व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या शिकवणींचा तुमच्या मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या

येशूच्या शिकवणींचा तुमच्या मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या

येशूच्या शिकवणींचा तुमच्या मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या

“ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो.”—योहा. ३:३४.

१, २. डोंगरावरील प्रवचनातील येशूच्या शब्दांची तुलना कशाशी केली जाऊ शकते आणि हे प्रवचन ‘देवाच्या वचनांवर’ आधारित होते असे का म्हणता येईल?

स्टार ऑफ आफ्रिका हा ५३० कॅरट वजनाचा हिरा जगातल्या सर्वात मोठ्या हिऱ्‍यांपैकी एक आहे. हा हिरा अतिशय मौल्यवान आहे यात शंकाच नाही. पण, येशूने डोंगरावरील प्रवचनात ज्या निरनिराळ्या गोष्टी शिकवल्या त्या कोणत्याही रत्नापेक्षा जास्त मौल्यवान आहेत असे म्हणता येईल. आणि यात आश्‍चर्य ते काय, कारण ख्रिस्ताच्या शिकवणींचा स्रोत स्वतः यहोवा देव आहे! बायबलमध्ये येशूविषयी असे म्हटले आहे: “ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचने बोलतो.”—योहा. ३:३४-३६.

डोंगरावरील प्रवचन देण्यास येशूला कदाचित अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ लागला असेल. पण, या प्रवचनात इब्री शास्त्रवचनांतील आठ पुस्तकांतून घेतलेली २१ उद्धरणे आढळतात. त्याअर्थी, येशूने ज्या गोष्टी शिकवल्या त्यांना ‘देवाच्या वचनांचा’ भक्कम आधार होता असे आपण म्हणू शकतो. तर मग, देवाच्या प्रिय पुत्राच्या त्या प्रभावशाली प्रवचनातील काही मौल्यवान शिकवणी आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात कशा प्रकारे उपयोगात आणू शकतो हे आता आपण पाहू या.

“प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर”

३. दीर्घकाळ मनात राग बाळगण्याच्या दुष्परिणामांविषयी आपल्या शिष्यांना इशारा दिल्यानंतर येशूने कोणता सल्ला दिला?

खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्या जीवनावर देवाच्या पवित्र आत्म्याचा प्रभाव असल्यामुळे आपले जीवन आनंदी व शांतीपूर्ण आहे. कारण, आनंद व शांती हे गुण पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळात समाविष्ट आहेत. (गलती. ५:२२, २३) आपल्या शिष्यांना त्यांची मनःशांती व आनंद गमवावा लागू नये अशी येशूची इच्छा होती. म्हणूनच, त्याने त्यांना दीर्घकाळ मनात राग बाळगल्याने होणाऱ्‍या घातक दुष्परिणामांविषयी इशारा दिला. (मत्तय ५:२१, २२ वाचा.) त्यानंतर त्याने म्हटले: “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”मत्त. ५:२३, २४.

४, ५. (क) मत्तय ५:२३, २४ यातील येशूच्या विधानात उल्लेख केलेले “दान” काय होते? (ख) दुखावलेल्या बांधवाशी समेट करणे किती महत्त्वाचे आहे?

येशूने येथे ज्या ‘दानाचा’ उल्लेख केला ते जेरूसलेमच्या मंदिरात अर्पण केले जाणारे कोणतेही बलिदान असू शकत होते. त्याकाळी, यहोवाच्या लोकांच्या उपासनेत पशूंच्या बलिदानांना बरेच महत्त्व होते. पण, येशूने या बलिदानांपेक्षाही जास्त महत्त्वाच्या एका गोष्टीवर भर दिला. ती कोणती? देवाला दान अर्पण करण्याआधी दुखावलेल्या बांधवाशी समेट करणे.

तर मग, येशूच्या या शब्दांवरून आपण कोणता धडा घेऊ शकतो? आपण इतरांशी कशा प्रकारे वागतो याचा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर थेट परिणाम होतो हे आपल्याला येशूच्या शब्दांवरून कळते. (१ योहा. ४:२०) खरोखर, प्राचीन काळात देवाला बलिदान अर्पण करणारा जर इतरांशी चांगल्या प्रकारे वागत नसला, तर त्याच्या बलिदानाला काहीही अर्थ नव्हता.मीखा ६:६-८ वाचा.

