प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
“कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”—योहा. ७:४६.
१. येशूने शिकवलेल्या गोष्टी ऐकल्यावर लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?
येशू शिकवत असलेल्या गोष्टी ऐकणे किती रोमांचक असावे याची जरा कल्पना करा! येशूने त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर कसा प्रभाव पाडला याची अनेक उदाहरणे आपल्याला बायबलमध्ये सापडतात. उदाहरणार्थ, लूक आपल्या शुभवर्तमानात सांगतो की येशूच्या गावचे लोक, “जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले.” मत्तयाच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की डोंगरावरील प्रवचनात येशूने शिकवलेल्या गोष्टी ऐकल्यावर लोक “त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” आणि योहान एका प्रसंगाचे वर्णन करतो, जेव्हा येशूला अटक करण्यासाठी पाठवण्यात आलेले अधिकारी त्याला अटक न करताच परतले व म्हणाले, “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”—लूक ४:२२; मत्त. ७:२८; योहा. ७:४६.
२. येशूने शिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर केला होता?
२ त्या अधिकाऱ्यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा नव्हता. येशू खरोखरच सर्वश्रेष्ठ शिक्षक होता. तो अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने शिकवत असे आणि त्याचे तर्क खोडून काढणे अशक्य होते. त्याने दृष्टांतांचा व प्रश्नांचा कुशलतेने वापर केला. त्याचे श्रोते समाजाच्या उच्च वर्गातले असोत वा निम्न वर्गातले, तो आपल्या शिकवणी त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेत असे. त्याने शिकवलेली सत्ये समजायला सोपी असली तरीही ती अतिशय अर्थभरीत होती. पण केवळ याच कारणांमुळे येशू सर्वश्रेष्ठ शिक्षक ठरला असे नाही.
प्रेम—येशूने दाखवलेला प्रमुख गुण
३. शिक्षक या नात्याने येशू त्याच्या दिवसांतील धर्मपुढाऱ्यांपेक्षा कशा प्रकारे वेगळा होता?
३ साहजिकच शास्त्री व परूशी लोकांमध्येही भरपूर ज्ञान असलेले आणि हे ज्ञान इतरांना देण्याची क्षमता असलेले अनेक विद्वान होते. तर मग, येशूची शिकवण्याची पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी का होती? येशूच्या काळातील धर्मपुढाऱ्यांना सर्वसामान्य लोकांबद्दल प्रेम नव्हते. उलट ते या लोकांना पाण्यात पाहायचे. त्यांच्या दृष्टीने हे लोक “शापित” होते. (योहा. ७:४९) याउलट, येशूला लोकांची दया आली कारण “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्त. ९:३६) येशू मायाळू, संवेदनशील व प्रेमळ होता. आणखी एक गोष्ट म्हणजे, त्या धर्मपुढाऱ्यांना देवाबद्दल प्रेम नव्हते. (योहा. ५:४२) पण येशूचे त्याच्या पित्यावर प्रेम होते आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास त्याला आनंद वाटे. यहुदी धर्मपुढारी स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी देवाच्या वचनांचा वाटेल तसा अर्थ लावीत. पण येशूला “देवाचे वचन” प्रिय होते. त्याने देवाच्या वचनाच्या आधारावर शिकवले, त्याचा खुलासा केला, त्याचे समर्थन केले आणि त्यानुसार आचरण देखील केले. (लूक ११:२८) खरोखर, ख्रिस्त जणू प्रेमाचा सागर होता आणि त्याने लोकांना जे शिकवले व ज्या प्रकारे शिकवले तसेच तो त्यांच्याशी ज्या प्रकारे वागला त्यातून हे प्रेम स्पष्टपणे दिसून आले.
४, ५. (क) प्रेमळपणे शिकवणे का महत्त्वाचे आहे? (ख) शिकवण्यासाठी ज्ञान व कौशल्य देखील असणे का महत्त्वाचे आहे?
