“मौन धरण्याचा समय”
“मौन धरण्याचा समय”
“ज्ञानी मनुष्य मौन पसंत करतो.” ही म्हण कदाचित तुमच्या ऐकण्यात आली असेल. ब्रूअर्स डिक्शनरी ऑफ फ्रेझ ॲन्ड फेबल या शब्दकोशानुसार इब्री भाषेतही या अर्थाची एक म्हण आहे. तिचे शब्दशः भाषांतर याप्रमाणे करता येईल: “शब्दाची किंमत जर एक शेकेल, तर मौनाची किंमत दोन शेकेल.” प्राचीन इस्राएलच्या शलमोन राजाने तर असे लिहिले होते: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.”—उप. ३:१, ७.
पण, बोलण्यापेक्षा शांत राहणे कोणत्या परिस्थितींत योग्य असते? “मौन” या अर्थाचे शब्द बायबलमध्ये अनेकदा आढळतात. या शब्दांचा संदर्भ विचारात घेतल्यास आपल्याला हे लक्षात येईल की कमीत कमी तीन प्रकारच्या परिस्थितींत मौन बाळगणे योग्य असते. तर आता आपण पाहू या की या तीन परिस्थितींत म्हणजेच इतरांना आदर दाखवण्यासाठी, सुज्ञतेने व शहाणपणाने वागण्यासाठी आणि मनन करण्यासाठी, शांत राहणे कशा प्रकारे साहाय्यक ठरते.
आदर दाखवण्यासाठी
शांत राहणे हे आदराचे लक्षण आहे. हबक्कूक संदेष्ट्याने म्हटले: “परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याजपुढे स्तब्ध राहो.” (हब. २:२०) खऱ्या उपासकांनी ‘परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहावी आणि तीहि मुकाट्याने पाहावी’ असे त्यांना सांगण्यात आले आहे. (विलाप. ३:२६) स्तोत्रकर्त्याने एका स्तोत्रात असे म्हटले: “परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नको.”—स्तो. ३७:७.
शब्दांविना आपण यहोवाचे गौरव करू शकतो का? हो, करू शकतो. जरा विचार करा, निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहून कधीकधी आपण अवाक् होतो, म्हणजे आपल्या तोंडातून शब्द फुटत नाहीत इतके आपण आश्चर्यचकित होतो. नाही का? निसर्गाचे सौंदर्य पाहून अशा प्रकारे विस्मयचकित होणे हे मनोमन आपल्या सृष्टिकर्त्याचे गौरव करण्यासारखेच नाही का? दाविदाने एका स्तोत्राची सुरुवात या शब्दांनी केली: “हे सीयोनातील देवा, तुझी मूकपणे स्तुती करीत, . . . आम्ही आमचा नवस फेडीत आहोत.”—स्तो. ६५:१, सुबोध भाषांतर.
यहोवा स्वतः ज्याप्रमाणे आपल्या आदरास पात्र आहे त्याचप्रमाणे त्याची वचने देखील आपल्या आदरास पात्र आहेत. उदाहरणार्थ, देवाचा संदेष्टा मोशे याने इस्राएल राष्ट्राला निरोपाचे भाषण दिले तेव्हा त्याने व याजकांनी अनु. २७:९, १०; ३१:११, १२.
सर्व उपस्थित लोकांना असे सांगितले: ‘शांतपणे ऐकून घ्या; आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐका.’ देवाचे नियमशास्त्र वाचले जायचे तेव्हा सर्व इस्राएल लोक ते ऐकण्यासाठी एकत्र येत. या प्रसंगी, इस्राएलांच्या लहान मुलांनीही लक्षपूर्वक ऐकावे असे देवाने सांगितले होते. मोशेने म्हटले: “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके . . . ह्यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील.”—आजही, यहोवाच्या उपासकांनी ख्रिस्ती सभांतून, तसेच मोठ्या अधिवेशनांतून दिले जाणारे मार्गदर्शन आदरपूर्वक ऐकणे किती महत्त्वाचे आहे! व्यासपीठावरून बायबलमधील महत्त्वाच्या सत्यांविषयी माहिती दिली जात असताना जर आपण विनाकारण आपसात बोलत असू, तर यावरून देवाच्या वचनाबद्दल व त्याच्या संघटनेबद्दल आपल्या मनात आदर नसल्याचे दिसून येणार नाही का? सभा सुरू असतानाचा समय हा शांत बसून, लक्षपूर्वक ऐकण्याचा समय असतो.
एरवीही एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपण तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतो, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आदर असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, कुलपिता ईयोब याने त्याच्यावर दोष लावणाऱ्यांना म्हटले: “माझी समजूत करा म्हणजे मी उगा राहीन; मी कोठे चुकलो हे मला समजावून सांगा.” ते बोलत असताना ईयोब शांतपणे ऐकून घेण्यास तयार होता. मग, जेव्हा त्याने स्वतः बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने त्यांना अशी विनंती केली: “गप्प राहा, माझ्याआड येऊ नका म्हणजे मी बोलेन.”—ईयो. ६:२४; १३:१३.
सुज्ञतेने व शहाणपणाने वागण्यासाठी
बायबल म्हणते: “जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.” “सुज्ञ मनुष्य मौन धारण करितो.” (नीति. १०:१९; ११:१२) येशूने शांत राहून, सुज्ञता व विचारशीलता हे गुण किती सुरेखपणे प्रदर्शित केले याकडे लक्ष द्या. एकदा त्याचे शत्रू संतप्त होते तेव्हा, यांना उत्तर देऊनही काही उपयोग होणार नाही हे ओळखून येशू “उगाच राहिला.” (मत्त. २६:६३) नंतर पिलातापुढे न्यायचौकशी चालली असताना, येशूने “काहीच उत्तर दिले नाही.” आपली आतापर्यंतची कार्येच आपल्याविषयी साक्ष देतील असा सुज्ञपणे विचार करून त्याने शांत राहण्याचा मार्ग निवडला.—मत्त. २७:११-१४.
आपणही सुज्ञपणे आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. विशेषतः जेव्हा कोणी आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा. एका नीतिसूत्रानुसार, “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान् होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करितो.” (नीति. १४:२९) रागाच्या भरात उतावीळपणे उत्तर दिल्यास, नंतर पस्तावा होईल अशा प्रकारचे अविचारीपणाचे शब्द आपल्या तोंडून निघू शकतात. अशा परिस्थितीत, लोकांना आपले बोलणे मूर्खपणाचे वाटू शकते आणि यामुळे आपली मनःशांती हरपू शकते.
दुष्ट हेतू असलेल्या लोकांचा आपल्याला सामना करावा लागतो तेव्हा विचारपूर्वक बोलणे शहाणपणाचे असते. सेवाकार्य करत असताना लोक आपली थट्टा करतात तेव्हा बरेचदा, शांत राहणेच सर्वात उत्तम असते. तसेच, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी आपले साथीदार घाणेरडे विनोद करतात किंवा अचकटविचकट बोलतात तेव्हा काहीही प्रतिसाद न देता शांत राहणे सुज्ञपणाचे ठरणार नाही का? नाहीतर, इफिस. ५:३) स्तोत्रकर्त्याने लिहिले, “माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”—स्तो. ३९:१.
त्यांच्या अश्लील भाषेविषयी आपली काहीच हरकत नाही असे त्यांना वाटू शकते. (“सुज्ञ मनुष्य” त्याला विश्वासात घेऊन सांगितलेली गोष्ट उघड करत नाही. (नीति. ११:१२) खऱ्या ख्रिश्चनांनी गुप्त माहिती जाहीर न करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. विशेषतः मंडळीतील वडिलांनी याबाबतीत सावध असले पाहिजे, जेणेकरून मंडळीतील सदस्य नेहमी त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतील.
