व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुम्ही माझे मित्र आहा”

“तुम्ही माझे मित्र आहा”

“तुम्ही माझे मित्र आहा”

“मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.”—योहा. १५:१४.

१, २. (क) येशूचे मित्र कोणकोणत्या पार्श्‍वभूमीतून आले होते? (ख) आपण येशूचे मित्र असणे का आवश्‍यक आहे?

माडीवरच्या खोलीत येशूसोबत असलेले त्याचे शिष्य वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीतून आले होते. पेत्र आणि अंद्रिया हे दोघे भाऊ मासेमार होते. मत्तयाचा पूर्वी जकात वसूल करणे हा पेशा होता, जो यहुदी लोकांच्या दृष्टीत तिरस्करणीय होता. त्यांच्यापैकी याकोब आणि योहान हे येशूला लहानपणापासून ओळखत असतील. तर, नथनेलासारखे इतर जण, केवळ काही वर्षांपासून त्याला ओळखत असतील. (योहा. १:४३-५०) तरीसुद्धा, वल्हांडण सणाच्या त्या महत्त्वपूर्ण रात्री जेरूसलेममध्ये एकत्र जमलेल्या त्या सर्वांच्या मनात याविषयी कोणतीही शंका नव्हती की येशू हाच मशीहा व जिवंत देवाचा पुत्र आहे. (योहा. ६:६८, ६९) त्यामुळे, येशूचे पुढील शब्द ऐकून त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा: “मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.”—योहा. १५:१५.

येशूने आपल्या प्रेषितांना म्हटलेले हे शब्द आज प्रामुख्याने सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होतात. आणि व्यापक अर्थाने त्यांचे साथीदार असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांनाही’ लागू होतात. (योहा. १०:१६) आपली पार्श्‍वभूमी कोणतीही असो, येशूचे मित्र असण्याचा सन्मान आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्याच्याशी आपली मैत्री असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याचे मित्र बनल्याने आपण यहोवाचे देखील मित्र बनतो. खरेतर, आधी येशूजवळ आल्याशिवाय, यहोवाजवळ येणे शक्यच नाही. (योहान १४:६, २१ वाचा.) तर मग, येशूचे मित्र बनण्यासाठी आणि ही मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्याआधी, चांगला मित्र असण्याविषयी येशूच्या उदाहरणाचे परीक्षण करू या. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्या मैत्रीला ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यावरून आपल्याला काय शिकता येईल हे आपण पाहू या.

चांगला मित्र असण्याबद्दल येशूचे उदाहरण

३. लोक येशूला काय म्हणून ओळखायचे?

“श्रीमंताला चाहणारे बहुत असतात,” असे सुज्ञ राजा शलमोन याने लिहिले. (नीति. १४:२०) हे शब्द अपरिपूर्ण मानवांच्या सर्वसामान्य प्रवृत्तीवर प्रकाश टाकतात. ती म्हणजे, इतरांना काय देता येईल याच्या आधारावर नव्हे, तर इतरांकडून काय प्राप्त करता येईल याच्या आधारावर मैत्री करणे. येशूमध्ये अशा प्रकारची अयोग्य प्रवृत्ती नव्हती. लोकांची आर्थिक स्थिती किंवा समाजातील त्यांची प्रतिष्ठा पाहून त्याने त्यांच्याशी मैत्री केली नाही. येशूने एका प्रतिष्ठित तरुण अधिकाऱ्‍यावर प्रीती केली आणि त्याला आपला अनुयायी होण्याचे आमंत्रण दिले हे खरे आहे. पण, त्याने त्या माणसाला आपले होते नव्हते ते सर्व विकायला व गोरगरिबांत वाटायला सांगितले. (मार्क १०:१७-२२; लूक १८:१८, २३) धनाढ्य व प्रतिष्ठित लोकांशी लागेबांधे असणारा नव्हे, तर दीनदुबळ्यांना जवळ करणारा म्हणून लोक येशूला ओळखत होते.—मत्त. ११:१९.

४. येशूच्या मित्रांमध्ये दोष होते असे का म्हणता येईल?