४ आपल्याबद्दल काय? ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे, आपल्या सेवाकार्यात व जीवनात आपण त्याचे अनुकरण करू इच्छितो. (१ पेत्र २:२१) त्यामुळे, केवळ बायबलमधील माहिती इतरांना देण्याचाच आपला उद्देश नाही तर आपण यहोवाचे गुण, विशेषतः त्याचे प्रेम प्रदर्शित करू इच्छितो. आपल्याजवळ भरपूर ज्ञान असो वा जेमतेमच; आपल्याला परिणामकारक पद्धतीने शिकवण्याची अनेक तंत्रे अवगत असोत वा मोजकीच; लोकांच्या मनापर्यंत पोचण्यासाठी या गोष्टींपेक्षा आपण दाखवत असलेले प्रेमच जास्त परिणामकारक ठरेल. तेव्हा, शिष्य बनवण्याच्या कार्यात खऱ्या अर्थाने परिणामकारक होण्याकरता प्रेमळपणे शिकवण्याद्वारे आपण येशूचे अनुकरण केले पाहिजे.
५ अर्थात, उत्तम शिक्षक होण्याकरता आपल्या विषयाचे ज्ञान असणे आणि ते ज्ञान इतरांना देण्याचे कौशल्य आपल्याजवळ असणे जरूरी आहे. येशूने या दोन्ही गोष्टी मिळवण्यास आपल्या शिष्यांना मदत केली. आणि आज यहोवा त्याच्या संघटनेद्वारे आपल्यालाही ही मदत पुरवत आहे. (यशया ५४:१३; लूक १२:४२ वाचा.) तरीसुद्धा आपण केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर नव्हे, तर अगदी अंतःकरणापासून शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञान व कौशल्याला प्रेमाची जोड मिळाल्यास अतिशय समाधानकारक परिणाम मिळू शकतात. तर मग, शिकवताना आपण कोणकोणत्या मार्गांनी प्रेम दाखवू शकतो? येशूने व त्याच्या शिष्यांनी ते कशा प्रकारे दाखवले? हे आता आपण पाहू या.
आपण यहोवावर प्रेम केले पाहिजे
६. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीबद्दल आपण कशा प्रकारे बोलतो?
६ आपल्याला प्रिय वाटणाऱ्या गोष्टींबद्दल बोलायला सहसा आपल्याला आवडते. मनापासून आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीविषयी आपण बोलू लागतो तेव्हा आपोआपच आपले हावभाव बदलतात आणि आपल्या एकंदरीत वागण्या-बोलण्यातून एक प्रकारचा उत्साह व चैतन्य झळकते. विशेषतः ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते तिच्याविषयी बोलताना असे घडते. या व्यक्तीबद्दल आपल्याला जे काही माहीत आहे ते इतरांना सांगण्यास आपण उत्सुक असतो. आपण त्या व्यक्तीची स्तुती करतो, तिच्याविषयी आदराने बोलतो आणि तिचे समर्थन करतो. आपण असे का करतो? कारण, आपल्याप्रमाणेच इतरांनीही त्या व्यक्तीच्या गुणांची कदर करावी व त्या व्यक्तीवर प्रेम करावे असे आपल्याला वाटत असते.
७. येशूचे देवावर प्रेम असल्यामुळे त्याला काय करण्याची प्रेरणा मिळाली?
७ लोकांच्या मनात यहोवाबद्दल प्रेम उत्पन्न करण्याअगोदर आपण स्वतः त्याला चांगल्या प्रकारे ओळखणे आणि त्याच्यावर प्रेम करणे गरजेचे आहे. शेवटी, खरी उपासना ही देवावरील खऱ्या प्रेमावरच आधारित आहे. (मत्त. २२:३६-३८) या बाबतीत येशूचे परिपूर्ण उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याने पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्तीने यहोवावर प्रेम केले. स्वर्गात आपल्या पित्यासोबत अब्जावधी वर्षे राहिल्यामुळे येशू त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होता. याचा काय परिणाम झाला? येशूने म्हटले, “मी पित्यावर प्रीति करितो.” (योहा. १४:३१) हे प्रेम येशूने जे काही म्हटले व केले त्यातून दिसून आले. या प्रेमाने त्याला नेहमी देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यास उद्युक्त केले. (योहा. ८:२९) याच प्रेमामुळे त्याने देवाच्या वतीने बोलत असल्याचा दावा करणाऱ्या ढोंगी धर्मपुढाऱ्यांची निर्भर्त्सना केली. आणि याच प्रेमाने त्याला यहोवाबद्दल बोलण्याची आणि देवाला ओळखून त्याच्यावर प्रेम करण्यास इतरांना मदत करण्याची प्रेरणा दिली.
८. येशूच्या शिष्यांचे देवावर प्रेम असल्यामुळे त्यांना काय करण्याची प्रेरणा मिळाली?
८ येशूप्रमाणेच पहिल्या शतकातील त्याच्या शिष्यांचेही यहोवावर प्रेम होते आणि या प्रेमामुळेच त्यांनी धैर्याने व उत्साहाने सुवार्तेची घोषणा केली. धर्मपुढाऱ्यांचा विरोध असतानाही त्यांनी संपूर्ण जेरूसलेम आपल्या शिक्षणाने भरून टाकले. त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या होत्या त्यांविषयी न बोलणे त्यांच्याकरता शक्यच नव्हते. (प्रे. कृत्ये ४:२०; ५:२८) यहोवा आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला आशीर्वाद देईल हे त्यांना माहीत होते. आणि खरोखरच यहोवाने त्यांच्या कार्यावर आशीर्वाद दिला! म्हणूनच तर, येशूच्या मृत्यूच्या फक्त ३० वर्षांनंतर प्रेषित पौल असे लिहू शकला की “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेची घोषणा झाली आहे.—कलस्सै. १:२३.
९. देवावर असलेले आपले प्रेम आपण कशा प्रकारे वाढवू शकतो?
९ शिक्षक या नात्याने परिणामकारक ठरण्यासाठी आपणही देवाबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपण कसे करू शकतो? स्तोत्र १०४:३३, ३४ वाचा.
देवाला नेहमी प्रार्थना करून त्याच्याशी बोलण्याद्वारे. आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे, बायबल आधारित प्रकाशने वाचण्याद्वारे आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याद्वारे त्याच्यावरील आपले प्रेम आणखीन दृढ होते. जसजसे देवाबद्दलचे आपले ज्ञान वाढत जाते तसतसे आपल्या मनात त्याच्याविषयीचे प्रेमही वाढत जाते. आणि जेव्हा आपण आपल्या शब्दांतून व कृतींतून हे प्रेम व्यक्त करतो तेव्हा इतर जणही ते पाहून यहोवाकडे आकर्षित होऊ शकतात.—आपण जे शिकवतो ते आपल्याला प्रिय वाटले पाहिजे
१०. चांगल्या शिक्षकाची ओळख कशावरून होते?
१० एका चांगल्या शिक्षकाची ओळख म्हणजे त्याला त्याचा विषय प्रिय असतो. आपण जे शिकवतो ते खरे आहे, महत्त्वाचे आहे, उपयोगाचे आहे याची एका शिक्षकाला खातरी असली पाहिजे. जेव्हा त्याला अशी खातरी असते तेव्हा तो विषय शिकवताना त्याचा उत्साह स्पष्टपणे दिसून येतो आणि यामुळे त्याच्या विद्यार्थ्यांवर अतिशय चांगला प्रभाव पडतो. दुसरीकडे पाहता, जर एखाद्या शिक्षकाला स्वतःलाच त्या विषयाबद्दल कदर नसेल तर त्याचे विद्यार्थी त्या माहितीची कदर करतील अशी अपेक्षा तो कशी करू शकतो? तेव्हा, देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने तुमच्या स्वतःच्या उदाहरणाचे महत्त्व कधीही कमी लेखू नका. येशूने म्हटले: “पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.”—लूक ६:४०.
