व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौटुंबिक उपासना बचावाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण!

कौटुंबिक उपासना बचावाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण!

कौटुंबिक उपासना बचावाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण!

‘देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ किती भयंकर असेल याची कल्पना करू शकता का तुम्ही? (प्रकटी. १६:१४) त्या लढाईचे मीखा संदेष्ट्याने अलंकारिक भाषेत असे वर्णन केले: “पर्वत विरघळतील, आणि खोरी फाटून जातील; जसे मेण अग्नीपुढे वितळते, जशी उंच स्थानावरून खाली ओतलेली जले वाहतात तशी ती होतील.” (मीखा १:४, पं.र.भा.) त्या वेळी, जे लोक यहोवाची उपासना करत नाहीत अशांची काय अवस्था होईल? देवाचे वचन म्हणते: “त्या दिवशी परमेश्‍वराने संहारिलेले, पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील.”—यिर्म. २५:३३.

जवळच्या भविष्यात घडणाऱ्‍या या घटनांची आधीच सूचना मिळाल्यामुळे कुटुंब प्रमुखांनी—ज्यांपैकी अनेक एकटे पालक आहेत—जाणत्या वयाच्या आपल्या मुलांविषयी स्वतःला असा प्रश्‍न विचारणे जरुरीचे आहे की, ‘येणाऱ्‍या मोठ्या संकटातून ती वाचतील का?’ तुमची मुले त्यांच्या वयानुसार आध्यात्मिक रीत्या उत्साही, सुदृढ असली तर ती नक्कीच वाचतील असे आश्‍वासन बायबल देते.—मत्त. २४:२१.

कौटुंबिक उपासनेसाठी एक ठराविक वेळ असणे महत्त्वाचे

आईवडील या नात्याने आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. (इफिस. ६:४) मुलांसोबत बायबलचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पौलाने फिलिप्पै येथील ज्या बांधवांच्या आज्ञाधारक वृत्तीची प्रशंसा केली त्यांच्याप्रमाणे आपल्या मुलांनी असावे असे आपणा सर्वांनाच वाटते. पौलाने त्यांना लिहिले: “माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसतानाहि, भीत व कापत आपले तारण साधून घ्या.”—फिलिप्पै. २:१२.

तुमची मुले तुमच्या पाठीमागे देखील यहोवाच्या नीतीनियमांचे पालन करतात का? उदाहरणार्थ, शाळेत असताना ते कसे वागतात? यहोवाचे नीतिनियम आपल्याच भल्यासाठी आहेत याची खात्री पटल्यास मुले तुमच्या पाठीमागे देखील देवाच्या नीतिनियमांनुसार वागतील. पण, तुम्हाला त्यांना ही खातरी कशी पटवून देता येईल?

अशा प्रकारचा विश्‍वास तुमच्या मुलांच्या मनात निर्माण करण्यासाठी कौटुंबिक उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. कौटुंबिक बायबल अभ्यास यशस्वीपणे चालवण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांची आता आपण चर्चा करू या.

नियमितपणा राखा

ईयोब १:६ मध्ये “एक दिवस” असे जे म्हटले आहे त्याचा बायबलच्या मूळ भाषेत नियुक्‍त वेळी असा अर्थ होतो. यावरून दिसून येते, की देवपुत्रांना नियुक्‍त वेळी देवासमोर येण्याचे आमंत्रण दिले जाते. तुमच्या मुलांच्या बाबतीतही तुम्ही हेच करू शकता. आठवड्यातला एक विशिष्ट दिवस व एक विशिष्ट वेळ कौटुंबिक उपासनेसाठी राखून ठेवा व त्यास जडून राहा. शिवाय, काही कारणास्तव अभ्यास चुकण्याची शक्यता असल्यास दुसरी एक वेळसुद्धा आधीच ठरवून घ्या.

काही काळानंतर, कौटुंबिक उपासनेच्या बाबतीत ‘जमले तर जमले नाहीतर राहिले’ अशी वृत्ती येऊ देऊ नका. हे कधीही विसरू नका, की तुमचे सगळ्यात महत्त्वाचे बायबल विद्यार्थी तुमची मुलेच आहेत. पण, सैतान मात्र त्यांना आपले लक्ष्य बनवण्यास टपलेला आहे. (१ पेत्र ५:८) म्हणूनच, तुमच्या कौटुंबिक उपासनेची ही अत्यंत महत्त्वाची संध्याकाळ तुम्ही टीव्ही पाहण्यात किंवा काही किरकोळ कामे करण्यात घालवली तर सैतानाने तुमच्यावर विजय मिळवला असे समजा.—इफिस. ५:१५, १६; ६:१२; फिलिप्पै. १:१०.

व्यवहारोपयोगी माहितीचा समावेश करा

कौटुंबिक उपासना म्हणजे केवळ ज्ञानात भर घालणे नव्हे. तर ती व्यवहारोपयोगी असली पाहिजे. तुम्हाला हे कसे करता येईल? त्यासाठी अशा काही विषयांची निवड करा ज्यांचा येणाऱ्‍या दिवसांत तुमच्या मुलाला उपयोग करता येईल. उदाहरणार्थ, क्षेत्रात संभाषण कसे करावे याचा तुम्ही सराव करू शकता. सहसा, मुलांना जी गोष्ट चांगली जमते ती वारंवार करण्यास ते उत्सुक असतात. क्षेत्र सेवेत संभाषण कसे सुरू करावे आणि घरमालकाने विचारलेल्या प्रश्‍नांचे समाधानकारक उत्तर कसे द्यावे यांचा सराव केल्याने निरनिराळ्या मार्गांनी प्रचार कार्य करण्याचा आत्मविश्‍वास त्यांच्यात निर्माण होईल.—२ तीम. २:१५.

मित्रमैत्रिणींकडून येणाऱ्‍या दबावाचा सामना कसा करता येईल याचाही तुम्ही कौटुंबिक उपासनेच्या वेळी सराव करू शकता. तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकातील ९ व्या अध्यायाची तुम्ही चर्चा करू शकता. याच अध्यायात पृष्ठे ७६-७७ वर “मी कशी प्रतिक्रिया दाखवेन?” या शीर्षकाखाली तुमच्या मुलासमोर येऊ शकतील अशा काही प्रसंगांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे काल्पनिक प्रसंग तुमच्या मुलांना विचार करण्यास प्रवृत्त करतील. अशा प्रकारचे प्रसंग उद्‌भवल्यास ते कशा प्रकारची प्रतिक्रिया दाखवतील याचा ते तुमच्यासोबत सराव करू शकतात. वेळोवेळी अशा प्रकारचे सराव तुमच्या कौटुंबिक उपासनेत समाविष्ट करणे तुम्हाला शक्य आहे का?

पालकांना मुलांच्या मनावर आध्यात्मिक ध्येयांचे महत्त्व ठसवण्याची उत्तम संधी कौटुंबिक उपासनेच्या वेळी मिळते. याविषयी तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकातील “मी कोणती कारकीर्द निवडावी?” या २२ व्या अध्यायात उपयुक्‍त माहिती दिली आहे. या अध्यायाची चर्चा करताना मुलांना हे समजण्यास मदत करा की जीवनात यहोवाची उपासना केंद्रस्थानी ठेवणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. पायनियर सेवा किंवा बेथेलमध्ये सेवा करण्याची, सेवा प्रशिक्षण प्रशालेस उपस्थित राहण्याची अथवा इतर स्वरूपाची पूर्ण-वेळ सेवा करण्याची इच्छा तुमच्या मुलाच्या मनात उत्पन्‍न करा.

असे करताना दक्षता बाळगण्याची एक गोष्ट म्हणजे: आपल्या मुलाने कोणती आध्यात्मिक ध्येये गाठावीत यावर काही पालक खूप भर देतात आणि यामागील त्यांचे हेतूही चांगलेच असतील. पण, यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी सध्या जे काही करत आहेत त्याकडे आईवडिलांचे दुर्लक्ष होते. अर्थात बेथेल सेवा व मिशनरी सेवा यांसारखी उत्तम ध्येये ठेवण्याचे प्रोत्साहन मुलांना देणे ही चांगली गोष्ट आहे. पण, तुमच्या अपेक्षांमुळे तुमचे मूल चिरडीस येणार नाही किंवा खिन्‍न होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. (कलस्सै. ३:२१) तुमच्या मुलाने किंवा मुलीने तुमच्या आग्रहाखातर नव्हे तर स्वच्छेने यहोवावर प्रेम केले पाहिजे हे नेहमी लक्षात असू द्या. (मत्त. २२:३७) तेव्हा, तुमचे मूल जे करत नाही त्यावर लक्ष देण्याऐवजी सध्या ते जे काही करत आहे त्याबद्दल त्याची वेळोवेळी प्रशंसा करा. यहोवाने आपल्यावर केलेल्या सर्व उपकारांची कदर बाळगण्यास त्याला शिकवा. असे केल्यास, तुमचे मूल यहोवाच्या चांगुलपणाला स्वतःहून प्रतिसाद देईल.

आनंददायक बनवा

कौटुंबिक उपासना यशस्वीपणे करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे ती आनंददायक बनवणे. तुम्हाला हे कसे करता येईल? कधीकधी तुम्ही बायबल आधारित ऑडिओ ड्रामा ऐकू किंवा पाहू शकता आणि यहोवाच्या साक्षीदारांनी बनवलेल्या व्हीडिओंची चर्चा करू शकता. किंवा मग, बायबलच्या एखाद्या उताऱ्‍यातील वेगवेगळ्या पात्रांचे संवाद एकेका सदस्याला नेमून त्या उताऱ्‍याचे तुम्ही वाचन करू शकता.

टेहळणी बुरूज नियतकालिकातील काही सदर कौटुंबिक चर्चेकरता अतिशय उपयुक्‍त आहेत. उदाहरणार्थ, अधूनमधून टेहळणी बुरूज नियताकिलकाच्या सार्वजनिक आवृत्तीत “आमच्या तरुण मित्रांकरता” आणि लहान मुलामुलींसाठी “आपल्या मुलांना शिकवा” हा अभ्यास प्रकल्प येत असतो.

सावध राहा! नियतकालिकाच्या जुन्या अंकांतील “तरुण लोक विचारतात” हे सदर तसेच, तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे हे पुस्तक किशोरवयीन मुलांच्या आईवडिलांना अतिशय उपयोगी ठरू शकते. तरुणांचे प्रश्‍न या पुस्तकात प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दिलेल्या “चर्चेसाठी प्रश्‍न” या चौकटीचा कौटुंबिक चर्चेसाठी आवर्जून उपयोग करा.

पण, कौटुंबिक उपासनेच्या वेळी आपल्या मुलांची उलटतपासणी करण्याचा प्रयत्न करू नका. “चर्चेसाठी प्रश्‍न” या चौकटीविषयी सदर पुस्तकाच्या प्रस्तावनेत पृष्ठ ७ वर असे म्हणण्यात आले आहे: “हे प्रश्‍न प्रत्येक परिच्छेदाचे परीक्षण करण्यासाठी बनवलेले नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या मुलांची परीक्षा घेण्याचे ते माध्यम नाहीत. तर युवकांमध्ये आणि पालकांमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी ते बनवलेले आहेत.” तेव्हा, मुलांना आपले वैयक्‍तिक मत व्यक्‍त करण्यास वाव देणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास बळजबरी करू नका.

तुम्ही तुमची कौटुंबिक उपासना नियमित, व्यवहारोपयोगी व आनंददायक बनवण्याचा प्रयत्न केल्यास यहोवा नक्कीच तुमचे प्रयत्न आशीर्वादित करील. खास तुमच्या कुटुंबासाठी राखलेल्या या वेळेमुळे तुमच्या प्रिय कौटुंबिक सदस्यांना आध्यात्मिक रीत्या उत्साही व सुदृढ राहण्यास मदत मिळेल.

[३१ पानांवरील चौकट]

कल्पकता दाखवा

“आमच्या लहान मुलींसोबत अभ्यास करताना मी व माझे पती सभेत अभ्यासल्या जाणाऱ्‍या लेखाची आधी चर्चा करायचो आणि मग त्या पाठातून काय शिकायला मिळतं याचं चित्र रेखाटण्यास आमच्या मुलींना सांगायचो. काही वेळा, आम्ही बायबल दृश्‍यांचं नाट्यरूपांतर करायचो किंवा क्षेत्र सेवेत संभाषण कसं सुरू करावं याचा सराव करायचो. त्यांचं वय, त्यांची आवड लक्षात ठेवून आम्ही अभ्यास नेहमी आनंदी व मजेशीर ठेवायचो.”—जे.एम., अमेरिका

“बायबलच्या काळात कशा प्रकारे गुंडाळ्यांचा उपयोग केला जायचा हे आमच्या एका बायबल विद्यार्थ्याच्या मुलाला समजावून सांगण्यासाठी आम्ही बायबलच्या यशया पुस्तकाचे अध्याय आणि वचनांचे आकडे वगळून त्याच्या प्रिंटआउट काढल्या. त्यानंतर आम्ही सर्व पानं एकमेकांना जोडली आणि वरच्या व खालच्या टोकाला दोन नळ्या चिकटवल्या. मग, येशूने नासरेथाच्या सभास्थानात जसं केलं तसंच या मुलानेही करण्याचा प्रयत्न केला. लूक ४:१६-२१ मधील वृत्तान्त म्हणतो, की येशूने ‘यशया संदेष्टाचा ग्रंथपट [गुंडाळी] उलगडला’ आणि त्याला जो उतारा वाचायचा होता तो त्याने काढला. (यश. ६१:१, २) पण, अध्याय व वचनांचे आकडे नसलेल्या त्या लांब गुंडाळीतून यशयाचा ६१ वा अध्याय शोधून काढणं त्या मुलाला फार कठीण गेलं. येशू किती कुशलतेनं गुंडाळ्या हाताळू शकत होता हे समजल्यामुळे तो मुलगा इतका प्रभावित झाला की त्याने म्हटले: ‘खरंच, येशू महान होता!’”—वाय. टी., जपान.

[३० पानांवरील चित्र]

सराव सत्रांमुळे मुले मित्रमैत्रिणींच्या दबावाला तोंड देण्यास सज्ज होऊ शकतात

[३१ पानांवरील चित्र]

कौटुंबिक उपासना नेहमी आनंददायक बनवण्याचा प्रयत्न करा