व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

थोर दावीद व थोर शलमोन असलेल्या येशूचा आदर करा

थोर दावीद व थोर शलमोन असलेल्या येशूचा आदर करा

थोर दावीद व थोर शलमोन असलेल्या येशूचा आदर करा

“शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.”—मत्त. १२:४२.

१, २. शमुवेलास जेव्हा दाविदाला राजा म्हणून नियुक्‍त करण्यास सांगण्यात आले तेव्हा बहुतेकांना आश्‍चर्य का वाटले असावे?

एखाद्या राजाला शोभेल असे त्याचे स्वरूप नव्हते. संदेष्टा शमुवेलाला तर तो भावी राजापेक्षा एक मेंढपाळच वाटत होता. शिवाय, तो ज्या गावात लहानाचा मोठा झाला होता ते बेथलहेम गाव इतके काही मोठे नव्हते. “यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे,” असे या गावाचे वर्णन करण्यात आले होते. (मीखा ५:२) तरीपण या लहानशा गावातल्या या साधारण तरुणाचा संदेष्टा शमुवेल इस्राएल राष्ट्राचा भावी राजा म्हणून अभिषेक करणार होता.

इस्राएलचा भावी राजा नियुक्‍त करण्यासाठी शमुवेल विश्‍वासू इशायाच्या घरी आला तेव्हा इशायाने दाविदाला त्याच्यासमोर आणले नाही. शमुवेल त्याच्या घरी आला होता तेव्हा तर दावीद घरातही नव्हता. पण यहोवाच्या मनात तर दावीदच होता आणि हेच सगळ्यात महत्त्वाचे होते.—१ शमु. १६:१-१०.

३. (क) देव एखाद्या व्यक्‍तीला पारखतो तेव्हा तो कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व देतो? (ख) दाविदाचा अभिषेक झाल्यानंतर काय झाले?

शमुवेल जे पाहू शकला नाही ते यहोवाने पाहिले. दाविदाच्या हृदयात काय आहे हे यहोवाला माहीत होते म्हणून तो त्याच्यावर संतुष्ट होता. देव एखाद्या व्यक्‍तीच्या बाह्‍यस्वरूपाला नव्हे तर त्या व्यक्‍तीच्या हृदयात काय आहे या गोष्टीला महत्त्व देतो. (१ शमुवेल १६:७ वाचा.) त्यामुळे इशायाच्या सात पुत्रांपैकी एकालाही यहोवाने राजा म्हणून निवडले नव्हते हे जेव्हा शमुवेलास जाणवले तेव्हा त्याने मेंढ्या चारत असलेल्या इशायाच्या सर्वात धाकट्या मुलाला घरी येण्याचे बोलावणे पाठवले. त्याविषयीचा अहवाल असा आहे: “[इशायाने] बोलाविणे पाठवून [दाविदास] आणिले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्‍वराने त्यास म्हटले, ऊठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्‍वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला.”—१ शमु. १६:१२, १३.

ख्रिस्ताला पूर्वचित्रित करणारा दावीद

४, ५. (क) दावीद आणि येशू यांच्यात काय साम्यता आहेत ते सांगा. (ख) येशूला थोर दावीद का म्हणता येते?

दाविदानंतर सुमारे १,१०० वर्षांनी येशूचाही जन्म बेथलहेममध्ये झाला होता. अनेक लोकांना तो राजा आहे असे वाटले नाही. म्हणजे, इस्राएलमधील लोकांनी एका राजाविषयी जशी अपेक्षा केली होती तसा तो नव्हता. तरीपण दाविदाप्रमाणे यहोवाने त्याला निवडले होते. तोही दाविदासारखाच यहोवाला परमप्रिय होता. * (लूक ३:२२) येशूच्या बाबतीतही, त्याचा अभिषेक झाल्यानंतर परमेश्‍वराचा ‘पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला’ व कार्य करू लागला.

