आपल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला
आपल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला
“लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला.” —इफिस. ४:२५.
१, २. सत्याबद्दल अनेक लोक कोणता दृष्टिकोन बाळगतात?
सत्याबद्दल किंवा खरेपणाबद्दल आजपर्यंत अनेक लोकांनी निरनिराळी मते मांडली आहेत. सा.यु.पू. सहाव्या शतकातल्या ॲल्केयस नावाच्या एका ग्रीक कवीने म्हटले: “मद्यातच खरे सत्य आहे.” त्याच्या म्हणण्याचा अर्थ, एखादी व्यक्ती मद्याच्या प्रभावाखाली आल्यावर भरभरून बोलू लागते व आपल्या मनातले सत्य उगळू लागते. पहिल्या शतकातील रोमी प्रांताधिकारी पंतय पिलात याने सत्याबद्दल शंका व्यक्त करत येशूला, “सत्य काय आहे? “ असे विचारले होते. यावरून त्याचाही सत्याबद्दल चुकीचा दृष्टिकोन होता हे दिसून येते.—योहा. १८:३८.
२ सत्याबद्दल आजही लोकांची अनेक परस्परविरोधी मते आहेत. काहींच्या मते “सत्य” या शब्दाचे निरनिराळे अर्थ आहेत किंवा प्रत्येक व्यक्ती आपापल्या सोयीप्रमाणे त्याचा वेगळा अर्थ लावते. इतर काही जण, सोयीस्कर असते किंवा फायद्याचे असते तेव्हाच खरे बोलतात. खोटे बोलण्याचे महत्त्व (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटले आहे: “प्रामाणिकता एक उत्कृष्ट गुण असेल, पण अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माणसाला इतका संघर्ष करावा लागतो की तो या गुणाला फारसे महत्त्व देत नाही. जगण्यासाठी खोटे बोलावेच लागते.”
३. सत्य बोलण्याविषयी येशूचे उदाहरण उल्लेखनीय आहे असे का म्हणता येईल?
३ येशूच्या शिष्यांचा दृष्टिकोन मात्र या सर्वांपेक्षा निराळा आहे! सत्याविषयीचा येशूचा दृष्टिकोन कोणत्याही तत्त्वज्ञानावर आधारित नव्हता. तो नेहमी खरे बोलला. त्याच्या शत्रूंनीही ही गोष्ट मान्य केली होती. त्यांनी म्हटले: “गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकविता.” (मत्त. २२:१६) आज येशूचे खरे अनुयायी देखील त्याच्या या उदाहरणाचे अनुकरण करतात. सत्य बोलण्यास ते कचरत नाहीत. प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना जो सल्ला दिला त्याच्याशी ते पूर्णपणे सहमत आहेत. पौलाने म्हटले: “लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला.” (इफिस. ४:२५) पौलाच्या या शब्दांचे तीन पैलू आपण विचारात घेऊ या. पहिला, आपला शेजारी कोण आहे? दुसरा, खरे बोलणे याचा अर्थ काय होतो? आणि तिसरा, आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रामाणिकपणे कसे वागू शकतो?
आपला शेजारी कोण आहे?
४. आपला शेजारी कोण आहे याविषयी पहिल्या शतकातील यहुदी धर्मगुरुंनी काय शिकवले, पण या उलट येशूने यहोवाच्या दृष्टिकोनाचे कशा प्रकारे अनुकरण केले?
४ सा.यु. पहिल्या शतकात, काही यहुदी धर्मगुरुंनी, केवळ आपले यहुदी बांधव किंवा आपले जवळचे मित्रच आपले ‘शेजारी’ आहेत असे शिकवले होते. येशूने मात्र या बाबतीत आपल्या पित्याचे अनुकरण केले व त्याच्यासारखाच दृष्टिकोन बाळगला. (योहा. १४:९) अगदी उल्लेखनीय रीतीने त्याने दाखवून दिले, की देवाच्या नजरेत एक जात दुसऱ्या जातीपेक्षा किंवा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ नाही. (योहा. ४:५-२६) तसेच, पवित्र आत्म्याद्वारे यहोवाने पेत्राला प्रकट केले, की “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:२८, ३४, ३५) म्हणून, सर्व लोक आपले शेजारी आहेत असे आपण मानले पाहिजे व आपल्याशी वैरभावाने वागणाऱ्यांवरही आपण प्रेम केले पाहिजे.—मत्त. ५:४३-४५.
५. शेजाऱ्यासोबत खरे बोलणे याचा काय अर्थ आहे?
५ पण, आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला असे जे पौलाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो? खरे बोलणे याचा अर्थ, आपण जे काही बोलतो ते वास्तवावर आधारित असावे व त्यात कोणत्याही प्रकारचे कपट नसावे. खरे ख्रिस्ती, इतरांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती देत नाहीत किंवा एखादी गोष्ट फेरफार करून सांगत नाहीत. ते ‘वाइटाचा वीट मानतात’ आणि ‘बऱ्याला चिकटून राहतात.’ (रोम. १२:९) ‘सत्यस्वरूप देवाचे’ अनुकरण करून आपणही जे काही बोलतो, जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक व निष्कपट असले पाहिजे. (स्तो. १५:१, २; ३१:५) आपण कधीकधी अशा एका परिस्थितीत सापडतो जेव्हा खरे बोलण्याची आपल्याला लाज वाटते किंवा अवघडलेपणा जाणवतो. अशा स्थितीत देखील शब्दांची विचारपूर्वक निवड करून आपण खोटे बोलण्याचे टाळू शकतो.—कलस्सैकर ३:९, १० वाचा.
६, ७. (क) सत्य बोलणे याचा अर्थ, आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला माहीत असलेला हरएक तपशील देणे असा होतो का? स्पष्ट करा. (ख) आपण कोणावर भरवसा ठेवून त्यांना खरे उत्तर दिले पाहिजे?
६ पण, खरे बोलणे याचा अर्थ, आपल्याला कोणी काही विचारल्यास आपल्याला माहीत असलेला हरएक तपशील त्याला देणे असा होतो का? जरुरी नाही. येशू पृथ्वीवर होता तेव्हा काही लोकांना थेट उत्तर देणे किंवा विशिष्ट माहिती देणे जरुरीचे नाही हे त्याने दाखवून दिले. उदाहरणार्थ, ढोंगी धर्मगुरुंनी, तो कोणाच्या शक्तीने किंवा अधिकाराने चिन्हे व चमत्कार करतो असे त्याला विचारले तेव्हा त्याने त्यांना म्हटले: “मीहि तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन.” शास्त्री व वडीलजनांनी त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नाकारले तेव्हा येशूने त्यांना म्हटले: “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे हे मीहि तुम्हाला सांगत नाही.” (मार्क ११:२७-३३) त्यांच्या भ्रष्ट कार्यांमुळे व विश्वासाच्या अभावामुळे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आपण बाध्य नाही असे येशूला वाटले. (मत्त. १२:१०-१३; २३:२७, २८) त्याचप्रमाणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी धूर्तपणे वागणाऱ्या व युक्त्या करणाऱ्या धर्मत्यागी व दृष्ट लोकांपासून आज यहोवाच्या लोकांनी सावध असले पाहिजे.—मत्त. १०:१६; इफिस. ४:१४.
७ सर्वच लोकांना एखाद्या गोष्टीविषयी सर्व काही जाणून घेण्याचा अधिकार नसतो हे पौलाने देखील दाखवून दिले. त्याने म्हटले, ‘वटवट व लुडबुड करणारे’ लोक “बोलू नये ते बोलतात.” (१ तीम. ५:१३) होय, जे लोक इतरांच्या खासगी जीवनात लुडबुड करतात किंवा सांगितलेली गोष्ट स्वतःजवळ ठेवत नाहीत अशा लोकांना जाणवते की इतर लोक सहसा त्यांना आपल्या खासगी गोष्टी सांगण्यास कचरतात. म्हणून, ‘शांततेने जीवन जगा, आपल्याच कामात गर्क राहा,’ असा जो ईश्वरप्रेरित सल्ला पौलाने दिला त्याचे अनुकरण करणे किती महत्त्वाचे आहे. (१ थेस्सलनी. ४:११, सुबोध भाषांतर) काही वेळा मात्र, मंडळीतील वडिलांना त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बंधूभगिनींना काही वैयक्तिक प्रश्न विचारावे लागतात. अशा वेळी, आपण वडिलांशी सहकार्य करून सत्य सांगतो तेव्हा त्यांना नक्कीच खूप मदत होते व याची ते कदरही करतात.—१ पेत्र ५:२.
कुटुंबात एकमेकांशी सत्य बोला
८. खरे बोलल्याने कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या आणखी जवळ येण्यास कशा प्रकारे मदत होईल?
८ सहसा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी आपले सगळ्यात जवळचे नाते असते. हे नातेसंबंध आणखी घट्ट करण्यासाठी एकमेकांशी खरे बोलणे अत्यंत गरजेचे आहे. मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे व प्रेमळपणे एकमेकांशी संवाद केल्यास अनेक समस्या व गैरसमज कमी होऊ शकतात किंवा त्यांचे पूर्णपणे निरसन होऊ शकते. उदाहरणार्थ, आपल्या हातून एखादी चूक होते तेव्हा आपल्या विवाहसोबत्याजवळ, आपल्या मुलांजवळ किंवा कुटुंबातील इतर सदस्यांजवळ ती कबूल करण्यास आपण कचरतो का? चुकीबद्दल मनापासून क्षमा मागितल्याने कुटुंबात शांतीचे व एकोप्याचे वातावरण टिकवून ठेवण्यास मदत होते.—१ पेत्र ३:८-१० वाचा.
९. खरे बोलणे याचा अर्थ फटकळपणे किंवा उर्मटपणे बोलणे असा होत नाही असे का म्हणता येईल?
इफिस. ४:३१, ३२) आपण दयाळूपणे व आदरभावाने बोलतो तेव्हा लोक आपल्या बोलण्याला महत्त्व देतात व ज्यांच्याशी आपण बोलतो त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे हे दिसून येते.—मत्त. २३:१२.
९ अर्थात, खरे बोलण्याचा अर्थ, विचार न करता, अगदी फटकळपणे बोलणे असा होत नाही. उर्मटपणे बोलल्याने, तुमचे बोलणे खरे असले तरी इतरांना त्याचे महत्त्व पटणार नाही. पौलाने म्हटले: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (मंडळीत सत्य बोला
१०. सत्य बोलण्याच्या बाबतीत येशूच्या उत्तम उदाहरणावरून मंडळीतील वडिलांना काय शिकता येईल?
१० येशू आपल्या शिष्यांशी सरळ व स्पष्ट शब्दांत बोलला. त्याचा सल्ला प्रेमावर आधारित होता, तरी ऐकणाऱ्यांना खुष करण्यासाठी त्याने आपल्या संदेशाचे महत्त्व कमी केले नाही. (योहा. १५:९-१२) उदाहरणार्थ, आपल्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे या विषयावरून त्याच्या शिष्यांमध्ये अनेकदा वाद झाला तेव्हा त्याने दृढतेने, पण धीराने, नम्रता दाखवण्याचे महत्त्व त्यांना समजावून सांगितले. (मार्क ९:३३-३७; लूक ९:४६-४८; २२:२४-२७; योहा. १३:१४) आज मंडळीतले ख्रिस्ती वडीलही तसेच करतात. नीतिमत्त्वासाठी ते खंबीरपणे उभे राहत असले, तरी देवाच्या कळपावर ते जुलूम करत नाहीत. (मार्क १०:४२-४४) तर, ‘एकमेकांबरोबर उपकारीपणे व कनवाळूपणे’ वागून ते ख्रिस्ताचे अनुकरण करतात.
११. बांधवांवर आपले प्रेम असल्यामुळे आपण आपल्या जिभेचा कशा प्रकारे उपयोग करण्यास प्रवृत्त होऊ?
११ आपल्या बांधवांशी मनमोकळेपणाने, पण त्याच वेळी मर्यादा न ओलांडता बोलण्याद्वारे, आपण इतरांचे मन न दुखवता आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकतो. होय, आपली “जीभ तीक्ष्ण वस्तऱ्यासारखी” वापरून अपमानास्पद किंवा हिणवणारे शब्द बोलून आपण केव्हाही इतरांच्या भावना दुखवणार नाही. (स्तो. ५२:२; नीति. १२:१८) आपल्या बांधवांवर आपले प्रेम असल्यामुळे ‘आपण आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवरतो.’ (स्तो. ३४:१३) अशा प्रकारे, आपण देवाचा सन्मान करतो व मंडळीमध्ये एकता राखण्यास हातभार लावतो.
१२. खोटे बोलण्याविरुद्ध केव्हा न्यायिक कारवाई केली जाऊ शकते? स्पष्ट करा.
१२ मनात दुष्ट हेतू बाळगून खोटे बोलणाऱ्यांपासून मंडळीचे संरक्षण करण्यासाठी वडीलजन खूप मेहनत घेतात. (याकोब ३:१४-१६ वाचा.) सहसा, दुष्ट हेतूने खोटे बोलणाऱ्या या लोकांना इतरांचे नुकसान व्हावे, त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास व्हावा किंवा मनःस्ताप व्हावा असे वाटत असते. यामध्ये इतरांची दिशाभूल करण्यासाठी लहानसहान गोष्टींत खोटे बोलणे किंवा एखादी गोष्ट वाढवून सांगणे यांव्यतिरिक्त आणखी बरेच काही गोवलेले असते. अर्थात, सर्वच प्रकारची लबाडी वाईट आहे. पण, सर्वच प्रकारच्या असत्याविरुद्ध न्यायिक कारवाई करण्यात येईल असेही नाही. यास्तव, एखाद्या व्यक्तीला दुष्ट हेतूने, जाणूनबुजून खोटे बोलण्याची सवय झाली आहे हे लक्षात घेऊन तिच्याविरुद्ध न्यायिक कारवाई करण्याची गरज आहे का? की कडक शब्दांत, पण प्रेमळपणे दिलेला सल्ला पुरेसा आहे? हे ठरवताना वडिलांनी संतुलित दृष्टिकोन, समजुतदारपणा व उत्तम निर्णयशक्ती यांचा उपयोग करणे गरजेचे आहे.
देवाणघेवाणीच्या व्यवहारांत सत्य बोला
१३, १४. (क) कशा प्रकारे काही लोक आपल्या नोकरीच्या ठिकाणी खोटे बोलतात? (ख) नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे वागल्याने आणि सत्य बोलल्याने कोणते चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात?
१३ आपण अशा एका काळात जगत आहोत ज्यामध्ये राजरोसपणे बेइमानी केली जाते. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी बेइमानी करण्याच्या प्रलोभनाचा विरोध करणे कठीण जाऊ शकते. नोकरीसाठी अर्ज करताना कित्येक जण अगदी सर्रासपणे खोटे बोलतात. उदाहरणार्थ, चांगली व लठ्ठ पगाराची नोकरी मिळवता यावी म्हणून नोकरीसाठी अर्ज करताना ते आपले शिक्षण व नोकरीचा अनुभव वाढवून सांगतात. तर इतर काही जण, नोकरीच्या ठिकाणी काम करत असल्याचे दाखवतात, पण खरेतर, कंपनीच्या नियमांविरुद्ध ते आपली खासगी कामे करत असतात. जसे की, ते आपल्या कामाशी संबंधित नसलेले साहित्य वाचतात, खासगी फोन कॉल करतात, इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवतात किंवा इंटरनेटचा वापर करतात.
१४ खऱ्या ख्रिश्चनांसाठी, प्रामाणिक असणे किंवा सत्य बोलणे हा आपापल्या मर्जीचा प्रश्न नाही. (नीतिसूत्रे ६:१६-१९ वाचा.) पौलाने म्हटले: ‘सर्व बाबतीत चांगले [“प्रामाणिकपणे,” NW] वागण्याची आमची इच्छा आहे.’ (इब्री १३:१८) यास्तव, खरे ख्रिश्चन त्यांना मिळत असलेल्या पूर्ण दिवसाच्या मोबदल्यासाठी पूर्ण दिवस मेहनत करतात. (इफिस. ६:५-८) आपण इमानदारीने काम करतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याची देखील स्तुती होते. (१ पेत्र २:१२) स्पेनमधील रोबर्टो नावाच्या व्यक्तीचे उदाहरण विचारात घ्या. इमानदारीने व जबाबदारीने काम करत असल्याबद्दल त्याच्या मालकाने त्याची प्रशंसा केली. रोबर्टोच्या उत्तम आचरणामुळे त्याच्या कंपनीने आणखी यहोवाच्या साक्षीदारांना कामावर घेतले. ते देखील आपल्या कामात अतिशय मेहनती व प्रामाणिक होते. अशा प्रकारे रोबर्टोने २३ बाप्तिस्माप्राप्त बांधवांना व ८ बायबल विद्यार्थ्यांना त्याच्या कंपनीत नोकरी मिळवून दिली.
१५. आपण आपल्या व्यवहारांत सत्य बोलतो हे एका ख्रिस्ती व्यावसायिकाने कशा प्रकारे दाखवून दिले पाहिजे?
१५ आपला स्वतःचा व्यवसाय असल्यास, आपल्या सर्व व्यवहारांमध्ये आपण इमानदार असतो का? की कधीकधी आपल्या शेजाऱ्याबरोबर आपण सत्य बोलण्यास चुकतो? स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीने, झटपट विक्री व्हावी म्हणून आपल्या उत्पादनाविषयी किंवा सेवेविषयी खोटी माहिती देऊ नये. तसेच, आपला व्यापार वाढवण्यासाठी त्याने लाच देऊ अगर घेऊ नये. इतरांनी आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसेच आपणही इतरांशी वागले पाहिजे.—नीति. ११:१; लूक ६:३१.
सरकारी अधिकाऱ्यांशी सत्य बोला
१६. खरे ख्रिस्ती (क) सरकारी अधिकाऱ्यांना काय देतात? (ख) यहोवाला काय देतात?
१६ येशूने असे म्हटले: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्त. २२:२१) आपण कैसराला अर्थात सरकारी अधिकाऱ्यांना काय दिले पाहिजे? येशूने वरील शब्द, कर भरण्याच्या संदर्भात बोलले होते. त्यामुळे, देवासमोर व माणसांसमोर शुद्ध विवेक राखण्यासाठी खरे ख्रिस्ती ज्या देशात राहतात त्या देशातील कायद्यांचे पालन करतात. यांत कर भरण्याविषयी असलेल्या कायद्याचा देखील समावेश होतो. (रोम. १३:५, ६) पण त्याच वेळी यहोवा हा आपला सार्वभौम सत्ताधिकारी व एकमेव खरा देव आहे याची देखील आपण जाणीव राखतो व संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रेम करतो. (मार्क १२:३०; प्रकटी. ४:११) आणि म्हणूनच, कोणतीही अट न बाळगता आपण यहोवा देवाला अधीनता दाखवतो.—स्तोत्र ८६:११, १२ वाचा.
१७. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेण्याच्या बाबतीत यहोवाचे लोक कोणता दृष्टिकोन बाळगतात?
१७ अनेक देशांमध्ये गरजवंताना साहाय्य करण्यासाठी सरकारद्वारे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात किंवा काही सामाजिक सेवा पुरवल्या जातात. खऱ्या ख्रिश्चनांनी अशा प्रकारच्या मदतीचा लाभ घेण्यात काहीच गैर नाही,
पण त्यासाठी ते पात्र असले पाहिजेत. सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या मदतीचा लाभ घेण्यासाठी आपण सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणार नाही. कारण, आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोलणे यात सरकारी अधिकाऱ्यांशी सत्य बोलणे हे देखील समाविष्ट आहे.सत्य बोलल्यामुळे मिळणारे आशीर्वाद
१८-२०. आपल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोलल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?
१८ सत्य बोलल्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. आपला विवेक शुद्ध राहतो आणि आपल्याला मनःशांती लाभते. (नीति. १४:३०; फिलिप्पै. ४:६, ७) शुद्ध विवेक बाळगणारे लोक देवाच्या नजरेत अनमोल आहेत. तसेच, आपण सर्व बाबतीत प्रामाणिक असतो तेव्हा लोकांसमोर आपली कृत्ये उघडकीस येतील अशी भीती देखील आपल्याला नसते.—१ तीम. ५:२४.
१९ सत्य बोलल्यामुळे मिळणाऱ्या आणखी एका आशीर्वादाचा विचार करा. पौलाने असे म्हटले: ‘सत्याच्या वचनाने सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.’ (२ करिंथ. ६:४, ७) ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका यहोवाच्या साक्षीदाराच्या अनुभवावरून हे सिद्ध होते. या बांधवाला आपली कार विकायची होती. त्याने आपली कार एका गिऱ्हाइकाला दाखवली व कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितले. पण, त्याचवेळी त्याने कारमध्ये असलेल्या बिघाडांबद्दलही सांगितले, आणि विशेष म्हणजे कोणाच्याही लक्षात आले नसते अशा बिघाडांबद्दल देखील त्याने सांगितले. कारची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावर त्या गिऱ्हाइकाने, तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात का असे त्या बांधवाला विचारले. तो या निष्कर्षावर का पोहचला होता? कारण त्याने बांधवाचा प्रामाणिकपणा व नीटनेटकेपणा पाहिला होता. याचा परिणाम असा झाला, की त्या माणसाला चांगली साक्ष देण्याची संधी बांधवाला मिळाली.
२० आपणही नेहमी सत्य बोलण्याद्वारे व प्रामाणिक असण्याद्वारे आपल्या सृष्टिकर्त्याची स्तुती करतो का? पौलाने म्हटले: “आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही.” (२ करिंथ. ४:२) तेव्हा, आपल्या शेजाऱ्याबरोबर नेहमी सत्य बोलण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू या. असे केल्याने, आपल्या स्वर्गीय पित्याचा व त्याच्या लोकांचा गौरव होतो.
तुमचे उत्तर काय असेल?
• आपला शेजारी कोण आहे?
• आपल्या शेजाऱ्यासोबत सत्य बोलणे याचा काय अर्थ होतो?
• सत्य बोलल्याने कशा प्रकारे देवाचा गौरव होतो?
• सत्य बोलल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चित्र]
तुमच्या हातून लहानसहान चुका होतात तेव्हा तुम्ही त्या लगेच कबूल करता का?
[१८ पानांवरील चित्र]
नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही खरे बोलता का?