व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या

तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या

तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या

“तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.”—१ तीम. ४:१५.

१. तरुणांसाठी देवाची काय इच्छा आहे?

“तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा.” (उप. ११:९, ईझी टू रीड) हे आहेत प्राचीन इस्राएलचा सुज्ञ राजा शलमोन याचे शब्द. हे शब्द प्रेरित करणाऱ्‍या यहोवा देवाला, तुम्ही तरुणांनी आनंदित असावे असे वाटते, यात काहीही शंका नाही. आणि तारुण्यातच नव्हे तर त्यापुढेही तुमचा हा आनंद टिकून राहावा अशी यहोवाची इच्छा आहे. पण, तरुणपणात सहसा तरुणांच्या हातून अशा काही गंभीर चुका होतात ज्यांमुळे त्यांच्या भावी आयुष्यातील आनंदावर विरजण पडू शकते. विश्‍वासू ईयोबानेही आपल्या ‘तारुण्यातील पातकांविषयी’ दुःख व्यक्‍त केले होते. (ईयो. १३:२६) किशोरावस्थेत आणि त्यानंतरच्या काही वर्षांत एका तरुण ख्रिस्ती व्यक्‍तीला बरेच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. तारुण्याच्या या काळात घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाची सल कायम मनात राहते व याचा उर्वरित आयुष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.—उप. ११:१०.

२. बायबलमधील कोणत्या तत्त्वाचे पालन केल्याने तरुणांना गंभीर चुका करण्याचे टाळता येईल?

तरुणांनी सुज्ञपणे विचार करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रेषित पौलाने करिंथकरांना दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या. त्याने लिहिले: “बालबुद्धीचे होऊ नका; . . . समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” (१ करिंथ. १४:२०) या सल्ल्याचे पालन करून, एका प्रौढ व्यक्‍तीप्रमाणे विचार व तर्क करायला शिकल्यामुळे तरुणांना जीवनात गंभीर चुका करण्याचे टाळता येईल.

३. प्रौढांसारखे समजूतदार बनण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तरुणांनो, प्रौढांसारखा समजूतदारपणा आपोआप येत नाही, तर त्यासाठी पुष्कळ मेहनत घ्यावी लागते हे लक्षात ठेवा. पौलाने तीमथ्याला सांगितले: “कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीति, विश्‍वास व शुद्धता ह्‍यांविषयी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा कित्ता हो. . . . वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव. . . . तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.” (१ तीम. ४:१२-१५) त्याअर्थी, ख्रिस्ती तरुणांनी सतत प्रगती करत राहिले पाहिजे आणि त्यांची ही प्रगती सर्वांना दिसून आली पाहिजे.

प्रगती म्हणजे काय?

४. ख्रिस्ती या नात्याने प्रगती करण्याचा काय अर्थ होतो?

प्रगतीचा अर्थ, ‘सुधारणा करून पूर्वीपेक्षा आणखी चांगले बनणे.’ पौलाने तीमथ्याला त्याचे भाषण, वर्तन, प्रीती, विश्‍वास, व नैतिक शुद्धता, तसेच त्याचे सेवाकार्य या सर्व बाबतींत प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहण्याचे प्रोत्साहन दिले. इतरांनाही त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी अशा प्रकारे आचरण करण्याचा त्याने प्रयत्न करायचा होता. म्हणूनच, तीमथ्याला सतत आध्यात्मिक प्रगती करत राहायचे होते.

५, ६. (क) तीमथ्याने केव्हापासून आध्यात्मिक प्रगती करण्यास सुरुवात केली होती? (ख) प्रगती करण्याच्या बाबतीत आज तरुण कशा प्रकारे तीमथ्याचे अनुकरण करू शकतात?

पौलाने तीमथ्याला सा.यु. ६१ ते ६४ सालादरम्यान वरील सल्ला दिला, तेव्हा तीमथ्य आधीच मंडळीत एक अनुभवी वडील होता. म्हणजे, त्याने इतक्यातच आध्यात्मिक प्रगती करण्यास सुरुवात केली नव्हती. सा.यु. ४९ किंवा ५० साली तीमथ्य साधारण वीसेक वर्षांचा असताना, त्याची आध्यात्मिक प्रगती पाहून “लुस्त्रांतले व इकुन्यांतले बंधु [त्याला] नावाजीत होते.” (प्रे. कृत्ये १६:१-५) त्याच सुमारास, पौलाने तीमथ्याला आपल्यासोबत मिशनरी दौऱ्‍यावर नेले. आणखी काही महिने तीमथ्याची पुढील प्रगती पाहिल्यावर पौलाने त्याला थेस्सलनीका शहरातील ख्रिस्ती बांधवांना सांत्वन देण्याकरता व विश्‍वासात स्थिर करण्याकरता तेथे पाठवले. (१ थेस्सलनीकाकर ३:१-३,  वाचा.) या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होते, की तीमथ्याने तरुणपणीच सर्वांच्या लक्षात येण्याजोगी प्रगती केली होती.

तेव्हा मंडळीतील तरुणांनो, आवश्‍यक आध्यात्मिक गुण विकसित करण्याचा आतापासूनच प्रयत्न करा, जेणेकरून ख्रिस्ती वर्तनात तसेच बायबलमधील सत्ये इतरांना शिकवण्याच्या कलेत तुमची प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल. येशू १२ वर्षांचा होता, तेव्हापासूनच तो ‘ज्ञानाने वाढत गेला.’ (लूक २:५२) तुम्हीही खासकरून तीन क्षेत्रांत, (१) समस्यांचा सामना करताना, (२) लग्नाचा विचार करताना, आणि (३) “चांगला सेवक” बनण्याच्या दिशेने प्रयत्न करताना इतरांना लक्षात येण्याजोगी प्रगती कशी करू शकता याविषयी आता आपण चर्चा करू या.—१ तीम. ४:६.

समस्यांना समंजसपणे तोंड द्या

७. समस्यांचा तरुणांवर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो?

कॅरल नावाची १७ वर्षांची एक ख्रिस्ती तरुणी म्हणते, “कधीकधी माझ्यावर खूप ताण येतो. मी मनानं व शरीरानं अगदी थकून गेले आहे असं मला वाटतं. इतकी, की सकाळी मला उठायलाही नको वाटतं.” * ती इतक्या तणावाखाली का आहे? कॅरल दहा वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिला तिच्या आईबरोबर राहावे लागत होते, जी बायबलमधील नीतिनियमांना मानत नव्हती. कॅरलप्रमाणे, कदाचित तुम्हीही अतिशय तणावपूर्ण परिस्थितीतून जात असाल आणि या परिस्थितीत बदल होण्याची काहीच चिन्हे तुम्हाला दिसत नसतील.

८. तीमथ्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

आध्यात्मिक प्रगती करत असताना, तीमथ्यालाही समस्यांचा सामना करावा लागला होता. उदाहरणार्थ, त्याला ‘वारंवार होणाऱ्‍या दुखण्याचा’ म्हणजे पोटदुखीचा त्रास होता. (१ तीम. ५:२३) पौलाच्या प्रेषितपणाबद्दल आक्षेप घेणाऱ्‍यांनी निर्माण केलेले मतभेद मिटवण्यासाठी एकदा पौलाने तीमथ्याला करिंथ मंडळीत पाठवले होते. तेव्हा त्याने मंडळीतील बांधवांना आग्रह केला की तीमथ्याने त्यांच्याजवळ “निर्भयपणाने राहावे” म्हणून त्यांनी तीमथ्याला सहकार्य करावे. (१ करिंथ. ४:१७; १६:१०, ११) यावरून असे दिसते की कदाचित तीमथ्य स्वभावाने लाजाळू किंवा बुजरा असावा.

९. समंजस असणे याचा काय अर्थ होतो आणि हे भित्रेपणाच्या आत्म्यापासून कशा प्रकारे वेगळे आहे?

तीमथ्याची मदत करण्याच्या हेतूने पौलाने नंतर त्याला अशी आठवण करून दिली: “देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा [समंजसपणाचा] आत्मा दिला आहे.” (२ तीम. १:७) समंजस असण्याचा अर्थ समजदारपणे विचार व तर्क करणे असा होतो. यात आपल्या मनासारखी परिस्थिती नसली तरी तिचा स्वीकार करण्याची क्षमता असणेही समाविष्ट आहे. आध्यात्मिक रीत्या प्रौढ नसलेले काही तरुण भित्रेपणाचा आत्मा दाखवतात व तणावापासून दूर पळण्यासाठी झोपण्यात किंवा टीव्ही पाहण्यात खूप वेळ घालवणे, मादक पदार्थ व दारूच्या आहारी जाणे, नेहमी पार्ट्यांना जाणे किंवा अनैतिक लैंगिक कृत्यांत गुरफटणे यांसारखे मार्ग निवडतात. ख्रिश्‍चनांना ताकीद देण्यात आली आहे: “आपण अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने [समंजसपणाने], नीतीने, व सुभक्‍तीने वागावे.”—तीत २:१३.

