व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझा धर्म मी निवडावा की माझ्या पालकांनी?

माझा धर्म मी निवडावा की माझ्या पालकांनी?

माझा धर्म मी निवडावा की माझ्या पालकांनी?

“या धर्मात माझा जन्म झालाय आणि मरेपर्यंत मला याच धर्मात राहायचंय!” असे म्हणणारे अनेक लोक पोलंडमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना भेटतात. यावरून, धर्म म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्‍या पिढीला दिली जाणारी गोष्ट आहे असे त्यांचे मत असल्याचे दिसून येते. तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणीसुद्धा धर्माबद्दल लोकांचा हाच दृष्टिकोन आहे का? असा दृष्टिकोन बाळगल्याने सहसा काय घडते? धर्म निव्वळ औपचारिकतेची किंवा कौटुंबिक परंपरेची बाब बनते. यहोवाच्या साक्षीदारांपैकी ज्यांना आईवडिलांकडून किंवा आजीआजोबांकडून सत्याचा बहुमोल वारसा मिळाला आहे त्यांच्या बाबतीतही असे घडू शकते का?

तीमथ्यासाठी त्याचा धर्म केवळ औपचारिकतेची किंवा परंपरेची बाब नव्हती. हे खरे की त्याच्या आईने व आजीने त्याला खऱ्‍या देवावर विश्‍वास ठेवण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास शिकवले होते. त्यामुळे तीमथ्याला “बालपणापासूनच” पवित्र शास्त्राची माहिती होती. कालांतराने, आपल्या आई व आजीप्रमाणे तो या निष्कर्षावर पोचला की ख्रिस्ती विश्‍वास हेच सत्य आहे. शास्त्रवचनांतून त्याने येशू ख्रिस्ताविषयी जे काही ऐकले होते त्याबद्दल त्याची “खातरी झाली” होती. (२ तीम. १:५; ३:१४, १५) यावरून हे दिसून येते की आपल्या मुलांनी यहोवाचे उपासक बनावे म्हणून ख्रिस्ती आईवडील मनापासून प्रयत्न करत असले, तरी यहोवाचे उपासक बनण्याची इच्छा मुळात मुलांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.—मार्क ८:३४.

ख्रिस्ती विश्‍वासांविषयी प्रत्येक व्यक्‍तीची पटण्याजोग्या युक्‍तिवादाच्या साहाय्याने खातरी होणे आवश्‍यक आहे. तरच ती व्यक्‍ती यहोवावरील प्रेमापोटी त्याची सेवा करील आणि सर्व परिस्थितीत त्याला विश्‍वासू राहील. आणि तरच त्या व्यक्‍तीचा विश्‍वास मजबूत होईल व खोलवर मुळावलेला असेल.—इफिस. ३:१७; कलस्सै. २:६, ७.

मुलांची भूमिका

साक्षीदार कुटुंबात लहानाचे मोठे झालेले ॲल्बर्ट * म्हणतात: “यहोवाच्या साक्षीदारांचा धर्म खरा आहे असं पूर्वीपासूनच मला वाटायचं. पण मी असंच केलं पाहिजे, किंवा तसंच केलं पाहिजे असं जे ते सांगायचे ते मात्र मला अजिबात पटायचं नाही.” तुम्ही स्वतः एक युवक असल्यास कदाचित तुम्हालाही असेच वाटत असेल. पण, देव आपल्याकडून कशा प्रकारे जीवन जगण्याची अपेक्षा करतो हे जाणून घेण्याचा आणि मग आनंदाने त्याच्या या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येईल का? (स्तो. ४०:८) ॲल्बर्ट म्हणतात: “मी प्रार्थना करू लागलो. सुरुवातीला मला हे फार कठीण वाटलं. प्रार्थना करायला मला अक्षरशः स्वतःला भाग पाडावं लागलं. पण, काही काळातच मला जाणीव झाली, की मी आयुष्यात योग्य ते करण्याचा प्रयत्न केला तर मी यहोवाचं मन आनंदित करू शकतो. याच गोष्टीनं मला जीवनात आवश्‍यक बदल करण्याची प्रेरणा दिली.” तर मग, यहोवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोपासल्याने तुम्हीसुद्धा त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण करू शकता.—स्तो. २५:१४; याको. ४:८.

तुम्ही खेळलेल्या एखाद्या खेळाचा विचार करा. त्या खेळाचे नियम तुम्हाला माहीत नसतील किंवा तो खेळता येत नसेल तर तुम्हाला तो खेळ अगदीच कंटाळवाणा वाटेल. या उलट, तुम्ही खेळाचे नियम शिकून घेतले व तुम्हाला तो खेळ चांगल्यापैकी खेळता येऊ लागला तर त्याविषयीची तुमची उत्सुकता आपोआपच वाढणार नाही का? आणि पुन्हा पुन्हा तो खेळ खेळण्यासाठी तुम्ही संधी शोधणार नाही का? खऱ्‍या उपासनेतील कार्यांत सहभाग घेण्याविषयी देखील हेच खरे आहे. तेव्हा, ख्रिस्ती सभांची चांगली तयारी करा. आणि सर्व ख्रिस्ती कार्यांत उत्साहाने सहभाग घ्या. कारण तुम्ही वयाने लहान असलात तरीही तुमच्या उत्तम उदाहरणामुळे इतरांना उत्तेजन मिळू शकते.—इब्री १०:२४, २५.

तुमच्या विश्‍वासाविषयी इतरांना सांगण्याच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. हे कार्य देखील बळजबरीने नव्हे तर प्रेमापोटी करणे जरुरीचे आहे. तेव्हा, स्वतःला असे विचारा: ‘मला इतरांना यहोवाविषयी सांगावंसं का वाटतं? कोणत्या कारणांमुळं माझं यहोवावर प्रेम आहे?’ यहोवाची एक प्रेमळ पिता या नात्याने तुम्हाला ओळख होणे गरजेचे आहे. यिर्मयामार्फत यहोवाने म्हटले: “तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन.” (यिर्म. २९:१३, १४) यहोवाचा जिवेभावे शोध घेण्यासाठी तुम्हाला कदाचित काय करावे लागेल? याकूप म्हणतो: “मला माझी विचारसरणी बदलावी लागली. लहानपणापासून मी सभांना जायचो, क्षेत्र सेवेतही जायचो. पण, या सगळ्या गोष्टी मी केवळ करायच्या म्हणून करत होतो. मला यहोवाची चांगल्या प्रकारे ओळख झाली आणि त्याच्यासोबत मी जवळचा नातेसंबंध जोडला तेव्हा कुठं मी सत्यात उत्साही बनलो.”

सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्‍या मित्रमैत्रिणींचा प्रोत्साहनदायक सहवास असल्यास तुमची सेवा अधिक आनंददायक होऊ शकते. एक देवप्रेरित नीतिसूत्र म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.” (नीति. १३:२०) तेव्हा, जे आपल्या जीवनात आध्यात्मिक ध्येये ठेवतात व यहोवाची सेवा करण्यास ज्यांना आनंद वाटतो अशांशी मैत्री करा. योला म्हणते: “आध्यात्मिक मनोवृत्तीच्या अनेक तरुणांचा सहवास माझ्यासाठी फार लाभदायक ठरला. मी नियमितपणे आणि मोठ्या आनंदाने सेवेत सहभाग घेऊ लागले.”

आईवडिलांची भूमिका

योला म्हणते: “माझ्या आईवडिलांनी मला यहोवाबद्दल शिकवलं याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे.” खरोखर, मुलांच्या आवडीनिवडींवर पालक खूप प्रभाव पाडू शकतात. प्रेषित पौलाने लिहिले: “बापांनो, . . . प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात [तुमच्या मुलांना] वाढवा.” (इफिस. ६:४) या देवप्रेरित सल्ल्यावरून स्पष्ट दिसून येते, की पालकांनी आपल्या मुलांना स्वतःचे नव्हे तर यहोवाचे मार्ग शिकवले पाहिजे. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा मुलांवर लादण्याऐवजी यहोवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे ध्येय ठेवण्यास त्यांची मदत करणे किती उत्तम ठरेल!

