व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताचे प्रेम आपल्यालाही इतरांवर प्रेम करण्याची प्रेरणा देते

ख्रिस्ताचे प्रेम आपल्यालाही इतरांवर प्रेम करण्याची प्रेरणा देते

ख्रिस्ताचे प्रेम आपल्यालाही इतरांवर प्रेम करण्याची प्रेरणा देते

“जगातील स्वकीयांवर [येशूचे] जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.”—योहा. १३:१.

१, २. (क) येशूचे प्रेम उल्लेखनीय आहे असे का म्हणता येईल? (ख) प्रेमाच्या कोणकोणत्या पैलूंविषयी या लेखात आपण चर्चा करणार आहोत?

प्रेमाच्या बाबतीत येशूने सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले. त्याचे वागणे-बोलणे, शिकवण्याची पद्धत व बलिदानरूपी मृत्यू या सर्वांतून त्याचे प्रेम दिसून आले. पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत त्याने, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांवर आणि विशेषतः आपल्या शिष्यांवर प्रेम केले.

प्रेमाच्या बाबतीत येशूने घालून दिलेले हे अप्रतिम उदाहरण त्याच्या अनुयायांसाठी एक उत्कृष्ट आदर्श आहे. येशूचे उदाहरण आपल्याला ख्रिस्ती मंडळीतील बंधूभगिनींवर आणि इतरांवरही प्रेम करण्यास उत्तेजन देते. चुका करणाऱ्‍यांप्रती—अगदी गंभीर स्वरूपाचे अपराध करणाऱ्‍यांप्रती देखील प्रेम दाखवण्याच्या बाबतीत मंडळीतील वडील येशूच्या उदाहरणावरून काय शिकू शकतात हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसेच आर्थिक संकटे, नैसर्गिक आपत्ती आणि आजारपण अशा समस्यांना तोंड देताना येशूचे प्रेम ख्रिश्‍चनांना एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे यायला कशा प्रकारे प्रेरित करते हे देखील आपण शिकणार आहोत.

३. पेत्रामध्ये गंभीर दोष असूनही येशू त्याच्याशी कसा वागला?

येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याच्याच एका प्रेषिताने अर्थात पेत्राने त्याला तीन वेळा नाकारले. (मार्क १४:६६-७२) तरीसुद्धा, येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे पेत्र वळाल्यावर येशूने त्याला क्षमा केली. इतकेच नव्हे तर, येशूने त्याच्यावर अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्‍या देखील सोपवल्या. (लूक २२:३२; प्रे. कृत्ये २:१४; ८:१४-१७; १०:४४, ४५) गंभीर दोष असलेल्या व्यक्‍तींप्रती येशूने दाखवलेल्या या मनोवृत्तीवरून आपण काय शिकतो?

अपराध करणाऱ्‍यांप्रती ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवा

४. कोणत्या परिस्थितीत ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवणे विशेष गरजेचे आहे?

ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवण्याचे अनेक प्रसंग आपल्यासमोर येत असले तरी एखादी व्यक्‍ती गंभीर अपराध करते तो प्रसंग आपल्याकरता अत्यंत दुःखदायक असू शकतो, मग ती व्यक्‍ती आपल्याच कुटुंबाची सदस्य असो अथवा मंडळीची. दुःखाची गोष्ट म्हणजे सैतानाच्या जगाचा अंत जवळ येत आहे तसतशी जगाच्या अनैतिक आत्म्याला बळी पडणाऱ्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगातील वाईट किंवा बेपर्वा वृत्ती लहानमोठ्या सर्वांवरच प्रभाव पाडते आणि यामुळे अरुंद मार्गावरून चालण्याचा त्यांचा निर्धार डळमळू शकतो. पहिल्या शतकात, काहींना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करावे लागले होते, तर इतरांना कडक ताकीद द्यावी लागली होती. आजही अशा प्रकारची कारवाई केली जाते. (१ करिंथ. ५:११-१३; १ तीम. ५:२०) पण, अशा बाबी हाताळणारे वडील ख्रिस्तासारखे प्रेम प्रदर्शित करतात तेव्हा अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या मनावर याचा गहिरा प्रभाव पडू शकतो.

५. अपराध करणाऱ्‍यांप्रती मंडळीतील वडिलांनी येशूच्या मनोवृत्तीचे अनुकरण कसे केले पाहिजे?

