व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवणे

ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवणे

ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवणे

“ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.”—कलस्सै. २:३.

१, २. (क) सन १९२२ मध्ये कोणत्या वस्तूंचा शोध लागला होता आणि आज त्या वस्तू कोठे आहेत? (ख) देवाच्या वचनात कोणते आमंत्रण सर्वांनाच देण्यात आले आहे?

गुप्त खजिना हाती लागल्याच्या बातम्यांनी नेहमीच लोकांचे लेक्ष वेधून घेतले आहे. उदाहरणार्थ, १९२२ मध्ये, हावर्ड कार्टर नावाच्या एका ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञाला अत्यंत बिकट परिस्थितीत अनेक दशकांच्या कठोर परिश्रमांनंतर एक विलक्षण शोध लागला. त्याला इजिप्तचा एक राजा, फारो तुतनखामेन याची कबर व जवळजवळ ५,००० वस्तू सापडल्या. हजारो वर्षांनंतर सापडलेली ही कबर व त्या कबरेतील वस्तू अजूनही जशाच्या तशाच होत्या.

कार्टरने लावलेला हा शोध उल्लेखनीय असला तरी त्याला सापडलेल्या बहुतेक वस्तू शेवटी संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या अथवा पुरातन वस्तू गोळा करण्याचा छंद असणाऱ्‍यांच्या हाती पडल्या. इतिहासाच्या किंवा कलेच्या दृष्टिकोनातून कदाचित या वस्तू मौल्यवान असतीलही, पण तुमच्या-आमच्या दररोजच्या जीवनात मात्र त्यांना फारसे महत्त्व नाही. दुसऱ्‍या बाजूला पाहता, देवाचे वचन बायबल आपल्याला अशा धनाचा शोध घेण्याचे आमंत्रण देते जे आपल्या जीवनाकरता खरोखरच महत्त्वाचे आहे. हे आमंत्रण सर्वांसाठी आहे आणि यामुळे मिळणाऱ्‍या प्रतिफळाची तुलना जगातल्या कोणत्याही खजिन्याशी करता येणार नाही.—नीतिसूत्रे २:१-६ वाचा.

३. यहोवा आपल्या उपासकांना ज्या मौल्यवान गोष्टींचा शोध घेण्याचे आमंत्रण देतो त्या आपल्याकरता कशा प्रकारे फायदेकारक आहेत?

यहोवा आपल्या उपासकांना ज्या मौल्यवान गोष्टींचा शोध घेण्याचे आमंत्रण देतो त्या आपल्याकरता किती फायदेकारक आहेत याचा विचार करा. त्यांपैकी एक आहे “परमेश्‍वराचे भय.” देवाचे हे भय सध्याच्या संकटमय काळात आपले संरक्षण करते. (स्तो. १९:९) तसेच, “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त केल्याने आपल्याला जगातला सर्वात मोठा सन्मान प्राप्त होतो आणि तो म्हणजे या विश्‍वातल्या परमश्रेष्ठ व्यक्‍तीशी जवळचा नातेसंबंध जोडण्याचा सन्मान. शिवाय, देवाकडून मिळणारी बुद्धी, ज्ञान व समजशक्‍ती यांच्या साहाय्याने आपण जीवनातील समस्यांना व चिंता-विवंचनांना यशस्वी रीत्या तोंड देऊ शकतो. (नीति. ९:१०, ११) मग, आपल्याला हे अमूल्य धन कसे मिळवता येईल?

आध्यात्मिकदृष्ट्या मौल्यवान गोष्टी मिळवणे

४. आध्यात्मिक खजिन्यांचा शोध आपण कशा प्रकारे घेऊ शकतो?

पुरातत्त्वशास्त्रज्ञांना व संशोधकांना सहसा दूरदूरच्या ठिकाणी जाऊन गुप्त खजिन्यांचा शोध घ्यावा लागतो. पण, आपल्याला मात्र आध्यात्मिक धन कोठे सापडू शकते याची अचूक माहिती आहे. देवाचे वचन एका नकाशासारखे असून, आध्यात्मिक धन कोठे मिळेल याचे नेमके ठिकाण ते आपल्याला दाखवते. ख्रिस्ताविषयी बोलताना प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.” (कलस्सै. २:३) हे वचन वाचल्यानंतर आपण कदाचित विचार करू: ‘या धनाचा शोध घेणे इतके महत्त्वाचे का आहे? कोणत्या अर्थी ते ख्रिस्तामध्ये “गुप्त” आहे? आणि ते आपल्या हाती कसे लागेल?’ या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण प्रेषित पौलाच्या वरील शब्दांचे बारकाईने परीक्षण करू या.

