व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा

शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा

शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा

‘तेव्हा तुम्ही जाऊन शिष्य करा.’—मत्त. २८:१९.

१-३. (क) बायबल अभ्यास चालवण्याबद्दल बहुतेकांना कसे वाटते? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

अमेरिकेतील एका हिंदी भाषिक गटासोबत सेवा करणाऱ्‍या एका बहिणीने असे लिहिले: “मागच्या अडीच-तीन महिन्यांपासून मी पाकिस्तानातून आलेल्या एका कुटुंबासोबत बायबल अभ्यास करत होते. साहजिकच, आमची चांगली मैत्री जमली. हे कुटुंब पाकिस्तानला परत जाणार या विचारानं माझे डोळे भरून येतात. त्यांना पुन्हा भेटता येणार नाही, या गोष्टीचं तर दुःख आहेच, पण यहोवाबद्दल त्यांना शिकवताना जो आनंद मला मिळायचा त्याला मी आता मुकणार याचीही खंत आहे.”

या बहिणीप्रमाणे, तुम्हीही एखाद्या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास चालवण्याचा आनंद कधी अनुभवला आहे का? येशू व त्याच्या पहिल्या शतकातील अनुयायांसाठी शिष्य बनवण्याचे कार्य अतिशय आनंददायी होते. येशूने प्रशिक्षण देऊन पाठवलेल्या त्याच्या ७० शिष्यांनी परत येऊन आपल्याला आलेल्या आनंददायक अनुभवांविषयी त्याला अहवाल दिला, तेव्हा तो “पवित्र आत्म्यात उल्लसित” झाला. (लूक १०:१७-२१) त्यांच्याप्रमाणे, आजही शिष्य बनवण्याच्या कार्यात पुष्कळ लोक खूप आनंद मिळवत आहेत. सन २००७ वर्षादरम्यान तर परिश्रमी व आनंदी प्रचारकांनी, दर महिन्याला सरासरी ६५ लाख बायबल अभ्यास चालवले!

पण, काही प्रचारकांनी बायबल अभ्यास चालवण्याचा आनंद अजूनही अनुभवलेला नाही. इतर काही जणांनी पूर्वी हा आनंद अनुभवला असला, तरी अलीकडील काही वर्षांपासून त्यांच्याकडे बायबल अभ्यास नाही. बायबल अभ्यास मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला कोणत्या काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते? या आव्हानांवर आपल्याला कशी मात करता येईल? आणि ‘तेव्हा तुम्ही जाऊन शिष्य करा,’ या येशूच्या आज्ञेचे पालन करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?—मत्त. २८:१९.

आनंद हिरावून घेणारी काही आव्हाने

४, ५. (क) जगाच्या काही भागांत बरेच लोक कसा प्रतिसाद देतात? (ख) इतर काही ठिकाणी प्रचारकांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?

जगातील काही भागांमध्ये, लोक उत्सुकतेने आपले साहित्य स्वीकारतात आणि आपल्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त करतात. उदाहरणार्थ, तात्पुरत्या काळासाठी झांबियामध्ये सेवा करणाऱ्‍या ऑस्ट्रेलियाच्या एका विवाहित जोडप्याने असे लिहिले: “तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरंय. प्रचार कार्य करण्यासाठी झांबियासारखं दुसरं ठिकाण नाही. तुम्हाला विश्‍वास बसणार नाही, पण रस्त्यावरील साक्षकार्य करताना लोक स्वतः आमच्याजवळ येतात आणि कधीकधी तर काही जण आपणहून मासिकांचे विशिष्ट अंक मागतात.” अलीकडील एका वर्षादरम्यान झांबियातील बंधू-भगिनींनी २,००,००० च्या वर बायबल अभ्यास चालवले, म्हणजे सरासरी एक बायबल अभ्यास प्रती प्रचारक.

पण इतर काही ठिकाणी, लोकांना साहित्य देणे आणि नियमितपणे बायबल अभ्यास चालवणे सोपे नाही. का? कारण, प्रचारक घरोघरी जातात तेव्हा बहुतेक लोक घरी भेटत नाहीत आणि जे भेटतात त्यांच्यापैकी अनेकांना धार्मिक विषयांत रस नसतो. कदाचित, लहानपणी त्यांच्या घरात देवधर्म मानत नसतील. किंवा खोट्या धर्मातील ढोंगीपणा पाहून त्यांना देवाधर्माबद्दल घृणा वाटू लागली असेल. पुष्कळ लोक खोट्या मेंढपाळांमुळे आध्यात्मिक रीत्या गांजलेले व पांगलेले आहेत. (मत्त. ९:३६) त्यामुळे साहजिकच, असे लोक बायबलबद्दल कोणाशी चर्चा करण्यास मागेपुढे पाहत असतील.

