व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवदूत—“परिचारक आत्मे”

देवदूत—“परिचारक आत्मे”

देवदूत—“परिचारक आत्मे”

“ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?”—इब्री १:१४.

१. मत्तय १८:१० आणि इब्री लोकांस १:१४ या वचनांत कोणती दिलासा देणारी गोष्ट सांगितली आहे?

येशू ख्रिस्ताने, आपल्या अनुयायांसाठी अडखळण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना अशी ताकीद दिली: “संभाळा, ह्‍या लहानातील एकालाहि तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हास सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.” (मत्त. १८:१०) विश्‍वासू देवदूतांविषयी बोलताना प्रेषित पौलाने लिहिले: “ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?” (इब्री १:१४) मानवांना मदत करण्यासाठी देव स्वर्गातील आत्मिक प्राण्यांचा उपयोग करतो ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! देवदूतांविषयी बायबल काय सांगते? ते कशा प्रकारे आपल्याला साहाय्य करतात? त्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो?

२, ३. स्वर्गातील आत्मिक प्राण्यांच्या काही जबाबदाऱ्‍या कोणत्या आहेत?

स्वर्गामध्ये लक्षावधी विश्‍वासू देवदूत आहेत. ते सर्व ‘बलसंपन्‍न आहेत आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालतात.’ (स्तो. १०३:२०; प्रकटीकरण ५:११ वाचा.) देवाच्या या आत्मिक पुत्रांचे आपापले व्यक्‍तिमत्त्व आहे, त्यांच्यात देवासारखे गुण आहेत आणि स्वतंत्र इच्छा आहे. त्यांचे अतिशय उत्कृष्टपणे संघटन करण्यात आलेले असून देवाच्या व्यवस्थेत त्यांना उच्च पदे आहेत. मीखाएल (येशूचे स्वर्गीय नाव) हा त्यांच्यातला आद्यदेवदूत आहे. (दानी. १०:१३; यहू. ९) “सर्व उत्पत्तीत जेष्ठ” असलेला हा आद्यदेवदूत यहोवाच्या वतीने बोलणारा त्याचा “शब्द” आहे व इतर सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी त्याने त्याचा उपयोग केला होता.—कलस्सै. १:१५-१७; योहा. १:१-३.

आद्यदेवदूताच्या खालोखाल सराफीम आहेत. ते यहोवाच्या पवित्रतेची घोषणा करतात आणि त्याच्या लोकांना आध्यात्मिक रीत्या शुद्ध जीवन जगण्यास मदत करतात. यांशिवाय, करूबीम देखील आहेत जे त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतात. (उत्प. ३:२४; यश. ६:१-३, ६, ७) तसेच, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी निरनिराळ्या जबाबदाऱ्‍या पार पाडणारे इतर देवदूत किंवा संदेशवाहकही आहेत.—इब्री १२:२२, २३.

४. पृथ्वीचा पाया घालण्यात आला तेव्हा देवदूतांना कसे वाटले आणि आदाम व हव्वेने आपल्या स्वतंत्र इच्छेचा उचितपणे उपयोग केला असता तर काय झाले असते?

देवाने “पृथ्वीचा पाया घातला” तेव्हा देवदूतांनी जयजयकार केला व हा अनोखा ग्रह मानवांच्या राहण्यायोग्य बनत होता तेव्हा त्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्‍या आनंदाने पार पाडल्या. (ईयो. ३८:४, ७) यहोवाने मनुष्याला “देवदूतांपेक्षा किंचित्काल कमी” पण त्याच्या ‘प्रतिरूपात’ बनवले आहे. त्यामुळे मानव सृष्टिकर्त्याचे उत्कृष्ठ गुण प्रदर्शित करू शकतात. (इब्री २:७; उत्प. १:२६) आदाम आणि हव्वेने त्यांना दिलेल्या स्वतंत्र इच्छेचा उचितपणे उपयोग केला असता तर त्यांना आणि त्यांच्या संततीला यहोवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाचा भाग बनून पृथ्वीवरील नंदनवनात जीवनाचा आनंद घेता आला असता.

