व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?

अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?

अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?

यहोवा सध्याच्या दुष्ट जगाचा हर्मगिदोनात अंत करेल तेव्हा नीतिमान लोकांचे काय होईल? नीतिसूत्रे २:२१, २२ याचे उत्तर देते: “सरळ जनच देशात [“पृथ्वीवर,” NW] वस्ती करितील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून [पृथ्वीवरून] उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.”

पण, फक्‍त सात्विक जनच पृथ्वीवर टिकून राहतील, हे कसे काय घडेल? त्यांच्या संरक्षणासाठी एखादे खास ठिकाण असेल का? अंत येईल तेव्हा सात्विकांनी कोठे असले पाहिजे? गतकाळात नाशातून बचावलेल्यांबद्दल असलेले बायबलमधील चार अहवाल या बाबींवर प्रकाश टाकतात.

जेव्हा स्थान महत्त्वाचे होते

प्राचीन काळातील नोहा व लोट यांच्या बचावाबद्दल २ पेत्र २:५-७ मध्ये असे सांगितले आहे: “[देवाने] प्राचीन जगाचीहि गय केली नाही, तर अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्‍याचे सात जणांसह रक्षण केले; पुढे होणाऱ्‍या अभक्‍तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांस विध्वंसाची शिक्षा केली; आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान्‌ लोट ह्‍याची सुटका केली.”

नोहाचा जलप्रलयातून कशा प्रकारे बचाव झाला? देवाने नोहाला सांगितले: “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर.” (उत्प. ६:१३, १४) नोहाने, अगदी यहोवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले. जलप्रलय सुरू होण्याच्या सात दिवसांआधी, यहोवाने नोहाला सर्व प्राण्यांना एकत्र करून आपल्या कुटुंबासोबत तारवात जाण्याची सूचना दिली. सातव्या दिवशी तारवाचे दार बंद करण्यात आले आणि “चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठविली.” (उत्प. ७:१-४, ११, १२, १६) पण, नोहा आणि त्याच्या कुटुंबाला “पाण्यातून वाचविण्यात आले.” (१ पेत्र ३:२०) बचावाकरता त्यांनी तारवाच्या आत असणे आवश्‍यक होते. कारण, पृथ्वीवर इतर कोणतेही ठिकाण नव्हते जिथे ते सुरक्षित राहू शकले असते.—उत्प. ७:१९, २०.

लोटाच्या बाबतीत पाहिले, तर त्याला देण्यात आलेल्या सूचना काहीशा वेगळ्या स्वरूपाच्या होत्या. त्याने कोठे असू नये याविषयी दोन देवदूतांनी त्याला सूचना दिल्या. त्यांनी लोटाला सांगितले: “तुझे दुसरे कोणी या नगरात [सदोम] असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ. कारण आम्ही ह्‍या स्थानाचा नाश करणार आहो.” त्यांना ‘डोंगराकडे पळ काढण्यास’ सांगण्यात आले.—उत्प. १९:१२, १३, १७.

नोहा आणि लोट यांच्या बाबतीत जे घडले त्यावरून हे सिद्ध होते, की “भक्‍तिमान्‌ लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान्‌ लोकांस . . . न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) नाशातून बचावण्याविषयीच्या या दोन्ही अहवालांत स्थान महत्त्वाचे होते. नोहाला तारवाच्या आत जायचे होते; तर लोटाला सदोम शहरातून बाहेर पडायचे होते. पण, बचाव होण्यासाठी नेहमीच एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणे जरुरी आहे का? नीतिमान लोकांना कोणत्याही विशिष्ट स्थानी जायला न लावता, म्हणजेच ते कोठेही असले तरी यहोवा त्यांचा बचाव करू शकतो का? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी, नाशातून बचावण्याविषयीच्या आणखी दोन अहवालांवर लक्ष देऊ या.

स्थान नेहमीच महत्त्वाचे असते का?

