व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगल्या कामांत आवेशी असा!

चांगल्या कामांत आवेशी असा!

चांगल्या कामांत आवेशी असा!

“[येशूने] स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्‍यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्‍त करावे आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.”—तीत २:१४.

१. सा.यु. ३३, निसान १० ला येशू मंदिरात आल्यावर काय घडते?

सा.यु. ३३, निसान १० चा दिवस. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी अनेक जण जेरूसलेममध्ये मंदिराच्या परिसरात जमले आहेत. ते सर्व जण सण सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. येशू तेथे येईल तेव्हा काय घडेल? शुभवर्तमान लेखक मत्तय, मार्क व लूक हे तिघेही सांगतात की येशू पुन्हा एकदा मंदिरातील सर्व खरेदीविक्री करणाऱ्‍यांना तेथून घालवून देतो. तो सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्‍यांच्या बैठका पालथ्या करतो. (मत्त. २१:१२; मार्क ११:१५; लूक १९:४५) तीन वर्षांपूर्वीही येशूने असेच केले होते आणि अजूनही त्याचा आवेश कमी झालेला नाही.—योहा. २:१३-१७.

२, ३. येशूचा आवेश फक्‍त मंदिराची शुद्धी करण्यापुरताच मर्यादित नव्हता हे आपल्याला कसे समजते?

मत्तयाच्या अहवालानुसार येशूचा आवेश मंदिराची शुद्धी करण्यापुरताच मर्यादित नव्हता, तर त्याने तेथे त्याच्याजवळ आलेल्या आंधळ्या व लंगड्या लोकांनाही बरे केले. (मत्त. २१:१४) लूकचा अहवाल येशूने केलेल्या इतर कार्यांबद्दलही सांगतो. “[येशू] मंदिरात दररोज शिक्षण देत असे.” (लूक १९:४७; २०:१) त्याअर्थी, येशूचा आवेश खासकरून त्याच्या प्रचार कार्यातून अगदी स्पष्ट दिसून आला.

नंतर प्रेषित पौलाने तीताला पत्र लिहिले व स्पष्ट केले की येशूने, “स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्‍यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्‍त करावे आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.” (तीत २:१४) आपणही आज “चांगल्या कामांत तत्पर” म्हणजे आवेशी कसे बनू शकतो? याबाबतीत यहुद्यांच्या चांगल्या राजांच्या उदाहरणांमुळे आपल्याला कशा प्रकारे उत्तेजन मिळू शकते?

प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशी

४, ५. चार यहुदी राजे कशा प्रकारे चांगल्या कामासाठी आवेशी होते?

आसा, यहोशाफाट, हिज्कीया व योशीया या सर्वांनी आपआपल्या कारकिर्दीत यहूदातून मूर्तिपूजा मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले होते. आसाने “अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकिली. मूर्तिस्तंभ मोडिले व अशेरा मूर्ति भंगिल्या.” (२ इति. १४:३) यहोशाफाटाने यहोवाच्या उपासनेबद्दल असलेल्या ज्वलंत आवेशाने प्रेरित होऊन, “यहूदातून उच्च स्थाने व अशेरा मूर्ति काढून टाकिल्या.”—२ इति. १७:६; १९:३. *

हिज्कीयाने जेरूसलेममध्ये आयोजित केलेला सात दिवसांचा वल्हांडण सण संपल्यावर “तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरातून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्‍शे या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून फोडून टाकिले, अशेरा मूर्ति फोडून टाकिल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून टाकिल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला.” (२ इति. ३१:१) योशीया आठ वर्षाचा असतानाच राजा बनला होता. बायबल सांगते, “आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ति आणि कोरीव व ओतीव मूर्ति यहूदा व यरुशलेम यातून काढून टाकू लागला.” (२ इति. ३४:३) अशा रीतीने हे चारही राजे चांगल्या कामांसाठी आवेशी होते.

६. आपल्या सेवाकार्याची तुलना यहूदाच्या विश्‍वासू राजांच्या मोहिमांशी का करता येईल?

