व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचे सत्य दुर्गम भागांतही पोचते

बायबलचे सत्य दुर्गम भागांतही पोचते

बायबलचे सत्य दुर्गम भागांतही पोचते

रशियातील टूव प्रजासत्ताक हे सायबेरियाच्या अगदी दक्षिण सीमेवर वसलेले आहे. त्याच्या दक्षिण-पूर्वेस मंगोलिया आहे. टूवमध्ये अनेक लोक दुर्गम भागांत राहत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत राज्याची सुवार्ता पोचवणे कठीण आहे. पण अलीकडेच, टूवच्या आसपासच्या भागांतून काही लोक, टूवची राजधानी असलेल्या किझिल या शहरात एका चर्चासत्रासाठी आले होते. किझिलमध्ये पायनियर सेवा करणाऱ्‍या मरीयाला ही बातमी कळली तेव्हा, या लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्याची यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही व काही केल्या हाती आलेली ही संधी घालवायची नाही असा विचार तिच्या मनात आला.

याविषयी बोलताना मरीया म्हणते: “मी ज्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करते त्या शाळेनं मादक पदार्थांच्या व्यसनापासून मुक्‍त कसं व्हावं या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी टूवच्या सगळ्यात दुर्गम भागांतून ५० लोक येणार होते. यांमध्ये शिक्षक, मनोवैज्ञानिक, बाल-कल्याण अधिकारी आणि इतर अनेक जण होते.” मरीयासाठी ही एक सुसंधी तर होतीच, पण एक आव्हानही होते. ती म्हणते: “मी तशी फार लाजाळू आहे, त्यामुळं लोकांना अनौपचारिक साक्ष देणं मला कठीण वाटतं. पण, माझ्या मनातली भीती घालवण्यास व मला धैर्यानं साक्ष देण्यास मदत करावी म्हणून मी यहोवाला प्रार्थना केली.” मरीयाला यश आले का?

मरीया पुढे म्हणते: “माझ्याजवळ एक सावध राहा! नियतकालिक होतं ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भयगंडांवर चर्चा करण्यात आली होती. ‘एखाद्या मनोवैज्ञानिकाला हे नक्कीच आवडेल,’ असा विचार करून मी ते नियतकालिक शाळेत घेऊन गेले. त्या दिवशी, चर्चासत्राकरता आलेली एक शिक्षिका माझ्या ऑफिसमध्ये आली तेव्हा मी तिला ते नियतकालिक दिलं. तिनं मोठ्या आनंदानं ते स्वीकारलं आणि ती देखील एक प्रकारच्या भयगंडानं ग्रस्त असल्याचं तिनं मला सांगितलं. दुसऱ्‍या दिवशी मी तिच्यासाठी तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, खंड १ हे पुस्तक घेऊन गेले. तेही तिनं तितक्याच आनंदानं स्वीकारलं. तिचा प्रतिसाद पाहून, इतर शिक्षकांनाही हे पुस्तक आवडेल असं मला वाटलं. त्यामुळं मी तरुणांचे प्रश्‍न पुस्तकं आणि इतर पुस्तकं यांचं एक कार्टनच शाळेत घेऊन गेले.” पाहता पाहता कार्टनमधली सगळी पुस्तकं संपली. मरीया सांगते: “मी ज्या शिक्षिकेला तरुणांचे प्रश्‍न पुस्तक दिलं होतं तिच्यासोबत काम करणाऱ्‍या इतर शिक्षकांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन विचारलं: ‘पुस्तकांचं वाटप कुठं होत आहे?’” खरेतर, ते उचित ठिकाणी आले होते.

शनिवारचा दिवस चर्चासत्राचा शेवटचा दिवस होता. पण, त्या दिवशी मरीयाची सुट्टी असल्यामुळे आदल्या दिवशी ती आपल्या ऑफिसमधील टेबलांवर बरीच प्रकाशने ठेवून गेली. आणि फलकावर तिने त्यांच्यासाठी असा संदेश लिहिला: “प्रिय शिक्षकांनो! तुम्ही तुमच्यासाठी व तुमच्या ओळखीपाळखीच्या लोकांसाठी ही पुस्तकं घेऊन जाऊ शकता. या उत्कृष्ट पुस्तकांमुळं तुम्ही तुमच्या कामात आणि तुमच्या कौटुंबिक जीवनातही यशस्वी होऊ शकाल.” याचा परिणाम काय झाला? मरीया म्हणते: “त्या दिवशी नंतर मी ऑफिसमध्ये जाऊन पाहते तर शिक्षकांनी बहुतेक पुस्तकं घेतली होती. त्यामुळं मी लगेच आणखी पुस्तकं व नियतकालिकं आणली.” चर्चासत्र संपेपर्यंत, मरीयाने ३८० नियतकालिके, १७३ पुस्तके आणि ३४ माहितीपत्रके दिली होती. चर्चासत्रासाठी आलेले लोक, ते राहत असलेल्या दुर्गम भागांत परतले तेव्हा ही प्रकाशनेही त्यांच्यासोबत गेली. मरीया म्हणते: “बायबलचे सत्य आता टूवच्या सगळ्यात दुर्गम भागांतही पोचले याचा मला खूप आनंद वाटतो.”—उप. ११:६.

[३२ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

रशिया

टूव प्रजासत्ताक