व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या शिकवणी आपल्याला आनंदी राहण्यास मदत करतात

येशूच्या शिकवणी आपल्याला आनंदी राहण्यास मदत करतात

येशूच्या शिकवणी आपल्याला आनंदी राहण्यास मदत करतात

“[येशू] डोंगरावर चढला, व . . . त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.”—मत्त. ५:१, २.

१, २. (क) कोणत्या परिस्थितीत येशूने डोंगरावरील प्रवचन दिले होते? (ख) येशूने आपल्या प्रवचनाची सुरुवात कशी केली?

वर्ष आहे सा.यु. ३१. येशू आपले गालीलमधील प्रचार कार्य मध्येच थांबवून वल्हांडण साजरा करण्यासाठी जेरूसलेमला जातो. (योहा. ५:१) गालीलला परत आल्यावर, १२ प्रेषितांना निवडण्याअगोदर तो मार्गदर्शनासाठी सबंध रात्रभर देवाला प्रार्थना करतो. येशू रोग्यांना बरे करतो हे ऐकून दुसऱ्‍या दिवशी एक मोठा लोकसमुदाय तेथे जमतो. तेव्हा, येशू आपल्या अनुयायांच्या व इतरांच्यासोबत एका डोंगरावर जाऊन बसतो आणि त्यांना शिकवण्यास सुरुवात करतो.—मत्त. ४:२३–५:२; लूक ६:१२-१९.

येशूने आपल्या डोंगरावरील प्रवचनाच्या सुरुवातीला हे स्पष्ट केले, की देवासोबत चांगला नातेसंबंध असल्यामुळेच मनुष्य जीवनात आनंदी होऊ शकतो. (मत्तय ५:१-१२ वाचा.) * आनंद ही मनाची व शरीराची सुस्थिती दर्शवणारी भावना आहे. यात संतुष्टीपासून तीव्र उल्हासापर्यंतच्या अनेक भावनांचा समावेश होतो. खरे ख्रिस्ती का आनंदी आहेत याची नऊ कारणे येशूने स्पष्ट केली. येशूने सांगितलेल्या या नऊ गोष्टी जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी होत्या तितक्याच आजही प्रभावशाली आहेत. आता आपण एकेक करून त्यांची चर्चा करू या.

“आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले”

३. आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असण्याचा काय अर्थ होतो?

“आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले आनंदी आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्त. ५:३, NW) ज्यांना ‘आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असते’ ते ओळखतात की आध्यात्मिक दृष्ट्या आपण दीनदुबळे आहोत आणि त्यामुळे आपल्याला देवाच्या दयेची गरज आहे.

४, ५. (क) आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले आनंदी का आहेत? (ख) आपल्या आध्यात्मिक गरजा कशा प्रकारे पूर्ण होऊ शकतात?

आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले आनंदी आहेत, “कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” येशूला मशीहा म्हणून स्वीकारल्यामुळे, पहिल्या शतकातील त्याच्या अनुयायांना त्याच्यासोबत देवाच्या स्वर्गीय राज्यात शासन करण्याची संधी प्राप्त झाली. (लूक २२:२८-३०) आज आपल्यापैकी काही जणांची स्वर्गात जाऊन ख्रिस्तासोबत राज्य करण्याची, तर काही जणांची देवाच्या राज्यात पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन जगण्याची आशा आहे. आपली आशा यांपैकी कोणतीही असली, तरी आध्यात्मिक गरजांची खरोखर जाणीव बाळगल्यास आणि देवाच्या दयेची आपल्याला गरज आहे हे नेहमी आठवणीत ठेवल्यास आपण आनंदी होऊ शकतो.

सर्वांनाच आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव नसते. बऱ्‍याच जणांचा विश्‍वास कमकुवत असतो आणि देवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या पवित्र गोष्टींची त्यांना कदर नसते. (२ थेस्सलनी. ३:१, २; इब्री १२:१५, १६) आपल्या आध्यात्मिक गरजा कशा प्रकारे पूर्ण होऊ शकतात? यासाठी आपण बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला पाहिजे, शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने भाग घेतला पाहिजे आणि ख्रिस्ती सभांमध्ये नियमितपणे उपस्थित राहिले पाहिजे.—मत्त. २८:१९, २०; इब्री १०:२३-२५.