येशूप्रमाणे ख्रिस्ती वडिलांनी सर्व प्रसंगी यहोवाच्या नीतिमान दर्जांचे समर्थन केले पाहिजे. ते असे करतात तेव्हा यहोवासारखी सौम्यता, दयाळूपणा आणि प्रेम दाखवतात. आपण केलेल्या अपराधाबद्दल एखादी व्यक्‍ती मनापासून पश्‍चात्ताप करते तेव्हा अशा ‘अनुतप्त मनाच्या’ किंवा “भग्नहृदयी” व्यक्‍तीला ‘सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणणे’ कदाचित वडिलांना फारसे कठीण जाणार नाही. (स्तो. ३४:१८; गलती. ६:१) पण, एखादी व्यक्‍ती उर्मटपणे वागते किंवा आपल्या चुकीबद्दल तिला जराही पस्तावा झाल्याचे चिन्ह दिसत नाही तेव्हा वडिलांनी तिच्याशी कसे वागावे?

६. अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीशी व्यवहार करताना वडिलांनी कोणती गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे व का?

अपराध करणारी व्यक्‍ती बायबलचा सल्ला स्वीकारत नाही किंवा आपला दोष दुसऱ्‍या कोणावर ढकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा वडिलांना व इतरांना राग येऊ शकतो. त्या व्यक्‍तीच्या चुकीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन तिच्या कृतीबद्दल व मनोवृत्तीबद्दल वडिलांना आपला हा राग व्यक्‍त करण्याचाही मोह होऊ शकतो. पण, राग हानिकारक आहे आणि त्यातून “ख्रिस्ताचे मन” प्रदर्शित होत नाही. (१ करिंथ. २:१६; याकोब १:१९, २० वाचा.) येशूने त्याच्या काळातील काही लोकांना अगदी सडेतोड शब्दांत ताकीद दिली. पण, द्वेषभावनेने किंवा कोणाचे मन दुखवण्याच्या उद्देशाने तो कधीही बोलला नाही. (१ पेत्र २:२३) उलट, तो त्यांच्याशी ज्या प्रकारे वागला-बोलला त्यावरून त्याने त्यांना स्पष्टपणे दाखवून दिले की, अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीला पश्‍चात्ताप करून यहोवाचा अनुग्रह पुन्हा प्राप्त करणे शक्य आहे. खरेतर, ‘पापी लोकांचे तारण’ करण्यासाठीच तो जगात आला होता.—१ तीम. १:१५.

७, ८. न्यायिक कारवाई करण्याच्या बाबतीत वडिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

मंडळीत ज्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाते अशांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे? या बाबतीत येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? मंडळीमध्ये न्यायिक कारवाई करण्याच्या बायबलवर आधारित असलेल्या तरतुदीमुळे कळपाचे संरक्षण होते. शिवाय, या तरतुदीमुळे अपराध करणारी व्यक्‍ती पश्‍चात्ताप करण्यास प्रवृत्त होऊ शकते. (२ करिंथ. २:६-८) दुःखाची गोष्ट म्हणजे, पश्‍चात्तापी मनोवृत्ती न दाखवल्यामुळे काही जणांना बहिष्कृत करावे लागते. पण, अशांपैकी अनेक जण यहोवाकडे व त्याच्या संघटनेकडे वळतात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मंडळीतील वडील ख्रिस्तासारखी मनोवृत्ती प्रदर्शित करतात तेव्हा अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीला पश्‍चात्ताप करून यहोवाकडे वळण्याचा मार्ग ते सुकर करतात. भविष्यात यांपैकी काहींना वडिलांनी दिलेला बायबल आधारित सल्ला कदाचित पूर्णपणे आठवणार नाही. पण, वडिलांनी आपला आदर केला व ते आपल्याशी प्रेमाने वागले ही गोष्ट कायम त्यांच्या लक्षात राहील.

तेव्हा, वडिलांनी अगदी कठीण परिस्थितीतसुद्धा, “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” आणि प्रामुख्याने ख्रिस्तासारखे प्रेम प्रदर्शित केले पाहिजे. (गलती. ५:२२, २३) अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीला बहिष्कृत करण्याची त्यांनी कधीच घाई करू नये. चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीने पुन्हा यहोवाकडे यावे असे मनापासून त्यांना वाटते हे त्यांनी दाखवून दिले पाहिजे. त्यामुळे, नंतर जेव्हा अपराध करणारी व्यक्‍ती मनापासून पश्‍चात्ताप करते—आणि अनेक जण असे करतातही—तेव्हा मंडळीत परत येण्याचा तिचा मार्ग सुकर केल्याबद्दल तिला यहोवाविषयी व मंडळीतल्या [“मानवरूपी,” NW] देणग्यांविषयी मनस्वी कृतज्ञता वाटेल.—इफिस. ४:८, ११, १२.

शेवटल्या काळात ख्रिस्तासारखे प्रेम दाखवणे

९. येशूने आपले प्रेम कार्यांतून कसे दाखवून दिले याचे एक उदाहरण द्या.

येशूने आपले प्रेम कार्यांतून कसे दाखवून दिले याचे एक उल्लेखनीय उदाहरण लूक नमूद करतो. येशूला माहीत होते, की काही काळानंतर, रोमी सैनिक जेरूसलेम शहराला वेढा घालतील आणि शहरातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होतील. त्यामुळे त्याने प्रेमळपणे आपल्या शिष्यांना याविषयी सावध केले: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.” त्या वेळी काय करायचे याबद्दल अगदी सुस्पष्ट सूचना येशूने दिल्या. त्याने म्हटले: “त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरांत पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये. कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत.” (लूक २१:२०-२२) सा.यु. ६६ मध्ये रोमी सैन्याने जेरूसलेमला वेढा घातला तेव्हा जे आज्ञाधारक होते त्यांनी येशूच्या सूचनांचे पालन केले.

१०, ११. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी जेरूसलेममधून केलेल्या पलायनाचा विचार केल्याने ‘मोठ्या संकटासाठी’ स्वतःला तयार करण्यास आपल्याला कशा प्रकारे साहाय्य मिळेल?

१० ख्रिस्ताने ज्याप्रमाणे आपले प्रेम कृतीतून व्यक्‍त केले होते त्याचप्रमाणे जेरूसलेममधून पलायन करताना ख्रिश्‍चनांना देखील एकमेकांवर ख्रिस्तासारखे प्रेम दाखवणे जरुरीचे होते. त्यांच्यापाशी जे काही होते ते आपसात वाटून त्यांना एकमेकांच्या गरजा भागवायच्या होत्या. पण, येशूची भविष्यवाणी फक्‍त जेरूसलेम शहराच्या नाशापुरतीच मर्यादित नव्हती. कारण त्याने म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्त. २४:१७, १८, २१) पुढे येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटाच्या’ आधी व या संकटाच्या दरम्यान आपल्या वाट्यालाही कदाचित अडीअडचणी येतील व आवश्‍यक गोष्टींचा तुटवडा जाणवेल. पण, आपल्यामध्ये ख्रिस्तासारखी मनोवृत्ती असल्यास अशा प्रसंगांवर आपण मात करू शकू.

११ त्यावेळी निःस्वार्थ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे आपल्याला अनुकरण करावे लागेल. याच संदर्भात पौलाने असा सल्ला दिला: “आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्‍याची उन्‍नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेहि स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही. . . . धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.”—रोम. १५:२, ३, ५.

१२. आज आपण कशा प्रकारचे प्रेम विकसित करणे गरजेचे आहे व का?

१२ प्रेषित पेत्र ज्याने स्वतः येशूचे प्रेम अनुभवले होते त्यानेसुद्धा ख्रिश्‍चनांना ‘निर्दंभ बंधुप्रेम’ विकसित करण्याचा व ‘सत्याचे पालन’ करण्याचा आर्जव केला. ख्रिश्‍चनांनी ‘एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति करणे’ आवश्‍यक आहे. (१ पेत्र १:२२) अशा ख्रिस्ती गुणांची पूर्वी कधी नव्हे इतकी आज गरज आहे. कारण देवाच्या लोकांवर येणारे दबाव दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. जगाच्या कोलमडणाऱ्‍या आर्थिक यंत्रणेवरून तर हे अगदी स्पष्ट होते, की नाशाकडे वाटचाल करणाऱ्‍या या जगाच्या कुठल्याच गोष्टीवर आपण भरवसा ठेवू नये. (१ योहान २:१५-१७ वाचा.) या उलट, जसजसा या जगाचा अंत जवळ येत आहे तसतसा आपण मंडळीतील बांधवांशी जवळीक साधण्याचा व खऱ्‍या मैत्रीचे संबंध वाढवण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला पाहिजे. पौलाने असा सल्ला दिला: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोम. १२:१०) यावर आणखी भर देत पेत्राने म्हटले: “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा; कारण प्रीति पापांची रास झाकून टाकते.”—१ पेत्र ४:८.

१३-१५. नैसर्गिक आपत्तीच्या काळात काही बांधवांनी कशा प्रकारे ख्रिस्तासारखे प्रेम दाखवले?

१३ खरे प्रेम कार्यांतून दाखवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार जगभरात प्रसिद्ध आहेत. २००५ साली अमेरिकेच्या दक्षिण भागास वादळांचा जबरदस्त तडाखा बसला तेव्हा बांधवांच्या मदतीसाठी साक्षीदार कशा प्रकारे स्वेच्छेने पुढे आले हे विचारात घ्या. येशूच्या उदाहरणाने प्रेरित होऊन २०,००० पेक्षा अधिक स्वयंसेवक आपली आरामदायी घरे व चांगल्या नोकऱ्‍या सोडून संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांची मदत करण्यासाठी पुढे आले.