कधीकधी काहीच न बोलण्याचाही चांगला प्रभाव पडू शकतो. १९ व्या शतकातील इंग्रज लेखक सिड्नी स्मिथ याने आपल्या एका समकालीन व्यक्तीबद्दल असे लिहिले: “तो अधूनमधून अगदी शांत राहतो, त्यामुळे त्याच्याशी संभाषण करणे अतिशय आनंददायक असते.” दोन मित्र गप्पागोष्टी करतात तेव्हा दोघांनाही बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. उत्तम संभाषण करणारा दुसऱ्याचे बोलणे ऐकून घेण्यातही पटाईत असला पाहिजे.
शलमोनाने ताकीद दिली, “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.” (नीति. १०:१९) आपण जितके कमी बोलतो, तितकीच अविचारीपणे नको ते बोलून बसण्याची शक्यता कमी असते. किंबहुना, “मौन धारण करणाऱ्या मूर्खालाहि शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरितो तेव्हा त्याला समंजस मानितात.” (नीति. १७:२८) तर मग, ‘आपल्या वाणीचे द्वार संभाळण्याची’ आपण यहोवाला विनंती करू या.—स्तो. १४१:३.
मनन करण्यासाठी
नीतिमत्तेच्या मार्गाने चालणाऱ्या मनुष्याबद्दल बायबल आपल्याला सांगते, की तो “[देवाच्या] नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो.” (स्तो. १:२) मनन करण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण योग्य असते?
कुलपिता अब्राहामाचा पुत्र इसहाक “संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला,” असा उल्लेख आढळतो. (उत्प. २४:६३) मनन करण्यासाठी त्याने शांत वेळ व ठिकाण निवडले. राजा दावीद रात्रीच्या नीरव शांततेत मनन करत असे. (स्तो. ६३:६) परिपूर्ण मनुष्य असूनही येशूला शांत वातावरणात, एकांतात मनन करण्याची गरज भासली. आणि म्हणूनच तो बरेचदा मुद्दामहून गर्दी व गोंगाटापासून दूर—डोंगरांत, वाळवंटात आणि इतर एकांत स्थळी जाऊन मनन व प्रार्थना करत असे.—मत्त. १४:२३; लूक ४:४२; ५:१६.
शांत मनोवृत्ती आपल्याकरता हितकारक आहे यात काहीच शंका नाही. शांत वातावरणात आत्मपरीक्षण करणे आणि पर्यायाने स्वतःमध्ये सुधारणा करणे शक्य होते. शांत राहिल्यामुळे मनःशांती प्राप्त होते. तसेच, शांततेत मनन केल्यामुळे आपल्यामध्ये विनय व नम्रता यांसारखे उत्तम गुण उत्पन्न होतात आणि जीवनातील खरोखर महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींबद्दल आपली कदर वाढते.
शांत राहणे हा एक सद्गुण असला तरी, ‘बोलण्याचाही समय असतो.’ (उप. ३:७) आज यहोवाचे खरे उपासक “सर्व जगात” त्याच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आहेत. (मत्त. २४:१४) आणि त्यांची संख्या जसजशी वाढत आहे तसतसा त्यांचा हा आनंदाचा गजर सबंध जगात आणखीनच मोठ्याने ऐकू येत आहे. (मीखा २:१२) तेव्हा, राज्याच्या सुवार्तेची आवेशाने घोषणा करणाऱ्यांमध्ये व देवाच्या महत्कृत्यांचे स्तवन करणाऱ्यांमध्ये आपण निश्चितच सामील झाले पाहिजे. पण, या महत्त्वाच्या कार्यात सहभाग घेण्यासोबतच योग्य परिस्थितीत शांत राहण्याचे महत्त्व आपण ओळखतो हे देखील आपल्या जीवनचर्येवरून दिसून यावे याकडे आपण लक्ष देऊ या.
[३ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती सभांतून दिले जाणारे मार्गदर्शन आपण लक्षपूर्वक ऐकून आत्मसात केले पाहिजे
[४ पानांवरील चित्र]
सेवाकार्य करताना लोक आपल्याशी अपमानास्पद रीतीने बोलतात तेव्हा बरेचदा शांत राहणेच सर्वात उत्तम असते
[५ पानांवरील चित्र]
शांत वातावरणात मनन करणे सोपे जाते