व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या शिकवणींचा तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडतो का?

येशूच्या शिकवणींचा तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडतो का?

येशूच्या शिकवणींचा तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडतो का?

“येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.”—मत्त. ७:२८.

१, २. येशूच्या शिकवणी ऐकून लोक आश्‍चर्यचकित का झाले होते?

देवाचा एकुलता एक पुत्र असलेल्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचा आपण स्वीकार करून त्यांना आपल्या जीवनात लागू केले पाहिजे. नक्कीच तो इतर कोणाही मनुष्यापेक्षा उत्तम रीतीने शिकवत असे. म्हणूनच तर, डोंगरावरील प्रवचनात त्याने ज्या प्रकारे शिकवले ते ऐकून लोक आश्‍चर्यचकित झाले.मत्तय ७:२८, २९ वाचा.

यहोवाचा पुत्र, अपरिपूर्ण मनुष्यांच्या शिकवणींवर आधारित लांबलचक भाषणे देणाऱ्‍या शाश्त्र्यांप्रमाणे शिकवत नसे. तर, तो “अधिकारवाणीने” शिकवत असे. कारण तो जे काही शिकवायचा ते त्याला देवाकडून प्राप्त झाले होते. (योहा. १२:५०) म्हणून, डोंगरावरील प्रवचनात येशूने पुढे जे काही शिकवले त्याचा आपल्या प्रार्थनांवर कशा प्रकारे प्रभाव पडला पाहिजे हे आपण पाहू या.

कधीही ढोंग्यांप्रमाणे प्रार्थना करू नका

३. मत्तय ६:५ मध्ये येशूने जे म्हटले त्याचा सारांश सांगा.

प्रार्थना खऱ्‍या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून आपण नियमितपणे यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. पण, आपल्या प्रार्थना येशूने डोंगरावरील प्रवचनात जे शिकवले त्यानुसार असल्या पाहिजेत. त्याने म्हटले: “जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका; कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानांत व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.”मत्त. ६:५.

४-६. (क) परुश्‍यांना “सभास्थानांत व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे” का आवडायचे? (ख) ढोंगी परूशी “आपले प्रतिफळ भरून पावले” आहेत असे का म्हणता येईल?

प्रार्थना करताना येशूच्या शिष्यांनी, केवळ लोकांना दाखवण्यासाठी धार्मिकतेचा आव आणणाऱ्‍या “ढोंगी” परुश्‍यांसारखे असायचे नव्हते. (मत्त. २३:१३-३२) त्या ढोंग्यांना “सभास्थानांत व चवाठ्यावर उभे राहून” प्रार्थना करायला आवडायचे. का? “लोकांनी आपणास पाहावे म्हणून.” पहिल्या शतकातील यहुद्यांमध्ये होमार्पण करायच्या वेळी (सकाळी नऊ आणि दुपारी तीन वाजताच्या सुमारास) प्रार्थना करण्यासाठी मंदिरात एकत्र येण्याची प्रथा होती. जेरूसलेम शहरात राहणारे बरेच यहुदी मंदिराच्या परिसरात इतर उपासकांच्या जमावासोबत प्रार्थना करायचे. जेरूसलेम शहरात राहत नसलेले धार्मिक मनोवृत्तीचे यहुदी बहुधा दिवसातून दोन वेळा ‘सभास्थानांत उभे राहून’ प्रार्थना करायचे.—लूक १८:११, १३ पडताळून पाहा.

बहुतेक लोक प्रार्थनेच्या वेळी मंदिराच्या किंवा एखाद्या सभास्थानाच्या जवळपास नसल्यामुळे त्यावेळी ते जेथे कोठे असतील तेथेच प्रार्थना करायचे. काही जण तर बरोबर प्रार्थनेच्या वेळी “चवाठ्यावर” पोचण्याच्या बेतानेच निघायचे. चवाठ्यावरून जाणाऱ्‍या इतरांनी आपल्याला “पाहावे” असे त्यांना वाटत असे. धार्मिकतेचा दिखावा करणारे हे लोक इतरांनी आपली प्रशंसा करावी म्हणून “ढोंगाने लांबलचक प्रार्थना” करायचे. (लूक २०:४७) आपली मनोवृत्ती मात्र अशी नसावी.