५. कलस्सैकरांना पौल आध्यात्मिक धनाबद्दल का लिहित होता?

पौलाने हे शब्द कलस्सैमधील ख्रिस्ती बांधवांना लिहिले होते. “त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; [आणि] प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे,” म्हणून आपण पुष्कळ परिश्रम करत आहोत असे पौलाने त्यांना सांगितले. (कलस्सैकर २:१, २ वाचा.) पौलाला त्यांच्याविषयी इतकी काळजी का वाटत होती? कलस्सैमधील काही जण ग्रीक तत्त्वज्ञान पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते, तर इतर काही जण मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करत राहण्याचा अट्टहास करत होते. अशा लोकांचा कलस्सैमधील बांधवांवर प्रभाव पडला असेल हे पौलाला माहीत होते. म्हणून त्याने अगदी कडक शब्दांत त्यांना ताकीद दिली: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सै. २:८.

६. पौलाने दिलेला सल्ला आपण गांभीर्याने का घेतला पाहिजे?

आज आपल्यावरही सैतानाचा व सैतानाच्या दुष्ट जगाचा प्रभाव पडतो. सांसारिक तत्त्वज्ञानाचा आपल्या विचारसरणीवर, नैतिक मूल्यांवर, ध्येयांवर व जीवनशैलीवर विलक्षण प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, देवाधर्मापेक्षा माणुसकीच सर्वात महत्त्वाची आहे असे सांगणारा तर्कवाद आणि उत्क्रांतीवाद यांचा आज बऱ्‍याच लोकांवर पगडा आहे. अनेक लोकप्रिय सण व उत्सव खोट्या धर्मावर आधारित आहेत. आजचे मनोरंजन विश्‍व लोकांच्या लैंगिक वासनांना खतपाणी घालते, तर इंटरनेटवरील बरीचशी माहिती लहान-मोठ्या सर्वांनाच अत्यंत घातक आहे. या व अशा इतर सांसारिक गोष्टींचा आपल्यावर सतत मारा होत असल्यामुळे यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनासंबंधी असलेल्या आपल्या भावनांवर व मनोवृत्तीवर सहज परिणाम होऊ शकतो आणि खऱ्‍या जीवनावरील आपली पकड सैल होऊ शकते. (१ तीमथ्य ६:१७-१९ वाचा.) तेव्हा, सैतानाच्या डावपेचांना आपण बळी पडू नये म्हणून पौलाने कलस्सै येथील बांधवांना लिहिलेल्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे व त्याने दिलेला सल्ला गांभीर्याने घेतला पाहिजे.

७. कलस्सैकरांना साहाय्य करू शकतील अशा कोणत्या दोन गोष्टींचा पौलाने उल्लेख केला?

पौलाने कलस्सैकरांना लिहिलेल्या शब्दांचा आपण पुन्हा विचार करू या. त्यांच्याबद्दल काळजी व्यक्‍त केल्यानंतर पौलाने, त्यांना उत्तेजन मिळावे व ते प्रेमाच्या बंधनात बांधले जावे म्हणून दोन गोष्टींचा उल्लेख केला. सर्वप्रथम त्याने ‘ज्ञानाच्या पूर्ण खातरीचा’ उल्लेख केला. याचा अर्थ, शास्त्रवचनांची त्यांची समज अचूक आहे याची त्यांनी पूर्ण खातरी करायची होती. कारण यामुळेच त्यांच्या विश्‍वासाचा पाया भक्कम होणार होता. (इब्री ११:१) यानंतर पौलाने ‘देवाच्या रहस्याच्या पूर्ण ज्ञानाचा’ उल्लेख केला. म्हणजेच, सत्याच्या मूलभूत गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्यांनी देवाच्या गहन गोष्टी नीट समजून घेणे गरजेचे होते. (इब्री ५:१३, १४) खरोखरच, कलस्सैकरांसाठी व आज आपल्यासाठी देखील हा सल्ला किती उपयुक्‍त आहे! पण, आपण देवाच्या रहस्याचे पूर्ण ज्ञान कसे प्राप्त करू शकतो व या ज्ञानाची पूर्ण खातरी कशी करून घेऊ शकतो? याचे उत्तर पौलाने येशू ख्रिस्ताबद्दल केलेल्या या अर्थभरीत विधानातून मिळते: “ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.”

ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले निधी

८. ख्रिस्तामध्ये “गुप्त” आहेत याचा काय अर्थ होतो ते स्पष्ट करा.

बुद्धी व ज्ञानाचे सर्व निधी ख्रिस्तामध्ये “गुप्त” आहेत याचा अर्थ, ते कोणाच्याही हाती लागू नये म्हणून लपवून ठेवलेले आहेत असा होत नाही. तर ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे व आपले लक्ष येशू ख्रिस्तावर केंद्रित केले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. या गोष्टीचा येशूने स्वतःविषयी जे म्हटले त्याच्याशी मेळ बसतो: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहा. १४:६) होय, देवाविषयीचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर येशू आपल्याला जी मदत व मार्गदर्शन पुरवतो त्याचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे.

९. येशू कोणकोणत्या भूमिका बजावतो?

येशूने मी केवळ “मार्ग” आहे असे म्हटले नाही तर मी “सत्य व जीवन” आहे असेही त्याने म्हटले. यावरून हे दिसून येते की, पित्याकडे जाण्याचे माध्यम इतकीच त्याची भूमिका नाही. तर आपल्याला बायबलच्या सत्याची अचूक समज व सार्वकालिक जीवन मिळवून देण्याकरताही येशू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. खरोखरच, येशूमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या मौल्यवान असलेल्या गोष्टी गुप्त आहेत—बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्यांनी ही अनमोल रत्ने शोधून काढण्याचाच केवळ अवकाश आहे. तर आता आपण अशा काही आध्यात्मिक रत्नांचे परीक्षण करू या ज्यांचा आपल्या भवितव्याशी व देवासोबतच्या आपल्या नात्याशी जवळचा संबंध आहे.

१०. कलस्सैकर १:१९ आणि २:९ यातून आपण येशूबद्दल काय शिकू शकतो?

१०“ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान्‌ वसते.” (कलस्सै. १:१९; २:९) येशूने कित्येक युगे स्वर्गात आपल्या पित्याच्या सहवासात घालवली होती. त्यामुळे आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्त्वाची व इच्छेची इतर कोणाहीपेक्षा त्याला अधिक चांगली समज होती. पृथ्वीवरील आपल्या सबंध सेवाकार्यादरम्यान, त्याने पित्याकडून शिकलेल्या गोष्टी इतरांना शिकवल्या व त्याच्याकडून आत्मसात केलेले गुण आपल्या आचरणातून प्रदर्शित केले. म्हणूनच, येशू असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहा. १४:९) त्याअर्थी, देवाची सर्व बुद्धी व ज्ञान ख्रिस्तामध्ये गुप्त आहे किंवा त्याच्यामध्ये वसते. तेव्हा, होता होईल तितके येशूविषयी काळजीपूर्वक ज्ञान घेणे हाच यहोवाविषयीचे ज्ञान मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.

११. येशू आणि बायबलमधील भविष्यवाण्या यांचा काय संबंध आहे?

११“येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे [भविष्यवाणीचे] मर्म आहे.” (प्रकटी. १९:१०) या वचनावरून दिसून येते, की बायबलच्या अनेक भविष्यवाण्यांची पूर्णता करण्यात येशू प्रमुख भूमिका बजावतो. उत्पत्ति ३:१५ यात यहोवाने केलेल्या पहिल्या भविष्यवाणीपासून ते प्रकटीकरणातील वैभवी दृष्टांतांपर्यंत बायबलमधील सर्व भविष्यवाण्यांची अचूक समज आपल्याला तेव्हाच प्राप्त होऊ शकते, जेव्हा मशीही राज्यासंबंधी असलेली येशूची भूमिका आपण समजून घेतो. म्हणूनच, येशू हा वचनयुक्‍त मशीहा असल्याचे न मानणाऱ्‍या लोकांना इब्री शास्त्रवचनांतील अनेक भविष्यवाण्या अत्यंत गुंतागुंतीच्या वाटतात. तसेच, ज्यात मशीहाविषयीच्या भविष्यवाण्या देण्यात आल्या आहेत त्या इब्री शास्त्रवचनांना महत्त्व न देणाऱ्‍या लोकांना येशू केवळ एक महान पुरुष आहे असे वाटते. पण, येशूविषयीचे ज्ञानच, देवाच्या लोकांना अद्याप पूर्ण न झालेल्या भविष्यवाण्यांचा उलगडा करण्यास मदत करते.—२ करिंथ. १:२०.

