“परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो”
“परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो”
क्रिस्टबेल कॉनल यांच्याद्वारे कथित
क्रिस्टफरनं बायबलविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या नादात किती उशीर झालाय याचं आम्हा दोघींनाही भान नव्हतं; आणि क्रिस्टफर सारखा सारखा खिडकीबाहेर का पाहतोय याकडेही आम्ही फारसं लक्ष दिलं नाही. शेवटी तो आम्हाला म्हणाला, “आता भीतीचं काही कारण नाही, आता तुम्ही जाऊ शकता.” मग, त्यानं आमच्या सायकली ठेवल्या होत्या तिथपर्यंत आम्हाला पोचवलं आणि आम्ही त्याचा निरोप घेतला. पण त्याला खिडकीबाहेर असं काय दिसलं होतं?
माझा जन्म १९२७ साली इंग्लंडमधील शेफिल्ड शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बहल्ल्यात आमचं घर उद्ध्वस्त झाल्यामुळे मला शालेय शिक्षण पूर्ण होईस्तवर आजीकडे राहायला पाठवण्यात आलं. कॉन्व्हेंटमध्ये शिकत असताना मी तिथल्या नन्सना, जगात इतकी दुष्टाई आणि हिंसाचार का आहे असं अनेकदा विचारलं. पण त्यांना किंवा इतर धार्मिक व्यक्तींनाही माझ्या या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता आलं नाही.
दुसरं महायुद्ध संपल्यावर मी नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून पॅडिंगटन जनरल हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी लंडनला आले. पण या शहरात तर मी आणखीनच हिंसाचार होताना पाहिला. माझा मोठा भाऊ कोरियातील युद्धासाठी गेल्यावर थोड्या काळानंतर आमच्या हॉस्पिटलच्या बाहेरच एक हिंसक घटना घडली. एका माणसानं दुसऱ्याला बेदम मारलं, पण त्याला वाचवायला कुणीही पुढं आलं नाही. मारहाणीमुळे तो माणूस कायमचा आंधळा झाला. याच सुमारास, माझी आई व मी स्पिरिचुअलिस्ट (एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मृतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणारे लोक) सभांना जात होतो. पण जगात इतकी दुष्टाई का आहे, या प्रश्नाचं उत्तर मला तिथंही मिळू शकलं नाही.
बायबलचा अभ्यास करण्याचं प्रोत्साहन
एकदा माझा सर्वात थोरला भाऊ, जॉन आम्हाला भेटायला आला. तो यहोवाचा साक्षीदार बनला होता. त्यानं मला विचारलं, “या सगळ्या वाईट गोष्टी का घडत आहेत, तुला माहीतंय का?” मी म्हटलं, “नाही.” तेव्हा त्यानं आपलं बायबल उघडून प्रकटीकरण १२:७-१२ मला वाचून दाखवलं. आता मला समजलं की जगातल्या सर्व दुष्टाईसाठी खरं तर सैतान आणि त्याचे दुरात्मे जबाबदार आहेत. त्यानंतर लवकरच मी माझ्या भावाचा सल्ला मान्य करून बायबल अभ्यास स्वीकारला. पण मनुष्याच्या भीतीला बळी पडून त्यावेळी मी बाप्तिस्मा घेण्याचं पाऊल उचललं नाही.—नीति. २९:२५.
माझी बहीण डॉरथी सुद्धा साक्षीदार बनली होती. न्यूयॉर्क इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनानंतर (१९५३) ती आपला होणारा पती, बिल रॉबर्ट्स याच्यासोबत घरी आली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझाही बायबल अभ्यास झालाय. बिलनं मला विचारलं: “तू बायबल उघडून सगळी शास्त्रवचनं पाहिली होतीस का? प्रश्नांची उत्तरं पुस्तकात रेखांकित केली होतीस का?” मी नाही म्हटलं तेव्हा बिल मला म्हणाला: “मग तर तुझा अभ्यास झालाच नाही! त्या बहिणीला गाठ आणि पुन्हा अभ्यास कर!” त्याच काळात मला दुरात्मे त्रास देऊ लागले.
मला आठवतंय, मी यहोवाला माझं संरक्षण करण्यासाठी आणि दुरात्म्यांच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करायचे.स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये पायनियर सेवा
१६ जानेवारी, १९५४ रोजी माझा बाप्तिस्मा झाला. हॉस्पिटलमध्ये काम करण्याची ठरलेली मुदत मे महिन्यात संपवून मी जूनमध्ये पायनियर सेवेला सुरुवात केली. आठ महिन्यांनंतर मला स्कॉटलंडच्या ग्रेन्जमथ नावाच्या ठिकाणी खास पायनियर म्हणून पाठवण्यात आलं. या एकाकी क्षेत्रात प्रचार कार्य करताना जणू यहोवाच्या देवदूतांनी ‘माझ्यासभोवती छावणी दिली आहे’ असं मला वाटायचं.—स्तो. ३४:७.
१९५६ साली मला आयर्लंडमध्ये सेवा करण्यास पाठवण्यात आलं. माझ्यासोबत आणखी दोघींना गॉल्वे शहरात नियुक्त करण्यात आलं होतं. पहिल्याच दिवशी मी व माझी जोडीदार सेवेला गेलो तेव्हा आमची भेट एका पाळकाशी झाली. पुढे गेल्यानंतर काही मिनिटांनी एक पोलीस आला आणि त्यानं आम्हा दोघींना पोलीस स्टेशनला नेलं. आमची नावं आणि पत्ता घेतल्यावर तो लगेच फोनजवळ गेला. आम्ही त्याचं बोलणं ऐकलं, तो म्हणाला, “हो फादर, त्या नेमकं कुठं राहतात मला माहीतंय.” याचा अर्थ, त्याला त्या पाळकानंच पाठवलं होतं! आमच्या घरमालकावर दबाव आणून आम्हाला घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे, शाखा कार्यालयानं आम्हाला ते क्षेत्र सोडून देण्याचा सल्ला दिला. रेल्वे स्टेशनवर आम्ही दहा मिनिटं उशीरानं पोचलो, तरी गाडी अजून स्टेशनवरच उभी होती आणि आम्ही गेल्याची खातरी करण्यासाठी खास एक माणूस तिथं थांबलेला होता. गॉल्वेला आल्यानंतर तीन आठवड्यांतच हे सारं घडलं!
यानंतर आम्हाला लिमरिक नावाच्या दुसऱ्या एका शहरात नियुक्त करण्यात आलं. इथंही कॅथलिक चर्चचा दबदबा होता. आम्ही प्रचाराला निघालो, की लोकांचा जमाव जोरजोरानं ओरडत आमच्या मागोमाग यायचा. यामुळे बऱ्याच लोकांना दार उघडून आमच्याशी बोलायला भीती वाटायची. एका वर्षाआधी इथून जवळच असलेल्या क्लूनलारा या लहानशा नगरात एका बांधवाला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला आहे त्या क्रिस्टफरनं आम्हाला बायबलवरील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी पुन्हा त्याच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं, तेव्हा आम्हाला साहजिकच खूप आनंद झाला. पण क्रिस्टफरच्या घरी त्याच्याशी बोलत असताना, अचानक एक पाळक घरात घुसून आला आणि क्रिस्टफरनं आम्हाला घराबाहेर काढावं असं तो त्याला म्हणू लागला. पण क्रिस्टफर उलट त्या पाळकालाच म्हणाला: “या दोघींना मी स्वतः बोलावलंय आणि त्या माझ्या परवानगीनं आत आल्या आहेत. तुम्हाला मात्र मी बोलावलेलं नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही परवानगीशिवायच आत शिरलाय.” हे ऐकून पाळक तणतणत निघून गेला.
तिथून गेल्यावर त्या पाळकानं बऱ्याच माणसांना जमा केलं आणि ते सर्व क्रिस्टफरच्या घरापुढं आमच्या बाहेर येण्याची वाट पाहत उभे होते. अर्थात आम्हाला याची कल्पना नव्हती. पण, क्रिस्टफरला माहीत होतं की जमाव आमच्या विरोधात आहे आणि लोक संतापलेले आहेत. म्हणूनच, या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तो वारंवार खिडकीबाहेर पाहत होता. जोपर्यंत सगळी माणसं तिथून निघून गेली नाहीत तोपर्यंत त्यानं आम्हाला थांबवून ठेवलं. काही काळानंतर आम्हाला कळलं की क्रिस्टफर व त्याच्या कुटुंबाला गाव सोडून जायला भाग पाडण्यात आलं आणि ते इंग्लंडला स्थाईक झाले.
गिलियड प्रशालेचे निमंत्रण
१९५८ साली न्यूयॉर्कमध्ये होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला जाण्याची मी तयारी करतच होते, इतक्यात मला गिलियड प्रशालेच्या ३३ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण आलं. गिलियड प्रशिक्षण १९५९ मध्ये सुरू होणार होतं, त्यामुळे अधिवेशनानंतर घरी परतण्याऐवजी मी काही काळ कॅनडातील आँटेरियोजवळ असलेल्या कॉलिंगवुड या शहरात पायनियर सेवा केली. अधिवेशनात माझी भेट एरिक कॉनल याच्याशी झाली होती. त्याला १९५७ साली सत्य मिळालं होतं आणि १९५८ मध्ये त्यानं पायनियर सेवा सुरू केली होती. अधिवेशनानंतर मी कॅनडात राहत असताना, तसंच माझं गिलियड प्रशिक्षण सुरू असताना तो दररोज मला पत्र लिहायचा. माझं गिलियड प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं आमचं काय होणार याचा मी विचार करत असे.
गिलियड प्रशिक्षण माझ्या जीवनातली अतिशय महत्त्वाची घटना होती. डॉरथी व तिचा पतीही त्याच वर्गात होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिशनऱ्यांना नियुक्त करण्यात आलेली ठिकाणं वाचून दाखवण्यात आली. डॉरथी व तिच्या पतीला पोर्तुगालला पाठवण्यात आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मला आयर्लंडला नियुक्त करण्यात आलं. बहिणीसोबत जाता येणार नाही म्हणून मी खूप निराश झाले! माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना, असं मी आमच्या प्रशिक्षकांपैकी एकाला विचारलं देखील. ते म्हणाले, “नाही, असं काही नाही. तुझी जोडीदार आयलिन माओनी व तू जगातल्या कोणत्याही भागात जाण्याचं कबूल केलं होतं.” साहजिकच त्यात आयर्लंडचाही समावेश होता.
परत आयर्लंडला
१९५९ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी आयर्लंडला परत आले. मला डनलियरी मंडळीत नियुक्त करण्यात आलं. तोपर्यंत
एरिक इंग्लंडला परतला होता आणि मी जवळच आहे हे कळल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्यालाही मिशनरी बनण्याची इच्छा होती. त्याकाळात आयर्लंड मिशनऱ्यांच्या क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे त्यानं इथं येऊन पायनियर सेवा करायचं ठरवलं. तोही डनलियरीला आला आणि १९६१ साली आमचं लग्न झालं.सहा महिन्यांनंतर एरिक मोटरबाईकने जात असताना त्याचा गंभीर अपघात झाला. त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याला वाचवता येईल की नाही याबद्दल डॉक्टरांनाही खातरी नव्हती. तीन आठवडे तो हॉस्पिटलमध्येच होता. त्यानंतर तो पूर्ण बरा होईपर्यंत, पाच महिने मी घरी त्याची काळजी घेतली. या काळातही मी सेवाकार्यात जमेल त्याप्रमाणे सहभाग घेत राहिले.
१९६५ मध्ये आम्हाला आयर्लंडच्या उत्तरेकडे असलेल्या स्लीगो या बंदर शहरातील आठ प्रचारकांच्या लहानशा मंडळीत नियुक्त करण्यात आलं. तीन वर्षांनी आम्ही लंडनडेरी या आणखी उत्तरेकडे असलेल्या दुसऱ्या एका लहानशा मंडळीत गेलो. एके दिवशी सेवेवरून परत आल्यावर आमच्या घरासमोरील रस्त्यावर आम्हाला तारेचं कुंपण लावलेलं दिसलं. उत्तर आयर्लंडच्या कॅथलिक व प्रोटेस्टंट लोकांमधील हिंसक संघर्षाला सुरुवात झाली होती. तरुणांच्या टोळ्यांनी कितीतरी मोटारी जाळल्या. आधीच शहराचे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक असे दोन भाग करण्यात आले होते. एका भागातून दुसऱ्या भागात जाणं अतिशय धोकेदायक होतं.
संघर्षाच्या काळातील जीवन
सेवाकार्य करण्यासाठी आम्हाला शहराच्या सर्वच भागांत जावं लागायचं. पुन्हा एकदा देवदूतांनी आमच्यासभोवती छावणी दिल्याचं आम्ही अनुभवलं. एखाद्या भागात दंगल उसळली, की आम्ही लगेच तो परिसर सोडायचो आणि परिस्थिती थोडी शांत झाल्यावरच तिथं परत जायचो. एकदा आमच्या घराजवळच दंगल सुरू झाली. जवळच्याच पेन्टच्या दुकानातील जळत्या वस्तू आमच्या खिडकीवर येऊन पडल्या. घराला आग लागण्याच्या भीतीनं आम्ही ती अख्खी रात्र जागून काढली. १९७० साली बेलफास्टला राहायला गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते पेन्टचं दुकान खरोखरच एका पेट्रोल बॉम्बहल्ल्यात नष्ट झालं होतं आणि ज्या घरात आम्ही राहायचो ते घर देखील त्यावेळी आगीत नष्ट झालं.
आणखी एकदा, मी एका बहिणीसोबत सेवाकार्य करत होते. एका घरासमोरून जाताना आम्हाला खिडकीवर एक पाईपचा तुकडा ठेवलेला दिसला. थोडं विचित्र वाटलं, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेलो. काही मिनिटांनी त्याचा स्फोट झाला. तिथल्या लोकांना वाटलं की आम्हीच त्या पाईप बॉम्बचा स्फोट केला होता! तेवढ्यात त्याच भागात राहणाऱ्या एका बहीणीनं आम्हाला तिच्या घरात बोलावलं. तेव्हा कुठं तिच्या शेजाऱ्यांना आम्ही निर्दोष असल्याची खातरी पटली.
१९७१ मध्ये आम्ही एका बहिणीला भेटायला पुन्हा लंडनडेरीला आलो होतो. आम्ही अमुक रस्त्यानं आलो आणि मध्ये एक नाका होता असं सांगितल्यावर तिनं आम्हाला विचारलं, “नाक्यावर कुणीही नव्हतं का?” आम्ही तिला सांगितलं, “होते, पण त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं.” हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं. का? कारण नुकतंच तिथं एका डॉक्टरच्या व पोलिसाच्या गाड्यांचं अपहरण करून त्या जाळण्यात आल्या होत्या.
१९७२ साली आम्ही कॉर्क इथं आलो. नंतर, नेस आणि मग आर्कलो इथं आम्ही सेवा केली. शेवटी, १९८७ साली आम्हाला कासलबार इथं नियुक्त करण्यात आलं. सध्या आम्ही इथंच आहोत. कासलबारला आल्यावर आम्हाला एका राज्य सभागृहाच्या बांधकामात साहाय्य करण्याची सुसंधी मिळाली. १९९९ मध्ये एरिक गंभीर रीत्या आजारी पडला. पण, यहोवाच्या साहाय्याने आणि मंडळीतील बांधवांच्या प्रेमळ आधारामुळे पुन्हा एकदा मी त्याची काळजी घेऊ शकले आणि कालांतरानं तो पूर्ण बरा झाला.
एरिक व मला दोनवेळा पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहण्याची सुसंधी मिळाली. तो अजूनही मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे. मला तीव्र स्वरूपाचा संधिवात आहे आणि माझ्या कटिबंधाच्या आणि गुडघ्यांच्या सांध्यांच्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. धार्मिक कट्टरवाद्यांचा विरोध आणि राजकीय व सामाजिक संघर्षाच्या काळातील अनेक अडचणींना मी तोंड दिलंय. तरीसुद्धा माझ्यापुढं आलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे प्रकृतीमुळे कार चालवायचं बंद करणं. ही माझ्यासाठी एक परीक्षाच होती कारण तेव्हापासून मला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. अर्थात, मंडळीतील भाऊबहीण मला खूप मदत करतात. आता मी काठी घेऊन चालते आणि थोड्या लांबवर जायचं असल्यास बॅटरीवर चालणारी तीनचाकी गाडी चालवते.
एरिक व मी, दोघांनी मिळून एकूण १०० पेक्षा अधिक वर्षं खास पायनियर म्हणून सेवा केली आहे. यांतली ९८ वर्षं आम्ही इथं आयर्लंडमध्येच घालवली. आम्हा दोघांनाही निवृत्त होण्याची मुळीच इच्छा नाही. अर्थात आम्ही कोणत्याही चमत्कारांची अपेक्षा करत नाही, पण आम्हाला खातरी आहे की यहोवाचे शक्तिशाली देवदूत त्याचं भय धरणाऱ्यांसभोवती व विश्वासूपणे त्याची सेवा करणाऱ्यांसभोवती ‘छावणी देतात.’