१४ एका ठिकाणी तर समुद्राच्या पाण्याचा ३० फूट उंच लोंढा किनाऱ्‍यापासून ८० किलोमीटर आतपर्यंत शिरला. पाणी ओसरले तेव्हा एक तृतियांश घरे व इतर इमारती भुईसपाट झाल्या होत्या. बांधवांची मदत करण्यासाठी जगभरातून कित्येक साक्षीदार स्वयंसेवक निरनिराळी साधनसामग्री व बांधकाम साहित्य घेऊन या ठिकाणी हजर झाले. निरनिराळी कौशल्ये असलेल्या या बांधवांनी कोणतेही काम करायची तयारी दाखवली. उदाहरणार्थ, विधवा असलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी आपले सर्व सामानसुमान एका लहानशा ट्रकमध्ये टाकले व स्वतः ट्रक चालवत सुमारे ३,००० किलोमीटरचे अंतर कापून तिथे आल्या. यांपैकी एक बहीण अजूनही त्याच ठिकाणी राहून स्थानिक मदत कार्य समितीला साहाय्य करत आहे व त्यासोबतच नियमित पायनियर म्हणून सेवाही करत आहे.

१५ या क्षेत्रातील साक्षीदारांच्या व इतर लोकांच्या ५,६०० पेक्षा अधिक घरांचे नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करण्यात आली आहे. तिथल्या साक्षीदार बांधवांना भरभरून मिळालेल्या या प्रेमाबद्दल कसे वाटले? एका बहिणीचे उदाहरण विचारात घ्या. तिचे घर पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे ती एका लहानशा ट्रेलरमध्ये राहू लागली. ट्रेलरचे छत गळके आणि त्यातील स्टोव्हही मोडकातोडका होता. दरम्यान बांधवांनी तिच्यासाठी एक लहानच पण छानसे घर बांधले. त्या नवीन सुबक घराकडे पाहून, यहोवाबद्दल व आपल्या बांधवांबद्दल तिला इतके कृतज्ञ वाटले, की ती अक्षरशः रडू लागली. बेघर झालेल्या कितीतरी बांधवांची घरे बांधून तयार झाल्यावरही ते जेथे त्यांच्या राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली होती तेथेच आणखी एक वर्षभर व त्याहीपेक्षा अधिक काळ राहिले. का बरे? त्यांच्या नवीन घरांत, मदत कार्य करायला आलेल्या बांधवांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी असे केले. ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवण्याचा किती उत्तम नमुना!

आजारी असलेल्यांप्रती ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवणे

१६, १७. आजारी असलेल्या लोकांप्रती आपण कोणकोणत्या मार्गांनी ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवू शकतो?

१६ आपल्यापैकी सर्वांवरच नैसर्गिक आपत्ती कोसळली असेल असे नाही. पण, जवळजवळ सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागते. मग ती आपली स्वतःची आरोग्य समस्या असो अथवा आपल्या कौटुंबिक सदस्यांची. अशा वेळी, आजारी लोकांप्रती येशूने दाखवलेल्या मनोवृत्तीचे आपण अनुकरण करू शकतो. त्यांच्यावरील प्रेमापोटी त्याला त्यांचा कळवळा आला. लोकांनी आपल्या आजारी माणसांना त्याच्याकडे आणले तेव्हा “त्यांच्यातील दुखणेकऱ्‍यांस त्याने बरे केले.”—मत्त. ८:१६; १४:१४.

१७ आज, ख्रिस्ताप्रमाणे चमत्कारिक रीत्या बरे करण्याचे सामर्थ्य ख्रिश्‍चनांजवळ नाही. पण, ख्रिस्ताप्रमाणेच आजारी लोकांबद्दल त्यांनाही कळवळा वाटतो. हे ते कसे दाखवून देतात? याचा एक पुरावा म्हणजे, मंडळीतील वडील मत्तय २५:३९, ४० * (वाचा.) यात दिलेल्या तत्त्वानुसार, आजारी लोकांची मदत करण्यासाठी आवश्‍यक व्यवस्था करून त्यांची नीट कार्यवाही होत आहे याकडे जातीने लक्ष देतात.

१८. कशा प्रकारे दोन ख्रिस्ती बहिणींनी एका आजारी बहिणीप्रती खरे प्रेम दाखवले आणि त्याचा काय परिणाम झाला?