१२, १३. (क) कोणत्या अर्थाने येशू “जगाचा प्रकाश” आहे? (ख) खोट्या धर्माच्या अंधकारातून मुक्‍त झाल्यामुळे ख्रिस्ताच्या अनुयायांनी काय करणे जरुरीचे आहे?

१२“मीच जगाचा प्रकाश आहे.” (योहान ८:१२; ९:५ वाचा.) पृथ्वीवर येशूचा जन्म होण्याच्या बऱ्‍याच काळाआधी यशया संदेष्ट्याने असे भाकीत केले: “अंधकारात चालणाऱ्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशांत बसणाऱ्‍यांवर प्रकाश पडला आहे.” (यश. ९:२) प्रेषित मत्तयाने स्पष्ट केले की येशूने जेव्हा, “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,” असे म्हणून आपल्या प्रचार कार्याची सुरुवात केली तेव्हा या भविष्यवाणीची पूर्णता झाली. (मत्त. ४:१६, १७) येशूच्या सेवाकार्यामुळे लोकांना आध्यात्मिक प्रकाश मिळाला व खोट्या धार्मिक शिकवणींच्या दास्यत्वातून त्यांची सुटका झाली. येशूने म्हटले: “जो कोणी माझ्यावर विश्‍वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.”—योहा. १:३-५; १२:४६.

१३ याच्या अनेक वर्षांनंतर प्रेषित पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना म्हटले: “पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहा. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला.” (इफिस. ५:८) आध्यात्मिक अंधकाराच्या दास्यत्वातून सुटका झाल्यामुळे ख्रिश्‍चनांनी प्रकाशाच्या प्रजेसारखे चालणे जरुरीचे आहे. येशूनेही डोंगरावरील प्रवचनात आपल्या अनुयायांना म्हटले होते: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.” (मत्त. ५:१६) येशूमध्ये गुप्त असलेले आध्यात्मिक धन मिळाल्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटते का? आणि आपल्या वागण्याबोलण्याद्वारे इतरांनाही हे धन मिळवण्याचे प्रोत्साहन देण्याची प्रेरणा तुम्हाला मिळते का?

१४, १५. (क) बायबलच्या काळात, मेंढरांच्या व इतर पशूंच्या बलिदानाला खऱ्‍या उपासनेत कोणते महत्त्व होते? (ख) “देवाचा कोकरा” या नात्याने येशूची भूमिका अत्यंत मौल्यवान का आहे?

१४येशू हा “देवाचा कोकरा” आहे. (योहा. १:२९, ३६) बायबलच्या काळात, पापांची क्षमा होण्यासाठी व देवासोबत नातेसंबंध जोडण्यासाठी मेंढरांच्या बलिदानाला खूप महत्त्व होते. उदाहरणार्थ, आपला पुत्र इसहाक याचे अर्पण करण्याची अब्रहामाने तयारी दाखवली तेव्हा त्याला तसे करण्यापासून रोखण्यात आले. आणि त्याऐवजी अर्पण करण्यासाठी त्याला एक एडका (मेंढा) देण्यात आला. (उत्प. २२:१२, १३) तसेच, इजिप्तमधून इस्राएल लोकांची सुटका झाली तेव्हा ‘परमेश्‍वराच्या वल्हांडण सणात’ पुन्हा एकदा मेंढराच्या बलिदानाला महत्त्व देण्यात आले. (निर्ग. १२:१-१३) पुढे, मोशेच्या नियमशास्त्रातही निरनिराळ्या पशूंचे बलिदान करण्याची आज्ञा देण्यात आली. यांत मेंढरांचा व शेरडांचा समावेश होता.—निर्ग. २९:३८-४२; लेवी. ५:६, ७.

१५ पण, ही बलिदाने किंवा मानवांनी दिलेले कोणतेही बलिदान, पाप आणि मृत्यूपासून त्यांची कायमची सुटका करू शकत नव्हते. (इब्री १०:१-४) पण, येशू हा “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” आहे. त्यामुळे “देवाचा कोकरा” या नात्याने येशूची भूमिका आजवर शोध लागलेल्या कोणत्याही गुप्त खजिन्यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे. तेव्हा, येशूच्या खंडणी बलिदानाविषयी काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे व या अद्‌भुत तरतुदीवर आपला विश्‍वास असल्याचे दाखवले पाहिजे. असे केल्याने आपल्याला एक अद्‌भुत आशीर्वाद व प्रतिफळ मिळेल—‘लहान कळपाला’ स्वर्गात ख्रिस्तासोबत असण्याचा गौरव व सन्मान, तर ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवन.—लूक १२:३२; योहा. ६:४०, ४७; १०:१६.

१६, १७. “आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा” या नात्याने येशूची भूमिका समजून घेणे महत्त्वाचे का आहे?

१६येशू “आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा” आहे. (इब्री लोकांस १२:१, २ वाचा.) इब्री लोकांस पत्र याच्या ११ व्या अध्यायात पौलाने विश्‍वासाचे अतिशय प्रभावीपणे स्पष्टीकरण केले. यात त्याने विश्‍वासाची संक्षिप्त व्याख्या केली व विश्‍वासाच्या बाबतीत आदर्श असलेल्या नोहा, अब्राहाम, सारा व राहाब यांसारख्या व्यक्‍तींचा उल्लेख केला. याच पार्श्‍वभूमीवर पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना, ‘आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहण्याचे’ उत्तेजन दिले. पौलाने त्यांना असे उत्तेजन का दिले?

१७ इब्री लोकांस पत्र याच्या ११ व्या अध्यायात उल्लेख केलेल्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांचा देवाच्या अभिवचनावर दृढ विश्‍वास होता. पण, मशीहाद्वारे व आपल्या राज्याद्वारे देव कशा प्रकारे आपले अभिवचन पूर्ण करणार होता याचा प्रत्येक तपशील त्यांना माहीत नव्हता. त्या अर्थी, त्यांचा विश्‍वास अपूर्ण होता. खरेतर, मशीहासंबंधी भविष्यवाण्या लिहिण्यासाठी यहोवाने ज्यांचा उपयोग केला होता त्या लेखकांना देखील त्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. (१ पेत्र १:१०-१२) विश्‍वासास पूर्णता प्राप्त होणे हे केवळ येशूद्वारेच शक्य आहे. तेव्हा, “आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा” या नात्याने येशूची भूमिका समजून घेणे व तिचा आदर करणे महत्त्वपूर्ण आहे!

शोधत राहा

१८, १९. (क) ख्रिस्तामध्ये गुप्त असलेली आणखीन काही आध्यात्मिक रत्ने कोणती आहेत? (ख) आध्यात्मिक धन मिळवण्याकरता येशूविषयी अधिकाधिक जाणून घेणे का महत्त्वाचे आहे?

१८ मानवजातीचे तारण करण्याच्या देवाच्या उद्देशात येशू ज्या मोलाच्या भूमिका निभावतो त्यांची केवळ काही उदाहरणे आपण पाहिली आहेत. पण, ख्रिस्तामध्ये गुप्त असलेली आणखीनही काही आध्यात्मिक रत्ने आहेत. त्यांचा शोध घेणे नक्कीच आनंददायक ठरेल व यामुळे आपल्याला अनेक आशीर्वादही लाभतील. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्राने येशूला ‘जीवनाचा अधिपती’ व उगवणारा “पहाटचा तारा” असे म्हटले. (प्रे. कृत्ये ३:१५; ५:३१; २ पेत्र १:१९) आणि बायबलमध्ये “आमेन” ही संज्ञा येशूला लागू करण्यात आली आहे. (प्रकटी. ३:१४) या भूमिकांचा अर्थ व महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? येशूने म्हटल्यानुसार: “शोधा म्हणजे तुम्हास सापडेल.”—मत्त. ७:७.

१९ येशूइतके अर्थपूर्ण जीवन जगलेला व आपल्या अनंत कल्याणाशी ज्याचा इतका जवळचा संबंध आहे असा एकही मनुष्य संपूर्ण इतिहासात नाही. मनापासून शोध घेणाऱ्‍या कोणाही व्यक्‍तीला येशूमध्ये “गुप्त” असलेले आध्यात्मिक धन सहज मिळू शकते. हे धन मिळवण्याचा आनंद व आशीर्वाद तुम्हालाही लाभो.

तुम्हाला आठवते का?

• कोणत्या खजिन्यांचा शोध करण्यासाठी ख्रिश्‍चनांना आर्जवण्यात आले आहे?

• पौलाने कलस्सैकरांना दिलेला सल्ला आजही आपल्यासाठी का उपयुक्‍त आहे?

• ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेल्या काही आध्यात्मिकदृष्ट्या मौल्यवान गोष्टी कोणत्या आहेत ते सांगा व स्पष्ट करा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्रे]

देवाचे वचन एका नकाशासारखे असून ते आपल्याला ख्रिस्तामध्ये “गुप्त” असलेले धन मिळवण्याचा मार्ग दाखवते