व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही प्रचार कार्यात कसे टिकून राहू शकता?

तुम्ही प्रचार कार्यात कसे टिकून राहू शकता?

तुम्ही प्रचार कार्यात कसे टिकून राहू शकता?

कधीकधी खूप गळून गेल्यामुळे अथवा निराशेमुळे प्रचार कार्य करण्याचे सोडून द्यावे असा विचार तुमच्या मनात आला आहे का? कडा विरोध, दररोजच्या चिंता, ढासळणारे आरोग्य, समवयस्कांचा दबाव किंवा मग क्षेत्रातील लोकांचा थंड प्रतिसाद यांमुळे सेवेत टिकून राहणे अतिशय कठीण होऊ शकते. पण, येशूचे उदाहरण लक्षात घ्या. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता” अगदी खडतर परीक्षेतही तो टिकून राहिला. (इब्री १२:२) देवावर लावण्यात आलेले दोषारोप सर्वस्वी निराधार आहेत हे सिद्ध करून, आपण यहोवाचे मन आनंदित करत आहोत याची त्याला जाणीव होती.—नीति. २७:११.

प्रचार कार्यात टिकून राहिल्याने तुम्हीही यहोवाचे मन आनंदित करू शकता. परंतु काही कारणांमुळे सेवा कार्यातील तुमचा उत्साह कमी होत असल्याचे तुम्हाला जाणवते तेव्हा काय करता येऊ शकते? वयस्कर व सतत आजारी असलेली भगिनी क्रिस्टिना म्हणते: “मी अनेकदा खूप थकून जाते व निराश होते. वाढत्या वयोमानाबरोबर येणाऱ्‍या आजारांमुळे व दररोजच्या चिंतांमुळे कधी कधी मी निरुत्साही होते.” अशा प्रकारच्या समस्या तुमच्याही समोर येतात तेव्हा तुम्ही सेवा कार्यात कसे टिकून राहू शकता?

संदेष्ट्यांचे अनुकरण करा

प्रचार कार्यात टिकून राहण्याकरता विश्‍वासू राज्य प्रचारक, प्राचीन काळातील संदेष्ट्यांच्या मनोवृत्तीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू शकतात. यिर्मयाचे उदाहरण विचारात घ्या. संदेष्टा म्हणून कार्य करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली तेव्हा तो सुरुवातीला कचरला. पण, देवावर पूर्णपणे विसंबून राहिल्यामुळे या कठीण नेमणुकीत तो ४० हून अधिक वर्षे टिकून राहिला.—यिर्म. १:६; २०:७-११.

यिर्मयाच्या उदाहरणावरून हेन्रिक यांना प्रेरणा मिळाली. ते म्हणतात: “७० हून अधिक वर्षांच्या माझ्या सेवा कार्यात लोकांच्या प्रतिक्रियेमुळे, त्यांच्या विरोधामुळे किंवा त्यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे मी कधीकधी खूप उदास होतो. अशा वेळी मी यिर्मयाच्या उदाहरणाचा विचार करतो. यिर्मयाचे यहोवावरील प्रेम आणि त्याच्याबरोबरील त्याचा घनिष्ठ नातेसंबंध यांमुळे संदेष्ट्याचे कार्य करत राहण्याची शक्‍ती त्याला मिळाली.” (यिर्म. १:१७) रॉफॉ यांनाही यिर्मयाच्या उदाहरणाने प्रेरणा मिळाली आहे. ते म्हणतात: “स्वतःचा किंवा स्वतःच्या भावनांचा विचार करण्याऐवजी यिर्मया देवावर विसंबून राहिला. त्यामुळे लोकांचा कडा विरोध असतानाही तो निर्भीडपणे देवाचे कार्य करत राहिला. यिर्मयाची हीच गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो.”

यशया संदेष्ट्याच्या उदाहरणानेही अनेकांना क्षेत्र सेवेत टिकून राहण्याची प्रेरणा दिली आहे. त्याचे देश बांधव त्याचा संदेश ऐकणार नाहीत हे देवाने त्याला सांगितले होते. यहोवाने म्हटले: “त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.” याचा अर्थ, यशया आपल्या नेमणुकीत अपयशी ठरणार होता असा होतो का? नाही, देवाच्या दृष्टिकोनातून तर मुळीच नाही! संदेष्टा म्हणून कार्य करण्याची संधी पुढे आली तेव्हा “हा मी आहे, मला पाठीव” असे तो म्हणाला. (यश. ६:८-१०) आणि या कार्य नेमणुकीत तो शेवटपर्यंत टिकून राहिला. प्रचार करण्याच्या आज्ञेला तुम्हीही असाच प्रतिसाद देता का?

क्षेत्रातील लोक आपल्या संदेशाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा यशयाप्रमाणे सेवेत टिकून राहायचे असल्यास लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा जास्त विचार करण्याचे टाळा. रॉफॉ निराश होतात तेव्हा काय करतात? “लोकांचे कठोर शब्द मी मनाला लावून घेत नाही. क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दाखवण्याचा हक्क आहे,” असे ते म्हणतात. तसेच, ॲना ही भगिनी म्हणते, “मन विषण्ण करणाऱ्‍या नकारात्मक गोष्टींचा विचार मी उगाच मनात घोळत राहू देत नाही. क्षेत्र सेवेत जाण्यापूर्वी प्रार्थना केल्यामुळे व दैनिक वचन वाचल्यामुळे मला असे करणे शक्य होते. यामुळे नकारात्मक विचार लगेच मनातून निघून जातात.”

यहेज्केल संदेष्टा, बॅबिलोनच्या बंदिवासात असलेल्या ताठ मानेच्या यहुद्यांमध्ये सेवा करत होता. (यहे. २:६) या संदेष्ट्याने लोकांना देवाचा संदेश सांगितला नसता व धोक्याची सूचना न मिळाल्याने एखादी दुष्ट व्यक्‍ती मरण पावली असती तर यहेज्केलला त्याचा जाब द्यावा लागला असता. कारण यहोवाने यहेज्केलला सांगितले होते: “त्याच्या रक्‍ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.”—यहे. ३:१७, १८.

हेन्रिकही यहेज्केलसारखी मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात: “मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी राहू इच्छितो. लोकांचे मौल्यवान जीव धोक्यात आहेत.” (प्रे. कृत्ये २०:२६, २७) झ्बेग्निव यांनाही असेच वाटते: “लोकांच्या वागण्या-बोलण्याने विचलित न होता त्याला आपले कार्य करत राहायचे होते. यामुळे क्षेत्र सेवेबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगण्यास मला मदत होते.”

या कार्यात तुम्ही एकटे नाहीत

तुम्ही प्रचार कार्य करत असता तेव्हा तुम्ही कधीही एकटे नसता. प्रेषित पौलाप्रमाणे आपणही म्हणू शकतो, की “आम्ही देवाचे सहकारी आहो.” (१ करिंथ. ३:९) क्रिस्टिना म्हणते: ‘सेवेत अधूनमधून निराश होत असल्यामुळे, यहोवाने मला शक्‍ती द्यावी म्हणून मी सतत त्याच्याकडे याचना करत असते. आणि तो मला कधीही निराश करत नाही.’ होय, आपल्या सेवा कार्यात पाठिंबा देण्याकरता आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याची मदत हवी असते.—जख. ४:६.

प्रचार कार्य करत असताना, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” अर्थात गुण दाखवण्यासही पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करतो. (गलती. ५:२२, २३) आणि त्यामुळे काहीही झाले तरी प्रचार कार्यात टिकून राहणे आपल्याला शक्य होते. हेन्रिकने असे अनुभवले आहे, की “सेवा कार्यात सहभाग घेतल्याने मला माझ्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्यास मदत होते. मी सहनशील व समंजस होण्यास शिकलो आहे. आणि सहजासहजी निराश होत नाही.” निरनिराळ्या अडचणी असतानाही सेवा कार्यात टिकून राहिल्यामुळे तुम्हाला आत्म्याचे फळ आणखी मोठ्या प्रमाणात विकसित करण्यास मदत होऊ शकेल.

या अनोख्या कार्यात देवदूतांमार्फत यहोवा आपले मार्गदर्शन करतो. (प्रकटी. १४:६) या देवदूतांची “संख्या अयुतांची अयुते व सहस्त्रांची सहस्त्रे,” इतकी आहे असे बायबल म्हणते. (प्रकटी. ५:११) येशूच्या मार्गदर्शनाखाली हे देवदूत पृथ्वीवरील देवाच्या सेवकांना पाठिंबा देतात. तुम्ही सेवेत असता तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवता का?

“सेवेत असताना देवदूत आपल्यासोबत असतात या गोष्टीचा विचार करणे किती दिलासा देणारे आहे. यहोवा व येशू यांच्या देखरेखीखाली ते पुरवत असलेल्या मदतीची मी खूप कदर करते,” असे भगिनी ॲना म्हणतात. विश्‍वासू देवदूतांच्या सोबतीने कार्य करणे हा खरोखर किती मोठा विशेषाधिकार आहे!

सेवा कार्यात टिकून राहण्याकरता इतर राज्य प्रचारक कशा प्रकारे आपली मदत करू शकतात? विश्‍वासू साक्षीदारांच्या मोठ्या समूहाचा भाग होण्याचा सुहक्क आपल्याला लाभला आहे. “तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो,” या बायबलमधील शब्दांची तुम्हाला नक्कीच प्रचिती आली असेल.—नीति. २७:१७.

इतरांसोबत प्रचार कार्य केल्याने आपल्यासाठी नवीन असणाऱ्‍या अनेक प्रभावशाली पद्धती शिकण्याची बहुमोल संधी आपल्याला मिळते. एल्झबेटा म्हणता: “सेवेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रचारकांसोबत कार्य केल्यामुळे बंधूभगिनींवरील तसेच क्षेत्रातील लोकांवरील आपले प्रेम दाखवण्याची सुसंधी मला मिळते.” तेव्हा, क्षेत्रात वेगवेगळ्या प्रचारकांबरोबर कार्य करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची सेवा अधिक रोचक बनेल.

स्वतःची चांगली काळजी घ्या

सेवा कार्यातील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी उत्तम योजना करा, वैयक्‍तिक बायबल अभ्यासाचा चांगला नित्यक्रम राखा आणि पुरेशी विश्रांती घ्या. दुसऱ्‍या शब्दांत, स्वतःची आध्यात्मिक तसेच शारीरिकरित्या काळजी घ्या.

बायबल म्हणते: “उद्योग्याचे विचार [अर्थात योजना] समृद्धि करणारे असतात.” (नीति. २१:५) आता ८८ वर्षांचे असलेले झिग्मंट म्हणतात: “पद्धतशीरपणे सेवा केल्यामुळे मला माझी ध्येये गाठता येतात. तसेच वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे क्षेत्र सेवेसाठी मला भरपूर वेळ मिळतो.”

शास्त्रवचनांचे उत्तम ज्ञान आपल्याला सेवेत सहभाग घेण्यास तयार करते व बळ देते. आपल्याला जशी शारीरिक अन्‍नाची गरज असते तसेच प्रचार कार्यात सहभाग घेण्यासाठी नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न सेवन करणे जरूरीचे आहे. देवाच्या वचनाचे दररोज वाचन केल्याने व “यथाकाळी” पुरवले जाणारे आध्यात्मिक अन्‍न सेवन केल्याने सेवेत सहभाग घेण्यासाठी आपल्याला शक्‍ती मिळते.—मत्त. २४:४५-४७.

आपल्या सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी एल्झबेटा यांनी आपल्या जीवनशैलीत आवश्‍यक बदल केले. त्या म्हणतात: “पूर्वी मी माझा बराच वेळ टीव्ही पाहण्यात खर्च करायचे, पण आता मी ते खूप कमी केले आहे. त्यामुळे सेवेची तयारी करण्यासाठी मला बराच वेळ मिळतो. दररोज संध्याकाळी बायबल वाचन करताना, सेवेत भेटलेल्या लोकांचा मी विचार करते. कोणती शास्त्रवचने व कोणते लेख त्यांना लागू होतील हे मी पाहत असते.”

पुरेशी विश्रांती घेतल्यामुळे सेवा कार्यात सहभाग घेण्यास तुम्ही नेहमी उत्साही राहाल. या उलट, जास्त वेळ मनोरंजनामध्ये खर्च केल्याने तुमच्या सेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आन्द्रेज नावाचा एक आवेशी प्रचारक म्हणतो: “पुरेशी विश्रांती घेतली नाही तर भयंकर थकायला होते आणि मग निरुत्साही व्हायला जास्त वेळ लागत नाही. तसे होऊ नये म्हणून मी नेहमी काळजी घेत असतो.”—उप. ४:६.

इतके सगळे प्रयत्न करूनसुद्धा फार कमी लोक आपला संदेश ऐकतात. पण, यहोवा आपले प्रयत्न कधीही विसरणार नाही. (इब्री ६:१०) लोकांनी आपल्या संदेशाबद्दल आस्था दाखवली नाही तरी आपण निघून गेल्यानंतर आपल्या भेटीविषयी ते नक्की बोलतील. याचा परिणाम, यहेज्केलविषयी जे काही म्हटले होते त्याप्रमाणे असेल: “निदान त्यांजकडे कोणी तरी संदेष्टा गेला होता हे त्यांस समजेल.” (यहे. २:५) आपल्याला सोपवलेली सेवा, ही सोपी नाही हे मान्य आहे. पण, त्यापासून आपल्याला व आपला संदेश ऐकणाऱ्‍यांनाही फायदा होतो.

झिग्मंट म्हणतात: “सेवा कार्यात सहभाग घेतल्यामुळे नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करण्याची तसेच देवावर व आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्याची संधी आपल्याला मिळते.” “जीवन वाचवण्याच्या या कार्यात भाग घेणे हा आपल्यासाठी एक बहुमान आहे. कारण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात व अशा परिस्थितीत परत कधीही केले जाणार नाही,” असे आन्द्रेज यांचे म्हणणे आहे. सेवा कार्यात टिकून राहिल्यास तुम्हालाही भरपूर आशीर्वाद लाभतील.—२ करिंथ. ४:१, २.

[३१ पानांवरील चित्रे]

आध्यात्मिक व शारीरिक रीत्या स्वतःची काळजी घेतल्यास सेवेत टिकून राहणे शक्य होते