व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘कोकऱ्‍यामागे जाणारे ते हे आहेत’

‘कोकऱ्‍यामागे जाणारे ते हे आहेत’

‘कोकऱ्‍यामागे जाणारे ते हे आहेत’

“जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत.”—प्रकटी. १४:४.

१. येशूचे अनुसरण करण्याबाबत त्याच्या खऱ्‍या शिष्यांना कसे वाटले?

पृथ्वीवर आपले सेवाकार्य सुरू केल्यावर जवळजवळ अडीच वर्षांनंतर, एकदा येशू ‘कफर्णहूमातील सभास्थानात शिक्षण देत होता.’ त्यावेळी त्याने शिकवलेल्या गोष्टी धक्कादायक वाटल्याने “त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत.” या लोकांप्रमाणेच तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का, असे येशूने त्याच्या बारा प्रेषितांना विचारले तेव्हा शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्‍वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.” (योहा. ६:४८, ५९, ६०, ६६-६९) अशा रीतीने त्याच्या खऱ्‍या अनुयायांनी त्याला सोडून देण्यास साफ नकार दिला. आणि पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झाल्यानंतर ते पुढेही येशूच्या मार्गदर्शनाचे पालन करत राहिले.—प्रे. कृत्ये १६:७-१०.

२. (क) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ किंवा ‘विश्‍वासू कारभारी’ कोण आहे? (ख) दास वर्गाने कशा प्रकारे आजपर्यंत कोकऱ्‍याचे प्रामाणिकपणे अनुसरण केले आहे?

येशूचे अनुसरण करण्याबाबत आपल्या काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल काय म्हणता येईल? पृथ्वीवर असताना येशूने ‘आपल्या येण्याच्या व ह्‍या युगाच्या समाप्तीच्या चिन्हाविषयीची’ भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीत त्याने आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या आपल्या पृथ्वीवरील अनुयायांच्या गटास ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ किंवा ‘विश्‍वासू कारभारी’ म्हटले. (मत्त. २४:३, ४५; लूक १२:४२) आजपर्यंत या दास वर्गाने ‘कोकरा जेथे कोठे जातो तेथे त्याच्यामागे जाऊन’ एक गट या नात्याने त्याचे प्रामाणिकपणे अनुसरण केले आहे. (प्रकटीकरण १४:४, ५ वाचा.) ‘मोठ्या बाबेलच्या’ म्हणजेच खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या शिकवणी व प्रथा यांपासून दूर राहून दास वर्गातील सदस्य स्वतःला आध्यात्मिकरित्या शुद्ध ठेवतात. (प्रकटी. १७:५) ते कोणतेही खोटे सिद्धान्त शिकवत नाहीत. त्यामुळे असे म्हणता येईल, की ‘त्यांच्या तोंडांत असत्य आढळत नाही’ व सैतानाच्या जगापासून ते “निष्कलंक” आहेत. (योहा. १५:१९) आणि भविष्यात, पृथ्वीवर असलेले अभिषिक्‍तांतील शेषजन कोकऱ्‍यामागे थेट स्वर्गात ‘जातील’.—योहा. १३:३६.

३. आपण दास वर्गावर भरवसा का ठेवला पाहिजे?

येशूने विश्‍वासू व बुद्धिमान दासाला “आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे.” या परिवारात दास वर्गातील प्रत्येक सदस्याचा समावेश होतो. तसेच, येशूने दास वर्गाला “आपल्या सर्वस्वावर” देखील नेमले आहे. (मत्त. २४:४५-४७) या ‘सर्वस्वामध्ये’ ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ एका ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ समावेश होतो, जो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. (प्रकटी. ७:९; योहा. १०:१६) या दोन्ही गटांतील प्रत्येक सदस्याने दास वर्गावर भरवसा ठेवू नये का? नक्कीच हा दास वर्ग भरवशास पात्र आहे. असे म्हणण्याची अनेक कारणे आहेत. यांपैकी दोन उल्लेखनीय कारणे म्हणजे: (१) खुद्द यहोवाला दास वर्गावर भरवसा आहे. (२) येशूलाही या दास वर्गावर तितकाच भरवसा आहे. असे कशावरून म्हणता येईल याचे आता आपण परीक्षण करू या.

यहोवाचा दासावर भरवसा आहे

४. विश्‍वासू व बुद्धिमान दास आपल्याला शास्त्रवचनांतून जे ज्ञान, बोध व मार्गदर्शन देतो त्यावर आपण पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?

आपल्याकरता उचित समयी, सकस आध्यात्मिक आहार पुरवणे विश्‍वासू व बुद्धिमान दासाला कशामुळे शक्य होते? यहोवा म्हणतो, “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन.” तसेच, “मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन,” असेही तो म्हणतो. (स्तो. ३२:८) त्याअर्थी, दास वर्गाचे मार्गदर्शन करणारा यहोवा आहे. म्हणूनच, दास वर्ग आपल्याला शास्त्रवचनांतून जे ज्ञान, बोध व मार्गदर्शन देतो त्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो.

५. दास वर्गाला देवाच्या आत्म्याचे पाठबळ आहे हे कशावरून म्हणता येईल?

यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचेही पाठबळ दास वर्गाला देतो. यहोवाचा आत्मा अदृश्‍य असला, तरी त्याच्या साहाय्याने घडून येणारी कार्ये मात्र अदृश्‍य नाहीत. उदाहरणार्थ, यहोवा देवाबद्दल, त्याच्या पुत्राबद्दल व त्याच्या राज्याबद्दल सबंध जगभरात साक्ष देण्याच्या कार्यात विश्‍वासू व बुद्धिमान दास किती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे याचा जरा विचार करा. यहोवाचे उपासक आज २३० पेक्षा जास्त देशांत व द्वीपांत देवाच्या राज्याच्या संदेशाची आवेशाने घोषणा करत आहेत. देवाच्या आत्म्याचे पाठबळ दास वर्गाला असल्याचा हा एक खातरीलायक पुरावा नाही का? (प्रेषितांची कृत्ये १:८ वाचा.) जगभरातील यहोवाच्या लोकांना उचित समयी आध्यात्मिक अन्‍न पुरवताना दास वर्गाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेताना व ते अंमलात आणताना विश्‍वासू व बुद्धिमान दास प्रेम, सौम्यता व आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारे इतर सद्‌गुण प्रदर्शित करतात.—गल. ५:२२, २३.

६, ७. यहोवाला विश्‍वासू दास वर्गावर भरवसा असल्याचे कशावरून दिसून येते?

यहोवाला विश्‍वासू दास वर्गावर किती भरवसा आहे हे समजून घेण्यासाठी त्यातील सदस्यांना यहोवाने काय बहाल करण्याचे वचन दिले आहे यावर विचार करा. प्रेषित पौलाने लिहिले: “कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्‍यक आहे.” (१ करिंथ. १५:५२, ५३) देवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांचा नाशवंत मानवी शरीरांत मृत्यू होतो. पण यहोवा त्यांचे पुनरुत्थान, केवळ सार्वकालिक जीवनाची आशा असणाऱ्‍या आत्मिक प्राण्यांच्या रूपात करत नाही. तर तो त्यांना अमरत्व, म्हणजेच जे कधीही संपुष्टात येणार नाही व कधीही नाश होणार नाही असे जीवन बहाल करतो. शिवाय, त्यांना अविनाशीपण प्राप्त होते. यावरून, त्यांची शरीरे क्षय पावणार नाहीत व ती स्वयंनिर्भर असतील असे दिसते. प्रकटीकरण ४:४ यात आपण वाचतो, की पुनरुत्थित अभिषिक्‍त जन सिंहासनांवर बसलेले आहेत व त्यांच्या डोक्यावर सोनेरी मुकुट आहेत. यावरून स्वर्गात त्यांच्याकरता गौरवी राज्यपद राखून ठेवले आहे हे आपल्याला समजते. पण, देवाला अभिषिक्‍त जनांवर भरवसा असल्याचे एवढेच पुरावे नाहीत.

प्रकटीकरण १९:७, ८ यात आपण असे वाचतो, “कोकऱ्‍याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे; ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.” कयहोवाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आपल्या पुत्राची वधू होण्याकरता निवडले आहे. अविनाशीपण, अमरत्व, राज्यपद, कोकऱ्‍याची वधू होण्याचा सन्मान—ही सगळी खरोखर किती अद्‌भुत वरदाने आहेत! ‘जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणाऱ्‍या’ अभिषिक्‍त जनांवर देवाला किती भरवसा आहे याची या सर्व गोष्टींवरून आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते.

दासवर्गावर येशूला भरवसा आहे

८. येशूने त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांवर त्याला भरवसा असल्याचे कशा प्रकारे दाखवले?

आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या आपल्या अनुयायांवर येशूला पूर्ण भरवसा आहे हे कशावरून म्हणता येते? पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याने आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांना एक वचन दिले. तो त्यांना म्हणाला, “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो. ह्‍यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.” (लूक २२:२८-३०) त्या प्रसंगी येशूने ११ शिष्यांसोबत जो करार केला त्यात कालांतराने सर्व १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिस्ती सामील होतील. (लूक १२:३२; प्रकटी. ५:९, १०; १४:१) जर येशूला त्यांच्यावर भरवसा नसता तर त्याने आपल्यासोबत राज्यसत्ता चालवण्याचा करार त्यांच्याशी केला असता का?

९. ‘ख्रिस्ताच्या सर्वस्वात’ कशाकशाचा समावेश होतो?

शिवाय, येशूने विश्‍वासू व बुद्धिमान दासाला “आपल्या सर्वस्वावर,” म्हणजेच पृथ्वीवर त्याच्या राज्याशी संबंधित असलेल्या सर्व संपत्तीवर नेमले आहे. (मत्त. २४:४७) यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाच्या तसेच निरनिराळ्या देशांतील शाखा कार्यालयांच्या इमारती, जगभरातील संमेलनगृहे व राज्य सभागृहे येशूच्या पृथ्वीवरील संपत्तीत समाविष्ट आहेत. तसेच, राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याचाही या संपत्तीत समावेश होतो. एखाद्यावर भरवसा नसल्यास त्याला आपल्या मौल्यवान वस्तूंची देखभाल करण्यास किंवा त्यांचा उपयोग करण्यास कोणी नियुक्‍त करेल का?

१०. येशू ख्रिस्त त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांबरोबर आहे हे कशावरून दिसून येते?

१० स्वर्गात जाण्याच्या थोड्या काळाअगोदर पुनरुत्थित येशू त्याच्या विश्‍वासू शिष्यांसमोर प्रकट झाला व त्याने त्यांना हे वचन दिले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:२०) येशूने हे वचन पूर्ण केले आहे का? मागील १५ वर्षांत यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील मंडळ्यांची संख्या ७०,००० पासून १,००,००० पर्यंत वाढली आहे. ही वाढ ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आणि नव्या शिष्यांच्या संख्येविषयी काय? मागील १५ वर्षांत ४५,००,००० शिष्यांचा बाप्तिस्मा झाला. याचा अर्थ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दररोज सरासरी ८०० जणांची भर पडली. ही आश्‍चर्यजनक वाढ याचाच पुरावा आहे, की ख्रिस्त आपल्या अभिषिक्‍त अनुयायांच्या मंडळीच्या सभांचे तसेच शिष्य बनवण्याच्या त्यांच्या कार्याचेही नेतृत्त्व करत आहे.

विश्‍वासू व बुद्धिमान असणारा दास

११, १२. विश्‍वासू व बुद्धिमान असल्याचे दासवर्गाने कशा प्रकारे सिद्ध केले आहे?

११ यहोवा देवाला व येशू ख्रिस्ताला ज्याअर्थी विश्‍वासू व बुद्धिमान दासावर भरवसा आहे, त्याअर्थी आपणही त्यांच्यावर भरवसा ठेवू नये का? खरे पाहता, दासवर्गाला नेमलेले कार्य त्यांनी आजपर्यंत अगदी विश्‍वासूपणे पार पाडले आहे. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज नियतकालिक जवळजवळ १३० वर्षांपासून अविरत प्रकाशित केले जात आहे. तसेच, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा, संमेलने व अधिवेशने यांतून आपल्याला सातत्याने आध्यात्मिक ज्ञान व उत्तेजन मिळत आहे.

१२ विश्‍वासू दास बुद्धिमानही आहे असे म्हणता येते, कारण तो कधीही आपली मर्यादा ओलांडून यहोवाच्या मार्गदर्शनाच्या पुढे जात नाही. तसेच, एखाद्या गोष्टीबद्दल देवाचे मार्गदर्शन स्पष्ट असते तेव्हा ते स्वीकारण्यास तो उशीरही लावत नाही. उदाहरणार्थ, खोट्या धर्मांचे पुढारी सहसा या जगातील लोकांच्या स्वार्थी, स्वैराचारी वर्तनाचे एक तर अप्रत्यक्षपणे नाहीतर उघडउघड समर्थन करतात. पण, विश्‍वासू व बुद्धिमान दास मात्र देवाच्या लोकांना सैतानाच्या दुष्ट जगातील मोहपाशांबाबत वेळोवेळी धोक्याच्या सूचना देतो. या सुज्ञ व समयोचित सूचना दासवर्ग देऊ शकतो, याचे कारण हेच आहे की यहोवा देवाचा व येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद त्याच्यावर आहे. म्हणूनच, हा दासवर्ग आपल्या पूर्ण भरवशास पात्र आहे. पण आपल्याला विश्‍वासू व बुद्धिमान दासावर भरवसा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

कोकऱ्‍यामागे जाणाऱ्‍या अभिषिक्‍तांचे अनुसरण करा

१३. जखऱ्‍याच्या भविष्यवाणीनुसार विश्‍वासू व बुद्धिमान दासावर आपला भरवसा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

१३ बायबलमधील जखऱ्‍याच्या पुस्तकात ‘दहा जणांबद्दल’ सांगितले आहे, जे एका ‘यहूदी माणसाकडे’ येऊन असे म्हणतात: “आम्ही तुम्हाबरोबर [“तुम्हा लोकांबरोबर,” NW] येतो.” (जखऱ्‍या ८:२३ वाचा.) ‘यहूदी माणसाला’ उद्देशून बोलताना “तुम्हा लोकांबरोबर” असे म्हणण्यात आले आहे त्याअर्थी, तो केवळ एकाच मनुष्याला नव्हे तर लोकांच्या एका गटाला सूचित करतो. आपल्या काळात, हा माणूस आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांतील शेषजनांना सूचित करतो, जे ‘देवाच्या इस्राएलाचे’ भाग आहेत. (गलती. ६:१६) “सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण” दुसऱ्‍या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायाला सूचित करतात. ज्या प्रकारे अभिषिक्‍त ख्रिस्ती येशूचे अनुसरण करतात त्याच प्रकारे मोठा लोकसमुदायही विश्‍वासू व बुद्धिमान दासाबरोबर ‘जातो’ म्हणजेच त्यांच्या सोबत राहतो. मोठ्या लोकसमुदायाला आपण अभिषिक्‍तांचे म्हणजेच ‘स्वर्गीय पाचारणाच्या भागीदारांचे’ साथीदार आहोत हे दाखवण्यास कधीही कमीपणा वाटू नये. (इब्री ३:१) खुद्द येशूलाही या अभिषिक्‍त जनांना आपले “बंधु” म्हणण्यास लाज वाटत नाही.—इब्री २:११.

१४. ख्रिस्ताच्या बांधवांना कशा प्रकारे एकनिष्ठपणे पाठिंबा दिला जाऊ शकतो?

१४ आपल्या बंधूंना एकनिष्ठपणे दिलेला पाठिंबा हा जणू काय आपल्यालाच दिलेला पाठिंबा आहे असे येशू ख्रिस्त समजतो. (मत्तय २५:४० वाचा.) तर मग, पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणारे ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना आपला पाठिंबा कसा दर्शवू शकतात? प्रामुख्याने, राज्य प्रचाराच्या कार्यात त्यांना हातभार लावण्याद्वारे. (मत्त. २४:१४; योहा. १४:१२) काळाच्या ओघात पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्‍त जनांची संख्या कमी होत गेली आहे, तर दुसऱ्‍या मेंढरांची संख्या वाढत गेली आहे. ही दुसरी मेंढरे साक्षकार्यात सहभागी होतात, आणि शक्य झाल्यास पूर्णवेळेचे सुवार्तिक म्हणूनही सेवा करतात तेव्हा ते अभिषिक्‍त जनांना त्यांच्यावर सोपवलेले शिष्य बनवण्याचे कार्य पार पाडण्याकरता साहाय्य करतात. (मत्त. २८:१९, २०) तसेच, निरनिराळ्या मार्गांनी देणग्या देण्याद्वारे आर्थिक दृष्ट्या या कार्याला हातभार लावण्याची संधीही ते सोडत नाहीत.

१५. दास वर्गाकडून यथाकाळी मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाबाबत व संघटनेसंबंधी त्याने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीची कशी मनोवृत्ती असावी?

१५ विश्‍वासू दासाने बायबल आधारित प्रकाशनांच्या व ख्रिस्ती सभांच्या माध्यमाने पुरवलेल्या आध्यात्मिक अन्‍नाबाबत, ख्रिस्ती या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकाची कशी मनोवृत्ती आहे? आपण हे आध्यात्मिक अन्‍न कृतज्ञपणे स्वीकारतो का आणि त्याचे आनंदाने पालन करतो का? दास वर्गाने संघटनेसंबंधी घेतलेल्या निर्णयांना आपण कसा प्रतिसाद देतो? आपल्याला देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे स्वेच्छेने पालन करण्याद्वारे, यहोवाने केलेल्या व्यवस्थेवर आपला विश्‍वास असल्याचे आपण दाखवतो.—याको. ३:१७.

१६. सर्व ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ताच्या बंधूंचे का ऐकले पाहिजे?

१६ येशूने म्हटले: “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.” (योहा. १०:२७) हे शब्द प्रामुख्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होतात. आणि दुसऱ्‍या मेंढरांतील त्यांच्या साथीदारांविषयी काय? त्यांनीही येशूची वाणी ऐकली पाहिजे. त्याचबरोबर, त्यांनी त्याच्या बंधूंचेही ऐकले पाहिजे. कारण, देवाच्या लोकांची आध्यात्मिक रीत्या देखभाल करण्याची जबाबदारी मुख्यतः त्यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. पण ख्रिस्ताच्या बंधूंचे ऐकणे म्हणजे नेमके काय?

१७. दास वर्गाचे ऐकणे याचा काय अर्थ होतो?

१७ आज नियमन मंडळ विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करते. हे नियमन मंडळ सबंध जगातील राज्य प्रचाराच्या कार्यात पुढाकार घेते व या कार्याचे मार्गदर्शन करते. नियमन मंडळाचे सदस्य हे आत्म्याने अभिषिक्‍त असलेले अनुभवी वडील असतात. ख्रिस्ती मंडळीतील “अधिकारी” म्हणजेच पुढाकार घेणारे यांनाच म्हणता येईल. (इब्री १३:७) सबंध जगभरात १,००,००० मंडळ्यांतील जवळजवळ ७०,००,००० राज्य प्रचारकांची देखभाल करणारे हे अभिषिक्‍त वडील “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर” असतात. (१ करिंथ. १५:५८) तेव्हा, दास वर्गाचे ऐकणे म्हणजे त्याच्या नियमन मंडळाला पूर्ण सहकार्य देणे.

दास वर्गाचे ऐकणाऱ्‍यांना मिळणारे आशीर्वाद

१८, १९. (क) जे विश्‍वासू व बुद्धिमान दासाचे ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील? (ख) आपण कोणता निश्‍चय केला पाहिजे?

१८ विश्‍वासू व बुद्धिमान दासाची नियुक्‍ती झाली तेव्हापासून त्याने ‘पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविले’ आहे. (दानी. १२:३) या लोकांना सध्याच्या दुष्ट जगाच्या नाशातून बचावण्याची आशा आहे. देवाच्या दृष्टीने धार्मिक ठरणे हा खरोखर किती मोठा आशीर्वाद आहे!

१९ लवकरच ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम [१,४४,००० सदस्यांनी बनलेली] नवऱ्‍यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजून देवापासून स्वर्गातून उतरेल.’ ज्यांनी दास वर्गाचे ऐकले आहे अशा लोकांना तेव्हा कोणते आशीर्वाद मिळतील? बायबल असे सांगते: “देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटी. २१:२-४) खरोखर, ख्रिस्ताच्या व त्याच्या भरवशालायक अभिषिक्‍त बांधवांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याची कितीतरी कारणे आपल्याजवळ आहेत. तेव्हा, आपण असेच करण्याचा निश्‍चय करू या.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• यहोवाला विश्‍वासू व बुद्धिमान दासावर भरवसा आहे हे कशावरून दिसून येते?

• येशूला दास वर्गावर पूर्ण भरवसा आहे हे कशावरून दिसते?

• विश्‍वासू दास आपल्या भरवशास पात्र आहे असे का म्हणता येईल?

• आपल्याला दास वर्गावर भरवसा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

यहोवाने आपल्या पुत्राची वधू होण्याकरता कोणाला निवडले आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

[२६ पानांवरील चित्रे]

येशू ख्रिस्ताने विश्‍वासू व बुद्धिमान दासाला “आपल्या सर्वस्वावर” नेमले आहे

[२७ पानांवरील चित्र]

साक्षकार्यात सहभाग घेण्याद्वारे आपण अभिषिक्‍त जनांना आपला पाठिंबा दर्शवतो