अर्थात, येशूच्या मित्रांत अनेक दोष होते. उदाहरणार्थ, काही प्रसंगी पेत्राने देवाच्या दृष्टिकोनातून विचार केला नाही. (मत्त. १६:२१-२३) याकोब आणि योहान यांनी येशूजवळ देवाच्या राज्यात प्रमुख स्थाने मागण्याद्वारे त्यांच्यात प्रतिष्ठेची हाव असल्याचे दाखवले. त्यांच्या या मनोवृत्तीमुळे इतर प्रेषितांना त्यांचा राग आला. आपल्यापैकी मोठा कोण यावरून त्यांच्यात सतत वाद होत राहिले. पण, येशूने त्यांच्यावर रागावण्याऐवजी त्यांची चुकीची विचारसरणी सुधारण्याचा अगदी धीराने प्रयत्न केला.—मत्त. २०:२०-२८.

५, ६. (क) येशूने बहुतेक प्रेषितांशी मैत्री का टिकवून ठेवली? (ख) येशूने यहूदाशी मैत्री का तोडली?

येशूच्या शिष्यांमध्ये दोष असूनही त्याने त्यांच्याशी मैत्री का टिकवून ठेवली? आपल्या मित्रांचे हे दोष येशूला दिसत नव्हते किंवा तो त्यांकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत होता अशातला भाग नाही. तर, त्याने त्यांच्या चांगल्या हेतूंवर आणि त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केले. उदाहरणार्थ, येशूला तोंड द्याव्या लागलेल्या सर्वात कठीण परीक्षेच्या वेळी पेत्र, याकोब आणि योहान त्याचे मनोबल वाढवण्याऐवजी झोपी गेले. यामुळे साहजिकच येशू निराश झाला. पण अशा वेळीसुद्धा, मुळात त्यांचे हेतू वाईट नव्हते हे लक्षात घेऊन येशूने म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.”—मत्त. २६:४१.

या उलट, येशूने यहूदा इस्कर्योतसोबतची आपली मैत्री तोडली. यहूदाने येशूचा मित्र असल्याचा आव आणला, तरीही आपल्या या जुन्या सोबत्याचे मन आता कपटी बनले आहे हे येशूने ओळखले. यहूदाने जगाशी मैत्री केल्यामुळे तो देवाचा वैरी बनला होता. (याको. ४:४) त्यामुळे, यहूदाला बाहेर घालवल्यानंतरच येशूने बाकीच्या ११ विश्‍वासू प्रेषितांना आपल्या मैत्रीचे आश्‍वासन दिले.—योहा. १३:२१-३५.

७, ८. येशूने आपल्या मित्रांवरील प्रेम कशा प्रकारे व्यक्‍त केले?

येशू आपल्या विश्‍वासू मित्रांच्या दोषांवर लक्ष केंद्रित न करता, नेहमी त्यांच्या कल्याणासाठी झटला. उदाहरणार्थ, त्यांच्या परीक्षांच्या वेळी त्यांचे संरक्षण करावे म्हणून त्याने पित्याला प्रार्थना केली. (योहान १७:११ वाचा.) येशूने त्यांच्या शारीरिक दुर्बलतांची जाण राखली. (मार्क ६:३०-३२) आणि केवळ आपले विचार त्यांना सांगण्यास नव्हे, तर त्यांचे विचार व भावना काय आहेत हे ऐकून व समजून घेण्यासही तो उत्सुक होता.—मत्त. १६:१३-१६; १७:२४-२६.

येशूने आपले जीवन मित्रांच्या भल्याकरता वाहून घेतले आणि शेवटी मित्रांकरता त्याने मृत्यूलाही कवटाळले. हे खरे आहे की आपल्या पित्याच्या न्यायी स्तरांची पूर्तता करण्यासाठी त्याने मरण पत्करले. (मत्त. २६:२७, २८; इब्री ९:२२, २८) पण, आपल्या जीवनाचे बलिदान देण्याद्वारे येशूने मानवजातीवरील आपले प्रेमही व्यक्‍त केले. त्याने म्हटले: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.”—योहा. १५:१३.

येशूच्या मैत्रीला शिष्यांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला?

९, १०. येशूच्या उदारतेबद्दल लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

येशूने लोकांसाठी भरपूर वेळ दिला, त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आणि जे काही त्याच्याजवळ होते ते त्याने त्यांच्या भल्याकरता उपयोगात आणले. परिणामस्वरूप, लोकांना तो अधिक जवळचा वाटला आणि त्यांनीही स्वखुशीने त्याच्यासाठी पुष्कळ काही केले. (लूक ८:१-३) येशू स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर असे म्हणू शकला: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”—लूक ६:३८.

१० अर्थात, काहींनी येशूकडून काही मिळवावे या स्वार्थी हेतूनेच त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. स्वतःस येशूचे मित्र म्हणवणारे हे लोक, त्याच्या एका विधानावरून गैरसमज झाल्यामुळे त्याला सोडून गेले. येशूवर भरवसा ठेवण्याऐवजी त्यांनी लगेच चुकीचा निष्कर्ष काढला आणि त्याला अनुसरण्याचे सोडून दिले. या उलट, त्याचे प्रेषित त्याच्याशी एकनिष्ठ राहिले. येशूसोबतची त्यांची मैत्री अनेकदा कसोटीस लागली, तरीसुद्धा त्यांनी त्याच्या सुखदुःखात त्याला साथ देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. (योहान ६:२६, ५६, ६०, ६६-६८ वाचा.) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री, त्याने त्याच्या प्रेषितांवर त्याचे किती प्रेम होते हे व्यक्‍त केले. त्याने म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा.”—लूक २२:२८.

११, १२. येशूने आपल्या शिष्यांना कशा प्रकारे आपल्या मैत्रीचे पुन्हा आश्‍वासन दिले आणि शिष्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

११ शिष्यांच्या एकनिष्ठेबद्दल येशूने त्यांची प्रशंसा केल्यानंतर काही काळातच, ते त्याला एकटे टाकून निघून गेले. मनुष्यांच्या भीतीमुळे थोड्या वेळासाठी का होईना पण त्यांना ख्रिस्तावरील प्रेमाचा विसर पडला. पुन्हा एकदा येशूने त्यांना माफ केले. त्याचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यावर त्याने त्यांची भेट घेऊन आपल्या मैत्रीचे त्यांना आश्‍वासन दिले. शिवाय, “सर्व राष्ट्रांतील लोकांस” शिष्य बनवणे आणि “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” त्याच्याविषयी साक्ष देणे ही महत्त्वाची कामगिरी देखील त्याने त्यांच्यावर सोपवली. (मत्त. २८:१९; प्रे. कृत्ये १:८) याला शिष्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

१२ शिष्यांनी राज्य संदेशाचा प्रचार करण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले. पवित्र आत्म्याच्या पाठबळामुळे त्यांनी लवकरच सबंध जेरूसलेम आपल्या शिक्षणाने भरून टाकले. (प्रे. कृत्ये ५:२७-२९) मृत्यूच्या भीतीनेसुद्धा त्यांना शिष्य बनवण्याच्या येशूच्या आज्ञेचे पालन करण्यापासून परावृत्त केले नाही. शिष्य बनवण्याबद्दल येशूकडून आज्ञा मिळाल्याच्या काही दशकांतच प्रेषित पौल असे लिहू शकला की “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार झाला आहे. (कलस्सै. १:२३) खरोखर, येशूच्या शिष्यांनी दाखवून दिले की त्यांना त्याची मैत्री अतिशय प्रिय होती!

१३. येशूच्या शिष्यांनी त्याच्या शिकवणींचा स्वतःवर कोणकोणत्या मार्गांनी प्रभाव पडू दिला?

१३ जे लोक येशूचे शिष्य बनले त्यांनी येशूच्या शिकवणींचा आपल्या वैयक्‍तिक जीवनात अवलंब केला. यासाठी बऱ्‍याच जणांना आपल्या आचरणात आणि व्यक्‍तिमत्त्वात अनेक मोठे बदल करावे लागले. नव्यानेच येशूचे शिष्य बनलेल्यांपैकी काही जण पूर्वी समलिंगी, व्यभिचारी, मद्यपी किंवा चोर होते. (१ करिंथ. ६:९-११) काहींना इतर वंशांच्या लोकांबद्दल असलेला त्यांचा दृष्टिकोन बदलावा लागला. (प्रे. कृत्ये १०:२५-२८) तरीही, त्यांनी येशूच्या आज्ञेचे पालन केले आणि जुन्या व्यक्‍तिमत्त्वाचा त्याग करून नवे व्यक्‍तिमत्त्व धारण केले. (इफिस. ४:२०-२४) तसेच, त्यांनी “ख्रिस्ताचे मन” म्हणजे त्याचे आचारविचार जाणून घेऊन त्याचे अनुकरण केले.—१ करिंथ. २:१६.

आज ख्रिस्तासोबत मैत्री करणे

१४. जगाच्या अंतसमयादरम्यान येशूने काय करणार असल्याचे वचन दिले?

१४ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांपैकी अनेक जण येशूला वैयक्‍तिकपणे ओळखत होते किंवा त्याच्या पुनरुत्थानानंतर त्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते. अर्थातच, आपल्याला ही अद्‌भुत सुसंधी मिळाली नाही. तर मग, आपण कशा प्रकारे ख्रिस्ताचे मित्र बनू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाद्वारे मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे पालन करणे. या दास वर्गात आज पृथ्वीवर जिवंत असलेल्या येशूच्या अभिषिक्‍त बांधवांचा समावेश आहे. येशूने वचन दिले होते की जगाच्या अंतसमयादरम्यान तो या दासाला “आपल्या सर्वस्वावर” नेमील. (मत्त. २४:३, ४५-४७) आज, ख्रिस्ताचे मित्र होऊ इच्छिणाऱ्‍यांपैकी बहुतेक जण या दास वर्गाचे सदस्य नाहीत. मग, विश्‍वासू दास वर्गाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाला ते ज्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवतात त्याचा ख्रिस्तासोबतच्या त्यांच्या मैत्रीवर कसा प्रभाव पडतो?

१५. एक व्यक्‍ती मेंढरांपैकी असेल की शेरडांपैकी हे कशावरून ठरवले जाईल?

१५मत्तय २५:३१-४० वाचा. विश्‍वासू दास वर्गाचा भाग होणाऱ्‍यांना येशूने आपले बांधव म्हटले. शेरडांपासून मेंढरांना वेगळे केले जाण्याविषयीच्या दृष्टान्तात येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले होते की त्याच्या बांधवांना दिलेली वागणूक जणू त्यालाच दिल्यासारखी आहे. त्याने तर असेही म्हटले, की एका व्यक्‍तीची गणना शेरडांत होईल किंवा मेंढरांत, हे तिने येशूच्या “कनिष्ठ बंधूंपैकी” एकालाही ज्या प्रकारची वागणूक दिली त्यावरून ठरवले जाईल. म्हणूनच, पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले, येशूचे मित्र बनण्याची आपली इच्छा प्रामुख्याने विश्‍वासू दास वर्गाला सहकार्य करण्याद्वारे व्यक्‍त करतात.

१६, १७. ख्रिस्ताच्या बांधवांप्रती आपली मैत्री आपण कशा प्रकारे व्यक्‍त करू शकतो?

१६ तुम्ही देवाच्या राज्यात पृथ्वीवर जगण्याची आशा बाळगत असाल, तर ख्रिस्ताच्या बांधवांप्रती तुम्ही आपली मैत्री कशा प्रकारे व्यक्‍त करू शकता? याचे तीन मार्ग आपण पाहू या. पहिला मार्ग म्हणजे, प्रचार कार्यात मनापासून भाग घेणे. ख्रिस्ताने त्याच्या बांधवांना जगभरात सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा दिली होती. (मत्त. २४:१४) पण, ख्रिस्ताच्या बांधवांपैकी आज पृथ्वीवर राहिलेल्यांना, त्यांचे सोबती असलेल्या दुसऱ्‍या मेंढरांच्या मदतीशिवाय ही जबाबदारी पार पाडणे अतिशय कठीण गेले असते. त्याअर्थी, जेव्हा जेव्हा दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्य प्रचार कार्यात भाग घेतात, तेव्हा तेव्हा ते ख्रिस्ताच्या बांधवांना त्यांची ही महत्त्वाची कामगिरी पूर्ण करण्यास मदत करतात. दुसऱ्‍या मेंढरांच्या या मैत्रीची येशूप्रमाणेच विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गही मनापासून कदर करतो.

१७ दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्य ख्रिस्ताच्या बांधवांना ज्या आणखी एक मार्गाने मदत करतात तो म्हणजे प्रचार कार्याला आर्थिकदृष्ट्या साहाय्य करणे. येशूने आपल्या अनुयायांना “अनीतिकारक धनाने” आपल्याकरता मित्र जोडण्याचे प्रोत्साहन दिले. (लूक १६:९) याचा अर्थ आपण येशूची किंवा यहोवाची मैत्री विकत घेऊ शकतो असे नाही. उलट, राज्याशी संबंधित कार्यांकरता आपल्या धनसंपत्तीचा उपयोग करण्याद्वारे आपण आपली मैत्री आणि प्रेम केवळ शब्दांनीच नव्हे, तर “कृतीने व सत्याने” व्यक्‍त करतो. (१ योहा. ३:१६-१८) उदाहरणार्थ, जेव्हा आपण प्रचार कार्यात भाग घेतो, आपल्या उपासना स्थळांचे बांधकाम व देखभाल करण्याकरता आणि जगभरात केल्या जाणाऱ्‍या प्रचार कार्याकरता देणग्या देतो, तेव्हा आपण आर्थिक साहाय्य करण्याद्वारे ख्रिस्ताच्या बांधवांप्रती मैत्री व प्रेम व्यक्‍त करतो. आणि आपण आनंदाने दिलेल्या या दानाची यहोवा आणि येशू मनापासून कदर करतात, मग आपण दिलेली रक्कम छोटी असो वा मोठी.—२ करिंथ. ९:७.

