व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इत्तयाच्या एकनिष्ठ उदाहरणाचे अनुकरण करा

इत्तयाच्या एकनिष्ठ उदाहरणाचे अनुकरण करा

इत्तयाच्या एकनिष्ठ उदाहरणाचे अनुकरण करा

“हेप्रभु देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र [‘एकनिष्ठ,’ NW] आहेस.” हे गीत ‘श्‍वापदावर व त्याच्या मूर्तीवर जय मिळविलेल्या लोकांनी’ स्वर्गात गायिले होते आणि ते देवाच्या एकनिष्ठेकडे आपले लक्ष वेधते. (प्रकटी. १५:२-४) यहोवाची ही इच्छा आहे की त्याच्या उपासकांनी हा उत्कृष्ट गुण दाखवण्यात त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करावे.

दुसरीकडे पाहता दियाबल सैतान, देवाच्या पृथ्वीवरील सेवकांना त्याच्या प्रेमापासून दूर करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करत आहे. पण, तरीसुद्धा अनेकजण कठीण परिस्थितीतही देवाला एकनिष्ठ राहिले आहेत. यहोवा अशा लोकांची खूप कदर करतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! बायबल आपल्याला ही खात्री देते की: “परमेश्‍वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्‍तांस [एकनिष्ठ उपासकांस] सोडीत नाही.” (स्तो. ३७:२८) आपल्याला एकनिष्ठ राहायला मदत मिळावी म्हणून त्याने त्याच्या वचनात अशा अनेक एकनिष्ठ व्यक्‍तींची कार्ये नमूद करून ठेवली आहेत. इत्तय गित्ती हा त्यांच्याचपैकी एक.

“परका व हद्दपार केलेला”

इत्तय हा बहुधा शक्‍तिशाली गल्याथ व इस्राएल लोकांच्या इतर भयानक शत्रूंचे जन्मस्थान असलेल्या गथ या पलिष्टातील विख्यात शहराचा राहणारा असावा. अबशालोमाने दाविदाविरुद्ध बंड केले तेव्हा बायबलमध्ये या कसलेल्या योद्ध्‌याचा पहिल्यांदा उल्लेख येतो. त्यावेळी इत्तय व त्याच्याबरोबर गथवरून आलेले ६०० लोक आपल्या देशातून हद्दपार झाल्यामुळे जेरूसलेम जवळ राहत होते.

इत्तय व त्याच्या साथीदारांची अवस्था बघून दाविदाला ते दिवस आठवले असतील, जेव्हा तो आपल्या ६०० वीर योद्ध्‌यांबरोबर जेरूसलेममधून पळ काढून पलिष्टातील गथचा राजा आखीश याच्या हद्दीत राहिला होता. (१ शमु. २७:२, ३) आता मात्र दाविदाचा पुत्र अबशालोम याने त्याच्याविरुद्ध बंड पुकारले होते. तेव्हा इत्तय व त्याचे लोक आता काय करणार होते? ते अबशालोमाची बाजू घेणार होते, तटस्थ राहणार होते की दावीद व त्याच्या साथीदारांना साथ देणार होते?

हे दृश्‍य डोळ्यांपुढे उभे करा. जेरूसलेममधून पळ काढल्यानंतर दावीद बेथ-मरहाक या ठिकाणी थांबतो ज्याचा अर्थ “दूर असलेले घर” असा होतो. किद्रोन खोरे पार करण्यापूर्वी जैतूनाच्या डोंगराच्या दिशेने असलेले जेरूसलेममधील ते शेवटचे घर असावे. (२ शमु. १५:१७) येथे दावीद आपल्या सैन्याची पाहणी करतो. तेव्हा त्याला दिसते की त्याच्यासोबत फक्‍त विश्‍वासू इस्त्राएलीच नव्हे तर सर्व करेथी व सर्व पलेथी देखील आहेत. तसेच सर्व गथकरी म्हणजेच इत्तय व त्याचे ६०० योध्देही त्याच्यासोबत आहेत.—२ शमु. १५:१८.

इत्तयाबद्दल कळकळ वाटून दावीद त्याला म्हणतो: “तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ [अबशालोमाजवळ] राहा; तू तर परका व हद्दपार केलेला आहेस; तू आपल्या स्थानी परत जा; तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवीत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदासहि परत ने; दया व सत्य तुझ्यासमागमे राहोत.”—२ शमु. १५:१९, २०.

