“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”
“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”
“सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.”—यहू. २१.
१, २. यहोवाने कशा प्रकारे आपल्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे आणि आपण काहीही केले तरी यहोवा आपल्याला त्याच्या प्रेमात राहू देईल असा विचार आपण का करू नये?
यहोवाने आपल्यावर असलेले त्याचे प्रेम असंख्य मार्गांनी व्यक्त केले आहे. त्याने केलेली खंडणी बलिदानाची तरतूद ही त्याच्या प्रेमाची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती आहे यात कोणतीही शंका नाही. मानवांवर त्याचे इतके अपार प्रेम आहे, की त्याने आपल्या परमप्रिय पुत्राला त्यांच्याकरता आपल्या जीवनाचे बलिदान देण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. (योहा. ३:१६) आपल्याला सर्वकाळ जगता यावे व त्याच्या प्रेमाचा आपल्याला सतत लाभ होत राहावा म्हणून यहोवाने हे पाऊल उचलले.
२ पण, आपण जीवनात काहीही केले तरी यहोवा आपल्याला त्याच्या प्रेमात राहू देईल असा विचार आपण करू शकतो का? नाही. कारण यहूदा पुस्तकातील २१ व्या वचनात आपल्याला असा बोध करण्यात आला आहे: “सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” या वचनातील “आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा” या शब्दांवरून समजते की देवाच्या प्रेमात राहण्यासाठी आपण काही पावले उचलण्याची गरज आहे. तर मग, देवाच्या प्रेमात राहण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजे?
आपण देवाच्या प्रेमात कसे राहू शकतो?
३. आपल्या पित्याच्या प्रेमात राहण्यासाठी येशूला काय करण्याची आवश्यकता वाटली?
३ येशूने आपल्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री जे म्हटले त्यावरून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते. त्याने म्हटले: “जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” (योहा. १५:१०) यावरून स्पष्ट होते, की यहोवाने आपल्या उपासनेचा स्वीकार करावा म्हणून पित्याच्या आज्ञांचे पालन करणे जरुरीचे आहे याची येशूला जाणीव होती. जर देवाच्या परिपूर्ण पुत्राला देवाच्या आज्ञांचे पालन करण्याची आवश्यकता वाटली, तर आपल्याला किती जास्त वाटायला हवी?
४, ५. (क) यहोवावर आपले प्रेम आहे हे दाखवण्याचा सर्वात प्रमुख मार्ग कोणता आहे? (ख) यहोवाच्या आज्ञा पाळण्यास कचरण्याचे कोणतेही कारण नाही असे का म्हणता येईल?
१ योहा. ५:३) हे खरे आहे, की कोणाच्या आज्ञांचे पालन करण्याची कल्पना आजच्या जगात बहुतेक लोकांना आवडत नाही. पण, “त्याच्या आज्ञा कठीण नाहीत” असे जे वरील वचनात सांगितले आहे ते लक्षात घ्या. या शब्दांवरून समजते, की आपल्याला जमणार नाही अशी कोणतीही गोष्ट करायला यहोवा आपल्याला सांगत नाही.
४ यहोवावर आपले प्रेम आहे हे दाखवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याच्या आज्ञांचे पालन करणे. याविषयी प्रेषित योहानाने असे म्हटले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (५ एक उदाहरण विचारात घ्या: एखादी जड वस्तू उचलण्यास तुमच्या मित्राला जमणार नाही हे माहीत असतानासुद्धा तुम्ही त्याला ती उचलण्यास सांगाल का? कधीच नाही! मग यहोवा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने प्रेमळ आहे आणि आपल्या कमतरतांचीही त्याला आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक जाणीव आहे. “आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो” असा दिलासा बायबल आपल्याला देते. (स्तो. १०३:१४) आपल्याला झेपणार नाहीत अशा गोष्टींची तो आपल्याकडून कधीच अपेक्षा करणार नाही. तेव्हा, यहोवाच्या आज्ञा पाळण्यास कचरण्याचे कोणतेही कारण नाही. उलट, यहोवाच्या आज्ञा पाळणे म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्यावर आपले अतोनात प्रेम आहे आणि आपण त्याच्या प्रेमात टिकून राहू इच्छितो हे त्याला दाखवण्याची एक सुसंधी आहे असे आपण मानतो.