६. काही प्रचारकांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते?

काही विश्‍वासू प्रचारक एका वेगळ्या प्रकारच्या आव्हानामुळे आपला आनंद गमावून बसतात. पूर्वी ते शिष्य बनवण्याच्या कार्यात अतिशय उत्साही असले, तरी आजारपणामुळे किंवा म्हातारपणामुळे आता त्यांना तितक्याच उत्साहाने सेवाकार्य करणे जमत नाही. शिवाय, काही अडचणी अशा असतात ज्या आपण स्वतःच आपल्यावर ओढवून घेतलेल्या असतात. उदाहरणार्थ, बायबलचा अभ्यास चालवणे आपल्याला जमणारच नाही असे तुम्हाला वाटते का? यहोवाने फारोशी बोलण्याकरता पाठवले असता मोशेला जसे वाटले, तसेच तुम्हालाही कदाचित वाटत असेल. मोशेने म्हटले: “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीहि नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनहि नाही.” (निर्ग. ४:१०) अशा भावनांमागे सहसा अयशस्वी होण्याची भीती दडलेली असते. आपण उत्तम शिक्षक नसल्यामुळे ज्या व्यक्‍तीसोबत आपण अभ्यास करतो ती व्यक्‍ती शिष्य बनणार नाही अशी भीती आपल्याला वाटू शकते. या भीतीमुळे अभ्यास चालवण्याची आलेली संधी आपण सोडून देऊ शकतो. तर मग, येथे उल्लेख केलेल्या आव्हानांवर आपण कशी मात करू शकतो?

मनाची तयारी करा

७. सेवाकार्य करण्यासाठी येशूला कशामुळे प्रेरणा मिळाली?

सर्वात आधी आपण आपल्या मनाची तयारी करायला हवी. येशूने म्हटले: “अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) इतरांचे भले करण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे येशूला साक्षकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. उदाहरणार्थ, जेव्हा त्याने इतर यहुद्यांची दयनीय आध्यात्मिक अवस्था पाहिली तेव्हा “त्याला कळवळा आला.” त्याने आपल्या अनुयायांना म्हटले: “पीक फार आहे . . . ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”—मत्त. ९:३६-३८.

८. (क) आपण कशाबद्दल विचार केला पाहिजे? (ख) बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या एका स्त्रीने जे म्हटले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

आपल्यासोबत बायबल अभ्यास चालवण्याकरता कोणीतरी वेळ काढल्यामुळे आपल्याला किती फायदा झाला आहे, याचा शिष्य बनवण्याचे कार्य करत असताना आपण खोलवर विचार केला पाहिजे. तसेच, क्षेत्र सेवेत आपल्याला जे लोक भेटणार आहेत त्यांच्याबद्दल आणि आपला संदेश ऐकल्यामुळे त्यांना कशा प्रकारे फायदा होईल याबद्दलही विचार करा. एका स्त्रीने ती राहत असलेल्या देशाच्या शाखा कार्यालयाला असे लिहिले: “माझ्या घरी येऊन मला बायबल शिकवणाऱ्‍या साक्षीदारांची मी किती आभारी आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. कधीकधी त्यांना माझा वैताग येत असेल, कारण मी त्यांना खूप प्रश्‍न विचारते व त्यांचा खूप वेळ घेते. परंतु, ते धीरानं माझं ऐकून घेतात आणि त्यांना शिकायला मिळालेल्या गोष्टी मला सांगण्यास ते उत्सुक असतात. या लोकांची भेट घडली याबद्दल मी यहोवाची व येशूची आभारी आहे.”

९. येशूने आपले लक्ष कशावर केंद्रित केले आणि आपण त्याचे अनुकरण कशा प्रकारे करू शकतो?