१८. मंडळीतील वडिलांकडून मिळणाऱ्‍या बायबलवर आधारित मार्गदर्शनाचे आपण पालन का केले पाहिजे?

१८ आपण ख्रिस्ताचे मित्र आहोत हे दाखवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे मंडळीतील वडिलांकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे पालन करणे. मंडळीतील वडिलांना येशूच्या मार्गदर्शनाखाली पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केले जाते. (इफिस. ५:२३) प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपल्या अधिकाऱ्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा.” (इब्री १३:१७) कधीकधी, आपल्याला मंडळीतील वडिलांकडून मिळणारा बायबलवर आधारित सल्ला स्वीकारणे कठीण वाटेल. त्यांच्यात असलेल्या उणिवांमुळे, दोषांमुळे कदाचित त्यांच्याकडून मिळणाऱ्‍या सल्ल्याकडे आपण चुकीच्या दृष्टिकोनातून पाहण्याची शक्यता आहे. पण, मंडळीचे मस्तक असलेला ख्रिस्त या अपरिपूर्ण मनुष्यांचा उपयोग करतो. त्यामुळे, त्यांच्या अधिकाराप्रती आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो याचा ख्रिस्तासोबतच्या आपल्या मैत्रीशी थेट संबंध आहे. जेव्हा आपण मंडळीतील वडिलांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करून आनंदाने त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करतो, तेव्हा ख्रिस्तावर आपले प्रेम असल्याचे आपण दाखवतो.

चांगले मित्र कोठे मिळू शकतात?

१९, २०. ख्रिस्ती मंडळीत आपल्याला कशा प्रकारचे मित्र सापडतात आणि पुढील लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

१९ मंडळीत आपली प्रेमळपणे देखभाल करणारे वडीलच नव्हे, तर अनेक आध्यात्मिक आया, भाऊ आणि बहिणी देखील देऊन येशू आज आपली काळजी घेत आहे. (मार्क १०:२९, ३० वाचा.) तुम्ही पहिल्यांदा यहोवाच्या संघटनेच्या सहवासात आला तेव्हा तुमच्या नातेवाइकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? कदाचित, त्यांनी देवाच्या आणि ख्रिस्ताच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला मदत केली असेल. पण, येशूने ताकीद दिली होती की कधीकधी “मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” (मत्त. १०:३६) म्हणूनच, मंडळीत सख्ख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करणारे मित्र सापडतात हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो!—नीति. १८:२४.

२० प्रेषित पौलाने रोममधील मंडळीला लिहिलेल्या पत्राच्या शेवटी आढळणाऱ्‍या त्याच्या प्रेमळ अभिवादनांतून दिसते की त्याने अनेकांशी घनिष्ठ मैत्रीसंबंध जोडले होते. (रोम. १६:८-१६) प्रेषित योहानाने आपल्या तिसऱ्‍या पत्राचा शेवट या शब्दांनी केला: “मित्रमंडळींना ज्याच्या त्याच्या नावाने सलाम सांगा.” (३ योहा. १४) याचा अर्थ त्यानेही अनेकांशी घनिष्ठ मैत्रीसंबंध जोडले होते. मंडळीतील आपल्या बंधूभगिनींशी घनिष्ठ मैत्रीसंबंध जोडण्याद्वारे व ते टिकवून ठेवण्याद्वारे आपण येशूच्या व पहिल्या शतकातील त्याच्या शिष्यांच्या उदाहरणाचे कशा प्रकारे अनुकरण करू शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात दिले जाईल.

तुमचे उत्तर काय असेल?

• चांगला मित्र असण्याबद्दल येशूने कोणते उत्तम उदाहरण मांडले?

• येशूच्या मैत्रीप्रती त्याच्या शिष्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

• ख्रिस्ताचे मित्र असल्याचे आपण कशा प्रकारे दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

येशू आपल्या शिष्यांचे विचार व भावना काय आहेत हे ऐकून व समजून घेण्यास उत्सुक होता

[१६ पानांवरील चित्रे]

आपण ख्रिस्ताचे मित्र होऊ इच्छितो हे आपण कशा प्रकारे दाखवू शकतो?