येशूने म्हटले की हे ढोंगी “आपले प्रतिफळ भरून पावले” आहेत. (मत्त. ६:५) इतरांनी आपली प्रशंसा करावी आणि आपल्याला मान द्यावा असे त्यांना मनापासून वाटायचे. आणि त्यांना एवढेच प्रतिफळ मिळणार होते, कारण ढोंगीपणाने केलेल्या त्यांच्या प्रार्थना यहोवा ऐकणार नव्हता. त्याउलट, देव ख्रिस्ताच्या खऱ्‍या अनुयायांची प्रार्थना ऐकतो. हे येशूच्या पुढील विधानावरून दिसते.

७. ‘आपल्या खोलीत जाऊन’ प्रार्थना करण्याच्या सल्ल्याचा काय अर्थ आहे?

“तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल.” (मत्त. ६:६) आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेऊन प्रार्थना कर या येशूने दिलेल्या सल्ल्याचा हा अर्थ होत नाही की मंडळीच्या वतीने कोणी प्रार्थना करू शकत नाही. तर, सर्वांच्या वतीने प्रार्थना करताना लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्याच्या किंवा त्यांची प्रशंसा मिळवण्याच्या उद्देशाने प्रार्थना करणे अयोग्य आहे हे दाखवण्यासाठी येशूने हा सल्ला दिला होता. म्हणून, देवाच्या लोकांच्या वतीने प्रार्थना करण्याची सुसंधी आपल्याला लाभते तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवू या. आणि प्रार्थनेच्या बाबतीत येशूने पुढे दिलेल्या सल्ल्याचेही आपण पालन करू या.

८. मत्तय ६:७ या वचनानुसार आपण प्रार्थना करताना कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

“तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते.” (मत्त. ६:७) येथे येशूने आणखी एका गोष्टीविषयी सांगितले जी प्रार्थना करताना टाळली पाहिजे. ती म्हणजे प्रार्थनेत पुन्हा पुन्हा तेच ते म्हणणे. पण, आपण कधीच आपल्या कळकळीच्या विनंत्या किंवा देवाची उपकारस्तुती प्रार्थनेत एकापेक्षा जास्त वेळा करू नये असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. त्याने स्वतः त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री गेथशेमाने येथील बागेत पुन्हा पुन्हा “तेच शब्द” उच्चारून प्रार्थना केली होती.—मार्क १४:३२-३९.

९, १०. कोणता चुकीचा विचार करून आपण आपल्या प्रार्थनेत पुन्हा पुन्हा तेच ते शब्द बोलू नये?

‘परराष्ट्रीयांसारखे’ तोंडपाठ केलेल्या प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणणे चुकीचे आहे. कारण ते केवळ “व्यर्थ बडबड करतात” म्हणजेच तोंडपाठ केलेले निरर्थक शब्द वारंवार उच्चारतात. बआल देवतेचे उपासक ‘सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत बआलाचे नाव घेत व हे बआला, आमचे ऐक, असे म्हणत राहिले’ पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. (१ राजे १८:२६) आजही लाखो लोक तोंडपाठ केलेल्या प्रार्थना वारंवार म्हणतात कारण असे केल्याने “आपले मागणे मान्य होईल” असे त्यांना वाटते. पण येशू आपल्याला याची जाणीव करून देतो की प्रार्थनेत ‘पुष्कळ बोलणे’ किंवा लांबलचक प्रार्थना करणे व तेच ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चारणे यहोवाच्या दृष्टीने व्यर्थ आहे. येशूच्या पुढील शब्दांवरून हे स्पष्ट होते.

१०“तुम्ही त्यांच्यासारिखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.” (मत्त. ६:८) अनेक यहुदी धार्मिक पुढारी, परराष्ट्रियांसारखे लांबलचक प्रार्थना करायचे. अर्थात, देवाला मनःपूर्वक प्रार्थना करणे हा खऱ्‍या उपासनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि आपण आपल्या प्रार्थनेत स्तुती, धन्यवाद आणि विनंती यांचा समावेश करू शकतो. (फिलिप्पै. ४:६) पण, वारंवार उल्लेख केल्याशिवाय देवाला आपल्या गरजा कशा कळतील, असा विचार करून प्रार्थनेत पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टींचा उल्लेख करणे चुकीचे आहे. कारण, ‘आपल्या गरजा काय आहेत हे आपला पिता, आपण त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.’ ही गोष्ट आपण कधीही विसरू नये.

११. इतरांच्या वतीने प्रार्थना करण्याची संधी मिळते तेव्हा आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

११ अनुचित प्रकारच्या प्रार्थनांबद्दल येशूने जे शिकवले त्यावरून आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टीची आठवण झाली पाहिजे की प्रार्थनेत मोठमोठे आणि अनावश्‍यक शब्द वापरून आपण देवाला प्रभावित करू शकत नाही. तसेच, प्रार्थनेतून लोकांना आपली बुद्धीमत्ता किंवा आपले भाषाज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करणेही चुकीचे आहे. आपली प्रार्थना ऐकताना ‘कधी एकदाचे आमेन म्हणता येईल’ असे लोकांना वाटू नये. तसेच, प्रार्थना करताना एखाद्या गोष्टीची घोषणा करणे किंवा उपस्थित लोकांना उपदेश करणे हे देखील डोंगरावरील प्रवचनात येशूने शिकवलेल्या गोष्टींशी सुसंगत ठरणार नाही.

प्रार्थना कशी करावी हे येशूने शिकवले

१२. “तुझे नाव पवित्र मानिले जावो” अशी विनंती करण्याचा काय अर्थ आहे?

१२ अनुचित प्रकारे प्रार्थना करून प्रार्थनेच्या विशेषाधिकाराचा अनादर न करण्याविषयी इशारा देण्यासोबतच, येशूने आपल्या शिष्यांना योग्य प्रकारे प्रार्थना कशी करावी हे देखील शिकवले. (मत्तय ६:९-१३ वाचा.) पण, येशूने शिकवलेली प्रार्थना तोंडपाठ करून पुन्हा पुन्हा म्हणण्यासाठी नव्हती. उलट, ही आदर्श प्रार्थना, आपल्या प्रार्थना कशा असाव्यात हे दाखवण्यासाठी दिलेला एक नमुना आहे. उदाहरणार्थ, येशूने आपल्या प्रार्थनेत देवाला पहिले स्थान दिले. त्याच्या प्रार्थनेचे सुरुवातीचे शब्द हे होते: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्त. ६:९) आपण यहोवाला ‘आमच्या पित्या’ म्हणणे योग्यच आहे कारण तो पृथ्वीच्या पलीकडे ‘स्वर्गात’ राहणारा आपला सृष्टिकर्ता आहे. (अनु. ३२:६; २ इति. ६:२१; प्रे. कृत्ये १७:२४, २८) आपण देवाला “आमच्या” पित्या म्हणून संबोधतो त्यावरून आपल्याला याची आठवण झाली पाहिजे की आपल्यासारखाच आपल्या बांधवांचाही देवासोबत जवळचा नातेसंबंध आहे. “तुझे नाव पवित्र मानिले जावो” असे म्हणताना आपण यहोवाला विनंती करत असतो की एदेन बागेत झालेल्या विद्रोहामुळे त्याच्या नावावर आलेला कलंक मिटवून त्याने आपल्या नावाचे पवित्रीकरण करावे. या प्रार्थनेचे उत्तर म्हणून यहोवा या पृथ्वीवरून सर्व प्रकारची दुष्टता नाहीशी करेल आणि अशा प्रकारे स्वतःस पवित्र म्हणून प्रगट करेल.—यहे. ३६:२३.

१३. (क) “तुझे राज्य येवो” ही विनंती कशा प्रकारे पूर्ण केली जाईल? (ख) पृथ्वीवर देवाची इच्छा कशा प्रकारे पूर्ण होईल?

१३“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्त. ६:१०) येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत त्याने ज्या ‘राज्याचा’ उल्लेख केला ते स्वर्गीय मशीही सरकार आहे. हे सरकार ख्रिस्ताद्वारे व त्याचे साथीदार असलेल्या पुनरुत्थित ‘पवित्र जनांद्वारे’ चालवले जाते. (दानी. ७:१३, १४, १८; यश. ९:६, ७) हे राज्य “येवो” अशी प्रार्थना करण्याद्वारे आपण पृथ्वीवर देवाच्या शासनाचा विरोध करणाऱ्‍यांविरुद्ध देवाच्या राज्याने कारवाई करावी अशी विनंती करतो. असे लवकरच घडून येईल आणि त्यानंतर पृथ्वीवर नीतीमत्त्व, शांती आणि सुखसमाधान असलेले नंदनवन स्थापन होईल. (स्तो. ७२:१-१५; दानी. २:४४; २ पेत्र ३:१३) यहोवाची इच्छा आज स्वर्गात पूर्ण होत आहे. तसेच, पृथ्वीवर देखील त्याची इच्छा पूर्ण व्हावी असे म्हणण्याद्वारे आपण अशी विनंती करतो की देवाने पृथ्वीबद्दलचे त्याचे उद्देश पूर्ण करावे आणि प्राचीन काळात त्याने जसा आपल्या विरोधकांचा नाश केला होता तसाच आताही करावा.स्तोत्र ८३:१, २, १३-१८ वाचा.

१४. “रोजची भाकर” देण्याची विनंती करणे का योग्य आहे?

१४“आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” (मत्त. ६:११; लूक ११:३) ही प्रार्थना करण्याद्वारे आपण ‘रोजचे’ म्हणजे आजच्यापुरते अन्‍न दे अशी देवाला विनंती करतो. यावरून हे दिसून येते की आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या यहोवाच्या सामर्थ्यावर आपल्याला पूर्ण भरवसा आहे. ही प्रार्थना आवश्‍यकतेपेक्षा जास्त वस्तूंची मागणी करण्यासाठी नाही. उलट, ही विनंती देवाने इस्राएली लोकांना ‘एकएका दिवसाला पुरेल इतका’ मान्‍ना जमा करण्याविषयी दिलेल्या आज्ञेची आपल्याला आठवण करून देते.—निर्ग. १६:४.

१५. “जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड” याचा काय अर्थ आहे?

१५ आदर्श प्रार्थनेतील यानंतरची विनंती आपल्याला आपल्या एका कर्तव्याची जाणीव करून देते. येशूने म्हटले: “जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.” (मत्त. ६:१२) ही “ऋणे” आपली ‘पापे’ आहेत हे लूकच्या शुभवर्तमानातून आपल्याला दिसते. (लूक ११:४) आपण जर आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्‍यांना क्षमा केली, तरच यहोवाकडून क्षमा मिळण्याची अपेक्षा आपण करू शकतो. (मत्तय ६:१४, १५ वाचा.) म्हणून, आपण मनमोकळेपणाने इतरांना क्षमा केली पाहीजे.—इफिस. ४:३२; कलस्सै. ३:१३.

१६. परीक्षेसंबंधी व वाइटापासून सोडवण्यासंबंधी असलेल्या विनंत्यांवरून आपल्याला काय समजते?

१६“आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाइटापासून सोडीव.” (मत्त. ६:१३) एकमेकांशी संबंध असलेल्या आदर्श प्रार्थनेतील या दोन विनंत्यांचा काय अर्थ आहे? एक गोष्ट तर नक्की: यहोवा देव कधीही पाप करण्याचा मोह आपल्यापुढे आणत नाही. (याकोब १:१३ वाचा.) वास्तविक ज्याला ‘वाईट’ म्हणण्यात आले आहे तो सैतानच खरा “परीक्षक” आहे. (मत्त. ४:३) पण बायबलमध्ये काही ठिकाणी, देवाने एखाद्या गोष्टीला परवानगी दिली असल्यास त्यानेच ती केली असे म्हटले आहे. (रूथ १:२०, २१; उप. ११:५) म्हणून, “आम्हास परीक्षेत आणू नको” असे म्हणण्याद्वारे, आपल्याला यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्याचा मोह होतो तेव्हा त्या मोहाला बळी न पडण्यास साहाय्य करण्याची आपण त्याला विनंती करतो. शेवटी “आम्हास वाइटापासून सोडीव” असे म्हणण्याद्वारे, सैतानाने आपल्याला अडखळवू नये अशी आपण यहोवाला विनंती करतो. आणि आपण हा भरवसा बाळगू शकतो की ‘देव आपल्या शक्‍तीपलीकडे आपली परीक्षा होऊ देणार नाही.’१ करिंथकर १०:१३ वाचा.

‘मागत राहा, शोधत राहा आणि ठोकत राहा’

१७, १८. ‘मागत राहा, शोधत राहा आणि ठोकत राहा’ याचा काय अर्थ होतो?

१७ प्रेषित पौलाने ख्रिस्ती बांधवांना असे आर्जवले: “प्रार्थनेत तत्पर राहा.” (रोम. १२:१२) येशूनेही अशाच प्रकारची एक आज्ञा दिली होती जेव्हा त्याने असे म्हटले: “मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोकत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल; कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल.” (मत्त. ७:७, ८, NW) देवाच्या इच्छेच्या सुसंगतेत असलेली कोणतीही गोष्ट ‘मागत राहणे’ योग्यच आहे. येशूप्रमाणेच, प्रेषित योहानाने असे लिहिले: “[देवासमोर] येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्‍यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.”—१ योहा. ५:१४.

१८ ‘मागत आणि शोधत’ राहण्याबद्दल येशूने दिलेल्या सल्ल्याचा हा अर्थ होतो की आपण कळकळीने प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थना करण्याचे आपण कधीही थांबवू नये. तसेच, देवाच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे मिळणारे आशीर्वाद, फायदे आणि प्रतिफळ यांचा उपभोग घेण्यासाठी आपण ‘ठोकत राहणे’ देखील आवश्‍यक आहे. पण यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल अशी आपण खातरी बाळगू शकतो का? जर आपण यहोवाला विश्‍वासू असलो, तर नक्कीच आपण अशी खातरी बाळगू शकतो. कारण ख्रिस्ताने म्हटले: “जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल.” यहोवाच्या सेवकांना आलेल्या कित्येक अनुभवांवरून हे सिद्ध होते की देव खरोखर ‘प्रार्थना ऐकणारा’ आहे.—स्तो. ६५:२.

१९, २०. मत्तय ७:९-११ मध्ये नमूद असलेल्या येशूच्या शब्दांवरून यहोवा एका प्रेमळ पित्यासारखा आहे असे का म्हणता येईल?

१९ येशूने देवाची तुलना आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या वस्तू देणाऱ्‍या एका मायाळू पित्याशी केली. डोंगरावरील प्रवचनाच्या वेळी तुम्ही तेथे होता आणि येशूचे पुढील शब्द तुम्ही ऐकले अशी कल्पना करा: “आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल. आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?”मत्त. ७:९-११.

२० आदामाकडून मिळालेल्या पापामुळे एक मानवी पिता “वाईट” असतानाही त्याचे आपल्या मुलांवर प्रेम असणे स्वाभाविक आहे. तो कधीही आपल्या मुलांना फसवत नाही, तर त्यांना “चांगल्या देणग्या” देण्याचा प्रयत्न करतो. तशाच प्रकारे, एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपला स्वर्गीय पिता आपल्याला चांगल्या गोष्टी देतो, उदाहरणार्थ त्याचा पवित्र आत्मा. (लूक ११:१३) हा पवित्र आत्मा आपल्याला “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्‍या यहोवा देवाची, त्याला संतोष वाटेल अशा पद्धतीने उपासना करण्यास बळ देऊ शकतो.—याको. १:१७.

येशूच्या शिकवणींचा फायदा घेत राहा

२१, २२. डोंगरावरील प्रवचन उल्लेखनीय का आहे आणि त्यातील येशूच्या शिकवणींबद्दल तुम्हाला कसे वाटते?

२१ डोंगरावरील प्रवचन हे आजवर देण्यात आलेले सर्वोत्तम प्रवचन आहे. त्यातील आध्यात्मिक गोष्टी व सुस्पष्ट शिकवण यांमुळे हे प्रवचन उल्लेखनीय आहे. या लेखमालिकेत दाखवल्यानुसार, या प्रवचनातील सल्ला लागू केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. येशूच्या या शिकवणींमुळे आज आपले जीवन सुधारू शकते व एका सुखी भविष्याची आशा आपल्याला प्राप्त होऊ शकते.

२२ या लेखमालिकेत, येशूने दिलेल्या डोंगरावरील प्रवचनातील केवळ काही मौल्यवान आध्यात्मिक शिकवणींचे आपण परीक्षण केले आहे. ज्यांनी येशूचे प्रवचन ऐकले होते ते “त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले” यात आश्‍चर्य ते काय! (मत्त. ७:२८) थोर शिक्षक, येशू ख्रिस्त याने दिलेल्या या व इतर मौल्यवान शिकवणींवर आपण मनन करत राहिल्यास आपलीही त्यांच्यासारखीच प्रतिक्रिया असेल यात शंका नाही.

तुमची उत्तरे काय असतील?

• ढोंगीपणाने केलेल्या प्रार्थनांबद्दल येशूने काय म्हटले?

• प्रार्थना करताना आपण वारंवार तेच ते शब्द का बोलू नये?

• येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

• आपण कशा प्रकारे ‘मागत, शोधत आणि ठोकत’ राहू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

लोकांनी आपल्याला पाहावे, आपले ऐकावे या हेतूने प्रार्थना करणाऱ्‍या ढोंगी लोकांची येशूने निंदा केली

[१७ पानांवरील चित्र]

आपल्या रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करणे योग्य का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?