१८ अर्थात, आपण वडील असलो तरच इतरांना मदत करू शकतो असे नाही. कर्करोगाने पीडित असलेल्या ४४ वर्षांच्या शार्लीन नावाच्या एका बहिणीचे उदाहरण विचारात घ्या. आणखी दहा दिवस फक्‍त ती जगेल असे सांगण्यात आले, तेव्हा तिची आणि जिवाभावाने तिची काळजी घेणाऱ्‍या तिच्या पतीची अवस्था पाहून शॅरन आणि निकोलेट या दोन ख्रिस्ती बहिणी त्यांची मदत करण्यासाठी आपणहून पुढे आल्या. यानंतर जवळजवळ दीड महिना म्हणजे शार्लीनचा मृत्यू होईपर्यंत, अगदी शेवटपर्यंत त्यांनी तिची प्रेमळपणे काळजी घेतली. आपल्या या अनुभवाबद्दल शॅरन म्हणते: “एक आजारी व्यक्‍ती कधीच बरी होणार नाही हे माहीत झाल्यावर खूप दुःख होतं. पण, यहोवानं आम्हाला शक्‍ती दिली. या अनुभवामुळं आम्ही यहोवाच्या आणि एकमेकांच्या अधिक जवळ आलो.” शार्लीनचा पती म्हणतो: “या दोन प्रिय बहिणींनी मला जी मदत केली ती मी कधीच विसरणार नाही. त्यांच्या निःस्वार्थ मनोवृत्तीमुळं, शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिलेल्या माझ्या शार्लीनचं आजारपण थोडं सुसह्‍य झालं आणि शरीरानं व मनानं थकून गेलेल्या मलासुद्धा आवश्‍यक असलेली विश्रांती मिळाली. त्यांचे उपकार मला कधीच फेडता येणार नाहीत. त्यांच्या निःस्वार्थ मनोवृत्तीमुळं यहोवावरचा माझा विश्‍वास आणि बांधवांवरचं माझं प्रेम आणखी दृढ झालं.”

१९, २०. (क) ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे कोणते पाच पैलू आपण विचारात घेतले आहेत? (ख) तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१९ या लेखमालेत आपण येशूच्या मनोवृत्तीचे पाच पैलू विचारात घेतले आहेत. तसेच, त्याची विचार करण्याची व वागण्याची पद्धत आपण कशी आत्मसात करू शकतो हे देखील आपण पाहिले आहे. तेव्हा येशूप्रमाणे आपणही ‘मनाची सौम्यता व लीनता’ दाखवू या. (मत्त. ११:२९) इतरांच्या स्वभावातील दोष व त्यांच्या कमतरता स्पष्ट दिसत असल्या तरीही आपण त्यांच्याशी दयाळूपणे वागण्याचा प्रयत्न करू या आणि अगदी कठीण परिस्थितीतही यहोवाच्या आज्ञांचे धैर्याने पालन करू या.

२० तसेच, आपल्या सर्व बांधवांप्रती आपण “शेवटपर्यंत” ख्रिस्तासारखे प्रेम प्रदर्शित करू या. याच प्रेमामुळे आपण येशूचे खरे अनुयायी असल्याची ओळख पटते. (योहा. १३:१, ३४, ३५) होय, तुमचे “बंधुप्रेम टिकून राहो.” (इब्री १३:१) बांधवांवरील प्रेम व्यक्‍त करण्यासाठी सतत संधी शोधत राहा! आपल्या जीवनात यहोवाची स्तुती करण्यास व इतरांची मदत करण्यास नेहमी प्रयत्नशील असा. यहोवा नक्कीच तुमचे सर्व प्रयत्न आशीर्वादित करेल.

[तळटीप]

^ परि. 17 टेहळणी बुरूज जुलै १, १९८७ या अंकातील “‘ऊब घ्या व तृप्त व्हा’ असे नुसते बोलण्यापेक्षा करून दाखवा” हा लेख पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• अपराध करणाऱ्‍यांप्रती वडीलजन ख्रिस्तासारखी मनोवृत्ती कशी दाखवू शकतात?

• या अंतसमयात ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करणे विशेष महत्त्वाचे का आहे?

• आजारी असलेल्यांप्रती आपण ख्रिस्तासारखी मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

अपराध करणाऱ्‍यांनी यहोवाकडे परत यावे असे वडिलांना मनापासून वाटते

[१८ पानांवरील चित्र]

जेरूसलेममधून पलायन करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे ख्रिस्तासारखी मनोवृत्ती दाखवली?

[१९ पानांवरील चित्र]

यहोवाचे साक्षीदार खरे प्रेम कार्यांतून दाखवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत