नव्वद वर्षांपूर्वी मी माझ्या ‘निर्माणकर्त्याचं स्मरण’ करू लागलो
नव्वद वर्षांपूर्वी मी माझ्या ‘निर्माणकर्त्याचं स्मरण’ करू लागलो
एडवीन रिजवेल यांच्याद्वारे कथित
युद्धविराम दिनी अर्थात नोव्हेंबर ११, १९१८ रोजी, अचानक माझ्या शाळेतल्या सर्व मुलांना, महायुद्धाचा अर्थात पहिल्या विश्व युद्धाचा अंत साजरा करण्यासाठी एकत्र करण्यात आलं. त्यावेळी मी अवघ्या पाच वर्षांचा होतो आणि या प्रसंगाविषयी मला फारशी कल्पना नव्हती. पण, आईवडिलांनी मला देवाविषयी जे काही शिकवलं होतं त्यावरून, अशा समारंभात भाग घेणं चुकीचं आहे हे मला ठाऊक होतं. मी देवाला प्रार्थना केली व स्वतःला आवरण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी मला राहावलं नाही आणि मी रडू लागलो. पण, त्या समारंभात मात्र मी भाग घेतला नाही. हाच तो दिवस होता जेव्हापासून मी माझ्या ‘निर्माणकर्त्याचं स्मरण’ करू लागलो.—उप. १२:१.
शाळेतली ही घटना घडण्याच्या काही महिन्यांपूर्वीच आम्ही स्कॉटलॅन्डमधील ग्लासगो इथं स्थलांतर केलं होतं. त्याच काळात वडिलांनी, “सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत” हे जाहीर व्याख्यान ऐकलं आणि त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. आईवडील दोघंही बायबलचा अभ्यास करू लागले आणि देवाचं राज्य व त्याकरवी येणाऱ्या आशीर्वादांविषयी ते नेहमी आपसात बोलायचे. तेव्हापासून त्यांनी मला देवावर प्रेम करण्यास व त्याच्यावर भरवसा ठेवण्यास शिकवलं. याबद्दल मी देवाचा किती आभारी आहे!—नीति. २२:६.
पूर्ण वेळेच्या सेवेची सुरुवात
मी १५ वर्षांचा झालो तेव्हा माझ्यापुढं उच्च शिक्षण घेण्याची संधी होती, तरी पूर्ण वेळेची सेवा करायची माझी मनस्वी इच्छा होती. पण, यासाठी मी अजून फार लहान आहे असं वडिलांना वाटत होतं. त्यामुळं काही दिवस मी एका ऑफिसमध्ये काम करू लागलो. तरीसुद्धा, यहोवाची पूर्ण वेळ सेवा करायची माझी इच्छा इतकी उत्कट होती की एके दिवशी मी सरळ बंधू जे. एफ. रदरफर्ड यांना पत्र लिहिलं. त्यावेळी ते जगभरातील प्रचार कार्यावर देखरेख करत होते. मी त्यांना माझा बेत कळवून त्याबद्दल त्यांचं मत विचारलं. बंधू रदरफर्ड यांनी माझ्या पत्राचं उत्तर दिलं: “तू जर काम करू शकतो तर प्रभूची सेवाही करू शकतो. . . . तू विश्वासूपणे प्रभूची सेवा करण्याचा प्रयत्न केलास तर तो नक्कीच तुला आशीर्वाद देईल.” मार्च १०, १९२८ रोजी त्यांनी लिहिलेल्या या पत्राचा माझ्या कुटुंबावर इतका प्रभाव पडला की लवकरच आई, वडील, माझी मोठी बहीण आणि मी आम्ही सर्व जण पूर्ण वेळेचे सेवक बनलो.
सन १९३१ मध्ये लंडनमध्ये एक अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनात बंधू रदरफर्ड यांनी, परदेशात जाऊन सुवार्तेचा प्रचार करण्याकरता स्वयंसेवकांची गरज असल्याची घोषणा केली. त्यासाठी मी पुढं आलो आणि ॲन्ड्रू जॅक या बांधवासोबत काउनसमध्ये सेवा करण्यास मला पाठवण्यात आलं. त्यावेळी काउनस ही लिथुएनियाची राजधानी होती. ही नेमणूक मिळाली तेव्हा मी १८ वर्षांचा होतो.
परदेशात राज्याचा प्रचार करणं
त्या काळी लिथुएनियाचा कृषिप्रधान समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होता. तिथल्या खेडोपाड्यात प्रचार करणं सोपं नव्हतं. बरेचदा आम्हाला राहण्याचा प्रश्न यायचा. काही राहण्याची ठिकाणं तर कायम लक्षात राहिली. उदाहरणार्थ, एकदा रात्री ॲन्ड्रू आणि मी जागे झालो. दिवा लावून पाहतो तर आमच्या बिछान्यात ढेकणांची बचबच झाली होती. ढेकणांनी आम्हाला नखशिखान्त फोडून काढलं होतं. अंगाची
आगआग घालवण्यासाठी तब्बल एक आठवडाभर दररोज सकाळी मी जवळच असलेल्या एका नदीत, गळ्याइतक्या थंड पाण्यात उभं राहायचो. असं असलं तरी आम्ही आमची सेवा सोडून दिली नाही. काही दिवसानंतरच, आम्हाला एक तरुण जोडपं भेटलं ज्यांनी नंतर बायबलचं सत्य स्वीकारलं आणि आमचा राहण्याचा प्रश्न सुटला. त्यांच्या लहानशा पण स्वच्छ घरात त्यांनी आम्हाला आसरा दिला. या ठिकाणी आम्ही खाली झोपायचो पण ढेकणांनी बचबचलेल्या गादीवर झोपण्यापेक्षा हे किती तरी पटीनं बरं होतं.त्या काळी लिथुएनियावर रोमन कॅथलिक व रशियन ऑर्थोडॉक्स धर्मगुरुंचा दबदबा होता. आणि केवळ श्रीमंत लोकच बायबल विकत घेऊ शकत होते. शक्य तितकं क्षेत्र उरकायचं व आस्था दाखवणाऱ्या लोकांमध्ये होताहोईल तितकं बायबलचं साहित्य वाटायचं हा आमचा उद्देश होता. कोणत्याही नवीन गावात गेल्यानंतर आम्ही प्रथम आमच्या राहण्याची सोय करायचो. मग, अत्यंत सावधगिरीनं गावाबाहेरून सेवा सुरू करून नंतर संपूर्ण गाव भरभर उरकायचो. अशा प्रकारे, पाळकांनी आमच्या कामात काही अडथळा आणण्याआधीच आम्ही आमचं कार्य उरकायचो.
खळबळ माजते व कार्याला प्रसिद्धी मिळते
१९३४ साली ॲन्ड्रूला काउनसमधील शाखा कार्यालयात सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा जॉन सेम्पी हा माझ्यासोबत कार्य करू लागला. आम्हा दोघांना आलेले काही अनुभव आम्ही कधीच विसरू शकणार नाही. एकदा एका छोट्याशा गावातील एका वकिलाच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो. मला पाहून त्याचा पारा इतका चढला की त्यानं आपल्या ड्रॉवरमधून बंदूक काढली व धाक दाखवत मला चालतं व्हायला सांगितलं. मी मनोमन प्रार्थना केली आणि “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते,” हा बायबलचा सल्ला मला त्यावेळी आठवला. (नीति. १५:१) म्हणून मी त्याला म्हणालो, “एक मित्र म्हणून चांगली बातमी सांगायला मी तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही माझ्यावर गोळी झाडली नाही म्हणून तुमचे आभार मानतो.” हे ऐकून बंदुकीच्या चापावरची त्याची पकड सैल झाली आणि मी तिथून काढता पाय घेतला.
या नंतर मी जॉनला भेटलो तेव्हा त्यालाही एक भयंकर अनुभव आल्याचं त्यानं मला सांगितलं. त्याला भेटलेल्या एका स्त्रीची भली मोठी रक्कम असलेली प्रॉमिसरी नोट चोरल्याचा खोटा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. त्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याचे सर्व कपडे काढून त्याची झडती घेण्यात आली होती. अर्थात, त्यांना ती नोट सापडली नाही. नंतर मात्र त्यांना खरा चोर सापडला.
या दोन्ही प्रसंगांमुळे, सहसा शांत असणाऱ्या त्या गावात चांगलीच खळबळ माजली आणि यामुळे आपोआपच आमच्या कार्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.
गुप्तपणे कार्य करणं
शेजारच्या लॅट्वीयामध्ये प्रचार कार्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी बायबलचं साहित्य पोचवणं अत्यंत जोखमीचं होतं. महिन्यातून एकदा रात्रीची ट्रेन धरून आम्ही लॅट्वीयाला जायचो. तिथं बायबलचं साहित्य पोचवल्यानंतर कधी कधी आणखीन साहित्य आणण्यासाठी आम्ही तसेच पुढे एस्टोनियाला जायचो व तिथून परत येताना ते साहित्य लॅट्वीयात पोचवायचो.
एकदा एका कस्टम अधिकाऱ्याला आमच्या या कार्याचा कुठून तरी सुगावा लागला. आम्ही आमची ट्रेन सोडून द्यावी आणि बायबलचं साहित्य घेऊन त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटावं असं त्यानं आम्हाला सांगितलं. जॉन आणि मी, आम्ही दोघांनी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. आश्चर्याची गोष्ट
म्हणजे, आम्ही काय घेऊन चाललो होतो हे त्या अधिकाऱ्यानं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलं नाही. त्यानं त्याच्या अधिकाऱ्याला केवळ इतकंच म्हटलं की, “या लोकांना काहीतरी सांगायचंय.” त्यावर मी त्याला “सागितलं” की शाळा-कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, आपल्या या त्रस्त जगात जे काही चाललंय त्याचा काय अर्थ होतो हे समजण्यास मदत करणारं हे साहित्य आहे. हे ऐकून कस्टम अधिकाऱ्यानं आम्हाला पुढं जाण्याचा इशारा केला आणि आम्ही आमचं बायबल साहित्य सुरक्षितपणे पोचवू शकलो.बॉल्टिक राज्यांतील राजकीय स्थिती बिकट होऊ लागली तसा यहोवाच्या साक्षीदारांचा लोक अधिकाधिक विरोध करू लागले. आणि लिथुएनियातही आपल्या प्रचार कार्यावर बंदी घालण्यात आली. ॲन्ड्रू आणि जॉन यांना तडीपार करण्यात आलं आणि दुसरं महायुद्ध पेटण्याची लक्षणं दिसू लागली तेव्हा तिथल्या सर्व इंग्रजांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. मलाही अत्यंत जड अंतःकरणानं लिथुएनिया सोडावं लागलं.
उत्तर आयर्लंडमधील सुसंधी आणि आशीर्वाद
तोपर्यंत आईवडील उत्तर आयर्लंडमध्ये राहायला गेले होते आणि १९३७ साली मीही त्यांच्याकडे राहायला आलो. उत्तर आयर्लंडमध्येसुद्धा, युद्धाच्या भीतीपोटी आमच्या बायबल साहित्यावर बंदी घालण्यात आली होती. पण, त्या युद्ध काळातही आम्ही आमचे प्रचार कार्य चालू ठेवले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मोकळेपणे कार्य करू शकत होतो. एक अनुभवी पायनियर, बंधू हॅरल्ड किंग यांनी सार्वजनिक ठिकाणी जाहीर व्याख्यानं देण्याच्या कार्यात पुढाकार घेतला. याच बंधू हॅरल्ड किंगनी नंतर चीनमध्ये मिशनरी कार्य केलं. ते म्हणाले: “येत्या शनिवारी पहिलं जाहीर व्याख्यान मी देणार आहे.” मग, माझ्याकडं पाहून ते म्हणाले: “आणि पुढच्या शनिवारी तू देशील.” हे ऐकून मला धक्काच बसला.
