व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करा

ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करा

ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करा

“ख्रिस्त येशूप्रमाणे [ख्रिस्त येशूच्या मनोवृत्तीप्रमाणे] तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.”—रोम. १५:५.

१. आपण ख्रिस्ताची मनोवृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न का करावा?

येशू ख्रिस्ताने म्हटले, ‘माझ्याकडे या. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.’ (मत्त. ११:२८, २९) या हार्दिक आमंत्रणावरून येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ मनोवृत्तीची आपल्याला कल्पना येते. कोणाही मनुष्यापेक्षा येशू हाच आपल्याकरता सर्वोत्तम आदर्श आहे! कारण, देवाचा शक्‍तिशाली पुत्र असूनही त्याने इतरांप्रती आणि विशेषतः दुःखीकष्टी लोकांप्रती सहानुभूती व करुणा दाखवली.

२. येशूच्या मनोवृत्तीच्या कोणत्या पैलूंविषयी आपण चर्चा करणार आहोत?

आपण ख्रिस्तासारखी मनोवृत्ती विकसित करून ती सतत आपल्या वागणुकीतून कशी प्रदर्शित करू शकतो आणि आपल्याठायी “ख्रिस्ताचे मन” असल्याचे दैनंदिन जीवनात कसे दाखवू शकतो, याविषयी या व पुढील दोन लेखांत आपण पाहणार आहोत. (१ करिंथ. २:१६) प्रामुख्याने येशूच्या मनोवृत्तीचे पाच महत्त्वपूर्ण पैलू आपण विचारात घेऊ या: येशूची सौम्यता आणि लीनता, त्याचा दयाळुपणा, देवाप्रती त्याची आज्ञाधारकता, त्याचे धैर्य आणि अविनाशी प्रेम.

येशूच्या सौम्य मनोवृत्तीपासून शिका

३. (क) येशूने आपल्या शिष्यांना लीन मनोवृत्ती बाळगण्यासंबंधी एकदा कोणता धडा दिला? (ख) शिष्यांच्या वागणुकीतून त्यांचे दोष दिसून आले तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती?

येशू हा देवाचा परिपूर्ण पुत्र होता. तरीसुद्धा, पृथ्वीवर अपरिपूर्ण, पापी मानवांमध्ये येऊन सेवा करण्याची तयारी त्याने दाखवली. यांच्याचपैकी काही जण पुढे जाऊन त्याला जिवे मारणार होते. तरीसुद्धा, एका क्षणासाठी देखील येशूने आपला आनंद किंवा आत्मसंयम गमावला नाही. (१ पेत्र २:२१-२३) येशूच्या आदर्शाकडे “पाहत” राहिल्यास, इतरांच्या चुकांचा किंवा कमतरतांचा आपल्यावर परिणाम होतो तेव्हा आपल्यालाही आपला आनंद व आत्मसंयम टिकवून ठेवणे शक्य होईल. (इब्री १२:२) येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, “माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका.” (मत्त. ११:२९) ते येशूकडून काय शिकू शकत होते? एक गोष्ट म्हणजे, येशू मनाचा सौम्य होता आणि त्याच्या शिष्यांमध्ये बरेच दोष असूनही तो त्यांच्याशी सहनशीलतेने वागला. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने शिष्यांचे पाय धुतले. असे करण्याद्वारे त्याने “लीन” मनोवृत्ती बाळगण्यासंबंधी त्यांना एक अविस्मरणीय धडा दिला. (योहान १३:१४-१७ वाचा.) नंतर जेव्हा “जागृत राहा” असे येशूने सांगितल्यावरही पेत्र, याकोब व योहान झोपी गेले, तेव्हा ते शारीरिक दुर्बलतेमुळे असे वागले हे ओळखून येशूने त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवली. त्याने पेत्राला विचारले, “शिमोना, झोपी गेलास काय?” मग तो म्हणाला: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्‍त आहे.”—मार्क १४:३२-३८.

४, ५. येशूच्या उदाहरणावरून इतरांच्या दोषांप्रती योग्य प्रतिक्रिया दाखवण्यास आपल्याला कशी मदत मिळते?

