व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या आवडीनिवडींवर आपण अडून राहावे का?

आपल्या आवडीनिवडींवर आपण अडून राहावे का?

आपल्या आवडीनिवडींवर आपण अडून राहावे का?

दोन लहान मुले एकत्र खेळत आहेत. त्यांच्यापैकी एक जण दुसऱ्‍याच्या हातातले आपले आवडते खेळणे हिसकावून घेतो आणि जोरात ओरडतो, “ए, ते माझंय!” अपरिपूर्ण मानवांमध्ये लहानपणापासूनच, काही प्रमाणात स्वार्थी प्रवृत्ती दिसून येते. (उत्प. ८:२१; रोम. ३:२३) शिवाय, या जगात स्वार्थी मनोवृत्तीला सहसा प्रोत्साहन दिले जाते. अशा प्रकारच्या स्वार्थी मनोवृत्तीपासून दूर राहायचे असेल, तर त्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. असे न केल्यास, आपण इतरांसाठी सहज अडखळण बनू शकतो आणि यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंधही यामुळे कमजोर होऊ शकतो.—रोम. ७:२१-२३.

आपण जे काही करतो त्याचा इतरांवर काय परिणाम होईल याचा विचार करण्यास प्रोत्साहन देताना, प्रेषित पौलाने असे लिहिले: “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी उन्‍नति करितातच असे नाही.” पौलाने असेही म्हटले: “अडखळविणारे होऊ नका.” (१ करिंथ. १०:२३, ३२) अशा बऱ्‍याच गोष्टी आहेत, ज्यांबद्दल प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला आपल्या पसंतीनुसार निर्णय घेण्याची मुभा आहे. परंतु, अशा गोष्टींबद्दल निर्णय घेताना स्वतःला हे प्रश्‍न विचारणे शहाणपणाचे ठरेल: ‘एखादी गोष्ट करण्याचा मला हक्क असूनही तसे केल्यामुळे जर मंडळीची शांती भंग होणार असेल, तर मी याबाबतीत तडजोड करण्यास तयार असतो का? बायबलमधील तत्त्वांचे पालन करणे कठीण असते तेव्हासुद्धा त्यांचे पालन करण्याची मी तयारी दाखवतो का?’

नोकरी-व्यवसायाची निवड करताना

कोणती नोकरी किंवा व्यवसाय करावा हा आपला वैयक्‍तिक निर्णय आहे, आणि याचा इतरांवर फारसा प्रभाव पडत नाही असा अनेक जण विचार करतात. पण, दक्षिण अमेरिकेतील एका लहानशा शहरात राहणाऱ्‍या व्यापाऱ्‍याचा अनुभव लक्षात घ्या. जुगारी व दारुडा म्हणूनच लोक त्याला ओळखायचे. पण, यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि शिकायला मिळालेल्या सर्व गोष्टी जीवनात लागू केल्यामुळे त्याची संपूर्ण जीवनशैली बदलली. (२ करिंथ. ७:१) जेव्हा त्याने मंडळीसोबत प्रचार कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्‍त केली, तेव्हा एका वडिलांनी त्याला त्याच्या व्यवसायाबद्दल विचार करण्याचे प्रेमळपणे सुचवले. कारण उसापासून बनणाऱ्‍या दारूचा तो शहरातील मुख्य विक्रेता होता. ही दारू अनेक गोष्टींसाठी उपयोगी असली, तरी या भागातील लोक मात्र ती इतर पेयांत मिसळून नशा करण्याच्या उद्देशानेच ती प्यायचे.

या मनुष्याला जाणीव झाली, की एकीकडे दारूचा व्यवसाय करणे आणि दुसरीकडे प्रचार कार्य करणे, यामुळे मंडळीची बदनामी होईल आणि देवासोबत असलेला आपला नातेसंबंधही धोक्यात येईल. म्हणून, त्याने आपला दारूचा व्यवसाय बंद केला. एका मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी असूनही त्याने हा निर्णय घेतला. आता तो आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता कागदी वस्तूंचा विक्रेता म्हणून काम करतो. त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या पाच मुलांपैकी दोन मुलींचा आता बाप्तिस्मा झाला आहे. इतरांसाठी अडखळण न ठरता ते सर्व आवेशाने सुवार्तेचा प्रचार करत आहेत.

मित्रांची निवड करताना

यहोवाचे उपासक नसलेल्यांसोबत उठणे बसणे हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे का, की याबाबतीत बायबलमध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत ज्यांचे आपण पालन केले पाहिजे? एका बहिणीला यहोवाचा उपासक नसलेल्या एका तरुणाबरोबर पार्टीला जायची इच्छा होती. यामुळे कोणते धोके संभवू शकतात याबाबत तिला आधीच खबरदार करण्यात आले तरीसुद्धा ती त्या पार्टीला गेली. मला माझ्या मर्जीप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार आहे असे तिचे म्हणणे होते. पण तेथे पोचल्यावर काही वेळातच, गुंगी आणणारा पदार्थ मिसळलेले एक पेय तिला देण्यात आले. नंतर, कित्येक तासांनी तिला जाग आल्यावर तिला कळाले की स्वतःला तिचा मित्र म्हणवणाऱ्‍या त्या तरुणाने तिचा बलात्कार केला होता.—उत्प. ३४:२.

यहोवाचे उपासक नसलेल्यांसोबत मैत्री केल्याने नेहमीच अशा प्रकारचे दुःखद परिणाम होत नसले, तरीही बायबल आपल्याला असा इशारा देते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीति. १३:२०) विश्‍वासात नसलेल्या लोकांशी मैत्री करणे धोकेदायक आहे यात काहीच शंका नाही! नीतिसूत्रे २२:३ मध्ये असे म्हटले आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” होय, आपण कोणाशी मैत्री करतो याचा आपल्यावर व देवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर प्रभाव पडू शकतो.—१ करिंथ. १५:३३; याको. ४:४.

पेहरावाच्या बाबतीत

बदलणाऱ्‍या ऋतूंप्रमाणे हल्लीच्या फॅशनही सतत बदलत असतात. पण, पेहरावाबद्दल असलेली बायबलमधील तत्त्वे मात्र कधीच बदलत नाहीत. पौलाने ख्रिस्ती स्त्रियांना असे आर्जवले: “स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे.” हे तत्त्व स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही तितकेच लागू होते. (१ तीम. २:९) अगदीच साधे कपडे घालावे किंवा सगळ्यांनी एकसारखाच पेहराव करावा असे पौल येथे सुचवत नव्हता. तर, त्याने असा सल्ला दिला की आपला पेहराव शालीन व सभ्य असावा.

म्हणून आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजे: ‘मला आपल्या आवडीप्रमाणे पेहराव करण्याचा अधिकार असला, तरीही त्यामुळे जर लोकांचे लक्ष माझ्याकडे विनाकारण आकर्षित होत असेल, तर माझा पेहराव शालीन किंवा सभ्य आहे असे मी प्रामाणिकपणे म्हणू शकेन का? माझ्या पेहरावामुळे, माझ्याबद्दल किंवा माझ्या चारित्र्याबद्दल लोकांचा चुकीचा ग्रह होतो का?’ याबाबतीत केवळ ‘आपलेच हित न पाहता, दुसऱ्‍याचेही पाहिल्यास,’ आपण इतरांना ‘कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होण्याचे’ टाळू शकतो.—२ करिंथ. ६:३; फिलिप्पै. २:४.

आर्थिक व्यवहारांत

करिंथ मंडळीतील बांधवांमध्ये पैशांच्या व्यवहारांत गैरप्रकार घडल्याने गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. तेव्हा, आपल्या बांधवांवर खटले भरवण्याऐवजी ख्रिश्‍चनांनी नुकसान सहन करण्यास तयार असले पाहिजे असा सल्ला पौलाने दिला. त्याने असे लिहिले: “त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करित नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?” (१ करिंथ. ६:१-७) अमेरिकेतील एका बांधवाने हा सल्ला गंभीरतेने घेतला. तो एका बांधवाकडे नोकरीला होता. आपल्या या मालकाकडून विशिष्ट रक्कम येणे बाकी आहे असे या बांधवाचे म्हणणे होते. त्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. बायबलमधील तत्त्वांना अनुसरून त्या दोघांनी याबद्दल अनेकदा चर्चा केली. पण, त्यातून काहीच निष्पन्‍न झाले नाही. सरतेशेवटी, त्यांनी ही गोष्ट “मंडळीला,” म्हणजेच मंडळीचे प्रतिनिधी असलेल्या ख्रिस्ती वडिलांना कळवली.—मत्त. १८:१५-१७.

खेदाची गोष्ट म्हणजे, हा वाद काही सुटला नाही. या विषयाबद्दल खूप प्रार्थना केल्यावर, त्या नोकरी करणाऱ्‍या बांधवाने आपल्याला येणे असलेल्या रकमेतील मोठा भाग सोडून देण्याचा निर्णय घेतला. का? त्याने नंतर असे म्हटले, “पैशांबद्दलच्या या वादामुळे मला खूप मनस्ताप होत होता आणि आध्यात्मिक कार्यांकरता वापरता येण्याजोगा माझा अमूल्य वेळही वाया जात होता.” पण या निर्णयानंतर, या बांधवांला मनाची शांती लाभली आणि आपल्या सेवाकार्यावर यहोवा आशीर्वाद देत असल्याचेही त्याला जाणवले.

लहानसहान गोष्टींतही

आपल्या वैयक्‍तिक आवडीनिवडींवर अडून न राहिल्याने, लहानसहान गोष्टींतही आपल्याला आशीर्वाद मिळतात. एका प्रांतीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एक पायनियर जोडपे अधिवेशनाच्या ठिकाणी लवकर पोचले व त्यांना सोयीस्कर वाटणाऱ्‍या नेमक्या जागा शोधून ते तेथे बसले. कार्यक्रम सुरू होणार इतक्यात, एक मोठे कुटुंब खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये घाईघाईने आले. या कुटुंबात बरीच मुले होती. ते सर्व जण एकत्र बसण्यासाठी पुरेशा सीटस्‌ शोधत आहेत हे पाहून त्या पायनियर जोडप्याने स्वतःच्या दोन सीटस्‌ त्यांना दिल्या. यामुळे त्या मोठ्या कुटुंबाला एकत्र बसणे शक्य झाले. अधिवेशनाच्या काही दिवसांनंतर, पायनियर जोडप्याला त्या कुटुंबाकडून आभार व्यक्‍त करणारे एक पत्र मिळाले. त्या पत्रात त्यांनी म्हटले की अधिवेशनात उशिरा पोचल्यामुळे ते खूप निराश झाले होते. पण, या पायनियर जोडप्याच्या विचारशील कृत्यामुळे त्यांच्या निराशेचे रूपांतर आनंदात झाले व त्यांना मनापासून कृतज्ञ वाटले.

आपल्याला संधी मिळाल्यास, आपणही इतरांच्या फायद्याकरता आपल्या वैयक्‍तिक आवडीनिवडी बाजूला सारण्याची तयारी दाखवू या. आपलेच ‘स्वार्थ न पाहणारे’ प्रेम दाखवण्याद्वारे, आपण मंडळीत व आपल्या शेजाऱ्‍यांसोबत शांती टिकवून ठेवण्यास हातभार लावतो. (१ करिंथ. १३:५) पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवासोबत असलेली आपली मैत्री आपण टिकवून ठेवतो.

[२० पानांवरील चित्र]

पेहरावाच्या बाबतीत तुम्ही आपल्या वैयक्‍तिक आवडीनिवडींचा त्याग करण्यास तयार आहात का?

[२०, २१ पानांवरील चित्र]

तुम्ही आपल्या बांधवाकरता आपली जागा सोडण्यास तयार आहात का?