११. येशूने जे काही शिकवले ते त्याला प्रिय का होते?
११ येशूने जे शिकवले ते त्याला प्रिय होते. आपल्याजवळ इतरांना देण्याजोगे काहीतरी मोलवान आहे याची त्याला जाणीव होती. ते म्हणजे, त्याच्या स्वर्गीय पित्याबद्दलचे सत्य, “देवाची वचने” व “सार्वकालिक जीवनाची वचने.” (योहा. ३:३४; ६:६८) लखलखणाऱ्या तीव्र प्रकाशाप्रमाणे येशूने शिकवलेल्या सत्यांनी जे वाईट होते त्याचा पर्दाफाश केला व जे चांगले होते त्यास लोकांपुढे आणले. या सत्यांमुळे, धर्मपुढाऱ्यांच्या खोट्या शिकवणींना व दियाबलाच्या छळाला बळी पडलेल्यांना आशा व सांत्वन मिळाले. (प्रे. कृत्ये १०:३८) येशूला सत्याबद्दल जे प्रेम होते ते केवळ त्याच्या शिकवणींतूनच नव्हे तर त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसून आले.
१२. सुवार्तेबद्दल प्रेषित पौलाने कशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या?
१२ येशूप्रमाणेच त्याच्या शिष्यांनाही यहोवा व ख्रिस्त यांच्याबद्दलचे सत्य प्रिय होते व त्यांनी त्यास मोलवान लेखले. म्हणूनच, विरोधकांनी बरेच प्रयत्न करूनही ते निरुत्साही झाले नाहीत तर इतरांना त्यांविषयी सांगतच राहिले. पौलाने रोममधील ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला . . . तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” (रोम. १:१५, १६) सत्याविषयी घोषणा करणे हा पौलाच्या मते एक बहुमान होता. त्याने लिहिले: “माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी.” (इफिस. ३:८) यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल पौलाने किती उत्साहाने शिकवले असेल याची आपण सहज कल्पना करू शकतो.
१३. आपल्याला सुवार्ता प्रिय असण्याची कोणती कारणे आहेत?
१३ देवाच्या वचनात असलेली सुवार्ता आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याला जाणून घेण्याची आणि त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याची संधी देते. या सुवार्तेमुळेच जीवनाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची आपल्याला उत्तरे मिळतात. तसेच आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे, आपल्या निराशेचे आशेत रूपांतर करण्याचे व संकटाला तोंड देण्याकरता आपल्याला धैर्यवान बनवण्याचे सामर्थ्य सुवार्तेमध्ये आहे. शिवाय, ही सुवार्ता आपल्याला कधीही न संपणाऱ्या अशा अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवते. कोणतीही माहिती किंवा ज्ञान बायबलमधील सुवार्तेपेक्षा जास्त मौल्यवान किंवा महत्त्वाचे नाही. अशी ही अनमोल सुवार्ता आपल्याला मिळाली असल्यामुळे आपण अतिशय आनंदी आहोत. आणि जेव्हा आपण इतरांनाही ही अनमोल सुवार्ता सांगतो तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो.—प्रे. कृत्ये २०:३५.
१४. आपण शिकवत असलेल्या गोष्टींबद्दलचे प्रेम आपण कसे वाढवू शकतो?