१०, ११. समंजसपणा आपल्याला कशा प्रकारे देवाकडून मिळणाऱ्‍या शक्‍तीवर भरवसा ठेवण्यास साहाय्य करेल?

१० बायबल प्रोत्साहन देते की “तरुण पुरुषांनी मर्यादशील [समंजस] असावे.” (तीत २:६) समस्यांचा सामना करताना प्रार्थना करण्याद्वारे आणि देव पुरवत असलेल्या शक्‍तीवर विसंबून राहण्याद्वारे तुम्ही या सल्ल्याचे पालन करू शकता. (१ पेत्र ४:७ वाचा.) अशा रीतीने तुम्ही ‘देवाने दिलेल्या शक्‍तीवर’ मनापासून भरवसा ठेवण्यास शिकाल.—१ पेत्र ४:११.

११ कॅरलला समंजसपणा व प्रार्थना या दोन गोष्टींमुळे मदत मिळाली. ती म्हणते “आईच्या अनैतिक जीवनशैलीचा विरोध करणं माझ्यासाठी अत्यंत कठीण होतं, पण प्रार्थनेमुळे मला खरंच खूप मदत मिळाली. मला माहीत आहे की यहोवा माझ्यासोबत आहे, त्यामुळे आता मला कशाचीही भीती वाटत नाही.” कठीण परिस्थितीमुळे तुमच्या व्यक्‍तिमत्वात अनेक चांगले गुण निर्माण होऊ शकतात व तुम्हाला भविष्यातील परीक्षांना तोंड देण्याचे धैर्य मिळू शकते हे नेहमी आठवणीत असू द्या. (स्तो. १०५:१७-१९; विलाप. ३:२७) कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी हे ध्यानात ठेवा की यहोवा तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. तो तुम्हाला नक्की ‘सहाय्य’ करील.—यश. ४१:१०.

सफल वैवाहिक जीवनाची तयारी

१२. लग्नाचा विचार करणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीने नीतिसूत्रे २०:२५ मधील तत्त्वाचे पालन का केले पाहिजे?

१२ काही ख्रिस्ती तरुण लग्नाची घाई करतात. जीवनातील निराशा, एकाकीपणा, कंटाळा, घरातील समस्या या सगळ्यांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे असे त्यांना वाटते. पण, लग्नाची शपथ घेणे ही एक गंभीर बाब आहे. बायबलमध्ये अशा काही लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांनी पुरेसा विचार न करता उतावीळपणे देवाला नवस केला होता. (नीतिसूत्रे. २०:२५ वाचा.) त्याचप्रमाणे कधीकधी तरुणही, लग्नानंतर आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्‍या येतील याचा गंभीरतेने विचार करत नाहीत. पण नंतर त्यांच्या लक्षात येते की लग्न म्हणजे बाहुला-बाहुलीचा खेळ नाही.

१३. लग्नाचा विचार करणाऱ्‍यांनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत आणि याविषयी कोणती उपयुक्‍त माहिती उपलब्ध आहे?

१३ म्हणूनच, लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘मला लग्न का करायचे आहे? माझ्या काय अपेक्षा आहेत? ही व्यक्‍ती माझ्यासाठी योग्य आहे का? विवाहित जीवनाच्या जबाबदाऱ्‍या पेलण्यास मी तयार आहे का?’ तुम्हाला आत्मपरीक्षण करायला साहाय्य करण्यासाठी ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ अतिशय सुस्पष्ट मार्गदर्शन प्रकाशित केले आहे. * (मत्त. २४:४५-४७) या माहितीद्वारे यहोवा खास तुम्हाला मार्गदर्शन देत आहे असा दृष्टिकोन बाळगा. ही माहिती नीट पडताळून पाहा व तिचा उपयोग करा. कधीही, “निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्‍यांसारखे होऊ नका.” (स्तो. ३२:८, ९) लग्नानंतर येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या पूर्णपणे समजून घ्या. आणि जर आपण लग्नासाठी तयार आहोत असे तुम्हाला वाटत असेल, तर लग्नाआधी भावी जोडीदारासोबत भेटीगाठी करताना ‘शुद्धतेच्या बाबतीत कित्ता होण्याची’ खबरदारी बाळगा.—१ तीम. ४:१२.

१४. आध्यात्मिक प्रगतीचा तुम्हाला वैवाहिक जीवनात कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

१४ आध्यात्मिक प्रौढता केवळ लग्नाचा निर्णय घेतानाच नव्हे, तर वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्याकरता नंतरही उपयुक्‍त ठरते. जो ख्रिस्ती आध्यात्मिक रीत्या प्रौढ असतो, तो “ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” पोचण्याचा प्रयत्न करतो. (इफिस. ४:११-१४) ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा तो कसोशीने प्रयत्न करतो. आपला आदर्श असणाऱ्‍या ख्रिस्ताने कधीही “स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” (रोम. १५:३) त्याच प्रकारे, जेव्हा पतीपत्नी स्वतःच्याच स्वार्थाचा विचार न करता आपल्या जोडीदाराच्या हिताचा विचार करतात तेव्हा त्यांचे कौटुंबिक जीवन सुखावह बनते. (१ करिंथ. १०:२४) अशा कुटुंबात पती आपल्या पत्नीला निःस्वार्थ प्रेम दाखवतो; आणि पत्नी देखील ज्याप्रमाणे येशू आपल्या मस्तकाच्या अधीन आहे त्याचप्रमाणे नेहमी आपल्या पतीच्या अधीन राहते.—१ करिंथ. ११:३; इफिस. ५:२५.

‘तुमच्यावर सोपवलेली सेवा पूर्ण करा’

१५, १६. सेवाकार्यातील तुमची प्रगती इतरांना दिसून येण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१५ तीमथ्यावर सोपवण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामगिरीविषयी पौलाने असे लिहिले: ‘देवासमक्ष आणि ख्रिस्त येशूसमक्ष मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.’ त्याने पुढे म्हटले: “सुवर्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीम. ४:१, २, ५) ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तीमथ्याला ‘विश्‍वासाच्या वचनांपासून पोषण’ मिळवणे गरजेचे होते.१ तीमथ्य ४:६ वाचा.

१६ तुम्ही ‘विश्‍वासाच्या वचनांपासून पोषण’ कसे मिळवू शकता? पौलाने लिहिले: “मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव. ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.” (१ तीम. ४:१३, १५) प्रगती करण्यासाठी मेहनतीने वैयक्‍तिक अभ्यास करण्याची गरज आहे. “गढून जा” या वाक्यांशाचा अर्थ एखाद्या कार्यात बुडून जाणे असा होतो. तुमच्या अभ्यासाच्या सवयींविषयी काय म्हणता येईल? ‘देवाच्या गहन गोष्टींच्या’ अभ्यासात तुम्ही अगदी गढून जाता का? (१ करिंथ. २:१०) की, फारशी मेहनत न घेता तुम्ही फक्‍त वरवर वाचन करता? अभ्यास केलेल्या साहित्यावर मनन केल्याने ती माहिती तुमच्या अंतःकरणापर्यंत पोचून, त्यानुसार आचरण करण्यास तुम्ही प्रेरित व्हाल.नीतिसूत्रे २:१-५ वाचा.

१७, १८. (क) तुम्ही कोणती कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (ख) तीमथ्यासारखी मनोवृत्ती बाळगल्याने तुम्हाला सेवाकार्यात कशा प्रकारे मदत होईल?

१७ मीशेल नावाची एक तरुण पायनियर बहीण म्हणते: “सेवाकार्यात खऱ्‍या अर्थानं परिणामकारक ठरण्यासाठी मी नियमित वैयक्‍तिक अभ्यास करते. तसंच, मी सभांना नियमित उपस्थित राहते. यामुळे मला सतत आध्यात्मिक प्रगती करणं शक्य होतं.” पायनियर सेवा केल्यामुळे तुम्हाला क्षेत्र सेवेत बायबलचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यास आणि आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास नक्कीच साहाय्य मिळेल. अचूकपणे वाचन करण्याचा आणि ख्रिस्ती सभांमध्ये अर्थपूर्ण उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तसेच, ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत, दिलेल्या साहित्याच्या आधारावर तुम्ही माहितीपूर्ण भाषणे तयार करता तेव्हा देखील तुमची आध्यात्मिक प्रगती होत असल्याचे सर्वांना दिसून येईल.

