सहकार्य केल्याने आध्यात्मिक प्रगती होते
सहकार्य केल्याने आध्यात्मिक प्रगती होते
कुटुंबातील प्रत्येक सदस्याने यहोवावर प्रेम करावे व त्याची उपासना करावी, अशी जर आईवडिलांची इच्छा असेल तर, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे. यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला बनवले तेव्हा, एकमेकांना सहकार्य करणे खरोखरच किती महत्त्वाचे आहे हे त्याने सांगितले. हव्वेने आदामासोबत त्याची “अनुरूप साहाय्यक” म्हणून काम करायचे होते. (उत्प. २:१८) पतीपत्नीने सोबत काम करून एकमेकांना मदत केली पाहिजे. (उप. ४:९-१२) पालक आणि बालक या दोघांना यहोवाने ठरवून दिलेल्या भूमिका पार पाडण्यासाठी देखील सहकार्याची आवश्यकता आहे.
कौटुंबिक उपासना
बॅरी आणि हायडी यांना पाच लेकरे आहेत. कौटुंबिक बायबल अभ्यास करण्यासाठी एकत्र मिळून कार्य केल्याने प्रगती करता येते, हे त्यांना दिसून आले आहे. बॅरी म्हणतात: “कौटुंबिक अभ्यासासाठी मी आमच्या मुलांना अधूनमधून लहान लहान नेमणुका देतो. कधीकधी मी त्यांना सावध राहा! मधील एखादा लेख वाचण्यास सांगतो व या लेखातून त्यांना कोणता मुद्दा शिकायला मिळाला ते अभ्यासाच्या वेळी सांगण्यास सांगतो. आम्ही क्षेत्र सेवेचाही सराव करतो. यामुळे प्रत्येक मुलाकडे एक सादरीकरण असते.” आपल्या पतीचे बोलून झाल्यावर हायडी म्हणते: “आमच्या सर्वांकडे, आम्हाला कोणती ध्येये गाठायची आहेत त्याची एक यादी आहे. ही ध्येये गाठण्यात आम्ही कुठवर प्रगती केली आहे त्याची वेळोवेळी कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी चर्चा करतो.” संध्याकाळच्या वेळी घरात टीव्ही न लावल्याने संपूर्ण कुटुंबाला, वाचन करण्यासाठी निवांत वेळ मिळतो, हेही बॅरी व हायडी यांना दिसून आले आहे.
मंडळीच्या सभा
माईक व डेनीझ यांनी चार मुलांचे संगोपन केले. एकमेकांना सहकार्य केल्याने त्यांना कोणता फायदा झाला? माईक म्हणतात: “कधीकधी, आम्ही सभेला वेळेवर जाण्याची कितीही काळजीपूर्वक योजना केलेली असली तरी आम्ही धावतपळतच सभेला जायचो. पण, एकमेकांना सहकार्य दिल्याने आम्ही सभेला वेळेवर जाऊ शकलो, हे आमच्या पाहण्यात आले.” डेनीझ म्हणते: “मुलं मोठी होत होती तेव्हा आम्ही प्रत्येकाला कामं वाटून दिली होती. आमची मुलगी किम, स्वयंपाक व जेवणाची तयारी करण्यात मदत करायची.” माईक व डेनीझ यांचा मुलगा मायकल आठवून सांगतो: “मंगळवारच्या दिवशी आमच्या घरात मंडळीची सभा असायची. त्यामुळे सभेच्या आधी आम्ही खोली झाडून काढायचो आणि खुर्च्या लावायचो.” त्यांचा दुसरा मुलगा मॅथ्यू म्हणतो: “बाबा सभांच्या दिवशी कामाहून जरा लवकरच घरी यायचे व आम्हाला सगळ्यांना सभेसाठी तयार करायचे.” याचा काही फायदा झाला आहे का?
प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत
माईक सांगतात: “१९८७ साली मी व डेनीझनं पायनियरिंग सुरू केली. त्यावेळी आमच्या मुलांपैकी तिघं जण आमच्यासोबतच राहत होते. आमच्या दोन मुलांनी पायनियरिंग सुरू केली आणि उरलेल्या दोघांनी बेथेल बांधकाम प्रकल्पावर काम केलं. आमच्या कुटुंबाला मिळालेला आणखी एक आशीर्वाद म्हणजे, आम्ही ४० वेगवेगळ्या जणांना यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेण्यास मदत करू शकलो. याशिवाय, आम्ही कुटुंब मिळून स्वतःच्या देशात व परदेशातही बांधकाम प्रकल्पांवर काम केलं.”
कुटुंब मिळून एकमेकांना सहकार्य करण्याचे आपले प्रयत्न कधीही व्यर्थ जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या कुटुंबात आणखी कोणकोणत्या मार्गांनी एकमेकांना सहकार्य करू शकता? एकमेकांना सहकार्य केल्याने तुमच्या कुटुंबाला नक्कीच आध्यात्मिक प्रगती करता येईल.
[२८ पानांवरील चित्र]
क्षेत्र सेवेचा सराव केल्याने प्रगती करता येते