मोशेच्या काळात, इजिप्त देशावर विनाशकारी दहावी पीडा आणण्याआधी, यहोवाने इस्राएल लोकांना वल्हांडणासाठी बलिदान केलेल्या पशूचे रक्‍त दाराच्या चौकटीच्या वर व दोन्ही बाजूंना लावण्याची आज्ञा दिली. का? जेणेकरून, ‘परमेश्‍वर मिसऱ्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरेल [तेव्हा] ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्‍यांवर रक्‍त लाविलेले तो पाहील, ते ते दार तो ओलांडून जाईल.’ आणि अशा रीतीने त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांचा नाश होणार नाही. त्या रात्री, “मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्‍या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुरांढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्‍वराने मारून टाकिले.” पण, इस्राएल लोकांच्या ज्येष्ठ पुत्रांचा मात्र बचाव झाला आणि कोणालाही आपले स्थान सोडून इतर ठिकाणी जावे लागले नाही.—निर्ग. १२:२२, २३, २९.

यरीहो शहरात राहणाऱ्‍या राहाब नावाच्या वेश्‍येच्या बाबतीत जे घडले त्याच्याकडे देखील लक्ष द्या. त्यावेळी, इस्राएल लोक प्रतिज्ञात देश काबीज करण्याच्या बेतात होते. यरीहोचा नाश ठरलेला आहे हे ओळखून राहाबेने इस्राएलच्या दोन हेरांना सांगितले की आगेकूच करत असलेल्या इस्राएल लोकांमुळे शहरातील लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. तिने त्या हेरांना लपवले व त्यांना अशी शपथ घ्यायला लावली की यरीहो काबीज होईल तेव्हा तिला व तिच्या कुटुंबाला वाचवले जाईल. हेरांनी राहाबेला सांगितले की तिने शहराच्या तटावर असलेल्या आपल्या घरात आपल्या कुटुंबाला एकत्र करावे. घराबाहेर पडल्यास शहरातील इतर लोकांसोबत त्यांचाही नाश होणार होता. (यहो. २:८-१३, १५, १८, १९) पण, यहोवाने नंतर यहोशवाला असे सांगितले, की “नगराचा तट जागच्या जागी कोसळेल.” (यहो. ६:५) हेरांनी बचावासाठी जे ठिकाण सुरक्षित ठरवले होते, ते आता धोक्यात आले होते. तर मग, राहाब व तिच्या कुटुंबाला कशा प्रकारे वाचवण्यात आले?

यरीहो शहरावर विजय मिळवण्याची वेळ आली तेव्हा, इस्राएल लोक मोठ्याने जयघोष करत रणशिंगे वाजवू लागले. यहोशवा ६:२० मध्ये असे म्हटले आहे: “रणशिंगांचा आवाज ऐकताच [इस्राएल] लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला.” तो तट कोसळण्यापासून थांबवणे कोणत्याही मनुष्याच्या हाती नव्हते. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, सबंध तट कोसळला नाही. तटाच्या ज्या भागावर राहाबेचे घर होते तेवढा भाग तसाच राहिला. यहोशवाने त्या दोन हेरांना आज्ञा केली: “तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्‍येच्या घरी जाऊन तिला आणि तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा.” (यहो. ६:२२) अशा प्रकारे राहाबेच्या घरात असलेल्या सर्व जणांना वाचवण्यात आले.

कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची होती?

नोहा, लोट, मोशेच्या काळातील इस्राएल लोक आणि राहाब यांचा ज्याप्रमाणे बचाव करण्यात आला त्यावरून आपण काय शिकू शकतो? या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा आपण कोठे असायला हवे हे ठरवायला वरील अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतात?

नोहा तारवात गेल्यामुळे त्याचा बचाव झाला हे खरे आहे. पण, मुळात तो तारवात का गेला? त्याने देवावर विश्‍वास ठेवला आणि त्याच्या आज्ञेचे पालन केले हेच त्यामागचे मुख्य कारण नव्हते का? बायबल असे सांगते: “देवाने [नोहाला] जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२; इब्री ११:७) आपल्याबद्दल काय? आपणही देवाने जे काही सांगितले आहे ते करत आहोत का? नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” देखील होता. (२ पेत्र २:५) आपल्या क्षेत्रातील लोक फारसा चांगला प्रतिसाद देत नसले, तरीसुद्धा आपण नोहाप्रमाणे आवेशाने प्रचार कार्य करत आहोत का?