आज आपणही लोकांना मूर्तिपूजा व अशा इतर अनेक खोट्या शिकवणींपासून मुक्‍त करण्याच्या सुसंघटित कार्यात सहभाग घेतो. घरोघरचे कार्य करताना आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांना भेटणे शक्य होते. (१ तीम. २:४) आशियातील एका मुलीला आठवते की तिची आई कशा प्रकारे घरातील अनेक मूर्तींची पूजा करायची. सगळ्याच मूर्तींमध्ये खरा देव असू शकत नाही या निष्कर्षाला पोचून ही मुलगी खऱ्‍या देवाची ओळख पटावी म्हणून प्रार्थना करायची. एकदा दारावर कोण आले आहेत हे बघायला ती घराबाहेर आली तेव्हा दोन यहोवाचे साक्षीदार तिला दिसले. त्यांनी तिला खऱ्‍या देवाचे नाव यहोवा आहे असे सांगितले. मूर्तिंबद्दलचे सत्य शिकल्याबद्दल ती किती आभारी होती! आता ती प्रचार कार्यात आवेशाने भाग घेते व यहोवाबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल इतरांना शिकण्यास मदत करते.—स्तो. ८३:१८; ११५:४-८; १ योहा. ५:२१.

७. यहोशाफाटाच्या दिवसांत नगरोनगरी पाठवण्यात आलेल्या शिक्षकांचे आपण कसे अनुकरण करू शकतो?

घरोघरचे सेवाकार्य करताना आपल्याला दिलेल्या क्षेत्रात आपण पूर्णपणे साक्ष देतो का? यहोशाफाटाने आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्‍या वर्षात सर्व नगरात लोकांना यहोवाचे नियम शिकवण्यासाठी आपल्या पाच सरदारांना, नऊ लेव्यांना व दोन याजकांना पाठवले होते. त्यांची ही मोहीम इतकी प्रभावी ठरली की शेजारच्या राष्ट्रांतील लोकही यहोवाचे भय बाळगू लागले. (२ इतिहास १७:९, १० वाचा.) आपणही वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी लोकांना भेटी दिल्यास, घरांतील इतर सदस्यांनाही आपल्याला भेटता येईल.

८. आपल्या प्रचार कार्याचे क्षेत्र आपण कसे विस्तारू शकतो?

आधुनिक काळातील देवाचे अनेक सेवक आपले घर सोडून आवेशी प्रचारकांची जेथे जास्त गरज आहे तेथे जाऊन स्वेच्छेने सेवा करत आहेत. तुम्हीही असे करू शकता का? आपल्यापैकी काही जण जे अशा प्रकारे स्थलांतर करू शकत नाहीत ते आपल्या भागात राहणाऱ्‍या पण वेगळी भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न करू शकतात. ८१ वर्षांचे रॉन यांना त्यांच्या क्षेत्रात वेगवेगळ्या देशांचे लोक भेटतात. त्यामुळे त्यांनी ३२ भाषांत अभिवादन करायला शिकून घेतले आहे! नुकतेच रस्त्यावरून चालताना त्यांची भेट एका आफ्रिकन जोडप्याशी झाली. रॉननी त्यांना त्यांच्या योरुबा भाषेत अभिवादन केले. त्यांनी रॉनना आफ्रिकेला कधी गेला होतात का? असे विचारले. यावर रॉननी नाही असे उत्तर दिले. मग आमची भाषा तुम्हाला कशी येते असे त्यांनी विचारले असता रॉनना त्यांना साक्ष देता आली. त्यांना देण्यात आलेली मासिके त्यांनी आनंदाने स्वीकारली व रॉनना आपला पत्ताही दिला. रॉन यांनी तो पत्ता तेथील स्थानिक मंडळीला पाठवला जेणेकरून ते जोडपे बायबल अभ्यास करू शकतील.

९. प्रचार कार्य करताना बायबलचे वचन वाचून दाखवणे गरजेचे का आहे? उदाहरण द्या.

यहोशाफाटाने दिलेल्या आज्ञेवरून नगरोनगरी गेलेले शिक्षक आपल्यासोबत “परमेश्‍वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ” घेऊन गेले होते. बायबल हे देवाचे वचन असल्यामुळे जगभरात लोकांना शिकवताना आपण त्यातूनच शिकवण्याचा प्रयत्न करतो. बायबलची वचने उघडून ती वाचून दाखवण्याचा खास प्रयत्न करण्याद्वारे प्रचार कार्यात बायबलचा वापर करणे किती महत्वाचे आहे हे आपण दाखवतो. साक्षकार्यात भेटलेल्या एका स्त्रीने लिंडा नावाच्या साक्षीदार बहिणीला सांगितले, की तिच्या नवऱ्‍याला पक्षाघात झाल्यामुळे त्याच्याकडे सतत लक्ष देण्याची गरज आहे. ती स्त्री दुःखाने म्हणाली: “मला माहीत नाही मला कोणत्या पापाची शिक्षा देव देतोय.” लिंडा तिला म्हणाली “तुला मी एका गोष्टीची खात्री देऊ शकते.” मग तिने बायबलमधून याकोब १:१३ हे वचन वाचून दाखवले व म्हटले: “आपल्याला व आपल्या प्रिय जनांना जे दुःख सहन करावं लागतं ते देवाकडून मिळालेलं नाही.” हे ऐकताच त्या स्त्रीने लिंडाला प्रेमाने मिठी मारली. लिंडा सांगते: “बायबलचा वापर केल्यामुळेच मी तिला सांत्वन देऊ शकले. काही वेळा आपण बायबलची वचने घरमालकांना वाचून दाखवतो तेव्हा ती ते प्रथमच ऐकत असतात.” या संभाषणामुळे लिंडाला या स्त्रीसोबत बायबल अभ्यास सुरू करता आला.

आवेशाने सेवा करणारे तरुण

१०. ख्रिस्ती तरुणांसाठी योशीया कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण आहे?

१० आता आपण पुन्हा योशियाच्या उदाहरणाकडे पाहू या. त्याने तरुण असतानाच खऱ्‍या उपासनेला पाठिंबा दिला होता. तो २० वर्षांचा असताना मुर्तिपूजेविरुद्ध त्याने मोठी मोहीम राबवली होती. (२ इतिहास ३४:१-३ वाचा.) आजही अनेक तरुण प्रचार कार्यात अशाच प्रकारचा आवेश दाखवत आहेत.

११-१३. यहोवाची आवेशाने सेवा करणाऱ्‍या आधुनिक दिवसांतील तरुणांपासून आपण काय शिकू शकतो?

११ इंग्लडमध्ये राहणारी १३ वर्षीय हान्‍ना शाळेत फ्रेंच भाषा शिकत होती. तेव्हा तिने जवळच्याच एका शहरात फ्रेंच भाषेचा एक नवा गट सुरू झाल्याचे ऐकले. तिथे होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहण्यासाठी तिच्या वडिलांनी सोबत येण्याची तयारी दाखवली. हान्‍ना आता १८ वर्षांची आहे व फ्रेंच भाषेत आवेशाने नियमित पायनियर म्हणून सेवा करत आहे. तुम्हीही एखादी नवी भाषा शिकून यहोवाबद्दल इतरांना शिकण्यास मदत करू शकता का?

१२ रेचलला, देवाचा सन्मान करणाऱ्‍या ध्येयांचा पाठलाग करा (इंग्रजी) हा व्हिडिओ खूप आवडला. १९९५ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला तेव्हा ती काय विचार करायची हे सांगताना ती म्हणते: “मला वाटत होतं की मी सत्यात चांगली प्रगती करत आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यावर मला असं जाणवलं की इतकी वर्षं मी फक्‍त नावापुरतीच सत्यात होते. सत्यात खऱ्‍या अर्थानं प्रगती करण्यासाठी मला संघर्ष करण्याची गरज होती. मी प्रचार कार्य व माझा वैयक्‍तिक अभ्यास अधिक मेहनतीनं व मन लावून केला पाहिजे असं माझ्या लक्षात आलं.” आता यहोवाची सेवा आपण अधिक आवेशाने करत आहोत असे रेचलला जाणवते. याचा काय परिणाम तिला दिसून आला? “यहोवासोबत माझा नातेसंबंध आणखी दृढ झाला. मी अधिक अर्थपूर्ण रीतीनं प्रार्थना करू लागले, माझा वैयक्‍तिक अभ्यास आणखी सखोल व समाधानकारक बनला आणि बायबलमधील वृत्तान्त मला अधिक वास्तविक वाटू लागले. या सर्वांचा परिणाम म्हणजे मला प्रचार कार्यात आता खूप आनंद मिळतो व यहोवाच्या वचनातून इतरांना सांत्वन मिळतं हे पाहून मला खूप समाधान वाटतं.”

१३ लूक नावाच्या ख्रिस्ती तरुणालाही असाच अनुभव आला. तरुण लोक विचारतात—मी जीवनात काय करू इच्छितो? (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहून त्याला खूप उत्तेजन मिळाले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लूकने असे लिहिले: “माझ्या आयुष्यात मी काय करत आहे याबद्दल विचार करायला मी प्रेरित झालो. आधी माझ्यावर उच्च शिक्षण मिळवून आर्थिक रीत्या स्थिर होण्याचा दबाव होता, त्यानंतर मी माझ्या आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करणार होतो. अशा प्रकारच्या दबावामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध दृढ होत नाही तर याउलट आध्यात्मिक रीत्या तुम्ही कमजोर होता.” तरुण बंधु-भगिनींनो, शाळेत तुम्ही जे शिकता त्याचा उपयोग हान्‍नासारखा आपले सेवाकार्य वाढवण्यासाठी तुम्ही करू शकता का? देवाचा आदर होईल अशा ध्येयांचा पाठलाग करताना रेचलच्या उदाहरणाचे अनुकरण का करू नये? अनेक तरुणांसाठी पाश ठरलेले धोके टाळण्यासाठी लूकचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवा.

धोक्याच्या सूचनांचे उत्सुकतेने पालन करा

१४. यहोवा कोणत्या प्रकारची उपासना स्वीकारतो, आणि असे करताना आज आपल्याला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते?

१४ यहोवाने आपली उपासना स्वीकारावी असे जर वाटत असेल तर यहोवाच्या लोकांनी शुद्ध राहण्याची गरज आहे. यशया अशी ताकीद देतो: “निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तुला शिवू नका; त्याच्यामधून [बाबेलमधून] निघून जा; परमेश्‍वराची पात्रे वाहणाऱ्‍यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा.” (यश. ५२:११) यशयाने हे शब्द लिहिण्याच्या कितीतरी वर्षांआधी चांगला राजा आसा याने यहूदातून अनैतिकता समूळ नष्ट करण्यासाठी आवेशी मोहीम हाती घेतली होती. (१ राजे १५:११-१३ वाचा.) आणि याच्या अनेक शतकांनंतर प्रेषित पौलाने तीताला सांगितले की येशूने त्याच्या शिष्यांना शुद्ध करण्यासाठी व त्यांना “चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक” बनवण्याकरता स्वतःला दिले. (तीत २:१४) आजकालच्या या नीतीभ्रष्ट जगात खासकरून तरुणांसाठी नैतिकरीत्या शुद्ध राहणे एक आव्हानच आहे. उदाहरणार्थ, देवाच्या सेवकांनी, मग ते तरुण असो वा वृद्ध सर्वच प्रकारच्या अश्‍लीलतेपासून (पोर्नोग्राफी) दूर राहिले पाहिजे. आज ठिकठिकाणी, रस्त्यांवर व इमारतींवर लावलेल्या मोठ मोठ्या जाहिरातींमधून, टी.व्ही., चित्रपट यांमधून आणि खासकरून इंटरनेटच्या माध्यमातून झळकणाऱ्‍या अश्‍लीलतेपासून दूर राहण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

१५. वाइटाचा तिरस्कार करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१५ देवाकडून मिळणाऱ्‍या धोक्याच्या सूचनांचे आवेशाने पालन केल्यामुळे वाइटाचा द्वेष करण्यास आपल्याला मदत होऊ शकेल. (स्तो. ९७:१०; रोम. १२:९) एका ख्रिस्ती व्यक्‍तीने म्हटल्याप्रमाणे पोर्नोग्राफीचे “जबरदस्त आकर्षण” टाळण्यासाठी आपण त्याचा द्वेष केला पाहिजे. हे आकर्षण चुंबकीय आकर्षणासारखे असते. चुंबकाच्या प्रभावात असलेल्या धातूला वेगळे करण्यासाठी त्यांच्यातील आकर्षण शक्‍तीपेक्षा अधिक शक्‍तीची गरज असते. त्याचप्रमाणे, पोर्नोग्राफीचे प्रलोभन टाळण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करण्याची गरज आहे. पोर्नोग्राफीचे परिणाम किती घातक असू शकतात हे समजून घेतल्यास आपल्याला त्याचा तिरस्कार करता येईल. इंटरनेटवर अश्‍लील वेबसाईटला भेट देण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी एका बांधवाला खूप प्रयत्न करावे लागले. त्याने त्याचा कंप्युटर घरातील सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवला. त्यासोबतच त्याने स्वतःला शुद्ध ठेवण्याचा व चांगल्या कामासाठी आवेशी असण्याचा दृढ संकल्प केला. त्याने आणखी एक गोष्ट केली. त्याला कामानिमित्त इंटरनेट वापरावा लागत असल्यामुळे पत्नी सोबत असतानाच इंटरनेटचा वापर करण्याचा त्याने दृढनिश्‍चय केला.

