व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आदरणीय, मर्यादशील आणि देवाच्या दृष्टीने योग्य असलेले ख्रिस्ती अंत्यविधी

आदरणीय, मर्यादशील आणि देवाच्या दृष्टीने योग्य असलेले ख्रिस्ती अंत्यविधी

आदरणीय, मर्यादशील आणि देवाच्या दृष्टीने योग्य असलेले ख्रिस्ती अंत्यविधी

सगळीकडे लोकांचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत आहे. खास प्रकारचे काळे कपडे घातलेले शोकाकूल नातेवाईक आक्रोश करत आहेत. काही जण तर दुःखाने बेभान होऊन जमिनीवर लोळण घेत आहेत. ढोल-ताशांच्या तालावर काही जण बेहोष होऊन नाचत आहेत. तर दुसरीकडे काही जण खातपीत आहेत व मोठमोठ्याने हसत जणू उत्सव साजरा करत आहेत. ताडापासून बनवलेली दारू व बीयर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे इतर काही जण पिऊन तर्र झाले आहेत व जमिनीवर पडले आहेत. हा प्रसंग आहे तरी कोणता? जगातल्या काही भागांत, वरती वर्णन केलेल्या गोष्टी अंत्यविधीच्या वेळी सर्रासपणे केल्या जातात. अशा प्रसंगी, मृत व्यक्‍तीला शेवटचा निरोप देण्यासाठी शेकडो लोक एकत्र येतात.

यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेक जण अशा समाजात राहतात ज्यात लोक अतिशय अंधश्रद्धाळू आहेत व त्यांच्या मनात मृतांविषयी भय आहे. लाखो लोकांची अशी धारणा आहे की जेव्हा एखादी व्यक्‍ती मरते तेव्हा ती त्यांच्या पितरांना जाऊन मिळते व हे पितरांचे अदृश्‍य आत्मे जिवंतांना एक तर मदत करू शकतात किंवा त्यांना त्रास देऊ शकतात. अंत्यविधीचे बहुतेक रीतिरिवाज याच धारणेशी निगडित आहेत. अर्थात, एखादी व्यक्‍ती मरते तेव्हा दुःख वाटणे साहजिक आहे. येशू व त्याच्या शिष्यांनीही मरण पावलेल्या प्रिय जनांबद्दल शोक केल्याचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो. (योहा. ११:३३-३५, ३८; प्रे. कृत्ये ८:२; ९:३९) पण, त्यांच्या काळातही शोकाचे अतिप्रदर्शन करण्याचे जे प्रकार होते, ते त्यांनी कधीही अवलंबिले नाहीत. (लूक २३:२७, २८; १ थेस्सलनी. ४:१३) का? याचे एक कारण म्हणजे, त्यांना मृत्यूबद्दलचे सत्य माहीत होते.

बायबल स्पष्ट सांगते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही . . . त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत . . . ज्या अधोलोकाकडे [मूळ भाषेत, शिओल म्हणजेच मानवजातीची सर्वसाधारण कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उप. ९:५, ६, १०) बायबलमधील या देवप्रेरित वचनांतून हे स्पष्ट होते की एखादी व्यक्‍ती जेव्हा मरते तेव्हा तिला कशाचीही जाणीव राहत नाही. मृत व्यक्‍ती विचार करू शकत नाही, तिला कसल्याच संवेदना नसतात. ती बोलू शकत नाही किंवा काहीही समजू शकत नाही. बायबलमधील हे महत्त्वाचे सत्य लक्षात घेता, यहोवाच्या साक्षीदारांचे अंत्यविधी कसे असले पाहिजेत?

“जे अशुद्ध त्याला शिवू नका”

यहोवाचे साक्षीदार जगाच्या निरनिराळ्या भागांतून आलेले व विभिन्‍न संस्कृतीचे आहेत. तरीसुद्धा, मृत्यूनंतरही अस्तित्व असते व मृत व्यक्‍ती जिवंत असलेल्यांवर प्रभाव पाडू शकते या धारणांशी संबंधित असलेले रीतिरिवाज न पाळण्याची ते खास काळजी घेतात. मृत व्यक्‍तीसाठी जागरण करणे, दफनविधीनंतर खाणे-पिणे व नाच-गाणे यासाठी एकत्र येणे, दरवर्षी मृत्यूदिवस पाळणे, मृतांना शांती लाभावी म्हणून बळी देणे, तसेच एखादी स्त्री विधवा झाल्यानंतर काही खास रूढीपरंपरा पाळणे, या सर्व गोष्टी देवाच्या दृष्टीने अशुद्ध व अयोग्य आहेत. याचे कारण म्हणजे, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो या बायबलशी सुसंगत नसलेल्या व सैतानाने अस्तित्वात आणलेल्या शिकवणीशी या सर्व परंपरांचा संबंध आहे. (यहे. १८:४) खरे ख्रिस्ती ‘प्रभूच्या मेजावरचे व भुतांच्याहि मेजावरचे खाऊ’ शकत नाहीत, त्यामुळे ते या प्रथांमध्ये सहभागी होत नाहीत. (१ करिंथ. १०:२१) तर ते या आज्ञेचे पालन करतात: ‘वेगळे व्हा, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका.’ (२ करिंथ. ६:१७) पण, अशी भूमिका घेणे नेहमीच सोपे नसते.

आफ्रिका व इतर ठिकाणीही बरेच लोक असे मानतात की विशिष्ट प्रथा न पाळल्यास पितरांचे आत्मे क्रोधित होतील. या प्रथा न पाळणे हे एक घोर पाप आहे आणि असे केल्यामुळे सगळ्या समाजावर शाप येईल किंवा काहीतरी अनर्थ ओढवेल असे ते समजतात. बायबलशी सुसंगत नसलेल्या अशा प्रथांमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे यहोवाच्या लोकांपैकी अनेकांची टीका करण्यात आली आहे, त्यांचा अपमान करण्यात आला आहे आणि कित्येकदा तर अख्ख्या गावाने किंवा नातेवाइकांनी त्यांना वाळीत टाकल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच, हे लोक समाजद्रोही आहेत, यांना मेलेल्या माणसाबद्दल जराही आदर नाही अशा प्रकारचे आरोप काहींवर लावण्यात आले आहेत. कधीकधी तर, यहोवाच्या साक्षीदाराचा अंत्यविधी अविश्‍वासी नातेवाइकांनी जबरदस्तीने स्वतःच्या रीतिरिवाजांनुसार केल्याचे प्रकारही घडले आहेत. तर मग, देवाच्या दृष्टीने अयोग्य असलेल्या अंत्यविधीच्या प्रथा पाळण्याचा अट्टहास करणाऱ्‍यांशी आपण मतभेद कसा टाळू शकतो? आणि याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवासोबतचा आपला नातेसंबंध ज्यांमुळे बिघडू शकतो अशा अशुद्ध रीतिरिवाजांपासून आपण स्वतःला अलिप्त कसे ठेवू शकतो?

आपली भूमिका आधीच स्पष्ट करा

जगाच्या काही भागांत, कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्‍त समाजातील वडीलधारी माणसांच्या व इतर नातेवाइकांच्या सल्ल्यानेच अंत्यविधी पार पाडला जातो. त्यामुळे यहोवाच्या साक्षीदाराने हे स्पष्ट केले पाहिजे की त्याचा अंत्यविधी बायबलमधील तत्त्वांनुसार व यहोवाच्या साक्षीदारांद्वारेच पार पाडला जाईल. (२ करिंथ. ६:१४-१६) एखाद्या साक्षीदाराच्या अंत्यविधीत जे घडते त्यामुळे सह विश्‍वासू बांधवांच्या विवेकाला धक्का बसू नये किंवा मृतांबद्दल आपले विश्‍वास व शिकवणी माहीत असलेल्या इतरांना ते अडखळण्याचे कारण ठरू नये.

ख्रिस्ती मंडळीतील एखाद्या प्रतिनिधीला अंत्यविधी पार पाडण्याची विनंती केली जाते, तेव्हा नियुक्‍त वडील मृत व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना मार्गदर्शक सूचना देऊ शकतात व बायबलमधील तत्त्वे समजून घेण्यास त्यांना मदत करू शकतात. असे केल्याने, अंत्यविधीच्या वेळी घडणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीमुळे बायबलमधील तत्त्वांचे उल्लंघन होणार नाही. यहोवाचे साक्षीदार नसलेल्या नातेवाइकांनी अशुद्ध प्रथा पाळण्याचा दबाव आणल्यास कसलीही तडजोड न करता निर्भयपणे त्यांना बायबलनुसार असलेली आपली भूमिका प्रेमाने व आदराने समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. (१ पेत्र ३:१५) पण अविश्‍वासी नातेवाइकांनी तरीसुद्धा अशुद्ध प्रथा पाळण्याविषयी अट्टहास केला तर? तर मग, साक्षीदार कुटुंब अंत्यविधीत सहभागी न होता तेथून निघून जाण्याचा निर्णय घेऊ शकते. (१ करिंथ. १०:२०) असे घडल्यास, मृत व्यक्‍तीच्या स्मरणार्थ राज्य सभागृहात किंवा इतर योग्य ठिकाणी एका साध्याशा भाषणाची व्यवस्था केली जाऊ शकते. यामुळे, प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे दुःखी असलेल्यांना ‘शास्त्रापासून मिळणारे उत्तेजन’ देण्याची संधी मिळू शकेल. (रोम. १५:४) या प्रसंगी मृतदेह तिथे नसला तरीसुद्धा हा कार्यक्रम आदरयुक्‍त व पूर्णपणे उचित ठरेल. (अनु. ३४:५, ६, ८) आपण आधीच दुःखी असताना, जेव्हा अविश्‍वासी नातेवाईक लुडबूड करण्याचा प्रयत्न करतात व अविचारीपणे वागतात तेव्हा साहजिकच आपल्याला आणखीनच मनस्ताप होतो. पण, जे योग्य ते करण्याचा आपला दृढसंकल्प देव निश्‍चितच पाहतो आणि तोच आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देईल हे जाणून आपल्याला सांत्वन मिळते.—२ करिंथ. ४:७.

आपल्या निर्णयास लेखी स्वरूप द्या

एखाद्या व्यक्‍तीने आपल्या अंत्यविधीसंबंधी जातीने लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या असल्यास, विश्‍वासात नसलेल्या त्याच्या नातेवाइकांची समजूत घालणे जास्त सोपे जाते. कारण, लोक सहसा आपल्या मृत नातेवाइकाच्या इच्छांना मान देऊ इच्छितात. अंत्यविधी कशा प्रकारे पार पाडला जावा, तो केव्हा व कोठे व्हावा, आणि त्यासंबंधी सर्व व्यवस्था पाहण्याची जबाबदारी कोणाची असावी या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांविषयी लेखी स्वरूपात सूचना देणे आवश्‍यक आहे. (उत्प. ५०:५) अशा सूचनांखाली, लिहिणाऱ्‍या व्यक्‍तीची व साक्षीदारांची स्वाक्षरी असल्यास ते अधिकच प्रभावी ठरू शकेल. बायबलमधील तत्त्वांवर आधारित ज्ञानाने व बुद्धीने जे भविष्याकरता योजना करतात त्यांना याची जाणीव असते की आपण फार म्हातारे नसलो किंवा आपल्याला काहीतरी असाध्य आजार झालेला नसला तरीसुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्‍तिक इच्छा लिहून ठेवणे हे एक सुज्ञतेचे पाऊल आहे.—नीति. २२:३; उप. ९:१२.

काही जण अशा प्रकारच्या सूचना असलेले लिखित दस्तऐवज तयार करण्यास मागेपुढे पाहतात. पण, खरे पाहता असे पाऊल उचलणारी व्यक्‍ती हे दाखवते की ती एक प्रौढ ख्रिस्ती आहे व तिला इतरांबद्दल प्रेम व काळजी आहे. (फिलिप्पै. २:४) अंत्यविधीसंबंधी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची जबाबदारी शोकाकुल कुटुंबीयांवर सोडण्याऐवजी आधीच यांविषयी वैयक्‍तिक निर्णय घेऊन त्यांना लेखी स्वरूप देणेच सर्वात उत्तम ठरेल. नाहीतर, मृत व्यक्‍ती मानत नसलेल्या व तिला पसंत नसलेल्या अशुद्ध प्रथा पाळण्याचा कुटुंबीयांवर दबाव आणला जाण्याची शक्यता आहे.

अंत्यविधी साधा ठेवा

आफ्रिकेच्या बऱ्‍याच भागांत असे मानले जाते, की अंत्यविधीचा मोठा व थाटामाटाचा समारंभ केला नाही तर पितरांचे आत्मे क्रोधित होतील. इतरांसाठी अंत्यविधीचे कार्यक्रम हे त्यांची सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठा म्हणजेच, “संसाराविषयीची फुशारकी” मिरवण्याचीच जणू एक संधी असते. (१ योहा. २:१६) मृत व्यक्‍तीचा दफनविधी “व्यवस्थित” पार पडावा म्हणून बराच वेळ, शक्‍ती व पैसा खर्च केला जातो. जास्तीत जास्त लोकांनी अंत्यविधीला उपस्थित राहावे म्हणून मृत व्यक्‍तीचे छायाचित्र असलेली मोठमोठी पोस्टर्स ठिकठिकाणी लावून अंत्यविधीची जाहिरात केली जाते. मृत व्यक्‍तीचे चित्र असलेली टी-शर्ट्‌स खास तयार करून घेतली जातात व अंत्यविधीला येणाऱ्‍या लोकांमध्ये वाटली जातात. लोकांवर छाप पाडण्यासाठी महागड्या, शोभिवंत शवपेट्या बनवून घेतल्या जातात. आफ्रिकेतील एका देशात तर काही लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी कारच्या, विमानांच्या, बोटींच्या व इतर वस्तूंच्या आकाराच्या शवपेट्या तयार करून घेतात. लोकांना पाहता यावे म्हणून मरण पावलेल्या व्यक्‍तीचा मृतदेह शवपेटीतून काढून विशेष रीत्या सजवलेल्या पलंगावर ठेवला जातो. स्त्री असल्यास, तिला नववधूचा पांढरा शुभ्र झगा घातला जातो, बरेचसे दागदागिने व माळा घातल्या जातात आणि मेकअप केला जातो. अशा प्रकारच्या प्रथा पाळणे देवाच्या लोकांकरता खरेच योग्य ठरेल का?

ज्यांना देवाची तत्त्वे माहीत नाहीत व ज्यांना त्यांची पर्वाही नाही असे लोक पाळत असलेल्या अवाजवी प्रथांपासून दूर राहणेच सुज्ञतेचे आहे याची प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍तींना जाणीव आहे. केवळ दिखाव्यासाठी पाळल्या जाणाऱ्‍या व बायबलशी सुसंगत नसलेल्या रूढीपरंपरा ‘देवापासून नाहीत तर जगापासून आहेत’ आणि ‘हे जग नाहीसे होत आहे’ याची आपल्याला जाणीव आहे. (१ योहा. २:१५-१७) त्यामुळे, इतरांशी स्पर्धा करण्याची, किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याची ख्रिश्‍चनांना न शोभणारी प्रवृत्ती आपल्यामध्ये येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. (गलती. ५:२६) अनुभवावरून असे दिसून येते, की ज्या संस्कृतींत व समाजात मृतांविषयीचे भय सर्रास दिसून येते त्या संस्कृतींत व समाजात सहसा अंत्यविधीत लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि यामुळे साहजिकच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण बनते आणि परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता वाढते. मृतांप्रती मानसन्मान व्यक्‍त करणाऱ्‍या अविश्‍वासी व्यक्‍तींच्या भावना इथपर्यंत उद्दिप्त होऊ शकतात की त्यांच्या हातून अशुद्ध कृत्यही घडू शकते. अशा प्रकारच्या अंत्यविधींमध्ये मोठमोठ्याने व भान हरपून रडणे, वारंवार मृतदेहाला बिलगणे, ती व्यक्‍ती जिवंत असल्याप्रमाणे तिला उद्देशून बोलणे किंवा मृत देहावर पैसे किंवा इतर वस्तू ठेवणे यांसारखे प्रकार घडू शकतात. जर एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराच्या अंत्यविधीत असे घडले तर यहोवाच्या नावावर व त्याच्या लोकांवर मोठा कलंक लागेल.—१ पेत्र १:१४-१६.

मृतांची खरी स्थिती काय असते याविषयी सत्य माहीत झाल्यामुळे आपल्याला, जगिक रीतिरिवाजांचा जराही अंश असणार नाही अशा पद्धतीने आपले अंत्यविधी पार पाडण्याचे धैर्य मिळाले पाहिजे. (इफिस. ४:१७-१९) येशू हा आजवर होऊन गेलेला सर्वात महान व सर्वात महत्त्वाचा मनुष्य असूनही त्याचा दफनविधी अतिशय सुज्ञतेने व साधेपणाने पार पाडण्यात आला. (योहा. १९:४०-४२) ज्यांच्याठायी “ख्रिस्ताचे मन” आहे त्यांना अशा प्रकारे साधेपणाने केलेला दफनविधी कमी प्रतिष्ठेचा वाटत नाही. (१ करिंथ. २:१६) उलट, बायबलशी सुसंगत नसलेले अशुद्ध रीतिरिवाज टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अवास्तव दिखावा न करता साधेपणाने अंत्यविधी पार पाडणे. यामुळे अशा प्रसंगी शांत, आदरणीय, साजेसे व देवावर प्रेम असणाऱ्‍या लोकांना शोभेलसे वातावरण टिकवून ठेवणेही शक्य होते.

आनंदोत्सव साजरा करावा का?

काही ठिकाणी आणखी एक प्रथा आहे. दफनविधी झाल्यानंतर नातेवाईक, शेजारी, व इतर जण मोठ्या संख्येने एकत्र येऊन मेजवानी करतात व मोठ्या आवाजातील संगीताच्या तालावर नाचतात. अंत्यविधीनंतरच्या या सोहळ्यांत सहसा दारू पिण्याचे व अनैतिक कृत्ये करण्याचे प्रकार घडतात. अशा आनंदोत्सवामुळे मरणाचे दुःख काहीसे कमी होते असा काही जण तर्क करतात. इतर जण या प्रथा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे असे मानतात. पण, बऱ्‍याच जणांचा असा विश्‍वास आहे की मृतांचा आदर व मानसन्मान करण्यासाठी आणि त्यांचा आत्मा देह सोडून पितरांना जाऊन मिळावा यासाठी असा आनंदोत्सव साजरा करणे आवश्‍यक असते.

खरे ख्रिस्ती मात्र बायबलमधील या सल्ल्याची सुज्ञता ओळखतात: “हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्‍न असल्याने मन सुधारते.” (उप. ७:३) शिवाय, जीवन किती क्षणभंगुर आहे यावर तसेच पुनरुत्थानाच्या आशेवर शांतपणे मनन करण्याचे महत्त्वही ते ओळखतात. खरोखर, ज्यांचा यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध आहे त्यांच्यासाठी “जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा” असतो. (उप. ७:१) अंत्यविधीनंतरचे सोहळे भूतविद्येशी संबंधित असतात तसेच यात अनैतिक कृत्येही घडण्याची शक्यता असते याची जाणीव असल्यामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी असे सोहळे आयोजित करणे किंवा त्यांना हजर राहणे निश्‍चितच योग्य ठरणार नाही. अशा सोहळ्यांत आपण सहभागी झाल्यास देवाचा तर अनादर होईलच, शिवाय त्याची उपासना करणाऱ्‍या आपल्या बांधवांच्या विवेकाबद्दलही आपल्याला पर्वा नसल्याचे दिसून येईल.

लोकांना फरक दिसून आला पाहिजे

सत्य माहीत नसलेल्या लोकांमध्ये सर्वसामान्यपणे दिसून येणाऱ्‍या मृतांविषयीच्या भीतीपासून आपण मुक्‍त झालो आहोत. याबद्दल आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत! (योहा. ८:३२) ‘प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे’ चालत असताना, आपण आपले दुःख, शोक अशा रीतीने व्यक्‍त करतो की ज्यावरून आपल्याला सत्य माहीत असल्याचे दिसून येते. म्हणजेच, भावनांचे अतिप्रदर्शन न करता, आदरणीय पद्धतीने तसेच पुनरुत्थानाची पक्की आशा मनात बाळगून आपण आपला शोक व्यक्‍त करतो. (इफिस. ५:८; योहा. ५:२८, २९) ही आशा आपल्याला ‘ज्यांना आशाच नाही अशा लोकांप्रमाणे’ दुःखाचे अतिप्रदर्शन करण्यापासून रोखेल. (१ थेस्सलनी. ४:१३) तसेच बायबलमधील तत्त्वांशी एकनिष्ठ राहण्यास व मनुष्याच्या भीतीपुढे हात न टेकण्याचे धैर्यही ही आशा आपल्याला देईल.—१ पेत्र ३:१३, १४.

बायबलमधील तत्त्वांचे आपण विश्‍वासूपणे पालन केल्यास, लोकांना ‘देवाची सेवा करणारे व सेवा न करणारे यांच्यातला भेद’ दिसून येईल. (मला. ३:१८) तो दिवस आता दूर नाही, जेव्हा मृत्यू कायमचा नाहीसा झालेला असेल. (प्रकटी. २१:४) ती अद्‌भुत आशा पूर्ण होण्याची वाट पाहात असताना, आपण यहोवाच्या दृष्टीने निर्दोष, निष्कलंक व या जगापासून तसेच देवाचा अनादर करणाऱ्‍या रीतिरिवाजांपासून पूर्णपणे अलिप्त राहू या.—२ पेत्र ३:१४.

[३० पानांवरील चित्र]

अंत्यविधीबद्दल आपल्या वैयक्‍तिक इच्छा लिखीत स्वरूपात मांडणे सुज्ञपणाचे ठरेल

[३१ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती अंत्यविधी आदरणीय असावेत व कोणत्याही प्रकारचा दिखावा त्यांत असू नये