१४ सुवार्तेबद्दल असलेले तुमचे प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? देवाचे वचन वाचताना अधूनमधून थांबा आणि तुम्ही जे वाचत आहात त्यावर विचार करा. उदाहरणार्थ, येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यात तुम्ही त्याच्यासोबत आहात किंवा पौलासोबत तुम्ही प्रवास करत आहात अशी कल्पना करा. नव्या जगात आपण आहोत अशी कल्पना करा आणि आजच्यापेक्षा अगदीच वेगळ्या असलेल्या त्या जीवनाचे चित्र डोळ्यांपुढे उभे करा. बायबलमधील सत्याचे पालन केल्यामुळे तुम्हाला जे निरनिराळे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांवर विचार करा. सुवार्तेबद्दल असलेले प्रेम तुम्ही आपल्या मनात जिवंत ठेवल्यास ज्यांना तुम्ही शिकवता १ तीमथ्य ४:१५, १६ वाचा.
त्यांना ते प्रेम जाणवेल. म्हणूनच, शिकलेल्या गोष्टींवर आपण जाणीवपूर्वक मनन केले पाहिजे आणि आपण जे शिकवतो त्याकडे लक्ष दिले पाहिजे.—आपण लोकांवर प्रेम केले पाहिजे
१५. शिक्षकाचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम का असले पाहिजे?
१५ एक चांगला शिक्षक सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती व तणाव दूर करतो, जेणेकरून ते शिकण्यात जास्त रस घेतील व न संकोचता स्वतःच्या भावना व्यक्त करतील. प्रेमळ शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल मनापासून काळजी असते आणि त्यामुळे तो त्यांना ज्ञान देतो. त्यांच्या गरजांनुसार व आकलनशक्तीनुसार तो त्यांना शिकवतो. त्यांच्या क्षमता व परिस्थिती तो लक्षात घेतो. अशा प्रकारे शिक्षक प्रेमाने शिकवतात तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांचे हे प्रेम जाणवते आणि यामुळे शिकवणे तसेच शिकणे आनंददायक बनते.
१६. कोणकोणत्या मार्गांनी येशूने लोकांप्रती प्रेम दाखवले?
१६ येशूने अशा प्रकारचे प्रेम दाखवले. त्याच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने इतरांच्या तारणाकरता आपले परिपूर्ण मानवी जीवन बलिदान केले. (योहा. १५:१३) पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना येशूने लोकांना शारीरिक व खासकरून आध्यात्मिक रीत्या मदत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. लोकांनी आपल्याकडे यावे अशी अपेक्षा त्याने केली नाही. तर, त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी तो शेकडो मैलांचा पायी प्रवास करून त्यांच्याकडे गेला. (मत्त. ४:२३-२५; लूक ८:१) तो सहनशील व समजूतदार होता. त्याच्या शिष्यांकडून काही चुकल्यास तो प्रेमळपणे त्यांची चूक सुधारत असे. (मार्क ९:३३-३७) आपले शिष्य अतिशय प्रभावीपणे सुवार्तेची घोषणा करतील असा विश्वास व्यक्त करण्याद्वारे त्याने त्यांचे मनोबल वाढवले. खरोखर, येशूइतका प्रेमळ शिक्षक आजपर्यंत कोणी झाला नाही. येशूने आपल्या शिष्यांबद्दल असे प्रेम दाखवल्यामुळे त्यांनाही त्याच्यावर प्रेम करण्याची व त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची प्रेरणा मिळाली.—योहान १४:१५ वाचा.
१७. येशूच्या शिष्यांनी कशा प्रकारे इतरांबद्दल प्रेम व्यक्त केले?
१७ येशूप्रमाणेच त्याच्या शिष्यांनीही लोकांना शिकवताना त्यांच्याबद्दल मनःपूर्वक प्रेम व आपुलकी दाखवली. छळाला तोंड देऊन व आपला जीव धोक्यात घालून त्यांनी इतरांची सेवा केली व यशस्वी रीत्या सुवार्तेची घोषणा केली. ज्यांनी सुवार्तेचा स्वीकार केला ते त्यांच्याकरता किती प्रिय होते! प्रेषित पौलाच्या हृदयस्पर्शी शब्दांवरून हे दिसून येते. त्याने लिहिले: “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.”—१ थेस्सलनी. २:७, ८.
१८, १९. (क) प्रचार कार्य करण्यासाठी आपण त्याग करण्यास का तयार असतो? (ख) आपण इतरांप्रती दाखवत असलेल्या प्रेमाची लोक दखल घेतात हे एक उदाहरण देऊन सांगा.
१८ आज सबंध जगात यहोवाचे साक्षीदार देवाला जाणून घेण्यास व त्याची सेवा करण्यास उत्सुक असणाऱ्या लोकांचा शोध घेतात. मागची सलग १७ वर्षे आपण प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात दरवर्षी एक योहा. १७:३; १ तीम. २:३, ४) प्रामाणिक मनाच्या लोकांनी देवाविषयीचे ज्ञान घेऊन त्याची सेवा करावी म्हणून त्यांना मदत करण्याची प्रेरणा आपल्याला प्रेमामुळेच मिळते.
अब्ज तास खर्च केले आणि अजूनही हे कार्य अखंड सुरू आहे. प्रचार कार्य करण्यासाठी आपल्याला वेळ, शक्ती व साधने खर्च करावी लागत असली, तरीसुद्धा आपण हे कार्य आनंदाने करतो. लोकांनी सार्वकालिक जीवन देणारे ज्ञान मिळवावे अशी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे याची येशूप्रमाणेच आपल्यालाही जाणीव आहे. (१९ आपण दाखवलेल्या प्रेमाची इतर जणही दखल घेतात. उदाहरणार्थ, ज्यांच्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे अशा लोकांना अमेरिकेतील एक पायनियर बहीण सांत्वनदायक पत्रे लिहिते. एका मनुष्याने तिच्या पत्राच्या उत्तरात असे लिहिले: “एका अनोळखी व्यक्तीला तिच्या दुःखाच्या प्रसंगी सांत्वन देण्यासाठी कोणी पत्र लिहिण्याची तसदी घेतो हे पाहून प्रथम मला फार आश्चर्य वाटलं. तुम्ही खरोखर इतर लोकांवर प्रेम करता आणि जीवनाच्या वाटेवर आपलं मार्गदर्शन करणाऱ्या देवावरही प्रेम करता, इतकंच मी म्हणू शकतो.”
२०. प्रेमळपणे शिकवणे इतके महत्त्वाचे का आहे?
२० कर्तबगारीला प्रेमाची जोड मिळाल्यास एक श्रेष्ठ कलाकृती जन्म घेते, असे एका लेखकाने म्हटले आहे. बायबलमधील सत्य इतरांना शिकवताना, आपल्या विद्यार्थ्यांनी यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घ्यावे व त्याच्यावर मनापासून प्रेम करावे हे आपले ध्येय असते. तेव्हा, शिक्षक या नात्याने यशस्वी व्हायचे असल्यास आपले देवावर, आपण जे शिकवतो त्यावर आणि लोकांवर प्रेम असले पाहिजे. हे प्रेम आपण उत्पन्न करू व आपल्या सेवाकार्यात प्रदर्शित करू तेव्हा आपल्याला केवळ इतरांना काहीतरी दिल्याचा आनंदच नव्हे, तर येशूचे अनुकरण करत असल्याचे व यहोवाचे मन आनंदित करत असल्याचे समाधान देखील लाभेल.
तुमचे उत्तर काय असेल?
• इतरांना सुवार्ता शिकवण्यासाठी . . .
देवावर आपले प्रेम असणे का महत्त्वाचे आहे?
आपण जे शिकवतो त्यावर आपले प्रेम असणे का महत्त्वाचे आहे?
आपण ज्यांना शिकवतो त्यांच्यावर आपले प्रेम असणे का महत्त्वाचे आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्र]
येशूची शिकवण्याची पद्धत शास्त्री व परूश्यांपेक्षा वेगळी का होती?
[१८ पानांवरील चित्र]
चांगले शिक्षक बनण्यासाठी ज्ञान, कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम असणे गरजेचे आहे