आपण नम्र असले पाहिजे

६, ७. आपल्यामुळे दुखावलेल्या बांधवासोबत समेट करण्याचा प्रयत्न करताना नम्र असणे का महत्त्वाचे आहे?

दुखावलेल्या बांधवाशी समेट करणे ही आपल्या नम्रतेची परीक्षा ठरू शकते. नम्र व्यक्‍ती आपले हक्क सिद्ध करण्यासाठी वाद घालत नाही किंवा भांडत नाही. अशा प्रकारच्या भांडणतंट्यांमुळे बांधवांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते व हे कोणाच्याच हिताचे नसते. करिंथ येथील ख्रिस्ती बांधवांमध्ये एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रेषित पौलाने त्या बांधवांना विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी असे लिहिले: “तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्‍यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करित नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?”—१ करिंथ. ६:७.

पण, आपले बरोबर होते आणि त्या बांधवाचेच चुकले होते हे सिद्ध करण्यासाठी आपण त्याच्याकडे जावे असे येशूने म्हटले नाही. तर बिघडलेले संबंध पूर्ववत व्हावेत या उद्देशाने आपण त्याच्याकडे गेले पाहिजे. समेट करण्यासाठी आपण आपल्या मनात जे काही आहे ते प्रामाणिकपणे बोलून दाखवले पाहिजे. तसेच त्या व्यक्‍तीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे देखील आपण कबूल केले पाहिजे. आणि जर आपले काही चुकले असेल, तर नक्कीच आपण नम्रपणे त्याबद्दल माफी मागितली पाहिजे.

“तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर”

८. मत्तय ५:२९, ३० यातील येशूच्या शब्दांचा सारांश सांगा.

डोंगरावरील प्रवचनात येशूने नैतिकतेशी संबंधित विषयांवर ठोस सल्ला दिला. आपल्या अपरिपूर्ण शरीराचे अवयव आपल्याला पाप करायला लावू शकतात आणि याचे घातक परिणाम होऊ शकतात हे त्याला माहीत होते. म्हणूनच येशूने म्हटले: “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात [“गेहेन्‍नात,” NW] टाकले जावे ह्‍यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात [“गेहेन्‍नात,” NW] पडावे, ह्‍यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.”मत्त. ५:२९, ३०.

९. आपला “डोळा” किंवा “हात” कशा प्रकारे आपल्याला ‘पापास प्रवृत्त’ करू शकतो?

याठिकाणी येशूने ‘डोळ्याचा’ उल्लेख केला, तो एखाद्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला सूचित करतो. तर “हात” हा शब्द आपण हातांनी जे काही करतो त्याच्या संदर्भात वापरला आहे. खबरदारी न बाळगल्यास आपल्या शरीराचे हे अवयव आपल्याला ‘पाप करण्यास’ व ‘देवाबरोबर चालण्याचे’ सोडून देण्यास प्रवृत्त करू शकतात. (उत्प. ५:२२; ६:९) म्हणूनच, यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्याचा मोह होतो, तेव्हा आपण डोळा उपटून टाकणे किंवा हात तोडून टाकणे यांसारखे निर्णायक पाऊल उचलण्याची गरज आहे.

१०, ११. लैंगिक अनैतिकतेचे कृत्य आपण कसे टाळू शकतो?

१० आपल्या डोळ्यांनी अनैतिक गोष्टींवर लक्ष लावू नये म्हणून आपण त्यांच्यावर नियंत्रण कसे करू शकतो? ईयोब या देवभीरू मनुष्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयो. ३१:१) ईयोब हा एक विवाहित पुरुष होता आणि नैतिकतेसंबंधी देवाच्या नियमांचे उल्लंघन न करण्याचा त्याने आपल्या मनाशी निश्‍चय केला होता. आपण विवाहित असो वा अविवाहित, आपलीही ईयोबासारखीच मनोवृत्ती असली पाहिजे. आपल्या हातून अनैतिक कृत्य घडू नये म्हणून आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालले पाहिजे. कारण देवावर प्रेम करणाऱ्‍यांमध्ये हा आत्मा संयम उत्पन्‍न करतो.—गलती. ५:२२-२५.

११ लैंगिक अनैतिकतेचे कृत्य आपल्या हातून घडू नये म्हणून आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘पुस्तके, मासिके, टीव्ही कार्यक्रम किंवा इंटरनेट यांवर सहज उपलब्ध असलेल्या अश्‍लील साहित्याबद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण करण्यास मी माझ्या डोळ्यांना संधी देतो का?’ तसेच, शिष्य याकोबाचे हे शब्दही आपण नेहमी आठवणीत ठेवू या: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” (याको. १:१४, १५) खरे पाहता, देवाला समर्पित असलेली कोणतीही व्यक्‍ती जर अनैतिक हेतूने एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीकडे ‘पाहत’ असेल तर तिने आपला डोळा उपटून तो टाकून देण्याशी तुलना करता येईल असे निर्णायक पाऊल उचलले पाहिजे.मत्तय ५:२७, २८ वाचा.

१२. पौलाचा कोणता सल्ला आपल्याला अनैतिक वासनांवर नियंत्रण करण्यास मदत करू शकतो?

१२ आपल्या हातांचा अयोग्य वापर केल्यास आपल्याकडून यहोवाच्या नैतिक स्तरांचे उल्लंघन होईल असे एखादे गंभीर पाप घडू शकते. याची जाणीव बाळगून आपण नैतिक रीत्या शुद्ध राहण्याचा दृढनिश्‍चय केला पाहिजे. याकरता, पौलाच्या या सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.” (कलस्सै. ३:५) येथे “जिवे मारा” असे म्हणण्याद्वारे, अनैतिक वासनांवर नियंत्रण करण्यासाठी कठोर पावले उचलणे किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्यात आला आहे.

१३, १४. अनैतिक विचारांपासून व कृत्यांपासून दूर राहणे महत्त्वाचे का आहे?

१३ हात किंवा पाय कापून टाकल्यास जीव वाचणार असेल तर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करवून घ्यायला बहुतेक जण तयार होतील. तसेच, यहोवासोबतचा आपला चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी लाक्षणिक अर्थाने डोळा उपटून टाकणे किंवा हात तोडून टाकणे महत्त्वाचे आहे. मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक रीत्या स्वतःला शुद्ध ठेवणे हाच गेहेन्‍नाद्वारे चित्रित होणाऱ्‍या सार्वकालिक नाशातून बचावण्याचा एकमात्र मार्ग आहे.

१४ उपजतच आपल्यामध्ये असलेल्या पापामुळे व अपरिपूर्णतेमुळे नैतिक रीत्या स्वतःला शुद्ध ठेवणे सोपे नाही, त्याकरता प्रयत्न करावे लागतात. पौलाने म्हटले, “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यास घोषणा केल्यावर कदाचित्‌ मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (१ करिंथ. ९:२७) तेव्हा, आपणही नैतिकतेविषयी येशूच्या सल्ल्याचे पालन करण्याचा दृढनिश्‍चय करू या आणि त्याच्या खंडणी बलिदानाची आपल्याला कदर नसल्याचे ज्यावरून दिसेल असे कोणतेही कृत्य न करण्याची खबरदारी घेऊ या.—मत्त. २०:२८; इब्री ६:४-६.

“द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल”

१५, १६. (क) उदारतेच्या बाबतीत येशूने कशा प्रकारे आपल्याकरता उदाहरण मांडले? (ख) लूक ६:३८ यातील येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

१५ येशूच्या शिकवणी तसेच त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरणही आपल्याला उदार असण्यास प्रेरित करते. अपरिपूर्ण मानवांच्या हिताकरता पृथ्वीवर येऊन त्याने फार मोठी उदारता दाखवली. (२ करिंथकर ८:९ वाचा.) त्याने स्वर्गातील आपल्या गौरवी स्थानाचा स्वेच्छेने त्याग केला व मानव बनून पापी मानवजातीसाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. अशा रीतीने त्याने मानवांपैकी काही जणांना स्वर्गात त्याच्या राज्याचे सह वारस या नात्याने धनवान बनण्याची संधी खुली केली. (रोम. ८:१६, १७) येशूच्या पुढील शब्दांवरून त्याने उदार मनोवृत्तीला प्रोत्साहन दिले हे स्पष्टपणे दिसून येते:

१६“द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” (लूक ६:३८) “पदरी घालतील” असे येशूने त्याकाळच्या एका रूढ पद्धतीचा संदर्भ घेऊन म्हटले. त्याकाळी लोक आतल्या झग्यावर एक ढगळ अंगरखा घालायचे. कमरेला पट्टा बांधल्यामुळे, अंगरख्याच्या वरच्या भागाची झोळी करून त्यात सामान ठेवता यायचे. काही दुकानदार विकत घेतलेली वस्तू ग्राहकाच्या पदरात म्हणजेच त्याच्या अंगरख्याच्या या झोळीत घालत. आपण आपखुषीने उदारता दाखवतो तेव्हा आपल्यालाही, कदाचित आपल्या गरजेच्या वेळी उदारतेने त्याचे प्रतिफळ मिळेल.—उप. ११:२.

१७. उदारतेने देण्याच्या बाबतीत यहोवाने सर्वोत्तम उदाहरण मांडले असे का म्हणता येईल आणि कशामुळे आपल्याला भरपूर आनंद मिळू शकतो?

१७ जे आनंदाने देतात ते यहोवाला प्रिय आहेत आणि तो त्यांना आशीर्वाद देतो. याबाबतीत त्याचे उदाहरण सर्वोत्तम म्हणता येईल. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला “अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) पौलाने लिहिले: “जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथ. ९:६, ७) खऱ्‍या उपासनेच्या वाढीकरता आपण आपला वेळ, शक्‍ती व साधनसंपत्ती खर्च करतो तेव्हा आपल्याला भरपूर आनंद व विपुल आशीर्वाद मिळतील यात शंका नाही.नीतिसूत्रे १९:१७; लूक १६:९ वाचा.

‘आपणापुढे शिंग वाजवू नको’

१८. कोणत्या परिस्थितीत आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही?

१८“माणसांनी पाहावे ह्‍या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केले तर तुमच्या स्वर्गांतील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही.” (मत्त. ६:१) येथे येशूने “धर्माचरण” हा शब्द देवाच्या इच्छेनुसार वागणे या अर्थाने वापरला. देवाला संतोषविणारी कृत्ये कधीच सर्वांसमोर केली जाऊ नयेत असे त्याच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. त्याने तर स्वतःच आपल्या शिष्यांना, ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’ असे सांगितले होते. (मत्त. ५:१४-१६) तेव्हा, येशू असे सांगू इच्छित होता, की जर आपण रंगमंचावरील नटनट्यांप्रमाणे लोकांची प्रशंसा मिळवण्याच्या हेतूने किंवा सर्वांनी आपल्याला “पाहावे ह्‍या हेतूने” देवाची सेवा केली, तर आपल्या स्वर्गीय पित्याकडून आपल्याला प्रतिफळ मिळणार नाही. जर आपण असे हेतू मनात बाळगून कार्य करत असू तर देवासोबत आपला घनिष्ठ नातेसंबंध राहणार नाही. तसेच, देवाच्या राज्यातील सार्वकालिक आशीर्वादही आपल्याला मिळणार नाहीत.

१९, २०. (क) “दानधर्म” करताना ‘शिंग वाजवू नको’ असे म्हणताना येशूचा काय अर्थ होता? (ख) उजवा हात काय करतो हे आपण डाव्या हाताला कसे कळू देत नाही?

१९ जर आपली योग्य मनोवृत्ती असेल तर आपण येशूच्या या सल्ल्याचे पालन करू: “ह्‍यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करितोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.” (मत्त. ६:२) गरजवंतांना मदत करण्यासाठी त्याकाळीही “दानधर्म” केले जायचे. (यशया ५८:६, ७ वाचा.) उदाहरणार्थ, येशू व त्याच्या प्रेषितांजवळ गरिबांना मदत करण्यासाठी एक निधी होता. (योहा. १२:५-८; १३:२९) पण, गरिबांना दान देताना कोणीही खरोखरच शिंग वाजवत नसे. त्यामुळे, “दानधर्म” करताना ‘शिंग वाजवू नको’ असे येशूने म्हटले तेव्हा त्याने मुद्दामहून अतिशयोक्‍ती केली होती. यहुदी परुश्‍यांप्रमाणे आपण आपल्या दानशूरपणाचा डांगोरा पिटू नये असे येशूला सांगायचे होते. त्या परुशांना येशूने ढोंगी म्हटले कारण ते “सभास्थानात व रस्त्यात” आपल्या दानधर्माची जाहिरात करत. येशूने म्हटले की ते ढोंगी लोक “आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.” लोकांची वाहवा आणि कदाचित सभास्थानात पहिल्या ओळीत नामवंत रब्बींच्या शेजारचे आसन एवढेच प्रतिफळ त्यांना मिळणार होते. यहोवाकडून मात्र त्यांना कोणतेही प्रतिफळ मिळणार नव्हते. (मत्त. २३:६) पण, ख्रिस्ताच्या शिष्यांनी याबाबतीत कशा प्रकारे वागायचे होते? येशूने त्यांना—आणि आपल्यालाही असे सांगितले:

२०“तू तर दानधर्म करितोस तेव्हा तुझा उजवा हात काय करितो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल.” (मत्त. ६:३, ४) सहसा आपले दोन्ही हात एकसाथ काम करतात. त्यामुळे उजवा हात काय करतो हे डाव्या हाताला कळू नये याचा अर्थ असा होतो, की जे आपल्या अगदी जवळचे आहेत त्यांच्यापुढेही आपण आपल्या दानधर्माचा दिखावा करू नये.

२१. “गुप्तदर्शी” पित्याकडून मिळणाऱ्‍या प्रतिफळात कशाचा समावेश आहे?

२१ आपण आपल्या दानशूरपणाचा डांगोरा न पिटल्यास, आपले “दानधर्म” गुप्त राहील. आणि मग, आपला “गुप्तदर्शी” पिता आपल्याला त्याचे प्रतिफळ देईल. आपला पिता स्वर्गात राहत असल्यामुळे व तो अदृश्‍य असल्यामुळे मानवांच्या दृष्टीने तो ‘गुप्तच’ राहतो. (योहा. १:१८) “गुप्तदर्शी” पित्याकडून प्रतिफळ मिळण्याचा काय अर्थ होतो? या प्रतिफळात यहोवासोबतचा जवळचा नातेसंबंध, आपल्या पापांची क्षमा व सार्वकालिक जीवनाच्या आशीर्वादाचा समावेश होतो. (नीति. ३:३२; योहा. १७:३; इफिस. १:७) मानवांची वाहवा मिळवण्यापेक्षा हे कैक पटीने उत्तम प्रतिफळ आहे!

मनाशी कवटाळून ठेवण्याजोग्या मौल्यवान शिकवणी

२२, २३. येशूच्या शिकवणी आपण मनाशी का कवटाळून ठेवाव्यात?

२२ खरोखर, डोंगरावरील प्रवचनात अनेक सुंदर पैलू असलेली असंख्य रत्ने आहेत. त्यातील मौल्यवान वचनांतून आपल्याला या त्रस्त जगातही आनंद मिळू शकतो यात शंका नाही. येशूच्या या शिकवणी आपण मनाशी कवटाळून ठेवल्या व त्यांना आपल्या मनोवृत्तीवर तसेच आपल्या सर्व व्यवहारांवर प्रभाव पाडू दिला तर आपण निश्‍चितच आनंदी होऊ.

२३ जो येशूच्या शिकवणी “ऐकून त्याप्रमाणे वागतो” त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. (मत्तय ७:२४, २५ वाचा.) तेव्हा, येशूच्या सल्ल्याचे पालन करण्याचा आपण संकल्प करू या. डोंगरावरील प्रवचनातील येशूच्या आणखी काही शिकवणींविषयी या मालिकेतील शेवटल्या लेखात चर्चा केली जाईल.

तुमचे उत्तर काय?

• दुखावलेल्या बांधवाशी समेट करणे महत्त्वाचे का आहे?

• आपल्या ‘उजव्या डोळ्याने’ आपल्याला पाप करण्यास प्रवृत्त करू नये म्हणून आपण काय केले पाहिजे?

• दान देण्याच्या बाबतीत आपली कशी मनोवृत्ती असावी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

‘समेट करणे’ खरोखर किती उत्तम आहे!

[१२, १३ पानांवरील चित्रे]

आनंदाने देणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो