व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पतींनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करा!

पतींनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करा!

पतींनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करा!

येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना असे सांगितले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३४, ३५) होय, सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे.

प्रेषित पौलाने थेट ख्रिस्ती पतींना उद्देशून असे लिहिले: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिस. ५:२५) एक ख्रिस्ती पती, आपल्या वैवाहिक जीवनात आणि विशेषकरून त्याची पत्नी देखील यहोवाची समर्पित सेवक असल्यास, बायबलमधील या सल्ल्याचे पालन कसे करू शकतो?

ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केले

बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.” (इफिस. ५:२८, २९) येशूने आपल्या शिष्यांवर जिवापाड प्रेम केले. ते अपरिपूर्ण होते तरीसुद्धा येशू त्यांच्याशी नेहमी सौम्यतेने व प्रेमाने वागला. “गौरवयुक्‍त मंडळी अशी ती स्वत:ला सादर करावी” म्हणून त्याने त्यांच्या सद्‌गुणांवर लक्ष केंद्रित केले.—इफिस. ५:२७.

जसे ख्रिस्ताने मंडळीवरील आपले प्रेम व्यक्‍त केले, तसेच पतीनेही आपल्या पत्नीवरील प्रेम शब्दांतून व कृतीतून व्यक्‍त केले पाहिजे. पत्नीला आपल्या पतीकडून नेहमी असे प्रेम मिळते तेव्हा तिला मनस्वी आनंद होतो. या उलट, एखाद्या स्त्रीकडे जीवनातील सर्व ऐषआराम असतील, पण तिचा पती तिच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तिची पर्वा करत नसेल, तर ती अत्यंत दुःखी होऊ शकते.

आपल्या पत्नीवर आपले प्रेम आहे व आपल्याला तिची काळजी आहे हे एक पती कशा प्रकारे दाखवू शकतो? चारचौघांत असताना, तो आदराने इतरांना तिची ओळख करून देतो व तिच्या सहकार्याबद्दल तिची मनमोकळेपणे प्रशंसा करतो. एखादी महत्त्वाची गोष्ट साध्य करण्यात तिने खूप मेहनत घेतली असेल तर त्याबद्दल तो इतरांना सांगण्यास कचरत नाही. केवळ चारचौघांतच नव्हे तर, ते दोघे एकांतात असतात तेव्हा देखील पत्नी आपल्या पतीचे प्रेम अनुभवू शकते. एक प्रेमळ स्पर्श, स्मितहास्य, प्रेमाने जवळ घेणे, प्रशंसेचे दोन शब्द, या सर्व गोष्टी फार क्षुल्लक वाटतील; पण वास्तवात या सर्वांचा एका स्त्रीच्या मनावर विलक्षण प्रभाव पडू शकतो.

“त्यांना ‘बंधु’ म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही”

ख्रिस्त येशूला, ‘[आपल्या अभिषिक्‍त अनुयायांना] ‘बंधु’ म्हणावयाची लाज वाटली नाही.’ (इब्री २:११, १२, १७) पतींनो, तुम्ही ख्रिस्ती असल्यास, तुमची पत्नी देखील एक ख्रिस्ती बहीण आहे हे लक्षात असू द्या. तिचा बाप्तिस्मा तुमच्या लग्नाआधी झालेला असो अथवा लग्नानंतर, तुमच्या लग्नाच्या शपथेपेक्षाही तिने यहोवाला केलेले समर्पण सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मंडळीतील सभांमध्ये उत्तर देण्यासाठी तुमची पत्नी हात वर करते तेव्हा व्यासपीठावरील बांधव अगदी उचितपणे तिला “बहीण” असे संबोधतो. ती तुमचीही बहीण आहे आणि केवळ राज्य सभागृहातच नव्हे तर घरीसुद्धा. यास्तव, राज्य सभागृहात तुम्ही ज्या प्रकारे तिच्याशी प्रेमळपणे व सौम्यतेने वागता, त्याच प्रकारे घरामध्येही वागणे महत्त्वाचे आहे.

तुमच्यावर मंडळीच्या इतर काही जबाबदाऱ्‍या असतील तर मंडळीच्या व कुटुंबाच्या अशा दोन्ही जबाबदाऱ्‍या व्यवस्थितपणे सांभाळणे कधीकधी तुम्हाला कठीण जाऊ शकते. पण, मंडळीतले वडीलजन व सेवा सेवक यांच्यात उत्तम सहकार्य असल्यास व काही जबाबदाऱ्‍या हाताळण्यास इतरांनाही प्रशिक्षण दिल्यास, तुमच्या पत्नीकरता वेळ देणे तुम्हाला शक्य होईल. मंडळीत तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यास इतर बांधव तुमची मदत करू शकतील यात शंका नाही; पण, पती या नात्याने तुमच्या पत्नीची जबाबदारी ही सर्वस्वी तुमचीच आहे हे कधीही विसरू नका.

शिवाय, तुम्ही तुमच्या पत्नीचे मस्तकही आहात. बायबलमध्ये असे म्हटले आहे: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” (१ करिंथ. ११:३) मस्तकपणाची ही जबाबदारी तुम्हाला कशा प्रकारे पार पाडता येईल? मस्तकपणाविषयी बायबल जे सांगते ते उठताबसता आपल्या पत्नीला ऐकवून हक्काने आदराची मागणी करून नव्हे, तर मस्तकपदाच्या बाबतीत येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे एक पती आपल्या मस्तकपदाची जबाबदारी प्रेमळपणे पार पाडू शकतो.—१ पेत्र २:२१.

“तुम्ही माझे मित्र आहा”

आपले शिष्य आपले मित्र असल्याचे येशूने सांगितले होते. त्याने त्यांना म्हटले: “मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.” (योहा. १५:१४, १५) येशू व त्याच्या शिष्यांमध्ये उत्तम संवाद होता. त्यांनी एकत्र मिळून बऱ्‍याच गोष्टीही केल्या होत्या. काना येथील लग्नाच्या मेजवानीला ‘येशू त्याच्या शिष्यांना’ बोलावण्यात आले होते. (योहा. २:२) तसेच त्यांची काही आवडती ठिकाणेही होती, जसे की गेथशेमानेची बाग. “येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे,” असे बायबलमध्ये म्हटले आहे.—योहा. १८:२.

पत्नीला ती आपल्या पतीची जिवलग मैत्रीण आहे असे वाटले पाहिजे. तेव्हा पतीपत्नीने, सहजीवनाचा आस्वाद घेणे, एकत्र मिळून देवाची सेवा करणे, एकत्र बसून आनंदाने बायबलचा अभ्यास करणे किती महत्त्वाचे आहे. तसेच, सोबत फिरायला जाणे, गप्पागोष्टी करणे, एकत्र जेवण करणे, यांसारख्या गोष्टींसाठी वेळ काढणे देखील महत्त्वाचे आहे. तर मग, केवळ पतीपत्नी म्हणून नव्हे, तर जिवाभावाचे मित्र म्हणून एकमेकांकडे पाहा.

‘त्याने शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम केले’

येशूने आपल्या शिष्यांवर ‘शेवटपर्यंत प्रेम केले.’ (योहा. १३:१) या बाबतीत ख्रिस्ताचे अनुकरण करण्यात मात्र काही पती उणे पडतात. कदाचित एखाद्या तरुण स्त्रीसाठी ते आपल्या “तरुणपणाच्या पत्नीचा” त्याग करतील.—मला. २:१४, १५.

पण, या बाबतीत इतर काही पती खरोखरच ख्रिस्ताचे अनुकरण करतात. विली नावाच्या पतीचेच उदाहरण घ्या. त्यांच्या पत्नीची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेल्यामुळे त्यांना कित्येक वर्षांपर्यंत तिची सतत काळजी घ्यावी लागली. याबद्दल त्यांना कसे वाटले? ते म्हणतात: “माझी पत्नी म्हणजे मला देवाकडून मिळालेली एक देण आहे आणि मी तिला तसंच जपलं आहे. शिवाय ६० वर्षांपूर्वी, सुखदुःखात तिची साथ देण्याची मी शपथ घेतली होती. ती शपथ मी कधीच विसरणार नाही.”

तेव्हा, ख्रिस्ती पतींनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करा. आणि तुमची बहीण व तुमची मैत्रीण असलेल्या तुमच्या देवभीरू पत्नीवर जिवापाड प्रेम करा.

[२० पानांवरील चित्र]

तुमची पत्नी तुमची जिवलग मैत्रीण आहे का?

[२० पानांवरील चित्र]

‘आपल्या पत्नीवर प्रीती करा’