दावीद आणि येशू यांच्यात आणखीही साम्यता आहेत. उदाहरणार्थ, दाविदाचा सल्लागार अहिथोफेल याने दाविदाचा केसाने गळा कापला आणि येशूचा एक प्रेषित यहुदा इस्कर्योत यानेही येशूचा विश्‍वासघात केला. (स्तो. ४१:९; योहा. १३:१८) दावीद व येशू हे दोघेही यहोवाच्या मंदिराबद्दल खूप आवेशी होते. (स्तो. २७:४; ६९:९; योहा. २:१७) येशू दाविदाचा वारसदार होता. येशूचा जन्म व्हायच्या आधी एका देवदूताने त्याच्या आईला असे म्हटले: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल.” (लूक १:३२; मत्त. १:१) पण, लोक ज्या मशीही राजाची अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते तो येशू, दाविदापेक्षाही थोर ठरणार होता कारण मशीहाच्या संबंधाने असलेली सर्व अभिवचने तो पूर्ण करणार होता.—योहा. ७:४२.

मेंढपाळ-राजा असलेल्या येशूचे अनुसरण करा

६. कशा प्रकारे दावीद एक उत्तम मेंढपाळ होता?

येशू हा एक मेंढपाळही आहे. एक उत्तम मेंढपाळ कळपासाठी काय करतो? तो आपल्या कळपाची विश्‍वासूपणे व धैर्याने राखण करतो, त्यांना खाऊ घालतो व त्यांचे रक्षण करतो. (स्तो. २३:२-४) तरुण असताना दावीद एक मेंढपाळ होता. आपल्या वडिलांच्या मेंढ्यांची त्याने खूप चांगली काळजी घेतली. कळप जेव्हा धोक्यात होता तेव्हा त्याने आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या कळपाला एकदा एका सिंहापासून व एकदा अस्वलापासून वाचवले.—१ शमु. १७:३४, ३५.

७. (क) कशामुळे दावीद, राजा म्हणून त्याच्यावर येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या सांभाळण्यास तयार झाला? (ख) येशूने स्वतःला एक उत्तम मेंढपाळ कसे सिद्ध केले आहे?

शेतांमध्ये व डोंगरांवर मेंढ्यांची राखण करण्यात दाविदाने घालवलेल्या अनेक वर्षांमुळे, इस्राएल राष्ट्राचे पालन करण्याकरता त्याच्यावर येणाऱ्‍या भारी जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी तो तयार झाला. * (स्तो. ७८:७०, ७१) येशूही एक आदर्श मेंढपाळ ठरला आहे. आपल्या ‘लहान कळपाचे’ व ‘दुसऱ्‍या मेंढरांचे’ पालन करताना त्याला यहोवाकडून शक्‍ती व मार्गदर्शन मिळते. (लूक १२:३२; योहा. १०:१६) म्हणूनच येशूने स्वतःला एक उत्तम मेंढपाळ सिद्ध केले आहे. आपल्या कळपातील हरएक मेंढराला तो जातीने ओळखत असल्यामुळे तो प्रत्येकाला नावाने हाक मारतो. आपल्या मेंढरांवर त्याचे अफाट प्रेम असल्यामुळेच, पृथ्वीवर असताना त्याने त्यांच्यासाठी अनेक त्याग केले. (योहा. १०:३, ११, १४, १५) उत्तम मेंढपाळ या नात्याने येशू, दावीद जे करू शकला नाही ते करतो. त्याच्या खंडणी बलिदानामुळे मानवजातीला मृत्यूपासून सुटका मिळण्याची संधी मिळते. कोणतीही गोष्ट त्याला, आपल्या ‘लहान कळपास’ स्वर्गातील अमर जीवन मिळवून देण्यापासून रोखू शकत नाही. किंवा, लांडग्यासारखी मनोवृत्ती असलेले लोक ज्यात नसतील अशा एका धार्मिक नवीन जगात आपल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांस’ सार्वकालिक जीवन मिळवून देण्यापासून त्याला रोखू शकत नाही.योहान १०:२७-२९ वाचा.