१८ ‘सुवार्तिकाचे काम करणे’ म्हणजे आपली सेवा अधिक प्रभावी बनवणे आणि इतरांना तारण मिळवण्यास मदत करणे. याकरता तुम्ही बायबलमधील सत्ये परिणामकारक रीत्या इतरांना शिकवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. (२ तीम. ४:२) या कार्यात जे अनुभवी आहेत त्यांच्यासोबत सेवेत सहभाग घेतल्यामुळे, ते कशा प्रकारे शिकवतात हे पाहून तुम्हाला त्यांचे अनुकरण करता येईल. तीमथ्यालाही पौलासोबत कार्य केल्यामुळे बरेच काही शिकायला मिळाले होते. (१ करिंथ. ४:१७) पौलाने ज्यांना मदत केली होती त्यांच्याविषयी तो असे म्हणतो, की त्यांच्यावर अत्यंत प्रीती असल्यामुळे आपण त्यांना केवळ सुवार्ताच नव्हे तर “आपला जीवहि” दिला आहे, म्हणजेच त्यांना मदत करण्यासाठी आपण आपले आयुष्य वेचले आहे. (१ थेस्सलनी. २:८) सेवाकार्यात पौलाचे अनुकरण करण्यासाठी तुम्ही तीमथ्यासारखी मनोवृत्ती बाळगली पाहिजे, ज्याला इतरांबद्दल मनापासून कळकळ होती आणि ज्याने एखाद्या दासाप्रमाणे ‘सुवार्तेसाठी सेवा केली.’ (फिलिप्पैकर २:१९-२३ वाचा.) तुम्हीही सेवाकार्यात अशी स्वार्थत्यागी वृत्ती दाखवता का?

प्रगती केल्याने खरे समाधान प्राप्त होते

१९, २०. आध्यात्मिक प्रगती केल्याने आपण आनंदी का होतो?

१९ आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण शिकवण्याच्या कलेत निपुण बनण्याचा धीराने प्रयत्न केल्यामुळे कालांतराने तुम्हाला आध्यात्मिक दृष्टीने “पुष्कळांना सधन” किंवा श्रीमंत बनवण्याचा बहुमान मिळेल. आणि हे लोक तुमचा ‘आनंद किंवा तुमच्या अभिमानाचा मुगूट’ बनतील. (२ करिंथ. ६:१०; १ थेस्सलनी. २:१९) पूर्ण वेळेच्या सेवेत असणारा फ्रेड सांगतो, “आता माझा बहुतेक वेळ इतरांना मदत करण्यात जातो. घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.”

२० आध्यात्मिक प्रगती केल्यामुळे डॅफ्नी नावाच्या एका तरुण पायनियर बहिणीला जो आनंद व जे समाधान मिळाले त्याविषयी सांगताना ती असे म्हणते: “यहोवाची एक व्यक्‍ती म्हणून ओळख झाल्यामुळे त्याच्यासोबतचा माझा नातेसंबंध अतिशय घनिष्ठ बनला आहे. आपण आपल्या पूर्ण शक्‍तिनिशी यहोवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरंच खूप चांगलं वाटतं—खूप समाधान मिळतं!” आपण केलेल्या आध्यात्मिक प्रगतीची इतरांनी जरी कदर केली नाही तरी यहोवा मात्र ती पाहतो आणि तिची कदरही करतो. (इब्री ४:१३) तरुणांनो, तुमच्यामुळे यहोवाची स्तुती व गौरव होतो यात काहीही शंका नाही. तेव्हा, आपली प्रगती सर्वांसमोर प्रगट करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करण्याद्वारे नेहमी यहोवाचे हृदय आनंदित करण्याचा प्रयत्न करत राहा.—नीति. २७:११.

[तळटीपा]

^ परि. 7 काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 13 तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, यातील “मी विवाहाकरता तयार आहे का?” व टेहळणी बुरूज मे १५, २००१ अंकातील, “विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला.”

आपल्याला काय शिकायला मिळाले?

• आध्यात्मिक प्रगती करण्याचा काय अर्थ होतो?

• खालील बाबतींत तुमची आध्यात्मिक प्रगती इतरांना दिसून येण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

समस्यांचा सामना करताना

सफल वैवाहिक जीवनाची तयारी करताना

सेवाकार्यात

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

समस्यांचा सामना करण्यासाठी प्रार्थना करणे साहाय्यक ठरू शकते

[१६ पानांवरील चित्र]

तरुण प्रचारक कशा प्रकारे शिकवण्याच्या प्रभावशाली पद्धतींचा अवलंब करू शकतात?