आपल्या ख्रिस्ती बांधवांपैकी एखाद्याची चढाओढ करण्याची किंवा लहानसहान कारणांवरून चिडण्याची वृत्ती असेल किंवा तो वडिलांच्या अथवा विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या सूचनांचे पालन करण्यास तत्पर नसेल तर आपण कशी प्रतिक्रिया दाखवू? (मत्त. २४:४५-४७) सैतानाच्या जगातील लोकांच्या अपरिपूर्णता कदाचित सर्वसामान्य समजून आपण त्यांना सहज क्षमा करत असू. पण तेच दोष आपल्या बांधवांमध्ये दिसून आल्यास आपल्याला त्यांना क्षमा करणे खूप कठीण जाऊ शकते. इतरांच्या चुकांची आपल्याला सहजासहजी चीड येत असेल तर आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, की ‘“ख्रिस्ताचे मन” मी आत्मसात केले आहे हे मला माझ्या वागणुकीतून आणखी चांगल्या प्रकारे कसे दाखवता येईल?’ येशूच्या शिष्यांनी त्याच्या मनोवृत्तीचे नेहमीच अनुकरण केले नाही तरीसुद्धा तो त्यांच्यावर चिडला नाही हे नेहमी आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करा.

प्रेषित पेत्राचे उदाहरण पाहू या. येशूने पेत्राला नावेतून उतरून पाण्यावरून चालत त्याच्याकडे येण्यास सांगितले, तेव्हा पेत्र खरोखरच काही वेळ पाण्यावरून चालला. पण मग त्याने वादळाकडे पाहिले तेव्हा मात्र तो बुडू लागला. पण येशू पेत्रावर रागावला का, किंवा “बरं झालं, तुला असंच पाहिजे!” असे तो म्हणाला का? नाही! उलट, “येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्‍वासी तू संशय का धरिलास?” (मत्त. १४:२८-३१) जर आपल्या एखाद्या बांधवाच्या वागणुकीवरून त्याच्यात विश्‍वासाचा अभाव असल्याचे आढळले तर आपणही येशूप्रमाणे मदतीचा हात देऊन त्याचा विश्‍वास दृढ करण्यास त्याला साहाय्य करू शकतो का? येशू पेत्राशी ज्या प्रकारे सौम्यपणे वागला त्यावरून आपल्याला हाच धडा शिकायला मिळतो.

६. प्रमुख स्थानाची लालसा बाळगण्याच्या बाबतीत येशूने आपल्या प्रेषितांना काय शिकवले?

आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण, यावरून प्रेषितांमध्ये बऱ्‍याच काळापासून वाद चालला होता. पेत्रही या वादात गोवलेला होता. याकोब व योहान यांपैकी एकाला येशूच्या राज्यात त्याच्या उजवीकडे तर दुसऱ्‍याला त्याच्या डावीकडे बसण्याची इच्छा होती. हे जेव्हा पेत्र व इतर प्रेषितांच्या कानी आले तेव्हा त्यांना खूप राग आला. पण येशूला जाणीव होती की ज्या समाजात ते लहानाचे मोठे झाले होते त्याच्या प्रभावामुळे कदाचित त्यांच्यात अशी मनोवृत्ती निर्माण झाली असेल. त्यामुळे त्यांना आपल्याजवळ बोलावून येशू त्यांना म्हणाला: “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकहि अधिकार करितात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही; तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.” मग स्वतःच्या उदाहरणाकडे त्यांचे लक्ष वेधून येशूने म्हटले: “ह्‍याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”—मत्त. २०:२०-२८.

७. आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीतील ऐक्याला कशा प्रकारे हातभार लावू शकतो?

येशूच्या लीन मनोवृत्तीवर मनन केल्याने आपल्याला आपल्या बांधवांमध्ये स्वतःला “कनिष्ठ” समजून वागण्यास मदत मिळेल. (लूक ९:४६-४८) अशा प्रकारे वागल्याने आपण मंडळीच्या ऐक्याला हातभार लावू. एखाद्या मोठ्या कुटुंबातील पित्याप्रमाणे यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या मुलांनी ‘ऐक्याने एकत्र राहावे,’ म्हणजेच एकमेकांशी मिळूनमिसळून राहावे. (स्तो. १३३:१) आपल्या सर्व अनुयायांनी ऐक्याने राहावे अशी येशूने आपल्या पित्याला प्रार्थना केली. येशूने अशी प्रार्थना का केली? त्याने म्हटले: “त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीति केली तशी त्यांच्यावरहि प्रीति केली.” (योहा. १७:२३) त्याअर्थी, आपण ऐक्याने राहतो तेव्हा ख्रिस्ताचे खरे अनुयायी म्हणून आपण आपली ओळख पटवून देतो. ही एकता टिकवून ठेवण्यासाठी इतरांच्या चुकांकडे ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. येशू क्षमाशील होता आणि आपण क्षमाशील असलो तरच आपण आपल्या चुकांची क्षमा होण्याची अपेक्षा करू शकतो असे त्याने आपल्याला शिकवले.मत्तय ६:१४, १५ वाचा.

८. अनेक वर्षांपासून देवाची सेवा करणाऱ्‍यांकडून आपण काय शिकू शकतो?

अनेक वर्षांपासून ख्रिस्ताचे अनुकरण करत आलेल्या बांधवांच्या विश्‍वासाचे अनुकरण केल्याने देखील आपण बरेच काही शिकू शकतो. येशूप्रमाणेच हे बांधव देखील इतरांच्या चुकांप्रती सहसा समजूतदार मनोवृत्ती दाखवतात. त्यांना जाणीव झाली आहे, की ख्रिस्ताप्रमाणे सहानुभूतिशील मनोवृत्ती दाखवल्याने ‘अशक्‍तांच्या दुर्बलतेचा भार वाहणे’ तर शक्य होतेच, पण यामुळे मंडळीतील ऐक्यही वाढीस लागते. शिवाय, यामुळे मंडळीतील सर्वांनाच ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळते. पौलाला रोममधील ख्रिश्‍चनांबद्दल जसे वाटले तसेच या अनुभवी ख्रिश्‍चनांनाही इतर बांधवांविषयी वाटते: “आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे [ख्रिस्त येशूच्या मनोवृत्तीप्रमाणे] तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.” (रोम. १५:१, ५, ६) खरोखर, आपण ऐक्याने उपासना करतो तेव्हा यहोवाचा गौरव होतो!

९. येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज का आहे?

येशूने “लीन” असणे हे सौम्य मनोवृत्तीशी निगडित असल्याचे सांगितले. सौम्यता देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळात समाविष्ट असलेला एक गुण आहे. तेव्हा, येशूच्या उदाहरणाचे परीक्षण करण्यासोबतच, या उदाहरणाचे चांगल्या प्रकारे अनुकरण करता यावे म्हणून यहोवाच्या पवित्र आत्म्याचीही आपल्याला गरज आहे. म्हणूनच, आपण देवाचा पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तसेच, या आत्म्याचे फळ अर्थात, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे सद्‌गुण स्वतःमध्ये उत्पन्‍न करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. (गलती. ५:२२, २३) अशा रीतीने, लीनता आणि सौम्यता यांच्याबाबतीत येशूने घालून दिलेल्या उदाहरणाचे अनुकरण केल्याने आपण आपला स्वर्गीय पिता यहोवा याचे मन आनंदित करू.

येशू इतरांशी दयाळूपणे वागला

१०. येशू दयाळू होता हे कशावरून दिसते?

१० दयाळूपणा किंवा ममता हा देखील आत्म्याच्या फळात समाविष्ट असलेला एक गुण आहे. येशू नेहमी इतरांशी दयाळूपणे वागला. प्रामाणिकपणे त्याचा शोध घेणाऱ्‍यांचे त्याने दयाळूपणे स्वागत केले. (लूक ९:११ वाचा.) येशूच्या दयाळूपणावरून आपण काय शिकू शकतो? दयाळू व्यक्‍ती ही मनमिळाऊ, कोमल, सहानुभूतिशील व उदार असते. येशू अशाच प्रकारची व्यक्‍ती होता. त्याला लोकांचा कळवळा आला “कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.”—मत्त. ९:३५, ३६.

११, १२. (क) एके प्रसंगी येशूने कशा प्रकारे सहानुभूती दाखवली याचे वर्णन करा. (ख) या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता?

११ येशूला दया व करुणा केवळ वाटलीच नाही तर त्याने या भावनांनी प्रेरित होऊन लोकांना मदत देखील केली. एक उदाहरण पाहू या. एका स्त्रीला तब्बल १२ वर्षांपासून रक्‍तस्रावाची व्याधी होती. मोशेच्या नियमशास्त्रानुसार या स्थितीत असलेल्या व्यक्‍तीला आणि तिला स्पर्श करणाऱ्‍या दुसऱ्‍या व्यक्‍तीला देखील अशुद्ध समजले जात असे. (लेवी. १५:२५-२७) तरीसुद्धा, या स्त्रीला येशूच्या स्वभावाची आणि इतरांशी तो कसा वागला याची माहिती असल्यामुळे तो आपल्याला बरे करू शकतो आणि अवश्‍य करेल असा भरवसा तिला वाटला असावा. तिने विचार केला: “केवळ ह्‍याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” म्हणून, धैर्य एकवटून तिने त्याच्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्याच क्षणी तिचा रोग बरा झाल्याचे तिला जाणवले.

१२ आपल्याला कोणीतरी स्पर्श केल्याचे येशूला जाणवले. कोणी स्पर्श केला हे पाहण्यासाठी तो आजुबाजूला पाहू लागला. तेव्हा, आपण नियमशास्त्रातील आज्ञा मोडल्यामुळे आता येशू आपल्यावर रागावेल अशी भीती वाटून ती स्त्री थरथरत त्याच्या पाया पडली आणि तिने प्रामाणिकपणे सर्व काही त्याला सांगून टाकले. येशूने त्या असहाय, दुःखी स्त्रीला खडसावले का? मुळीच नाही! उलट, तिला दिलासा देत येशूने म्हटले, “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.” (मार्क ५:२५-३४) हे प्रेमळ शब्द ऐकून तिला किती हायसे वाटले असेल याची कल्पना करू शकता का तुम्ही?

१३. (क) येशूची मनोवृती परूश्‍यांच्या मनोवृत्तीपेक्षा वेगळी कशी होती? (ख) लहान मुलांशी येशू कशा प्रकारे वागला?

१३ पाषाणहृदयी परूश्‍यांप्रमाणे येशूने कधीही आपल्या अधिकाराचा गैरवापर करून इतरांवर अत्याचार केला नाही. (मत्त. २३:४) उलट, त्याने दयाळूपणे व धीराने इतरांना यहोवाचे मार्ग शिकवले. आपल्या अनुयायांसाठी येशू एक प्रेमळ सोबती होता. तो नेहमी त्यांच्याशी प्रेमाने व दयाळूपणे वागला. खरोखर, तो त्यांचा सच्चा मित्र होता. (नीति. १७:१७; योहा. १५:११-१५) लहान मुलांनासुद्धा येशूजवळ येण्यास भीती वाटत नसे आणि त्यालाही मुलांचा सहवास आवडत असे. कितीही व्यग्र असला तरी मुलांसाठी त्याच्याकडे हमखास वेळ असायचा. त्या काळच्या धर्मपुढाऱ्‍यांप्रमाणे, येशूच्या शिष्यांत मात्र अजूनही इतरांपुढे आपला श्रेष्ठपणा दाखवण्याची वृत्ती होती. त्यामुळे, एकदा लोक येशूजवळ आपल्या लहान मुलांना आणू लागले तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यांना मना करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची ही वागणूक येशूला मुळीच आवडली नाही. त्याने त्यांना म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” मग मुलांकडे लक्ष वेधून येशूने त्यांना म्हटले: “मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”—मार्क १०:१३-१५.

१४. मुलांमध्ये आस्था दाखवणे त्यांच्या हिताचे का आहे?

१४ अनेक वर्षांनंतर त्या मुलांपैकी काहींना लहानपणी येशूने आपल्याला ‘कवटाळून व आपल्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला’ होता हे आठवले असेल तेव्हा त्यांना कसे वाटले असावे याचा विचार करा. (मार्क १०:१६) आजही वडिलांनी व इतरांनी लहान मुलांमध्ये निःस्वार्थपणे आस्था दाखवून त्यांच्याशी प्रेमळपणे वागल्यास, ही मुले त्यांना मिळालेले हे प्रेम अनेक वर्षांनंतरही विसरणार नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मंडळीत अशा प्रकारचे खरे प्रेम अनुभवण्यास मिळते तेव्हा यहोवाच्या लोकांवर त्याचा पवित्र आत्मा आहे ही भावना लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजते.

निर्दयी जगात दयाळूपणा दाखवा

१५. आज जगात दयाळूपणाचा अभाव आहे याचे आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये?

१५ आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेकांना इतरांप्रती दयाळूपणा दाखवण्याची सवड नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांत, कामाच्या ठिकाणी, प्रवास करताना तसेच सेवाकार्यातही यहोवाच्या लोकांना दररोज जगातील लोकांच्या निर्दयी वागणुकीला तोंड द्यावे लागते. अशा वागणुकीमुळे आपल्याला वाईट जरूर वाटते, पण याचे आपल्याला नवल वाटू नये. कारण, यहोवाने पूर्वीच पौलाला असा इशारा देण्यास प्रेरित केले होते, की ‘शेवटल्या काळातील’ कठीण दिवसांत खऱ्‍या ख्रिश्‍चनांना “स्वार्थी . . . ममताहीन” लोकांचा सामना करावा लागेल.—२ तीम. ३:१-३.

१६. आपण मंडळीत ख्रिस्तासारखी दयाळूपणाची मनोवृत्ती कशी वाढीस लावू शकतो?

१६ दुसरीकडे पाहता, खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीतील आनंददायक वातावरण या निर्दयी जगापेक्षा अगदीच वेगळे आहे. आणि येशूच्या गुणांचे अनुकरण करण्याद्वारे आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीतील आनंदात भर घालू शकतो. आपण हे कसे करू शकतो? मंडळीतील अनेकांना आजारपण व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यांना आपल्या साहाय्याची व सांत्वनाची गरज आहे. शेवटल्या काळात या समस्या आणखीनच वाढल्या आहेत हे खरे असले, तरी या समस्या नवीन नाहीत. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना देखील अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. तेव्हा, त्या काळात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना मदत पुरवणे आवश्‍यक होते त्याप्रमाणेच आजही अशा समस्यांना तोंड देणाऱ्‍या आपल्या बांधवांना मदतीचा हात देणे तितकेच आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, पौलाने ख्रिस्ती बांधवांना असे प्रोत्साहन दिले, “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.” (१ थेस्सलनी. ५:१४) यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आपला दयाळूपणा कार्यांतून दाखवणे जरुरीचे आहे.

१७, १८. येशूप्रमाणे आपणही कोणकोणत्या मार्गांनी दयाळूपणा दाखवू शकतो?

१७ आपल्या ख्रिस्ती बांधवांशी येशू ज्या प्रकारे दयाळूपणे वागला असता त्याच प्रकारे त्यांच्याशी वागण्याची ख्रिस्ती या नात्याने आपली जबाबदारी आहे. ज्यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो त्यांच्याबद्दल तसेच, ज्यांना आपण पहिल्यांदाच भेटतो त्यांच्याबद्दलही आपण मनापासून आस्था व काळजी व्यक्‍त केली पाहिजे. (३ योहा. ५-८) इतरांना सहानुभूती दाखवण्यासाठी येशूने ज्या प्रकारे पुढाकार घेतला त्याच प्रकारे आपणही घेतला पाहिजे आणि अशा रीतीने इतरांना दिलासा व प्रोत्साहन मिळेल असेच नेहमी आपण वागले पाहिजे.—यश. ३२:२; मत्त. ११:२८-३०.

१८ इतरांबद्दल आपल्याला कळकळ आहे आणि त्यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे हे कृतींतून दाखवण्याद्वारे आपल्यापैकी प्रत्येक जण दयाळूपणा दाखवू शकतो. तेव्हा असे करण्याचे मार्ग शोधा. दयाळूपणे वागण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या. आपल्या बांधवांच्या मदतीला धावून या! पौलाने म्हटले, “एकमेकांवर बंधुभावाने प्रेम करा.” पुढे त्याने म्हटले, “एकमेकांचा सन्मान करण्यात आनंद माना.” (रोम. १२:१०, सुबोध भाषांतर) याचा अर्थ, ख्रिस्ताचे अनुकरण करून आपण इतरांशी प्रेमळपणे व दयाळूपणे वागले पाहिजे आणि ‘निष्कपट प्रीति’ दाखवायला शिकले पाहिजे. (२ करिंथ. ६:६) ख्रिस्ती प्रेमाचे पौलाने असे वर्णन केले: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही.” (१ करिंथ. १३:४) आपल्या बंधूभगिनींबद्दल मनात अढी बाळगण्याऐवजी आपण या सल्ल्याचे पालन करू या: “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.”—इफिस. ४:३२.

१९. येशूप्रमाणे दयाळूपणा दाखवल्याने कोणते चांगले परिणाम घडून येतात?

१९ सर्व परिस्थितींत व सर्व प्रसंगी ख्रिस्तासारखा दयाळूपणा विकसित करण्याचा व दाखवण्याचा प्रयत्न केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. यामुळे यहोवाचा आत्मा मंडळीत मुक्‍तपणे कार्य करू शकेल आणि सर्वांनाच आत्म्याच्या फळातील उत्तम गुण प्रदर्शित करणे शक्य होईल. शिवाय, आपण स्वतः येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून इतरांनाही तसे करण्यास साहाय्य केल्यास, आपल्या आनंदी व एकजूटपणे केलेल्या उपासनेने यहोवाचे मन निश्‍चितच आनंदित होईल. तेव्हा, इतरांशी वागताना आपण सदोदित येशूच्या सौम्य व दयाळू मनोवृत्तीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू या.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• येशू “मनाचा सौम्य व लीन” होता हे त्याने कशा प्रकारे दाखवले?

• येशूने कशा प्रकारे दयाळूपणा दाखवला?

• या अपरिपूर्ण जगात आपण येशूप्रमाणे सौम्यता व दयाळूपणा कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

पेत्राप्रमाणे एखाद्या बांधवाचा विश्‍वास डगमगल्यास आपण त्याला मदतीचा हात देऊ का?

[१० पानांवरील चित्र]

मंडळीतील प्रेमळ वातावरण टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे हातभार लावू शकता?