विजयी राजाचे अनुसरण करा

८. दावीद एक विजयी राजा होता, असे आपण का म्हणू शकतो?

राजा या नात्याने दावीद एक करारी योद्धा होता. देवाच्या लोकांच्या राष्ट्राचे त्याने संरक्षण केले आणि “दावीद जेथे गेला तेथे परमेश्‍वराने त्यास यश दिले.” दाविदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्राच्या सीमा ईजिप्तच्या नदीपासून महानदी फरातपर्यंत वाढवण्यात आल्या. (२ शमु. ८:१-१४) यहोवाने दाविदाला शक्‍ती दिल्यामुळे तो एक शक्‍तिशाली शासक बनला. बायबल त्याच्याविषयी असे म्हणते: “दाविदाची कीर्ति देशोदेशी पसरली; परमेश्‍वराने सर्व राष्ट्रांवर त्याचा धाक बसविला.”—१ इति. १४:१७.

९. भावी राजा या नात्याने येशू विजयी कसा ठरला आहे?

राजा दाविदाप्रमाणेच येशू देखील पृथ्वीवर असताना निर्भयी होता. भावी राजा या नात्याने त्याने, भूतग्रस्त लोकांची दुरात्म्यांच्या प्रभावातून सुटका करून दुरात्म्यांवर त्याचा अधिकार असल्याचे दाखवले. (मार्क ५:२, ६-१३; लूक ४:३६) आद्यशत्रू दियाबल सैतान याचेही येशूवर वर्चस्व नाही. यहोवाच्या शक्‍तीने येशूने, सैतानाच्या वर्चस्वाखाली असलेल्या जगावर विजय मिळवला.—योहा. १४:३०; १६:३३; १ योहा. ५:१९.

१०, ११. स्वर्गामध्ये येशूची योद्धा-राजा म्हणून काय भूमिका आहे?

१० प्रेषित योहानाला, येशूचा मृत्यू व त्याचे स्वर्गात पुनरुत्थान होऊन सुमारे ६० वर्षे उलटल्यानंतर एक भविष्यसूचक दृष्टांत झाला. या दृष्टांतात त्याने स्वर्गात योद्धा-राजा असलेल्या येशूला पाहिले. त्याविषयी तो असे लिहितो: “एक पांढरा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगूट देण्यात आला; तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.” (प्रकटी. ६:२) पांढऱ्‍या घोड्यावरील स्वार हा येशू आहे. १९१४ मध्ये जेव्हा त्याला स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून सिंहासनावर बसवण्यात आले तेव्हा “मुगूट देण्यात आला.” यानंतर तो “विजय मिळवीत मिळवीत” गेला. होय, दाविदाप्रमाणे येशूही एक विजयी राजा आहे. देवाच्या राज्याचा राजा म्हणून त्याला नियुक्‍त केल्यानंतर लगेच त्याने सैतानाशी युद्ध करून त्याला व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर फेकून दिले. (प्रकटी. १२:७-९) जोपर्यंत तो “विजयावर विजय” मिळवत म्हणजे सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा पूर्णपणे नाश करत नाही तोपर्यंत त्याची ही विजयी दौड चालू राहील.प्रकटीकरण १९:११, १९-२१ वाचा.

११ पण दाविदाप्रमाणेच येशू हा एक कनवाळू राजा आहे आणि तो ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ हर्मगिदोनादरम्यान संरक्षण करेल. (प्रकटी. ७:९, १४) तसेच, येशू आणि त्याच्या १,४४,००० पुनरुत्थित सहशासकांच्या राजवटीत, “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) पृथ्वीवरील जीवनासाठी ज्यांचे पुनरुत्थान होईल त्यांना अनंतकाळ जगण्याची आशा असेल. किती अद्‌भुत भवितव्य आहे त्यांच्यासाठी! तेव्हा, आपण सर्वजण ‘बरे ते करत’ राहूया जेणेकरून संपूर्ण पृथ्वी थोर दाविदाच्या धार्मिक व आनंदी प्रजेने भरेल तेव्हा आपल्यालाही त्या प्रजेतील एक होण्याची संधी मिळेल.—स्तो. ३७:२७-२९.

बुद्धीसाठी शलमोनाने केलेली प्रार्थना देव ऐकतो

१२. शलमोनाने यहोवाजवळ काय मागितले?

१२ दाविदाचा पुत्र शलमोनही येशूला पूर्वचित्रित करतो. * शलमोन राजा बनला तेव्हा यहोवाने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, की तो मागेल ते त्याला दिले जाईल. शलमोन आणखी धनसंपत्ती, सत्ता किंवा दीर्घ आयुष्य मागू शकला असता. पण त्याऐवजी त्याने निःस्वार्थपणे यहोवाला अशी विनंती केली: “आता या लोकांपुढे मी बाहेर जावे आणि आत यावे म्हणून मला बुद्धी व ज्ञान दे; कारण तुझ्या या मोठ्या लोकांचा न्याय कोणाला करता येईल?” (२ इति. १:७-१०, पं.र.भा.) यहोवाने शलमोनाच्या या प्रार्थनेचे उत्तर दिले.२ इतिहास १:११, १२ वाचा.

१३. शलमोन सर्वात बुद्धिमान होता असे का म्हणता येईल व ही बुद्धी त्याला कोठून मिळाली होती?

१३ शलमोन यहोवाशी विश्‍वासू होता तोपर्यंत, त्याच्या काळात त्याच्याइतका बुद्धिमान कोणीच नव्हता. शलमोनाने “तीन हजार नीतिसूत्रे” म्हटली. (१ राजे ४:३०, ३२, ३४) यांपैकी बहुतेक नीतिसूत्रे लिहून ठेवण्यात आली आणि आजही बुद्धी मिळवू पाहणारे लोक त्यांना मौल्यवान समजतात. शेबाची राणी, “कूट प्रश्‍नांनी” शलमोनाच्या बुद्धीची परीक्षा घेण्याकरता सुमारे २,४०० किलोमीटरचा प्रवास करून जेरूसलेमला आली होती. शलमोन जे काही बोलला ते ऐकून व त्याच्या राज्यातील ऐश्‍वर्य पाहून ती भारावून गेली. (१ राजे १०:१-९) शलमोनाला इतकी बुद्धी कोठून मिळाली होती त्याविषयी बायबल असे सांगते: “देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण [बुद्धी] ठेविले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरले लोक त्याच्या दर्शनास येत.”—१ राजे १०:२४.

बुद्धिमान राजाचे अनुसरण करा

१४. येशू कोणकोणत्या मार्गांनी “शलमोनापेक्षा थोर” होता?

१४ केवळ एक मनुष्य शलमोनापेक्षा बुद्धिमान होता. तो होता येशू ख्रिस्त. त्याने स्वतःविषयी असे म्हटले, की तो “शलमोनापेक्षा थोर” आहे. (मत्त. १२:४२) येशू “सार्वकालिक जीवनाची वचने” बोलला. (योहा. ६:६८) उदाहरणार्थ, डोंगरावरील प्रवचनात येशूने शलमोनाच्या नीतिसूत्रांतील सिद्धांतांवर अधिक तपशीलवार माहिती दिली व आणखी काही सिद्धांत मांडले. यहोवाच्या उपासकाला आनंद देणाऱ्‍या अनेक गोष्टींचे शलमोनाने वर्णन केले. (नीति. ३:१३; ८:३२, ३३; १४:२१; १६:२०) येशूनेही याच गोष्टीवर जोर देत म्हटले, की यहोवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या गोष्टींमुळे तसेच देवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेमुळे एखाद्या व्यक्‍तीला खरा आनंद मिळतो. त्याने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव बाळगणारे आनंदी आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्त. ५:३, NW) येशूच्या शिकवणींतून मिळणाऱ्‍या सिद्धांतांचे आपल्या जीवनात पालन करणारे, “जीवनाचा झरा” असलेल्या यहोवाच्या जवळ येतात. (स्तो. ३६:९; नीति. २२:११; मत्त. ५:८) ख्रिस्त “देवाचे ज्ञान” अर्थात बुद्धी आहे. (१ करिंथ. १:२४, ३०) मशीही राजा या नात्याने येशू ख्रिस्ताजवळ ‘सुज्ञानाचा आत्मा’ आहे.—यश. ११:२.