चांगल्या आचरणाचे महत्त्व

१६, १७. आपले उत्तम आचरण पाहून इतरांवर काय प्रभाव पडू शकतो? याचे एक उदाहरण द्या.

१६ यहोवाची सेवा करणाऱ्‍या तरुणांची चांगली मनोवृत्ती पाहून अनेकांवर खूप चांगला प्रभाव पडला आहे. (१ पेत्र २:१२ वाचा.) लंडन बेथेलमध्ये प्रिंटिंग प्रेसची दुरुस्ती करण्यासाठी एक माणूस आला होता. तेथे दिवसभर काम केल्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेले त्याचे मत पूर्णपणे बदलले. त्याच्यात झालेला हा बदल, एका साक्षीदार बहिणीबरोबर बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या त्याच्या पत्नीच्या लक्षात आला. याआधी, यहोवाचे साक्षीदार घरी आलेले त्या माणसाला आवडत नसे. पण बेथेलमधून परतल्यावर तेथील लोक त्याच्याशी किती प्रेमळपणे वागले याबद्दल त्याने त्यांची प्रशंसा केली. त्याने म्हटले तेथे कोणीच वाईट भाषा वापरत नव्हते. प्रत्येक जण धीराने वागत होता व तेथील वातावरण शांतीमय होते. तेथील तरुण बंधू-भगिनी कोणताच मोबदला न घेता सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी स्वेच्छेने आपल्या वेळेचा व शक्‍तीचा उपयोग करत आहेत व आवेशाने काम करत आहेत याचे त्याला विशेष आश्‍चर्य वाटले.

१७ त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करणारे बंधु-भगिनी देखील प्रामाणिकपणे आपले काम करतात. (कलस्सै. ३:२३, २४) त्यांच्या या कामसू मनोवृत्तीबद्दल त्यांचे मालक त्यांची कदर करतात व त्यांना गमावू इच्छित नाहीत. यामुळे साक्षीदारांना त्यांची नोकरी टिकवून ठेवता येते.

१८. आपण “चांगल्या कामांत तत्पर” कसे असू शकतो?

१८ यहोवावर आपण भरवसा ठेवतो, त्याच्या सूचनांचे पालन करतो व आपल्या उपासना स्थळांची देखभाल करतो तेव्हा यहोवाच्या मंदिराबद्दल आपण आवेशी आहोत हे दिसून येते. शिवाय, राज्य प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण होता होईल तितका भाग घेऊ इच्छितो. आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्या उपासनेशी संबंधित असलेल्या शुद्ध दर्जांनुसार जीवन जगण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यास आपल्याला अनेक आशीर्वाद लाभतील. आणि “चांगल्या कामांत तत्पर” किंवा आवेशी असलेले लोक म्हणून आपण ओळखले जाऊ.—तीत २:१४.

[तळटीप]

^ परि. 4 कदाचित आसाने खोट्या उपासनेशी संबधित असलेली उच्च स्थाने काढून टाकली असावीत, पण जेथे यहोवाची उपासना केली जायची ती उच्च स्थाने त्याने तशीच राहू दिली असावीत. किंवा ही उच्च स्थाने आसाच्या कारकिर्दीत नंतर बांधण्यात आली असावीत व ती त्याचा मुलगा यहोशाफाट याने काढून टाकली असावीत.—१ राजे १५:१४; २ इति. १५:१७.

बायबलमधील व आधुनिक दिवसांतील उदाहरणांवरून

• प्रचाराचे व शिक्षण देण्याचे कार्य आवेशाने कसे करता येईल याबाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• ख्रिस्ती तरुण “चांगल्या कामात तत्पर” कसे असू शकतात याबाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• वाईट सवयींपासून कसे मुक्‍त होता येईल याबाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळाले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

सेवाकार्यात तुम्ही नियमितपणे बायबल वापरता का?

[१५ पानांवरील चित्र]

शाळेत असताना दुसरी भाषा शिकून घेतल्याने तुम्हाला तुमचे सेवाकार्य वाढवता येईल