अर्थात, येशूने ज्यांना ज्यांना शिकवले ते सर्वच जण त्याचे शिष्य बनले नाहीत. (मत्त. २३:३७) काही जणांनी तात्पुरत्या काळासाठी त्याचे अनुसरण केले, पण नंतर त्यांनी त्याच्या शिकवणींविरुद्ध आक्षेप घेतला आणि “ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत.” (योहा. ६:६६) पण, काही जणांच्या प्रतिकूल प्रतिसादामुळे, आपला संदेश महत्त्वाचा नाही असा येशूने विचार केला नाही. त्याने पेरलेल्या पुष्कळ बियांना फळ आले नाही, तरी त्याने आपल्या कार्याच्या चांगल्या परिणामांवर लक्ष केंद्रित केले. पीक कापणीसाठी तयार आहे हे त्याने पाहिले होते आणि या कापणीच्या कार्यात सहभागी झाल्याने त्याला अतिशय आनंद झाला. (योहान ४:३५, ३६ वाचा.) येशूप्रमाणे, आपणही आपल्या क्षेत्रात जे प्रतिसाद देत नाहीत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, जे शिष्य बनू शकतील अशांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशी सकारात्मक मनोवृत्ती आपण कशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो याचे आपण परीक्षण करू या.

कापणीच्या उद्देशाने पेरणी करा

१०, ११. आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१० कोणताही शेतकरी पीक काढण्याच्या उद्देशानेच बी पेरतो. त्याच प्रकारे, आपणही बायबल अभ्यास सुरू करण्याचा उद्देश मनात बाळगूनच सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. पण, क्षेत्र सेवेत नियमित भाग घेऊनही जर तुम्हाला खूप कमी लोक घरी सापडत असतील किंवा पहिंल्यादा भेटलेले लोक वारंवार प्रयत्न करूनही पुन्हा भेटत नसतील, तर काय? यामुळे तुम्ही हताश होऊ शकता. पण म्हणून, घरोघरचे सेवाकार्य करण्याचे तुम्ही थांबवावे का? बिलकुल नाही! ही पद्धत कित्येक वर्षांपासून यशस्वी ठरली आहे, आणि आजही अनेकांशी याच पद्धतीने संपर्क साधला जात आहे.

११ पण, आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी, तुम्हाला प्रचार करण्याकरता व लोकांपर्यंत पोचण्याकरता निरनिराळे मार्ग अजमावता येतील का? उदाहरणार्थ, तुम्ही लोकांना रस्त्यावर किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी साक्ष देण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? टेलिफोनद्वारे तुम्ही लोकांशी संपर्क साधता का? किंवा ज्यांना तुम्ही यापूर्वी राज्य संदेश सांगितला आहे त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांच्या संपर्कात राहता का? सेवाकार्यात टिकून राहण्याची जिद्द आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची मनोवृत्ती ठेवल्यास, राज्य संदेशाप्रती चांगला प्रतिसाद देणाऱ्‍या लोकांना भेटण्याचा आनंद तुम्हाला अनुभवता येईल.

लोकांच्या उदासीन मनोवृत्तीला तोंड देणे

१२. आपल्या क्षेत्रातील बहुतेक जणांची उदासीन मनोवृत्ती असल्यास आपण काय करू शकतो?

१२ तुमच्या क्षेत्रातील बहुतेक लोक धर्माबद्दल उदासीन असतील तर काय करता येईल? त्यांना कोणत्या विषयांत आवड आहे हे लक्षात घेऊन तुम्ही त्यानुसार चर्चा सुरू करू शकता का? करिंथमधील ख्रिस्ती बांधवांना प्रेषित पौलाने असे लिहिले: ‘मी यहूदी लोकांना यहूद्यासारखा झालो; जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मी नियमशास्त्राविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही.’ त्याने असे का केले? पुढे त्याने असे म्हटले: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.” (१ करिंथ. ९:२०-२२) पौलाप्रमाणे आपणही एखादा समान धागा शोधून आपल्या क्षेत्रातील लोकांशी चर्चा सुरू करू शकतो का? देवाधर्माला न मानणाऱ्‍या अनेक लोकांना आपल्या कौटुंबिक जीवनात सुधार करण्याची इच्छा असेल. जीवनात ते एखाद्या उद्देशाच्या शोधात असतील. या लोकांना आकर्षित करेल अशा पद्धतीने आपण त्यांना राज्य संदेश सादर करू शकतो का?

१३, १४. शिष्य बनवण्याच्या कार्यातील आपला आनंद आपण कशा प्रकारे द्विगुणित करू शकतो?

१३ ज्या क्षेत्रांत लोक उदासीन मनोवृत्ती दाखवतात अशा क्षेत्रांतही अनेक प्रचारकांनी शिष्य बनवण्याच्या कार्यातील आपला आनंद द्विगुणित केला आहे. तो कसा? नवीन भाषा शिकून घेण्याद्वारे. साठीत असलेल्या एका जोडप्याला, त्यांच्या मंडळीच्या क्षेत्रात हजारो चिनी विद्यार्थी व त्यांची कुटुंबे राहत असल्याचे आढळले. “यामुळेच, आम्हाला चिनी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळाली,” असे पतीने सांगितले. ते पुढे म्हणाले: “भाषेचा अभ्यास करण्यात दररोज बराच वेळ खर्च होत असला, तरी आमच्या क्षेत्रातील चिनी लोकांसोबत अनेक बायबल अभ्यास चालवण्याची संधी आम्हाला मिळाली.”

