व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला जीवनाचा अर्थ गवसला

मला जीवनाचा अर्थ गवसला

मला जीवनाचा अर्थ गवसला

गास्पार मार्टीनेस यांच्याद्वारे कथित

माझी गोष्ट म्हणजे गावाकडील एका साध्यासुध्या मुलाची गोष्ट आहे, ज्यानं शहरात येऊन धन कमवलं. पण मी कमवलेलं हे धन माझ्या अपेक्षेपेक्षा अगदीच वेगळं होतं. कसं, ते तुम्हाला माझी ही गोष्ट वाचल्यावर लक्षात येईल.

सन १९३० च्या दशकात, स्पेनच्या उत्तरेकडील भागात असलेल्या रियोहा या ओसाड ग्रामीण भागात मी लहानाचा मोठा झालो. दहा वर्षांचा असतानाच मला शाळा सोडावी लागली. पण, तोपर्यंत मी लिहायला-वाचायला शिकलो होतो. माझ्या सहा भावंडांसह मेंढरांची राखण करणं, आमच्या लहानशा शेतांत काम करणं यातच माझा वेळ जायचा.

गरीब असल्यामुळे पैसा, धनसंपत्तीच सर्वकाही असतं असं आम्हाला वाटू लागलं. ज्यांची घरची परिस्थिती आमच्यापेक्षा चांगली होती त्यांचा आम्हाला हेवा वाटायचा. असं असलं तरी, बिशपच्या अधिकाराखाली असलेल्या सबंध क्षेत्रात आमच्याच गावातले लोक “सगळ्यात धार्मिक” असल्याचं बिशपनं एकदा म्हटलं. अर्थात, यांपैकी अनेक जण लवकरच कॅथलिक धर्म सोडून देतील अशी कल्पनासुद्धा त्यावेळी त्यांनी केली नसावी.

चांगल्या जीवनाच्या शोधात

आमच्याच गावात राहणाऱ्‍या मर्सेथेस नावाच्या एका मुलीशी माझं लग्न झालं आणि आम्हाला एक मुलगाही झाला. जबाबदारी वाढल्यामुळे १९५७ मध्ये आम्ही जवळच्याच लोग्रोनियो शहरात स्थलांतर केलं आणि काही काळानं माझं पूर्ण कुटुंबच इथं राहायला आलं. लवकरच माझ्या लक्षात आलं, की माझ्याजवळ कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसल्यामुळं चांगल्या पगाराची नोकरी मिळणं जवळजवळ अशक्यच होतं. काय करावं सुचेना. मग तिथल्याच एका वाचनालयात जाऊन मी शोध करू लागलो. पण, कोणत्या विषयावर माहिती शोधावी हेसुद्धा मला माहीत नव्हतं.

नंतर एकदा, पत्र व्यवहारानं बायबल अभ्यासक्रम पूर्ण करण्याविषयीची बातमी मी रेडिओवर ऐकली. मी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर लागलीच प्रोटेस्टंटांच्या इव्हॅन्जेलिकल पंथाचे काही लोक मला भेटायला आले. त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेट दिल्यानंतर, पहिल्या दोनचार भेटींतच त्यांच्या प्रमुख सदस्यांची आपसांत चाललेली चढाओढ माझ्या लक्षात आली. त्यामुळं मी पुन्हा कधीच तिथं पाय ठेवला नाही आणि सगळेच धर्म असे असतील या निष्कर्षावर पोचलो.

माझे डोळे उघडले

सन १९६४ मध्ये एयूकेन्यो नावाचा एक तरुण आमच्या घरी आला. तो एक यहोवाचा साक्षीदार होता. या धर्माबद्दल मी पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. तरीसुद्धा, त्याच्याबरोबर बायबलविषयी चर्चा करण्यास मी आनंदानं तयार झालो. मला बायबलचं बऱ्‍यापैकी ज्ञान आहे असं मला वाटत होतं. जी थोडीफार वचनं मी माझ्या बायबल अभ्यासक्रमात शिकलो होतो त्यांचा उपयोग करून त्यानं विचारलेल्या प्रश्‍नांची मी उत्तरं दिली. प्रोटेस्टंट चर्चच्या शिकवणी बरोबर आहेत हे त्याला पटवून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण खरंतर, मला स्वतःलाच या शिकवणी कधी पटल्या नव्हत्या.

दोन वेळा सविस्तर चर्चा केल्यानंतर, देवाचं वचन हाताळण्यात एयूकेन्यो खरोखरच तरबेज आहे हे मला कबूल करावं लागलं. माझ्यापेक्षा कमी शिक्षण झालेलं असूनही तो कशी चुटकीसरशी वचनं काढून त्यांवर किती सुरेखपणे पटण्याजोगं स्पष्टीकरण देतो हे पाहून मी थक्क झालो. आपण शेवटल्या काळात जगत आहोत आणि लवकरच देवाचं राज्य या पृथ्वीचं रूपांतर एका नंदनवनात करेल या गोष्टी एयूकेन्योनं मला बायबलमधून दाखवल्या. हे ऐकून माझी जिज्ञासा आणखीनच वाढली.—स्तो. ३७:११, २९; यश. ९:६, ७; मत्त. ६:९, १०.

त्यामुळं मी बायबलचा अभ्यास करण्यास लगेच तयार झालो. खरंतर मी जे शिकत होतो ते सगळं माझ्यासाठी अगदीच नवीन होतं आणि या ज्ञानाचा माझ्या मनावर गहिरा प्रभाव पडला. जगण्याचा एक नवा अर्थ, एक नवी आशा मला सापडली होती. अखेर माझा शोध संपला होता. श्रीमंत होण्याचं स्वप्न आणि चांगली नोकरी मिळवण्याची माझी धडपड या सगळ्या गोष्टीही अगदीच निरर्थक वाटू लागल्या. जर आजारपण आणि मृत्यूसारख्या समस्याही देव नाहीशा करणार आहे, तर मग इतर समस्यांची काळजी करण्याची काय गरज?—यश. ३३:२४; ३५:५, ६; प्रकटी. २१:४.

बायबलमधून ज्या चांगल्या गोष्टी मी शिकत होतो त्यांबद्दल मी लगेच माझ्या नातेवाइकांना सांगू लागलो. पृथ्वीचं रूपांतर नंदनवनात करून त्यामध्ये विश्‍वासू मानवांना सर्वकाळचं जीवन देण्याच्या देवाच्या प्रतिज्ञांबद्दल मी त्यांना मोठ्या उत्साहानं सांगू लागलो.

माझ्या कुटुंबानंही बायबलचं सत्य स्वीकारलं

लवकरच, बायबलच्या प्रतिज्ञांविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही दहाबारा जण दर रविवारी दुपारी माझ्या काकांच्या घरी एकत्र येऊ लागलो. दर आठवडी दोन-तीन तासांपर्यंत आमची चर्चा चालायची. इतक्या सगळ्या लोकांना बायबलबद्दल आस्था आहे हे पाहून एयूकेन्योनं माझ्या नातेवाइकांपैकी प्रत्येक कुटुंबासोबत स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची व्यवस्था केली.

आमचे आणखी काही नातेवाईक सुमारे १२० किलोमीटर दूर असलेल्या डुरांगो नावाच्या छोट्याशा शहरात राहत होते. पण, या शहरात एकही यहोवाचा साक्षीदार नव्हता. म्हणून, तीन महिन्यांनंतर मी काही दिवसांची सुट्टी घेतली आणि मला गवसलेल्या नवीन विश्‍वासाबद्दल माझ्या नातेवाइकांना सांगण्यास त्यांच्या गावी गेलो. त्या वेळी, आम्ही दहा जण दररोज संध्याकाळी एकत्र यायचो आणि अगदी पहाटेपर्यंत मी त्यांच्यासोबत चर्चा करायचो. ते सगळेच जण शिकून घेण्यास खूप उत्सुक होते. मग, माझी घरी परतण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांना काही बायबल आणि बायबलवर आधारित मासिकं-पुस्तकं दिली. त्यानंतर आम्ही नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहिलो.

डुरांगोमध्ये पूर्वी कोणीही प्रचार कार्य केलं नव्हतं. तरीसुद्धा त्या ठिकाणी यहोवाचे साक्षीदार आले तेव्हा बायबल अभ्यास करण्यासाठी १८ लोक उत्सुकतेनं वाट पाहत असल्याचं त्यांना आढळलं. साक्षीदार बांधवांनी मग प्रत्येक कुटुंबाबरोबर स्वतंत्रपणे बायबल अभ्यास सुरू केला.

तोपर्यंत, बायबल अभ्यास करण्याविषयी मर्सेथेसनं फारशी आवड दाखवली नव्हती. बायबलच्या शिकवणी स्वीकारण्याची इच्छा नसल्यामुळं नव्हे तर फक्‍त लोकांच्या भीतीमुळं. त्या वेळी, स्पेनमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घालण्यात आली होती. हा नवीन धर्म स्वीकारल्यास आपल्या दोन मुलांना शाळेतून काढून टाकलं जाईल आणि लोक आपल्याला वाळीत टाकतील असं मर्सेथेसला वाटत होतं. पण, कुटुंबातले इतर सर्व सदस्य बायबलचं सत्य स्वीकारत आहेत हे पाहून तिलाही बायबलचा अभ्यास करावासा वाटू लागला.

अवघ्या दोन वर्षांत माझ्या कुटुंबातल्या ४० सदस्यांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला आणि ते साक्षीदार बनले. आता आमच्या सगळ्यांच्या जीवनात एकसारखाच उद्देश होता. आयुष्यात अत्यंत मौल्यवान असं काहीतरी मिळवल्याचं मला जाणवलं. यहोवाकडून अनेक आशीर्वाद लाभल्यामुळं आम्ही खऱ्‍या अर्थानं श्रीमंत झालो होतो.

जीवन अधिकाधिक समृद्ध होत गेलं

पुढची २० वर्षं मी माझ्या दोन मुलांचं संगोपन करण्याकडे आणि स्थानिक मंडळीला मदत करण्याकडे लक्ष दिलं. मी आणि मर्सेथेस पहिल्यांदा लोग्रोनियोमध्ये आलो होतो तेव्हा १,००,००० लोकसंख्या असलेल्या या शहरात केवळ २० साक्षीदार होते. काही काळातच मंडळीत माझ्यावर अनेक जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या.

मग वयाच्या ५६ व्या वर्षी, मी ज्या कारखान्यात कामाला होतो तो अचानक बंद पडला आणि मला माझी नोकरी गमवावी लागली. पूर्ण वेळची सेवा करण्याची माझी नेहमीच खूप खूप इच्छा होती. त्यामुळं समोर आलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन मी पायनियर सेवा हाती घेतली. मला मिळणारी पेन्शन अगदीच तुटपुंजी असल्यामुळं त्यावर भागवणं सोपं नव्हतं. मर्सेथेसनं साफसफाईची छोटीमोठी कामं करून मला हातभार लावला. त्यामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं शक्य झालं. शिवाय, आम्हाला कुठल्याच आवश्‍यक गोष्टीची कमतरता कधी भासली नाही. आजही मी पायनियर सेवा करत आहे. मर्सेथेससुद्धा अधूनमधून सहायक पायनियर सेवा करते. प्रचाराच्या कार्यातून तिला खूप आनंद मिळतो.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मर्चे नावाच्या एका स्त्रीला मर्सेथेस नेहमी आपली मासिकं वाचायला द्यायची. लहान असताना या स्त्रीनं बायबलचा अभ्यास केला होता. मर्चे ही मासिकं खूप आवडीनं वाचायची. मर्सेथेसला जाणवलं, की आजही या स्त्रीला बायबलच्या सत्याबद्दल खूप कदर आहे. शेवटी, मर्चेनं बायबलचा अभ्यास पुन्हा सुरू केला आणि ती चांगली प्रगती करू लागली. पण, तिचा नवरा बीथेन्ते याला दारूचं व्यसन असल्यामुळं तो कोणत्याच नोकरीत टिकत नसे. त्यामुळं, त्याच्याकडून मर्चेला काहीच आर्थिक मदत मिळत नव्हती. उलट, त्याच्या या व्यसनामुळं त्यांचं वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं.

बीथेन्तेनं माझ्याशी बोलावं असं माझ्या पत्नीनं मर्चेला सुचवलं. बऱ्‍याच भेटींनंतर शेवटी तो बायबलचा अभ्यास करण्यास तयार झाला. बीथेन्ते हळूहळू सुधरू लागला. सुरुवातीला सलग दोनचार दिवस त्यानं दारूला हातसुद्धा लावला नाही. मग, आठवडा-आठवडा तो दारू पीत नसे. शेवटी, त्याचं दारूचं व्यसन कायमचं सुटलं. त्याची तब्येत, राहणी बरीच सुधारली आणि त्याचं कौटुंबिक जीवनही सुधारलं. सध्या तो आपल्या कुटुंबासह कनेरी बेटांवर राहतो. तो, त्याची बायको आणि मुलगी तेथील मंडळीचे उत्साही सदस्य आहेत.

मागे वळून पाहताना

अनेक वर्षांपूर्वी बायबलचं सत्य शिकलेल्या माझ्या नातेवाइकांपैकी काही जण आज हयात नाहीत. तरीसुद्धा, इतर नातेवाईक चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहेत आणि देवानं आम्हाला भरपूर आशीर्वाद दिले आहेत. (नीति. १०:२२) ४० वर्षांपूर्वी ज्यांनी बायबलचा अभ्यास स्वीकारला होता त्यांपैकी जवळजवळ सगळेच जण आपल्या मुलाबाळांसह व नातवंडांसह अजूनही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत असल्याचं पाहून मला खूप समाधान वाटतं!

सत्यात असलेल्या माझ्या अनेक नातेवाइकांपैकी काही जण वडील, सेवा सेवक किंवा पायनियर म्हणून सेवा करत आहेत. माझा थोरला मुलगा व त्याची बायको स्पेनच्या माद्रिद शहरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहेत. मी यहोवाचा साक्षीदार बनलो तेव्हा स्पेनमध्ये ३,००० साक्षीदार होते. आज तिथं १,००,००० साक्षीदार आहेत. माझ्या पूर्ण वेळच्या सेवेत मी खूप आनंदी आहे आणि देवानं त्याच्या सेवेत माझा उपयोग केल्याबद्दल मी त्याचा मनस्वी आभारी आहे. माझं फारसं शिक्षण झालेलं नसलं, तरी मी वेळोवेळी बदली विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करतो.

काही वर्षांपूर्वी मला समजलं की मी ज्या गावात लहानाचा मोठा झालो ते आज अक्षरशः निर्जन झालंय. गरिबीमुळं लोकांना आपली घरंदारं, शेतीवाडी सर्वकाही सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पण, आनंदाची गोष्ट म्हणजे या स्थलांतर करणाऱ्‍यांपैकी अनेकांना आणि मला स्वतःला देखील आध्यात्मिक धन गवसलं आहे. आम्हाला कळून चुकलं, की जीवनात अर्थ आहे आणि यहोवाची सेवा करण्यातच सगळ्यात मोठा आनंद आहे.

[३२ पानांवरील चित्र]

बंधू मार्टीनेस यांच्या कुटुंबातले सत्यात असलेले जवळजवळ सर्व सदस्य