१५. देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीचा आज आपल्याला लाभ कसा होऊ शकतो?

१५ थोर शलमोनाचे अनुयायी या नात्याने आपण देवाकडून येणाऱ्‍या बुद्धीचा लाभ कसा करून घेऊ शकतो? यहोवाची बुद्धी त्याच्या वचनात प्रकट करण्यात आली आहे. तेव्हा, आपण या वचनाचा आणि विशेषकरून येशूच्या लिखित शब्दांचा काळजीपूर्वक अभ्यास करून तसेच वाचलेल्या गोष्टींवर मनन करून ही बुद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. (नीति. २:१-५) तसेच, आपल्याला बुद्धी मिळावी म्हणून आपणही देवाला सतत प्रार्थना करू शकतो. मदतीसाठी आपण मनापासून केलेल्या प्रार्थनांचे देव जरूर उत्तर देतो, अशी हमी देवाचे वचन आपल्याला देते. (याको. १:५) देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपल्याला, बायबलमधील बुद्धीचा अमूल्य ठेवा सापडेल. याच्या आधारावर आपण जीवनातील अडचणींवर मात करू शकतो व सुज्ञ निर्णय घेऊ शकतो. (लूक ११:१३) शलमोनाला ‘उपदेशक’ असे म्हटले आहे कारण त्याने सर्व लोकांना यहोवाची उपासना करण्यासाठी एकत्र बोलवून त्यांना ‘ज्ञान शिकवले.’ (उप. १२:९, १०) येशू देखील एक उपदेशक आहे कारण ख्रिस्ती मंडळीचा मस्तक या नात्याने तो आपल्या अनुयायांना यहोवाची उपासना करण्याचे आमंत्रण देतो. (योहा. १०:१६; कलस्सै. १:१८) यास्तव, आपण मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहतो. या सभांमध्ये आपल्याला सतत ‘शिकवले जाते.’

१६. शलमोन व येशू यांच्यात काय साम्यता आहे?

१६ शलमोनाने आपल्या कारकीर्दीत अनेक गोष्टी साध्य केल्या. त्याने संपूर्ण देशभर बांधकाम प्रकल्प राबवले. त्याने राजवाडे, रस्ते, जलकेंद्रे, भांडारासाठी, रथ व स्वार यांच्यासाठी नगरे बांधली. (१ राजे ९:१७-१९) आणि संपूर्ण राज्याला त्याच्या या बांधकामांचा फायदा झाला. येशूसुद्धा बांधकाम करणारा आहे. त्याने “ह्‍या खडकावर” म्हणजे स्वतःवर आपली मंडळी बांधली. (मत्त. १६:१८) आणि नवीन जगात पुढे चालू राहणाऱ्‍या बांधकामावरही तो देखरेख करणार आहे.—यश. ६५:२१, २२.

शांतीच्या राजाचे अनुसरण करा

१७. (क) कोणती उल्लेखनीय गोष्ट शलमोनाच्या राजवटीत होती? (ख) तरीपण शलमोन काय करू शकला नाही?

१७ शलमोन या नावाचा मूळ अर्थ “शांती” असा होतो. राजा शलमोनाने जेरूसलेमहून राज्य केले. आणि जेरूसलेमचा अर्थ “विपुल शांतीचे माहेर” असा होतो. शलमोनाच्या ४० वर्षांच्या राजवटीत, इस्राएल राष्ट्रात शांतीच शांती होती. या काळाविषयी बायबलमध्ये असे म्हटले आहे: “दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्‍यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहत होते.” (१ राजे ४:२५) शलमोन एक असाधारण राजा होता तरीही तो आपल्या प्रजेला, आजारपण, पाप व मृत्यू यांच्या विळख्यातून सोडवू शकला नाही. थोर शलमोन मात्र आपल्या प्रजेला या सर्वांतून सोडवणार आहे.रोमकर ८:१९-२१ वाचा.