इत्तय जे उत्तर देतो त्यावरून दाविदाप्रती त्याची अटळ निष्ठा दिसून येते. तो म्हणतो: “परमेश्‍वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामीराजांच्या जीविताची शपथ, प्राण जावो की राहो, जिकडे माझे महाराज जातील तिकडे आपला सेवकहि असणार.” (२ शमु. १५:२१) त्याचे बोलणे ऐकून दाविदाला आपली पणजी रूथ हिची आठवण आली असावी, तिनेही असेच उद्‌गार काढले होते. (रूथ १:१६, १७) इत्तयाचे शब्द दाविदाच्या अंतकरणाला भिडतात. तो त्याला म्हणतो: “जा, पार निघून जा.” तेव्हा, ‘इत्तय गित्ती याची सर्व माणसे व सर्व मुलेबाळे ही पार निघून जातात.’—२ शमु. १५:२२.

“आपल्या शिक्षणाकरिता”

रोमकर १५:४ म्हणते, ‘जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले आहे.’ म्हणूनच, आपण हा प्रश्‍न विचारात घेतला पाहिजे की इत्तयाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? दाविदाशी एकनिष्ठ राहायला त्याला कशामुळे प्रेरणा मिळाली असेल याचा विचार करा. इत्तय जरी पलिष्टमधून हद्दपार झालेला व परका असला, तरी यहोवा हा जिवंत देव आहे व दावीद त्याचा निवडलेला सेवक आहे हे त्याने ओळखले होते. इस्त्राएली व पलिष्ट्यांमध्ये जे वैर होते त्याचा परिणाम इत्तयाने स्वतःवर होऊ दिला नाही. दाविदाने पलिष्ट्यांचा वीर गल्याथ व आपल्या इतर अनेक देशबांधवांना मारले आहे असा विचार त्याने केला नाही. (१ शमु. १८:६, ७) दाविदाचे यहोवावर प्रेम आहे हे इत्तयाने पाहिले होते व त्याच्यामध्ये असलेले उल्लेखनीय गुण देखील त्याने पाहिले होते. शिवाय, दाविदाच्याही मनात इत्तयाविषयी गहिरा आदर निर्माण झाला. दाविदाने अबशालोमाविरुद्ध लढताना “एकतृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले.”—२ शमु. १८:२.

आपणही सांस्कृतिक भिन्‍नता किंवा जातीभेद, म्हणजेच आपल्या मनात इतरांबद्दल असलेले कोणतेही पूर्वग्रह किंवा वैरभाव याकडे लक्ष न देता त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे. दावीद व इत्तय यांच्यातील नातेसंबंधावरून हे स्पष्ट होते की जेव्हा आपण यहोवाविषयी जाणून घेतो व त्याच्यावर प्रेम करू लागतो, तेव्हा आपणही अशा अडथळ्यांवर मात करू शकतो.

इत्तयाच्या उदाहरणावर मनन करताना आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘थोर दावीद असलेल्या येशूप्रती मी अशीच एकनिष्ठा दाखवतो का? राज्यप्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशी सहभाग घेऊन मी एकनिष्ठ असल्याचे दाखवतो का? (मत्त. २४:१४; २८:१९, २०) माझी एकनिष्ठा सिद्ध करण्यासाठी कितपत सहन करण्याची माझी तयारी आहे?’

कुटुंबप्रमुखांनाही इत्तयाच्या एकनिष्ठ उदाहरणावर मनन केल्याने फायदा होऊ शकतो. दाविदाप्रती इत्तयाने जी निष्ठा दाखवली व देवाच्या या नियुक्‍त राजाबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला त्याचा परिणाम त्याच्या लोकांवरही झाला होता. त्याचप्रमाणे कुटुंबप्रमुख खऱ्‍या उपासनेसंबंधाने जे निर्णय घेतात त्यांचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होऊ शकतो व यामुळे काही काळासाठी त्यांना अडचणींनाही तोंड द्यावे लागू शकते. तरीसुद्धा, आपल्याला असे आश्‍वासन देण्यात आले आहे की “एकनिष्ठांशी [यहोवा] एकनिष्ठेने वागतो.”—स्तो. १८:२५, NW.

अबशालोमाशी दाविदाच्या झालेल्या युद्धाबद्दलच्या वृत्तांतानंतर बायबलमध्ये इत्तयाचा उल्लेख आढळत नाही. देवाच्या वचनात त्याच्याबद्दल अगदी थोडीशीच माहिती जरी असली, तरी दाविदाच्या जीवनातील त्या कठीण काळात इत्तयाने दाखवलेल्या निष्ठेबद्दल व त्याच्या एकंदर व्यक्‍तिमत्वाबद्दल आपल्याला या माहितीतून बरेच काही समजते. बायबलच्या प्रेरित अहवालात इत्तयाबद्दलची माहिती समाविष्ट करण्यात आली यावरून हे सिद्ध होते की यहोवा एकनिष्ठा दाखवणाऱ्‍यांची कदर करतो व त्यांना प्रतिफळही देतो.—इब्री ६:१०.