माझं पहिलं व्याख्यान मला अजूनही अगदी स्पष्टपणे आठवतं. शेकडो लोक जमले होते. एका खोक्यावर उभं राहून कोणत्याही ध्वनी उपकरणाशिवाय मी ते व्याख्यान दिलं. माझं व्याख्यान संपलं तेव्हा एक मनुष्य माझ्याकडं आला. माझ्याशी हात मिळवत त्यानं स्वतःची, बिल स्मिथ म्हणून ओळख करून दिली. लोकांची गर्दी पाहून काय चाललंय हे पाहण्यासाठी तो थांबला होता असं त्यानं मला सांगितलं. बोलण्याच्या ओघात मला समजलं की बिलला सर्वात प्रथम माझ्या वडिलांनी
साक्ष दिली होती. पण माझे वडील आणि माझी सावत्र आई डब्लिनला राहायला गेल्यानंतर बिलचा त्यांच्याशी संपर्क तुटला. मी बिलसोबत बायबल अभ्यास सुरू केला आणि कालांतरानं त्याच्या कुटुंबातले नऊ सदस्य यहोवाचे सेवक बनले.नंतर बेल्फास्टच्या सरहद्दीवरील आलिशान बंगल्यांमध्ये प्रचार कार्य करत असताना मला एक रशियन स्त्री भेटली. पूर्वी ती लिथुएनियामध्ये राहत होती. मी तिला बायबल आधारित साहित्य दाखवलं तेव्हा एका पुस्तकाकडं पाहून ती म्हणाली: “हे पुस्तक तर माझ्याजवळ आहे. काउनस विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या माझ्या चुलत्यानं मला ते दिलं होतं.” मग तिनं मला पोलिश भाषेतील क्रियेशन पुस्तक दाखवलं. त्या पुस्तकाच्या समासात भरपूर नोंदी केल्या होत्या. काउनसमध्ये असताना मीच तिच्या चुलत्याला भेटून त्यांना ते पुस्तक दिलं होतं हे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटलं.—उप. ११:१.
मी उत्तर आयर्लंडला जाणार आहे हे जॉन सेम्पीनं ऐकलं तेव्हा त्यानं मला बायबलविषयी थोडीफार आस्था दाखवणाऱ्या त्याच्या धाकट्या बहिणीची म्हणजे नेल्लीची भेट घेण्यास सांगितलं. माझी बहीण कॉनी आणि मी आम्ही दोघं तिच्याबरोबर बायबल अभ्यास करू लागलो. नेल्लीनं झपाट्यानं प्रगती केली आणि यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं. काही गाठी-भेटी झाल्यानंतर आमचा विवाह झाला.
आम्ही दोघांनी ५६ वर्षे एकत्र यहोवाची सेवा केली. या काळादरम्यान, शंभरहून अधिक लोकांना बायबलचं सत्य शिकवण्याची सुसंधी आम्हाला लाभली. आम्ही दोघंही एकत्र हर्मगिदोन पार करून यहोवाच्या नवीन जगात प्रवेश करू असं आम्हाला वाटलं होतं. पण, १९९८ साली नेल्लीला मृत्यूनं गाठलं तेव्हा मला जबरदस्त धक्का बसला. माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात खडतर परीक्षा होती.
बॉल्टिक राज्यांत परतणं
नेल्लीचा मृत्यू झाला त्याच्या साधारण एक वर्षानंतर मला एक अद्भुत आशीर्वाद लाभला. टालिन, एस्टोनिया येथील शाखा कार्यालयाला भेट देण्याचं आमंत्रण मला मिळालं होतं. एस्टोनियातील शाखा कार्यालय एस्टोनिया, लॅट्वीया आणि लिथुएनियातील कार्याचा इतिहास तयार करत होते. बांधवांनी मला लिहिलेल्या पत्रात म्हटलं: “१९२० दशकाच्या शेवटच्या व १९३० दशकाच्या सुरुवातीच्या काळात बॉल्टिक राज्यांत सेवा करणाऱ्या दहा बांधवांपैकी केवळ तुम्हीच हयात आहात. तेव्हा तुम्ही इथं येऊन आम्हाला हा इतिहास लिहिण्यास मदत करू शकाल का?”
सुरुवातीच्या त्या काळात मला व माझ्यासोबत कार्य करणाऱ्या बांधवांना आलेले विविध अनुभव कथित करणं हा किती मोठा बहुमान होता! लॅट्वीयामध्ये ज्या ठिकाणी शाखा कार्यालय होतं ती जुनी इमारत मी बांधवांना दाखवली. तसेच, इमारतीच्या छताजवळ आम्ही साहित्य लपवून ठेवायचो ती जागाही मी त्यांना दाखवली. तिथं लपवून ठेवलेलं साहित्य केव्हाही पोलिसांच्या हाती लागलं नाही. मी जिथं पायनियर सेवा केली होती त्या लिथुएनियातील शाउलीन नावाच्या एक छोट्याशा गावात बांधवांनी मला नेलं. तिथं जमलेल्या बांधवांपैकी एकानं मला सांगितलं, की “कित्येक वर्षांपूर्वी मी व माझ्या आईनं याच गावात एक घर विकत घेतलं होतं. माळ्यावरचा केरकचरा काढताना मला द डिव्हाइन प्लान ऑफ दि एजेस आणि द हार्प ऑफ गॉड ही पुस्तके तिथं सापडली. ती पुस्तकं वाचल्यानंतर मला सत्य मिळाल्याची खात्री पटली. कदाचित तुम्हीच ती पुस्तकं दिली असावीत.”
मी ज्या गावात पायनियर सेवा केली होती त्या गावातील एका विभागीय संमेलनालाही मी उपस्थित राहिलो. याच गावात ६५ वर्षांपूर्वी मी एका संमेलनाला गेलो होतो. त्या वेळी, फक्त ३५ लोक उपस्थित होते. पण, आता १,५०० लोकांना पाहून मला खूप आनंद झाला! यहोवानं खरोखरच आमचं कार्य आशीर्वादित केलं आहे.
‘यहोवानं मला सोडलं नाही’
अलीकडेच, अगदी अनपेक्षितपणे मला आणखीन एक आशीर्वाद लाभला. बी नावाच्या एक ख्रिस्ती बहिणीनं माझ्याशी विवाह करण्याची तयारी दाखवली आणि नोव्हेंबर २००६ मध्ये आमचा विवाह झाला.
आपल्या आयुष्याचं काय करावं असा विचार करणाऱ्या कोणत्याही तरुण व्यक्तीला मी हेच आश्वासन देईन की “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर” या ईश्वरप्रेरित शब्दांचं पालन करण्यातच शहाणपण आहे. बायबलच्या स्तोत्रकर्त्याप्रमाणंच मी देखील आनंदानं म्हणू शकतो: “हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत. मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.”—स्तो. ७१:१७, १८.
[२५ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
लॅट्वीयामध्ये बायबलचं साहित्य पोचवणं अत्यंत जोखमीचं होतं
एस्टोनिया
टालिन
रीगाचे आखात
लॅट्वीया
रीगा
लिथुएनिया
टालिन
विल्निउस
काउनस
[२६ पानांवरील चित्र]
वयाच्या १५ व्या वर्षी मी स्कॉटलॅन्डमध्ये कॉलपोर्टर (पायनियर) म्हणून सेवा करू लागलो
[२६ पानांवरील चित्र]
१९४२ साली आमच्या विवाहाच्या दिवशी, नेल्लीबरोबर