१८. आज ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये आपण कोणता आनंद उपभोगत आहोत?

१८ आजही ख्रिस्ती मंडळीत शांती नांदत आहे. आपण खरोखरच आध्यात्मिक नंदनवनाचा आनंद उपभोगत आहोत. देव आणि सहमानव यांच्याबरोबर आपले शांतीसंबंध आहेत. आज आपण अनुभवत असलेल्या परिस्थितीविषयी यशयाने काय भाकीत केले होते ते पाहा: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यश. २:३, ४) देवाच्या पवित्र आत्म्यानुसार कार्य केल्याने आपणही आध्यात्मिक नंदनवनात नांदत असलेल्या शांतीला हातभार लावतो.

१९, २०. आनंदी होण्यासाठी आपल्याजवळ कोणकोणती कारणे आहेत?

१९ परंतु आपले भविष्य अधिक उत्तम असेल. आज्ञाधारक मानव, शांतीला अंत नसलेल्या येशूच्या राजवटीत राहतील आणि “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन” हळूहळू परिपूर्ण होतील. (रोम. ८:२१) हजार वर्षांच्या शेवटी होणाऱ्‍या अंतिम परीक्षेतून पार झालेले “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तो. ३७:११; प्रकटी. २०:७-१०) आपण कल्पनाही करू शकत नाही अशा रीतीने ख्रिस्त येशूची राजवट शलमोनाच्या राजवटीपेक्षा सरस ठरेल!

२० मोशे, दावीद व शलमोन यांच्या देखरेखीखाली इस्राएल राष्ट्र आनंदित होते. ख्रिस्ताच्या शासनाखाली आपण याहूनही अधिक आनंदी होऊ. (१ राजे ८:६६) थोर मोशे, थोर दावीद व थोर शलमोन यांची भूमिका बजावलेल्या आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी पाठवल्याबद्दल यहोवाचे शतशः आभार!

[तळटीपा]

^ परि. 4 दावीद या नावाचा अर्थ कदाचित “परमप्रिय” असा होतो. येशूचा बाप्तिस्मा आणि त्याचे रूपांतर झाले तेव्हा यहोवाने स्वर्गातून एका वाणीद्वारे त्याच्याविषयी, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे,” असे म्हटले.—मत्त. ३:१७; १७:५.

^ परि. 7 यासोबतच तो, आपल्या मेंढपाळावर भरवसा करणाऱ्‍या एका कोकऱ्‍यासारखा नम्र झाला. त्याने महान मेंढपाळ यहोवा याच्याकडे संरक्षण व मार्गदर्शन मिळण्याकरता पाहिले. “परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही,” असे तो पूर्ण भरवशाने म्हणू शकला. (स्तो. २३:१) बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने येशूची “देवाचा कोकरा!” अशी ओळख करून दिली.—योहा. १:२९.

^ परि. 12 शलमोनाचे दुसरे नाव “यदीद्या” म्हणजे “परमेश्‍वराला प्रिय” असेही होते.—२ शमु. १२:२४, २५.

तुम्ही समजावून सांगू शकाल का?

• येशू थोर दावीद कसा आहे?

• येशू थोर शलमोन कसा आहे?

• थोर दावीद व थोर शलमोन असलेल्या येशूचा तुम्ही आदर का करता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३१ पानांवरील चित्र]

देवाने शलमोनाला दिलेली बुद्धी, थोर शलमोनाच्या बुद्धीला पूर्वचित्रित करते

[३२ पानांवरील चित्र]

आपण कल्पनाही करू शकत नाही अशा रीतीने ख्रिस्त येशूची राजवट शलमोनाच्या व दाविदाच्या राजवटीपेक्षा सरस ठरेल!