यहोवाकडून मिळालेली एक खास देणगी
६, ७. (क) विवेक काय आहे? (ख) देवाच्या प्रेमात राहण्यासाठी विवेक आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो याचे उदाहरण द्या.
६ सतत बदलणाऱ्या या जगात राहत असताना आपल्याला असे असंख्य निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे आपण कितपत देवाच्या आज्ञा पाळतो याची परीक्षा होऊ शकते. मग, आपण घेतलेले निर्णय देवाच्या इच्छेनुसार आहेत याची खातरी आपण कशी बाळगू शकतो? याबाबतीत आपली मदत करू शकेल अशी एक देणगी यहोवाने आपल्याला दिली आहे. ती म्हणजे आपला विवेक. पण, विवेक नेमका काय आहे? स्वतःच्या कृतींचे, विचारांचे व निर्णयांचे परीक्षण करून पाहण्याची ती एक खास क्षमता आहे. आपले आत्मपरीक्षण करण्याची ही आंतरिक क्षमता, भविष्यातील निर्णय घेण्यासाठी आपल्यापुढे कोणकोणते मार्ग आहेत हे पाहण्यासाठी आणि आपण पूर्वी ज्या गोष्टी केल्या त्यांचे अवलोकन करण्यासाठी व त्या चांगल्या की वाईट, योग्य की अयोग्य याचे विश्लेषण करण्यासाठी आपली मदत करते.—रोमकर २:१४, १५ वाचा.
७ आपला विवेक कशा प्रकारे आपली मदत करू शकतो? याचे एक उदाहरण विचारात घ्या. रात्रीच्या वेळी रस्त्याने चालताना तुमच्याजवळ कोणती गोष्ट असणे जरुरीचे आहे? रस्ता चुकू नये किंवा तो नीट दिसावा म्हणून तुमच्याकडे बॅटरी असणे खूप महत्त्वाचे आहे. बॅटरी नसेल तर तुम्ही पडू शकता किंवा तुम्हाला दुखापत होऊ शकते. पण बॅटरीच्या उजेडामुळे रस्त्यावरील खाचखळगे तुम्हाला दिसतील व होणारा अनर्थ तुम्ही टाळू शकाल. काही प्रमाणात, या बॅटरीची तुलना यहोवाने आपल्या सर्वांना दिलेल्या एका अमूल्य देणगीशी करता येईल. ही देणगी म्हणजे आपला विवेक. ज्याप्रमाणे बॅटरी नसती तर आपण रस्ता चुकलो असतो, त्याचप्रमाणे विवेक नसता तर जीवनात नैतिकतेसंबंधी कोणतेही निर्णय घेताना मनुष्य अगदीच गोंधळून गेला असता.
८, ९. (क) काही वेळा आपला विवेक कशा प्रकारे आपली दिशाभूल करू शकतो? (ख) आपल्या विवेकाने आपले योग्य मार्गदर्शन करावे म्हणून काय करणे जरुरीचे आहे?
८ परंतु काही वेळा आपला विवेक आपली दिशाभूल करू शकतो. तो कसा? वर चर्चा केलेल्या बॅटरीच्या उदाहरणाचा पुन्हा विचार करा. बॅटरीतले सेल गेले असतील तर बॅटरीतून उजेड येणार नाही. आपल्या विवेकाच्या बाबतीतही असेच आहे. आपण जर देवाच्या वचनाचा अभ्यास केला नाही तर आपला विवेक कार्य करणार नाही. यामुळे बरोबर व चूक यातला फरक आपल्याला कळणार नाही. तसेच, आपल्या अंतःकरणाच्या स्वार्थी इच्छांचा आपल्यावर प्रभाव झाला असेल तर आपला विवेक आपली दिशाभूल करेल. बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे, की “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्म. १७:९; नीति. ४:२३) देवाचे वचन बायबल यातील विश्वसनीय मार्गदर्शनावर आपण विसंबून राहिलो नाही तर आपल्या विवेकाचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. (स्तो. ११९:१०५) दुःखाची गोष्ट म्हणजे आज जगातले बहुतेक लोक आपल्या स्वार्थी इच्छांनाच जीवनात अवाजवी महत्त्व देतात. पण, देवाच्या वचनात घालून दिलेल्या सिद्धान्तांकडे मात्र ते डोळेझाक करतात. (इफिसकर ४:१७-१९ वाचा.) म्हणूनच विवेक असूनसुद्धा आज कित्येक लोक भयानक कृत्ये करून बसतात.—१ तीम. ४:२.
