वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
सैतानाला स्वर्गातून केव्हा घालवण्यात आले?—प्रकटी. १२:१-९.
सैतानाला स्वर्गातून केव्हा घालवण्यात आले याची निश्चित वेळ बायबलमधील प्रकटीकरण पुस्तकात दिलेली नाही. पण, एका पाठोपाठ एक घडणाऱ्या अनेक घटनांचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे, ज्यावरून सैतानाला स्वर्गातून केव्हा घालवण्यात आले याचा अंदाज बांधता येईल. यांपैकी पहिली घटना म्हणजे मशीही राज्याची स्थापना. यानंतर, “स्वर्गात युद्ध सुरू झाले” आणि या युद्धात सैतानाचा पराभव झाला व शेवटी त्याला स्वर्गातून घालवून देण्यात आले.
१९१४ मध्ये “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली व एका नवीन राज्याची स्थापना झाली हे शास्त्रवचने अगदी स्पष्टपणे दाखवून देतात. * (लूक २१:२४) मग, या घटनेनंतर नेमके केव्हा स्वर्गात युद्ध सुरू झाले व सैतानाला नेमके केव्हा स्वर्गातून घालवून देण्यात आले?
प्रकटीकरण १२:४ यात असे म्हटले आहे: “स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर [सैतान] त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता.” यावरून, सैतानाला त्या नवीन राज्याचे ताबडतोब, शक्यतो त्याची स्थापना होताच नामोनिशाण मिटवून टाकायचे होते हे दिसून येते. पण, यहोवाच्या हस्तक्षेपामुळे सैतान आपला हा दुष्ट हेतू पूर्ण करू शकला नाही. तरीसुद्धा, नव्याने स्थापित झालेल्या या राज्याला नुकसान पोहचवण्याचा तो नेटाने प्रयत्न करतच राहिला. त्यामुळे, ‘मिखाएल व त्याच्या दूतांनी,’ ‘अजगर व त्याच्या दूतांना’ स्वर्गातून घालवून देण्यास लगेच पाऊल उचलले. यावरून, १९१४ मध्ये राज्याची स्थापना झाल्यानंतर लगेचच सैतानाचा पराभव करून त्याला स्वर्गातून घालवून देण्यात आले असे म्हणता येईल.
विचारात घेण्याजोगी आणखीन एक गोष्ट म्हणजे अभिषिक्त ख्रिश्चनांचे पुनरुत्थान. बायबलमधील पुराव्यांवरून दिसून येते, की स्वर्गात राज्याची स्थापना झाल्यानंतर लवकरच अभिषिक्त ख्रिश्चनांचे पुनरुत्थान सुरू झाले. * (प्रकटी. २०:६) अजगर व त्याच्या दूतांशी येशूने केलेल्या लढाईत येशूसोबत त्याचे अभिषिक्त बांधव असल्याचा उल्लेख बायबलमध्ये कोठेही आढळत नाही. त्यामुळे, ख्रिस्ताच्या बांधवांचे पुनरुत्थान सुरू होण्याआधीच स्वर्गात युद्ध झाले असावे आणि सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून घालवण्यात आले असावे.
तर मग, सैतान व त्याचे दुरात्मे यांना स्वर्गातून केव्हा घालवून देण्यात आले याची नेमकी वेळ बायबलमध्ये सांगितलेली नाही. पण, १९१४ मध्ये येशू ख्रिस्त स्वर्गात राजा झाला त्याच्यानंतर लगेच ही घटना घडली हे स्पष्ट होते.
[तळटीपा]
^ परि. 6 टेहळणी बुरूज, जानेवारी १, २००७, पृष्ठे २९-३०, परिच्छेद ९-१३ पाहा.