इतरांवर जबाबदारी सोपवणे का गरजेचे आहे वहे कसे केले जावे?
इतरांवर जबाबदारी सोपवणे का गरजेचे आहे वहे कसे केले जावे?
इतरांवर जबाबदारी सोपवणे ही काही नवीन गोष्ट नाही. पृथ्वीच्या निर्मितीच्याही आधी, इतरांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे उदाहरण सापडते. यहोवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला बनवले व एक “कुशल कारागीर” म्हणून त्याचा उपयोग करून विश्वाची निर्मिती केली. (नीति. ८:२२, २३, ३०; योहा. १:३) पहिल्या मानवी जोडप्याची सृष्टी केल्यानंतर देवाने त्यांना सांगितले, “पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्प. १:२८) आपल्या निर्माणकर्त्याने मानवांवर संपूर्ण पृथ्वी व्यापून तिला एदेन बागेसारखे नंदनवन बनवण्याची जबाबदारी सोपवली होती. होय, इतरांवर जबाबदाऱ्या सोपवणे हे अगदी सुरुवातीपासूनच यहोवाच्या संघटनेचे वैशिष्ट्य आहे.
इतरांवर जबाबदारी सोपवण्यात कशाचा समावेश होतो? ख्रिस्ती वडिलांनी मंडळीतील काही कामे इतरांवर सोपवायला का शिकले पाहिजे? आणि हे त्यांना कसे करता येईल?
जबाबदारी सोपवणे म्हणजे काय?
“जबाबदारी सोपवणे” म्हणजे “विश्वासाने काम सुपूर्त करणे; प्रतिनिधी म्हणून नेमणे; जबाबदारी किंवा अधिकार स्वाधीन करणे.” तेव्हा, जबाबदारी सोपवण्याचा अर्थ एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यात इतरांचा समावेश करणे असा होतो. यात आपले अधिकार काही प्रमाणात इतरांवर सोपवणे देखील सामील आहे.
ख्रिस्ती मंडळीत ज्यांच्यावर काम सोपवले जाते, त्यांच्याकडून
ते काम पूर्ण करण्याची, ते काम कसे चालले आहे याचा अहवाल देण्याची व त्यांच्यावर ज्यांनी काम सोपवले आहे त्यांच्या सल्ल्यानुरूप काम करण्याची अपेक्षा केली जाते. पण मूळ जबाबदारी ज्या नियुक्त बांधवाने काम सोपवले आहे त्याचीच असते. त्याने काम नीट चालले आहे किंवा नाही याकडे लक्ष देण्याची आणि आवश्यकतेनुसार सल्ला देण्याची गरज आहे. तरीही, काही जण कदाचित विचारतील, “जर तुम्ही स्वतः एखादे काम करू शकता तर ते इतरांवर सोपवण्याची काय गरज?”इतरांवर सोपवण्याची गरज का आहे?
याबद्दल विचार करा. यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला बनवले व निर्मिती कार्याचे उरलेले काम करण्यासाठी त्याला प्रतिनिधी म्हणून नेमले. होय, ‘स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही, जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.’ (कलस्सै. १:१६, ईझी टू रीड व्हर्शन) खरेतर, निर्माणकर्ता यहोवा सर्वकाही स्वतः करू शकला असता. पण, आपल्या पुत्रानेही फलदायी काम करण्याचा आनंद लुटावा असे त्याला वाटले. (नीति. ८:३१) निर्मितीच्या कार्यात सहभागी झाल्यामुळे पुत्राला देवाच्या गुणांबद्दल अधिक जाणून घ्यायला मदत मिळाली. एका अर्थाने पित्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रशिक्षित करण्यासाठी या संधीचा उपयोग केला.
पृथ्वीवर असताना येशूने इतरांवर जबाबदाऱ्या सोपवण्याद्वारे आपल्या पित्याचे अनुकरण केले. त्याने हळूहळू आपल्या शिष्यांना प्रशिक्षित केले. आपल्या १२ प्रेषितांना व इतर ७० शिष्यांना प्रचार कार्याची सुरुवात करण्यासाठी त्याने पाठवले. (लूक ९:१-६; १०:१-७) नंतर जेव्हा येशूने स्वतः अशा ठिकाणांना भेटी दिल्या तेव्हा तेथील लोकांना आधीच थोडीफार माहिती असल्याने त्यांना साक्ष देणे येशूला सोपे गेले. पृथ्वीवरून जाताना येशूने त्याच्या प्रशिक्षित शिष्यांवर आणखी मोठी जबाबदारी सोपवली. यात जगभरात प्रचार कार्य करणे समाविष्ट होते.—मत्त. २४:४५-४७; प्रे. कृत्ये १:८.
इतरांवर जबाबदाऱ्या सोपवणे व प्रशिक्षण देणे ख्रिस्ती मंडळीचे वैशिष्ट्य बनले. प्रेषित पौलाने तीमथ्याला म्हटले, “ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.” (२ तीम. २:२) त्याअर्थी, जे अनुभवी आहेत त्यांनी इतरांना प्रशिक्षित केले पाहिजे जेणेकरून ते देखील आणखी इतरांना शिकवू शकतील.
इतरांवर काम सोपवण्याद्वारे वडील आपल्यासोबत त्यांनाही, मंडळीला शिकवण्याच्या व कळपाचे पालन करण्याच्या कामांचा आनंद लुटण्याची संधी देऊ शकतात. मानवांच्या क्षमतांना मर्यादा असल्याकारणाने वडिलांनी इतरांवर मंडळीतील कामे सोपवणे अधिकच महत्त्वाचे ठरते. बायबल म्हणते: “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीति. ११:२) नम्र असण्यात आपल्या मर्यादांची जाणीव असणे समाविष्ट आहे. सर्वकाही तुम्ही स्वतःच करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही थकून जाल व तुमच्या कुटुंबीयांसाठी जो वेळ तुम्ही राखून ठेवला पाहिजे त्यापासून त्यांना वंचित राहावे लागेल. त्यामुळे आपल्या जबाबदारीचा काही भार इतरांवर सोपवण्यातच शहाणपण आहे. उदाहरणार्थ, वडिलवर्गाचा संयोजक या नात्याने सेवा करणाऱ्या बांधवाचा विचार करा. हा बांधव मंडळीचे जमाखर्च अहवाल तपासून पाहण्यास इतर वडिलांना सांगू शकतो. असे केल्यामुळे अहवाल तपासून पाहणाऱ्या या वडिलांना मंडळीच्या आर्थिक स्थितीची कल्पना येईल.
इतरांवर काम सोपवल्यामुळे त्यांना आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करणे व अनुभव प्राप्त करणे शक्य होते. पण यासोबतच, जबाबदारी सोपवणाऱ्यालाही त्या बांधवांच्या क्षमतांचे निरीक्षण करण्याची संधी मिळते. अशा प्रकारे, वडील मंडळीतील निरनिराळी कामे इतर बांधवांवर सोपवण्याद्वारे, भविष्यात जे सेवा सेवक म्हणून कार्य करू शकतील अशा बांधवांची कार्यक्षमता पारखू शकतात.—१ तीम. ३:१०.
इतरांवर जबाबदाऱ्या सोपवण्याद्वारे वडील त्यांच्यावर भरवसा असल्याचे दाखवतात. पौलाने तीमथ्याला मिशनरी कार्यासाठी प्रशिक्षित केले होते. त्या दोघांमध्ये एक जवळचा नातेसंबंध निर्माण झाला होता. पौलाने तीमथ्याला “विश्वासातील माझे खरे लेकरू” असे संबोधले. (१ तीम. १:१, २) सर्व गोष्टींची निर्मिती करताना एकत्र काम केल्यामुळे यहोवा व येशूमध्येही असाच एक दृढ नातेसंबंध निर्माण झाला होता. इतरांवर काम सोपवल्याने वडील देखील त्यांच्यासोबत एक प्रेमळ नातेसंबंध निर्माण करू शकतात.
काही वडील मागेपुढे का पाहतात?
इतरांवर जबाबदारी सोपवण्याचे फायदे माहीत असूनही काही वडिलांना असे करणे जड जाते कारण यामुळे आपण आपला अधिकार गमावू असे त्यांना वाटते. सगळी सूत्रे नेहमी आपल्याच हाती असली पाहिजेत असे त्यांना वाटत असते. पण येशूचे उदाहरण आठवा. स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने त्याच्या शिष्यांवर एक मोठी जबाबदारी सोपवली होती. ते आपल्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात कार्य करतील याची पूर्ण कल्पना असूनही येशूने असे केले.—मत्त. २८:१९, २०; योहा. १४:१२.
काही वडिलांनी पूर्वी इतरांवर जबाबदाऱ्या सोपवल्याही असतील, पण कदाचित त्यांना समाधानकारक परिणाम मिळाले नसावेत. त्यामुळे, आपण स्वतःच ते काम कमी वेळात व अधिक चांगले करू शकतो असे त्यांना आता वाटत असेल. तरीपण, पौलाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. इतरांवर काम सोपवण्याचे महत्त्व तो जाणून होता. पण, इतर जण नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करणार नाहीत याचीही त्याला जाणीव होती. त्याच्या पहिल्या मिशनरी दौऱ्याच्या वेळी त्याने मार्क या आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या सोबत्याला प्रशिक्षण दिले होते. पण, मार्क आपली नेमणूक सोडून घरी निघून गेला तेव्हा साहजिकच पौलाची खूप निराशा झाली. (प्रे. कृत्ये १३:१३; १५:३७, ३८) तरीसुद्धा, या अनुभवामुळे पौलाने इतरांना प्रशिक्षण देण्याचे थांबवले नाही. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे, त्याने तीमथ्य या ख्रिस्ती तरुणाला आपल्या सोबत मिशनरी दौऱ्यांवर येण्याचे निमंत्रण दिले. तीमथ्य आणखी मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यास तयार झाला तेव्हा पौलाने मंडळीत अध्यक्ष व सेवक नेमण्याचा अधिकार त्याच्यावर सोपवून त्याला इफिससमध्येच राहण्याची विनंती केली.—१ तीम. १:३; ३:१-१०, १२, १३; ५:२२.
त्याचप्रमाणे आधुनिक दिवसांतील वडिलांनी देखील, केवळ एका दोघांनी नीट प्रतिसाद दिला नाही म्हणून इतरांना प्रशिक्षण देण्याचे थांबवू नये. इतरांवर भरवसा ठेवायला शिकणे व त्यांना प्रशिक्षित करणे सुज्ञपणाचे व महत्त्वाचे आहे. पण, इतरांवर जबाबदाऱ्या सोपवताना वडिलांनी कोणत्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
इतरांवर जबाबदारी कशी सोपवावी?
जबाबदाऱ्या सोपवताना, तुम्ही ज्यांच्यावर जबाबदारी सोपवू इच्छिता त्यांच्या पात्रतेचा विचार करा. जेरूसलेममध्ये रोजच्या अन्नाच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा प्रेषितांनी ‘पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशा सात प्रतिष्ठित पुरुषांना’ निवडले. (प्रे. कृत्ये ६:३) जर तुम्ही भरवशालायक व्यक्तीवर काम सोपवले नाही, तर ते काम कदाचित पूर्ण होणारच नाही. तेव्हा, एखादी व्यक्ती भरवशालायक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला लहानसहान कामे देऊन पाहा. आणि जर ती व्यक्ती भरवशालायक असल्याचे दिसून आले, तर नंतर तुम्ही तिच्यावर अधिक जबाबदारी सोपवू शकता.
पण, प्रश्न फक्त भरवशालायक असण्याचाच नाही. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व व कौशल्ये वेगवेगळी असतात. तसेच, प्रत्येकाजवळ असलेला अनुभवही वेगवेगळा असतो. एखादा मैत्रिपूर्ण स्वभावाचा व हसतमुख बांधव, राज्य सभागृहात येणाऱ्या लोकांचे स्वागत करणाऱ्या अटेंडंटचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकेल. तर, सर्व कामे शिस्तबद्ध व पद्धतशीर रीतीने करण्याची सवय असलेला बांधव मंडळीच्या सचिवांना अतिशय मोलाची मदत देऊ शकेल. स्मारक विधीसाठी पुष्परचना तयार करण्याची जबाबदारी, सौंदर्याची व कलेची आवड असलेल्या एखाद्या बहिणीवर सोपवली जाऊ शकते.
एखाद्यावर काम सोपवताना, तुमच्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे अगदी स्पष्टपणे त्याला सांगा. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने काही जणांना येशूकडे निरोप घेऊन पाठवले तेव्हा त्याला येशूकडून कोणती माहिती हवी होती, हे त्याने त्यांना समजावून सांगितले. इतकेच काय, तर नेमके काय विचारायचे हेही त्याने त्यांना सांगितले. (लूक ७:१८-२०) तर दुसऱ्या एका प्रसंगी येशूने आपल्या शिष्यांना उरलेले अन्न गोळा करायला सांगितले तेव्हा ते काम कसे करायचे हे त्याने त्यांनाच ठरवू दिले. (योहा. ६:१२, १३) तेव्हा, कामाचे स्वरूप आणि काम ज्याच्यावर सोपवले जाते त्याच्या पात्रतेवर बरेच काही अवलंबून आहे. जबाबदारी सोपवणाऱ्याला आणि ज्याच्यावर ती सोपवली जाते, या दोघांनाही काय साध्य करायचे आहे हे नेमके माहीत असले पाहिजे. तसेच, काम पूर्ण होईपर्यंत किती वेळा प्रगतीचा अहवाल अपेक्षित आहे, याचीही स्पष्ट कल्पना त्या दोघांना असणे महत्त्वाचे आहे. शिवाय, काम ज्याच्यावर सोपवण्यात आले आहे त्याला स्वतःहून निर्णय घेण्याचे कितपत स्वातंत्र्य आहे हे देखील दोघांनाही माहीत असले पाहिजे. जर विशिष्ट तारखेपर्यंत काम संपवायचे असेल तर नुसतीच ती तारीख सांगण्याऐवजी, दोघांनी मिळून त्या तारखेविषयी चर्चा केल्यास व दोघांच्या संमतीने तारीख ठरवल्यास काम करणाऱ्याला अधिक उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.
काम ज्याच्यावर सोपवण्यात येते त्याला आवश्यक निधी, साधने व साहाय्य पुरवले पाहिजे. विशिष्ट व्यक्ती हे काम पाहणार आहे हे इतरांना माहीत असणे देखील काही वेळा मदतदायी ठरू शकते. येशूने इतर शिष्यांच्या देखत “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” पेत्राच्या स्वाधीन केल्या होत्या. (मत्त. १६:१३-१९) त्याच प्रकारे काही बाबतींत, विशिष्ट काम कोणावर सोपवण्यात आले आहे हे मंडळीला कळवणे चांगले राहील.
पण, काम सोपवणाऱ्यांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. इतरांना सोपवलेल्या कामात जर तुम्ही ढवळाढवळ केली तर ज्या व्यक्तीला तुम्ही ते काम सोपवले आहे तिला जणू तुम्ही सांगत असता, की “तुझ्यावर मला तितका भरवसा नाही.” अर्थात, तुमच्या अपेक्षेप्रमाणे नेहमीच काम होईल असे नाही. तरीसुद्धा, ज्या बांधवावर एखादे काम सोपवण्यात आले आहे त्याला काही प्रमाणात स्वातंत्र्य दिले जाते तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला कामाचा अनुभव येतो. याचा अर्थ, तो कशा प्रकारे काम करत आहे याविषयी तुम्ही अगदीच बेफिकीर राहावे असेही नाही. यहोवाने निर्मितीचे कार्य आपल्या पुत्रावर सोपवले तरीसुद्धा तो स्वतःही त्यात सामील झाला. आपल्या कुशल कारागीराला त्याने म्हटले: ‘आपल्या प्रतिरूपाचा असा मनुष्य आपण करू.’ (उत्प. १:२६) तेव्हा, काम करणाऱ्या व्यक्तीला तुमचा पाठिंबा आहे हे तुमच्या शब्दांतून व कृतींतून तिला कळू द्या आणि तिच्या प्रयत्नांबद्दल तिची प्रशंसा करा. काम कोठपर्यंत आले आहे याविषयी चर्चा करणे साहाय्यक ठरेल. जर काम चांगल्या प्रकारे केले जात नसेल, तर आणखी सल्ला किंवा आवश्यक मदत पुरवण्यास मागेपुढे पाहू नका. काम सोपवणारा या नात्याने त्या कामासाठी शेवटी तुम्ही जबाबदार आहात हे ध्यानात ठेवा.—लूक १२:४८.
वडिलांनी बांधवांमध्ये आस्था घेऊन त्यांच्यावर मंडळीतील कामे सोपवल्यामुळे अनेकांना खूप फायदा झाला आहे. खरोखर, यहोवाचे अनुकरण करून इतरांवर जबाबदाऱ्या का व कशा सोपवाव्यात हे सर्वच वडिलांनी शिकून घेतले पाहिजे.
[२९ पानांवरील चौकट]
इतरांवर जबाबदारी सोपवल्याने
• एखादे कार्य साध्य करण्याचा आनंद तुम्ही इतरांनाही अनुभवण्याची संधी देऊ शकता
• तुम्ही अधिक कार्य साध्य करू शकता
• तुम्ही सुज्ञपणा व नम्रता दाखवता
• तुम्ही इतरांना प्रशिक्षण देऊ शकता
• तुम्ही इतरांवर भरवसा असल्याचे दाखवता
[३० पानांवरील चौकट]
इतरांवर जबादारी सोपवताना
• त्या कामासाठी योग्य असणाऱ्या व्यक्तीला निवडा
• स्पष्ट सूचना द्या
• काय साध्य करायचे आहे याची स्पष्ट कल्पना द्या
• आवश्यक साधने पुरवा
• कामाबद्दल आस्था बाळगा आणि काम करणाऱ्यावर तुमचा भरवसा आहे हे त्याला कळू द्या
• शेवटली जबाबदारी स्वतःवर घेण्यास तयार असा
[३१ पानांवरील चित्रे]
इतरांवर काम सोपवण्यासोबतच ते काम कसे चालले आहे यावर लक्ष ठेवणेही महत्त्वाचे आहे