? (यश. ४२:१) येशूला भोगाव्या लागलेल्या दुःखाने यहोवाला आनंद वाटला असे कसे म्हणता येईल?

यशयाच्या भविष्यवाणीचा हा भाग समजून घेण्यासाठी आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की सबंध विश्‍वावर प्रभुत्व करण्याच्या यहोवाच्या आधिकाराविषयी सैतानाने वादविषय निर्माण केला, तेव्हा त्याने स्वर्गात व पृथ्वीवर असलेल्या देवाच्या सर्व सेवकांच्या एकनिष्ठतेबद्दलही शंका व्यक्‍त केली. (ईयो. १:९-११; २:३-५) पण, येशूने मृत्यूपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहून सैतानाचे आरोप साफ खोटे असल्याचे सिद्ध केले. यहोवाने ख्रिस्ताच्या शत्रूंना त्याला जिवे मारण्याची परवानगी तर दिली, पण आपल्या निवडलेल्या सेवकाला जिवे मारले जात होते तेव्हा त्यालाही यातना झाल्याच असतील यात शंका नाही. तरीसुद्धा, आपला प्रिय पुत्र कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी न करता शेवटपर्यंत विश्‍वासू राहिला हे पाहून यहोवाला खूप आनंद झाला. (नीति. २७:११) शिवाय, आपल्या पुत्राच्या मृत्यूमुळे पश्‍चात्तापी मनोवृत्तीच्या मानवांना अनेक फायदे मिळणार आहेत हे माहीत असल्यामुळे यहोवाला मनापासून समाधान वाटले.—लूक १५:७.

‘आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला’

८, ९. (क) येशू कशा प्रकारे ‘आपल्या अपराधांमुळे घायाळ’ झाला? (ख) पेत्राने या गोष्टीला कशा प्रकारे दुजोरा दिला?

यशया ५३:६ वाचा. आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापी स्वभावामुळे मानव जणू पापाच्या व मृत्यूच्या तावडीत सापडले आहेत. त्यांची स्थिती हरवलेल्या, भटकणाऱ्‍या मेंढरांसारखी झाली आहे. (१ पेत्र २:२५) पण आदामाचे सर्वच वंशज अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापैकी एकही जण आदामाने जे गमावले होते ते मोल देऊन पुन्हा मिळवण्यास समर्थ नव्हता. (स्तो. ४९:७) पण, यहोवाचे मानवांवर अतिशय प्रेम असल्यामुळे त्याच्या प्रिय पुत्रावर व निवडलेल्या सेवकावर त्याने ‘आपल्या सर्वांचे पाप लादिले.’ ख्रिस्त ‘आपल्या अपराधांमुळे घायाळ होण्यास’ व ‘आपल्या दुष्कर्मांमुळे ठेचला जाण्यास’ तयार झाला. अशा रीतीने त्याने आपल्या सर्वांची पापे वधस्तंभावर वाहून नेली आणि आपल्या ऐवजी तो मृत्यूला सामोरे गेला.

प्रेषित पेत्राने लिहिले: “ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे; त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्‍यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे.” त्यानंतर पेत्राने यशयाच्या भविष्यवाणीतील शब्द उद्धृत करून असे म्हटले: “त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.” (१ पेत्र २:२१, २४; यश. ५३:५) ख्रिस्ताने भोगलेल्या दुःखामुळे, देवापासून दुरावलेल्या पापी जनांना त्याच्याकडे परत येणे शक्य झाले. याविषयी पेत्राने पुढे म्हटले: “आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेहि पापांबद्दल, म्हणजे नीतिमान्‌ पुरुषाने अनीतिमान्‌ लोकांकरिता, एकदा मरण सोसले.”—१ पेत्र ३:१८.

“वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे”

१०. (क) बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने येशूला पाहून काय म्हटले? (ख) योहानाचे शब्द कशा प्रकारे खरे ठरले?

१०यशया ५३:७, ८ वाचा. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने येशूला पाहिले तेव्हा तो म्हणाला: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहा. १:२९) येशूला कोकरा म्हणताना योहानाच्या मनात कदाचित यशयाचे हे शब्द असावेत: ‘वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला.’ (यश. ५३:७) यशयाने असे भाकीत केले होते, की “आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यु पावला.” (यश. ५३:१२) लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना केली त्या रात्री त्याने आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांना एक प्याला देऊन म्हटले: “हे माझे [नव्या] कराराचे रक्‍त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.”—मत्त. २६:२८.

११, १२. (क) इसहाक आपले जीवन बलिदान करण्यास तयार झाला यावरून ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी काय स्पष्ट होते? (ख) स्मारकविधी साजरा करताना आपण थोर अब्राहाम असलेल्या यहोवा देवाबद्दल कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे?

११ येशूकरता यहोवाची जी इच्छा होती ती एका वेदीला सूचित करते आणि या वेदीवर येशूने आज्ञाधारकपणे आपल्या जीवनाचे बलिदान दिले. या बाबतीत तो प्राचीन काळातील इसहाकासारखा ठरला. (उत्प. २२:१, २, ९-१३; इब्री १०:५-१०) पण इसहाक जरी आपले जीवन बलिदान करण्यास तयार झाला, तरीसुद्धा ते बलिदान देणारा खरे तर अब्राहाम होता. (इब्री ११:१७) त्याच प्रकारे, येशूही आपले जीवन बलिदान करण्यास तयार झाला, पण या खंडणी बलिदानाची तरतूद करणारा मुळात यहोवा होता. देवाच्या पुत्राचे बलिदान, मानवजातीबद्दल देवाच्या प्रेमाचा पुरावा होता.

१२ येशूने स्वतः असे म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) प्रेषित पौलाने लिहिले: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:८) त्यामुळे, ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याद्वारे आपण त्याचा सन्मान जरी करत असलो, तरी आपण हे कधीही विसरू नये, की या बलिदानाची तरतूद थोर अब्राहाम, यहोवा याच्यामुळेच शक्य झाली आहे. त्याअर्थी, स्मारकविधी साजरा करण्याद्वारे आपण त्याचे गौरव करतो.

यहोवाचा सेवक “बहुतांस निर्दोष ठरवील”

१३, १४. यहोवाच्या सेवकाने कशा प्रकारे ‘बहुतांस निर्दोष ठरविले?’

१३यशया ५३:११, १२ वाचा. यहोवाने आपल्या निवडलेल्या सेवकाबद्दल म्हटले: ‘माझा धर्मशील सेवक बहुतांस निर्दोष ठरवील.’ हे त्याने कसे केले? १२ व्या वचनाच्या शेवटी आपल्याला याचा एक सुगावा सापडतो. तेथे म्हटले आहे, ‘त्याने अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.’ आदामाचे सर्व वंशज उपजतच पापी किंवा ‘अपराधी’ आहेत. त्यामुळे, त्यांना “पापाचे वेतन” मिळते, म्हणजेच मरण. (रोम. ५:१२; ६:२३) पापी मानव देवापासून दुरावलेले असल्यामुळे, यहोवा व त्यांच्यामध्ये समेट होणे आवश्‍यक आहे. म्हणूनच, येशूने पापी मानवजातीच्या वतीने “मध्यस्थी केली.” याविषयी यशयाच्या भविष्यवाणीत अतिशय सुरेख वर्णन केलेले आहे: “आम्हास शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.”—यश. ५३:५.

१४ आपली पापे स्वतःवर घेऊन व आपल्याकरता मृत्यूला सामोरे जाऊन ख्रिस्ताने ‘बहुतांस निर्दोष ठरविले.’ पौलाने लिहिले: “[ख्रिस्ताठायी] सर्व पूर्णता वसावी, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्‍ताच्या द्वारे शांति करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.”—कलस्सै. १:१९, २०.

१५. (क) पौलाने उल्लेख केलेल्या ‘स्वर्गातील’ गोष्टी कोणास सूचित करतात? (ख) स्मारकविधीच्या चिन्हांत सहभागी होण्याचा हक्क केवळ कोणाला आहे, आणि का?

१५ ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्‍ताद्वारे ज्यांचा यहोवासोबत समेट झाला, त्यांपैकी ‘स्वर्गातील’ गोष्टी, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सूचित करतात. यांना स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करण्याकरता निवडण्यात आले आहे. ‘स्वर्गीय पाचारणाचे भागीदार’ असलेल्या या ख्रिश्‍चनांना “जीवनदायी नीतिमत्व” प्राप्त होते. (इब्री ३:१; रोम. ५:१, १८) तेव्हा, यहोवा त्यांना आपले आत्मिक पुत्र म्हणून स्वीकारतो. पवित्र आत्मा त्यांना अशी साक्ष देतो की ते “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” आहेत, म्हणजेच त्याच्या स्वर्गीय राज्यात राजे व याजक होण्याकरता त्यांना निवडण्यात आले आहे. (रोम. ८:१५-१७; प्रकटी. ५:९, १०) ते ‘देवाच्या इस्राएलाचे,’ म्हणजेच आत्मिक इस्राएलाचे सदस्य बनतात आणि ‘नव्या करारात’ सहभागी होतात. (यिर्म. ३१:३१-३४; गल. ६:१६) नव्या करारात सहभागी झाल्यामुळे त्यांना स्मारकविधीच्या चिन्हांत सहभागी होण्याचा हक्क मिळतो. या चिन्हांपैकी एक चिन्ह असलेल्या द्राक्षारसाच्या प्याल्याविषयी येशूने असे म्हटले होते: “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे ते रक्‍त तुम्हांसाठी ओतिले जात आहे.”—लूक २२:२०.

१६. ‘पृथ्वीवरील’ गोष्टी काय आहेत आणि त्यांना कोणत्या अर्थाने यहोवाच्या दृष्टीत नीतिमान ठरवले जाते?

१६ ‘पृथ्वीवरील’ गोष्टी म्हणजे ख्रिस्ताची दुसरी मेंढरे, ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे. यहोवाचा निवडलेला सेवक, यांनाही निर्दोष किंवा नीतिमान ठरवतो. त्यांनी ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याद्वारे ‘आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले’ असल्यामुळे यहोवा त्यांना नीतिमान लेखतो. पण, आत्मिक पुत्र म्हणून नव्हे तर मित्र म्हणून तो त्यांना स्वीकारतो व “मोठ्या संकटातून” सुखरूप बचावण्याची अद्‌भुत आशा त्यांना देतो. (प्रकटी. ७:९, १०, १४; याको. २:२३) ही दुसरी मेंढरे नव्या करारात सहभागी नसल्यामुळे आणि त्याअर्थी त्यांना स्वर्गातील जीवनाची आशा नसल्यामुळे, ते स्मारकविधीच्या चिन्हांत सहभागी होत नाहीत तर हा विधी पाळण्याकरता ते आदरपूर्वक उपस्थित राहतात.

यहोवा व त्याच्या सेवकाचे मनःपूर्वक आभार!

१७. यहोवाच्या सेवकासंबंधी असलेल्या यशयाच्या भविष्यवाण्यांचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा झाला आहे?

१७ ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी जवळ आला असल्यामुळे, यहोवाच्या सेवकासंबंधी असलेल्या यशयाच्या भविष्यवाण्यांचे परीक्षण करणे अतिशय समयोचित ठरले आहे. या अभ्यासामुळे ‘आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहणे’ किंवा त्याचे जवळून निरीक्षण करणे आपल्याला शक्य झाले आहे. (इब्री १२:२) आपल्याला समजले आहे, की देवाच्या पुत्राने त्याच्याकडून मिळालेले शिक्षण नाकारले नाही. सैतानाप्रमाणे यहोवाचा विरोध करण्याऐवजी, त्याला यहोवाकडून शिक्षण घेण्यास व यहोवाला आपला सार्वभौम प्रभू मानण्यास आनंद वाटतो. आपण हेही पाहिले, की येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान त्याने ज्या लोकांना प्रचार केला त्यांच्याशी तो सहानुभूतीने वागला. त्यांच्यापैकी अनेकांच्या शारीरिक व आध्यात्मिक व्याधी त्याने दूर केल्या. अशा रीतीने त्याने दाखवून दिले की मशीही राजा या नात्याने तो नव्या जगात ‘पृथ्वीवर न्याय स्थापित करेल’ तेव्हा तो लोकांना कोणकोणते आशीर्वाद देईल. (यश. ४२:४) देवाच्या राज्याचा प्रचार आवेशाने करण्याद्वारे तो “राष्ट्रांना प्रकाश” ठरला. त्याने दाखवलेला आवेश आपल्यालाही सबंध पृथ्वीवर उत्साहीपणे देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करत राहण्याची प्रेरणा देतो.—यश. ४२:६.

१८. यशयाची भविष्यवाणी आपल्याला यहोवा व त्याच्या विश्‍वासू सेवकाचे मनापासून आभार मानण्यास का प्रवृत्त करते?

१८ यहोवाने त्याच्या प्रिय पुत्राला आपल्याकरता दुःखे सोसून त्याच्या जीवनाचे बलिदान देण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्याद्वारे किती मोठा त्याग केला, हे देखील यशयाच्या भविष्यवाणीतून आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजले आहे. यहोवाला त्याच्या पुत्राच्या यातना पाहून नव्हे, तर तो शेवटपर्यंत—अगदी मृत्यूपर्यंत पूर्णपणे विश्‍वासू राहिला हे पाहून आनंद झाला. सैतानाला खोटे ठरवून यहोवाच्या नावावरील कलंक मिटवण्यात व यहोवालाच या विश्‍वावर प्रभुत्व करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यात येशूने कसा हातभार लावला आहे हे पाहून आपणही यहोवाप्रमाणे आनंदित झाले पाहिजे. शिवाय, ख्रिस्ताने आपली पापे स्वतःवर घेतली आणि आपल्या ऐवजी तो मरण पावला. यामुळेच, त्याच्या अभिषिक्‍त बांधवांच्या लहान कळपाला व दुसऱ्‍या मेंढरांना यहोवाच्या दृष्टीत नीतिमान ठरणे शक्य झाले आहे. या सर्व गोष्टींसाठी, यंदाच्या स्मारकविधीला उपस्थित राहताना, आपण यहोवाचे व त्याच्या विश्‍वासू सेवकाचे मनःपूर्वक आभार मानू या.

उजळणी

• आपल्या विश्‍वासू सेवकास ‘ठेचण्यास’ यहोवाला “आनंद” वाटला तो कोणत्या अर्थाने?

• येशू कशा प्रकारे ‘आपल्या अपराधांमुळे घायाळ’ झाला?

• यहोवाच्या सेवकाने कशा प्रकारे ‘बहुतांस निर्दोष ठरविले?’

• स्मारकविधी जवळ येत असता, यहोवाच्या सेवकासंबंधी असलेल्या यशयाच्या भविष्यवाण्यांचे परीक्षण केल्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

लोकांनी त्याला ‘तुच्छ लेखले’ आणि ‘त्याला मानिले नाही’

[२८ पानांवरील चित्र]

“आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यु पावला”

[२९ पानांवरील चित्र]

‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ सदस्य स्मारकविधी पाळण्याकरता आदरपूर्वक उपस्थित राहतात