शोक करत असूनही आनंदी

६. ‘शोक करणारे’ कोण आहेत आणि ते “आनंदी” का आहेत?

“जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.” (मत्त. ५:४) हे ‘शोक करणारे’ ‘आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेल्या’ लोकांसारखेच आहेत. आपल्या जीवनातील परिस्थितीबद्दल तक्रार असल्यामुळे ते शोक करत नाहीत. तर, स्वतःची पापपूर्ण अवस्था आणि मानवी अपरिपूर्णतेमुळे निर्माण झालेल्या दुःखद परिस्थितीमुळे ते शोक करत आहेत. हे शोक करणारे “आनंदी” आहेत असे का म्हणता येईल? कारण देवावर व ख्रिस्तावर त्यांचा विश्‍वास आहे आणि यहोवासोबत असलेल्या चांगल्या नातेसंबंधामुळे त्यांना सांत्वन प्राप्त होते.—योहा. ३:३६.

७. सैतानाच्या जगाबद्दल आपला कसा दृष्टिकोन असावा?

आपल्यापैकी प्रत्येकाविषयी काय? सैतानाच्या जगात सर्वत्र पसरलेल्या अनीतीमुळे आपण शोक करतो का? या जगात उपलब्ध असलेल्या गोष्टींबद्दल मनोमनी आपल्याला कसे वाटते? प्रेषित योहानाने लिहिले: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत.” (१ योहा. २:१६) पण, ‘जगाच्या आत्म्यामुळे’—देवापासून दुरावलेल्या मानव समाजाच्या आचारविचारांवर नियंत्रण करणाऱ्‍या प्रेरक शक्‍तीमुळे—आपल्या उपासनेवर हळूहळू परिणाम होत असल्याचे आपल्याला जाणवले तर आपण काय करावे? आपण कळकळीने देवाला प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि मंडळीतील वडिलांची मदत घेतली पाहिजे. आपण कोणत्याही गोष्टीमुळे निराश किंवा दुःखी असलो, तरीही जसजसे आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ, तसतसे आपल्याला “समाधान” प्राप्त होईल.—१ करिंथ. २:१२; स्तो. ११९:५२; याको. ५:१४, १५.

“सौम्य” ते आनंदी आहेत

८, ९. सौम्यता म्हणजे काय आणि सौम्य असलेले आनंदी का आहेत?

“जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्त. ५:५) “सौम्यता” हे दुबळेपणाचे लक्षण नाही. तसेच, सौम्यता म्हणजे सौजन्यशीलतेचा दिखावा करणे देखील नाही. (१ तीम. ६:११) तर, सौम्यता म्हणजे नम्रपणे यहोवाच्या इच्छेप्रमाणे करणे आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करणे. आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांशी आणि इतरांशी कशा प्रकारे वागतो यावरूनही आपण सौम्य आहोत किंवा नाही हे दिसून येईल. अशा प्रकारची सौम्यता दाखवून आपण पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करतो.रोमकर १२:१७-१९ वाचा.

सौम्य असलेले लोक आनंदी आहेत असे का म्हटले आहे? कारण “ते पृथ्वीचे वतन भोगतील” असे येशूने म्हटले. स्वतः सौम्य असलेला येशू, पृथ्वीचे वतन पावणाऱ्‍यांपैकी सर्वात प्रमुख आहे. (स्तो. २:८; मत्त. ११:२९; इब्री २:८, ९) पण, त्याच्याव्यतिरिक्‍त “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” असणारे देखील पृथ्वीचे वतन पावतील. (रोम. ८:१६, १७) तसेच, येशूच्या राज्यात पृथ्वीवर असंख्य नम्र जन सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेतील.—स्तो. ३७:१०, ११.

१०. आपण सौम्य नसल्यास मंडळीतील आपल्या विशेषाधिकारांवर आणि इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होऊ शकतो?

१० येशूप्रमाणे आपणही सौम्य असले पाहिजे. पण, आपला स्वभाव भांडखोर आहे असे जर लोक आपल्याविषयी म्हणत असतील तर काय? अशा कुरापत काढण्याच्या किंवा वाद घालण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक आपल्याला टाळू लागतील. आपण जर मंडळीत जबाबदारीच्या पदाची इच्छा बाळगणारे बांधव असू तर आपल्या भांडखोर प्रवृत्तीमुळे आपण या विशेषाधिकारासाठी अयोग्य ठरू. (१ तीम. ३:१, ३) पौलाने तीताला क्रीट येथील ख्रिश्‍चनांना वारंवार आठवण करून देण्यास सांगितले की त्यांनी “भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे.” (तीत ३:१, २) आपण अशा प्रकारची सौम्यता दाखवतो तेव्हा इतरांना किती आशीर्वाद मिळतात!

“नीतिमत्त्वाचे” भुकेले

११-१३. (क) नीतिमत्त्वासाठी भुकेले व तान्हेले असण्याचा काय अर्थ होतो? (ख) नीतिमत्त्वासाठी भुकेले व तान्हेले असलेले कशा प्रकारे “तृप्त” होतात?

११“जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.” (मत्त. ५:६) येशूने ‘नीतिमत्त्व’ असे म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की देवाची इच्छा व त्याच्या आज्ञा यांनुसार जे योग्य आहे ते करणे. देवाच्या नीतिमान निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे “माझा जीव कासावीस झाला आहे” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले. (स्तो. ११९:२०) देवाचे ‘नीतिमत्त्व’ आपल्यासाठी इतके मौल्यवान आहे का की आपण त्याच्यासाठी भुकेले व तान्हेले आहोत असे म्हणता येईल?

१२ येशूने म्हटले होते की जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले आहेत ते आनंदी असतील कारण ते “तृप्त होतील.” हे सा.यु. ३३ नंतर शक्य झाले. कारण, तेव्हापासून यहोवाच्या पवित्र आत्म्याने ‘नीतिमत्त्वाविषयी जगाची खातरी करायला’ सुरुवात केली. (योहा. १६:८) आपल्या पवित्र आत्म्याद्वारे देवाने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे लिखाण करण्यास मनुष्यांना प्रेरित केले. ही शास्त्रवचने “सुधारणूक, नीतिशिक्षण” यांकरता अति उपयोगी आहेत. (२ तीम. ३:१६) “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करण्यासाठी देखील देवाचा आत्मा आपल्याला साहाय्य करतो. (इफिस. ४:२४) येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाच्या आधारावर जे लोक पश्‍चात्ताप करण्याद्वारे आपल्या पापांची क्षमा मागतात, ते देवासमोर नीतिमान ठरू शकतात हे खरोखरच सांत्वनदायक नाही का?रोमकर ३:२३, २४ वाचा.

१३ जर आपली पृथ्वीवरील जीवनाची आशा असेल, तर नंदनवनातील नीतिमान परिस्थितीत आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगण्यास मिळेल तेव्हा नीतिमत्त्वासाठी असलेली आपली भूक व तहान पूर्णपणे तृप्त केली जाईल. पण तोपर्यंत, यहोवाच्या स्तरांनुसार जगण्याचा आपण निर्धार करू या. येशूने म्हटले: “पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” (मत्त. ६:३३) असे केल्यामुळे देवाच्या सेवेत करण्यासाठी आपल्याजवळ भरपूर काम असेल आणि आपले मन आनंदाने प्रफुल्लित होईल.—१ करिंथ. १५:५८.

“जे दयाळू” ते आनंदी का आहेत?

१४, १५. आपण कशा प्रकारे दया दाखवू शकतो आणि “दयाळू” लोक आनंदी का आहेत?

१४“जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.” (मत्त. ५:७) जे “दयाळू” असतात त्यांना इतरांबद्दल सहानुभूती व करुणा असल्यामुळे ते त्यांना साहाय्य करण्यास प्रेरित होतात. येशूनेही दयेनेच प्रेरित होऊन पुष्कळ लोकांचे आजार चमत्कारिक रीत्या बरे केले. (मत्त. १४:१४) न्यायिक गोष्टींच्या संदर्भात बोलताना, आपल्याविरुद्ध केलेल्या अपराधाची क्षमा करण्याद्वारे दया दाखवली जाऊ शकते. यहोवा देखील पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना दयाळूपणे क्षमा करतो. (निर्ग. ३४:६, ७; स्तो. १०३:१०) त्याच प्रमाणे आपणही इतरांचे अपराध क्षमा करण्याद्वारे, तसेच गरजू व्यक्‍तींना आपल्या शब्दांनी व कार्यांनी साहाय्य पुरवण्याद्वारे दया दाखवू शकतो. दया दाखवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे इतरांना बायबलमधील सत्ये सांगणे. येशूला एका लोकसमुदायाला पाहून कळवळा आला तेव्हा तो “त्यांना बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.”—मार्क ६:३४.

१५ “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल” हे येशूचे विधान अगदी खरे आहे. जर आपण इतरांशी दयाळूपणे वागलो, तर तेही आपल्याशी दयाळूपणे वागतील. जर आपण इतरांना दया दाखवली असेल, तर कदाचित देवही आपला न्याय करताना आपल्याविरुद्ध प्रतिकूल निर्णय देणार नाही. अशा रीतीने दया न्यायावर विजय मिळवेल. (याको. २:१३) पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन केवळ दयाळू लोकांनाच प्राप्त होते.—मत्त. ६:१५.

“जे अंतःकरणाचे शुद्ध” ते आनंदी का आहेत?

१६. “अंतःकरणाचे शुद्ध” असण्याचा काय अर्थ होतो आणि जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत ते कशा प्रकारे ‘देवाला पाहतात’?

१६ “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.” (मत्त. ५:८) आपले ‘अंतःकरण शुद्ध’ असल्यास आपल्या आवडीनिवडी, आपल्या इच्छा आणि हेतू यांवरून ते दिसून येईल. आपण ‘शुद्ध अंतःकरणातून उद्‌भवणारी प्रीति’ व्यक्‍त करू. (१ तीम. १:५) आपले अंतःकरण शुद्ध असल्यामुळे आपण ‘देवाला पाहू.’ याचा अर्थ आपण यहोवाला अक्षरशः पाहू असा होत नाही. कारण, देवाला “पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्ग. ३३:२०) येशूने देवाचे व्यक्‍तिमत्त्व तंतोतंत प्रतिबिंबित केल्यामुळे तो असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहा. १४:७-९) पृथ्वीवरील यहोवाचे उपासक या नात्याने आपण देवाला ‘पाहू’ शकतो ते या अर्थाने, की तो आपल्या वतीने कशा प्रकारे कार्य करतो हे आपण अनुभवतो. (ईयो. ४२:५) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आत्मिक जीवनासाठी पुनरुत्थित केले जाईल तेव्हा ते देवाला अक्षरशः पाहतील.—१ योहा. ३:२.

१७. शुद्ध अंतःकरणाचा आपल्यावर काय परिणाम होईल?

१७ शुद्ध अंतःकरण नैतिक रीत्या व आध्यात्मिक रीत्या शुद्ध असते, त्यामुळे ते यहोवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या गोष्टींवर लक्ष लावत नाही. (१ इति. २८:९; यश. ५२:११) आपले अंतःकरण किंवा हृदय शुद्ध असल्यास आपण जे काही बोलू किंवा करू ते देखील शुद्धच असेल. आणि यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्यात ढोंग किंवा दिखाऊपणा नसेल.

‘शांती करणाऱ्‍यांना’ देवाची मुले म्हणतील

१८, १९. “शांति करणारे” कशा प्रकारे वागतात?

१८“जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” (मत्त. ५:९) “शांति करणारे” काय करतात आणि काय करत नाहीत, यावरून त्यांना ओळखता येते. येशू ज्या प्रकारच्या लोकांबद्दल बोलत होता त्यांपैकी जर आपण असू, तर आपण सर्वांशी शांतीने वागू आणि ‘कोणाचेही वाइटाबद्दल वाईट करणार नाही.’ त्याऐवजी, आपण ‘सर्वदा सर्वांचे चांगले करीत राहू.’—१ थेस्सलनी. ५:१५.

१९ जर आपण “शांति करणारे” होऊ इच्छितो, तर ज्यांमुळे शांती वाढेल अशी कार्ये आपण केली पाहिजेत. शांती करणारे कधीही असे काहीही करणार नाहीत ज्यांमुळे ‘स्नेह्‍यांत फूट पडेल.’ (नीति. १६:२८) “शांति करणारे” या नात्याने ‘सर्वांबरोबर शांततेने राहण्यासाठी’ आपण आपल्याकडून होता होईल तितके केले पाहिजे.—इब्री १२:१४.

२०. सध्या “देवाची मुले” कोण आहेत आणि कालांतराने आणखी कोण देवाची मुले बनतील?

२० शांती करणारे आनंदी आहेत कारण “त्यांना देवाची मुले म्हणतील.” विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना यहोवाने दत्तक घेतले असल्यामुळे ते “देवाची मुले” आहेत. त्यांचा ख्रिस्तावर विश्‍वास असल्यामुळे आणि ते ‘प्रीती व शांतीच्या देवाची’ संपूर्ण मनाने उपासना करत असल्यामुळे देवाची मुले या नात्याने त्यांचा यहोवाशी घनिष्ठ नातेसंबंध आहे. (२ करिंथ. १३:११; योहा. १:१२) येशूच्या शांतीप्रिय असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांबद्दल’ काय? येशूच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान तो त्यांचा “सनातन पिता” असेल. पण, हजार वर्षांच्या शासनाच्या शेवटी तो स्वतःला यहोवाच्या स्वाधीन करेल आणि अशा प्रकारे ही दुसरी मेंढरे पूर्णार्थाने देवाची मुले बनतील.—योहा. १०:१६; यश. ९:६; रोम. ८:२१; १ करिंथ. १५:२७, २८.

२१. आपण ‘आत्म्याच्या सामर्थ्याने जगत’ असल्यास आपण कशा प्रकारे वागू?

२१ आपण जर ‘आत्म्याच्या सामर्थ्याने जगत’ असू तर आपण शांतीप्रिय आहोत हे इतरांना दिसून येईल. आपण ‘एकमेकांना चीड आणणार’ नाही. (गल. ५:२२-२६) त्याऐवजी, ‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्यासाठी’ आपण परिश्रम करू.—रोम. १२:१८.

छळ होत असूनही आनंदी

२२-२४. (क) नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ केला जातो त्यांच्याजवळ आनंदी असण्याची कोणती कारणे आहेत? (ख) पुढच्या दोन अभ्यास लेखांत आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२२“नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्त. ५:१०) येशूने पुढे असेही म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.”मत्त. ५:११, १२.

२३ प्राचीन काळच्या देवाच्या संदेष्ट्यांप्रमाणेच आपल्या “नीतिमत्त्वाकरिता” आपली निंदा केली जाईल, छळ केला जाईल आणि आपल्याविरुद्ध खोटे बोलले जाईल याची ख्रिश्‍चनांना जाणीव आहे. तरीसुद्धा, आपल्याला याचे समाधान आहे की अशा प्रकारच्या परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड दिल्याने आपण यहोवाचे मन आनंदित करतो व त्याचा सन्मान करतो. (१ पेत्र २:१९-२१) आपण सोसत असलेल्या दुःखामुळे सध्या व भविष्यातही यहोवाची सेवा करत राहण्याचा आपला आनंद कमी होणार नाही. ख्रिस्तासोबत स्वर्गीय राज्यात शासन करण्याचा किंवा त्या राज्याची पृथ्वीवरील प्रजा या नात्याने सार्वकालिक जीवन मिळण्याचा आपला आनंदही कमी होणार नाही. हे सर्व आशीर्वाद देवाच्या कृपेचे, चांगुलपणाचे व उदारतेचे पुरावे आहेत.

२४ डोंगरावरील प्रवचनातून आणखीही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुढच्या दोन अभ्यास लेखांमध्ये यांपैकी आणखी काही गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे. येशू ख्रिस्ताच्या या शिकवणी आपण आपल्या जीवनात कशा लागू करू शकतो ते आपण पाहू या.

[तळटीप]

^ परि. 2 या वचनांत “धन्य” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ “आनंदी” असा होतो.

तुमचे उत्तर काय असेल?

• “आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले” आनंदी का आहेत?

• “जे सौम्य” आहेत ते आनंदी असण्याची कोणती कारणे आहेत?

• छळ होत असूनही खरे ख्रिस्ती आनंदी का आहेत?

• येशूने सांगितलेल्या आनंद देणाऱ्‍या गोष्टींपैकी खास कोणत्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७ पानांवरील चित्र]

आनंदी असण्याची येशूने सांगितलेली नऊ कारणे त्याकाळी होती तितकीच आजही प्रभावशाली आहेत

[८ पानांवरील चित्र]

दया दाखवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे इतरांना बायबलमधील सत्ये सांगणे