१४ सध्या एखादी नवीन भाषा शिकणे तुम्हाला शक्य नसले, तरीही इतर भाषा बोलणारे लोक भेटतात तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा तुम्ही पुरेपूर उपयोग करू शकता. तसेच, तुम्हाला भेटणाऱ्‍या लोकांच्या भाषेतील साहित्य देखील तुम्हाला सहज मिळवता येईल. अर्थातच, इतर भाषा बोलणाऱ्‍या व वेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला अतिरिक्‍त वेळ द्यावा लागेल व जास्त प्रयत्न करावे लागतील. पण, देवाच्या वचनातील हे तत्त्व कधीही विसरू नका: “जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.”—२ करिंथ. ९:६.

संपूर्ण मंडळीचे योगदान

१५, १६. (क) शिष्य बनवण्याच्या कार्यात संपूर्ण मंडळीचे योगदान असते असे का म्हणता येते? (ख) शिष्य बनवण्याच्या कार्यात मंडळीतील वयस्क लोकांची भूमिका काय आहे?

१५ पण, शिष्य बनवण्याचे कार्य हे केवळ एकाच व्यक्‍तीच्या प्रयत्नांवर अवलंबून नाही. तर, यात सबंध मंडळीचे योगदान असते. ते कसे? येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३५) खरोखरच, बायबल विद्यार्थी सभांना येतात, तेव्हा सहसा तेथील प्रेमळ वातावरण पाहून ते प्रभावित होतात. बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या एका स्त्रीने असे लिहिले: “सभांना उपस्थित राहणं मला खूप आवडतं. कारण इथं आपलं अगदी मनापासून स्वागत केलं जातं!” येशूने म्हटले की त्याचे शिष्य बनणाऱ्‍यांचा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांकडून विरोध होऊ शकतो. (मत्तय १०:३५-३७ वाचा.) तरीसुद्धा, त्याने असे वचन दिले की मंडळीत त्यांना कितीतरी आध्यात्मिक “भाऊ, बहिणी, आया, मुले” मिळतील.—मार्क १०:३०.

१६ बायबल विद्यार्थ्यांच्या प्रगतीत विशेषतः आपल्या वयस्क बंधूभगिनींचा महत्त्वाचा वाटा असतो. तो कसा? वयस्क बंधूभगिनींपैकी काही जण जरी स्वतः बायबल अभ्यास चालवण्याच्या स्थितीत नसले, तरी मंडळीतील सभांमध्ये त्यांच्या प्रोत्साहनदायक उत्तरांमुळे सभेला उपस्थित असलेल्या सर्वांचा विश्‍वास मजबूत होतो. अनेक वर्षांपासून ‘धर्ममार्गाने चालत’ असलेले हे बंधूभगिनी मंडळीची शोभा वाढवतात आणि यामुळे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक देवाच्या संघटनेकडे आकर्षित होतात.—नीति. १६:३१.

भीतीवर मात करणे

१७. कमीपणाच्या भावनांवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो?

१७ आपण बायबल अभ्यास चालवूच शकणार नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर काय? यहोवाने मोशेला पवित्र आत्मा देऊन व त्याचा भाऊ अहरोन याला त्याच्या सोबतीस पाठवून कशा प्रकारे त्याला मदत केली होती हे आठवा. (निर्ग. ४:१०-१७) आपल्या साक्षकार्यालाही देवाच्या आत्म्याचा पाठिंबा असेल असे आश्‍वासन येशूने दिले होते. (प्रे. कृत्ये १:८) शिवाय, येशूने आपल्या शिष्यांना जोडीने प्रचार करण्यास पाठवले. (लूक १०:१) तेव्हा, तुम्हाला जर बायबल अभ्यास चालवणे कठीण वाटत असेल, तर देवाच्या आत्म्याने आपल्याला बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करा. आणि जो तुमचा आत्मविश्‍वास वाढवेल आणि ज्याच्या अनुभवातून तुम्हाला शिकता येईल असा एखादा जोडीदार निवडा. यहोवाने आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना म्हणजे “जगातील जे दुर्बळ” अशांना हे असामान्य काम करण्यासाठी निवडले आहे या विचाराने खरोखरच आपल्या विश्‍वासाला बळकटी मिळते.—१ करिंथ. १:२६-२९.

१८. अपयशी होण्याच्या भीतीवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो?

१८ अपयशी होण्याच्या भीतीवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो? शिष्य बनवण्याचे कार्य हे एखादा पदार्थ बनवण्यासारखे नाही, ज्याचे यशापयश फक्‍त एकट्या स्वयंपाक्यावर अवलंबून असते. त्याउलट, शिष्य बनवण्याच्या कार्यात आपल्या सहभागाव्यतिरिक्‍त यहोवाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. तोच एखाद्या व्यक्‍तीला स्वतःकडे आकर्षित करतो. (योहा. ६:४४) विद्यार्थ्याला प्रगती करण्यास मदत करण्यासाठी आपण तसेच मंडळीतील इतर जण शिकवण्याचे कौशल्य पणाला लावतो. (२ तीमथ्य २:१५ वाचा.) पण, त्या विद्यार्थ्यानेही शिकलेल्या गोष्टींनुसार वागण्याची गरज आहे. (मत्त. ७:२४-२७) एखाद्या व्यक्‍तीने बायबलचा अभ्यास थांबवला तर आपल्याला वाईट वाटू शकते. आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घ्यावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते, पण शेवटी प्रत्येक जण “आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.”—रोम. १४:१२.

आपल्याला मिळणारे आशीर्वाद

१९-२१. (क) बायबल अभ्यास चालवल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात? (ख) प्रचार कार्यात सहभागी होणाऱ्‍या सर्व जणांना यहोवा कोणत्या दृष्टीने पाहतो?

१९ आपण बायबल अभ्यास चालवतो तेव्हा पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटत राहण्याच्या ध्येयावर आपले लक्ष केंद्रित राहते. तसेच, यामुळे देवाच्या वचनातील सत्ये आपल्या मनात खोलवर रुजतात. ते कसे? बॅरक नावाच्या एका पायनियरने असे सांगितले: “बायबल अभ्यास चालवण्याकरता तुम्हाला देवाच्या वचनाचा स्वतः चांगल्या प्रकारे अभ्यास करावाच लागतो. मला माझ्या विश्‍वासांची पूर्ण खातरी पटलेली असेल, तरच मला दुसऱ्‍या व्यक्‍तीला नीट शिकवता येईल.”

२० सध्या तुम्ही एकही बायबल अभ्यास चालवत नसल्यास, तुम्ही करत असलेल्या सेवेचे देवाच्या नजरेत काहीच महत्त्व नाही असा याचा अर्थ होतो का? बिलकुल नाही! यहोवाची स्तुती करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो त्यांची तो मनापासून कदर करतो. प्रचार कार्यात सहभागी होणारे सर्वच जण “देवाचे सहकारी” आहेत. (१ करिंथ. ३:६, ९) पण, बायबल अभ्यास चालवणे हे विशेष आनंददायक आहे. कारण आपण पेरलेल्या बियांना देव कशा प्रकारे वाढवत आहे हे आपल्याला पाहायला मिळते. (१ करिंथ. ३:६, ९) एमी नावाची एक पायनियर बहीण म्हणते: “तुमचा बायबल विद्यार्थी प्रगती करत आहे हे पाहून, त्या विद्यार्थ्याला यहोवाला जाणण्याची व सार्वकालिक जीवन मिळवण्याची एक अतुलनीय भेट देण्यासाठी यहोवा तुम्हाला वापरत असल्यामुळे तुमचे मन कृतज्ञतेने भरून येते.”

२१ बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी व ते चालवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्याने आपले लक्ष देवाच्या सेवेवर केंद्रित राहील. तसेच, येणाऱ्‍या नाशापासून बचावून नवीन जगात जाण्याची आपली आशा देखील यामुळे बळकट होईल. आणि यहोवाच्या मदतीने, जे लोक आपले ऐकून घेतात त्यांचे जीव वाचवण्यास साहाय्य करणेही आपल्याला शक्य होईल. (१ तीमथ्य ४:१६ वाचा.) यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकेल!

तुम्हाला आठवते का?

• कोणत्या आव्हानांमुळे काही जणांना बायबल अभ्यास चालवणे कठीण वाटते?

• आपल्या क्षेत्रातील बहुतेक जणांची उदासीन मनोवृत्ती असल्यास आपण काय करू शकतो?

• बायबल अभ्यास चालवल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

प्रामाणिक मनाच्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही प्रचार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती अजमावून पाहता का?