वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
यहुदी लोकांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येशूचा वध करण्याची मागणी केली तेव्हा ते “अज्ञानाने” वागले असे प्रेषित पेत्र कसे काय म्हणू शकला, कारण, येशूने तर सबंध इस्राएल राष्ट्रात प्रचार कार्य केले होते?—प्रे. कृत्ये ३:१७.
मशीहाचा वध होण्यात यहुद्यांची काय भूमिका होती याविषयी त्यांना उद्देशून बोलताना प्रेषित पेत्राने असे म्हटले: “तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीहि, जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.” (प्रे. कृत्ये ३:१४-१७) काही यहुद्यांना येशू हाच मशीहा आहे हे समजले नसावे किंवा येशूच्या शिकवणी त्यांना कळाल्या नसाव्यात. पण, त्यांच्यापैकी काहींनी मात्र जाणूनबुजून मशीहाला ओळखण्यास नकार दिला होता. याचे कारण म्हणजे त्यांना देवाचा अनुग्रह मिळवण्याची मुळातच इच्छा नव्हती. काहींचे मन येशूबद्दल कलुषित होते. तर काहींच्या मनात त्याच्याविषयी हेवा व द्वेष होता.
यहोवाचा अनुग्रह मिळवण्याची इच्छा नसल्यामुळे येशूच्या शिकवणींकडे बघण्याच्या बऱ्याच जणांच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम झाला हे विचारात घ्या. येशू सहसा दाखले देऊन शिकवत असे. आणि ज्यांना तो विषय आणखी स्पष्टपणे समजून घेण्याची इच्छा असेल, त्यांना तो या दाखल्यांचा खुलासा करून सांगत असे. पण, काही जण येशूचे बोलणे तेवढ्यापुरते ऐकून तिथून निघून जायचे. आणखी माहिती मिळवण्याचा ते जराही प्रयत्न करायचे नाहीत. एकदा तर काही शिष्यांनाही येशूने वापरलेली एक उपमा खटकली. त्यांनी येशूच्या बोलण्याचा काय अर्थ होता हे समजावून न घेताच त्याविषयी हरकत घेतली. (योहा. ६:५२-६६) खरेतर येशूच्या दाखल्यांमुळे, हे लोक आपली विचारसरणी व वागणूक बदलायला कितपत उत्सुक आहेत हे दिसून येणार होते. पण त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली नाही. (यश. ६:९, १०; ४४:१८; मत्त. १३:१०-१५) तसेच, मशीहा दाखल्यांच्या साहाय्याने शिकवेल अशी जी त्याच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती तिच्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले.—स्तो. ७८:२.
काही जणांचे मन येशूबद्दल कलुषित असल्यामुळे त्यांनी त्याच्या शिकवणी नाकारल्या. येशू जेथे लहानाचा मोठा झाला होता, त्या नासरेथमधील सभास्थानात त्याने लोकांना उपदेश दिला तेव्हा लोक त्याचे बोलणे ऐकून “थक्क” झाले. पण म्हणून त्यांनी येशूच मशीहा आहे हे स्वीकारले का? नाही, उलट ते त्याच्या पात्रतेबद्दल शंका घेऊ लागले. ते म्हणाले: “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? . . . जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि त्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” (मार्क ६:१-३) येशू एका गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झाला असल्यामुळे नासरेथच्या लोकांच्या दृष्टीने त्याच्या शिकवणी लक्ष देण्याजोग्या नव्हत्या.
त्या काळच्या धर्मपुढाऱ्यांबद्दल काय म्हणता येईल? त्यांच्यापैकीही बहुतेकांनी याच कारणांमुळे येशूच्या शिकवणींकडे कानाडोळा केला. (योहा. ७:४७-५२) त्यांनी येशूच्या शिकवणी नाकारल्या याचे आणखी एक कारण हे होते, की लोक येशूच्या मागे जाऊ लागले आहेत हे पाहून त्यांना येशूचा हेवा वाटायचा. (मार्क १५:१०) शिवाय, येशूने त्यांच्या ढोंगीपणाचा व खोटेपणाचा पर्दाफाश केल्यामुळे या प्रतिष्ठित लोकांना साहजिकच त्याचा राग यायचा. (मत्त. २३:१३-३६) म्हणूनच, येशूने आपल्या शिकवणींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवून म्हटले: “तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला; तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांस तुम्ही प्रतिबंध केला.”—लूक ११:३७-५२.
साडेतीन वर्षे येशू इस्राएल राष्ट्रात सुवार्तेचा प्रचार करत राहिला. यासोबतच, त्याने आणखी बऱ्याच जणांना हे कार्य करण्याचे प्रशिक्षण दिले. (लूक ९:१, २; १०:१, १६, १७) येशू व त्याच्या शिष्यांचे कार्य इतके परिणामकारक होते, की परूशी लोक अशी तक्रार करू लागले: “पाहा जग त्याच्यामागे चालले आहे.” (योहा. १२:१९) त्याअर्थी, बहुतेक यहुदी लोकांना अगदी काहीच माहीत नव्हते असे नाही. पण, येशू हाच मशीहा आहे हे समजून घेण्याच्या बाबतीत मात्र ते ‘अज्ञानातच’ राहिले. मशीहाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची आणि त्याच्यावर असलेले प्रेम आणखी वाढवण्याची त्यांना संधी असूनही या संधीचा त्यांनी फायदा घेतला नाही. काही जण तर येशूचा वध करणाऱ्यांत सामील झाले. म्हणूनच, प्रेषित पेत्राने यहुद्यांपैकी बहुतेकांना असे प्रोत्साहन दिले: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे; आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे.” (प्रे. कृत्ये ३:१९, २०) या सल्ल्याला हजारो यहुद्यांनी व “याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी” प्रतिसाद दिला. त्यांनी अज्ञानाने वागणे सोडून दिले. उलट, त्यांनी पश्चात्ताप केला आणि यामुळे त्यांना यहोवाचा अनुग्रह मिळाला.—प्रे. कृत्ये २:४१; ४:४; ५:१४; ६:७.