५, ६. स्वर्गात कोणता विद्रोह झाला आणि त्याबद्दल देवाने काय केले?

देवाच्या स्वर्गीय कुटुंबात विद्रोहाची सुरुवात झाल्याचे पाहून पवित्र देवदूतांना नक्कीच धक्का बसला असेल. त्यांच्यापैकी एक जण यहोवाची स्तुती करण्यात समाधानी नव्हता, तर यहोवाला मिळणारी उपासना आपल्याला मिळावी अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. विश्‍वावर राज्य करण्यास यहोवा योग्य आहे की नाही याविषयी शंका व्यक्‍त करून व देवाच्या सार्वभौम सत्तेविरुद्ध उभे राहून त्याने स्वतःला सैतान (अर्थात “विरोधक”) बनवले. सैतानाने सर्वात पहिली लबाडी केली. त्याने अगदी धूर्तपणे पहिल्या मानवी दांपत्यालाही त्यांच्या प्रेमळ सृष्टीकर्त्याविरुद्ध विद्रोह करण्यास प्रवृत्त केले.—उत्प. ३:४, ५; योहा. ८:४४.

यहोवाने लगेच बायबलची पहिली भविष्यवाणी करून सैतानाविरुद्ध न्यायदंड सुनावला: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्प. ३:१५) ही स्त्री कोण होती? ही स्त्री म्हणजे यहोवाच्या विश्‍वासू आत्मिक प्राण्यांनी बनलेली स्वर्गीय संघटना होती जी त्याच्या नजरेत एका प्रिय पत्नीसमान होती. सैतान आणि देवाच्या या ‘स्त्रीतले’ वैर बऱ्‍याच काळापर्यंत राहणार होते. या भविष्यवाणीतील बऱ्‍याच गोष्टी “पवित्र रहस्य” होत्या व त्यांचा उलगडा क्रमाक्रमाने होणार होता, तरी या भविष्यवाणीमुळे एक निश्‍चित आशा प्राप्त झाली. देवाने ठरवले, की त्याच्या स्वर्गीय संघटनेतील एक जण सर्व बंडखोरांचा नाश करील व त्याच्याद्वारे “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व” एकत्र आणले जाईल.—इफिस. १:८-१०, NW.

७. नोहाच्या काळात काही देवदूतांनी काय केले आणि यामुळे त्यांना कोणता परिणाम भोगावा लागला?

नोहाच्या काळात, अनेक देवदूतांनी आपले “वसतिस्थान सोडले” व पृथ्वीवर येऊन आपल्या स्वार्थी इच्छा तृप्त करण्यासाठी मानवी शरीरे धारण केली. (यहू. ६; उत्प. ६:१-४) या बंडखोर देवदूतांना यहोवाने निबिड अंधकारात लोटून दिले. अशा प्रकारे ते सैतानाप्रमाणे ‘दुरात्मे’ व देवाच्या सेवकांचे खतरनाक वैरी बनले.—इफिस. ६:११-१३; २ पेत्र २:४.

कशा प्रकारे देवदूत आपली मदत करतात?

८, ९. मानवांना मदत करण्यासाठी यहोवाने कशा प्रकारे देवदूतांचा उपयोग केला?

अब्राहाम, याकोब, मोशे, यहोशवा, यशया, दानीएल, येशू, पेत्र, योहान आणि पौल या सर्वांना देवदूतांनी मदत केली होती. विश्‍वासू देवदूतांनी देवाच्या न्यायदंडांची अंमलबजावणी केली, देवाच्या भविष्यवाण्या विदित केल्या व त्याची निर्देशने लोकांप्रत पोहचवली, ज्यात मोशेच्या नियमशास्त्राचाही समावेश होतो. (२ राजे १९:३५; दानी. १०:५, ११, १४; प्रे. कृत्ये ७:५३; प्रकटी. १:१) आज देवाचे संपूर्ण वचन आपल्याजवळ आहे. त्यामुळे देवदूतांकरवी देवाचे संदेश आपल्याप्रत पोहचवण्याची गरज निर्माण होत नाही. (२ तीम. ३:१६, १७) पण, आपल्या नजरेआड देवाची इच्छा पूर्ण करण्यात व त्याच्या सेवकांना मदत करण्यात देवदूत अत्यंत व्यग्र आहेत.

बायबल आपल्याला आश्‍वासन देते: “परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.” (स्तो. ३४:७; ९१:११) परीक्षांमध्ये मनुष्य देवाला खरोखरच विश्‍वासू राहील का अशी शंका सैतानाने व्यक्‍त केली होती. त्यामुळे मानवांवर सर्व प्रकारची संकटे आणण्याची अनुमती यहोवा सैतानाला देतो. (लूक २१:१६-१९) पण, आपला विश्‍वासूपणा सिद्ध होण्याकरता आपल्यावर कितपत परीक्षा येऊ द्यायच्या, हे देवाला माहीत आहे. (१ करिंथकर १०:१३ वाचा.) आणि देवाची इच्छा असेल तर आपली मदत करण्यासाठी देवदूत नेहमी तयार असतात. शद्रख, मेशख, अबेद्‌नगो, दानीएल आणि पेत्र यांची त्यांनी मृत्यूतून सुटका केली. पण, शत्रुंच्या हाती मृत्यू होण्यापासून त्यांनी स्तेफन व याकोब यांना मात्र वाचवले नाही. (दानी. ३:१७, १८, २८; ६:२२; प्रे. कृत्ये ७:५९, ६०; १२:१-३, ७, ११) कारण प्रत्येकाची परिस्थिती व वादविषय वेगळे होते. त्याचप्रमाणे, नात्सी छळ छावण्यांमध्ये आपल्या काही बांधवांना जिवास मुकावे लागले, तर बऱ्‍याच जणांना वाचण्यास यहोवाने मदत केली.

१०. देवदूतांच्या मदती व्यतिरिक्‍त आपल्याला आणखी कोणत्या मार्गांनी साहाय्य मिळू शकते?

१० पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्‍तीचा एक रक्षक देवदूत असतो अशी शिकवण बायबल देत नाही. तर “आपण [देवाच्या] इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल,” या विश्‍वासाने आपण प्रार्थना करतो. (१ योहा. ५:१४) अर्थात, देव एखाद्या देवदूताकरवीसुद्धा आपली मदत करू शकतो. पण कधीकधी तो निरनिराळ्या मार्गांनी आपली मदत करतो. उदाहरणार्थ, आपली मदत करण्यासाठी तो आपल्या ख्रिस्ती बांधवांना प्रवृत्त करू शकतो. तसेच, आपल्या ‘शरीरातला एखादा काटा’ कदाचित “सैतानाचा एक दूत” ठोसे मारत असल्याप्रमाणे आपल्याला सतत त्रास देत असेल. पण, या काट्याचा सामना करण्यासाठी देव आपल्याला बुद्धी व आंतरिक शक्‍ती देऊ शकतो.—२ करिंथ. १२:७-१०; १ थेस्सलनी. ५:१४.

येशूचे अनुकरण करा

११. येशूला मदत करण्यासाठी देवदूतांचा कशा प्रकारे उपयोग करण्यात आला आणि देवाप्रती विश्‍वासू राहून येशूने काय साध्य केले?

११ येशूच्या बाबतीत यहोवाने देवदूतांचा कसा उपयोग केला ते विचारात घ्या. त्याच्या जन्माची व पुनरुत्थानाची घोषणा त्यांनी केली व तो पृथ्वीवर असताना त्यांनी त्याची मदत केली. येशूला अटक होऊ नये व त्याच्यावर वेदनादायक मृत्यू ओढवू नये म्हणून देवदूत हस्तक्षेप करू शकले असते. पण, त्यांनी तसे केले नाही. या उलट, त्याची हिम्मत वाढवण्यासाठी एका देवदूताला पाठवण्यात आले. (मत्त. २८:५, ६; लूक २:८-११; २२:४३) यहोवाच्या उद्देशानुसार, येशूने बलिदानरूपी मरण पत्करले व अगदी पराकोटीच्या परीक्षेतही एक परिपूर्ण मनुष्य देवाप्रती आपली एकनिष्ठा टिकवून ठेवू शकतो हे त्याने सिद्ध करून दाखवले. त्यामुळे यहोवाने येशूचे पुनरुत्थान करून त्याला अमर स्वर्गीय जीवन बहाल केले. तसेच, देवदूतांना त्याच्या स्वाधीन करून त्याला “सर्व अधिकार” दिला. (मत्त. २८:१८; प्रे. कृत्ये २:३२; १ पेत्र ३:२२) यावरून, येशू हा देवाच्या ‘स्त्रीच्या संततीचा’ प्रमुख भाग असल्याचे शाबीत झाले.—उत्प. ३:१५; गल. ३:१६.

१२. येशू कशा प्रकारे “मर्यादेने” वागला आणि आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

१२ अनावश्‍यक धोका पत्करल्यामुळे संकट ओढवते तेव्हा देवदूतांनी आपल्या मदतीसाठी धावून यावे अशी अपेक्षा करून यहोवाची परीक्षा पाहणे चुकीचे आहे हे येशूला माहीत होते. (मत्तय ४:५-७ वाचा.) तेव्हा, आपणही अनावश्‍यक धोका पत्करण्याचे टाळू या आणि येशूप्रमाणे “मर्यादेने” वागून छळसंकटांचा आत्मविश्‍वासाने सामना करू या.—तीत २:१२, १३.

आपण विश्‍वासू देवदूतांकडून काय शिकू शकतो?

१३. दुसरे पेत्र २:९-११ मध्ये उल्लेख केलेल्या विश्‍वासू देवदूतांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१३ यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांची “निंदा” करणाऱ्‍यांना ताकीद देताना प्रेषित पेत्र आपल्याला विश्‍वासू देवदूतांचे उत्तम उदाहरण देतो. देवदूत अत्यंत शक्‍तीशाली असले तरी यहोवाबद्दल असलेल्या आदरामुळे ते कोणालाही दोषी ठरवण्यापासून नम्रपणे स्वतःला आवरतात. (२ पेत्र २:९-११ वाचा.) तेव्हा, आपणही इतरांना दोष लावण्यापासून स्वतःला आवरले पाहिजे, मंडळीची देखरेख करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांचा आदर केला पाहिजे व सर्वश्रेष्ठ न्यायाधीश असलेल्या यहोवाच्या हातात सर्वकाही सोपवून दिले पाहिजे.—रोम. १२:१८, १९; इब्री १३:१७.

१४. विनम्रपणे सेवा करण्याच्या बाबतीत आपण देवदूतांकडून काय शिकू शकतो?

१४ विनम्रपणे सेवा करण्याच्या बाबतीतही यहोवाचे देवदूत उत्तम उदाहरण राखतात. काही देवदूतांनी मानवांना आपले नाव सांगण्यास नकार दिला. (उत्प. ३२:२९; शास्ते १३:१७, १८) स्वर्गात लक्षावधी देवदूत असले तरी बायबलमध्ये केवळ दोन देवदूतांच्या नावांचा उल्लेख आढळतो—मीखाएल आणि गब्रीएल. यामुळे देवदूतांना आपण अनुचित आदर देण्याचे टाळू शकतो. (लूक १:२६; प्रकटी. १२:७) प्रेषित योहान एका देवदूताला नमन करण्यासाठी त्याच्या पाया पडला तेव्हा त्या देवदूताने त्याला म्हटले: “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधु . . . ह्‍यांच्या सोबतीचा दास आहे.” (प्रकटी. २२:८, ९) म्हणून, आपण केवळ यहोवाचीच उपासना केली पाहिजे व केवळ त्यालाच प्रार्थना केली पाहिजे.मत्तय ४:८-१० वाचा.

१५. धीर धरण्याच्या बाबतीत देवदूत कशा प्रकारे उत्तम उदाहरण मांडतात?

१५ धीर धरण्याच्या बाबतीतही देवदूतांनी मांडलेल्या उत्तम उदाहरणाचे आपण अनुकरण करू शकतो. देवाची पवित्र रहस्ये जाणून घेण्यास ते अत्यंत उत्सुक आहेत. त्यांच्याविषयी बायबल म्हणते: “त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.” (१ पेत्र १:१२) पण, सर्वच गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या नाहीत. मग या बाबतीत त्यांची काय मनोवृत्ती आहे? “देवाचे नानाविध ज्ञान . . . मंडळीच्या द्वारे” प्रकट करण्याची देवाची नियुक्‍त वेळ येईपर्यंत ते धीराने प्रतिक्षा करतात.—इफिस. ३:१०, ११.

१६. आपल्या वर्तनाचा देवदूतांवर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो?

१६ छळाचा सामना करणारे ख्रिस्ती ‘देवदूतांना जणू तमाशा’ आहेत. (१ करिंथ. ४:९) छळातही आपण विश्‍वासू राहतो तेव्हा देवदूतांना मोठे समाधान वाटते. तसेच, एखादा पापी जेव्हा पश्‍चात्ताप करतो तेव्हा देखील त्यांना मनस्वी आनंद होतो. (लूक १५:१०) शिवाय, ख्रिस्ती स्त्रियांच्या चांगल्या वर्तनाकडे देवदूतांचे लक्ष आहे. “देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकारांचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे,” असे बायबलमध्ये सांगितले आहे. (१ करिंथ. ११:३, १०) होय, ख्रिस्ती स्त्रिया व पृथ्वीवरील देवाचे इतर सर्व सेवक ईश्‍वरशासित व्यवस्थेला व मस्तकपदाला आदर दाखवतात तेव्हा देवदूतांना नक्कीच फार आनंद होतो. देवाचे सेवक दाखवत असलेली ही आज्ञाधारक मनोवृत्ती पाहून देवाच्या या स्वर्गीय पुत्रांनाही आज्ञाधारक राहण्याची प्रेरणा मिळते.

प्रचार कार्यात देवदूतांची साथ

१७, १८. प्रचार कार्यात देवदूत आपल्याला मदत करतात असे आपण का म्हणू शकतो?

१७ ‘प्रभूच्या दिवसांत’ घडणाऱ्‍या काही उल्लेखनीय घटनांमध्ये देवदूत सहभागी आहेत. उदाहरणार्थ, १९१४ मध्ये राज्याची स्थापना झाली तेव्हा आणि ‘मीखाएल व त्याच्या दूतांनी’ सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली टाकले तेव्हाही देवदूतांचा यात सहभाग होता. (प्रकटी. १:१०; ११:१५; १२:५-९) प्रेषित योहानाने “एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” त्या देवदूताने अशी घोषणा केली: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.” (प्रकटी. १४:६, ७) यावरून, सैतानाकडून कडा विरोध होत असूनही, देवाच्या स्थापित राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत असताना देवदूत आपल्या पाठीशी आहेत ही खात्री यहोवाच्या सेवकांना मिळते.—प्रकटी. १२:१३, १७.

१८ कुशी षंडाला मदत करण्याचे निर्देशन देण्यासाठी एक देवदूत जसे फिलिप्पाशी प्रत्यक्ष बोलला, तसे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांकडे जाण्यास सांगण्यासाठी देवदूत आज प्रत्यक्ष आपल्याशी बोलत नाहीत. (प्रे. कृत्ये ८:२६-२९) पण, आधुनिक काळातील अनेक अनुभव दाखवून देतात, की आपण देवदूतांना पाहू शकत नसलो तरी आपल्या राज्य प्रचार कार्यात व “सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्यांकडे जाण्यास देवदूत आपली मदत करतात. * (प्रे. कृत्ये १३:४८, NW) तेव्हा, नियमितपणे सेवाकार्यात सहभाग घेणे किती महत्त्वाचे आहे! यामुळे, “आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना” करण्याची इच्छा असणाऱ्‍या लोकांना शोधण्याचे आपल्यावर सोपवलेले काम आपल्याला पूर्ण करता येईल.—योहा. ४:२३, २४.

१९, २०. “युगाच्या समाप्तीस” घडणाऱ्‍या घटनांमध्ये देवदूतांची काय भूमिका असेल?

१९ आपल्या दिवसांबद्दल बोलताना येशूने म्हटले: “युगाच्या समाप्तीस” देवदूत “नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील.” (मत्त. १३:३७-४३, ४९) अभिषिक्‍त जणांना शेवटी एकदाचे एकत्र करण्याच्या व त्यांच्यावर शिक्का मारण्याच्या कार्यातही देवदूत सहभाग घेतात. (मत्तय २४:३१ वाचा; प्रकटी. ७:१-३) याशिवाय, ‘शेरडांपासून मेंढरे वेगळे’ करण्याच्या कामातही देवदूत येशूसोबत असतील.—मत्त. २५:३१-३३, ४६.

२० ‘प्रभु येशू आपल्या सामर्थ्यवान दूतांसह प्रगट होईल’ तेव्हा “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” त्यांचा नाश करण्यात येईल. (२ थेस्सलनी. १:६-१०) योहानाने हीच घटना दृष्टांतात पाहिली तेव्हा त्याने, पांढऱ्‍या घोड्यांवर स्वार असलेला येशू व देवदूतांचे स्वर्गीय सैन्य नीतीने न्यायनिवाडा करण्याच्या लढाईस निघाल्याचे वर्णन केले.—प्रकटी. १९:११-१४.

२१. ‘हातात अथांग डोहाची किल्ली व एक मोठा साखळदंड’ असलेला देवदूत सैतानाविरुद्ध व त्याच्या दुरात्म्यांविरुद्ध कोणती कारवाई करेल?

२१ याशिवाय, योहानाने “एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता.” हा देवदूत दुसरा कोणी नसून खुद्द आद्यदेवदूत मीखाएल आहे जो दियाबलाला व अर्थातच त्याच्या दुरात्म्यांनाही बांधून अथांग डोहात टाकून देईल. आणि ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शेवटी परिपूर्ण मानवजातीची शेवटची परीक्षा घेण्याकरता त्यांना थोड्या वेळासाठी मुक्‍त केले जाईल. त्यानंतर, सैतानाला व इतर बंडखोरांना कायमचे नष्ट केले जाईल. (प्रकटी. २०:१-३, ७-१०; १ योहा. ३:८) तेव्हा, बंडखोरीचा गंधही राहणार नाही.

२२. लवकरच घडणाऱ्‍या घटनांमध्ये देवदूत कशा प्रकारे सामील आहेत आणि त्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला कसे वाटले पाहिजे?

२२ लवकरच सैतानाच्या दुष्ट जगापासून आपली सुटका केली जाईल. यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करणाऱ्‍या आणि पृथ्वी व मानवजात यांसंबंधी असलेला देवाचा उद्देश पूर्ण करणाऱ्‍या उल्लेखनीय घटनांमध्ये देवदूत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील. विश्‍वासू देवदूत खरोखरच, ‘ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले परिचारक आत्मे’ आहेत. देवाची इच्छा पूर्ण करण्यास आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास यहोवा देवदूतांकरवी आपल्याला मदत करतो त्याबद्दल आपण नेहमी त्याचे आभार मानू या.

[तळटीप]

^ परि. 18 यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक, (इंग्रजी) पृष्ठे ५४९-५५१ पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• स्वर्गातील आत्मिक प्राणी कशा प्रकारे संघटित आहेत?

• नोहाच्या काळात काही देवदूतांनी काय केले होते?

• मानवांना मदत करण्यासाठी यहोवाने कशा प्रकारे देवदूतांचा उपयोग केला?

• आपल्या काळात विश्‍वासू देवदूत कोणती भूमिका पार पाडत आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

देवाची इच्छा पूर्ण करण्यास देवदूतांना आनंद होतो

[२३ पानांवरील चित्र]

दानीएलाच्या बाबतीत झाले, त्याप्रमाणेच देवाची इच्छा असेल तर देवदूत आपली मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात

[२४ पानांवरील चित्रे]

घाबरू नका, प्रचार कार्यात देवदूत आपल्याबरोबर आहेत!

[चित्राचे श्रेय]

Globe: NASA photo