लोटाने सदोम शहरातून पळ काढल्यामुळे तो नाशातून बचावला. तो देवाच्या दृष्टीत नीतिमान होता आणि सदोम व गमोरा शहरातील दुष्कर्मी लोकांच्या अनैतिक आचरणामुळे अतिशय दुःखी होता त्यामुळे त्याचा बचाव झाला. आज सर्वत्र दिसणाऱ्‍या अनैतिकतेबद्दल आपल्याला खरोखरच दुःख वाटते का? की ही अनैतिकता पाहून आपल्याला आता काहीच वाटत नाही इतके आपले मन संवेदनाशून्य झाले आहे? या जगात “निष्कलंक व निर्दोष असे शांतीत” असण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करत आहोत का?—२ पेत्र ३:१४.

इजिप्तमधील इस्राएल लोकांना आणि यरीहोतील राहाबेला नाशातून बचावण्याकरता आपल्या घरांमध्येच थांबायचे होते. असे करण्यासाठी विश्‍वासाची व आज्ञाधारक असण्याची गरज होती. (इब्री ११:२८, ३०, ३१) एकापाठोपाठ एक इजिप्शियन कुटुंबात “मोठा हाहाःकार उडाला,” तशा प्रत्येक इस्राएल कुटुंबातील सदस्यांच्या नजरा त्यांच्या ज्येष्ठ पुत्रावर कशा खिळल्या असतील याची कल्पना करा. (निर्ग. १२:३०) यरीहोचा तट कोसळण्याचा आवाज कानावर पडला तेव्हा राहाब व तिच्या कुटुंबाचे सदस्य आपल्या घरात कसे जीव मुठीत घेऊन बसले असतील याची कल्पना करा. राहाबेचे घर तटबंदीवरच होते. त्यामुळे, दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी आणि आपल्या घरातच थांबून राहण्यासाठी राहाबेला खरोखरच मोठ्या विश्‍वासाची गरज होती.

लवकरच सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत होणार आहे. यहोवाच्या ‘क्रोधाचा’ भयानक दिवस येईल तेव्हा तो आपल्या लोकांचे संरक्षण नेमके कशा प्रकारे करेल हे सध्या आपल्याला माहीत नाही. (सफ. २:३) पण, एवढे मात्र नक्की की आपण कोठेही आणि कोणत्याही परिस्थितीत असलो, तरी यहोवावर विश्‍वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे यावरच आपला बचाव अवलंबून राहील. तोपर्यंत, यशयाच्या भविष्यवाणीत ज्या ‘खोल्यांबद्दल’ सांगितले आहे त्यांबद्दल आपण योग्य मनोवृत्ती विकसित करू या.

“आपआपल्या खोल्यांत जा”

यशया २६:२० मध्ये असे म्हटले आहे: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” सा.यु.पू. ५३९ मध्ये मेदी व पारसी लोकांनी बॅबिलोनवर विजय मिळवला तेव्हा या भविष्यवाणीची पहिली पूर्तता झाली असावी. बॅबिलोनमध्ये प्रवेश केल्यावर, पर्शियन राजा कोरेश याने शहरातील सर्वांना आपआपल्या घरातच राहण्याची आज्ञा दिली होती, कारण घराबाहेर दिसणाऱ्‍या प्रत्येकाला जिवे मारण्यात यावे असा त्याच्या सैनिकांना हुकूम देण्यात आला होता.

आपल्या काळात, या भविष्यवाणीत सांगितलेल्या ‘खोल्या’ जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या १,००,००० पेक्षा जास्त मंडळ्यांशी संबंधित असू शकतात. या मंडळ्यांची आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे. आणि ‘मोठ्या संकटाच्या’ सबंध काळादरम्यानही त्या आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतील. (प्रकटी. ७:१४) देवाच्या लोकांना आपल्या “खोल्यांत” जाऊन “क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत” लपून राहण्याची आज्ञा देण्यात आली आहे. म्हणूनच, मंडळीप्रती योग्य मनोवृत्ती विकसित करणे व ती टिकवून ठेवणे अतिशय गरजेचे आहे. तसेच, नेहमी मंडळीच्या निकट सहवासात राहण्याचा दृढनिश्‍चय करणेही महत्त्वाचे आहे. तर मग, पौलाने दिलेल्या या सल्ल्याचे आपण मनापासून पालन करू या: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते तसतसा तो अधिक करावा.”—इब्री १०:२४, २५.

[७ पानांवरील चित्रे]

गतकाळात यहोवाने लोकांच्या बचावासाठी जे केले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

[८ पानांवरील चित्र]

आधुनिक काळात, ‘खोल्या’ कशास सूचित करू शकतात?