तुम्ही तुमच्या मुलांच्या मनावर “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता” यहोवाचे शिक्षण बिंबवू शकता. (अनु. ६:६, ७) ईवा आणि रिशार्ड यांना तीन मुले आहेत. ते सांगतात: “निरनिराळ्या स्वरूपाच्या पूर्ण वेळच्या सेवेविषयी आम्ही नेहमी खूप भरभरून बोलायचो.” याचा परिणाम काय झाला? “अगदी कोवळ्या वयातच आमच्या मुलांनी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवण्याची इच्छा व्यक्‍त केली. नंतर ते प्रचारक बनले आणि बाप्तिस्मा घेण्याचा निर्णयही त्यांनी स्वतःच घेतला. पुढे ते सर्व पूर्ण वेळचे सेवक बनले.”

पालकांचे उत्तम उदाहरण खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, रिशार्ड म्हणतात: “घरात एक आणि मंडळीत एक, असं दुटप्पी वागणं आम्ही कटाक्षानं टाळलं.” तेव्हा स्वतःला असे विचारा: ‘माझ्या वागण्यातून माझ्या मुलांना काय दिसतं? मी यहोवावर मनापासून प्रेम करत असल्याचं त्यांना दिसतं का? माझ्या प्रार्थनांमधून आणि माझ्या वैयक्‍तिक अभ्यासाच्या नियमितपणावरून त्यांना हे प्रेम पाहायला मिळतं का? क्षेत्र सेवा, मनोरंजन आणि भौतिक गोष्टी यांप्रती असलेल्या माझ्या मनोवृत्तीवरून, तसेच मंडळीतल्या बंधूभगिनींविषयी मी जे काही बोलतो/बोलते त्यावरून त्यांना यहोवावर असलेलं माझं प्रेम दिसून येतं का?’ (लूक ६:४०) दैनंदिन जीवनात तुम्ही कसे वागता याकडे मुलांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे तुमच्या बोलण्यात व वागण्यात तफावत असल्यास हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

मुलांचे संगोपन करत असताना त्यांना शिस्त लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, बायबल आपल्याला सांगते, की “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे.” (नीति. २२:६) या विषयावर बोलताना ईवा आणि रिशार्ड म्हणतात: “आमच्या प्रत्येक मुलासोबत आम्ही वेगळा बायबल अभ्यास करायचो.” अर्थात, आपल्या प्रत्येक मुलासोबत असा वेगळा अभ्यास करणे जरुरीचे आहे की नाही हे आईवडिलांनी ठरवावे. महत्त्वाची गोष्ट ही की प्रत्येक मुलाला वैयक्‍तिक लक्ष मिळाले पाहिजे. यासाठी, ताठर भूमिका न घेणे आणि समंजस असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, विशिष्ट प्रकारचे संगीत वाईट आहे असे मुलांना सांगण्याऐवजी, योग्य निर्णय कसे घ्यावेत आणि हे निर्णय घेताना कोणती बायबल तत्त्वे लक्षात घ्यावीत हे त्यांना दाखवा.

तुम्हाला तुमच्या मुलांकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे त्यांना अचूकपणे माहीत असेल आणि त्याप्रमाणे ते वागतही असतील. पण, मुलांच्या अंतःकरणात काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. “मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढितो,” हे लक्षात असू द्या. (नीति. २०:५) तेव्हा, मुलांच्या मनात सत्याबद्दल अजूनही काही शंका असल्याचे चिन्ह दिसते का याबद्दल जागरूक असा आणि त्यांचे निरसन करण्यासाठी लगेच योग्य पाऊल उचला. मुलांवर दोषारोप न लावता तुम्हाला त्यांच्याबद्दल कळकळ आहे हे दाखवा आणि उचित प्रश्‍न विचारा. पण, खोदून खोदून प्रश्‍न विचारू नका. तुम्हाला त्यांच्याबद्दल मनस्वी कळकळ आहे हे त्यांना जाणवल्यास ते नक्कीच प्रतिसाद देतील आणि यामुळे त्यांना मदत करणे तुम्हाला सोपे जाईल.

मंडळीची भूमिका

देवाचे उपासक या नात्याने तुम्ही तुमच्या मंडळीतील युवकांना, त्यांना लाभलेल्या आध्यात्मिक वारशाची कदर करण्यास मदत करू शकता का? मुलांना तालीम देणे ही प्रामुख्याने पालकांची जबाबदारी असली तरी मंडळीतील इतर सदस्य आणि विशेषतः वडील, त्यांना या बाबतीत मदत करू शकतात. खासकरून, ज्या कुटुंबात केवळ एक पालक सत्यात आहे अशा कुटुंबातील मुलांना मदत करणे महत्त्वाचे आहे.