१ करिंथ. ८:१२; २ करिंथ. ४:२; १ पेत्र ३:१६.
९ आपण अशा लोकांसारखे न होण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे! उलट, आपल्या विवेकाने आपले योग्य मार्गदर्शन करावे म्हणून सतत देवाच्या वचनाद्वारे आपण त्यास प्रशिक्षित केले पाहिजे. आपल्या स्वार्थी इच्छांना आपल्यावर प्रभुत्व गाजवू देण्याऐवजी आपण आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचे ऐकले पाहिजे. पण, त्याच वेळी आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींच्या विवेकाचासुद्धा आदर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या बांधवांचा विवेक आपल्यापेक्षा अधिक संवेदनशील असू शकतो हे लक्षात ठेवून आपण कधीही त्यांना अडखळविणार नाही.—१०. जीवनातील कोणत्या तीन क्षेत्रांबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत?
१० जीवनातल्या अशा तीन क्षेत्रांचा आपण विचार करू या ज्यात यहोवाच्या आज्ञा पाळण्याद्वारे आपण त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त करू शकतो. जीवनातल्या या प्रत्येक क्षेत्रात विवेकाची महत्त्वाची भूमिका आहे. पण, आपल्या विवेकाने आपले योग्य मार्गदर्शन करावे म्हणून सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आचरणाच्या बाबतीत बायबलमध्ये दिलेल्या सिद्धान्तांनुसार आपण आपल्या विवेकाला प्रशिक्षित केले पाहिजे. ज्या तीन क्षेत्रांत, यहोवाच्या आज्ञा पाळून त्याच्यावरील आपले प्रेम आपण व्यक्त करू शकतो ते पुढीलप्रमाणे आहेत: (१) देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करणे (२) जे अधिकार पदावर आहेत त्यांचा आदर करणे आणि (३) देवाच्या नजरेत शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे.
देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करा
११. यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर आपण प्रेम का केले पाहिजे?
११ सर्वात प्रथम, यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर आपण प्रेम केले पाहिजे. संगतीच्या बाबतीत आपण एखाद्या स्पंजप्रमाणे असतो. आपण सहसा ज्यांच्यासोबत उठबस करतो अशा लोकांचे आचारविचार, वृत्ती-प्रवृत्ती आपण शोषून घेतो किंवा आत्मसात करतो. अपरिपूर्ण मानवांसाठी संगती किती लाभदायक ठरू शकते व किती घातक ठरू शकते हे आपल्या निर्माणकर्त्याला माहीत आहे. म्हणूनच तो आपल्याला असा सुज्ञ सल्ला देतो: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३) ‘कष्ट पावण्याची’ अर्थातच आपल्यापैकी कोणाचीही इच्छा नाही. उलट, आपल्या सर्वांनाच ‘सुज्ञ होण्याची’ इच्छा असते. यहोवाच्या बाबतीत पाहिल्यास, त्याच्या बुद्धीत कोणी भर घालू शकत नाही किंवा त्याच्यावर कोणाचा विपरित परिणामही होऊ शकत नाही. असे असले तरी, सोबत्यांची निवड करण्याच्या बाबतीत तो आपल्याकरता एक उत्तम आदर्श मांडतो. उदाहरणार्थ, अपरिपूर्ण मानवांपैकी कशा प्रकारच्या व्यक्तींशी तो मैत्री करतो याचा विचार करा.
१२. यहोवा कशा प्रकारच्या व्यक्तींशी मैत्री करतो?
१२ कुलपिता अब्राहामाच्या बाबतीत बोलताना यहोवाने “माझा मित्र” म्हणून त्याचा उल्लेख केला. (यश. ४१:८) विश्वास, धार्मिकता आणि आज्ञाधारकता यांच्या बाबतीत या पुरुषाने एक उल्लेखनीय उदाहरण मांडले होते. तो खरोखरच एक विश्वासू पुरुष होता. (याको. २:२१-२३) म्हणूनच यहोवाने त्याच्याशी मैत्री केली. आजही यहोवा अशाच प्रकारच्या लोकांशी मैत्री करतो. जर यहोवा अशा लोकांशी मैत्री करतो तर आपणही आपल्या मित्रमैत्रिणींची विचारपूर्वक निवड करू नये का? सुज्ञ होण्यासाठी आपणही सुज्ञांची सोबत धरू नये का?
१३. मित्रांची योग्य निवड करण्यास कोणती गोष्ट तुमची मदत करू शकते?
१३ मित्रांची योग्य निवड करण्यास कोणती गोष्ट तुमची मदत करू शकेल? मैत्रीच्या बाबतीत बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास केल्याने तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, रूथ आणि तिची सासू नामी, दावीद आणि योनाथान किंवा तीमथ्य आणि पौल यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीचा विचार करा. (रूथ १:१६, १७; १ शमु. २३:१६-१८; फिलिप्पै. २:१९-२२) या व्यक्तींमध्ये घनिष्ठ मैत्री असण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे: यहोवा देवावरील मनःपूर्वक प्रेम हा त्यांच्या मैत्रीचा पाया होता. पण, तुमच्या इतकेच यहोवावर प्रेम करणारे मित्र तुम्हाला कोठे भेटू शकतात? अशा प्रकारचे अनेक मित्र तुम्हाला ख्रिस्ती मंडळीत भेटू शकतात याबद्दल तुम्ही खातरी बाळगू शकता. हे मित्र तुम्हाला आध्यात्मिक दृष्टीने कष्टदायक ठरेल अशा मार्गाने कधीही जाऊ देणार नाहीत. उलट, ते तुम्हाला यहोवाच्या आज्ञा पाळण्यास, त्याच्याशी जवळचा नातेसबंध जोपासण्यास आणि आत्म्याच्या उत्तम गोष्टी पेरण्यास मदत करतील. (गलतीकर ६:७, ८ वाचा.) देवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी ते तुमची मदत करतील.
अधिकार पदावर असलेल्यांचा आदर करा
१४. कोणत्या कारणांमुळे अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींचा आदर करणे आपल्याला कठीण वाटते?
१४ यहोवावर आपले प्रेम आहे हे दाखवण्याचा दुसरा मार्ग अधिकारासंबंधी आहे. जे अधिकार पदावर आहेत अशांचा आपण आदर केला पाहिजे. पण, असे करणे काही वेळा आपल्याला कठीण का जाते? त्याचे एक कारण म्हणजे अधिकार पदावर असलेल्या व्यक्ती अपरिपूर्ण असतात. शिवाय, आपण स्वतः देखील अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे अधिकाराचा विरोध करण्याच्या आपल्या उपजत प्रवृत्तीशीही आपल्याला झुंजावे लागते.
१५, १६. (क) आपल्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी यहोवाने ज्यांच्यावर सोपवली आहे अशांचा आदर करणे महत्त्वाचे का आहे? (ख) इस्राएल लोकांनी मोशेविरुद्ध केलेल्या बंडखोर कृत्यांकडे यहोवाने ज्या दृष्टिकोनातून पाहिले त्यावरून आपण कोणता महत्त्वपूर्ण धडा शिकतो?
१५ तुम्ही कदाचित विचार कराल, ‘अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींचा आदर करणे इतके कठीण आहे तर त्यांचा आदर का करावा?’ याचे उत्तर सार्वभौमत्वाच्या विषयाशी जुळलेले आहे. तुमचा सार्वभौम किंवा सत्ताधारी म्हणून तुम्ही कोणाची निवड कराल? यहोवाला आपला सार्वभौम म्हणून स्वीकारल्यास त्याच्या अधिकाराचा आपण आदर केलाच पाहिजे. न केल्यास, आपण त्याला आपला सार्वभौम म्हणून स्वीकारले आहे असे खरोखरच म्हणू शकू का? शिवाय, आपला अधिकार चालवण्यासाठी यहोवा अपरिपूर्ण मानवांचा उपयोग करतो. त्यांच्यावर तो आपल्या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवतो. तेव्हा, जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींचा आपण विरोध केल्यास आपल्या या वागणुकीकडे यहोवा कोणत्या दुष्टिकोनातून पाहील?—१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ वाचा.
१६ इस्राएल लोकांचे उदाहरण विचारात घ्या. त्यांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली आणि त्याच्या अधिकाराचा विरोध केला तेव्हा त्यांनी केलेली ही बंडखोर कृत्ये आपल्याविरुद्ध केली असल्याचे यहोवाने मानले. (गण. १४:२६, २७) देव आजही बदललेला नाही. यहोवाने ज्यांना अधिकार दिला आहे अशांचा विरोध केल्यास आपण खुद्द देवाचा विरोध करत असू.
१७. ख्रिस्ती मंडळीत अधिकार पदावर असलेल्यांप्रती कशा प्रकारची मनोवृत्ती विकसित करण्याचा आपण प्रयास केला पाहिजे?
१७ ख्रिस्ती मंडळीत जबाबदारीच्या पदावर असलेल्या बांधवांप्रती आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे हे प्रेषित पौलाने स्पष्ट केले. त्याने म्हटले: “आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” (इब्री १३:१७) अशा प्रकारची अधीनता व आज्ञाधारक मनोवृत्ती दाखवण्यासाठी आपल्याला खूप प्रयास करावे लागतील हे मान्य आहे. पण, देवाच्या प्रेमात टिकून राहणे हा आपला मुख्य उद्देश आहे हे नेहमी लक्षात असू द्या. तर मग, यासाठी प्रयास करणे योग्यच ठरणार नाही का?
देवाच्या नजरेत शुद्ध राहा
१८. आपण शुद्ध राहावे अशी अपेक्षा यहोवा का करतो?
१८ यहोवावर आपले प्रेम आहे हे दाखवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे त्याच्या नजरेत शुद्ध राहण्याचा प्रयत्न करणे. आईवडील सहसा मुलांना स्वच्छ ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. का? कारण स्वच्छता राखल्याने मुलांना चांगले आरोग्य लाभते. शिवाय, त्यांची स्वच्छता, नीटनेटकेपणा त्यांच्या कुटुंबाविषयी बरेच काही सांगून जाते. त्यांच्या पालकांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे, त्यांना त्यांची किती काळजी आहे हे दिसून येते. याच कारणांसाठी आपणही शुद्ध राहावे अशी यहोवाची इच्छा आहे. शुद्धता आपल्यासाठी हितावह आहे याची त्याला जाणीव आहे. तसेच, त्याला याचीही जाणीव आहे, की तो आपला स्वर्गीय पिता असल्यामुळे आपली शुद्धता त्याच्याविषयी बरेच काही सांगते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपली शुद्धता पाहून, या दुषित जगात इतरांपेक्षा आपण किती वेगळे आहोत हे सहज लोकांच्या लक्षात येते. आणि त्यामुळे आपण ज्या देवाची उपासना करतो त्याच्याकडे ते आकृष्ट होऊ शकतात.
१९. शारीरिक स्वच्छता महत्त्वाची आहे असे आपण का म्हणू शकतो?
१९ आपण कोणकोणत्या बाबतीत शुद्ध असले पाहिजे? खरे तर सर्वच बाबतीत. यहोवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला शारीरिक स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी स्पष्टपणे सांगितले होते. (लेवी. १५:३१) मोशेच्या नियमशास्त्रात मानव विष्ठेची विल्हेवाट लावण्यासंबधी, पात्रे शुद्ध करण्यासंबंधी तसेच हातपाय व वस्त्रे धुण्यासंबंधी विशिष्ट नियम देण्यात आले होते. (निर्ग. ३०:१७-२१; लेवी. ११:३२; गण. १९:१७-२०; अनु. २३:१३, १४) इस्राएल लोकांना सतत आठवण करून दिली जात होती, की त्यांचा देव यहोवा पवित्र अर्थात “शुद्ध” व “निर्मळ” आहे आणि त्याचे सेवक या नात्याने त्यांनीही पवित्र असले पाहिजे.—लेवीय ११:४४, ४५ वाचा.
२०. कोणकोणत्या बाबतीत शुद्ध राहणे गरजेचे आहे?
२० त्याअर्थी, आपणही अंतर्बाह्य शुद्ध असण्याची गरज आहे. यासाठी आपण आपले विचार नेहमी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो. जगातले लोक नैतिकतेच्या बाबतीत कितीही रसातळाला गेलेले असले तरी आपण यहोवाच्या उच्च नैतिक दर्जांनुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, खोट्या धर्माच्या कोणत्याही दुषित करणाऱ्या गोष्टीपासून अलिप्त राहून आपण आपली उपासना शुद्ध ठेवण्याचा विशेष प्रयत्न करतो. यशया ५२:११ मध्ये हा इशारेवजा संदेश दिला आहे: “निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तुला शिवू नका; त्याच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो, तुम्ही आपणास शुद्ध करा.” हा संदेश आपण नेहमी आठवणीत ठेवतो आणि आज आपल्या स्वर्गीय पित्याच्या नजरेत अशुद्ध असलेल्या खोट्या धर्मातील सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवून आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहतो. त्यामुळेच खोट्या धर्मावर आधारित असलेल्या सध्याच्या प्रचलित सणावारांत कोणत्याही प्रकारचा सहभाग न घेण्याची आपण काळजी घेतो. शुद्धता राखणे सोपे नक्कीच नाही. पण, यहोवाचे लोक असे करण्याचा प्रयत्न करतात कारण शुद्ध राहिल्यानेच काय ते देवाच्या प्रेमात टिकून राहू शकतात.
२१. देवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने काय केले पाहिजे?
२१ आपण सदा सर्वकाळ यहोवाच्या प्रेमात राहावे अशी त्याची इच्छा आहे. पण, आपल्यापैकी प्रत्येकाने देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. येशूने घालून दिलेल्या आदर्शाचे अनुकरण करण्याद्वारे आणि देवाच्या आज्ञा पाळण्याद्वारे आपल्याला हे शक्य होईल. आपण असे केल्यास, कोणतीही गोष्ट “ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही,” याची खातरी आपण बाळगू शकतो.—रोम. ८:३८, ३९.
तुम्हाला आठवते का?
• देवाच्या प्रेमात टिकून राहण्यास आपला विवेक आपली मदत कशी करू शकतो?
• यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर आपण प्रेम का करावे?
• अधिकार पदावर असलेल्यांचा आपण आदर का करावा?
• देवाच्या लोकांनी शुद्ध राहणे इतके महत्त्वाचे का आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२० पानांवरील चौकट/चित्र]
चांगल्या आचरणास प्रोत्साहन देणारे पुस्तक
२००८/२००९ प्रांतीय अधिवेशनांत देवाच्या प्रेमात टिकून राहा असे शीर्षक असलेले २२४ पानांचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते. या नवीन पुस्तकाचा उद्देश काय आहे? खासकरून ख्रिस्ती आचरणाच्या संदर्भात असलेल्या यहोवाच्या दर्जांशी परिचित होण्यास व ते मनापासून स्वीकारण्यास ख्रिश्चनांना मदत करण्यासाठी या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्याने आपल्याला याची खातरी होईल, की यहोवाच्या दर्जांनुसार जीवन जगणे हाच सगळ्यात उत्तम मार्ग असून यामुळेच भवितव्यात आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल.
याहून महत्त्वाचे म्हणजे, हे पुस्तक आपल्याला याची जाणीव करून देते, की यहोवाच्या आज्ञा पाळणे कठीण नाही. उलट, यहोवाच्या आज्ञा पाळल्याने त्याच्यावर आपले किती प्रेम आहे हे आपण दाखवतो. त्यामुळे हे पुस्तक आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न विचारण्यास प्रेरित करते, की ‘मी यहोवाच्या आज्ञा का पाळतो/पाळते?’
दुःखाची गोष्ट म्हणजे, काही जण यहोवाला सोडून देण्याची चूक करतात. सहसा बायबलमधील एखादी शिकवण न समजल्यामुळे किंवा न पटल्यामुळे नव्हे, तर त्यांच्या चुकीच्या आचरणामुळे असे घडते. तेव्हा, दररोजच्या जीवनात आपले मार्गदर्शन करणाऱ्या यहोवाच्या नियमांबद्दल व सिद्धान्तांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता विकसित करणे किती महत्त्वाचे आहे! आम्हाला खातरी आहे, की जगभरातील यहोवाच्या मेंढरांना खंबीरपणे योग्य ते करत राहण्यास, सैतानाला खोटे ठरवण्यास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाच्या प्रेमात टिकून राहण्यास हे नवे पुस्तक नक्कीच मदत करील!—यहू. २१.
[१८ पानांवरील चित्र]
“जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल”