व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

यहोवाचे वचन सजीव आहे

प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २

यहोवा देवाची उपासना करणाऱ्‍यांसाठी व त्याची उपासना करण्याचे नाकारणाऱ्‍यांसाठी भविष्यात काय राखून ठेवले आहे? सैतान व त्याच्या दुरात्म्यांचे भविष्यात काय होईल? ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान आज्ञाधारक मानवांना कोणकोणते आशीर्वाद मिळतील? या व इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे प्रकटीकरण १३:१–२२:२१ या भागात सापडतात. * या अध्यायांत, सा.यु. पहिल्या शतकाच्या शेवटी प्रेषित योहानाने पाहिलेल्या १६ दृष्टान्तांपैकी शेवटल्या ९ दृष्टान्तांचे वर्णन केलेले आहे.

योहान लिहितो: “ह्‍या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य.” (प्रकटी. १:३; २२:७) प्रकटीकरणाच्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याचे वाचन व पालन केल्यामुळे आपल्याला देवाची सेवा करण्याची प्रेरणा मिळेल; देवावरील व त्याच्या पुत्रावरील आपला विश्‍वास आणखी वाढेल; तसेच, यामुळे आपल्याला भविष्याकरता एक उज्ज्वल आशा प्राप्त होईल. *इब्री ४:१२.

देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओतल्या जातात

(प्रकटी. १३:१–१६:२१)

प्रकटीकरण ११:१८ यात असे म्हटले आहे: “राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, [देवाच्या] क्रोधाची वेळ आली, . . . आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.” ही वेळ का आली हे आठव्या दृष्टान्तात सांगण्यात आले आहे. त्यात ‘दहा शिंगे व सात डोकी असलेल्या एका श्‍वापदाचे’ व तो काय काय करतो याचे वर्णन करण्यात आले आहे.—प्रकटी. १३:१.

नवव्या दृष्टान्तात, “कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला” आणि त्याच्याबरोबर “एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम” योहानाच्या दृष्टीस पडतात. हे “माणसांतून विकत घेतलेले आहेत.” (प्रकटी. १४:१, ४) यानंतर देवदूत घोषणा करतात. पुढील दृष्टान्तात, योहान “सात पीडा घेतलेले सात देवदूत” पाहतो. सैतानाच्या जगाच्या निरनिराळ्या भागांवर “देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या” ओतण्याची आज्ञा यहोवा स्वतःच या देवदूतांना देतो. या वाट्यांमध्ये देव जो न्यायदंड आणणार आहे त्याविषयीच्या घोषणा व इशारे आहेत. (प्रकटी. १५:१; १६:१) मशीही राज्याद्वारे येणार असलेले देवाचे आणखी काही न्यायदंड तिसऱ्‍या अनर्थाशी व सातव्या कर्ण्याच्या नादाशी संबंधित आहेत. त्यांविषयी या दोन दृष्टान्तांतून आपल्याला अधिक माहिती मिळते.—प्रकटी. ११:१४, १५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१३:८—‘कोकऱ्‍याजवळील जीवनाचे पुस्तक’ काय आहे? हे एक लाक्षणिक पुस्तक आहे व येशू ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात जे राज्य करतील केवळ त्यांचीच नावे या पुस्तकात लिहिलेली आहेत. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत व ज्यांना स्वर्गीय जीवन मिळण्याची आशा आहे त्यांची नावे देखील या पुस्तकात आहेत.

१३:११-१३—दोन शिंगे असलेले श्‍वापद कशा प्रकारे अजगरासारखे कार्य करते आणि ते कशा प्रकारे आकाशातून अग्नी पडावा असे करते? दोन शिंगे असलेले श्‍वापद अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करते. हे श्‍वापद अजगरासारखे बोलते ते या अर्थाने, की ते इतरांना आपली शासनपद्धती स्वीकारायला लावण्यासाठी धमकावते, त्यांच्यावर दबाव आणते व हिंसाचाराचाही वापर करते. तसेच, हे श्‍वापद २० व्या शतकातील दोन महायुद्धांत दुष्ट शक्‍तींवर मात मिळवल्याचा व कम्युनिस्ट मतप्रणालीवर विजय मिळवल्याचा दावा करते. अशा प्रकारे, ते एखाद्या संदेष्ट्याची भूमिका घेऊन स्वर्गातून अग्नी पडावा असे करते.

१६:१७सातव्या देवदूताने आपली वाटी ज्या “अंतराळात” ओतली ते अंतराळ कशास सूचित करते? हे ‘अंतराळ’ [“हवा,” NW] सैतानी विचारसरणीला, म्हणजेच ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याला [मनोवृत्तीला]’ सूचित करते. सैतानाच्या दुष्ट जगाचा भाग असलेला प्रत्येक जण या विषारी हवेत श्‍वासोच्छ्‌वास करतो.—इफिस. २:२.

आपल्याकरता धडे:

१३:१-४, १८. मानवी सरकारांचे प्रतीक असणारे “एक श्‍वापद समुद्रातून,” म्हणजेच खवळलेल्या समुद्रासारख्या स्थितीत असलेल्या अस्वस्थ मानवसमाजातून वर येते. (यश. १७:१२, १३; दानी. ७:२-८, १७) या श्‍वापदाला अस्तित्वात आणणारा व त्यास कार्य करण्याची शक्‍ती देणारा सैतान आहे. त्याच्यावर टोकाची अपरिपूर्णता दर्शवणारा ६६६ हा आकडा लिहिलेला आहे. हे श्‍वापद काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण, हे समजून घेतल्यास आपण त्याची प्रशंसा किंवा अनुकरण करणार नाही. तसेच, सर्वसाधारण लोकांप्रमाणे आपण त्याची उपासनाही करणार नाही.—योहा. १२:३१; १५:१९.

१३:१६, १७. ‘विकत घेणे’ किंवा ‘विकत देणे’ यांसारखे सर्वसामान्य व्यवहार पार पडणे कठीण होऊन बसले, तरीसुद्धा आपण कधीही दबावात येऊन, श्‍वापदाला आपल्या जीवनावर अधिकार चालवू देण्यास तयार होऊ नये. ‘हातावर किंवा आपल्या कपाळावर श्‍वापदाची खूण करून घेणे’ हे त्याला आपल्या आचारविचारांवर नियंत्रण करण्यास परवानगी देण्यासारखे ठरेल.

१४:६, ७. देवदूताच्या या घोषणेवरून आपल्याला हे शिकायला मिळते, की आपण १९१४ साली स्थापन झालेल्या देवाच्या राज्याची सुवार्ता तातडीने घोषित केली पाहिजे. आपण ज्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो त्यांना यहोवाचे आदरयुक्‍त भय मानण्यास व त्याचे गौरव करण्यास साहाय्य केले पाहिजे.

१४:१४-२०. ‘पृथ्वीच्या पीकाची कापणी’ म्हणजेच ज्यांचे तारण होईल अशांना एकत्र करण्याचे कार्य संपुष्टात आल्यावर, देवदूत ‘पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकील.’ पृथ्वीची ही द्राक्षवेल—मानवजातीवर सत्ता चालवणारी व सैतानाच्या नियंत्रणात असलेली भ्रष्ट सरकारी यंत्रणा; तसेच, “द्राक्षीचे घड”—या यंत्रणेमुळे उत्पन्‍न झालेले दुष्ट पीक कायमचे नष्ट केले जाईल. पृथ्वीच्या या द्राक्षवेलीचा स्वतःवर प्रभाव पडू न देण्याचा आपण दृढ संकल्प केला पाहिजे.

१६:१३-१६. “अशुद्ध आत्मे [‘अशुद्ध प्रेरणेने निघालेले उद्‌गार,’ NW]” दुरात्म्यांच्या प्रचाराला सूचित करतात. या प्रचाराचा हेतू काय आहे? जगातील राजांनी, यहोवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओतण्याकडे म्हणजेच त्याच्या न्यायसंदेशांकडे लक्ष न देता, त्याच्या विरोधात उभे राहावे हा दुरात्म्यांच्या या प्रचाराचा हेतू आहे.—मत्त. २४:४२, ४४.

१६:२१. या जगाचा अंत जवळ येईल तसतसे सैतानाच्या दुष्ट जगाविरुद्ध यहोवाचे न्यायदंड कदाचित अतिशय सडेतोड शब्दांत घोषित करण्यात येतील. याच संदेशांना लाक्षणिक भाषेत गारा म्हटले असावे. पण हे भयावह संदेश ऐकूनही बहुतेक जण देवाची निंदा करतच राहतील.

जय पावलेला राजा शासन करतो

(प्रकटी. १७:१–२२:२१)

“मोठी बाबेल” अर्थात खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, सैतानाच्या दुष्ट जगाचा एक अतिशय घृणास्पद भाग आहे. ११ व्या दृष्टान्तात तिचे वर्णन “कलावंतीण” किंवा एक अनैतिक स्त्रीच्या रूपात करण्यात आले आहे. ती एका “किरमिजी रंगाच्या श्‍वापदावर बसलेली” आहे. पण हेच “दहा शिंगे” असलेले श्‍वापद तिचा संपूर्ण नाश करणार आहे. (प्रकटी. १७:१, ३, ५, १६) पुढील दृष्टान्तात या कलावंतीणीची तुलना एका ‘मोठ्या नगरीशी’ करण्यात आली आहे. याच दृष्टान्तात, ती पडेल असे घोषित करण्यात येते आणि देवाच्या लोकांना लवकरात लवकर ‘तिच्यामधून निघण्याचा’ इशारा दिला जातो. ही मोठी नगरी पडल्याबद्दल अनेक जण शोक करतात. पण स्वर्गात मात्र ‘कोकऱ्‍याच्या लग्नाचा’ आनंद साजरा केला जातो. (प्रकटी. १८:४, ९, १०, १५-१९; १९:७) १३ व्या दृष्टान्तात ‘एका पांढऱ्‍या घोड्यावरील’ स्वार राष्ट्रांशी युद्ध करण्यास जातो. तो सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत करतो.—प्रकटी. १९:११-१६.

पण, ‘दियाबल, व सैतान म्हटलेल्या जुनाट सापाचे’ काय? त्याला ‘गंधकाच्या सरोवरात केव्हा टाकण्यात’ येईल? इतर गोष्टींसोबत १४ व्या दृष्टान्तात हे देखील प्रकट करण्यात आले आहे. (प्रकटी. २०:२, १०) शेवटल्या दोन दृष्टान्तांत येशूच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान जीवन कसे असेल याची एक झलक मिळते. ‘प्रकटीकरणाच्या’ शेवटास, योहानाला ‘नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची नदी’ दिसते आणि ‘तान्हेल्यांना’ एक अद्‌भुत निमंत्रण देण्यात येते.—प्रकटी. १:१; २२:१, २, १७.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१७:१६; १८:९, १०—‘पृथ्वीवरील राजांनीच’ मोठ्या बाबेलला नष्ट केले असताना, ते तिच्याविषयी शोक का करतात? त्यांच्या शोक करण्यामागे फक्‍त त्यांचा स्वार्थ दडलेला आहे. मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतर पृथ्वीच्या राजांना या गोष्टीची जाणीव होते की ती त्यांच्यासाठी किती उपयोगी होती. धर्माचा आड घेऊन ते बेधडक अनेक अत्याचार करू शकत होते. युवकांना सैन्यात भरती करण्यासाठीही त्यांना मोठ्या बाबेलची मदत झाली. शिवाय, लोकांना नियंत्रणात ठेवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली.

१९:१२—येशूचे न उल्लेखलेले नाव केवळ त्यालाच माहीत आहे याचा काय अर्थ होतो? प्रभूच्या दिवसादरम्यान येशूचे पद व त्याला मिळालेले विशेषाधिकार, ज्यांबद्दल यशया ९:६ मध्ये उल्लेख करण्यात आला आहे त्यांना हे नाव सूचित करते. हे नाव त्याच्याशिवाय आणखी कोणालाच माहीत नाही याचा असा अर्थ होतो की त्याला मिळालेले विशेषाधिकार अतिशय खास आहेत. आणि अशा उच्च पदावर असण्याचा काय अर्थ होतो हे केवळ तोच समजू शकतो. पण यांपैकी काही विशेषाधिकार तो वधूवर्गाच्या सदस्यांना देतो आणि अशा प्रकारे ‘त्यांच्यावर त्याचे नवे नाव लिहितो.’—प्रकटी. ३:१२.

१९:१४—हर्मगिदोनाच्या वेळी येशूसोबत आणखी कोण लढाईकरता घोड्यांवर स्वार होतील? देवाच्या लढाईत ‘स्वर्गातील सैन्यात’ येशूसोबत देवदूत तसेच ज्या अभिषिक्‍त जनांना तोपर्यंत स्वर्गीय जीवनाचे प्रतिफळ मिळालेले असेल, ते देखील असतील.—मत्त. २५:३१, ३२; प्रकटी. २:२६, २७.

२०:११-१५—“जीवनाच्या पुस्तकात” कोणाची नावे लिहिलेली आहेत? या पुस्तकात ज्यांना ज्यांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ दिले जाते त्या सर्वांची नावे लिहिलेली आहेत. यांत अभिषिक्‍त ख्रिस्ती, मोठ्या लोकसमुदायातील सदस्य व ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानात’ उठणाऱ्‍या देवाच्या विश्‍वासू सेवकांचा समावेश आहे. (प्रे. कृत्ये २४:१५; प्रकटी. २:१०; ७:९) जे ‘अनीतिमानांच्या पुनरुत्थानात’ उठतील त्यांनी हजार वर्षांच्या शासनादरम्यान उघडल्या जाणाऱ्‍या ‘पुस्तकांमध्ये जे लिहिले असेल’ त्याचे पालन केले, तरच त्यांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” लिहिली जातील. पण, या पुस्तकात लिहिलेली नावे मिटवलीही जाऊ शकतात. अभिषिक्‍त जन मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिल्यास त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात कायमची कोरली जातील. (प्रकटी. ३:५) तर, पृथ्वीवरील जीवनाचे प्रतिफळ मिळणाऱ्‍यांपैकी जे हजार वर्षांच्या शेवटी होणाऱ्‍या अंतिम परीक्षेत यशस्वी ठरतील त्यांचीच नावे जीवनाच्या पुस्तकात कायम राहतील.—प्रकटी. २०:७, ८.

आपल्याकरता धडे:

१७:३, ५, ७, १६. “वरून येणारे ज्ञान” आपल्याला ‘ती स्त्री आणि तिला वाहून नेणारे [किरमिजी रंगाचे] श्‍वापद ह्‍यांचा गूढ अर्थ’ समजून घेण्यास साहाय्य करते. (याको. ३:१७) हे लाक्षणिक श्‍वापद सुरुवातीला लीग ऑफ नेशन्सच्या रूपात अस्तित्वात आले आणि नंतर संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या रूपात त्याला पुन्हा जीवदान देण्यात आले. या गूढ रहस्याचा उलगडा झाल्यामुळे, देवाच्या राज्याच्या सुवार्तेची व यहोवाच्या न्यायाच्या दिवसाची आवेशाने घोषणा करण्याची प्रेरणा आपल्याला मिळू नये का?

२१:१-६. देवाच्या राज्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल ज्या भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत त्या सर्व निश्‍चितच खऱ्‍या ठरतील. असे का म्हणता येते? कारण या भविष्यवाण्यांच्या संदर्भात, “झाले!” असे म्हणण्यात आले आहे.

२२:१, १७. ‘जीवनाच्या पाण्याची नदी,’ आज्ञाधारक मानवजातीला पाप व मुत्यूपासून सोडवण्यासाठी यहोवाने केलेल्या तरतुदींना सूचित करते. हे पाणी काही प्रमाणात आजही उपलब्ध आहे. तेव्हा, “तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो” हे निमंत्रण कृतज्ञपणे स्वीकारून आपण ते इतरांनाही देण्यास उत्सुक असले पाहिजे.

[तळटीपा]

^ परि. 1 प्रकटीकरण १:१–१२:१७ या भागाची चर्चा, टेहळणी बुरूज जानेवारी १५, २००९ अंकातील “प्रकटीकरण पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १” या लेखात करण्यात आली आहे.

^ परि. 2 प्रकटीकरणाच्या पुस्तकातील एकेका वचनाच्या स्पष्टीकरणासाठी प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! हे पुस्तक पाहावे.

[५ पानांवरील चित्र]

देवाप्रती आज्ञाधारक राहणाऱ्‍यांना त्याच्या राज्यात किती अद्‌भुत आशीर्वाद अनुभवायला मिळतील!