मंडळीतील युवकांना यहोवावर प्रेम करण्यास मदत करण्यासाठी आणि मंडळीत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे व त्यांची कदर केली जाते याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी वडीलजन काय करू शकतात? पोलंडमधील एका मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे मार्यूश म्हणतात: “तरुणांशी संवाद साधणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि केवळ समस्या उद्‌भवतात तेव्हाच नव्हे तर इतर प्रसंगी देखील म्हणजे सेवाकार्य करताना, ख्रिस्ती सभांनंतर किंवा सहज गप्पा मारताना वडिलांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” उदाहरणार्थ, मंडळीबद्दल तुम्हाला काय वाटते असे ते युवकांना विचारू शकतात. मनमोकळेपणाने केलेल्या अशा संभाषणामुळे युवकांना मंडळीबद्दल आपुलकी वाटू लागेल आणि आपण या मंडळीचा भाग आहोत ही भावना त्यांच्या मनात रुजण्यास मदत मिळेल.

तुम्ही एक वडील असल्यास तुमच्या मंडळीतील युवकांशी मैत्री करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का? उदाहरणार्थ, आधी उल्लेख केलेले ॲल्बर्ट सध्या वडील म्हणून सेवा करत असले, तरी तारुण्यावस्थेत पदार्पण करत असताना त्यांना बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागले होते. ते म्हणतात: “किशोरावस्थेत असताना, मंडळीतल्या एखाद्या वडिलांनी खास मला मेंढपाळ भेट द्यावी असं मला खूप वाटायचं.” युवकांनी यशस्वीपणे देवाची सेवा करावी व त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडावा म्हणून वडीलजन त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याद्वारे देखील त्यांच्याबद्दल असलेली आत्मीयता दाखवू शकतात.—२ तीम. १:३, ४.

ख्रिस्ती कार्यहालचालींत आवेशाने सहभाग घेतल्याने युवकांना खूप फायदा होतो. अन्यथा, ते सांसारिक ध्येयांवर आपले लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. मंडळीतील वयाने मोठे असलेल्या बंधूभगिनींना क्षेत्र सेवेत त्यांच्यासोबत कार्य करून त्यांच्याशी मैत्री करता येईल का? त्यांच्या सहवासात निवांतपणे वेळ घालवल्याने तुम्हाला त्यांच्यासोबत भरवशाचे व मैत्रीचे संबंध जोडता येतील. योला सांगते: “एका पायनियर बहिणीने माझ्याबद्दल खास आस्था दाखवली. तिच्यासोबतच मी पहिल्यांदा, केवळ जावे लागते म्हणून नव्हे तर स्वतःच्या इच्छेने प्रेरित होऊन प्रचार कार्याला गेले.”

तुमची स्वतःची निवड

मुलांनो स्वतःला विचारा: ‘जीवनात माझी ध्येयं काय आहेत? माझा अद्याप बाप्तिस्मा झालेला नसेल तर बाप्तिस्मा घेण्याचे ध्येय मी आपल्यासमोर ठेवले आहे का?’ अर्थात, बाप्तिस्मा घेण्याचा तुमचा निर्णय कौटुंबिक परंपरा पुढे चालवण्याच्या इच्छेवर नव्हे, तर यहोवावरील तुमच्या मनस्वी प्रेमावर आधारित असला पाहिजे.

तुम्ही यहोवाला आपला खरा मित्र आणि सत्याला बहुमोल मानावे हीच आमची सदिच्छा आहे. यशया संदेष्ट्यामार्फत यहोवाने म्हटले: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.” जोपर्यंत तुम्ही यहोवाचे मित्र राहाल तोपर्यंत तो तुमच्या पाठीशी राहील. तो तुम्हाला बळ देईल आणि ‘आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुम्हाला आधार देईल.’—यश. ४१:१०, पं.र.भा.

[तळटीप]

^ परि. 6 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[४ पानांवरील चित्र]

तुमच्या मुलाच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करा

[६ पानांवरील चित्र]

बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय यहोवावरील मनस्वी प्रेमावर आधारित असला पाहिजे